बार्टर सिस्टिम अर्थात वस्तू विनिमय प्रणाली! भारतीय जीवनपद्धतीत बार्टर सिस्टिम रुजली असल्याने ही पद्धत ब्रिटिशांनी उधळून लावली. आपण त्याबद्दल वाईट वाटून बोलतो. ही पद्धत बंद करून ब्रिटिश काळानंतर 'चलन प्रणाली' जास्तीत जास्त वापरात आली. या पद्धतीचीही काही चांगली बाजू आहे.. आणि सोयीने त्याची फळं आपण चाखतोय. समान मूल्य असणारं चलन सरस ठरलं. कितीही छान जीवनपद्धती असली, तरी प्रत्येक जीवनपद्धतीला, तसेच पिढीला, व्यक्तीला काही फायदे-तोटे मिळणार. काही नफा-नुकसान अनुभवाला येणार. मी ज्या बार्टर सिस्टिमबद्दल लिहितीय, बोलतीये, त्यात फायदा अगणित, तोटा नगण्य आहे. ही आहे 'बार्टर सिस्टिम ऑफ मैत्री'!
माझ्या माहितीत आजही 'सुदामा-कृष्ण' अशा असंख्य मैत्रजोड्या अस्तित्वात आहेत. खरं तर मैत्रीत - त्यातही विशेषतः शालेय मैत्रीत पैसा, पद, सधनता फारशी कधी मध्यभागी नसते.. ती तशी नसावीच. खरं तर मैत्रीत 'धनसंपदा' नाही, पण 'मनसंपदा' महत्त्वाची! त्यामुळे ही बार्टर सिस्टिम खूप आनंद देते.
माझे काही मित्र-मैत्रिणी असे आहेत, ज्यांना मी स्वतः निराशेच्या गर्तेत असताना, जराशी दुःखी असताना कितीही वेळ कुठलीही त्रासदायक घटना मोकळेपणाने सांगू शकते. त्या वेळी मला वय, वेळ, काळ पाहावे लागत नाही. मी धबधब्याप्रमाणे बोलून, माझ्या मनातलं ओतून (की ओकून?) टाकू शकते. त्यांचे कान मला शांत करतात. निव्वळ ऐकून घेऊन हळुवार फुंकर घालतात. कधीतरी मलाही समजावतात, तर कधी "एक-दोन दिवस घे, शांत झालीस की परत विचार करू, बोलू" असं सहज सुचवून माझ्या प्रेशर कुकरला थंड होऊ देतात. त्या प्रत्येक वेळी त्यांचा वेळ, त्यांचे कान असतात मैत्री बार्टर सिस्टिमचा भाग.
माझे काही सुहृद आर्थिक सबलीकरणाचं महत्त्व सांगून मार्ग दाखवताना 'देणाऱ्याचे हात' कसे व्हावे हे स्वतःच्या कामाने दाखवतात. 'दातृत्व' हा गुण नकळत माझ्यामध्ये पेरते होणारे अनेक जिवलग, शिक्षक आज काळाच्या पडद्याआड गेले, पण 'खरी श्रीमंती वृत्तीत असते' असं वर्तनातून माझ्यासाठी 'ठेवा' म्हणून देऊन गेले. दानाने शाश्वत आनंद कसा मिळतो, हे सांगणारे ह्या बार्टर सिस्टिमचा किती महत्त्वाचा भाग सहज दान करून जातात. त्यांचे हे देणारे हात बार्टर सिस्टिमचाच भाग.
निसर्गप्रेमी व्यक्ती, वेगवेगळ्या संस्थांसाठी काम करणारे विविध विषयातील तज्ज्ञ त्यांच्या अनोख्या नजरेने, कामाने या आश्चर्यकारक सृष्टीकडे पाहायला शिकवतात. माझ्या अत्यंत सामान्य शंकांनी त्रस्त न होता, न थकता उत्तर देऊन वेगळीच नजर देतात. त्या ज्ञानचक्षूंचे केवळ आभार मानणं कोतेपणाचं आहे. त्यांनी ज्या सहजपणे विविध झाडं, फुलं, पक्षी, फूलपाखरं, कीटक, बुरशी, शैवालांकडे पाहायची गंमत दाखवून रंगत आणली, त्यांनी काय आणि किती दिलं याची शेकडो-हजारो उदाहरणं समोर येतात. असं पाहायला शिकवणारे आणि वेगळ्या अर्थाने 'डोळे उघडणारे' निसर्गमित्र हे समृद्ध बार्टर सिस्टिमचाच भाग आहेत.
सहज कधीतरी गप्पा मारताना, आपण एखाद्या पदार्थाची खुलून तारीफ केली की लक्षात ठेवून तो पदार्थ, ती वस्तू तयार करून किंवा विकत आणून 'खिलवणारे' अनेक जण आहेत. त्यांच्या हातची माया, स्नेह कशात मोजणार? पावसात भिजत कुणाकडे गेल्यावर आलं-गवती चहा घालून वाफाळणारा चहा मला देऊन, माझ्या चेहऱ्यावरचे फुलणारं हास्य पाहून आनंदून जाणारे माझे बार्टर मित्र-मैत्रिणी, आप्त जिवलग.. 'तुला आवडतं म्हणून आणलंय' असं सांगत रुची महोत्सव करणारे, रसनापूर्तीने तृप्त करणारे सर्वच जण ही बार्टर सिस्टिम समृद्ध करतात.
हळव्या कातर क्षणी स्पर्शाची जादू दाखवणारे जादूगार आठवा. आशीर्वादाचे हात डोक्यावर ठेवणारे, मायेने चेहऱ्यावरून हात फिरवणारे, रडताना पाठीवर आश्वासक हात ठेवणारे.. तसंच हक्काने, पूर्ण विश्वासाने त्यांचा हात माझ्या हातात देणारे कित्येक जण आहेत. स्पर्शातून पाझरणारा ओलावा, स्नेह, धीर, पाठिंबा किती किती छटा अनुभवायच्या! स्पर्शाची गंमत अशी की ती सांगता येत नाही, दाखवता येत नाही, ती अनुभवायलाच लागते. हे आणि असे अनुभव देणारे बार्टर सिस्टिमचा कणाच ठरतात.
ह्या 'बार्टर सिस्टिम ऑफ मैत्री'मध्ये शब्द, स्पर्श, दातृत्व, रसना, रुची, धीर, दृष्टी मला 'देणाऱ्या व्यक्ती' वेगळ्या असतात.. आणि हे सगळं मी ज्यांना देते, त्या व्यक्ती कोणीतरी वेगळ्याच असतात. इथे 'एक हातसे दे.. दुसरे हातसे ले' अशी कुठलीही अट नाही. इथे सहज देवाणघेवाण होताना परतफेडीची कुठली अपेक्षाच नाही. इथे चलन फक्त एकच - आनंद, स्वानंद, परमानंद! तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही द्यावं, जे हवं आहे ते तितक्याच मोकळेपणाने घ्यावं. इथे घेणारा सान नाही, देणारा महान नाही. दोघेही प्रेमाच्या, विश्वासाच्या, मैत्रीच्या सोपानातील वरची एक पायरी एकत्रच चढतात. देणाऱ्याने द्यावं, कदाचित दुसरीकडून जे हवं आहे ते मिळवावं, असं हे सुंदर चक्र पूर्णत्वाला न्यावं. पूर्वीच्या बार्टर सिस्टिममध्ये एकाने काहीतरी द्यावं आणि दुसऱ्यानेही काहीतरी द्यावंच लागायचं. मैत्रीच्या या बार्टरमध्ये देणाऱ्याने द्यावं-घ्यावं, घेणाऱ्यानेही सन्मानाने घ्यावं आणि पाहणाऱ्यानेही आनंदून जावं आणि अशा सात्त्विक, सहज, सुंदर, सुगंधी क्षणांचं साक्षीदार व्हावं. कोणाचंही उणं काहीच होत नाही. अशा बार्टर मैत्रीला, नात्याला कुठल्याही बंधनात न अडकवता मुक्त ठेवावं. अथांग, अभंग, अद्भुत मैत्र सगळ्यांना समजावं, अनुभवता यावं हीच मनोकामना!
डॉ. नीलिमा लिमये
निमी (मिपा आयडी)
मिसळपाव
प्रतिक्रिया