Skip to main content

मी आणि पोलीस

लेखक आजी यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

मी आणि पोलीस (पांढऱ्या शर्टातला आणि खाकी शर्टातला.)

 

माझ्या समोरच्या खुर्चीत एक पोलीस इन्स्पेक्टर बसले होते. नो. नो. नो. ते माझी चौकशी उर्फ इंटराॅगेशन करत नव्हते. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी पूर्वी त्यांची एक मुलाखत घेतली होती, तेव्हापासून आमची ओळख झाली होती.
    
मी विचारलं, "काय हो मानेसाहेब, सिनेमात आम्ही असं पाहतो की, हिरोची आणि व्हिलनची मारामारी चालू असते, एखाद्या गोदामात. तिथे जुनी पत्र्याची पिंपं आणि मोठमोठे खोके असतात. खूप ठोसे मारल्यावर 'कुत्ता कमीना' व्हिलन जखमी होऊन खाली पडतो. नायिकेची सुटका होते. हिरो आणि हिराॅइन मिठी मारतात. आणि सर्वात शेवटी पोलीस येतात. काय उपयोग इतक्या उशिरा येऊन? ते आधी का नाही येत? ते काय व्हिलनला आणि त्याच्या गॅंगला फक्त हातकड्या घालण्यापुरते येतात काय! पोलीस शेवटीच येणार? सगळं उरकल्यानंतर? असंच प्रत्यक्षातही घडतं का?"

यावर इन्स्पेक्टर माने हसून म्हणाले (हसणारा पोलीस! आईशपथ!), "अहो मॅडम, आम्ही आधी कसे येणार? मुळात गुन्हा घडला तर पाहिजे. त्याबद्दल आम्हाला कळलं तर पाहिजे. मगच आम्ही येणार! आणि सिनेमात दाखवतात तशी लुटुपुटीची लढाई आमच्या लाइफमध्ये नसते, बरं का! खांबाला बांधून ठेवलेली सुंदर नायिकाही नसते. हिरोसारखे लांब केस वाढवायचीही आम्हाला परमिशन नसते. अशा एखाद्या धाडमारीत आम्ही जबर जखमी होऊ शकतो. आमचा जीवही जाऊ शकतो. आमच्यासमोर अतिशय क्रूर, निष्ठुर, डेंजरस गुन्हेगार असतात. शिवाय आम्ही नेहमीच उशिरा येतो असं नाही. आम्हाला गुन्ह्याची माहिती मिळाली की आम्ही आधीच दबा धरून बसतो. बेसावध गुन्हेगारांवर हल्ला करतो. त्यांना पकडतो. यातही आमच्या जिवाला धोका असतो. म्हणजे आमची ॲक्शन गुन्हा घडण्याआधीही सुरू असते. आम्ही नेहमीच उशिरा येतो असं नाही."

"डोन्ट माइंड. मी गंमत केली." मी म्हटलं.

"मलाही ती कळली! पोलिसांचाही सेन्स ऑफ ह्युमर जागा असतो, बरं का!" माने हसत म्हणाले.

मानेसाहेब निघून गेले आणि माझ्या मनात विचार आले. खरंच सिनेमाने पोलिसांना किती बदनाम केलं आहे. त्यांची प्रतिमा किती मलीन केलीय. सिनेमातला पोलीस लाचखोर, कामचुकार, झोपा काढणारा, किंवा विनोदनिर्मिती करणारा, विदूषक असा दाखवला जातो. किंवा एकदम दुसरं टोक गाठतात. डायलाॅग रायटरने एकाच वाक्यात तीन वेळा 'वर्दी' शब्द वापरला असेल, तर तितक्यांदा हिरो ते शब्द ओरडत उच्चारतो. "अपना फर्ज निभानेके लिए अपना एकलौता बेटा, माॅं, और बिवीको दांवपर लगा सकता हूं" अशी फिल्मी वाक्यं फेकतो. \

तर ते असो.

प्रत्येक क्षेत्रात बरी, वाईट माणसं असतात. असं म्हणतात की माणसानं कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी चढू नये. (तशा इतरही अनेक 'पायऱ्या' असतात, ज्या माणसाने चढू नयेत अशा असतात.) पण कोणता तरी गुन्हा करून नाही, तर गरज पडल्यास पोलिसांची पायरी चढावी. पोलीस आपल्याला मार्गदर्शन करतो, मदत करतो. तो जनतेचा मित्र, हितचिंतक, संकटविमोचक आणि रक्षक असतो असा विश्वास ठेवून बघावा. 

माझी पोलिसाशी पहिली गाठ पडली ती पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालणाऱ्या ट्रॅफिक कंट्रोलरशी.

माझ्या पगारातून पैसे साठवून मी एक ल्यूना घेतली. महत्प्रयासाने ड्रायव्हिंगही शिकले. फायनल लायसन्स मिळवण्याआधी मी दोनदा लर्निंग लायसन्स काढलं होतं. मला एकूणच वेगाची भीती वाटते. मी एकदा घाटातून वेगाने वळणं घेत एस.टी. चालवणाऱ्या एका ड्रायव्हरलाही बिनधास्तपणे कंडक्टरबरोबर निरोप पाठवला होता, "गाडी हळू चालवा म्हणावं. आम्हाला 'वन पीस'मध्ये घरी पोहोचायचं आहे."

एका भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षावाल्याला त्याची मागून मान पकडून, ओरडून सांगितलं होतं की रिक्षा हळू चालवा. फक्त पायलटला कधी सांगितलं नाही की विमान हळू चालवा म्हणून. एकूण मला वेगाची भीती वाटते. त्यामुळे मी माझी ल्यूना, नंतर घेतलेली टीव्हीएस, त्यानंतर घेतलेली सनी आणि कायनेटिक ह्या सर्व गाड्या अतिशय हळू चालवायची. मी हॅंडल इतकं घट्ट पकडून धरायची की माझ्या तळहातांना घाम यायचा. मी कधीही कुणालाही ओव्हरटेक केलं नाही. मी एका पायाने, क्वचित दोन्ही पायांनी जमिनीवर तोल सांभाळत गाडी चालवायची. माझे डोळे विस्फारून समोरच्या रस्त्याकडे एकटक बघत मी गाडी चालवत असे. मी कधीही कुणालाही डबल सीट घेतलं नाही. तर एवं गुणविशिष्ट अशी मी ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला गेले.

आणि अहो आश्चर्यम्! मला अगदी लग्गेच पर्मनंट लायसन्स मिळालं. गाडी न चालवताच लायसन्स द्यावं इतकी मी सुंदर वगैरे नव्हते. आत्ताही नाही. पण त्याने मला चार-पाच नियम विचारले आणि जेमतेम वीस मीटर्स गाडी चालवायला सांगितलं. मी तेवढ्यापुरती अगदी सराईतपणाचा आव आणून ल्यूना चालवून दाखवली आणि टेस्टमध्ये पास झाले. या 'जेमतेम'वरून आठवलं. अजितेम नावाचा आमचा एक मित्र आहे, त्याला आम्ही 'जेमतेम' म्हणून हाक मारतो.

त्यानंतर कित्येक वर्षांत मला कधीही, कुठल्याही ट्रॅफिक पोलिसाने हटकलं नाही की माझं लायसन्स तपासलं नाही. पाठीत कुबड काढून सीटवर बसलेल्या, हळूहळू गाडी चालवणाऱ्या आणि भेदरट अशा माझी दया येऊन पोलिसांनी मला न अडवता पुढे जाऊ दिलं.

पण त्यामुळेच एक बाका प्रसंग उद्भवला. मी आणि माझी मैत्रीण सिनेमाला गेलो होतो.  सिनेमा मी दाखवणार होते. माझी गळ्यात अडकवलेली पर्स तिच्या हातात देत मी म्हटलं, "तू पुढे जाऊन तिकीटं काढ. मी गाडी पार्क करून येते."

मी वळले, एवढ्यात एका पांढऱ्या शर्टवाल्या वाहतूक नियंत्रकाने मला हटकलं आणि लायसन्स दाखवायला फर्मावलं. माझ्या पर्समध्ये माझं लायसन्स होतं आणि पर्स मैत्रीण आत घेऊन गेली होती. मी त्या पोलीसदादांना वस्तुस्थिती सांगितली. तो म्हणाला, "बरं जा. यापुढे लायसन्स स्वतःजवळ ठेवत जा." मी आज्ञाधारकपणे मान डोलावली.

नंतर काय गंमत झाली, मी घरी जाऊन माझं लायसन्स पाहिलं. मी ते कित्येक वर्षांत पाहिलंच नव्हतं. आत्ता पाहिलं, तर ते दोन वर्षांपूर्वीच एक्स्पायर झालं होतं. श्रीपोलीसकृपेने गेल्या दोन वर्षांत ते कोणत्याही पोलिसाच्या नजरेत आलं नव्हतं. ऑनलाइन सिस्टिम त्या वेळी अजून खूप दूर होती. पण आता लक्षात आल्यावर मात्र ते दंड भरून रिन्यू करणं भाग होतं. मी ऑफिसात रजा टाकून त्याच सनीवरून बेकायदेशीररीत्या आर टी ओ ऑफिसमध्ये गेले. तिथल्या लांबलचक रांगेत उभी राहिले आणि 'त्या महत्त्वाच्या' खिडकीजवळ माझा नंबर कधी येतोय, याची वाट बघत राहिले. मला माझ्या पुढेच उभ्या असलेल्या बेजार, कंटाळलेल्या, ताटकळलेल्या माणसाने संपूर्ण प्रक्रिया सांगितली. एकूण चौऱ्यांशी लक्ष कटकटींचा फेरा होता. वर आकाशात 'देसी ताप परि जसा वरवरी येशी नभी भास्करा' या काव्यपंक्तीना जागून सर्व शक्ती एकवटून सूर्यमहाराज ऊन भसाभसा ओतत होते. जवळचं बाटलीतलं पाणी संपलं होतं. 'अंगे भिजली घर्मधारांनी' अशी सर्वांची अवस्था झाली होती. इतक्यात एक शिपाई माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला "मॅडम, सूर्यवंशीसाहेबांनी तुम्हांला ऑफिसमध्ये बोलावलं आहे."

मी म्हटलं, आता हे काय आणखी यडताक! मला कशाला बोलावलंय ह्याच्या साहेबाने? मी वैतागून त्या शिपायाच्या मागे गेले, तर त्याने मला थेट आरटीओ सूर्यवंशीसाहेबांच्या केबिनमध्ये नेलं. आम्ही एकमेकांना ओळखत होतो. मी मागच्याच महिन्यात त्यांच्याबरोबर लाइव्ह डायल इन कार्यक्रम केला होता. त्यांनी मला त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं आणि ते हसत हसत (पुन्हा एकदा हसणारा पोलीस!) मला म्हणाले, "मॅडम, कशाला उन्हात, रांगेत उभ्या राहिल्या होतात? सरळ इकडं यायचं ना? काय काम काढलंत?"

"लायसन्स रिन्यू करायला आले आहे."

"द्या इकडे."

मी माझं लायसन्स त्यांना दिलं. सूर्यवंशीसाहेबांनी एका माणसाला बोलावलं आणि म्हणाले, "हे रिन्यू करायला ठेवून घ्या. आणून द्या. आणि जाता जाता दोन कप चहा सांगा."
मग आम्ही गप्पा मारत बसलो. चहा आला. तो पिऊन संपतो न संपतो, तोच माझं लायसन्स रिन्यू करण्यासाठी योग्य जागी पोहोचलं आणि नंतर मोजून दहा मिनिटांत सह्या-शिक्के मारून थेट हातातसुद्धा आलं! पोलीस मदत करतात याचा अनुभव घेतला. पण त्याच वेळी उन्हात, रांगेत उभ्या असलेल्या माणसांची आठवण होऊन अपराधीपणाची भावना मनात निर्माण झाली. खरं तर आपण असा आपल्या पदाचा फायदा घ्यायला नको होता असं वाटलं. चूकच झाली माझी. साॅरी.

माझी नोकरीच आधी प्रिंट मीडिया आणि मग रेडिओसारख्या माध्यमात असल्यामुळे अनेक सामान्य आणि त्याचबरोबर उच्चपदस्थ अधिकारी माझ्या ओळखीचे झाले होते. एका जिल्ह्याचे डी एस पी माझ्या ओळखीचे झाले होते. 'एक गाव, एक गणपती' ही योजना ते त्यांच्या जिल्ह्यात राबवत होते. या अभिनव आणि अत्यावश्यक कल्पनेबद्दल श्रोत्यांना माहिती व्हावी, म्हणून मी त्यांची एक मुलाखत घेतली. तेव्हा आमची चांगलीच ओळख झाली. मी त्यांना म्हटलं, "माझ्या एका मालिकेसाठी मला अगदी जगावेगळी माणसं हवी आहेत. तुम्ही शिक्षा भोगून बाहेर आलेला एखादा कैदी, माफीचा साक्षीदार, सुधारलेला गुन्हेगार अशी आत्मकथन करणारी माणसं देऊ शकता का?"

"नक्कीच देईन."

त्यांनी तशी माणसं रेडिओवर बोलण्यासाठी तर दिलीच, त्याचबरोबर एक आगळंवेगळं नावही सांगितलं. तो होता एक 'डमी' म्हणून दुसऱ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहायचा. त्याचं ओळखपत्र वगैरे सगळं 'मॅनेज' केलं जायचं. यात तो पकडला गेला. त्याला शिक्षा झाली. पण नंतर तो सुधारला. माझी ती कार्यक्रममालिका श्रोत्यांना खूपच आवडली.

हे एक कर्तबगार, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मला भेटले. त्यांना पुढे अनेक सेवा पदकं मिळाली. त्यांचं एक पुस्तकही प्रकाशित झालं. त्या प्रकाशन समारंभाला, त्यांच्या आमंत्रणावरून मी आवर्जून उपस्थित राहिले होते. पुस्तक चांगलं लिहिलं होतं. त्यावरून पोलीस हा एक चांगला लेखकही असू शकतो, हे जाणवलं.

एकदा खूपच मोठी गंमत झाली. मी काम करत असलेल्या जिल्ह्यातील डीवायएसपी साहेबांना एका रेकॉर्डिंगसाठी बोलावलं होतं. ध्वनिमुद्रण झालं. त्यांना मानधनाचा चेक देण्यासाठी मी त्यांना ड्यूटीरूमला घेऊन गेले. त्यांना बसायला सांगून मी चेक देणार, एवढ्यात त्यांनीच खिशातून पाचशे रुपये काढले. "फी कॅशने भरायची की चेक देऊ?" मी आश्चर्याने विचारलं, "कसली फी"? त्यांना पाठवलेलं प्रसार भारतीचं करारपत्र खिशातून बाहेर काढून ते म्हणाले, "हे काय! इथं टाईप केलंय ना फी रुपये ५०० म्हणून!" मला फक्कन् हसू फुटलं. "अहो, ती फी तुम्ही आम्हाला द्यायची नाहीये. ती तुमच्या आजच्या भाषणाच्या ध्वनिमुद्रणाबद्दल आकाशवाणीने तुम्हाला दिलेली फी आहे. हा घ्या तुमचा पाचशे रुपयांचा चेक." ते वरमले. मी त्यांची फिरकी घेत म्हटलं, "पैसे नेहमी पोलिसाला दिले जातात. पण आज चक्क पोलिसाने कुणाला तरी पैसे देऊ केले. हे अघटित घडलं." तेही मोकळेपणाने हसले. त्यांनी माझा टोमणा लाइटली घेतला.

आणखी एक ''पोलीसप्रसंग'.  माझं परदेशी जायचं ठरत होतं. पण पासपोर्टच काढलेला नव्हता. सगळं काम झालं होतं. पण माझ्या स्थानिक पत्त्याच्या संदर्भात मला माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. काम पाच मिनिटांत होणार होतं. पण संबंधित अधिकारी एका रूममध्ये कामात आहेत, असं कळलं. इतक्यात मला अत्यंत करुण असा रडण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कोण रडतंय ते बघण्यासाठी मी पुढे एका खोलीपाशी गेले, तर एका मुलाला गुडघ्यात अर्धवट वाकवून, खूप अवघडलेल्या स्थितीत उभं केलं होतं. त्याला हातही पुढं करायला लावले होते. तो रडत होता आणि एक पोलीस कर्मचारी त्याला लाकडी सोट्याने मारत होता. मी असं दृश्य यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मी खूप घाबरले. माझे पाय लटपट कापू लागले. डोळ्यांत पाणी आलं. मला बघून ते मारायचे थांबले. तिथे खुर्चीवर बसलेल्या ऑफिसरने विचारलं, "काय काम आहे?"
मी म्हटलं, "ॲड्रेस व्हेरिफिकेशन हवंय. तेवढं द्या. मी जाते."
तो अधिकारी उठला. खोलीबाहेर आला. 
मी धीर एकवटून विचारलं, "का मारताय त्या मुलाला?"

"अहो, काल रात्री एका लग्नात या पोराने आणि त्याच्या गॅंगने दारू पिऊन एका लग्नात राडा केला. नवऱ्या मुलीचा हात धरला. कबूल करत नाहीये. बाकीची पोरं पळून गेली. हा सापडला."

मी यावर काय प्रतिक्रिया देणार? मला पोलिसांची एक वेगळी बाजू दिसली.

संशयिताला असं मारताना पोलीसांच्या मनालाही त्रास होत असेल का?

यापुढचा प्रसंग थोडा धाडसी आणि थोडा चित्तथरारक आहे. मी त्या वेळी एका निमशहरी नोकरी करत होते. मी, माझे पती आणि आमचा मुलगा असे आम्ही राहात होतो. माझे पतीही त्याच गावात नोकरी करत होते. आमच्या शेजारी एक पत्नी आणि त्यांचा मुलगा असे राहात होते. आमची खूपच चांगली मैत्री झाली होती. या बाईंना अचानक कुणीतरी निनावी फोन करून त्रास द्यायला लागला. फोनवर तो नेहमी असभ्य भाषेत बोलत असे. बाईंच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष असे आणि तो फोनवर तसा उल्लेख करत असे. बाईंनी ही गोष्ट मला सांगितली.  मी म्हटलं, "फोन सतत येताहेत त्याअर्थी ते फोन त्याला फुकटात पडताहेत. (त्या वेळी मोबाइल्स नव्हते.) तो स्वतःचा फोन इतका सतत वापरणार नाही, कारण त्याला त्याचे पैसे पडतील आणि कोणी पोलिसात गेलं तर त्याचा थेट फोन नंबरही डिटेक्ट होईल. फोन फुकटात करतोय याचा अर्थ तो ते टेलिफोन एक्स्चेंजमधून करतोय किंवा टेक्निशियन असेल. आणि तो तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवतोय याचा अर्थ तुम्ही त्याला दिसताय, म्हणजे तो जवळपासच कुठेतरी आहे.

एका रात्री बाईंना त्याचा फोन आला, "सांगतो त्या ठिकाणी मला भेटायला ये." त्याने एक स्पाॅट सांगितला. बाईंना टेन्शन आलं. आमच्या दोघींचेही पती अजून कामावरून घरी आले नव्हते. बाईंनी मला हे सगळं सांगितलं. मी म्हटलं, "मी जाते त्या स्पाॅटवर. तुम्ही घरीच थांबा. माझ्या मुलाला सांभाळा. बघू तरी तो कोण माणूस आहे तो!"

मी धाडसी स्वभावाची होते. तरुण होते. बाई नको म्हणत असतानाही मी बिनदिक्कतपणे त्याने सांगितलेल्या स्पाॅटवर गेले. रात्र झाली होती. नीट काही दिसत नव्हतं. मी त्या स्पाॅटवर पाच मिनिटं उभी राहिले. सगळा परिसर नीट निरखून पाहिला. तिथे कुणीही नव्हतं.

मी घरी परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आम्ही दोघीही आपापल्या नवऱ्यांना घेऊन डीएसपी ऑफिसमध्ये गेलो. डीएसपी साहेबांनी माझ्या समोर हात जोडून विनंती केली, "मॅडम, प्लीज पुन्हा असं भलतं धाडस करू नका. आम्ही आहोत ना! मी तपास सुरू करतोय. आजपासून, आत्तापासूनच तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देतो. चोवीस तास तुमच्या दाराशी साध्या वेशातला पोलीस उभा असेल. तुम्ही जिथे जाल तिथे तो तुम्हाला फाॅलो करेल."

नंतर फोन यायचे बंद झाले. बाई निश्चिंत झाल्या.

एका शहरात मी नोकरी करत असताना मी त्या शहरातील 'महिला दक्षता समिती'चीही सदस्य होते. आमची दरमहा एक मीटिंग होत असे. त्या मीटिंगमध्ये एक पोलीस काॅन्स्टेबलही त्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून येत असे. एका घरकामवालीला तिचा नवरा मारहाण करत असे. रात्री घराबाहेर उभं करत असे. तिने ही परिस्थिती मला सांगितली. मी आमच्या समितीतील पोलिसाला हे सांगितलं. म्हटलं, "एकदा त्या बाईंच्या घरी जाऊन तिच्या नवऱ्याला समज द्या ना!"

आमच्या पोलीसदादांनी तिच्या नवऱ्याला योग्य ती 'समज' दिली आणि तेव्हापासून त्या कामवाल्या बाईचा छळ बंद झाला. मला वाटतं, आपणही पोलिसांना माहिती दिली पाहिजे. सहकार्य केलं पाहिजे.

असे हे माझे पोलिसांबद्दलचे अनुभव!

मातांनो, बापांनो, लहानपणापासूनच आपल्या मुलांना 'पोलीस येऊन पकडून नेईल हं' अशी भीती घालू नका. पोलिसांची कर्तव्यदक्षता, जनतेला मदत करण्याची त्यांची वृत्ती, त्यांची ताकद, त्यांचं कठोर प्रशिक्षण, त्यांची मेहनत, रात्रंदिवस ते करत असलेले कष्ट हे सगळंच 'सर ऑंखोपर!'

आपण दिवाळी साजरी करतोय, पण ते बंदोबस्तासाठी तासन् तास उभे राहिले आहेत. ते दिवाळी साजरी करू शकत नाहीयेत.

त्यांना कडक सॅल्यूट!

दिवाळी अंक वर्ष

वाचने 82
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया