Skip to main content

वय वाढत जातं तसे

लेखक वैशाली पंडित यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

वय वाढत जातं तसे 

डोळ्यांचे डोह काठोकाठ भरलेलेच असतात.

तळापासून काठापर्यंत 

आठवणींचे तरंगांवर तरंग

उमटत राहतात.

त्या तरंगांवर स्वतःला अलगद बसवून

मन स्मृतीच्या प्रदेशात जा-ये करतं.

मला तर हल्ली भूतकाळातच रहायला,

तिथल्या खिडक्या उघडून बसायला

जास्त आवडतं

तिथेच मला जास्त सुरक्षित वाटतं.

तिथे माझी कर्ती प्रतिमा

जीवतोड संसार सांभाळत असते,

आल्यागेल्यांचा

पोटच्या, पाठच्यांचा 

स्व चा सुद्धा!

तिथे असतात जबाबदाऱ्या,

तिथे असतं प्रयोजन

उगवल्या दर दिवशीच्या जगण्याचं

अपूर्वाईनं मी ती लगबग बघत बसते.

वर्तमानातून माझा जीर्ण सुरकुतला हात

मला बखोट धरून ओढत आणू बघतो

मी तो सोडवून घेते

मला नाही यायचं जा तुझ्याबरोबर...

तिथे कोणी नाही तुझ्याकडे.

एकटीच असतेस.

कोणीतरी भेटायला येईल 

अशी आशाळभूतशी बसून...

इथला छानदार गोतावळा सोडून 

नाही यावंसं वाटत तुझ्याबरोबर.

मग तो सुरकुतला हात

समंजस होऊन मला थोपटतो

आणि दिसेनासा होतो

मी.. वेगात धावते त्याच्यापाशी

मी तरी एकटं नाही सोडणार तुला.

तुझ्या सुरकुत्यांशप्पथ!

फक्त मधून मधून मला 

माझ्या स्मृतिमहालात जाऊन यायची

मुक्त मुभा हवीय !

 

दिवाळी अंक वर्ष

वाचने 42
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया