Skip to main content

लदाखच्या वाटेवर - हिमालयाच्या बदलत्या रूपांची रोमांचक सफर

लेखक गोरगावलेकर यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

लदाखची सहल हे आमच्यासाठी केवळ पर्यटन नव्हते, तर खूप वर्षांपासूनचे मनात जपलेले एक स्वप्न होते. उंच हिमशिखरे, खिंडी, निळीशार सरोवरे, अथांग दऱ्या आणि विरळ हवेतला तो अद्भुत निसर्ग प्रत्यक्ष अनुभवण्याची मनापासून इच्छा होती .

एप्रिलच्या सुरुवातीला आमच्या कौटुंबिक व्हॉट्सॲप ग्रूपवर सहलीविषयी विचारणा केली आणि बघता बघता अकरा जणांची नोंदही झाली.

जून-जुलैतील लदाखच्या हवामानाचा अंदाज घेऊन कपडे आणि इतर साहित्याची जमवाजमव सुरू झाली. मुंबई ते चंदीगड रेल्वे तिकिटे, हॉटेल्, परमिट आणि रस्त्याने प्रवास करण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी इ. सर्व व्यवस्था होत आली. आता फक्त प्रवास सुरू होण्याची आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची प्रतीक्षा होती.

steam road roller
वाफेवर चालणारा रोड रोलर

अखेर सहलीचा दिवस उजाडला. सगळे वांद्रे टर्मिनसला जमले. 

 

वांद्रे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी एक वाफेवर चालणारे रेल्वे इंजीन ठेवलेले दिसले. मात्र निरखून पाहिल्यावर ते रेल्वे इंजीन नसून वाफेवर चालणारा रोड रोलर असल्याचे लक्षात आले. नेटवर माहिती घेतली - १९४८मध्ये तत्कालीन बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (BB&CI Railway)कडे हा रोलर सुपुर्द करण्यात आल्याचे समजले. स्वातंत्र्योत्तर भारताच्या सुरुवातीच्या औद्योगिक प्रगतीचा आणि रेल्वेच्या वारशाचा हा एक जतन केलेला नमुना आहे. त्या काळात रस्ते बांधणी व मजबुतीकरणासाठी अशा वाफेवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर केला जात असे.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMxHDZMSnbSOJih4fpDFmtCS59r7qXh7db-6TcL_snjS78UT6JboKUHnR960nvQ8n80jf-_SpNGiAPsOItufit7GX-EBrEZ6fgbgXkMAs73f7OLaZ8QC9L9xb88jsPsAOCdFP2MH6ZOJtSSl_E0ne6Iug=w1348-h758-s-no-gm?authuser=0

वांद्रे टर्मिनसहून आमची गाडी वेळेवर निघाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास चंदीगडला पोहोचली. 

चंदीगड स्टेशनची आधुनिक भव्य  इमारत
चंदीगड स्टेशनची आधुनिक भव्य  इमारत

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN7R1QNQJD7l3LNd2T_xA4kXSosGR9e35vUBZVATbaiXZlMa5DuqoFDpaby8MzTKp4QcF0lDfrgpP9T5Y8aUBH7yhf6w8DYETdedmqHUq4moP02ucuyQPTZGsFc6e_G-KH-sjex34MPqd7Gf5H09ARBTw=w1348-h758-s-no-gm?authuser=0

आधीच बुक केलेल्या हॉटेलवर सामान ठेवून ताजेतवाने झालो. संध्याकाळचा वेळ मोकळा असल्याने फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. हॉटेलपासून जवळच असलेल्या रॉक गार्डनला भेट दिली.

चंदीगड रॉक गार्डन
चंदीगड रॉक गार्डन

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOmdtAT9JuvnEC91xtdO06zcD4I0z8znQCkox6e1eXGgNsdJq4ZCl_RKK-qSpqV4sD_EAL_RT4nfYRiZzEeFV9YfG-7oKYLxQXeZaY-M0Yc95RoXKupHic9UF5ZfmyvdEng-QCZKAbsdf3pbH63XN_vsg=w1012-h759-s-no-gm?authuser=0

टाकाऊ वस्तू, काच, टाईल्स अशा विविध वस्तूंपासून साकारलेले हे अनोखे शिल्प उद्यान चंदीगडचे एक खास आकर्षण आहे.

उद्याचा प्रवास खूप लांबचा असल्याने हॉटेलवर येऊन लवकरच झोपी गेलो.

चंदीगड ते लेह प्रवासातील पहिल्या टप्प्याला पहाटेच सुरुवात झाली  पंजाबच्या पठारी  प्रदेशातून गाडी हळूहळू उत्तरेकडे सरकू लागली. सपाट प्रदेश मागे पडत गेला आणि वळणावळणाच्या रस्त्यांनी डोंगरांची चाहूल लागली. आता शिवालिक टेकड्या दिसू लागल्या. हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील, तुलनेने कमी उंचीची आणि हिरवीगार रांग.

शिवालिक टेकड्या
शिवालिक टेकड्या  हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील, तुलनेने कमी उंचीची आणि हिरवीगार पर्वतरांग

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczP3ZU8IeEnE2Xlo4YpexqGZmagIu9RTD3t6kDNtldcjuR9Hx2UsX7K1FDGXRUyEjmh5rGzrYgYVY5feMlpgL-6En2Bq-vKtARlYNo5yQVQSPrBPGMfz58tIBvnziw6luVEZW5jNyzWFSpS6k8lDdObQWg=w1348-h758-s-no-gm?authuser=0

चंदीगड ते मनाली दरम्यान आता अनेक बोगदे झाले आहेत, त्यामुळे प्रवास बराच सोपा झाला आहे.

चंदीगड-मनाली बोगदा

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNPd-WraeizQwrPKTMMMWPgS6gZ37HF6QUkInro7_L2MrJySwUXeLRrTRbwktz0UQ95pOXVb757JYYw90kXr1-D0OGrrVmG7Ox1s33qUhf85iZ4GB0W62GNgkck4PFSTVOZn95rS5UXAgQt2G-sGpu6nw=w427-h759-s-no-gm?authuser=0

पुढे मनालीच्या दिशेने जाताना डोंगर अधिक उंच आणि निसर्ग अधिक भव्य होत गेला. व्यास नदीच्या सोबतीने आम्ही हिरव्यागार कुल्लू खोऱ्यातून पुढे सरकत होतो. कुल्लू परिसरातून जाताना वाटेत अनपेक्षितपणे वैष्णो देवी (महादेवी तीर्थ) मंदिराचे दर्शन घेता आले. रस्त्यालगतच वसलेले हे मंदिर.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOmpVQKKPG7-zCjWpj2X07bbkFXH4WjJOmHMsykqRXEgiV9bavuFTtzTgco0ofvdZplSyubRF8u_6gqQ5No-Hicw2IY-VlPYNSJxSlL0KlvsppOYNC-lFhX0EXUdPBERogVRSgcjuLenrZM_BT0zOXmFw=w427-h759-s-no-gm?authuser=0

अतिशय सुंदर स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात आहे. मंदिराच्या परिसरातून फेसाळत वाहणाऱ्या व्यास नदीचे मनमोहक दर्शन होते. नदीच्या प्रवाहात सुरू असलेले रिव्हर राफ्टिंग पाहणे हा एक वेगळाच आणि उत्साहवर्धक अनुभव होता.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPGqScGt6j3_QB3XG-D6xUhnDuPCxY1iioPspAq8EquSlEIMu6WPOJMGtuJHSpdqA_qiPeZCeN5o0jyPgD8zLFgamICa_5-kP_3p9bf-IRo0G5X0AyHsd0N-nSGPAHPcNK9bZ9E3hsRv4_b_3DmUQKvnQ=w569-h759-s-no-gm?authuser=0

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN79N081h6i3ozYCvmpo7SfQGF5dPHujWlROs-1e3do6KVtyNUagNBVlh4qnK1kClpHXshNKl9ObKpXxk2SPKwgKunfTHdRSQX9D-Xe4TXlSutsDcqvdqDZke_eUJJYAYWStwiDY-cfX7wf6kWn-ra8yw=w427-h759-s-no-gm?authuser=0

मनाली मागे पडताच हिमालयाचे आणखी एक रूप समोर आले - पीर पंजाळ पर्वतरांग. हिमालयाच्या पश्चिम भागातील ही उंच आणि विस्तीर्ण पर्वतरांग असून तिच्या उंच शिखरांवर बराच काळ बर्फाचे आवरण असते. कुल्लू-मनाली आणि लाहोल यांच्यातील हा पर्वतीय अडसर ओलांडताना हिमालयाची भव्यता अधिक तीव्रतेने जाणवते. 

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOhGk0CvUPReDkG2wIrNAXH2ZvaVqCEhNb5yeviyzBxROymuEyPdShvWComu0ukUQSDioLB3MprLvcKxWHr37rDEmudmiVtTQlhjDTNAVC-xsDO29eHBXPC1XFxiL9cplUrA97z1qcxqAk-FWVcinUiAw=w1012-h759-s-no-gm?authuser=0

अटल टनेलच्या आधी सोलांग व्हॅलीजवळ BROच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMbeT6ppwseyoJK9zAQJq6Q3LphouHvYeqovg-IiJXdAhVzm1puipvGeYSJ8rgXNwftmKTLFD7mcaNiV7xldskAY_BH-MWGpHbjDBGe1My4yyN4wN8qhC9dsnAv-cMIvDn1qAx0m6qD13jjAyRrJLiDJA=w427-h759-s-no-gm?authuser=0

थोड्याच वेळात अटल टनेलच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारापाशी पोहोचलो.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMHPOdneUg4ef96F4Uj_ZuayTM3big6RACJFSTNIYuqSTGzexj7wugX_xnEjdsNBNDzceDFJUWGJO0QP7pU_uRVBq39y2XRd9VabmRXKsmtiVlBgF6rzd5SSnnxvgTWKNSut29e-Wo2HLeXe2BT5EEGcQ=w569-h759-s-no-gm?authuser=0

तब्बल नऊ कि.मी. लांबीचा हा बोगदा पीर पंजाळ पर्वतरांगेखालून जातो - म्हणजेच आपण डोंगराला वळसा घालत नव्हतो, तर चक्क पीर पंजाळच्या पोटातूनच प्रवास करत होतो. बोगद्यातून बाहेर पडताच मात्र परिसराचे रूपच बदलले. हिरवाई मागे पडली होती आणि समोर लाहोलचा रूक्ष उंच आणि भव्य पर्वतीय प्रदेश उलगडला होता.

चंद्रा नदीवरील पूल ओलांडून आम्ही थांबा घेतला.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOZCS8-AaD5bNT6sDy6aMqVp_vfdtBgM1mdD3OfjPbPn4PyahLJrvES7wsIFq-G8rHvT3TSnnPXOSPJOIyEOMxmYwWMRbxbHLMwveWIMsIjyMSf_FX_yMQq6wOCUN1gpKlFyGIy2nKu-qsJf7ZRFrElCw=w1012-h759-s-no-gm?authuser=0

अतिशय गार आणि बोचरी हवा सुरू झाली होती. आतापर्यंत गाडीत ठेवलेले स्वेटर / जॅकेट अंगावर चढवण्याची ही पहिलीच संधी मिळाली! फोटो काढण्यात, गार वाऱ्याचा अनुभव घेण्यात आणि गरम गरम चहाचा आस्वाद घेण्यात थोडा वेळ गेला.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPOQPbfEXO-h3NnHCmG3JhAbwPCevDkVlZ8DbS9NXBvaOQkdDwhHw-QHO88K-iYQjdR_ekvnZbh7AfBxNt_tWUEATYVQ-Gv1vmM4OEtY5NU_776JcB9EKPlZsT7fPiERswxIOzyXUpK86Apntjs9NgxCg=w1012-h759-s-no-gm?authuser=0

लेहच्या दिशेने पुढे खडकाळ पर्वत, खोल दऱ्यांमधून वाहणाऱ्या नद्या असे लाहोलचे वेगळेच रूप दिसू लागले. रस्ता कधी नदीच्या काठाने, तर कधी डोंगराच्या कुशीतून वळणे घेत पुढे जात होता. थोड्याच वेळात सिस्सूला पोहोचलो. चंद्रा नदीच्या काठावर वसलेले हे छोटेसे गांव उंच पर्वतांनी वेढलेले आहे. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा सिस्सू धबधबा दुरूनच लक्ष वेधून घेत होता.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczModRxQQYXbwkBtt2DcFXnpHQlBMA9ofFz3fz35IQzpmSx461PVJrunktCBgTYgHV0H3144NnogkXWKwpZ_voV6KaZEaHhRF2aOMI9h8bohv6SlINdl7vS-o3jK_Ux0k9J-osPi3pemGFeJsy68lI8pyw=w571-h759-s-no-gm?authuser=0

रस्त्याच्या कडेला पसरलेला सिस्सू तलाव आणि त्याच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले उंच डोंगर मन मोहून टाकत होते.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOx2TNgNEdAup0lWcgw1xgYCDO6ChWEY9Eu1U2K6qxgFWXEFd8-_TBwEmSqyotTkRGZFFvXeVBWVCGs5caaOPjebJRs3hPThQ_Z4CoYlgN6WeHsLEb-cli1SmRFkQaRfT2ECXyuHvpTkMC_pBz6oAnmQg=w1348-h758-s-no-gm?authuser=0

काही वेळ या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी पुन्हा गाडीत बसलो.

थोड्याच वेळात तांडी या ठिकाणी येऊन पोहोचलो. रस्त्यालगतच चंद्रा आणि भागा या नद्यांचा संगम होताना दिसतो.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOMVCicx1D1ebGTlHPr26HnRP2vo9mcAYmd6SwFXakNLZBBjr02U_6V5RYiav0uPCFRtJiQ6FrWLEsQLCj_dr10fJvnwPYVnyOx3JHcUTKDqi7amfOuZMe-d4QAwXdyAI7xlCndRajgOb6DX6iltRZM7w=w1348-h758-s-no-gm?authuser=0

येथून पुढे संयुक्त प्रवाहाला चंद्रभागा म्हणतात आणि पुढे जम्मू-काश्मीरमध्ये हीच नदी चिनाब नदी म्हणून ओळखली जाते. चंद्रा आणि भागा यांच्या मिलनाची एक सुंदर लोककथाही लाहोलमध्ये सांगितली जाते - चंद्रा ही चंद्राची कन्या, तर भागा हा सूर्याचा पुत्र. दोघांनी विवाहासाठी वेगवेगळ्या दिशांनी प्रवास सुरू केला आणि अखेर तांडी येथे त्यांची भेट झाली.

दहा-पंधरा मिनिटे येथे थांबून आजच्या दिवसातील शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली. आजचा मुक्काम होता लाहोल खोऱ्याचे मुख्यालय असलेल्या केलांग येथे. आमच्या मोठ्या ग्रूपसाठी एक छानसा होम स्टे मिळाला होता. त्याचे आगाऊ बुकिंगही झालेले होते. जवळपास बारा तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर केलांगला पोहोचलो. होम स्टे रस्त्यापासून थोडे उंच एका टेकडीवर होते. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून आम्हाला काही पायऱ्या चढून वर जावे लागणार होते. अवजड बॅगा घेऊन वरपर्यंत जाणे अवघड होते. रस्त्यावरच बॅगा उघडल्या आणि आवश्यक ते सामान घेतले व बाकी सामान गाडीतच ठेवले.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNzrfaeEtvUL2uh5D8PBUNm-sK4ZOpSR0FlPXgybCgEVRS6vbWOzsZqPzbBW6kU17tYTXxazQ6alb9nbqEphDMMeEfjXWCXxUQz9EFMBBFXLyr6x9Ixee0V-sPWVDYxeKuCvryiqHDjWekWfteihNsAbw=w1348-h758-s-no-gm?authuser=0

दिवसभराच्या प्रवासामुळे थकवा होताच; त्यात उंचीचा परिणामही जाणवू लागला होता. पायऱ्या फारशा नसतानाही एक-दोन वेळा थांबून मगच वर पोहोचता आले. पाच खोल्यांचा हा टुमदार लाकडी बंगला लगेच मनात भरला.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMOfYMFopNus-T99EpXphgXqdp_47ytkPdlwQA4-_lwMAFvfTpL8tjJ5WV_h8rsHfDWmM92NeiDQIFu0xqqJf6XPBCTKEInAFiUTb6IEOgVZRqeg7Y58GCu8hSCyJKxsuNr-J1Qv87-Yft2zTJjOuXg0g=w1348-h758-s-no-gm?authuser=0

जेवणासाठी स्वतंत्र खोली होती तर सर्वात वरच्या मजल्यावर एक मोठा हॉल आणि प्रशस्त बाल्कनी होती; गच्चीच म्हटले तरी चालेल. खोल्यांमध्ये सामान टाकून आम्ही सगळे गच्चीत येऊन बसलो. येथून दिसणारे केलांग शहर, बर्फाच्छादित डोंगर आणि खाली खळाळत वाहणारी भागा यांचे विलोभनीय दृश्य पाहत बसलो. त्या दृश्यातून नजर हटत नव्हती, त्यामुळे कोणालाच आपल्या खोलीत परतण्याची घाई नव्हती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNSCKhiAJEkT4ljEmPFy4gpWIppTEDN25bMw0O9D3l1ARKPcqLlpezI41j6IL53Z0c-Kp7zatnxQt3sed37RhuE-d2WD4ssDHsVhyqxq_m35PaQ1FmiiH3GxbAc26SH64V24ELTRvOILwvHRZ9eWEaCZA=w1348-h758-s-no-gm?authuser=0

आमचे स्वागत म्हणून चहा आणि गरम गरम मोमोज आले. सोबत हिरवी चटणी आणि लाल तिखट सॉस! दिवसभराच्या प्रवासानंतर समोर आलेली ही वाफाळती प्लेट पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczM4VnHG3_W83OlVrW9crwU8xgihPumyxuqF8BRHaP6TWAPsGuNbHr5nnJyoOMu2dNCNJo5oTMJh8kPSteikpKi_Xn2BplrtQai2afsZW6o2OGGpE4s4POnKEdgHLkCfU7GUUbKa3XU6SDphificCMvu5A=w1012-h759-s-no-gm?authuser=0

थोड्याच वेळात जेवण तयार असल्याचा निरोप आला. होमस्टेची लाकडी डायनिंग रूमही तितकीच आपुलकीची वाटली. भिंती, छत आणि फर्निचर सगळीकडे लाकडाचा वापर, मध्यभागी ऊब देणारी छोटी भट्टी आणि तिच्याभोवती मांडलेल्या बैठकव्यवस्थेमुळे वातावरणात एक वेगळीच घरगुती ऊब होती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNujmE26FOKJ_UP7w1Cfc4vTUAkbG-h8tqmYkuT-c7vZl8Lkp2X8foFh4a65eo6d6fOrfwFM3EN8OluWqBNXAeGoO1T3RVScR83XN9f0-kCYi4sjpyGFygskrBaiMzCyXejoDe0bug29GGTNmxCj7op3Q=w1012-h759-s-no-gm?authuser=0

रस्ते, डोंगर, हवा आणि माणसे बदलत होती, पण आमच्या ताटातही त्या बदलाची चाहूल स्पष्टपणे जाणवत होती. जेवणात डाळ-भात, फुलके आणि भाजी असा घरगुती बेत होता.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMMCmTSn7CHvCUiAWeX2qVaFs3lL9E4jt8T067kZyzcIMUn1mR3kvJzmcv2brSCmleYWA-G8sOXKP-ac1eayaMcW4tOdxHIk5_bfmXJ0Mp-FBl4XFEt8Ndc9BUm2e6jBWUkaxlZUKj3k4RwvdwOycDH7w=w1012-h759-s-no-gm?authuser=0

सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारत स्थानिक पद्धतीच्या घरगुती जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला. दिवसभराच्या थकव्यानंतरचे जेवण यामुळे दिवसाचा शेवट अगदी सुखद झाला.

उद्याही लांबचा पल्ला गाठायचा होता, त्यामुळे गप्पांना आवर घालत लवकरच झोपायला गेलो. पण थोड्याच वेळापूर्वी गच्चीतून पाहिलेला निसर्ग डोळ्यापुढून हालत नव्हता. परत गच्चीत आलो. रात्र गडद झाली होती, आकाश निरभ्र होते. तेवढ्यात डोंगराच्या काळ्याशार रेषेमागून चंद्र हळूहळू वर येऊ लागला. त्याचा प्रकाश जसजसा पसरत गेला, तसतसे समोरचे बर्फाच्छादित डोंगर उजळू लागले. त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPbsylyYJUdSKaDWWRbrLb87Dpjp0plhfv2pgqWxULq9V_RBqXFz1aX4R7PsnQX9zWONV8in5AHbk5O_KhRaS8NrYlIzQ3xr6DKfWtvS36q_IrRyZjmAQxsKlXjTvAZZHtW2m79x0JlyLKe6Z0dxYjb-Q=w569-h759-s-no-gm?authuser=0

पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्रामुळे आकाशात तारे मात्र तुलनेने कमी दिसत होते, पण चांदण्याच्या प्रकाशात उजळलेले हिमकडे पाहण्याचा अनुभव काही औरच होता. कडाक्याची थंडी असूनही आम्ही दीड-दोन तास तेथे थांबून ते अद्भुत दृश्य अक्षरशः भान हरपून पाहत राहिलो.

चंदीगड ते लेह प्रवासाचा दुसरा दिवस उजाडला. आज केलाँग ते लेह असा जवळपास साडेतीनशे कि.मी.चा तब्बल बारा तासांचा प्रवास करायचा होता, तोही एक-दोन नव्हे, तर अनेक उंच उंच खिंडी पार करत! त्यामुळे नाश्त्याचीही वाट न पाहता सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास आम्ही होम स्टे सोडला. निघता निघता घराच्या भिंतीवरच्या एका छायाचित्राने पावले थांबवली. काल रात्री गच्चीतून ज्या बर्फाच्छादित पर्वतांकडे पाहात बसलो होतो, त्यातीलच एका प्रसिद्ध शिखराचे हे सुंदर छायाचित्र होते - 'लेडी ऑफ केलाँग'.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMeBFp7BtLym6Dz0pMKw7n908dvP7hmsg47v88KyXOU3oP52D3UviXAHY4JDjXPnmSnuXLMh-6-w2g46R_ZdIMjC9tf7t3lEiva8KCbd3iTboGp3tHuqWY94_QFLgL--InDZGnI4DHpdjKA9MVeb-tYGg=w1348-h758-s-no-gm?authuser=0

प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या त्या पर्वताचे हे वेगळे रूप पाहून कालची रात्र डोळ्यांसमोर उभी राहिली.

लेहच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. थोड्याच वेळात जिस्पा येथे पोहोचलो. भागा नदीच्या काठावर वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांचे आवडते मुक्कामाचे ठिकाण आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि नदीकाठच्या उतारांवर ठिकठिकाणी उभारलेले रंगीबेरंगी तंबू दिसत होते. उंच खडकाळ डोंगरांच्या कुशीत हिरवाईने नटलेले जिस्पाचे हे रूप लाहोलच्या सौंदर्यात एक वेगळीच भर घालत होते.

लाहोलच्या कुशीतील पर्यटकांची तंबू नगरी

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPQHarkhcq6USbZint5Lja3UMXFYiJekV2JqsdGV1uUX6Q2ICcXHWOOVDJaxxd5a7OkJyIULrkkM9qDEkcC8AfpOtQyVqScnEzyWGfy2xoy5dzRc_INs2chzpv6DQ-9N6iQIXWTluveBbBFFS3MO22_rw=w427-h759-s-no-gm?authuser=0

थोड्याच वेळात दारचा येथील प्रसिद्ध पुलाजवळ पोहोचणार होतो, पण लडाखचा प्रवास इतकाही सहज सोपा नाही, याची पहिली झलक मिळाली. बाजूच्या डोंगरावरील बर्फ वितळल्याने आलेल्या पाण्याबरोबर दगड-धोंडे रस्त्यावर घसरून आले होते आणि त्यामुळे रस्ता बंद झाला होता. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र 'BRO' (बॉर्डर रॉड ऑर्गनायझेशन)ची तुकडी यंत्रसामग्रीसह आधीच घटनास्थळी पोहोचलेली होती. रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMS8T3nRs9Zns-mxhJDZKmuZjPOS08-8CluCCilvhGhftw-xY0Bm5E9ntYKyCkz1-rjdRM5nCU6r5L77hw0CM5z-OdDDkyw-f1O3AyRvk2R01JPJwj6CABv1oMwhkbqqbHSuSlT0z-PugU-Z9ymjU8cuQ=w569-h759-s-no-gm?authuser=0

मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत अवजड यंत्रे कमला लागली आणि काही वेळातच वाहनांना जाण्यापुरता रास्ता तयार झाला. लडाखच्या या दुर्गम आणि कठीण प्रदेशात रस्ते खुले ठेवण्यासाठी BROचे जवान आणि कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत काम करतात, याची अगदी जवळून झालेली ही पहिलीच जाणीव. मनोमन BROचे आभार मानत आम्ही पुढे निघालो.

समोर दिसत होता हिमाचलमधील सर्वात लांब - ३६० मीटरचा दारचा पूल.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOwJ9BkmpguVsmGucdAMNaVSPkRJTo-GMB4bLwiP6LiCRI7ttOWcLBFXdKh2yM4jdO8PGkK02xdsX-KsB0ClPvbTdAJYgqenAixm4PoM-GWnAVuKJWAFq5F6AZklR_199NQaU6uK-Ar_p-tOE29-P3uNA=w427-h759-s-no-gm?authuser=0

थोड्याच वेळात दीपक ताल पाशी येऊन पोहोचलो. अतिशय सुंदर दृश्य. उंच पर्वतांच्या कुशीत वसलेले छोटेसे सरोवर. स्वच्छ नितळ पाण्यात आजूबाजूच्या डोंगरांचे आणि आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट उमटले होते. पाणी इतके पारदर्शक होते की तळाशी असलेले दगडही स्पष्ट दिसत होते .

हिमालयाच्या कुशीतला नितळ आरसा - 'दीपक ताल'.
हिमालयाच्या कुशीतला नितळ आरसा - 'दीपक ताल'.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN_lQg6SgBNZfJgE-g3LA87FUYRwk16RXsN7Ghv5Lm9jz9DLiBheejwWY_f3O57qLM5Qu18i3zlQ33UYBc4_EcfP-jKjNAKsJu47TGai92OudZrK3QmA9_4IPJiknyOjjfmtIqsXt-CfzMOw-8sDAC1qg=w1012-h759-s-no-gm?authuser=0

आता हिमालयाचे एक वेगळेच रूप दिसायला लागले होते. डोंगरांची हिरवाई हळूहळू नाहीशी होत होती. हिरव्यागार लाहोल खोऱ्याला मागे टाकून आम्ही आता थंड वाळवंटाच्या दिशेने पुढे सरकत होतो. प्रत्येक वळणावर बदलणारे ते हिमालयाचे रूप पाहताना जाणवत होते ते म्हणजे हिमालय एक पण त्याची रूपे किती वेगळी.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOchBT5nxV-Cn2yo9ZbBE4wfnCSV5TT1PDzd0WTey6ThqKag6r29lYaD3x1DQfl7qmVocS0Fl-FERiPVIBZJEFZKFOgQjE5Nj1h6ZP_5lPMzsb9FLjsYek1hHdxlJZHOa90HtjLNMRlrUUEZ3D8dE07cA=w1012-h759-s-no-gm?authuser=0

आता पोहोचलो 'झिंग झिंग बार' येथे. नांव ऐकून एखादे डोंगरावरचे बार रेस्टारंट असेल असे वाटणे साहजिकच! पण प्रत्यक्षात येथे दारूचा बार वगैरे काही नाही. झिंग झिंग बार हा BROचा महत्त्वाचा तळ आणि प्रवाशांसाठीचा एक छोटासा थांबा. सुमारे १४००० फूट उंचीवर असलेले हे ठिकाण बारालाचा ला चढाईच्या आधीचे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. येथे BROचे कॅम्प, काही तात्पुरती दुकाने आणि चहाच्या टपऱ्या दिसतात.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOKq2fQvHs2COIPGNDEmaGh1YgLraeOJ5cmpJikcu3tuwRuUtc6nCfFwHFtAO32HkwMGwlz5Imb8qHvW-u8W94M4kBlubFVZ_vaN2l986oXsSA0cx-Rg-pQK8DQXpbFfLvCuj3-1BZEV2a79twu8CN5EA=w427-h759-s-no-gm?authuser=0

 

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPyPENv2PlBu6HXCfQpCpMkryBomarAkywrBexYTTDOBeqzRXgA2i1csLj6iqdjDO2iKYuA8OGdWn7FNmggt0CcMh9Be0GizANR-ebdRDcCnmFl8e-YeEOmz6YSGphDoMlq6w0X2x_xIzt_o587mb912g=w427-h759-s-no-gm?authuser=0

हळूहळू सूर्य ताल येथे येऊन पोहोचलो. वाटेत तांडी येथे चंद्रा आणि भागा नद्यांचा संगम पाहिला होता, त्यातील भागा नदीचा उगम इथलाच. उंच बर्फ़ाच्छादित डोंगरांमध्ये वसलेले हे सरोवर खरोखरच सुंदर दिसत होते. वर निळेशार आकाश आणि आजूबाजूला पांढरा बर्फ असतांनाही सूर्य तालचे पाणी मात्र हिरवट निळ्या रंगात चमकत होते. निसर्गाने रंगांची अशी वेगळीच संगती येथे साधली होती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN3ssu9CFLXhIo24wTOLsV1y8Eft4Fvkoc2dI0cQu3ty9IaEg8NRPUlHNphf_n3l0SxN48hw6sSpc03W8m86Gcb18ALMdBFHX-mO5Z9R9s_Eq8PlZZjOU46_gKaRKlvy9T7XqLIl3yAf3oar1GhCrH6iA=w1012-h759-s-no-gm?authuser=0

सूर्य ताल मागे टाकून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पर्वतांच्या या निर्जन प्रदेशात अचानक मेंढ्यांचा एक मोठा कळप आमच्या गाडीपुढे आला. अरुंद रस्त्यावर आम्हीही त्याच्या मागोमाग सावकाश पुढे सरकत होतो. पण त्या निर्मनुष्य हिमालयात मेंढ्यांच्या कळपामुळे प्रवासात एक वेगळाच जिवंतपणा आला.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOWN75lYxaqaIgjx3e6p_bR6gOxxT6cnSWWDJMNirYLfdCIVOCnUovAyoTFJPeJVKXzMuBQpSb-5QmDXxnjOlmx75KtqfSoFsmS7MHk224ferQrv_MRJXao-TDZyVPIzU_bt6aKu6hnfrp0mUCnsX76yQ=w1348-h758-s-no-gm?authuser=0

क्षणभर मनात विचार आला, लडाखच्या पश्मिनाची लोकर याच मेंढ्यांपासून मिळत असेल का? पण पश्मिना ही मेंढ्यांची नव्हे, तर चांगथांगी शेळ्यांची अतिशय बारीक लोकर असते, हे नंतर समजले.

काही वेळातच आम्ही बारालाचा ला येथे येऊन पोहचलो. 'ला' म्हणजे खिंड, हे आधीच समजले होते. BROच्या फलकावर खिंडीची उंची १६०४० फूट इतकी दिसत होती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczO84A9x1hUYD-Y10diuY1_oIG9LHmWzheh7hJptLeEPht2ng9C-7wS6EGlySijrvBlte4W9FzZNIgHFvvb-sc2O44X-Jd-RaDsWmty0kt5-3d9TwMfWtP1kQX91pC_EOsGiA5xmYg0vGl_GBHnmdtRjGg=w427-h759-s-no-gm?authuser=0

आजूबाजूला नजर टाकावी तिकडे बर्फाचाच पसारा दिसत होता. हवेतील गारठाही चांगलाच जाणवत होता.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNX9ZXUYXXS2sgVO15J9zy6qhSPDezWtvjViRB91yDgNPFqjzy3Ohm9f_EW6CmilkE7jO45uUmsfrdua1Iu8yXEoVR6dmLIznbBOn2gPKntP5zkeFKcWnUGksr_m8L-xDoK_rz6M7d4BzO399XtY8ECzA=w1348-h758-s-no-gm?authuser=0

काही वेळ थांबून पुढे निघालो. पण हा प्रवास अजून संपला नव्हता. अजून कितीतरी 'ला' म्हणजेच खिंडी आम्हाला पार करायच्या होत्या. सकाळी नाश्ताही न करता आम्ही निघालो होतो. बारालाचा ला उतरून पुढे भरतपूर येथे थांबा घेतला. रस्त्याच्या कडेला तंबू उभारून केलेल्या ढाब्यांची एक रांगच लागली होती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOM-SyyG-hM1F94lTkx9om_IUpFStnTMVn0pqSdRNziKahqFuz80g5ga41JDCqBo2ZVW3DQveXu9-iFs2xG5hOcFNN5g4Tyhfi6_jjpc-DgM5UEd-YzbE7b0O-eLJPsGFS-YOpz6s5ILGUwpz7QlYqrDw=w427-h759-s-no-gm?authuser=0

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNlo5yGr2xZQjrzocNI-sRlJ5ggLF3yw0IaXpxJm-ZgsQ0C76_PH7lF50nIXpxTLACF-0rrgr4rV8C8tF-iaGNL28dS1VQ_Y2tf3Bp71mDgeHGigbFNcS8U1_COu2FNz6VOGQ6vA4LAfiI3t6KYYaw6iw=w427-h759-s-no-gm?authuser=0

बारालाचाच्या उंचीवर विरळ झालेल्या हवेचा त्रास आणि वळणावळणांचे रस्ते यामुळे आमच्या ग्रूपमधील दोन-तीन जणींना मळमळ, उलटी आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला होता. आमच्याकडे ऑक्सिजनचे पोर्टेबल कॅन होते. पेशंटला तंबूतील खाटांवर झोपवून ऑक्सिजन दिला.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPGw_LenY_9rNRlWGwFCouMeSUkVBTGdVvHh55B_rEUAllXv9Giu5FlXHbqk9XSn43GI9z4sTD_MBNI7wJNHapd7xc8Ojl85nKThlxaa6_PDwK-FbmGLChpIWU2J8LXQSk8a_AuGqJFcrgoD_NuI0hhLQ=w427-h759-s-no-gm?authuser=0

बाहेर कडाक्याची थंडी असली, तरी तंबूच्या आत मात्र उबदार आणि आरामदायक वातावरण होते. राजमा-भात, मॅगी, पराठे असा पोटभर नाश्ता केला. काही वेळ विश्रांती घेतल्यावर त्रास होत असलेल्या महिलांची तब्येतही बरीच सावरली.

हिमालयाची रूपे तर क्षणाक्षणाला बदलत होती. कधी बर्फाच्छादित शिखरे, कधी उघडेबोडके खडकाळ डोंगर, कधी खोल दऱ्यांमधून वाहणारे निळसर प्रवाह.. काही अंतर पार केले की जणू हिमालयाचे नवेच रूप आमच्यासमोर उलगडत होते. गाडीच्या खिडकीतून दिसणाऱ्या या सतत बदलत्या दृश्यांमुळे डोळे मात्र रस्त्यावरून हटतच नव्हते.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOnp9SpIeW4lsGWxE-U_BhB_F7SoRkZUrpQ1B82xsgDIVQfDEHEfX91RehGoFeO3hn2tGlXX0uPRevtG_KspcFnTsEcZKBX8PIGHl0ji2XGmIo2TV3DP5zK8780PtrVcweFXMYr6oxICJYH--M7r8jcxw=w1348-h758-s-no-gm?authuser=0

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOUDWRZqwjPNQj4qhXls1_n_UUzj3sc98apfAGBRDIVo0VCp3oJtFQhs4GWLELp7FQyC0N4vgap6EtpO9jhq_3jhpFeF9hYdHfeiX1eQh4qzIvDIrCHUMeljAw8wXorSaulcY8zZ8kQVpks1DdC2gvwlQ=w1348-h758-s-no-gm?authuser=0

काही वेळातच सरचू येथे पोहचलो. हिमाचल प्रदेशाची हद्द संपत आली होती. सरचू हे हिमाचल प्रदेश आणि लदाखच्या सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे वाहनांची तपासणी व नोंद केली जात होती.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOceneuqjRN03I2iT3654GVsfWwEV7V5lGRY4aFAOVODnr_6IilfqmAB1aEVHFheN3-PsyRffbmClhMOV-g_5XqUKCQ_JQJkXtoiHV4toMQqStaahsAF7iuHm1rFCWeWCTHByugWg0rrAuN4gEvrHLCog=w1348-h758-s-no-gm?authuser=0

'जुले!' लडाखमध्ये प्रवेश

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNhozpQ6B2CIVbCHktTp7Na2A9zoqwschdukYcdlX_e6qxi6Vg7rJeIt-TLfLEbJpHnesXVqGj538lgiqi9YbBrIu157M69TutnMWpcG6V6HUHs5Fi3J_Z9ltfZSVJI_lqngz4rDvSgtot3s-e93gFaxw=w1348-h758-s-no-gm?authuser=0

सरचू चेक पोस्ट ओलांडल्यानंतर काही अंतरातच लडाखच्या हद्दीत प्रवेश केला आणि पहिल्याच स्वागत फलकावर भेटला तो लदाखचा अगदी आपलासा शब्द 'जुले'. जुले म्हणजे नमस्कार, धन्यवाद, स्वागत किंवा निरोप. परिस्थितीनुसार अनेक अर्थांनी वापरला जाणारा लदाखचा हा शब्द. त्यामुळे पुढचे काही दिवस कोणालाही भेटतांना किंवा निरोप घेताना जुले हा शब्द आमच्या ओठांवरच राहणार होता.

दूरवरून एक लोखंडी पूल दिसू लागला. जवळ गेल्यावर BROचा फलक दिसला आणि त्यावर नाव होते 'ब्रँडी ब्रिज'.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPiY8kPkzBnODUsQPpmgOnMgJCQ8dSQu7rw_mOjEFvHfrUH91tjS9gIAJtBAC0s_hwPRI9HUP9HnQP6YjwwY_kkkdlxgqO3NWLloZDsqOHVNgVOM9C4B7UBBOp3ictdmZ8xxLfIuuE_9IJi2kha1FcAig=w1348-h758-s-no-gm?authuser=0

लदाखच्या रखरखीत प्रदेशात अचानक ब्रँडी नावाचा पूल दिसल्याने आम्हा सगळ्यांनाच गंमत वाटली.

ब्रँडी संपते ना संपते, तोच व्हिस्की आली!

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPDVEu6Gy9pbPEBR7_oEIymEcrxMgrSbw32-N7bXTKx4giWH2FniyBcpZCzCKheWua_Px5i11Bebi0TxzBxSJO6wv4UzL8AHVlWSUwD89xnlQpZlUxEWmUyicPNjB1S7f56UaTzSBCxUyQaEQULJcUsyQ=w1348-h758-s-no-gm?authuser=0

खडकाळ प्रदेशात ब्रँडी आणि व्हिस्की अशी सलग नावे असलेले पूल पाहून गाडीत एकाच हशा पिकला. या भागात वाहणारे झरे, ओढे यांना नाला असे संबोधतात. अर्थातच या पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यांना ब्रँडी नाला आणि व्हिस्की नाला म्हणूनच ओळखले जाते.

गाटा लूपचा थरार - आता सुरू झाला गाटा लूप्सचा थरारक प्रवास. डोंगराच्या कडेला अक्षरश: एकावर एक अशी एकवीस हेअर पिन वळणे घेत रास्ता वर चढत होता.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOW8ji8C3UeWb_08GC2tzfUWhdXER8IAnofZPqDYws3iSxerIIASW0N-N1zS3zoFl4ivjO4Oybx3CjvHxQKCQYI-BhLgbGOkd5XkJAVy8IKpfb-PzipbilONmglZy7to6tEdfJtZfbgDZ19ViB7GcuPwA=w1348-h758-s-no-gm?authuser=0

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczN9kMPSbKqPKLS2KAmBH7e_PrHacmgnCsFAUpiMz-D-AN5Euide2lJSeZ_jAn-SHF1YNb1D4oVZOAXg19WFuBopsN5CS-viVloWhEKThk_J6wDdNRen0dGJ9q9kB2sTi3tr9-mcbqMEAnyJBKd2rx2O9g=w1348-h758-s-no-gm?authuser=0

खाली खोल दरी आणि समोर उभे असलेले बोडके खडकाळ डोंगर. प्रत्येक वळणावर ड्रायव्हरच्या कौशल्याची कसोटीच लागणार होती. लाचुंग ला गाठण्याच्या मार्गावरील हा प्रवास नक्कीच रोमांचक होता.

गाटा लूपशी जोडलेली एक हृदयस्पर्शी कथा आमच्यागाडी चालकाने सांगितली. काही वर्षांपूर्वी या परिसरात एका ट्रक ड्रॉयव्हरचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्याला पाण्याचा घोटही मिळाला नव्हता, असे सांगितले जाते. त्याच्या स्मरणार्थ ज्या जागी त्याचा मृत्यू झाला, तेथे आजही प्रवासी पाण्याच्या बाटली ठेवतात.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMYZ5fZtJSn_mwCnwCNsEr8A1-lb1ySFzX0EEqFzN6qHrJIJ85SWe8OzKC-rB6pnyTPxSMPAQZao0nXktaNTTtn76azfbfQ0zzgJAd7oCSOJhNSsi4-3BxzMjomguPErRs8TfOE6V3_c23noUpobmjMTQ=w1348-h758-s-no-gm?authuser=0

गाटा लूप्सची वळणे पार केल्यावर 'नकी ला' खिंडीला पोहोचलो. समुद्रसपाटीपासून सुमारे १५५४७ फूट उंचीवर असलेली ही मनाली-लेह मार्गावरील आणखी एक महत्त्वाची खिंड. भोवती नजर टाकली तर सर्वत्र तपकिरी खडकाळ आणि जवळजवळ निर्विकार पर्वत.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOiEGv8yDzB6-qL9hyuydWwPtis1EsOG3BYkQx7_OU6qLZ-qefWdjuMboqXM8e_9E_lGv8nXD3W2LiSQHKQcqj89cD91-nTWd3JKGa6KWWjGrogDs8rVt0uEJ40DWy_HtCkVsz0bwfrH81KOcrppNwprQ=w427-h759-s-no-gm?authuser=0

लाचुलुंग ला

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczPGQmc-cB9LrBBSfmMlNcXFUk6NRJERzBZ8ryKofXhOGPgBEFl4JYWNJ2ETK2MVmrMnx1SEHOxkCLMAQlJquXQGSGufSTWzuICbCMZrlazZ_NJejvv-LgQtLbHEanIWdNd1c2QvU2pR2o8vSjLhK4sNcA=w427-h759-s-no-gm?authuser=0

'नकी ला' आणि लाचुलुंग ला खिंडींचे दर्शन गाडीतूनच घेतले.

लाचुलुंग ला उतरून पुढे आल्यावर पांगचा परिसर लागतो. उंच पर्वतरांगांच्या मधली ही एक लहानशी वस्ती आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचे थांबण्याचे ठिकाण आहे. इथून पुढे प्रदेश आणखी उघडा आणि विरळ होत जातो.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczO8Sj01yV-mMbw2ilEsq92s-cuHVTqrTyIi5VNBcuZaBrqPKeDJbfeehXLg894XRk9YYi_r9FEXU6l8VGoCKaybeSJ764Oe6WA-5D_R4kGFjkSbFTXqyPqDmQCpIF8ZFOrZ4RnA2fEOz9B7AHkOenS2FQ=w1348-h758-s-no-gm?authuser=0

पांगनंतर मात्र या प्रवासातील एक विलक्षण दृश्य समोर येते, ते म्हणजे मोरे प्लेन्सचे (More Plains). समुद्रसपाटीपासून सुमारे १५७५० फूट उंचीवरील हा जवळपास ४० कि.मी. लांबीचा मैदानी प्रदेश. मनाली ते लेह अशी बाइक ट्रिप करणाऱ्या प्रवाशांसाठी हा आवडता टप्पा. रस्ता अगदी सरळ आणि सपाट असल्याने येथे बाइक चालवण्याचा आनंद काही वेगळाच.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNS3Th6cuQIEardPrsUl_ivsupzAVZ-VnjgnBWZjvQ9EtjigP8F7HBRnfZ2nbVZtq27GT2WOf6XH-MMyz3UaIdZYjXwu_EONfLfh0Xg9DRK502jTRRSL8MNBxwypJPDACpbPrS8NPAZEhvZFiP4JrKsmQ=w427-h759-s-no-gm?authuser=0

लष्करी वाहनांचे ताफेही अधूनमधून नजरेस पडत होते.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNv43vY2Q-vq65l2fz3nMjW6AUz8uC9Rm8jaWGdiUgVbYr8uLBEt669jUnixgBIYtQBLIfuon0j7TQB3P7pGnLGBRhZoIYbWyeziS0xXGB4Mn9u5EztesK6gPOqUtTSYZxgf7_-eQ3hy8MCuHW6fmmnxw=w1348-h758-s-no-gm?authuser=0

मनाली-लेह मार्गावरील शेवटची मोठी खिंड - टांगलांग ला टॉप - १७४८२ फूट.  उंचीचा आकडा पाहूनच या ठिकाणच्या भव्यतेची आणि कठीण परिस्थितीची जाणीव झाली.

खिंडीवर पोहोचल्यावर रंगीबेरंगी प्रार्थना ध्वजांनी सजलेले एक छोटेसे बाबा मंदिर दिसले.

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczOxVV3ZBiAwUr1fprZq0kz_9ySnq-LCVHYJIy2f_LkEl8Czv42BHdXLI-383dgr3AF0XCjEKZ1YyrdZTCkKhsh82k9i8I8oilMgOdKHtKTXoVYOa9TmE8c8b5oKjlVW9fpjXEW1Z9jPLsxuz5omPSGM5Q=w1348-h758-s-no-gm?authuser=0

टांगलांग ला येथे पोहचल्यानंतर BROचे काम आणखी एका वेगळ्या रूपात दिसले.

हिमांक व्ह्यू पॉइंट - प्रवाशांसाठी बसण्याची आणि थांबण्याची व्यवस्था

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczP4BYfIj7r7VhJaib1rLdUgC_2zryvzbI4QEd3WZRF-ZiVQrhTIEGu_rgXYUA1PTuBqIOq__A10hw-dyz1qr00QiUBJZmdVzO-2XVteshjPxcVMAXEyIk0li1UPCuk5pVZzqvDl1r8r2FCD5vrUxlR-Ug=w1348-h758-s-no-gm?authuser=0

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMvBoYER1gb5np5EZPANdUea7PslIM5JSpoJvUsXTfrOEGF4wNZC_b2Rs3Dei29FT9fMNzfHOmczmeVi71yYCei51IpT51AV33UUbAMzT1IFmBEf3aa2xWX2vPW3iHUUkupkswSLpEO9faPcecuZt02Bw=w1348-h758-s-no-gm?authuser=0

कॅफे हिमांक व गरजूंना ऑक्सिजनची सुविधा

https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczNpTEiAuzeMzyX7M2TJ36uFCERozs0DcEQiO2iWnH7qorBWZQw9diPG0yPPvrPjb6RGf28aZooyWSeqRcgzHkPQ2BwX7-HBYGjPFx799KlD86xMrR0uNH2G-IhZR2v9wUO1-ovHTHABT8nHTmEtmNCmBA=w1348-h758-s-no-gm?authuser=0

उंच आणि दुर्गम प्रदेशातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी या सुविधा निश्चितच दिलासा देणाऱ्या होत्या.

रस्ते, पूल आणि बर्फ हटवण्याचे काम तर BRO करतेच, त्याचबरोबर अशा ठिकाणी प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही जाणवले. टांगलांग ला मागे पडल्यावर आमचा प्रवास हळूहळू उताराला लागला.

डेब्रीन्ग, रुमत्से, उपशी आणि कारू मागे टाकत लदाखच्या विशाल आणि रूक्ष पर्वतीय प्रदेशातून आम्ही पुढे सरकत राहिलो. उपशीजवळ सिंधू नदीची साथ मिळाली आणि तिच्या खोऱ्यातून पुढे जात अखेर लेह गाठले.

चंदीगडपासून सुरू झालेला हा उंच खिंडींतून आणि बदलत्या भूभागातून जाणारा प्रवास आता पूर्ण झाला होता.

आमच्यासाठी लेह हे गंतव्य होते, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्याहूनही समृद्ध होता.

जुले!

दिवाळी अंक वर्ष

वाचने 104
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया