Skip to main content

'लक्ष हेच लक्ष्य'

लेखक Yogesh Haribhau Kulkarni यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

[२१व्या शतकातील सर्वात मौल्यवान साधन म्हणजे तुमचं लक्ष (अटेन्शन) आणि काही वर्षांपासून त्याच्यावर कोणीतरी ताबा मिळवत आहे. प्लेटोच्या गुहेतल्या सावल्यांप्रमाणे आजचा माणूस सोशल मीडियाने आणि अल्गोरिदमने दाखवलेलं वास्तव खरं मानतो आहे का, आणि त्यातून सुटण्यासाठी आपलं लक्ष, जे एकमेव खरोखर तुमचं आहे, ते कसं जपायचं? याबद्दल हा लेख.]

 

 

कल्पना करा, तुम्ही आतापर्यंत कधीच सूर्यप्रकाश पाहिलेला नाही. एका अंधाऱ्या गुहेत तुमचा जन्म झाला आहे. तुम्ही साखळदंडांनी जखडलेले आहात आणि तुमचं तोंड गुहेच्या भिंतीकडे आहे. मागे एक मोठी आग पेटलेली आहे. तिथून काही जण वेगवेगळ्या वस्तू हलवत आहेत आणि आगीच्या उजेडात त्यांच्या सावल्या भिंतीवर पडत आहेत. त्या सावल्या हेच तुमचं संपूर्ण जग. तुम्ही त्यांना नावं देता, त्यांच्यावर चर्चा करता, वाद घालता आणि ठामपणे मानता की हेच खरं आहे. बाहेर सूर्य आहे, नदी आहे, झाडं आहेत याची तुम्हाला कल्पनाही नाही. ही ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोची गुहेची उपमा, सुमारे २,४०० वर्षांपूर्वी लिहिलेली. आता अस्वस्थ करणारा एक प्रश्न - ही गुहा फक्त जुनी गोष्ट आहे की तुम्ही या क्षणीही सावल्याच पाहत आहात? तुमचं अखंड स्क्रोलिंग, व्हॉट्सॲपवर येणारे संदेश, तुमच्या रील्स हे सगळं एक काळजीपूर्वक रचलेलं नाटक असेल तर? आणि तो प्रोजेक्टर कुठेतरी कुणीतरी चालवत असेल तर? आग कुणाच्या हातात आहे? सावल्या कुणाच्या इशाऱ्यावर नाचतायत?

 

इतिहास पाहिला, तर बहुतेक मोठ्या समाजांवर मूठभर कुटुंबांनी आणि संस्थांनीच राज्य केलं आहे. रोमन साम्राज्य युरोपपासून उत्तर आफ्रिकेपर्यंत पसरलं होतं, पण खरी सत्ता काही शे घराण्यांच्या हातात होती. या मूठभर लोकांनी समाजाला मुठीत ठेवण्यासाठी तीन मार्ग वापरले - अर्थव्यवस्था (पैसा, बँका), श्रद्धा (धर्म, विज्ञान, विचारधारा) आणि माहिती (हेरगिरी, माध्यमं). हे तिन्ही खांब एकमेकांना धरून उभे असतात. त्यांच्या जोरावर एकही गोळी न झाडता अख्खा समाज चालवता येतो. पैशावर ताबा म्हणजे माणसाच्या जगण्यावर ताबा. श्रद्धेवर ताबा म्हणजे माणसाने काय इच्छावं यावर ताबा. माहितीवर ताबा म्हणजे खरं काय, हे ठरवण्यावर ताबा. तिन्ही एकत्र आले की साम्राज्य बिनतक्रार चालतं.

 

समाजाची रचना एखाद्या मोठ्या कंपनीसारखी समजा. मालकी थोड्या श्रीमंत कुटुंबांकडे. वकील, प्राध्यापक, पत्रकार, सरकारी अधिकारी हे व्यवस्थापक. आणि बाकी सगळे कामगार. कंपनी नीट चालली असताना व्यवस्थापक कामगारांना चांगली वागणूक देतात, कारण खूश कामगार जास्त काम करतात. यालाच आपण ‘लोकशाही’ म्हणतो.
पण कंपनीवर संकट आलं की व्यवस्थापक मालकांची बाजू घेतात. आपली खुर्ची टिकवण्यासाठी ते खालच्यांवर ओझं टाकतात. रोमन साम्राज्यात, मोगल काळात, ब्रिटिश राजवटीत आणि आजच्या अमेरिकी डिजिटल साम्राज्यात हाच क्रम पुन्हा पुन्हा दिसतो.

 

प्लेटोची गुहा आणि आजचं डिजिटल युग यांच्यात चोवीस शतकांचं अंतर आहे, पण दोन्हीकडे लूट एकाच गोष्टीची होते. जुनी अर्थव्यवस्था शरीराचे श्रम लुटत होती - शेतात राबवून, खाणीत उतरवून, कारखान्यात जुंपून. नवी अर्थव्यवस्था त्याहून सूक्ष्म गोष्ट लुटते आणि आपल्याला पत्ताही लागत नाही. ती गोष्ट म्हणजे चेतना (कॉन्शसनेस). या शब्दाचा पसारा मोठा आहे, पण सोप्या भाषेत - तुमची जागरूकता, तुमची एकाग्रता, तुमचं लक्ष (अटेन्शन).

 

लक्ष म्हणजे ऊर्जा. अक्षरशः. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमची सर्जनशील शक्ती त्या दिशेने वाहते. त्यातून कामं होतात, निर्मिती होते, संपत्ती बनते. सामान्य माणसाला वाटतं ती संपत्ती आपली आहे, पण त्याचा वाटा कामगाराइतकाच असतो. खरी मालकी जगन्नियंत्या कुटुंबांकडे आणि संस्थांकडे (एलिट्सकडे) असते आणि कामगारांकडून आपल्या फायद्याचं काम कसं करून घ्यायचं, याचे मार्ग ते शोधत असतात.

 

इतिहासकार युवाल नोआ हरारी या मार्गांना ‘कथा’ (स्टोरीज) म्हणतात. त्यांच्या मते पैसा ही एक कथा आहे. रुपयाच्या नोटेला स्वतःचं असं काही मूल्य नाही, तो कागद आहे. आपण सगळे मिळून त्याला किंमत आहे असं मानतो, म्हणून तो चालतो. तोच कागद सीमेपलीकडे चालत नाही. आणि एका रात्रीत तो रद्दही होऊ शकतो, हे आपण पाहिलं आहे.

 

राष्ट्र हीसुद्धा एक कथा आहे, असं हरारी म्हणतात. शेअर बाजार हीसुद्धा एक कथाच. या गोष्टी निसर्गात कुठेच नाहीत. कोट्यवधी लोक त्यांच्याकडे लक्ष देतात आणि त्यांना खरं मानतात, म्हणून त्या टिकतात. म्हणजे जो कथा लिहितो, तो वास्तव घडवतो. आणि डिजिटल युगात कथा घडवण्याचं यंत्र इतक्या वेगाने चालतं की प्लेटोलाही ते अकल्पनीय वाटलं असतं.

 

डेटारिपोर्टलच्या पाहणीनुसार जगभरात माणूस रोज सरासरी साडेसहा तास इंटरनेटवर असतो. म्हणजे जागेपणीच्या वेळेचा मोठा तुकडा स्क्रीनसमोर. पुण्यातल्या गणपती मिरवणुकीत आता बरेच लोक बाप्पाला थेट डोळ्यांनी न पाहता फोनच्या स्क्रीनमधून पाहतात.

 

या वेळात तुम्ही काय पाहता, काय वाचता, कशावर हसता आणि कशावर चिडता, हे ठरवण्याचा अधिकार कुणाकडे आहे? एका अल्गोरिदमकडे. हजारो मैलांवर बसलेल्या अभियंत्यांनी बनवलेली ही संगणकीय यंत्रणा. तिचा एकच उद्देश - तुम्ही स्क्रीनसमोर जास्तीत जास्त वेळ बसून राहावं. आजची सर्वात प्रभावी कथा हीच आहे.

 

प्लेटोच्या गुहेतल्या कैद्यांना मागे आग आहे हे माहीतच नव्हतं, कारण ते कधी मागे वळलेच नाहीत. सोशल मीडियाचे अल्गोरिदम हेच करतात. तुम्हाला सिलिकॉन व्हॅलीतले ते अभियंते दिसत नाहीत, जे तुमचा स्क्रीनवरचा वेळ एक-दोन मिनिटांनी वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयोग करत असतात. तुम्हाला दिसतात फक्त त्या गोष्टी, ज्या तुमचे डोळे उघडे आणि अंगठा हलता ठेवण्यासाठी नेमक्या निवडल्या जातात. हे ठरवून केलं जातं. प्रत्येक मोठ्या सोशल प्लॅटफॉर्मचा धंदा सरळ आहे - तुमचं लक्ष जाहिरातदारांना विकायचं. तुम्ही जितका जास्त वेळ घालवाल, तितके तुम्ही त्यांच्यासाठी मौल्यवान. आणि राग आनंदापेक्षा जास्त वेळ बांधून ठेवतो. भीती विस्मयापेक्षा जास्त वेळ थांबवते. द्वेष आणि अफवा सगळ्यात जास्त ‘एंगेजमेंट’ देतात. म्हणून अल्गोरिदम त्याच गोष्टी पुढे ढकलतो. त्याला फक्त तुमचा वेळ आणि तुमचं लक्ष हवं आहे. तुमची मुलं, तुमचं मानसिक आरोग्य हे त्याच्या हिशोबात कुठेच नसतं.

 

एक छोटी चाचणी करून पाहा. सुटीच्या दिवशी चार तास कोणताही स्क्रीन पाहायचा नाही. कारण एकच - तुम्ही तसं ठरवलंय. मग बघा, ओढ किती लवकर लागते. एक अस्वस्थता येते. हात आपोआप फोनकडे जातो. मनात येतं, बघू कुणाचा मेसेज आलाय का, एक मिनिट बघतो आणि ठेवतो. ही सवय तुमच्यात पेरली गेली आहे. वर्षानुवर्षं, एकेका नोटिफिकेशनमधून, एकेका छोट्या बक्षिसातून (रिवॉर्डमधून) तुमचा मेंदू या यंत्राला जोडला गेला आहे. ही चाचणी जड गेली, तर तुम्ही आधीच गुहेत आहात आणि तुमच्या मानेवरची साखळी वाय-फायची आहे.

 

सोशल मीडिया ही पहिली लाट होती. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) ही दुसरी, आणि ती कितीतरी पटींनी ताकदवान आहे. सोशल मीडिया तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी निवडून दाखवत होता. एआय त्या गोष्टी स्वतःच बनवू शकते. तुमच्या भीतीनुसार, तुमच्या पूर्वग्रहांनुसार, तुमच्यासाठी खास शिवलेली कथा. कोणत्याही भाषेत, कोणत्याही वेळी, जवळपास फुकट.

 

आता भिंतीवरच्या सावल्या बोलतात. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतात आणि त्या खोट्या आहेत, हे ओळखताही येत नाही. खरा धोका असा आहे की एआय तुमच्या आधीच्या विश्वासांशी इतकं तंतोतंत जुळणारं वास्तव बनवेल की प्रश्न विचारावासा वाटणारच नाही. तुम्हाला वाटेल तुम्ही स्वतंत्रपणे विचार करताय. जो कैदी स्वतःच्या साखळ्या स्वतः घडवतो, त्याला त्या सगळ्यात कमी जाणवतात.

 

लक्ष वास्तव घडवतं. लक्ष कुठे जातं यावर ज्याचा ताबा, तो ठरवतो काय उभं राहणार, कशाला किंमत येणार आणि संपत्ती कुणाकडे वाहणार. यालाच ‘अटेन्शन इकॉनॉमी’ म्हणतात. शतकानुशतकं वसाहतवाद (कॉलोनायझेशन) म्हणजे जमीन बळकावणं आणि संसाधनं लुटणं होतं. लाकूड, मसाले, कापूस, सोनं, हिरे, सगळं इथून परदेशी गेलं. नवा वसाहतवाद मनं ताब्यात घेतो आणि लक्ष लुटतो. नव्वद कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आणि जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला भारत हा जगातल्या सर्वात मौल्यवान डिजिटल प्रदेशांपैकी एक आहे आणि तो स्वतःहोऊन दार उघडून लूट होऊ देतो आहे. आपण वापरतो ते प्लॅटफॉर्म परदेशी. आपली माहिती (डेटा, विदा) ज्या सर्व्हरवर साठवली जाते, तेही परदेशी. अल्गोरिदम परदेशात, परदेशी धंद्यासाठी आणि परदेशी मूल्यांनुसार लिहिलेले. लातूर, नाशिक किंवा कोल्हापूरमधला एखादा तरुण दिवसाचे चार-पाच तास कॅलिफोर्नियातल्या अल्गोरिदमने ठरवलेले व्हिडिओ पाहतो, तेव्हा त्याचं काहीतरी लुटलं जातं. त्याचं लक्ष, त्याची ओळख आणि ते तास जे वाचनात, शिकण्यात किंवा काहीतरी उभं करण्यात जायला हवे होते.

 

भारताच्या तरुणांचं विखुरलेलं लक्ष हीच पुढच्या दोन दशकांत भारताची सर्वात मोठी भूराजकीय कमकुवतता असेल. रील्स, सेलिब्रिटींचं गॉसिप आणि अल्गोरिदमने पेटवलेले वाद यांत बुडालेली पिढी उद्योग उभारत नाही, नवं काही घडवत नाही आणि वेळ आली तेव्हा प्रतिकारही करत नाही. जे मिळतं ते स्वीकारते आणि आणखी मागते. डिजिटल वसाहतवादासाठी तुमचा अंगठाच पुरेसा आहे. आजचा योद्धा स्क्रीनसमोर बसल्या बसल्या बेशुद्ध केला जातोय.

 

प्लेटोच्या गुहेतून सुटलेला कैदी लगेच आनंदाने नाचत नाही. उजेडाने त्याचे डोळे दिपतात, दुखतात. त्याला परत त्या ओळखीच्या अंधारात जावंसं वाटतं, जिथे सगळी उत्तरं ठाऊक होती आणि सावल्या ओळखीच्या होत्या. स्वातंत्र्य सुरुवातीला टोचतं. तरीही सुटकेचा तोच एक रस्ता आहे. बहुतेक तात्त्विक परंपरा आणि खोल धार्मिक शिकवणी एकाच उपायापाशी येतात - आपलं लक्ष परत मिळवा. ध्यान हा त्याचा एक मार्ग. शांत चित्ताने आजूबाजूचं निरीक्षण करणं हा दुसरा. दोन्हीत आपल्या लक्षाचा आपोआप, नकळत वाहणारा प्रवाह थांबवायचा आणि त्याचा लगाम पुन्हा आपल्या हातात घ्यायचा.

 

मग करायचं काय? दिवसाचा पहिला तास, जो बहुतेक दिवसाची दिशा ठरवतो, तो तरी अल्गोरिदमला देऊ नका. उठल्याबरोबर फोन हातात घेऊ नका. वाचा, फिरायला जा, ध्यान करा किंवा नुसते शांत बसा. तुमचं लक्ष दुसऱ्या कुणाच्या आधी तुमचं असू द्या. आणि जेव्हा हात आपोआप स्क्रोल करू लागतो, किंवा एखाद्या लाइकचं पोकळ समाधान मिळतं, तेव्हा त्याला नाव द्या. स्वतःला सांगा - हे माझ्यात हेतुपूर्वक पेरलेलं आहे. फसवणूक ओळखली की तिची पकड सैल होते. एकदा आग दिसली की सावल्यांची जादू संपते. निष्क्रियपणे घालवलेला प्रत्येक तास म्हणजे दुसऱ्या कुठल्यातरी निर्मितीची किंमत (ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट). विचार करण्यासाठी वाचा. काहीतरी बनवण्यासाठी शिका. रात्री झोपताना स्वतःला एकच प्रश्न विचारा - आज मी काय केलं, काय घडवलं, कुणाच्या उपयोगी पडलो?
छोटे व्हिडिओ ज्ञानाची फक्त चव देतात. क्वांटम फिजिक्सवरची साठ सेकंदांची रील पाहून काहीतरी भारी शिकल्यासारखं वाटतं, पण समज शून्य. मोठी पुस्तकं वाचा. हळू विचार करा. गुंतागुंत पचवायची सवय लावा. सोपेपणाचं व्यसन सोडा.

 

राष्ट्रीय पातळीवर डिजिटल वसाहतवादाचं उत्तर हे स्वदेशी प्लॅटफॉर्म, देशातलं एआय संशोधन आणि माध्यमांकडे चिकित्सक नजरेने पाहायला शिकवणारं शिक्षण यांत आहे. भारताच्या तरुणांचं 'लक्ष' हीच भारताची ताकद आहे. ते लक्ष परदेशी कंपन्यांच्या सर्व्हरवर वाया जात राहिलं, तर कोणतंही आर्थिक धोरण आणि कोणतीही विकास योजना भारताला स्वयंपूर्ण करू शकणार नाही. तुमची चेतना तासागणिक अशा कंपन्यांना भाड्याने जात असेल ज्यांना तुमच्याशी, तुमच्या कुटुंबाशी किंवा तुमच्या देशाशी काहीही देणंघेणं नाही, तर त्यातून उभं राहणारं जगही तुमचं नसतं. तुमच्या लक्षातून तयार होणारी संपत्ती वरच्या दिशेने, आगीच्या मालकांकडे वाहत राहते. म्हणूनच, तुमचं लक्ष परत घ्या. ती अक्षरशः एकमेव गोष्ट आहे, जी खरोखर तुमची आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा या दुसऱ्यांनी लिहिलेल्या कथा आहेत. लक्ष मात्र तुमचं आहे. जोपर्यंत तुम्ही ते कुणाला देऊन टाकत नाही, तोपर्यंत!

 

योगेश हरिभाऊ कुलकर्णी

 

(लेखक हे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे सल्लागार आहेत)

 

 

yogeshkulkarni@yahoo.com

https://www.linkedin.com/in/yogeshkulkarni/

Article illustration

 

 

लक्ष हेच लक्ष्य · लेख
मिसळपाव प्रस्तुत
दिवाळी अंक २०२६

← अनुक्रमणिका

दुवा प्रलंबित · INDEX LINK PENDING
दिवाळी अंक वर्ष

वाचने 46
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया