Skip to main content

खिडकी... काही स्मरणं

लेखक संजय.पाटील यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

खिडकी...

उघडझाप करणारी..

आपल्या मर्यादित चौकटीतून क्षितिजाला कवेत घेणारी.. अमर्याद..

तर कधी बंदिस्त.. सगळा अवकाश एका तुकड्यात गोवणारी.

किती रूपं सांगावीत खिडकीची...

किती सनातन आहे खिडकी आणि खिडकीपाठची आपली भावना..

मला तर खिडकीची रक्तातूनच ओढ पिढ्यानपिढ्यापासूनची..

श्‍वासाची खिडकी उघडली, तेव्हापासूनची..

दृष्टीची खिडकी उघडली, तिथपासूनची..

मनाची कवाडं उघडत जाईल तशी ती खिडकी आभाळव्यापी  होत जाते.. 

एकएक चित्र पापण्यांवर अलगद उतरंत राहतं..

जणू आठवणींचे पक्षीच.. खिडकीच्या गजांवर थबकलेले... 

मी धुंडाळत राहतो खिडकीचं आणि माझं नातं असीम ओढीनं..

पागोळ्या ठिबकाव्यात तशी स्मरणं ओघळू येतात..

काळोख गडद होत जावा आणि शहरभर खिडक्यानी डोळे उघडावेत.. संपूर्ण शहर हिरव्या पिवळ्या शुभ्रशा फुलांनी बहरून यावं अशा आठवणी...

खिडकीच्या.. आतल्या.. बाहेरच्या!

असंच एक शहर..

रक्तात उतरलेलं..

कदाचित एखाद्या चित्रपटातलं दृश्यच संवेदनाच्या तळाशी रुतून बसलेलं...

             प्रचंड गजबजाट..

             नक्षत्रांनी फुलून गेलेल्या गल्ल्या...

             चांदणी चौक किंवा असाच    

             बेबीजानचा मुहल्ला.....

रस्त्याच्या दुतर्फा हार गजऱ्याच्या हारीने मांडलेल्या माळा....

हिरव्या लाल रंगाची अत्तराची दुकानं.. चमचमतेली. ..

छोट्या-मोठ्या चकचकीत पितळी माठाच्या भांड्यांची पानठेल्यावरची आरास....

दीपदानांनी उजळलेल्या रंगीबेरंगी माड्या..

त्यातल्या भल्यामोठ्या खिडक्या.. हिरवे गर्द पडदे., अर्धोन्मीलित.. ध्यानस्थ असल्यासारखे..

आकाशातून लहरत येणाऱ्या गझलांच्या मंद मंद सुरावटी... सारंगीचे लडिवाळ स्वर त्यांना स्पर्शू पहात असलेले...

पायातल्या कणीदार पैंजणांची देव्हाऱ्यातल्या घंटेसारखी निर्मळ किणकिण..,

मधूनच तिचं झुंबर हलल्यासारखं हसणं.. हवेत विरंत जाणारं.. 

साऱ्या खिडक्यातून अवकाशभर दरवळणारे फक्त सुगंधांचे श्वास.......

                   कशी असेल ती?

                   पडदानशीन....

                   लयदार..

                   नाजूक...

                   संगमरवरी..

                   सुरमा घातलेल्या टपोऱ्या

                   डोळ्यांची ....

                   कशी? कशी?

सारं स्वप्नवत.. आभास.. नुसता..

माझे डोळे नेहमी.. उत्सुक...

त्या खिडकीआतलं वैभव पाहण्यासाठी आतुरलेले....

                     त्या खिडकीचा तो पडदा

                     अलगद    

                     बाजूला होईल....

                     अय खुदाsss

                     मला दिसेल..

                     जन्नत..

                     जन्नत..

 *******************

शाळेत जाण्याचं वय..

असेन मी दहा-अकरा वर्षाचा..

शाळा सुटली की सरळ घरी येणं व्हायचं नाही..

पाय फुटतील ते गल्लीबोळ धुंडाळायचे...

काही चाळी.. कौलारू बसकी घरं....

आमच्या उंचीच्या खिडक्या...

 फिरताना प्रत्येक खिडकीतून आत, घरात डोकवायचा छंदच लागलेला..

 कोणतं घर आतून कसं आहे ..कशा वस्तू ठेवल्या आहेत ..कुणाचं घर आटोपशीर आहे.. कुणाचं गबाळं.... कुणाच्या घरात भिंतीवर घड्याळ दिसतंय .. दोरीवर टांगलेले कपडे ..दाटणीत ठेवलेलं बाजलं. .. शिलाई मशीन.. क्वचित एखादं जातं.. भिंतीवरचे मिशीवाले आणि टोप पदर घेतलेल्या पूर्वजांचे धुरकट फोटो... चुलीतला धूर अन् खरपूस वास....

 याबरोबर हजारो बरी-वाईट दृश्य नजरेत यायची.. आतलं जग उघड्यावर यायचं त्या बंदिस्त खिडकीतून....

 

              एक आजोबा दिसायचे रोज एका खिडकीत बसलेले. पाणीदार डोळ्यांचे.. अत्यंत भावुक  चेहरा आणि कमालीचे उत्सुक डोळे..

खिडकी आतून त्यांची मान सतत हलत असायची.. उजवीकडे पाहायचे.. क्षणभर विसावायचे.. मग डावीकडे ..मग वर उंच आभाळात.. 

भान हरपून बाहेरच्या निसर्गातल्या हालचाली अधिरतेने टिपत असलेले...

ते बघतील तिकडं मीही काय पाहतायंत म्हणून मान वेळावून पाहायचो.. रस्त्यात उभा राहून...

कधी आभाळातल्या पक्ष्यांच्या रांगेकडे.. कधी पिंपळाच्या पर्णसंभारात काही शोधत असलेले..

कधी समोरच्या पोपडे उडालेल्या भिंतीत नजर खुपसून... तर कधी अंधार माखल्या चिंचोळ्या बोळातील चुकार उजेडाच्या कवडशांकडे.....

एखाद्या नवजात अर्भकाच्या निरागस अल्लड नितळ दृष्टीने.....

         मला वाटायचं...

आपणही त्या घरात जावं आणि त्यांच्या शेजारी बसून त्यांच्यासारखंच खिडकीतून बाहेर टुकूटुकू पहात राहावं ... कसं दिसत असेल आतून बाहेरचं रंगीबेरंगी जग? मनात काय चालू असेल त्यांच्या?

मी नेहमी खिडकी बाहेरून मुद्दाम घसटून जायचो.. खाकरायचो..

अत्यंत निष्पापपणाने ते आवाजाच्या दिशेने मान वळवायचे... चेहऱ्यावर तेच ओळखीचं आरस्पानी हसू.......

    न रहावून मी एकदा खिडकीशी थबकलो.

    खाकरलो नाही..

    आजोबा खिडकी आत.. मी बाहेर उभा ..

    जवळ गेलो.. आबदार पावलांनी ...

    आता दोघांच्या चेहऱ्यामध्ये फक्त 

     खिडकी.......

आजोबांनी मला पाहिलं..... 

पण डोळ्यात कसलीही ओळखीची खूण नाही...

निर्विकार.......

मलाच ती नजर आरपार भेदून गेली...

म्हणालो.. "आजोबा, काय पाहताय इतक्या तल्लीनतेने?"

त्यांच्या जाळीदार गोर्‍या चेहर्‍यावर हसू पसरलं..

म्हणाले..

"काय पहायचं असतं? जे जे दिसतं ते ते आनंदानं पाहायचं.. इतकंच."

मला त्यांच्या या बोलण्यातली गूढता आकळेना...

तेच म्हणाले...

"कळलं नाही? काळोखाच्या प्रचंड लाटा.. त्यांचे अजस्र हलते डोंगर.. खोल खोल अंधारगुहा.. वर आभाळात मुक्तपणाने उडणारे अगणित पक्ष्यांचे थवे.. सतत आकार बदलत असणारे... काळोखाचं झाड.. अन् काळे काळे पक्षी.."

           त्यांचे पाणीदार डोळे किंचितसे झिरपत असलेले मला दिसले.

 "म्हणजे.. तुम्ही काय म्हणता ते मला नाही कळलं." मी म्हणालो ..

"सांगून नाहीच कळणार.. त्याला अनुभवावं लागतं बेटा.. अंत नसलेल्या वाटेवरून चालावं लागतं.. दोन्ही डोळे मिटून पाच मिनिटं उभा राहा.. स्तब्ध.. स्थिर... म्हणजे कळेल मी काय पाहतोय ते...."

           मी अवाक...

           म्हणजे हे आजोबा दोन्ही डोळ्यांनी

           ठार आंधळे आहेत की काय?

           वाटत तर अजिबात नाहीत....

           कुठल्या जिज्ञासेने ते

           बाहेर पाहतायंत मग?

           की आतच पाहतायंत? स्वतःत ?...

           आणि चेहऱ्यावरचं ते आभाळ

            ओथंबून यावं असं हसू..।।

            

              कसं शक्यय ..?

मी पाठमोरा होऊन सुसाट पळालो.. आडवातिडवा... 

परत त्या वाटेला फिरकलो नाही..

अजूनही ती खिडकीची चौकट आणि त्यातून जीवनाचा साधा सरळ अर्थ सांगणारे ते डोळे.. माझा पाठलाग करताहेत..

अजूनही...

                   

*********************

पूर्वीची नगरपालिकेची शाळा... माझी शाळा... चौथीपर्यंतची.... शाळा म्हणजे पूर्वीचा बिड्या तयार करण्याचा कोटा.... जुन्या पद्धतीची दगडी चाळ...

मध्ये मोकळे आवार अन् बाजूंनी एकसारख्या खोल्या..

आत नेहमीचा ओला अंधार..

प्रत्येक खोलीला दोन दोन खिडक्या... त्यातून येणारा तेवढाच प्रकाश... वर इमारतीचा सगळा लाकडी डोलारा.. मोडकळीस आलेला..

खिडक्या बाजूच्या भिंती सोडायच्या तयारीत..

वरच्या मजल्यावर शाळा...

खालच्या खोल्या लोकांना भाड्याने दिलेल्या..

सगळी मुस्लीम कुटुंबं..

वरून शाळेचा कलकलाट आणि खालून संसारी कलकल... योट उठायचा..

नंतर सिमेंटच्या चकाचक हायस्कूल कॉलेजमधून शिकलो खरा, पण तिथल्या खिडक्या मला अजिबात आठवंत नाहीत... कसलीही स्मरणं त्या चौकटीत गुंतली नाहीत.. अगदी तरुण वयातही. ...

मात्र प्राथमिक शाळेतील त्या खिडक्या जिवाच्या दोरीने घट्ट बांधलेल्या...

घरून पिशवीतनं बस्कर घेऊन जायचं.. तेच अंथरायचं अन् त्यावर बसायचं..

माझं बस्कर म्हणजे पोतं..

पोत्याचा चौकोन तुकडा कापून कडेनं वाकळेच्या दोऱ्यात ओवलेली कड..

वर्गात खिडकीजवळ 'राजी' बसायची..

एकदम गोड मुलगी. . गोल चेहऱ्याची...

सदा हसतमुख.. नीटनेटकी.. दोन्ही बाजूंना दोन वेण्या.. तिपेडी...तळाला रिबीनचं फूल.. कपाळापासून मागे मानेपर्यंत सरळ रेषेतला भांग... एक दोरी ही इकडं तिकडं नाही.. खिडकीतनं कोवळं ऊन तिच्या केसांवर हळुवार उतरलं की ती रेष एखाद्या पायवाटेसारखी उठून दिसायची.. वाटायचं, आपल्या मधल्या बोटाची गाडी करावी अन त्या वाटेने हळू फिरवून आणावी.. कपाळावरून नाकाच्या शेंड्यावर उतरवावी.. तिथून जंप मारून मग ओठावर किंचित थांबवावी...

तिचं बस्कर सुबक.. चादरीचं.. गोंडे असलेलं..

शिक्षकांना पाटीवर लिहिलेलं दाखवायला पुढे जाताना मी मुद्दाम तिच्या बस्कराला पायाने स्पर्श करायचो.. ऊबदार .. अंगात शिरशिरी यायची..

ती खिडकीशी रेलून प्रश्नांची उत्तर द्यायची.. तेव्हा बाहेरून येणाऱ्या प्रकाशात ती एकटीच उठून दिसायची.. चित्रासारखी.....

बाकी मला वर्गातलं कुणी दिसायचंच नाही..

बऱ्याचदा खालच्या मजल्यावर अंडा आमलेटचा किंवा बिर्याणीच्या वासाचा खाट उठला की वरच्या खिडकीतून तरंगत आत यायचा...

आम्ही छाती भरून घ्यायचो...

खिडकीशी बसलेली राजी नाकाला छोटासा रुमाल लावायची.. नंतर नाक लालेलाल झालेलं असायचं.. किती सुंदर,.. हेही मलाच ठाऊक असायचं...

खिडकीतून वाऱ्याची झुळूक जरी आली तिच्याकडून, तरी वाऱ्याचा स्पर्श मला जाणवायचा..

तिथून तो येणारा सुगंधी वारा नेहमी हवाहवासा वाटायचा...

दिवसभर तो आवतीभोवती रेंगाळायचा..

रात्री अंधार होऊन टक्क डोळ्यासमोर दरवळायचा...

चौथीनंतर वाटा बदलल्या....

कोण कुठे कोण कुठे पांगला...

नंतर खूप वर्षांनी मित्रा मित्रांत राजीचा विषय निघाला...

सुऱ्या  म्हणाला, "कळलं नाही..?  मेली की..

नवऱ्याने सोडली.. मग काय! गेली वाया..

पोटासाठी वाटेल ते केलं.. आजारानंच गेली.."

का कुणास ठाऊक माझ्या पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं झालं..

खूप वर्षांनी शाळेपुढून निघालो होतो..

आता तिथं शाळा नाही..

सहज डोकवावं म्हणलं...

मधल्या आवारातून वर पाहिलं...

नुसते अवशेष.....

वरच्या तुळ्या खाली झुकलेल्या.. पोखरलेल्या...

भिंती अर्ध्या ढासळलेल्या...

वरचं निम्मं छत गायब.. आरपार आभाळ दिसतेलं.. 

आणि

खिडकीच्या जाग्यावर फक्त चौकोनी खूण..

आठवणीसारखी....

ठळक...

आणि वारा पडलेला...

 

*********************

पूर्वी चाळीत राहायचो.. माने वाड्यात...

रघुमामांचा वाडा.....

माडीवरंच आमचं दोन खोल्यांचं घर...

मातीच्या भिंती... लाकडी तुळ्यांवर तोललेला दुसरा मजला.. तळाशी मातीच.. आठ पंधरा दिवसातनं शेणानं सारवायचं..

भिंतीना मातीचा पोतेरा द्यायचा..

वर्षभरासाठी मातीचे मोठे गोळे करून ठेवलेले असायचे... पाण्यात ढेकूळ टाकायचा आणि त्यात कापड भिजवून रंगवल्यागत थप थप पोतेरा थापायचा.. पुन्हा कापड पिळून हलक्या हातानं सप्पय करायचं...

घराला दोन खिडक्या..

एक बाहेरच्या खोलीत आणि दुसरी बैठी खिडकी मागच्या खोलीत.. चुलीच्या वर..

पुढच्या खोलीतली खिडकी पश्चिमेला संगाप्‍पा कामन्ना यांच्या घराच्या बाजूला उघडायची.

खिडकीशेजारी आईचं शिलाई मशीन...

मध्यरात्रीपर्यंत तिचं ब्लाउज आणि चोळ्या शिवणं, लुगड्याला दंड घालणं सुरू असायचं..

मला आठवतं अडीच रुपये चोळीची शिलाई देताना बायका मागं-पुढं बघायच्या... चाराठ आणे कमीच  पडायचे....

आई हे लक्षात ठेवायची.. वर्षभरानं परत ती बाई शिवायला आली की मागच्या चार आण्याची हमखास आठवण करून द्यायची..

पुढच्या घराच्या खिडकीत नेहमी शिवण शिवत असलेली आई फक्त आठवतेय.

मला झोप यायची...

अध्येमध्ये झोप चाळवली की डोळे उघडायचो..

विरत चाललेल्या घोंगडीच्या फाटक्या गोल खिडकीतून बाहेर पाहायचो..

आईची मशीन वर खडखड सुरूच....

माझा पुन्हा डोळा लागायचा...

ती काम बंद करून केंव्हा झोपी जाते हे कळायचं नाही.. की ती झोपतच नव्हती?

अंधार पाठीशी घेऊन त्या खिडकीतून येणाऱ्‍या नगरपालिकेच्या लाईटच्या प्रकाशात ती डोळे जाळत असायची..

या खिडकीशी तिचं घट्ट नात..

दोघीही एकमेकांच्या साक्षीनं रात्रभर जागत असायच्या... मैत्रिणीसारख्या..

प्रपंचाशी ठिगळ जोड करत असायच्या..

उसवलेला एक एक टाका सांधत असायच्या..

एकमेकींशी खूप बोलत..

अबोलपणे.....

आता

आम्हा सर्वांसाठी तीनं जरतारी मखमली वस्त्रंच विणून ठेवलंय..

भेगाळल्या हाताने

नाजूक कशिद्याचं.....

***************************

 

स्वयंपाकघरातली खिडकी तशी आकाराने मोठी..

खिडकीतून बाहेरचं भलंमोठं लिंबाचं झाड दिसायचं. आमच्या माडीच्या दुप्पट उंच आणि प्रचंड विस्तार असलेलं.

वाऱ्याच्या हालचालीने झाड सतत आवाज करायचं..

रात्रीच्या अंधारात तर खिडकीच्या बाहेर बघायला भीतीच वाटायची...

झाड अंधार पांघरूण झुलत असायचं..

त्याची भीतिदायक सळसळ ऐकताना मनाला कापरं सुटायचं.. तशात रात्री विजा कडाडत असतील आणि वारा सुटला की खिडकीबाहेर सावल्यांचा जीवघेणा खेळ सुरू व्हायचा...

झाडावर भुतांची अख्खी भावकीच लोंबकळत असल्यागत वाटायचं...

मी घरात सगळ्यात लहान.. त्यात प्रचंड भित्रा..

घरात रेडिओ होता..

पावसाळ्यात वादळ वारं सुटलं, विजा कडाडू लागल्या की रात्री साडेनऊ वाजता रेडिओवर हमखास एक नभोनाट्य लागायचं ..." वाटसरू "..

व्यंकटेश माडगूळकरांचं....

त्या नाटकाचं नाव ऐकलं तरी माझ्या पोटात भीतीने गुरगुर सुरू व्हायची....

तशात लाईट जायचेच... घराच्या वरच्या पत्र्यावर पावसाचं थैमान सुरू व्हायचं...

खिडकीबाहेर नगरपालिकेच्या खांबाच्या प्रकाशात झाडातनं धारांचा पडदा चमकायचा.... विजांच्या कडकडाटाने भुई हादरायची. ..

घरात भयानक अंधार.... बाहेर सळसळ...

मी अधिक भ्यावा, म्हणून मुद्दाम माझे भाऊ खिडकीबाहेर एकटक पाहत राहायचे..

भेदरलेले चेहरे करून...

दिव्याच्या प्रकाशात त्यांचे डोळे चमकायचे..

जरा कोणी हलला की घरातल्या भिंतीवर सावल्या अजगरासारख्या हलायच्या..

मी रडकुंडीला यायचो..

खिडकी बंद करा अन आत माझ्याकडे बघा म्हणायचो..

तशात त्या नभोनाट्यातलं प्रेत खाडकन बाजल्यावर उठून बसलं की भयानं मी भोकाड पसरायचो.. कढी पातळ व्हायची..

सगळे हसायचे...

ह्या वाटसरूचं आणि खिडकीच काही सुतगुत असावं असं वाटायचं...

अशा काळोखात कुणीतरी अवचित खिडकीत येऊन उभा राहील आणि घोगर्‍या आवाजात हाक मारेल अशी भीती वाटायची...

"कुणी आहे का घरात? मी वाट चुकलोय.. वाटसरू आहे.. आजची रात्र आसरा मिळेल काय?"

       कल्पनेनेच मी अर्धा व्हायचो...

       आठवण आली की अजूनही ते दृश्य 

       माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवतं.

       कधीकधी स्वप्नातून जागं करतं....

 

*******************

एक खिडकी नेहमी माझ्या जाणिवेत रहात आली आहे..

आभासी खिडकी... फसवी...

पण खोलवर काळजात रुतलेली....

खूप वर्षांपासून या खिडकीविषयी प्रचंड ओढ..

अगदी हाताच्या अंतरावर ही खिडकी आहे असं वाटायचं.. पण प्रत्यक्ष दूरात कुठेतरी....

लहानपणी ब्लॅक-व्हाईट मराठी चित्रपट पाहिलेले... आनंद जयश्री नाहीतर पद्मा थिएटरात...

अशा चित्रपटातली खिडकी का कुणास ठाऊक मला माझ्याच घरची वाटायची.. खिडकीच्या आतून डोकावणारी लाजरी नटी आणि बाहेरून तिच्याशी गोड गोड बोलणारा मराठमोळा मर्दानी गडी....

काळजात गुदगुल्या व्हायच्या...

घराच्या आतल्या भागात बाजूच्या भिंतीवर किंवा खाली जमिनीवर खिडकीचं प्रतिबिंब पडलेलं असायचं.. बाजूलाच एखादी झुलणाऱ्या डहाळीची नाजूक सावली... सारा प्रकाशखेळ ..... 

पण मला ते कवडसे जिवंत वाटायचे... त्या खिडक्या त्या वयात खऱ्याच वाटायच्या...

एखादी दुमजली माडी.. रंगीत...

समोर भलंमोठं अंगण...

मागं निळा निळा डोंगर.. चंद्र...

बाजूला एखादं झाड.. पायऱ्यांवर परकर-पोलक्यातल्या दंडावर फुले असलेल्या दोन वेण्यावाल्या मुली.. टोपी आणि फेटेवाली ज्येष्ठ मंडळी पानपुड्यासह... 

नऊवारीतल्या ठसठशीत कुंकवाच्या घरंदाज आयाबाया. एका बाजूला बैलगाडी.. बैलावर झूल..

दाराला देखणं लाल-पिवळ्या मुंडावळ्याचे तोरण.. खिडक्यांना मुलायम पडदे... 

खिडकीच्या आतून, बाहेरची दिवाळीची आरास पाहणारी नटी... गोरी पान. नाजूक चाफा...

सगळंच चित्ताकर्षक..

माझं लक्ष त्या खिडकीतच...

तिच्या हिरव्या गच्च काकणांच्या मेंदीभरल्या हातांवर....

पडद्यावर असं चित्र आलं की मला जुन्या घराचा सुवास यायचा.. छाती भरून श्वास घ्यावा वाटायचा.. अनामिक परिचित गंध... 

अनेक खिडक्या असलेलं असं घर मी घालवाडला पाहिलेलं.. कौतुकाचं.. आईच्या आजोळी..

आणि शाळेतल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात...

गडद रंगाचं आणि पुस्तकाच्या वासाचं ..

अशीच दुसरी खिडकी नाटकातली...

नाटकाच्या वेळेचा गडद अंधार आणि रंगमंचावरच्या घराच्या खिडकीतून हळूहळू आत प्रवेश करणारा प्रकाश.... मग काही क्षणात उजळून येणारा रंगमंच....

खिडकीतून डोकावणारा सूर्योदय...

नारंगी पिवळे ऊन....

कधी रात्रीच्या खिडकीबाहेरच्या म्युन्सिपाल्टीच्या खांबावरच्या  पिवळ्या दिव्याच्या प्रकाशाचे रंगमंचावर येणारे चुकार कवडसे...

खिडकीजवळ टेबलावर मान टेकवून वाट पहात असलेली ती... भाऊक डोळ्यांची..

मोकळे केस...

केसांवरून काची कलरचा प्रकाश.. निसटता...

चमचमत्या लाटांसारखा ओघळू येतेला....

सारंच काळजाला स्पर्श करणारं....

वाटायचं उठावं अन् सगळी बंधनं तोडून रंगमंचाच्या पायऱ्या चढून वर जावं....तिला मिठीत घ्यावं...

अलगद तिचे केस सावरावेत..

आणि खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात न्हावून निघावं....

चित्रपटातलं घर म्हणजे रंगवलेले पडदे...

आणि नाटकातल्या खिडक्या म्हणजे बॅटन पट्ट्यांची चौकट आहे, हे कळू लागलं..  

आणि

वर्तमानावरचा विश्वासच उडू लागला.....

*********************

हल्ली काय वेढून राहिलेय स्वतःच्या आत बाहेर काहीच कळत नाही..

ज्ञानोब्बा....

किती कोवळे वय..

मुखकमलावर आगळे तेज विलसत असलेले.. जशी पौर्णिमा मुखावर साश्चर्य थबकलेली..

गोऱ्यापान उघड्या कांतीवर चैतन्य प्रभात झळकत असलेली..

नेत्रातून अखंड वात्सल्याचा पाझर..

नाजूक ओठावर साऱ्या ब्रम्हांडाचे रहस्य..

त्याने हसतमुख म्हणावे..

"संपले माझे कार्य.. बहुत आनंद उरीपोटी जोजवला.. बहुत रसपान केले.. आता हा अमृतकलश उतू जातो आहे.. मुक्तीची घडी समीप उभीय.. बोलावणे आलेय.. सगुण समाधी घ्यायची आज्ञा झालीय.. सदेह मुक्ती.. आता लौकिकाच्या पैलवाटा धोंडाळायच्या आहेत.. खेद नका करू.. अतिव आनंदे मजला बोळवण करा.."

अवघे विश्व धवळून निघाले..

काय हे आक्रित..??

समाधी...??

तो मंद गतीने एक एक पाऊल टाकू लागला..

जड मुढा पार जाऊ लागला..

"नदीच्या माशा ! घातले माजवन !

तैसे जनवन !  कालवले.. !! "

सिद्धबेट उमलून आलेले..

ज्ञाना विवरी उतरू लागला..

समईच्या शीतळ  प्रकाशात समाधी स्थळ उजळू आलेले..

मुखावर निरव शांतता..

जणू ज्ञाना अपार सुखाच्या थडी उभा आहे.. महाद्वारी.. चैतन्य लेवून...

परिपूर्ण कैवल्याचा पुतळा जसा...

भीम मुद्रा लावून ज्ञानोबा स्वतःत लीन झालेला..

जसे ब्रह्मकमळ उमलू आलेले..

तो आत आत जातोय..

खोल गुढात...

हे गूढ प्रकाशमान आहे..

अतर्क्य आहे..

पण आहे....

आयुष्य सांजावताना आता आपणही कुठल्याशा गुढात निघालोय अशी जाणीव शरीर मनात अविरत ठिबकत राहतेय..

काहीच कळत नाही..

कसलाच अंत लागत नाही..

सूप्त मनाच्या आत अंधार चिरत एक कवडसा उतरू येतोय.. लखलखीत.. कुठल्याशा अंतहीन खिडकीतून.. जी दृष्टी पैल आहे..

ती खिडकी खुणावतेय....

हे कसल्या भ्रमाचं पिसं लागलंय ज्ञानोबा?

****************

संजय जगन्नाथ पाटील 

     सांगली

दिवाळी अंक वर्ष

वाचने 32
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया