मग हरणार नाही हे नक्की!
असे अनेक लोक
भांडून गेले आयुष्यभर...
स्वप्नांच्या अल्याड राहणाऱ्यांना
भावलोच नाही कधीही,
आणि स्वप्नांच्या पल्याड राहणाऱ्या
लोकांच्या वसाहतीही हक्काच्या वाटत नव्हत्या.
खोल विहिरीतील काळा पाषाण
फुटून खळाळून वाहावा झरा आतला
तसा नेहमीच दाटलेला असायचा उमाळा…
उगाच गहिवरून आलेलं आभाळ
उतरावं डोळ्यात आणि तुर्येबाज
गवताने करावं सांत्वन,
हा व्यवहार मुळात आवडला नाही कधीही…
अगदी मायेच्या मोळ्यातली कफल्लकता
ठसठशीतपणे उठावदार वळणावर विसावली तरी..
आपल्या अश्रूंची फुले झेलण्यासाठी
एखादा सुकुमार तळवा धरावा कुणी
ह्या भ्रमात जगावं ही असोशी तर संपलेलीच होती कधीचीच.
तसं
उभं राहताच येतं जगाच्या बाजारात
कोणत्याही क्षणी, कोणत्याही युद्धात
कुणाच्याही विरुद्ध,
अगदी स्वतःच्यासुद्धा..
तेथे विजय मिळवला की हार व्हावी
अशी जागाच उरत नाही
पृथ्वीच्या कोणत्याही बिंदूवर..
किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा
मिसळपाव
प्रतिक्रिया