Skip to main content

किचाट

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.


हेंदरे गावात समगे डॉक्टरांचा कित्येक वर्षं दवाखाना होता. त्यांच्याकडे येणारे पेशंट ठरावीक नमुन्याचेच असत. गावातली माणसं बरं वाटेनासं झालं की आधी देशी उपाय करत. खोकला लागला की अडुळशाचा काढा करून घेत, अंग मोडून आलं, ताप आला की आलं आणि तुळशीचा काढा करून घेत. बांधावरनं घसरून पाय लचकला, पोती उचलताना पाठीत हुक्क भरलं, कधी मान आखडली की लोक सांबराचं शिंग, रक्तचंदन आणि एक-दोन रेघा काळा यांचा लेप करून लावत आणि तव्यावर किंवा कंदिलावर गरम केलेल्या कापडाच्या बोळ्याने शेकत. गावातल्या समजुती. सर्दी झाली की माशाची आमटी आणि गरम भात खाणं, पोट बिघडलं की गूळ आणि जायफळाचं चाटण घेणं, जखम झाली की तिच्यावर दगडी पाला चेचून लावणं  – लोक असे उपचार करत. याने कधी गुण येई, कधी नाही. ज्यांची परिस्थिती बेताची असे, त्यांचं दुखणं लांबे. ते लोक कुचमत दिवस काढत आणि शेवटी आपल्या मनानेच हळूहळू बरे होत. ज्यांची डॉक्टरांकडे जायची ऐपत असे, ते समगे डॉक्टरांकडे येत. नेहमीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांपलीकडे कुणी डोळ्यांत फूल पडलं म्हणून, नाहीतर अवघड जागी करट झालं म्हणून येत असे. कुणी शाकारणी करताना छतावरून पडलेला असे. कुणाला नंगरी मारताना बैलांचं शिंग लागलेलं असे. विहिरीतली मोटर काढून खाली बसवताना, नाहीतर वर काढताना कुणाच्या पायावर ती पडलेली असे, उसाचा फड पेटवताना कुणाला भाजलेलं असे, शेतात काम करत असताना मोहोळ उठून कुणाला मधमाश्या चावलेल्या असत, कुणाला शेतात काम करताना साप चावलेला असे.. शेतकऱ्यांच्या आयुष्यातल्या नेहमीच्या गोष्टी. त्यावरचे दवाखान्यातले उपचारही ठरलेलेच असत. थंडी-ताप असेल एपीसीच्या गोळ्या, कसलं इन्फेक्शन असेल तर टेरामायसिनचं पिवळं इंजेक्शन, जखम असेल तर ड्रेसिंग, गंजलेला मोळा वगैरे लागला असला तर धनुर्वाताचं इंजेक्शन, भाजलं असेल तर नुसतंच पिवळं बरनॉल लावणं.. बहुतेक वेळा पेशंटला दुसऱ्यांदा यायची गरजच लागत नसे. डॉक्टरांनाही ते माहीत असे, म्हणून पहिल्या वेळेलाच ते सगळी फी घेऊन मोकळे होत असत. फी म्हणजे काय, नुसतं तपासून गोळ्या द्यायच्या असल्या तर दोन रुपये, आणि इंजेक्शन द्यायचं असलं तर पाच रुपये. एवढ्यात काम होत असे. यापेक्षा वेगळे आजार म्हणजे बायकांचे आजार. तेसुद्धा लपवण्याकडेच बायकांचा कल असे. दुखणं अंगावर काढून काढून अगदी असह्य झालं की मग त्या माउल्या डॉक्टरकडे येत. बहुधा त्याआधी देशी उपचार करून त्याने गुण आला नाही, तरच. समगे डॉक्टरांच्या दोन खोल्यांच्या दवाखान्यातल्या बाहेरच्या खोलीत पंडुरोगाने पिडलेल्या, कानाला आणि डोक्याला काहीतरी बांधलेल्या, अंगभर गच्च पदर घेतलेल्या त्या काटकुळ्या बायका थंडीने कुडकुडत दोन पायांवर बारीक आवाजात कण्हत बसलेल्या असत.

समगे डॉक्टर म्हातारे झाले आणि त्यांनी हेंदरे गावातली त्यांची प्रॅक्टिस बंद केली. जाताना त्यांनी त्यांचा सगळा संच अण्णा कुंभारच्या हातात सोपवला. अजून दवाखान्यावर डॉक्टरांच्या नावाची पाटी होती, पण सगळं काम अण्णाच करत होता. लोक तर त्यालाच डॉक्टर म्हणत असत. अण्णा कुंभार हा काही डॉक्टर नव्हता. तो बरीच वर्षं समगे डॉक्टरांचा कम्पाउंडर होता. बघून बघून त्याला ठरावीक औषधं माहीत झाली होती आणि इंजेक्शन द्यायला तर त्याचा हात डॉक्टरांच्या हातापेक्षा हलका आहे असं लोक म्हणत. त्याची बायकोही समगे डॉक्टरांच्या हाताखाली तयार झाली होती. ती सगळ्या बायकांना बघत असे. अगदी बाळंतपणंही ती एकटीने करत असे. खेड्यांत अशा गोष्टी चालून जातात. अण्णाच्या हाताला गुण आहे, त्याच्या बायकोकडे बाई गेली की तिची सुखरूप सुटका झालीच म्हणा असं लोक म्हणत.

जिन्नाप्पा तगारेच्या धाकटी लेकीला - आरतीला शिरढोणला दिलं होतं. तिच्या लग्नाला आता पाच वर्षं होत आली होती, पण अजून तिच्याकडची काही बातमी नव्हती. ती बातमी आली, तसे तिच्या सासरचे आणि माहेरचे लोक हरखून गेले. पहिलं बाळंतपण, ते माहेरीच व्हायला पाहिजे अशी सगळी जनरीत माहीत असूनही गावात सोयी नाहीत, म्हणून बाळंतपण सासरी व्हावं, फार तर इकडेही नको आणि तिकडेही नको, तालुक्याच्या गावी व्हावं असं जिन्नाप्पाच्या मनाला आलं होतं. एक-दोन वेळा त्याने घरात तसं सुचवायचा प्रयत्न केलाही, पण नातेवाइकांचा - विशेषत: त्याच्या बायकोचा - सुलाचा दंगा बघून तो गप्प बसला होता. बाळंतपण आपल्या गावात करायला जिन्नाप्पाची काही हरकत नव्हती, पण गावात मुख्य अडचण होती ती म्हणजे दवाखान्याची. अण्णा कुंभारवर त्याचा विश्वास नव्हता. आपल्या पोरीचं बाळंतपण एखाद्या शिकल्या-सवरलेल्या डॉक्टरच्या हातून व्हावं, असं त्याला वाटत होतं आणि हेंदऱ्यासारख्या कुग्रामात चांगला डॉक्टर कुठून मिळणार हा त्याचा प्रश्न होता. गावात दुसरा सरकारी दवाखाना होता, पण तो गावापासून लांब होता. सरकारी दवाखान्यात नेमणूक झालेला डॉक्टर, सुईण हजेरी लावायला म्हणून रोज कामावर येत, पण ते नुसतं दाखवायलाच. खरं सांगायचं तर आठवड्या-पंधरवड्यातनं एखाद्या दिवशी ते येत आणि सगळ्या दिवसांसमोर सह्या करून मोकळे होत. हे सगळ्यांनाच माहीत होतं, पण त्याची काही दाद ना फिर्याद. पोरीचे दिवस भरेपर्यंत तिला गावातच ठेवावी आणि ऐन वेळी तालुक्याला हलवावी म्हटलं, तर तशी सोय नव्हती. एकतर गावाचा जेमतेम शंभर उंबरा, त्यातनं गाव असलं आडवळणी. ना कुठल्या शहराच्या रस्त्यावर, ना नदीच्या काठाला. वस्ती करणाऱ्याने तर काय बघून वस्ती केली होती कुणास ठाऊक. त्यामुळे जग इतकं पुढं गेलं, तरी हेंदरे गाव आहे तिथेच राहिलं होतं. गावातल्या नायकांच्या घरात अम्बॅसडॉर गाडीसुद्धा होती. कुणाला फार जास्त झालं किंवा एखादी बाई अडली की मग धावाधाव होई. बहुतेक वेळा गाडी करून त्या माणसाला, बाईला मोठ्या गावात नेलं जाई. पण आयत्या वेळी ती गाडी मिळणं, तिच्यात तेल असणं, तिचा ड्रायव्हर जागेवर असणं.. जिन्नाप्पाला ते काही खरं वाटत नव्हतं. शेवटी अण्णा कुंभारसारख्या अडाणी माणसापेक्षा कसला का असेना, शिकलेला सरकारी डॉक्टर बरा असा जिन्नाप्पानं मनाशी ताळा केला आणि एके दिवशी सकाळी उठून तो गावाबाहेर असलेल्या ‘प्राथमिक आरोग्य केंद्र’ अशी पाटी असलेल्या दवाखान्यात गेला. जुन्या चिंचवाडे डॉक्टरची आणि त्याची तोंडओळख होती, पण आता ते बदलून गेले होते. त्यांच्या जागेवर कोण आला होता, कुणास ठाऊक. दवाखान्याच्या आवारात कॉंग्रेस गवत माजलं होतं. आघाडा होता, खांडकुळी होती, सराटा होता. फाटकापासून दवाखान्याच्या दारापर्यंत जाणाऱ्या फरशी घातलेल्या वाटेवर फरशांच्या मधनं गवताची पाती उगवली होती. जिन्नाप्पाने फाटक उघडलं आणि त्याच्या चाहुलीने बाजूच्या गवतातनं एक भलंमोठं मुंगूस मधल्या वाटेपर्यंत पळत आलं. वाटेवर थबकून ते आपल्या लाल डोळ्यांनी जिन्नाप्पाकडे बघायला लागलं.

दवाखाना बंदच होता, पण तिथल्या पाटीवर संपर्कासाठी म्हणून दोन नंबर दिले होते. जिन्नाप्पाने ते दोन्ही नंबर फिरवून बघितले. एक तर लागलाच नाही, आणि दुसरा लागला पण कुणी उचलला नाही. जिन्नाप्पाला रानाकडे जायची गडबड होती. मिरचीचा तोडा करायचा होता आणि त्याने आधल्या दिवशी दहा घरं फिरून, मिंत्या करून कशातरी चार बायका सांगितल्या होत्या. शेतातल्या कामासाठी आता गडी-बायका मिळणं फारच अवघड होऊन बसलं होतं. गावाबाहेर शीतल हातगिण्याने शेवयांचा मोठा कारखाना काढला होता. तिथे गडी-बायकांना न्यायला गाडी होती. गड्यांना पाचशे आणि बायकांना तीनशे रुपये हजरी होती. शिवाय हलकं काम. त्यामुळे गावातले गडी-बायका सोकावल्या होत्या. जिन्नाप्पाला जाईल तिथे काही ना काही कारणं ऐकायला लागली होती. कुणाच्या जिवाला गोड वाटत नव्हतं, कुणाला हाताला मिरचीचा जाळ सोसत नव्हता, तर कुणाला कामाला यायला आधीच कुणीतरी सांगून ठेवलं होतं. जिन्नाप्पाचा हात दगडाखाली अडकलेला होता, म्हणून तो काही फार बोलला नाही, पण त्याच्या मनात चार गोष्टी येऊन गेल्या. हा मसणा कारखाना सुरू व्हायच्या आधी जिन्नाप्पाच्या शेतावर काम म्हटलं की गडी-बायका तू मी तू मी करत असत. त्याला कारण होतं. जिन्नाप्पा व्यवहाराला चांगला माणूस होता. बाजाराच्या आदल्या दिवशी त्याने हिशेब केलेला असे. कुणाचा पैसा बुडवावा अशी त्याची वासना नसे. कुणाला नड असली तर दहा-पाचाची उचल देण्याची त्याची तयारी असे. त्याची काय फार मोठी शेती-वाडी नव्हती, पण माणूस मनाने चांगला होता. तरीही त्याला शेतावरच्या कामासाठी माणसं मिळणं अवघड होऊन बसलं होतं.

दवाखाना बंद म्हटल्यावर आता आधी मिरचीच्या तोड्याचं काम मार्गी लावावं आणि दवाखान्यात दुपारी जाऊन बघावं, म्हणून जिन्नाप्पा शेताकडं गेला आणि तिथे अडकला तो अडकलाच. इचलकरंजीच्या बाजाराला जायची गाडी लागली होती. काढलेल्या मिरच्या हाताबरोबर पोत्यांत भरून, त्या पोत्यांवर शाईत बुडवलेल्या भेंडाने नावं घालून, ते डाग गाडीपर्यंत पोहोचवून तो गावाकडे यायला निघाला, तेव्हा चांगला अंधार झाला होता. सायकलीची पैडल मारत तो दवाखान्याजवळ आला, तशी एकदम त्याला सकाळच्या कामाची आठवण झाली. दवाखान्यात उजेड दिसत होता. सायकल स्टँडला लावून घाम पुसत तो दवाखान्याच्या दारात आला, तसा त्याला आतनं बाहेर येणारा अण्णा कुंभार दिसला. अण्णाच्या दोन्ही हातात भरलेल्या दोन जंग पिशव्या होत्या. जिन्नाप्पाला बघून अण्णा थोडासा बिचकला, पण लगेच तो तोंड भरून हसला.

“काय काय पाटील? सांज करून आला?” त्याने विचारलं. खेड्यात मान द्यायचा असला की पाटील म्हणण्याची पद्धत असते.

“तू रं कसा काय हिकडं?” जिन्नाप्पानं आश्चर्याने विचारलं.

*****************************************************************************************

आरतीची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. केळी सोडून इतर पाच फळं, नारळ, खण यांनी सुलाने आरतीची ओटी भरली. आरतीला आवडते म्हणून सुलाने शेवयाची खीर केली होती. हापळा तळला होता. चरचरीत शाक होतं. सगळ्यांची जेवणं झाल्यावर जिन्नाप्पा आणि सुलाने जेवायला घेतलं. जेवताना जिन्नाप्पाला गप्प गप्प बघून सुलाने असं का म्हणून विचारलं. लेकीचं बाळंतपण आपल्या गावात व्हावं अशी तिची इच्छा असली, तरी डॉक्टर चांगला असावा या नवऱ्याच्या म्हणण्यात अर्थ आहे, हे तिच्या लक्षात आलं होतं. विचारात पडलेला जिन्नाप्पा हातात घास तसाच घेऊन थांबला. मग आपल्या बायकोकडे बघून म्हणाला, “आरतीचं नाव सरकारी दवाखान्यात घालावं म्हणून तिथं डॉक्टर हाये का ते बघायला गेलोतो. त्यो तर न्हाईच, आणि त्याचा फोन पण लागंना. आता पोरीचं बाळतपण आलं. कायतरी व्यवस्था बघाय पायजे की नाही?”

“सरकारी दवाखान्यात जमत नसंल तर अण्णा कुंभारकडं घालू या नाव.” सुला म्हणाली. “चार लोकांचं जसं होतं तसं आपलं पण होईल. आण्णा कुंभारची बायको काय बाळंतपण करत न्हाई का काय? ते नको असलं तर तालुक्याच्या दवाखान्यात नाव घालू या. तिथं एगदा दाखवलं हाय की तिला. त्या डॉक्टरनं तपासून तारीख दिल्या न्हवं का. तालुक्याला जायला नायकाची गाडी आहे.”

जिन्नाप्पाने मान हलवली. “अगं, गावातला डॉक्टर असल्याला बरा. आणि त्यो अण्णा काय डॉक्टर हाय व्हय? समगे डॉक्टरांच्या हाताखाली हुता त्यो. पुड्या बांदायला आणि इंजेक्शनं उकळायला. त्यो कसला आलाय डॉक्टर? चोर एक नंबरचा. मला सरकारी दवाखान्यात भेटला हुता त्यो. त्याच्या हातात काय हुतं म्हायती हाय का? सरकारी दवाखान्यातली ढीगभर औषधं. हे सगळं त्यो आपल्या दवाखान्यात घेऊन चाललावता त्यो हादरगित्तीचा. त्याच्यावर मला म्हणालाय की लेकीला घेऊन कवासं येताय तपासायला. ह्यो अडानी डॉक्टर तपासणार, आणि औषधं  कुठली देणार? तर सरकारी दवाखान्यातनं चोरल्याली. चोरतोय कसला, त्यो सरकारी डॉक्टरपण त्याला सामील असणार. त्यानं इकली असतील ती औषधं. असला सगळा चोरांचा कारभार तिज्या आयला. आणि नायकाच्या गाडीचा काय भरोसा वाटत नाही मला. ती हाय खरं, पण तिचं आज हे मोडल्यालं असतंय तर उद्या ते. आयत्या वेळी कुटं धावपळ करणार माणूस? आणि त्याच्या आधी दर म्हयन्याला दाकवायला जायला लागलं तर त्याची काय जुळणी?” जिन्नाप्पाने एका दमात विचारलं.

सुलाला नवऱ्याचं मन कळलं. आता यावर आपण फार तोंड करू नये, त्याला एकट्याला विचार करू द्यावा एवढं कळण्याइतपत ती सुज्ञ होती. “कोरडयास घालू काय जरा? आणि भाकरी वाळ्ळीच का खायालाय? धई देऊ? गोड हाय बगा चांगलं. सांज्याची पोळी बी हाय बगा.दिऊ?” ती म्हणाली.

“बाबा, तू जिवाला घोर लावून घेऊ नकोस.” आरती म्हणाली. “अजून वेळ आहे भरपूर.”

काही झालं तरी अण्णा कुंभारकडे जायचं नाही, अशी जिन्नाप्पाने मनाशी गाठ घातली. आता तो सरकारी डॉक्टर कधी येतो हे बघायच्या नादाला लागला. मंगळवारी शेताकडं जाताना दवाखाना उघडा बघून तो घाईघाईनं आत गेला. गावातलीच लक्षुमी बाहेरची खोली झाडत होती. जिन्नाप्पाला बघून तिनं हातातला साळुता खाली टाकला आणि पदर न सावरता तसंच ठसक्यात विचारलं. “काय वं?”

“डॉक्टर आल्यात काय?” जिन्नाप्पानं विचारलं.

“आल्यात, खरं जरा कामात हायती.” लक्षुमी म्हणाली. “तुम्ही का आलता? पोर्गीचं नाव घालायला?”

‘ते मी आणि डॉक्टर बघून घेऊ. तुला का पंचाईत गं व्हयमाले, तू आधी नेसू आवर आपलं’ असं म्हणावं असं जिन्नाप्पाला वाटून गेलं. पण लक्षुमी म्हणजे मुलखाची तोंडाळ बाई, तिच्या कुठं नादाला लागता, नकोच ती बैदा म्हणून तो काही बोलला नाही. शिवाय तिचं आणि नव्या डॉक्टरचं काहीतरी आहे असंही त्याच्या कानावर आलं होतं. असलं तर असंना का तिकडं, आपल्याला कशाला पंचाईत असा जिन्नाप्पाने विचार केला होता. तिच्या झाडण्याला अडथळा नको म्हणून काही न बोलता तो बाहेर आला. मळीच्या रानात हत्ती गवत वाढावं तसं आवारात तणकाट वाढलं होतं. त्यातच जुनी औषधांची खोकी, मोडकं बाक आणि खुर्च्या, गेलेले बल्ब असलं कायबाय टाकलेलं होतं. एवढा पैसा खर्च करून दवाखाना बांधला सरकारने, इथल्या डॉक्टरला आणि नर्सला ढीगभर पगार देत असणार हे सरकार, आणि इथे एवढं किचाट झालंय.. एकाला दोन गडी लावून हे एवढं भांगलून घ्यायला सरकारला काय धाड? बरं, ते जमत नसलं तर एक दोन टाक्या औषध मारून घ्यावं. पण कुणाला काय नाहीच कशाचं. ही जुनी लाकडं पावसानं भिजून, किडून जायला लागलीत, वाळ्ळी असताना कुणा गरिबाला दिली असती, तर त्याच्या चुलीचं वर्षाचं भागलं असतं, त्याच्या मनात आलं. तेवढ्यात आतल्या खोलीतनं एक जाडा आणि गिड्डा माणूस बाहेर आला. त्याच्या पोटावर तटाटलेल्या शर्टाचं मधलं बटण तुटलं होतं आणि त्यातनं दिसणाऱ्या मळकट गंजीवर दहा पैशाचं नाणं जाईल एवढी भोकं पडलेली होती. त्याच्या लांडया पॅन्टखाली त्यांचे फताडे आणि फार फुटलेले पाय दिसत होते. जिन्नाप्पाला बघून एका हाताची करंगळी कानात घालून खाजवत त्यानं दुसऱ्या हाताने काय अशी खूण केली. नुसती खूण, तोंडाने तो काही बोलला नाही. त्याचं कारणपण जिन्नाप्पाच्या लगेचच लक्षात आलं. त्याच्या फुगलेल्या तोंडात गुटखा होता.

“डॉक्टर..?” जिन्नाप्पा चाचरत म्हणाला. त्या जाड्या माणसाने आपल्याकडे बोट दाखवलं आणि परत खुणेने काय असं विचारलं. माउली, आता माझ्या टोपीत थुका, पण कायतरी बोला, जिन्नाप्पाच्या मनात आलं.

“लेक गरवार हाय हो माझी. नाव घालायचं होतं तिचं...” जिन्नाप्पा चाचरत म्हणाला.

नाइलाज झाल्यासारखा चेहरा करून त्या डॉक्टरने तोंडांतला ऐवज रिकामा केला आणि सुपारीचे तुकडे थू थू करत तो म्हणाला, “केसपेपर केलाय काय? आधीच्या इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्टस आहेत काय?”

समोरच्या माणसाला कळणार नाही अशा भाषेतच बोलायचं. डॉक्टर असो का नर्स असो, सगळ्यांची ही खोड जिन्नाप्पाला ठाऊक होती. तो काही बोलला नाही. पुन्हा थू थू करत डॉक्टर म्हणाला, “कागद, कागद.. कागद काढलाय काय पोरीचा?”

“नाही.” जिन्नाप्पा म्हणाला. आज पैल्यांदाच आलोय.”

“बसा, बसा.” डॉक्टर म्हणाला “झाडून हूदे, मग केसपेपर करूया. लक्षुमी, चकोत्या आलाय का नाही अजून?”

“हूं, येवड्यात येतोय व्हय त्यो भाड्या.” लक्षुमी  म्हणाली. “अजून त्याची रात्रीची उतरली नसंल.”

डॉक्टरने चकोत्याला बाईमाणसांच्या समोर देऊ नये अशी एक शिवी दिली आणि वळून जिन्नाप्पाला म्हणाला, “लेकीला आणलाय ना?”

आपलं चुकलं हे जिन्नाप्पाच्या लक्षात आलं. लेकीला घेऊन यायला पाहिजे होतं. अपराधी आवाजात तो म्हणाला, “न्हवं, दवाखाना उघडा हाय की नाही ते बगाय आलोतो. म्हंटलं डॉक्टर असतील-नसतील. पर आता तुम्ही हाय तर घेऊन येतो की हो. हितं, पलीकडं ते पिंपळाचं झाड दिसतंय न्हवं, तितं घर हाय बगा माझं. आत्ता, धा मिनिटांत घेऊन येतो बगा.” गडबडीनं उठत तो म्हणाला. डॉक्टरचा चेहरा त्रासिक झाला होता. “तिला विचारा. आधीच्या डॉक्टरनं काही तपासण्या केल्या काय, त्यांचे काही रिपोर्टस आहेत काय ते.. काय तिच्या आयला सगळा अडाणी लोकांचा कारभार..” जिन्नाप्पाला ऐकू येईल अशा आवाजात तो डॉक्टर म्हणाला.  

आरतीला घेऊन दवाखान्यात यायला जिन्नाप्पाला अर्धा तास लागला. तोपर्यंत डॉक्टरांचा असिस्टंट चकोते दवाखान्यात आला होता. गजानन चकोते गावातला एक नंबरचा तर्कटी माणूस म्हणून प्रसिद्ध होता. कुणाबरोबर सरळ म्हणून बोलणार नाही, सदा तरबत्तर. गावातला माणूस, तो जिन्नाप्पा आणि आरतीला चांगलाच ओळखत होता. तरीही त्या दोघांना बघून त्याचा चेहरा होता तसाच राहिला. असंख्य कागदांनी भरलेली एक फाइल त्याने आधी टेबलवर दोनचार वेळा आपटली आणि धूळ खाली बसल्यावर तो जिन्नाप्पाला म्हणाला, “नाव काय पेशंटचं?"

जिन्नाप्पानं लेकीकडं बघितलं. “आरती. आरती सचिन ऐनापुरे.” आरती म्हणाली.

“आधार कार्ड बघू.”  असिस्टंट म्हणाला.

“आधार कार्ड.. आरतीने बापाकडे बघितलं. “आहे, पण ते माझ्या घरी आहे शिरढोणला.” ती म्हणाली.

“मोबाईलमध्ये आसंल की.”

“नाही.”

“मग आम्ही कसं करायचं?” गजानन त्रासिकपणे म्हणाला. “सगळं ऑनलाइन आहे आता. इथं एंट्री केल्याशिवाय पुढं कसं जाणार? आधार कार्ड आणा जावा. झेरॉक्स आणायला जमतंय का बघा, नाहीतर सॉफ्ट कॉपी तरी आणा.”

पोरीचं आधार कार्ड मिळाल्याशिवाय आता पुगेढे जाता येणार नाही, हे जिन्नाप्पाच्या लक्षात आलं. खुर्ची मागे सरकवत तो म्हणाला. “उद्या.. उद्याच्याला आधार कार्ड घेऊन येतो. उद्या डॉक्टर असतील न्हवं?”

“ते मी सांगणार?” गजानन चिडल्यासारख्या आवाजात म्हणाला. “त्यांना विचारा.”

*****************************************************************************************

दुसऱ्या दिवशी जिन्नाप्पा आपल्या पोरीला घेऊन सरकारी दवाखान्यात आला. अकरा वाजून गेले होते, पण गजाननचा पत्ता नव्हता. आतल्या खोलीतनं डॉक्टर आणि लक्षुमीच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. अशा वेळी आत जाऊ नये जिन्नाप्पाला कळत होतं. थोड्या वेळानं लक्षुमी हातात साळुता घेऊन बाहेर आली आणि जिन्नाप्पाला बघून म्हणाली. ”आलाय काय?”

“होय” गडबडीगे उठत जिन्नाप्पा म्हणाला. “गजानन आला नाही व्हय अजून?”

“हूं.. यील की आता सुक्काळीचा” लक्षुमी म्हणाली. “त्याला कोन इचारनारा हाय व्हय? मनाला येईल तवा येनार, मनाला येईल तवा जानार. बरं, त्यो मरू दे. तुमी जरा भायेर जावा. मी साळुता मारणार हाय हितं.”

लेकीला घेऊन जिन्नाप्पा बाहेर आला. बाहेर पाण्याची चावी होती. आरतीला तहान लागल्यासारखी झाली होती, म्हणून तिने ती चावी फिरवली, पण त्यातनं काही पाणी आलं नाही. आता आत जाऊन पाणी मागावं का काय करावं, हे काही जिन्नाप्पाला सुचेना. दवाखान्याच्या आवारातलं किचाट त्याच्या नजरेला खुपत होतं. दिवस वाढत होता, आरतीला तहान लागली होती आणि अजून गजानन चकोतेचा काही पत्ता नव्हता. आपल्या थकलेल्या चेहऱ्याच्या पोरीला बघत जिन्नाप्पा अस्वस्थपणे बसून राहिला.  

*****************************************************************************************

पाच महिने होऊन गेले होते. आरतीची कागदपत्रं घेऊन गजाननने तिच्या नावाची नोंदणी केली होती. बारटक्के डॉक्टरांनी आरतीला तपासलं होतं आणि सगळं ठीक आहे असं सांगितलं होतं. आरतीची तारीख पंधरा दिवसांवर आली होती. सरकारी दवाखाना कधी उघडा असे, कधी नसे. उघडा असलाच तर गजानन चकोते काय वेळेवर येईल की नाही, ते सांगता येत नव्हतं. डॉक्टर बारटक्के दुपारी बारानंतर एक तास-दोन तास येत आणि मग दुपारीच चहा घेऊन परत जात. बाहेरच्या खोलीत पेशंट वाट बघत बसलेले असत आणि डॉक्टर आणि लक्षुमी आतल्या खोलीत खिदळत असत. लोकांच्या ते डोळ्यांवर येत असे, पण बोलणार कोण? एवढं पोरीचं बाळतपण सुखरूप झालं की फिटलं, जिन्नाप्पाला वाटत असे. दवाखान्यात येऊन येऊन त्याच्या मनात कसला तरी विचार पक्का झाला होता.

सकाळची वेळ होती. थंडी संपत आली होती. गावावर धुकाट आलेलं होतं. कुणी सगळं आवरून गरम चहा घेत बसलं होतं, तर कुणाचं अजून दारात बसून खाकरणं-खोकरणं चाललं होतं. जिन्नाप्पा नेहमीपेक्षा लवकर उठला होता. आठ दिवस सकाळी लवकर जायला लागणार असं त्याने सुलाला सांगितलं होतं. सुला आता लेकीच्या बाळंतपणाच्या काळजीत होती, म्हणून तिने का, कशाला अशी काही चौकशी केली नाही. दोन भाकरी, डाळ कांदा, खर्डा आणि पांढरा कांदा असं तिने जिन्नाप्पाला बांधून दिलं. आपलं सगळं आवरून जिन्नाप्पाने न्याहारीचा डबा घेतला आणि एक पाणी पाजलेलं खुरपं, एक लहान खोरं आणि एक बुट्टी घेऊन तो बाहेर पडला. झपाझपा चालत तो गावाच्या बाहेर आला. सरकारी दवाखाना बंदच होता. मोडकं फाटक उघडून जिन्नाप्पा आत आला. आता ती बैठी इमारत गवतात बुडालेली होती. पावसाळ्यात हिरवेगार असलेले ते गवत आता पिवळं पडलं होतं. पावसाळ्यात भिजलेली ती सगळी लाकडं आता काळी पडली होती आणि त्यांवर कुत्र्याच्या छत्र्या आल्या होत्या. काय सरकारी कारभार.. जिन्नाप्पाला वाटून गेलं. जाताजाता कुणी एक काडी टाकली, तर सगळी राखरांगोळी होईल. त्याने एकदा त्या सगळ्या किचाटाकडं नजर टाकली आणि मग तो एका अंगाला आला. न्याहारीचा डबा त्याने खाली ठेवला. अंगातलं काढून घडी करून त्याने डब्याशेजारी ठेवलं. टॉवेलाची घडी करून त्याने ती डोक्याला बांधली आणि खुरपं घेऊन तो खाली बसला. ते वाढलेलं तणकाट त्याने डाव्या हातात धरलं आणि उजव्या हातातल्या खुरप्याने जमिनीबरोबर कापून घेतलं. जरा वेळात त्याच्या भांगलणीला सूर लागला. तण वाळलेलं होतं आणि कापायला जोर लावायला लागत होता. गवतातली सडं हातात घुसत होती आणि ती काढून टाकायला जरा थांबायला लागत होतं. दोन पायावर बसायची जिन्नाप्पाला सवय राहिली नव्हती. थोड्या वेळात त्यांच्या मांड्या भरून आल्या आणि त्याच्या पाठीला रग लागली. हातातलं खुरपं खाली ठेवून जिन्नाप्पा उठला आणि त्यानं दोन्ही बाजूंना अंग वळवून मोडलं. जरा वेळाने तो पुन्हा खाली बसला आणि  पुन्हा भांगलायला लागला.

“आज जेवण नको गं मला.” जिन्नाप्पा बायकोला म्हणाला. “आज जेवायला घरी येनार हाय मी.”

“आज रानाकडं गेला न्हाई तर चालणार न्हाई काय?” त्याच्यासमोर चहाचा कप ठेवत सुलाने विचारलं.

“का?”

“रातसारी पोरीला झोप न्हाई. तिचं दिसबी भरत आल्यात. तिच्या पोटात दुखायला लागलं तर दवाखान्यात डॉक्टर हाय-न्हाई बगायला पाहिजे. सरकारी दवाखाना बंद असला तर दुसरं कायतरी बगायला पाहिजे.”

“मी येतो लवकरच. आन फोन हाय की. काय लागलं तर फोन कर. आरती उटली न्हाई अजून?” जिन्नाप्पाने विचारलं.

“आत्ता सकाळी सकाळी डोळा लागला तिचा. रातभर आमी दोगी जाग्याच हाय न्हवं का.” सुला म्हणाली.

“झोपू दे, झोपू दे.” जिन्नाप्पा म्हणाला. “मी धा-अकरा वाजेपर्यंत येतोच बग.” चहा गडबडीने संपवून तो उठलाच. नेहमीपेक्षा जलदीने तो दवाखान्याकडे निघाला. गाव अजून जागं होत होतं. दवाखान्याचं फाटक उघडून जिन्नाप्पा आत आला.

आठ दिवसांपूर्वी दवाखान्याच्या आवारात माजलेलं किचाट आता जवळजवळ स्वच्छ झालं होतं. सगळं कस्पाट काढून त्याचे जागोजागी घातलेले घुप्पे पेटवून टाकल्याने जमिनीवर जागोजागी मोठे काळे वर्तुळाकार डाग पडले होते. बरं-वाईट सगळं लाकूड एका बाजूला शिस्तीत रचून ठेवलेलं होतं. दवाखान्याच्या मागच्या बाजूला एक खुटाणभर जागा राहिली होती. जिन्नाप्पाने गडबडीने ती स्वच्छ करायला घेतली. सगळं तणकाट चराचरा कापून ते पेटवून देईपर्यंत त्याने वरसुद्धा बघितलं नाही. त्या ढिगाची आग संपली आणि धूरपण कमी झाला तोवर दिवस चांगला वर आला होता आणि ऊन चटाचटा तापायला लागलं होतं. हातपाय धुऊन मग घराकडे जावं असं म्हंटलं, तर दवाखान्याच्या आवारात पाण्याची काही सोय नव्हती. पाण्याची चावी होती, पण तिला काही पाणी नसणार हे जिन्नाप्पाला माहीतच होतं. सहज म्हणून तो त्या चावीकडे गेला आणि त्याने ती चावी फिरवली. चावीतनं आधी जरा वेळ गरम आणि मग गार पाण्याची धार लागली. हातपाय धुऊन जिन्नाप्पा दवाखान्याच्या बाहेरच्या कट्ट्यावर जरा वेळ टेकला, तेवढ्यात ते मोडकं फाटक उघडून आत येणारा गजानन त्याला दिसला. त्याच्या मागं लक्षुमीपण होती. काही बोलणं-चालणं व्हायच्या आतच जिन्नाप्पाचा फोन वाजला.

*****************************************************************************************    

“पेडं काडा पाटील” चांगली ओळख असल्यासारखी लक्षुमी सलगीने जिन्नाप्पाला म्हणाली. “पहिला नातू, त्योबी शिनेमातल्या नटावाणी गोरा गोरा आन बाळसं धरलेला. काडा किलोभर पेडं.”

“बाळ-बाळंतीण दोघंही सुखरूप आहेत, जिन्नाप्पा.” डॉक्टर बारटक्के म्हणाले. “काळजीचं काही कारण नाही. नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. बाळ अंगावरचं दूधपण व्यवस्थित प्यायला लागलाय. दोन दिवस ठेवायचं अशी आमची प्रोसीजर आहे म्हणून, नाहीतर तुम्ही उद्यासुद्धा घरी घेऊन जाऊ शकला असता तुमच्या लेकीला.”

“आमचं सगळं आवार चकचकीत करून टाकला की हो तुम्ही, जिन्नाप्पा.” गजानन म्हणाला. “मी सगळं बघत होतो, पण काही बोललो नाही. म्हणलं काय चाललंय ते चालू द्यावं तुमचं. आधी वाटलं की दोन गडी घेऊन येता का काय तुम्ही. पण एकट्यानंच केला की हो तुम्ही.”

“गडी सांगणार होतो मी.” जिन्नाप्पा म्हणाला. “पर गडी कुटं भेटत्यात हो आता? आता हातगिण्याच्या कारखान्यावर जात्यात सगळं गडी. मग म्हंटलं आपनंच करावं झालं.”

“हे, काम काय जंक्शान केला बगा तुमी जिन्नाप्पा.” गजानन म्हणाला.

“आमच्याकडे तशी प्रोव्हिजन असते.” डॉक्टर बारटक्के म्हणाले. “साफसफाईसाठी बजेट असतं. पण ते सरकारी काम. पैसे कधी वेळेवर येतात, कधी नाही. मग कामं राहून जातात. माझ्याकडे आता तीन दवाखान्यांचा चार्ज आहे, त्यामुळे मग वेळेवर यायला, बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला जमत नाही हो, पाटील.”

“सरकारी काम. असंच की.” गजानन म्हणाला.

“आमच्या हातात काही असत नाही हो.” डॉक्टर बारटक्के म्हणाले. “काहीही होत असतं. एकदम नको त्या औषधांचा मोठा स्टॉक येतो. मध्ये एकदा मल्टिव्हिटॅमिनचा मोठा स्टॉक आला. एक्स्पायर व्हायच्या आत तो सगळा वाटून टाकायचा असतो. शिल्लक राहिला की मग परत वरचे लोक काहीतरी म्हणणार. शेरे टाकणार. मग मी म्हणालो की थोडा अण्णा कुंभारकडे द्या. त्याच्या दवाखान्यात गोरगरीब पेशंट येत असतात. वाया जाण्यापेक्षा निदान लोकांच्या उपयोगाला तरी येईल. अण्णा मला म्हणाला तुम्ही त्याला तो स्टॉक घेऊन जाताना बघितलं म्हणून. पण काही उघडउघड सांगता येत नसतं. आम्ही तरी काय करणार पाटील?”

बाळाच्या कुरकुरण्याचा आवाज आला, तसा जिन्नाप्पा आरतीच्या पलंगाकडे वळला. आरतीने पदराखालून बाळाला बाहेर काढलं. भरपूर जावळ असलेलं ते बाळ प्रकाशाने गोंधळल्यासारखं झालं होतं. आपले मोठे मोठे डोळे स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतं. सुलाने बाळाला घेतलं आणि जिन्नाप्पासमोर धरलं. “आज्जाकडं जानार बाळा?” तिने विचारलं.

सुलाच्या हातातलं ते लहानसं बाळ बघताना जिन्नाप्पाला आपल्या दुखऱ्या पाठीचा, भगभगणाऱ्या हातांचा आणि भरून आलेल्या पायांचा विसर पडला होता. तो खुर्चीत बसला आणि त्याने दुपट्यासकट त्या बाळाला हातात घेतलं. आपल्या नातवाकडे बघताना हळूहळू त्याचे डोळे भरून आले.

“हूं, आता डोळ्यांतनं पानी काडाय काय झालं, पाटील?” लक्षुमी ठसक्यात म्हणाली. “पेडं कवा देताय बोला.”              

“दिऊ की गं पोरी.” जिन्नाप्पा भरलेल्या आवाजात म्हणाला. “सगळ्यास्नी किलोभर आणि तुला पेशल एक किलोभर आणतो बग पेडं.”

 

दिवाळी अंक वर्ष

वाचने 59
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया