जंगलातल्या गमतीजमती
सुंदर माझे घर, प्रेमळ माझा पती,
तो माझा मदन, मी त्याची रती.
तेरी मेरी जोडी प्यारी
दोखो सोला शिनगारी
छंद आणि व्यसन या दोन्ही गोष्टी वरवर पाहता सारख्याच, कारण दोन्हींमध्ये माणूस स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. सूक्ष्मपणे विचार केल्यास छंद हे व्यसनाचे दुसरे रूप नसून स्वतःला आनंदी ठेवण्याची एक सकारात्मक, निरोगी कला आहे असे माझे मत आहे. असो, तो संपूर्णपणे वेगळा विषय आहे.
पक्षिनिरीक्षणाबरोबर छायाचित्रण अनिवार्य भाग. मी पक्षिनिरीक्षक, हौशी छायाचित्रकार. प्रचि काढण्याची कला हळूहळू चंद्रकलेप्रमाणे वाढीस लागली. लक्षात येऊ लागले, छायाचित्रे निसर्ग समजून घेण्याचे सशक्त साधन आहे. प्रचि फक्त चित्र नसते, तर ते काही ना काहीतरी सांगून जाते.
कुठला पक्षी कधी, कुठे, कसा, किती वेळ दिसेल याचा नेम नाही. सतत भिरभिरती नजर आणी प्रतिक्षिप्त क्रिया पक्षी छायाचित्रकारासाठी अवश्यक गुण. पक्षी कधी माॅडेल्सप्रमाणे 'पोझ' देणार नाहीत. त्यांच्या नकळत घेतलेल्या प्रचिमधून भावभंगीमा शोधाव्या लागतात. हे सर्व उत्स्फूर्त छायाचित्रणातून (Candid Photography) साध्य होते. अभिप्रेत भाव दिसतीलच असे नाही.
पक्षी आणि मानवी भावभावनांचे तुलनात्मक निरीक्षण मी याअगोदरच्या दिवाळी अंकात वाचकांसमोर आणले होते. पक्ष्यांचे उडणे, भक्ष्य पकडणे, प्रियाराधन, मातृ-पितृत्वाच्या भावना उत्स्फूर्त छायाचित्रणातून टिपणे रोमांचक असते. छायाचित्रकाची तीक्ष्ण नजर, कॅमेऱ्याची लेन्स आणि बुद्धी एकत्र अदभुत जगाचा शोध घेत असतात. प्रचि हे पक्ष्यांच्या भावना समजून घेण्याचे उत्तम साधन (Interpreting the emotions of birds) आहे.
कोतवालांच्या दोन टोळ्या (Black Drongo) समोरासमोर बसून तावातावाने भांडताना, कोकीळ नर, मादी मानवी नवरा-बायकोसमान वितंडवाद करताना, अन्य मानवसदृश भावनांत - अगदी रतिसुखात दंग असलेले पक्षीसुद्धा बघीतले आहेत.
जंगल म्हटले की नुसतेच पक्षी नाही, इतरही जीववैविध्य समोर येते. फूलपाखरे, रानफुले, रानभाज्या, औषधी वनस्पती, सरपटणारे प्राणी, अगदी भटकी कुत्री आणि गायरानात चरणारी गुरेढोरे. घरटी विणणारे पक्षी, पक्ष्यांच्या अंड्यांवर, पिल्लांवर ताव मारणारे शिकारी पक्षी, कधीकधी तर शिकार आणि शिकारी एकाच जागी बसलेले दिसतात.
मोराला पिसारा फुलवून नाचताना बघितला आहे. काळाकभिन्न तक्षक अगदी जवळून सळसळत जाण्याचा थरार अनुभवला आहे. नदीकाठी 'सर्प गरूड' झेप घेऊन लांबलचक सापाला पायात पकडून भरारी घेताना पाहिला आहे. खोटे वाटेल, बगळा आणी पाणकावळा यांना लपाछपी खेळताना बघितले आहे.
असेच काही थरारक, गमतीदार क्षण तुमच्यासमोर घेऊन आलो आहे.
१. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती.
सासुरवाडी, संभाजीनगर, कुटुंबकबिल्यासह पुण्याला रवाना झालो होतो. रविवार असल्याने गर्दी कमी होती. गाडी सुसाट चालली होती. सलिल-संदीप दळण दळत होते. सौं.चा गोड आवाज कानावर पडला. "दत्तदर्शनास जायचे का?" नो अपिल, सरळ फाट्यावरून गाडी आत वळवली. भव्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसर गाठला. गाडी पार्किंगमध्ये पार्क केली. पूजासामग्री घेतली. पामच्या उंच झाडांमधून मंदिराकडे कूच केले. इथे मात्र बर्यापैकी गर्दी होती. गेटवर चौकीदाराने अडवले, नम्रपणे म्हणाला, "सर, गर्भगृहात जाण्यासाठी ड्रेस कोड आहे. बरमुडा नाही चालणार." बायकोने भ्रूभुंग वक्र केले, मुखमंडलावर काही पुसटशा तिरक्या रेषाही दिसल्या. मुलांबरोबर पुढे निघून गेल्या. मी बापडा परिसर न्याहाळत इकडेतिकडे फिरू लागलो. चौकीदार म्हणाला, "धोतर आहे, देऊ का?" आभार मानत मी नको म्हणालो.
अमृतवाहिनी प्रवरा नदीतीर, भरपूर झाडेझुडपे, हिरवळ, पक्षी. माझी नजर भिरभिरत उंच नारळाच्या झाडावर गेली. तीन राखाडी बगळे (ग्रे हेराॅन पक्षी) एकमेकांस चिकटून बसले होते. जणू ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पटकन फोटो घेतला. अद्भुतच..
योगायोग होता का? पाषाणमूर्तीच्या दर्शनास मुकलो, पण प्रत्यक्ष श्रीपाद श्री दत्तात्रेयांनी वेगळ्या स्वरूपात दर्शन दिले की काय? असे वाटले. मंदिरात गेलो असतो, तर या अद्भुत दत्तदर्शनास मी मुकलो असतो.
तुलसीदासांच्या रामचरितमानसमधली चौपाई आठवली.
'जाकी रही भावना जैसी, प्रभु मुरत देखी तिन तैसी।'
२. टिटवीचे बाळंतपण.
महादेववाडी जंगलात भरपूर लाल, पिवळ्या टिटव्या फिरताना आढळतात. अंडी उबवण्याव्यतिरिक्त टिटवी खाली बसत नाही. जमिनीवर बसली म्हणजे अंडी दिली, यात शंका नाही. इतर टिटव्या अंडी उबवणाऱ्या टिटवी आईला मध्ये ठेवून गोल फेर धरून फिरत होत्या. त्यांची सुरक्षा व्यवस्था. जवळ जायचा प्रयत्न केला, तर फायटर जेटसारख्या अंगावर झेप घेत होत्या. जवळ गेलो तर डोळे फोडतील असे वाटल्याने दुरून टेहाळणी करू लागलो. आई टिटवी उडून गेली, लपलेली चार अंडी उघडी पडली.
जमिनीवर, बांधावर, खुल्या मैदानावर कुठेही टिटवी अंडी घालते. त्यांच्या सामूहिक सुरक्षा प्रणालीमुळे आक्रमक घारी, शिक्रा यासारखे शिकारी पक्षी, भटकी कुत्री अंड्यांना, पिल्लाना चोच (हात) लावताना हजार वेळा विचार करत असावेत. भा.वा.से.प्रमाणे यांची हवेतली 'डाॅग फाइट थरारक असते. सैन्यातली 'घातक प्लॅटून'च जणू.
ती पहिलटकरीण होती की नाही, माहीत नाही; पण माझा पहिला अनुभव होता. कुतूहल असे की नवजात पिल्ले अंड्यामधून बाहेर कशी पडत असतील! अंजावर वाचले होते की टिटवी एक खास दगड शोधून त्याने अंडी फोडते. हा दगड परीस असतो म्हणे. बरेच येडे पिर याच्या शोधार्थ वणवण करतात.
एक दिवस निरीक्षण करताना अंडी हलल्याचा भास झाला. थोड्या वेळात दोन अंडी फुटली, दोन पिल्ले बाहेर पडली. अंडी फोडून पिलांना बाहेर पडताना बघणे अद्भुत अनुभव होता. डोळ्याचे पारणे फिटले. उर्वरित अंडी नंतर दिवसभरात कधीतरी फुटली असावीत. पिल्ले थोरामोठ्यांच्या देखरेखीखाली वाढू लागली.
परीस दगडाची आख्यायिका याची देही याची डोळा खोटी असल्याचे सिद्ध झाले.
(अवांतर - पिल्लाच्या चोचीवर एक दात असतो, याला 'एग टूथ' म्हणतात. अंड्यातल्या द्रव पदार्थावर पिल्लांचे पोषण होते. कवच कमजोर झाल्यावर पिल्लू एग टूथने ते फोडून बाहेर पडतात. काही दिवसानी एग टूथ पडून जातो. अद्भुतच.)
पिल्लाच्या चोचीवर एग टूथ दिसत आहे.
नवजात पिल्लू.
जन्मवेळ १९/०६ /२०२४, वेळ ९:४१ भा.स्टॅ टा. तज्ज्ञ याची कुंडली मांडू शकतील का?
३. Strawberry finch, Red Avadavat, लाल मुनिया.
'सुपरसायटिंग' होणे एक श्रद्धा आहे. फिरताना फिंगर क्राॅस ठेवायचे. 'संडे हो या मंडे रोज खा अंडे' या धर्तीवर पाय जंगलाकडे वळले. नेहमीचे पक्षी, प्राणी दिसत होते. रोज दिसणारे भटके हाय हॅल्लो करत होते. जागोजागी आफ्रिकन मोनार्क, रुईकर, छोटा चांदवा, कृष्ण कमलिनी इ. फूलपाखरें बागडत होती. ऊन-पावसाचा खेळ चालूच होता.
चालताना बारीक शीळ कानी आली, थबकलो. काळजीपूर्वक चौफेर नजर फिरवली. मोकळ्या मैदानात लाकडांचा ढीग पडला होता. त्यावर छोटा लाल मुनियाची जोडी प्रियाराधन करत होती. चिमणीपेक्षा लहान, गडद लाल-गुलाबी श्री. लक्ष्या आणी सौ. आवडाबाईं..
मागील चार वर्षे हा पक्षी बघण्यासाठी जिवाचा आटापिटा करत होतो. फार दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली.
श्री लक्ष्मणराव
तू खीच मेरी फोटो..
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे नर पक्षी पक्षिणीपेक्षा अधिक अकर्षक, सुंदर असतो. नऊ-दहा सेंटिमीटरचा छोटासा पक्षी, गवताळ कुरणात राहत असल्याने सहजासहजी दिसत नाही.
बाय द वे, मुनियाचे भाऊबंद परदेशवारीत दिसले. 'रेड फिंच' (Amandava amandava) असे म्हणतात. दोघेही एका कुळातील पक्षी.
४. सायबेरियन स्टोनचॅट - NRI गप्पीदास.
पुण्यातील कवडीपाट गाव म्हणजे पक्षिप्रेमींची पंढरी. वीस-पंचवीस उंबरा, गावाच्या परिसरात व नदीतीरावर जवळपास तीनशे प्रकारचे पक्षी बघावयास मिळतात. ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान काळात सायबेरियन स्टोनचॅट (गप्पीदास), ब्ल्यू थ्रोट (नीलकंठ), चक्रवाक (Rudy Shelduck), भिवई (Common Teal), नदी सुरय (River Tern), थापट्या (Northern Shoveler,) ब्लॅक हेडेड गल (Black-headed Gull) असे आणखी बरेच स्थलांतरित पक्षी (NRI) येतात. प्रजननकाळ व थंडी संपल्यानंतर मायदेशी परत जातात. पाणपक्षी सहज दिसतात. स्टोनचॅट, ब्ल्यू थ्रोटकरता खास वणवण करावी लागते. सहजासहजी दिसत नाहीत. (येनार हाय,येनार हाय म्हणून NRI)
या काळात महिन्यातून किमान दोन वेळा तरी इकडे फेरी होते .मनसोक्त भटकतो. नदीतीरावर शंकराचे पांडवकालीन मंदिर आहे. (यादवांनी जीर्णोद्धार केल्याचे समजते). इतर गावांप्रमाणे 'खंडोबाचा माळ'सुद्धा आहे. वारंवार जाण्याने काही तरुणांशी, वरिष्ठ नागरिकांशी तोंडओळख झाली. आजसुद्धा ती टिकून आहे.
गाव महामार्गापासून बरेच आत आहे. छोटा रस्ता, जेमतेम वाहन पार करू शकेल. दोन्ही बाजूंना उसाची शेती. एक दिवस पक्षिदर्शन संपवून घरी परत निघालो होतो. दोन्ही बाजूंना बघत गाडी हळू चालवत होतो. कानावर हाक पडली, "ओ कर्नलसाहेब, तुमचा गप्पीदास आलाय बघा." कचकन ब्रेक मारला, शेतात उडी मारली..आवाजाने पक्षी ऊडून गेला. त्याच्या मागे धावलो (तो हजारो कि.मी. अंतरावरून आला आणि मी...) पक्षी थोड्या अंतरावरील काँग्रेस झुडपावर जाऊन बसला. त्याला बघून धन्स झाले. सुरेख, सुंदर रंगीबेरंगी, चिमणीएवढा पक्षी.
परदेशी पाहुणा गप्पीदास.
अवांतर - राजकीय मुद्दा नाही, पण हे गवत देशात काँग्रेस सरकारच्या काळात आले आणि काँग्रेस पक्षासारखे वेगाने संपूर्ण देशात पसरले, उपरोधाने 'काँग्रेस गवत' किंवा 'गाजर गवत' नाव पडले. याचे मूळ स्थान मेक्सिको, उत्तर अमेरिका. दुष्काळात आयात केलेल्या लाल गव्हांबरोबर याचे बीजही आले.
५. खंडेरावाचा (किंगफिशरचा) नाष्टा.
औताडवाडी - सह्याद्रीमधील महादेव डोंगररांगेच्या कुशीत वसलेले एक खेडे. निसर्गरम्य ठिकाण. महादेववाडीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर. पंधरवड्यात एखादी तरी चक्कर होते. या भागात एक मोठे नैसर्गिक तळे आहे. तळ्याच्या काठावर करढोक (Cormorant) पक्ष्यांची मोठी वस्ती आहे. तिरंदाज (ओरिएंटल डार्टर)सुद्धा दिसतात. थोरला धोबी, शराटी, खंड्या हमखास दिसतात. तलावात गणपती विसर्जन, छटपूजा यासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित होतात. मासेमारीसुद्धा खूप होते.
गणेशोत्सव झाल्यावर पावसाने उसंत दिली, म्हणून या भागात सकाळी सकाळी आलो. तलावाच्या काठी रंग गेलेली बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाच्या मुकुटावर बसलेला खंड्या बघून गंमत वाटली. मजेशीर दृश्य होते. प्रचि काढले. पुढे जंगलात निघून गेलो. परतीच्या वाटेवर पुन्हा तळ्याच्या काठी थांबलो. खंडेराव अजून तिथेच बसून परिसर न्याहाळत होते. त्यांच्यावर कॅमेरा ताणला. जवळच सापाची तीन-चार पिल्ले खेळताना दिसली. खंडेराव त्या पिलावळीकडे एकटक बघत जिभल्या चाटत होते. मला अंदाज आला. मी माझे लक्ष्य निश्चित केले. बराच वेळ गेला, हाताला कळ लागली. कदाचित खंडेरावांचेही पाय दुखायला लागले असावेत. निमिषार्धात झेप घेऊन खंडेरावानी एक पिल्लू उचलले व तलावाकडे धूम ठोकली. मीही तयारीत होतो. गर्रकन कॅमेरा वळवला, फ्लाईट मोडमधे प्रचि काढले. 'सब्र का फल मीठा होता है' हे खंडेरावांनी शिकवले.
https://lh3.googleusercontent.com/d/1OfCxM4N-uoQ-hQgGORdndBdql81WL6yQ
नाष्ट्याच्या प्रतीक्षेत.
गरम गरम नाष्टा.
६. तीनशे रुपायाची कापशी घार Black Winged Kite.
किरण पुरंदरे - प्रख्यात पक्षितज्ज्ञ यांनी मुलाखतीत पक्षिदर्शनाची प्रेरणा त्यांना कशामुळे मिळाली, ते सांगताना या घारीबद्दल उल्लेख केला होता. अर्थात आपल्यालाही दिसावी, असे प्रकर्षाने वाटले.
कुठलेही शिक्षण घेताना वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांचा छळ जरूर करतात. सुरुवातीला काही उच्चशिक्षित (इथे जास्त अनुभवी असा अर्थ अभिप्रेत आहे) अशा विद्यार्थ्यांकडून माझा छळ झाला. एक तर ते खूप चांगली चांगली प्रकाशचित्रे मला पाठवून जळवायचे. पक्ष्याचे चित्र त्यांना पाठवून नाव विचारले, की मुद्दाम 'चित्र स्पष्ट नाही, दुसरे पाठवा' वगैरे वगैरे. एका मित्राने या घारीचा फोटो पाठवला होता. कुठे दिसेल म्हणून त्यालाच विचारले. आढेवेढे घेत 'कवडीपाट' सांगितले. नंतर त्याच मित्राने "सर, तुमचे फोटो खूपच भारी येत आहेत" असे स्वखुशीने प्रमाणपत्र दिले.
असो, थंडीचे महिना, रविवार होता.
कवडीपाट, औताडवाडी, पाठारवाडी, पाषाण अशा दूरच्या ठिकाणी मी रविवारीच जातो. महामार्गावर वाहनांची गर्दी कमी, पक्षिमित्र भेटण्याची शक्यतासुद्धा बळावते.
पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्यावर मिसळपावचा नाष्टा केला. उजव्या बाजूला गावाकडे जाणारी पायवाट पकडली. रस्त्याने आणि नदीकाठावर तीन तास पक्षिनिरीक्षण झाल्यावर परत फिरलो.
जाता जाता, विजेच्या तारेवर एक कापशी घार बसलेली दिसली. खाली शेतात एकटक बघत होती .नक्की घूस ,उंदीर असे काही भक्ष्य दिसले असावे. गाडी चालवत होतो. घाईघाईत गाडी साईडला लावली, दार ढकलले. स्वभावानुसार ते आज्ञाधारकपणे बंद झाले. किल्ली आत राहिली! लोचा लक्षात आला. वेळ न दवडता घारीकडे पळालो. सहज काम झाले, तर आठवणीत कसे राहणार? आता फोटो तरी मिळावा ना! कसले काय! दुष्ट घार दूर जाऊन बसली. तिच्या मागे पळालो. धावतपळतच टकाटक फोटो काढले. मला माझे लक्ष्य आणि घारीला भक्ष्य मिळाले. पायात मोठी घूस पकडून नजरेआड झाली. माझी पावले गाडीकडे वळली.
https://lh3.googleusercontent.com/d/1J6utyiq8O4_E6tLEjSklhefuvEkTF1er
क्या मस्त नाष्टा है....
----
गाडी लाॅक झाली होती. गाव मागे सुटले होते. पायवाटेवर असल्याने वस्ती, वाहतूक नव्हती. त्रिशंकूसारखी अवस्था झाली. पायपीट करत महामार्गावर आलो. जवळची वाहनदुरुस्तीची दुकाने बंद होती. दुपारचे आकरा वाजले होते. माझ्या तोंडाकडे बघून बारा वाजले आहेत हे कुणीही सहज ओळखले असते.
पायवाट हायवेला मिळते, तिथे एक पानपट्टीची टपरी आहे. एक उत्तर हिंदुस्थानी टपरी उघडून दिवाबत्ती करत होता. पूजा झाली, प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितले. मी त्याला 'मेरी दु:खभरी दास्तां' सांगितली. कुठे जवळपास गॅरेज आहे का? विचारले. "भैय्याजी, इतवार हैं ना, आज गॅरेज खुलबे ना करे, छुट्टी जो है" 'अवधी' हेल काढत म्हणाला. माझा रक्तदाब आणखीन वाढवला.
मग कुठला कोण? वगैरे संभाषण वाढवले. "जीला बाराबंकी" लखनौ-रायबरेली रोडवरचे शहर. बरेच वेळा बाराबंकीला कामासाठी गेलो होतो. शहराची माहिती होती. तिकडच्या गोष्टी करू लागलो. थोडा नॉस्टॅल्जिक झाला. मराठीत म्हणाला, "थांबा काका, काम होईल पण वेळ लागेल." (अशा प्रसंगी थोडे खोटे आणि मसाला लावून बोलतो. मदत हमखास मिळते.)
मिसळपाव इफेक्ट संपला होता. पोटात कावळे कोकत होते. घरी आणीबाणीच्या परिस्थितीची सूचना दिली. पलीकडून "काहीतरी खाऊन घ्या" असा हुकूम आला. असे प्रसंगावधान फक्त भारतीय नारीतच असू शकते. पानवाल्याने गाववाल्यास काॅल करून सांगितले, आपला माणूस आहे. गाडी बंद पडलीय. मदत पाहिजे. तोही झोपेत होता. येतो म्हणाला. जरा हायसे वाटले.
'मित्र वणव्यात गारव्यासारखा' कवितेच्या ओळी आठवल्या. पुण्यातील मिपाकर मित्रांना आणी इतरेजनांना कायप्पावर संदेश दिले. धडाधड वांछित / अवांछित सल्ल्यांचा पाऊस पडला.
"गाडीत स्टीलची पट्टी ठेवावी".
"एखादा कलथा ठेवला असेल तर डायवर साईटच्या खिडकीचे गास्केट काढा व ....".
आणि असे बरेच....
वयोवृद्ध मिपाकर चित्रगुप्त यांनी पॅरिसवरून संदेश पाठवून माझ्या जखमेवर मीठ चोळले. त्यांनी मेसेज केला,
Chitragupta Kaka Mipa:-
ठके चुके विसरी भांडी..
आठवण जालिया चर्फडी....
'मित्र वणव्यातही गारव्यासारखा'...
साडेबारा वाजता दुसरा बाराबंकियां स्कूटरवर आला. तोंडात पान, मुखरस संभाळून मित्राला विचारले, "गड़िया कहाँ है बे?" टपरीवाल्याने माझ्याकडे बोट दाखवले.
नजरेनेच मला पिलियन सीट दाखवली. मी टुणकन उडी मारून बसलो. गाडी दूर नव्हती. पण काहीही म्हणा, मेकॅनिक भारी होता. दोन मिनिटात चावी काढून हातावर ठेवली. "किती पैसे?" विचारले, शब्द व मुखरस वाया न घालवता तीन बोटे दाखवली. रुपये घेतले, स्कूटरवर टांग टाकून दिसेनासा झाला. मी घराकडे निघालो. तीनशे रुपये खर्चून कापशी घार बघायला मिळाली.
७. चोट्टी चोर-कोकिळा
रविवार होता, महादेववाडी अजून साखर झोपेत होती. गेटवर सुरक्षा रक्षक, निरीक्षक रात्रपाळी संपली एकदाची असा भाव चेहर्यावर ठेवून जांभया देत होते. राम राम दुवा-सलाम करून विठ्ठल मंदिराकडे निघालो. नव्यानेच स्थापन केलेल्या गणपती मंदिरात अथर्वशीर्ष वाजत होते. समोर विठ्ठल मंदिरात कोणी गावगंधर्व पांडुरंगाची आळवणी करत होता. रस्त्यातून हजेरी लावून मी गोडसे महाराजांच्या मठाकडे प्रस्थान केले. महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर पडलो. शेतात टोमॅटोचे पीक तयार होते. तोडा चालू होता. विजेच्या तारेवर खंड्या ,कावळे, साळुंक्या अंतर ठेवून बसले होते.
बांधावर उभे राहून निरीक्षण करत असताना अचानक सौ. कोकिळाबेन (इथे कुणा व्यक्तिविशेषाचा नामनिर्देश नसून ती मादी कोकीळ पक्षी असल्याने आदरार्थी विषेशण जोडले आहे.) घाईघाईत शेतात घुसल्या आणि उंच माजलेल्या तांबाट्याच्या झुडपात अदृश्य झाल्या. डोक्यात केमिकल लोच्या झाला. मी त्याच जागी नजर रोखून धरली. काही सेकंदात सौ. कोकिळाबेन बाहेर पडल्या, आकाशाकडे झेप घेतली. क्षणभर चोचीत भक्ष्य असल्याचा भास झाला. बात आयी गयी हो गयी....
टेकडीवर जाणारी पायवाट पकडली. थोडे दूर गेल्यावर त्याच कोकिळाबेन एका वाळलेल्या झाडाच्या उंच फांदीच्या टोकावर बसलेल्या दिसल्या. तसे पाहता कोकीळ पक्षी या भागात खूप दिसतात. नवीन काही नव्हते. तरीही पाय तिथेच थांबले व कोकिळेकडे एकटक बघत राहिलो. क्षणात कोकिळेने लालभडक छोटा टोमॅटो गळ्यातून बाहेर काढला, दुसर्याच क्षणी पुन्हा गिळला. कदाचित ॲक्शन रिप्ले होईल या वेड्या आशेने मी छायाचित्रक सज्ज करून अर्जुनाप्रमाणे प्रत्यंच्या ताणली. सौ. कोकिळाबेन यांनी माझी इच्छा पूर्ण केली. प्रतिक्षिप्त क्रियेने आपले काम केले व सुंदर असे चित्र टिपले गेले.
https://lh3.googleusercontent.com/d/1csCg-Bvx5t99T2FaUk48aDbnN_1NNbwS
Not guilty until proven....
https://lh3.googleusercontent.com/d/15v4ERu6AkQurZ3BkvgPMYT9hBokRa3Uw
८. खाटिक Long-tailed shrike, Rufous-backed shrike
एका पक्षिमैत्रिणीने 'नीलिमा' (Tickell's Blue Flycatcher) पक्ष्याचे सुंदर प्रचि पाठवले. कुठे दिसला म्हणून विचारले. "पाठारवाडी तळे" असे उत्तर आले. महाज्ञानी गूगलबाबाने सांगितले - पठारवाडी, पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटात डोंगराच्या कुशीत वसलेले एक टुमदार गाव. इथेच प्राचीन चतुर्मुख महादेव मंदिर आहे. निसर्गरम्य परिसर. घरापासून वीस कि.मी.अंतरावर आहे. नुकत्याच झालेल्या आंतर्देशीय सायकल स्पर्धेसाठी घाटरस्त्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. कऱ्हा नदीचा उगम याच डोंगरावर झालाय व ती पुढे सासवडकडे प्रयाण करते. बाकी पौराणिक संदर्भ ,तत्कालीन मंदिर व परिसर याबद्दल इच्छुक तूनळीवर माहिती घेऊ शकतात.
मुसळधार पावसाने थोडी उसंत घेतली होती. एकोणीस जुलै, रविवार. घरमालकीण, मुले साखझोपेतच होती. मी चारचाकी काढली आणि बोपदेव घाटाकडे प्रस्थान केले. 'कापशी घार' प्रकरणानंतर गाडीच्या दोन्ही किल्ल्या बरोबर घेऊन निघतो. (दुधाने पोळलेला ताक). पावसाळी हवा, मस्त गारवा, राज्यमार्गावर बोटावर मोजण्याइतकी वाहने. गूगल मॅप लावला. नाट्यसंगीत सुरू केले. घाटमाथ्यावर येऊन परिसराचा आनंद घेतला. नंतर थेट मंदिरापर्यंत मजल मारली. ब्रह्मगिरीवर (इथे ब्रह्माजींनी तप केले म्हणे) पावसाळी ढगांनी मुक्काम ठोकला होता. पोटुश्या बाईसारखी ढगांची पावले जड झाली होती. वार्याला भीक घालत नव्हते. एक कविता आठवली,
काळा काळा कापूस पिंजरा रे
ढगांशी वारा झुंजला रे..
देवदर्शन झाले, एकुलते एक हाॅटेल कम पान टपरी कम किराणामाल दुकान. मालक भज्याचा घाणा काढत होता. गल्ला आणि चहा दोन्ही मालकीणबाई सांभाळत हरकाम्या पोराला हुकूम सोडत होत्या. एक प्लेट गरम भजी व दोन कट चहा मारला आणि परतीच्या प्रवासास सुरुवात केली.
पूर्ण रस्ता घाटाचा ,निर्मनुष्य पण निसर्गरम्य. गाडी रमतगमत चालली होती. कानात"वळीव, वळीव" असा आवाज ऐकू आला. लक्षात आले की 'छोटा पावश्या (Grey Billed Cuckoo) आवाज देतोय. इथे जवळपास कुठेतरी बसला असणार! गाडी थांबवून नजर भिरभिरवली. रस्त्याच्या कडेला विजेच्या ताराचे ओझे धल खांद्यावर घेऊन उभे असलेले खांब, दोन्ही अंगास काळीभोर शेतजमीन,ओलेती, हिरवी जणू चंद्रकळा नेसलेली सवाष्ण. बांधावर आंबा-लिबं-बाभळीची झाडे.
विजेच्या तारेवर छोटा पावश्या बसला होता. प्रचि काढले. पावश्या उडून गेला. तिथेच जवळ दोन खाटिक पक्षी अंतर ठेवून बसले होते. जोडपे होते की दोन्ही ठलवे, ते कळत नव्हते. (नर आणी मादी रंग-रूप-आकाराने सारखे असतात.) दूर असल्याने दोघे एकाच वेळेस फोटोफ्रेममध्ये बसत नव्हते. मी Aim धरून बसलो होतो. एकाने भरारी घेतली. दुसरा नसून दुसरी होती. मौसम बेइमान होता. 'रोजा' चित्रपटातले गाणे आठवले.....
रुकमणि रुकमणि शादी के
बाद क्या क्या हुआ
कौन हारा कौन जीता
खिड़की में से देखो जरा..
https://lh3.googleusercontent.com/d/1d8_2SSDkoql9Yo6nVpcsnN1M_gtZwfCq
https://lh3.googleusercontent.com/d/1Og888mszgBxbEW1RO6Bg2kZMBJilNW72
मी गुपचुप मनाची खिडकी आणि गाडीचा दरवाजा बंद करून पुण्याकडे प्रस्थान केले.
९. यलो बिल्ड मॅगपाय, कस्तुरचंद
हिमाचल प्रदेश भटकंतीला गेलो होतो. जाण्यापूर्वी त्या भागातल्या पक्ष्यांंची माहिती घेतली, 'मर्लिन' डेटाबेस अपडेट केला. पॅकेज टूर असल्याने माझ्याकडे वैयक्तिक थोडाच वेळ होता, तेवढ्या वेळातच पक्षिनिरीक्षण करावे लागणार होते. पॅकेज्ड टूरचा एक त्रास असतो - कंपनीचा माणूस सारखा टुरटुर करत असतो आणि पर्यटकांना त्याच्या तालावर थयथयाट करावा लागतो. असो. दिल्ली, चंदिगढ, शिमला करत मनाली येथे पोहोचलो. भटकंतीमध्ये एक गोष्ट माझ्या पथ्यावर पडली. दिवसाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होत असल्याने साडेपाच ते साडेसात माझा वेळ होता.
मनाली निसर्गरम्य, हाॅटेल चहूबाजूंनी हिरवळीत लपलेले, पर्वतरांगाच्या कुशीत. आजूबाजूला स्थानिक झाडे, गोल्डन जातीची सफरचदं, खुरमानी, अळू, चेरी अशी कच्च्या-पक्क्या फळांनी लगडलेली. चेरी हे फळ सर्वात आगोदर पिकते. चेरीचे फळ लालभडक, झाड लाइटच्या छोट्या लाल बल्बच्या माळांनी नटलेले वाटत होते. सकाळची कोवळी किरणे, थंडीमुळे जमा झालेले दवबिंदू. आ हा हा, काय स्वर्गीय नजारा होता. येथील जीववैविध्य अप्रतिम, पक्षीसुद्धा भरपूर आणि मनभावन रंगीबेरंगी.
ते निसर्गसौंदर्य बघत असताना एक आकाशी रंगाचा पक्षी चेरीच्या हिरव्या-लाल फळांच्या झुपक्यातून दिसला. 'पिवळ्या चोचीचा निळा कस्तूर' (Yellow Billed Magpie) होता. लालचुटुक फळे खाऊन बिया खाली टाकत होता.
https://lh3.googleusercontent.com/d/1s6Zp3PpSQ3nO1sBCy5rU8z-kMNz9D9k_
मला लहानपण आठवले. मोठी मुले झाडावर चढून चिंचा काढायची आणि मी केविलवाणे तोंड करून "ए, चिंच खाली टाक ना" विनवणी करायचो.. अगदी असेच फीलिंग आले.
न राहवून मी कस्तुरचंदला म्हणालो, 'मुझे भी दे दे ना! मै तुम्हारा बीबी के साथ मुफ्त फोटो शूट करूंगा!' बात आयी गयी हो गयी. कस्तुरचंद उडून गेला. मीसुद्धा नाष्ट्याला निघून गेलो.
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा तिथेच गेलो. कदाचित कस्तुरचंद आज पुन्हा येईल, इतर पक्षीसुद्धा बघायचे होते. ओ माय माय! गर्द हिरव्याकंच पानामागे श्री. व सौ. कस्तुरचंद पोझ घेऊन बसले होते.कस्तुरचंद शब्दाला जागले. मीसुद्धा माझ्या शब्दाला जागलो. खूप फोटो घेतले.
https://lh3.googleusercontent.com/d/1dJMOPZGx5p0rLR5tv9Poxi4Y-pmiXzyq
कस्तूरचंदजी, मॅडम को नही, कॅमेरेकी तरफ देखों!
https://lh3.googleusercontent.com/d/1xP9Jp9EcSgw2Js-ugUkIJyXQL2qRLMnD
(अवांतर - अम्रिकेतील ब्ल्यू जे (Blue Jay) आणि कस्तुरचंद एकाच कुळातले.)
तर वाचकांनो, असे अनेक क्षण अनुभवास येतात. सर्वच सांगत बसलो, तर खूपच मोठा लेख होईल, कदाचित कंटाळवाणासुद्धा. आता इथेच थांबतो. बाकी पुन्हा कधीतरी.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मिसळपाव
प्रतिक्रिया