Skip to main content

कृबुचे कातीव इंद्रधनू

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
कृबुचे कातीव इंद्रधनू मग
दुरूनी म्हणाले, "ऐक!
मानवी प्रज्ञा, सृजन, भावना 
अर्थहीन, त्या टाक.
 
चित्र, शिल्प,संगीत या कला 
बटीक माझ्या झाल्या
'अद्भुत' माझ्या घरी पाणक्या
कुणि न विचारी त्याला.
 
मयासुराची मायानगरी 
फिकी पडे मजपुढती
माग मागणे कोणतेही, मी 
क्षणात करेन पूर्ती.
 
अमोघ ऐसी अस्त्रे माझी
तोडीन जुनाट साचे
संभाव्याच्या अब्ज छटांनी
रेखीन चित्र उद्याचे.
 
विचार कसला वृथा करिसी तू
मांडलीक बन माझा
कळसूत्रे तव माझ्या हाती
अनभिषिक्त मी राजा!"
 
रंग कृबुच्या इंद्रधनूचे
झरझर बदलत गेले
मोहक,ओजस अभिव्यक्तीचे
गारूड नकळत पडले
 
स्वीकारून मग दास्य कृबुचे 
स्वत्व गमावून बसलो
सोनपिंजरा स्वतः बनवुनी 
त्यातच बंदी झालो!
दिवाळी अंक वर्ष

वाचने 46
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया