Skip to main content

जेफ्री आर्चर आणि मी, एक ग्रेट भेट

लेखक लीना सोहोनी यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

जेफ्री आर्चर आणि मी, एक ग्रेट भेट

सौ. लीना निरंजन सोहोनी
जेफ्री आर्चर आणि मी, एक ग्रेट भेट

 

परिचय -

सौ. लीना निरंजन सोहोनी या सुप्रसिद्ध लेखिका आणि अनुवादिका असून मेहता पब्लिशिंग हाउससाठी त्यांनी अनुवादित केलेल्या प्रकाशित पुस्तकांची संख्या ७२ आहे. याशिवाय 'अनुवादातील अनुसर्जनाकडे' हे अनुवाद या विषयावरील त्यांचे पुस्तकही बरेच लोकप्रिय ठरले आहे.

लीना सोहोनी वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून मराठीतून, तसेच इंग्लिशमधून नियमित लेखन करतात. त्या जर्मन विषयाच्या द्विपदवीधर आणि सुवर्णपदक विजेत्या असून त्यांना अनुवादाच्या दोन राज्य पुरस्कारांसहित इतरही अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या अनुवादित पुस्तकांच्या नेहमीच अनेक आवृत्त्या निघत असतात आणि आपल्या देशात व परदेशातही त्यांचे वाचक पसरलेले आहेत. 

..............................

 

संपादकीय नोंद

लेखिकेने हा आठवणींचा धागा अमेरिकेतून ४ ऑक्टोबरला शब्दांत गुंफून आमच्याकडे सोपवला आणि दुसऱ्याच दिवशी - ५ ऑक्टोबर या दिवशी, लंडनमधून जेफ्री आर्चर यांच्या निधनाची बातमी आली.

हा एक अत्यंत अनाकलनीय आणि दुर्दैवी योगायोग!

विशेष म्हणजे आर्चर यांच्या 'ॲडम अँड ईव्ह' या अखेरच्या कादंबरीच्या प्रकाशनाच्या एकच दिवस अगोदर या 'मास्टर स्टोरीटेलर'ने जगाचा कायमचा निरोप घेतला. 

या लेखात उमटलेला त्यांचा जिवंत सहवास आणि प्रसन्न उपस्थिती वाचकांपर्यंत तशीच पोहोचावी, म्हणून हा उत्स्फूर्त लेख मूळ रूपातच प्रसिद्ध करत आहोत.

..............................

 

“विदेशी साहित्यातील तुमचा सर्वात आवडता कथालेखक कोण?” असं जर मला कुणी विचारलं, तर ‘मास्टर स्टोरीटेलर’ असा ज्या साहित्यिकाचा जगात सर्वत्र उल्लेख करण्यात येतो, ते सुप्रसिद्ध ब्रिटिश कथा- व कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचंच नाव सर्वात प्रथम माझ्या तोंडी येईल, हे नक्की. नेमकी व अचूक शब्दयोजना, उत्कृष्ट पात्रयोजना, शब्दांमधून वाचकांसमोर दृश्य उभं करण्याची हातोटी, कथानकाची कौशल्यपूर्ण हाताळणी या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांच्या लेखणीतून उतरलेली  प्रत्येक कथा - मग ती लघुकथा असो, दीर्घकथा असो, नाहीतर कादंबरी - सर्वांगाने परिपूर्ण असते. 

मी जेफ्री आर्चर यांना सर्वात पहिल्यांदा भेटले ती त्यांच्या  'केन अँड एबल' या कादंबरीतून! मला अजूनही आठवतं, तो १९८५ सालचा मे महिना असावा. तेव्हा मी इंग्लिश कादंबऱ्या वाचायला सुरुवात करून जेमतेम तीन-चार वर्षंच झाली होती. खरं तर मी मराठी माध्यमात शिकलेली, पुणे शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी असल्यामुळे इंग्लिश साहित्याशी माझा याआधी कधी फारसा संबंध आला नव्हता. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना इंग्लिश हा माझा आवडता विषय होता, पण वाचन काही म्हणावं तेवढं जास्त नव्हतं. पुढे लग्न झाल्यावर मुंबईला येऊन एका कॉस्मोपॉलिटन सोसायटीत राहू लागले. आजूबाजूला फारशी मराठी कुटुंबं नव्हती आणि मुख्य म्हणजे मराठी लायब्ररी नव्हती. वाचनाची आवड गप्प बसू देईना, म्हणून इंग्लिश लायब्ररी लावली आणि सुरुवातीला जी काही पुस्तकं वाचली, त्यात एकदा 'केन अँड एबल' हे पुस्तक हाती पडलं आणि ते मी एका रात्रीत वाचून काढलं. त्या पुस्तकाने मला अक्षरशः झपाटून टाकलं.

‘केन अँड एबल’ ही ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर यांनी १९७९ साली लिहिलेली कादंबरी आहे. १९७९मध्ये इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर फेब्रुवारी १९८०मध्ये अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीने अल्पावधीतच जगभरातील वाचकांचं लक्ष वेधून घेतलं. प्रकाशनाच्या पहिल्याच आठवड्यात या पुस्तकाच्या दहा लाख प्रती विकल्या गेल्या आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाने थेट पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं.

विल्यम लॉवेल केन आणि एबल रोस्नोव्हस्की या दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांमधील संघर्ष ही या कादंबरीची मध्यवर्ती कथा आहे. या दोघांची पार्श्वभूमी मात्र एकमेकांपेक्षा अगदी वेगळी आहे. विल्यम केन हा बोस्टनमधील एका कोट्यधीशाचा मुलगा आहे, तर एबल रोस्नोव्हस्की हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून विस्थापित झालेला तरुण आहे. नाझींच्या छळछावणीतून कसाबसा जीव वाचवून तो चोरट्या मार्गाने अमेरिकेत येऊन पोहोचतो.

जगाच्या दोन विरुद्ध टोकांना जन्मलेले हे दोघं नायक एका विलक्षण योगायोगाने एकाच दिवशी, एकाच नक्षत्रावर आणि एकाच घटिकेला जन्मलेले असतात. पुढे नियती त्यांच्या आयुष्याला अशा प्रकारे एकमेकांशी जोडते की स्वतःचं भविष्य स्वतः घडवण्याच्या प्रयत्नांत ते वारंवार एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यांच्या आयुष्यातील हा संघर्ष, स्पर्धा आणि एकमेकांशी असलेला सततचा सामना याभोवतीच या कादंबरीची कथा आकार घेत जाते.

त्या काळी एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक जर मला आवडलं, तर तेवढ्यावर माझं समाधान होत नसे. त्या साहित्यिकाचं समग्र साहित्य लागोपाठ वाचून काढायची मला सवय होती. त्यामुळे त्या लेखकाचा आवाका आपल्या लक्षात येतो, असं मला वाटे. त्यामुळे त्यानंतर मी जेफ्री आर्चर यांची सगळी पुस्तकं अशीच झपाटल्यासारखी वाचून काढली.

पुढे मी अनुवादाच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २००० साल जेव्हा उजाडलं, तेव्हा माझे १२-१५ अनुवाद प्रसिद्ध झाले होते. या क्षेत्रात येऊन मला सुमारे १३-१४ वर्षं झाली होती, त्यामुळे मी नक्कीच नवोदित नव्हते. “तुम्हाला तुमच्या आवडीच्या एखाद्या विशिष्ट पुस्तकाचा अनुवाद करावासा वाटला, तर तुम्ही मला नक्की  सांगा” असं मला माझे प्रकाशक सुनील मेहता यांनी सांगितलं होतं. तेव्हा "जेफ्री आर्चर यांचं एखादं पुस्तक आपल्या वाचकांसाठी मराठीत आणायला मला आवडेल" असं एक दिवस मी त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी मला जेफ्री आर्चर यांच्या 'टू कट् अ लाँग स्टोरी शॉर्ट' या लघुकथांच्या संग्रहाच्या अनुवादाचं काम दिलं. तो संग्रह २००२ साली प्रकाशितही झाला. एव्हाना मी जेफ्री आर्चर यांची सर्वच्या सर्व पुस्तकं वाचून काढली होती. 

त्या काळी आम्ही कोल्हापूरला राहत होतो. त्यानंतर २००८ सालच्या मे महिन्यात एक दिवस अचानक मला सुनील मेहता यांचा फोन आला. ते म्हणाले, “तुमचे आवडते लेखक जेफ्री आर्चर भारताच्या दौऱ्यावर येत असून ते उद्याच सकाळी ११च्या सुमारास पुण्यात पोहोचणार आहेत. त्यांचं एक नवीन पुस्तक येतंय, 'अ प्रिझनर ऑफ बर्थ.' त्याच्या प्रकाशनपूर्व प्रसिद्धीसाठी ते येत आहेत. ते 'ब्लू डायमंड हॉटेल'मध्ये उतरणार आहेत. तुम्हाला जर त्यांना भेटायची इच्छा असेल, तर उद्या सकाळी साडेदहाच्या सुमाराला तुम्ही पुणे ऑफिसमध्ये पोहोचू शकाल का? आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. पण अर्थात पुण्यात त्यांचा मुक्काम फक्त एकच दिवस आहे. ते खूपच बिझी असतील, त्यामुळे ते आपल्याला भेटायला तयार होतीलच असं नाही. तरीही आपण प्रयत्न करून पाहू."

मग मी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे कोल्हापूरहून निघाले. मी साडेदहाच्या सुमाराला पुण्याच्या बाजीराव रोडवर असलेल्या मेहता प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचले. जेफ्री आर्चर यांचं बुकिंग ‘ब्लू डायमंड’ हॉटेलमध्ये असल्याचं समजलं होतं. मग सुनील मेहतांनी तिकडे फोन केला. जेफ्री आर्चर नुकतेच तिथे येऊन पोहोचले होते. रिसेप्शन काउंटरवरच्या माणसाने त्यांच्या रूममध्ये फोन जोडून दिला. सुनील मेहतांनी आर्चर यांना स्वतःची ओळख सांगितली आणि 'मी व तुमच्या पुस्तकाचे अनुवादक तुमची भेट घ्यायला येऊ इच्छितो' असंही त्यांना सांगून भेटीची वेळ मागितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेफ्री आर्चर यांनी जराही आढेवेढे न घेता आम्हाला भेटीची वेळ दिली. खरं तर त्यांचे संपूर्ण दिवसभराचे सगळे कार्यक्रम आधीच ठरलेले होते, पण त्यांनी त्यांच्या लंचसाठी राखून ठेवलेल्या अर्ध्या तासातील वीस मिनिटं आम्हाला दिली. आम्ही ठरलेल्या वेळेच्या जरा आधी - म्हणजे दुपारी साडेबाराला तिकडे जाऊन पोहोचलो. मी, प्रकाशक सुनील मेहता आणि त्यांचा एक मित्र असे तिघे जेफ्री आर्चर यांच्याच पुस्तकाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाची प्रत, पुष्पगुच्छ, फळांची करंडी वगैरे घेऊन 'ब्लू डायमंड'च्या लॉबीत दाखल झालो. जेफ्री आर्चर त्यांचा लंच केवळ दहा मिनिटांत आटपून लॉबीत आले. मी लगेच उठून‌ त्या अनुवादित पुस्तकाची प्रत त्यांच्या हाती ठेवली. त्याच्या कव्हरचं डिझाइन मूळ इंग्लिश पुस्तकाच्या डिझाइनसारखंच कायम ठेवलेलं असल्यामुळे त्यांनी ते पुस्तक (टू कट् अ लाँग स्टोरी शॉर्ट) लगेच ओळखलं. ते पाहून त्यांना फारच आनंद झाला. त्यांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. भारतात इंग्लिश वाचणारे इतके जास्त वाचक आहेत हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी मला विचारलं, “तुम्ही हा अनुवाद कोणत्या भाषेत केला आहे, हिंदुस्तानी भाषेत का? तो कोण वाचेल?"

मग मी त्यांना म्हटलं, "नाही, हा अनुवाद मराठीत आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची भाषा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जे वाचक तुमचं मूळ इंग्लिश पुस्तक वाचू शकणार नाहीत, ते हा अनुवाद वाचतील.”

त्यानंतर त्यांनी सुनील मेहतांशी पुस्तक प्रकाशनासंबंधी इतर अनेक बाबींवर चर्चा केली. त्यानंतर ते माझ्याकडे वळून म्हणाले, “तुम्ही माझी किती पुस्तकं वाचली आहेत?"

मी म्हटलं, “सगळी वाचली आहेत."

मग ते म्हणाले, “तुम्हाला त्यातलं सर्वांत जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं?"

मी क्षणाचाही विचार न करता म्हणाले, “केन अँड एबल.”

ते म्हणाले, “माझंसुद्धा सर्वांत आवडतं पुस्तक तेच आहे. तुम्ही त्याचा का नाही अनुवाद करत?”

मी म्हणाले, “जरूर करीन."

“मग करा ना." त्यानंतर तेच पुढे म्हणाले, “तुम्ही खरं तर माझ्या सगळ्याच पुस्तकांचा अनुवाद केला पाहिजे.”

मग आम्ही त्यांना म्हणालो, “तुम्ही आम्हाला तशी परवानगी द्या.”

त्यावर ते हसून म्हणाले, “पण मी आत्ता ज्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आलो आहे, ते पुस्तक म्हणजे 'अ प्रिझनर ऑफ बर्थ.' त्याचं काम तुम्ही आधी सुरू करा. ते पुस्तक मी तुम्हाला पाठवतो.” मग ते मला म्हणाले, “आज दिवसभर माझे पुण्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. तुम्ही माझ्याबरोबर का नाही येत?"

त्यावर मी त्यांची क्षमा मागून म्हणाले, “मला यायला नक्कीच आवडलं असतं, पण मला माझ्या गावी परत जायला हवं.”

मी केवळ त्यांना भेटण्यासाठी २३५ कि.मी.चा प्रवास करून पुण्याला आल्याचं कळताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 

त्यांनी माझे अनेकवार आभार मानले आणि स्वतःचा ई-मेल आयडी मला दिला. आम्ही त्यांचा निरोप घेऊन तिथून निघालो.

त्यानंतर खरोखरच आपला दौरा संपवून इंग्लंडला परतल्यावर काही दिवसांतच त्यांचं ते नवीन पुस्तक 'अ प्रिझनर ऑफ बर्थ' पुण्याच्या ऑफिसात येऊन दाखल झालं.‌ मेहतांच्या ऑफिसकडून ते कोल्हापूरला माझ्या घरी पोहोचलं आणि मी लगेच त्याच्या अनुवादाचं काम सुरू केलं. ज्याप्रमाणे सुधा मूर्ती यांनी माझ्यावर आणि मेहता प्रकाशनावर गाढ विश्वास टाकून स्वतःची अनेक इंग्लिश पुस्तकं मला अनुवादासाठी दिली होती, तेच जेफ्री आर्चर यांच्याही बाबतीत घडलं. आजवर मी जेफ्री आर्चर यांच्या १५ पुस्तकांचे अनुवाद केले आहेत.

'द प्रिझनर ऑफ बर्थ' हे पुस्तक माझ्या करिअरच्या दृष्टीने एक माइलस्टोन होतं, कारण तो माझा प्रकाशित झालेला पंचविसावा अनुवाद होता. त्यानंतर जेफ्री आर्चर यांच्या सेक्रेटरीचा आणि माझा ई-मेलवर जो संपर्क प्रस्थापित झाला, तो अजूनही आहे. अनुवादाचं काम करत असताना अनेकदा आम्हा अनुवादकांना काही प्रश्न पडतात, काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नसतात किंवा नीट समजलेल्या नसतात, काही वेळा पार्श्वभूमी नीट कळलेली नसते, संदर्भ लागत नाहीत. अशा वेळी मूळ लेखकाकडून मदत मिळाली, तर काम सोपं होतं. जेफ्री आर्चर यांना अशा प्रकारे कधीही मेल केल्यावर त्यांच्या सेक्रेटरीकडून चार तासांत माझ्या प्रश्नाचं उत्तर येतं, असा माझा अनुभव आहे. 

वाचक जेव्हा कोणतंही पुस्तक वाचतात, तेव्हा ते कधीच त्यातला प्रत्येक शब्द वाचत नाहीत. सर्वसामान्य वाचक पुस्तक वाचताना प्रत्येक शब्द बारकाईने वाचत नाहीत. वाचताना मुख्यतः आशय, कथानक किंवा विचारांकडे त्यांचं लक्ष असतं. पण अनुवादक म्हणून आम्हाला मात्र प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आणि त्यातील बारकावे तपासावे लागतात. त्यामुळे मजकुरात राहून गेलेल्या अगदी किरकोळ चुका, विसंगती किंवा अनवधानाने झालेल्या त्रुटीदेखील आमच्या लगेच लक्षात येतात. जिथे जिथे शक्य असेल तिथे मी मूळ लेखकाशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते व त्यांना पुढील आवृत्तीमध्ये ती चूक दुरुस्त करण्याची सूचना करते.

एक-दोन वेळा मला जेफ्री आर्चर यांच्या पुस्तकातील लहानशा चुका/विसंगती मला सापडल्या होत्या, त्या मी त्यांना कळवल्या होत्या. त्यांनी त्या गोष्टीचं स्वागत करून माझे आभारही मानले होते. एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीच्या लेखकाकडून अशा चांगल्या वागण्याचा अनुभव आला, याचं मला विशेष समाधान वाटतं.

या अशा सिद्धहस्त, प्रज्ञावंत लेखकाशी माझी आणखी एकदा भेट झाली. आम्ही तब्बल सहा वर्षांच्या गॅपनंतर भेटूनही त्यांनी मला लगेच ओळखलं, हे विशेष. 

२०१४ साली आम्ही एक आठवडा स्कॉटलंडमध्ये राहून त्यानंतर लंडनहून फ्लाइट घेऊन शिकागोला जाणार होतो. आमचा लंडनमध्ये २४ फक्त तास मुक्काम असणार होता. मी जेफ्री आर्चर यांच्या सेक्रेटरीला तो दिवस व तारीख कळवली आणि जेफ्री आर्चर यांना भेटण्याची इच्छा असल्याचं कळवलं. नेहमीप्रमाणे मला चार तासात त्यांच्या सेक्रेटरीची मेल आली. जेफ्री आर्चर यांनी मला त्यांच्या घरी भेटायला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतु माझ्यापुढे एक समस्या होती. मी लंडनमधील हॉटेलमधून निघून एकटी त्यांच्या घरी भेटायला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे या ‌भेटीला येताना माझ्यासोबत माझे यजमानही असतील, मी एकटी येऊ शकणार नाही, असं मी त्यांच्या सेक्रेटरीला ई-मेलवर कळवलं. त्यावर परत एकदा तातडीने तिचं उत्तर आलं. जेफ्री आर्चर यांनी आम्हा दोघांनाही निमंत्रण दिलं होतं.

आम्ही ठरलेल्या दिवशी वेळेच्या पाच मिनिटं आधीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचलो. अल्बर्ट एम्बँकमेंट या लंडन शहराच्या अत्यंत गजबजलेल्या भागात थेम्स नदीच्या काठी असलेल्या नितांतरमणीय परिसरात पेनिन्सुला हाइट्स या उंच बिल्डिंगमध्ये त्यांचा आलिशान फ्लॅट आहे. आम्ही बिल्डिंगच्या स्वागत कक्षात जाऊन थांबलो. खालच्या बाजूला सुरक्षा अधिकाऱ्याने आमची नावं लिहून घेतली आणि बसायला सांगितलं. आम्ही येणार असल्याची त्याला आधीच कल्पना देण्यात आली होती. आमची दोघांची नावं त्याच्याकडे लिहिलेली होती. 

त्यानंतर दहा मिनिटांतच त्याला वरून फोन आला आणि तो आम्हाला लिफ्टने वर घेऊन गेला. जेफ्री आर्चर यांच्या प्रायव्हेट लिफ्टने आम्ही थेट त्यांच्या पेन्टहाउस अपार्टमेन्टमध्ये जाऊन दाखल झालो. एका नोकराणीने आमची जॅकेट्स आणि सॅक वगैरे ताब्यात घेऊन आम्हाला दिवाणखान्यात नेऊन बसवलं. त्या फ्लॅटचं छत सुमारे वीस फूट उंचीचं होतं. सर्वत्र पेंटिंग्ज आणि सुंदर भव्य फर्निचरचं जणू प्रदर्शनच भरलं होतं. जागोजागी जेफ्री आर्चर यांना मिळालेली स्मृतिचिन्हं, चषक आणि मानपत्रं ठेवण्यात आली होती. दिवाणखान्याच्या भिंती तीन बाजूंनी पूर्णपणे काचेच्या होत्या. त्यांतून खाली वाहणाऱ्या थेम्स नदीचं रमणीय दृश्य दिसत होतं. कधी नव्हे तो त्या दिवशी लंडनमध्ये लख्ख सूर्यप्रकाश होता, त्या प्रकाशात नदीच्या पात्रातील पाणी चमकत होतं. समोरच्या बाजूला पार्लमेंट हाउसची बिल्डिंग दिमाखात उभी होती. एवढ्यात जेफ्री आर्चर यांची सेक्रेटरी ॲलिसन तिथे आली, तिने आमची विचारपूस केली, चहापाणी विचारलं. आम्ही दोघी ई-मेल आणि फोनवर गेल्या काही वर्षांपासून संपर्कात होतोच. बरोबर ११ वाजता स्वतः जेफ्री आर्चर तिथे आले. त्यांनी मला लगेच ओळखलं. इतकंच नव्हे, तर त्यांनी जुनी ओळख असल्यासारख्या आमच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल सांगितलं. ते भारताच्या आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंविषयी बोलले. पुणे शहराविषयी तर ते अत्यंत प्रेमाने बोलले. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यातील सुप्रसिद्ध सराफांचं दुकान कोणतं, असं त्यांनी विचारलं. त्यांना पु.ना. गाडगीळ सराफांचं नाव आठवत नव्हतं; पण मी नाव सांगितल्यावर आपल्याला तेच म्हणायचं होतं, असं त्यांनी सांगितलं. योगायोगाने मी त्यांच्यासाठी आठवण म्हणून एक छोटीशी भेटवस्तू नेली होती, ती पु.ना. गाडगीळ यांच्या दुकानातलीच होती. हे मी त्यांना सांगताच त्यांना हसू आलं. "पुण्यातील स्त्रिया सुंदर असतात" असं ते गमतीने म्हणाले आणि आमच्या याआधी पुण्यात झालेल्या भेटीत मी साडी नेसले होते, हेही त्यांना आठवत होतं. आम्ही जवळपास ४० ते ४५ मिनिटं तिथे होतो, त्यानंतर आमची निघायची वेळ झाली. इतक्यात त्यांची एडिटर तिथे आली. त्यांनी माझी व तिची ओळख करून दिली. 

योगायोगाने त्याच्या आधीच्याच आठवड्यात मी अनुवाद करत असलेल्या त्यांच्याच एका पुस्तकात मला व्याकरणाची एक लहानशी चूक सापडली होती आणि मी ती ई-मेलद्वारे त्यांच्या निदर्शनास आणली होती. त्या गोष्टीची त्यांना आठवण झाली. मग ते कृतककोपाने आपल्या एडिटरला म्हणाले, “ही इंडियन अनुवादिका आपल्या भाषेच्या, त्याही व्याकरणाच्या चुका काढते. काय हे?" त्यावर आम्ही सगळेच हसलो.

 

Article illustration

त्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर थोडे फोटो काढले. मी त्यांच्याच काही अनुवादित पुस्तकांची कव्हर्स प्रिंट करून आणली होती. त्यावर मी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

त्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो. त्याच संध्याकाळची फ्लाइट घेऊन आम्ही शिकागोला गेलो. अमेरिकेला पोहोचल्यावर मला आश्चर्याचा एक गोड धक्का बसला. जेफ्री आर्चर यांच्या ऑफिशिअल फेसबुक व ट्विटर पेजवर त्यांचे व माझे, तसेच माझ्या अनुवादित पुस्तकांच्या कव्हर्सचे फोटो झळकत होते. 'माझ्या पुस्तकांची इंडियन अनुवादिका मला भेटायला आली होती' असं त्यांनी त्यात म्हटलं होतं.

का कुणास ठाऊक, पण भारतीय लोक खूप टेक्नो-सॅव्ही असतात, असा आमच्या त्या भेटीत त्यांचा समज झाला होता आणि त्यामुळे मीही टेक्नो-सॅव्ही असणार, असं त्यांनी व त्यांची सेक्रेटरी ॲलिसन हिने गृहीत धरलं असावं; कारण त्यानंतर वर्षभराने मला ॲलिसनची मेल आली. तिने मला मेलवर एक व्हिडिओ क्लिप पाठवली होती. जेफ्री आर्चर यांनी स्वतःच्याच पुस्तकाच्या काही पानांचं अभिवाचन केलं होतं व ते करत असताना ते एक-दोन जागी अडखळले होते. (नुसते अडखळलेच नव्हते, तर त्यांनी शिवीसुद्धा दिली होती!‌) त्यामुळे तिला तो भाग कुठल्याही परिस्थितीत एडिट करून हवा होता आणि तोही अगदी लगेच. 

ह्या गोष्टीला कमीत कमी दहा वर्षं तरी झाली असतील. आता मी माझ्या फोनवरही व्हिडिओ एडिटिंगचं काम करू शकते; पण तेव्हा मात्र मला या विषयात थोडीसुद्धा गती नव्हती. मग मी अमेरिकेत असलेल्या माझ्या मुलीला मध्यरात्री उठवून तिच्यावर ते काम सोपवलं. तिने कुरकुरत का होईना, पण ते काम लगेच करून दिलं आणि मी ती एडिट केलेली व्हिडिओ क्लिप ॲलिसनला पाठवली.

पुढील काही वर्षांत मी त्यांची अनेक पुस्तकं केली. 'द क्लिफ्टन क्रॉनिकल्स' ह्या सात खंडांच्या मालिकेच्या अनुवादाचं कामही मी कोविडच्या काळात पूर्ण केलं. आमचा ई-मेलवर अजूनही संपर्क आहे.

कोणत्याही लेखकाची इतकी पुस्तकं मराठीत आणताना साहजिकच त्या लेखकाशी आणि त्याच्या लेखनाशी माझं एक वेगळंच नातं तयार होतं. जेफ्री आर्चर यांच्या बाबतीतही हेच घडलं. त्यांच्या पुस्तकांमधून मी त्यांना ओळखत गेले. ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला. पुण्यात आणि लंडनमधल्या त्यांच्या घरी अशा दोन भेटींमध्ये त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मला मिळाली. त्यामुळे जेफ्री आर्चर हे माझ्यासाठी केवळ एक आवडता लेखक राहिलेले नाहीत. त्यांच्या पुस्तकांबरोबर घालवलेली इतकी वर्षं आणि त्या दोन भेटी, या सगळ्या आठवणी आजही माझ्यासाठी खूप खास आहेत.

सौ. लीना सोहोनी. 

दिवाळी अंक वर्ष

वाचने 141
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया