एकदा माझं अन माझ्या पत्नीचं भांडण झालं. तुम्ही म्हणाल, आता यात नवीन ते काय?
पण अहो, आम्ही काही साधी माणसं नाही, तर यक्ष-यक्षिणी आहोत!
यक्षीण म्हणाली, “तुम्ही काय हो, खांदयावरचं उत्तरीय सावरत फुकट बोंबलत फिरता. आम्हा बायकांना सतराशे साठ कामं असतात. ते तुम्हाला काय कळणार?”
झालं! यक्ष असलो, तरी मीदेखील एक पुरुषच आहे. माझंही टाळकं सणकलं.
मी म्हणालो "अगं, तू इतकी सुंदर दिसतेस तरी पुन्हा साजशृंगार करत बसतेस. त्यात तुझा किती वेळ जातो, त्याचा विचार कर ना जरा. तुझ्या त्या सतराशे साठ कामात हेच वेळ खाणारं..”
झालं! तिचं डोकं फिरलं. पुढे बोलूच न देता ती म्हणाली, "तुम्ही येऊन-जाऊन या विषयावरच का बोलता? बाकीच्या यक्षिणींनी तुमच्या बायकोला गबाळी म्हणून नावं ठेवली, तर तुम्हाला चालेल का? बरं, हे सगळं साजशृंगाराचं साहित्य मला माझ्या आईने दिलंय, कळलं? त्याची तुम्हाला काही झळ पोहोचलीये? आणि ते अजागळ राहण्याची रीत ना तुमच्या खानदानाची आहे! अन मी अशी राहिले नाही ना, तर - तुम्ही इकडेतिकडे सुगंध घेत हिंडाल!"
हे मात्र अती होतं.
मग प्रकरण वाढतच गेलं. कडाक्याचं भांडण झालं.
पुढे ती म्हणाली, “अखिल विश्वात कुठेही गेलात, तरी हीच परिस्थिती असते बायकांची."
तिच्या तोंडाचा पट्टा थांबत नाही म्हणल्यावर एखादा नवरा जे करतो, तेच मी केलं. मी तिथून निघालो. कुठे जावं याचा विचार करत असताना मला असं वाटलं की जरा बदल म्हणून पृथ्वीतलावर जावं.
आणि माझ्या मस्तकात एकदम लक्ष दीप पेटले!
झालं तर. खाली जाऊन पृथ्वीवरचे नवरा-बायको काय करतात, कसे वागतात, कधी प्रेमाने वागतात अन कधी भांडतात, कसे भांडतात? याची जरा गंमत बघावी, असं मी ठरवलं.
आम्ही यक्ष म्हणजे कनिष्ठ देवता. आम्ही मायावी असतो, जादूगार असतो. आणि एवढंच नाही, तर खोडकरदेखील!
--------
मी पुण्यनगरीत पोहोचलो. डेक्कनवर.
अर्थातच, अदृश्य रूपात. हो ना. नाहीतर एखादी तरुणी घायाळ व्हायला कितीसा वेळ? यक्षांना देखणेपणाची देणगीच असते. आणि मी तर जरा.. अन - पत्नीची बत्तीशी खरी ठरायची. त्या तरुणीने एखादा छानसा सुगंध फवारलेला असेल, तर?.. हाहाहा!
रात्रीची वेळ. दिव्यांची झगमग अन लोकांची लगबग चालू होती. मस्त हवा होती. आल्हाददायक.
मला एक छानशी तरुणी दिसली. डौलात चालत जाणारी. कंबरेवर जीन्स अन पायात हिल्स. ती पृथ्वीवरची रंभा किंवा उर्वशी होती. पण हे सौंदर्य स्वर्गलोकापेक्षा वेगळं होतं. मी तिच्यामागे जाणार, पण लक्षात आलं की मला जोडपं हवं आहे.
आधी मला एक भांडणारं जोडपं दिसलं. कुठल्या हॉटेलमध्ये जायचं अन काय खायचं? यावरून त्यांचं चाललं होतं. नवऱ्याला खायचं होतं चायनीज, तर बायकोला थाई.
साध्या खाण्यात नवरा-बायकोचं जमत नाही, म्हणजे बघा. इतर आवडीनिवडीचा तर विषयच सोडा. अशा विजोड जोड्या देव का बनवतात? देवांनाच ठाऊक! हे देवपण ना. आमच्यापेक्षा भारी ना, मग अशा चुका का करतात? दिसायला नाही, तर वागायला साजेसे अशा पती-पत्नींच्या जोड्या का घडवत नाहीत?
च्या मातेला! मुहूर्तालाच भांडणारे नवरा-बायको! छे! अपशकुन! नवरा-बायको म्हणजे अजबच चीज असते. कशावरूनही भांडू शकतात, विद्वान कुठचे!
ती बाई नवऱ्याशी कचाकचा भांडत होती. मला एकदम माझ्या पत्नीची आठवण आली. ते जोडपं मला माझ्यासारखंच वाटलं. छे! यात काही नावीन्य नाही, मला वाटलं.
मी त्या बाईच्या नवऱ्याला तिच्या अंगावर ढकललं आणि बाईचा जोकरसारखा पलाझो खालून थोडासाच असा ओढला की तो तिच्या पायात आला अन ती धडपडलीच. यक्षीण भांडल्याचा राग तिच्यावर काढला. त्यावर "तू पाडलंस मला, तू पाडलंस?" म्हणत ती बाई नवऱ्याशी आणखीनच भांडू लागली.
पण मला भांडकुदळ जोडप्यांचा काही उपयोग नव्हता. जे जोडपं आनंदी वाटतंय, ते अगदी तस्संच, शेवटपर्यंत वागतंय का? न भांडता? ते पाहायला पाहिजे. पण जर भांडलेच नाहीत, तर? च्या मातेला! पण नाही! हे त्रिवार शक्य नाही. नवरा-बायको म्हणजे? झालंच. अगदीच जर भांडले नाहीत, तर त्यांच्यात भांडण लावून द्यावं का? अशा विचारात मी पडलो.
नाही, अशी वेळ येणार नाही. त्यासाठी त्यांच्या मागावर राहायला हवं. सतत. कदाचित.. कदाचित त्यांच्या शयनगृहापर्यंतदेखील जावं लागेल!
त्यासाठी मला आधी एक आनंदी जोडपं शोधावं लागणार होतं. त्याशिवाय मजा कशी ती येणार नव्हती.
एके ठिकाणी एक जोडपं भल्यामोठ्या मॉलमधून बाहेर येत होतं. बायको खुशीत होती. मनसोक्त, मनासारखं शॉपिंग झाल्यामुळे. सात-आठ वर्षांचा पोरगा व्हिडिओ गेम्स खेळायला मिळाल्याने, तर मनासारखं चापायला मिळाल्याने नवराही खूश होता. ते त्यांच्या कारमधून निघाले.
मी त्यांच्या कारमध्ये शिरलो. मागच्या सीटवर छोट्याशेजारी बसलो. पोरगं मोबाइल खेळत होतं. बायको खरेदीचं कौतुक सांगत होती आणि नवरा ते कौतुकाने ऐकत होता.
नवरा तुकतुकीत कांतीचा, थोडंसं पोट सुटलेला असा होता. त्याची बायको मात्र खरंच सुंदर होती. गोड चेहऱ्याची. केस कापलेले अन सरळ ठेवलेले. मस्त लिंबू रंगाची, नाजूक नक्षीची साडी नेसलेली.
हे आदर्श जोडपं आहे परीक्षा घेण्यासाठी! इतकं आनंदी!.. मग हे कधी भांडतील? पाहू या. मी मनात म्हणालो.
----
आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. घर छान होतं. आभाची आवडनिवड छान होती. तिने घर उत्तमरीत्या सजवलं होतं. ती एक सुगृहिणी होती, यात काही शंकाच नव्हती.
मी त्यांच्या घरात फिरलो. त्यांच्या शयनगृहामध्ये पोहोचलो. द्विमंचक पाहून तेच शयनगृह आहे हे मला कळलं. मग काय, बसलो तिथेच वरच्या छोट्याशा झुंबरावर. त्याच्या नक्षीदार आकारासारखा आकार धारण करून. खाली वाकून पाहत.
अजून तरी काही बिनसलं नव्हतं. कदाचित, लगेच असं काही होत नसावं. म्हणजे मला वाट पाहावी लागणार होती. नाहीतर.. दुसरं जोडपं. अर्थात माझी थांबण्याची तयारी होतीच. यक्षिणीची ओढ मला असह्य होईपर्यंत.
तो छोट्या आरव आता गाढ झोपला होता. आलोकही आडवा झाला होता. दिवसभराच्या कामाने अन दाबून जेवल्याने तोही सुस्तावला होता. आभाने आवरलं. ती बेडरूममध्ये आली.
तिने नुकताच खरेदी केलेला डिझायनर गाउन हातात घेतला घातला. टू पीस. शुभ्र पांढरा. आधीचा साधा गाउन काढायला सुरुवात केली - आणि - आणि काय शहाण्यांनो? मी गपकन डोळे मिटले. एकतर स्त्री अन त्यातून सुंदर! तरी - माझ्या यक्षिणीची सर नव्हतीच म्हणा.
आता ते काही बोलले तर ठीक, नाहीतर मलाही निद्रादेवीची आराधना करावी लागणार होती. अन बोलले नाहीत तर? न बोलताच... नको - ते जाऊ दे!
यौनभाषा ही खरी मौनभाषा!
आभाने आलोकला जवळ ओढलं. मी गपकन डोळे मिटले.
च्या मातेला! हे तर म्हणजे - शब्दावाचून कळले सारे. तोंडाची वाफ दवडायची गरजच नाही. थेट कृती! अन जरा लवकरच. पण मी एक यक्ष आहे, सभ्य यक्ष! मानव नाही.
"का रे असं करतोस?" या आभाच्या दुखावलेल्या स्वरांनी मी पुन्हा डोळे उघडले. "मूड नाही का?"
"नाही गं. आज दिवसभर खूप कामात गेला. आता खाणं जास्त झालं. त्यामुळे झोपावंसं वाटतंय." आलोक म्हणाला.
"तू आजकाल नेहमीच असं करतोस. आज माझा कित्ती मूड! माझ्याकडे पाहिलंस तर कळेल ना!"
त्याने डोळे किलकिले करून पाहिलं. त्याला अर्थातच काही कळलं नाही, तिने नवा गाउन घातला आहे म्हणून. लक्षातच आलं नाही त्याच्या. बिचारा!
"तुला ना, माझं काही कौतुकच नाही!" ती म्हणाली.
तो वैतागला. तिच्या स्वरावरून त्याला कळलं की आता आहे सरबत्ती! झोपेची वाट!
तरी तो गप्प बसला.
"तुझा ना - माझ्यातला इंटरेस्टच संपलाय!" ती पुढे बोचऱ्या स्वरात म्हणाली.
मग त्याचा स्वर बदलला आणि तो बकतच सुटला, "आभा, तुला माहितीये ना. माझं प्रमोशन झाल्यापासून माझं काम खूप वाढलंय. तुझं बरंय गं! दिवसभर घरी असतेस. खायचं-प्यायचं, आराम करायचा, आईशी तासतासभर मोबाइलवर बोलायचं, मालिका पाहायच्या - प्रीत जाण की सख्या रे अन वात आण पक्या रे! पकाऊ, फॅशनची मासिकं चाळायची, व्हॉट्सॲप आहेच जोडीला अन नेटवरच्या रेसिपी गोडीला. मला कामाचा काय ताण असतो, माहितीये तुला?"
"तुला माहितीये, मला किती कामं असतात ते?" आभा म्हणाली. "एखाद्याने किती कौतुक केलं असतं, इतका सेक्सी गाउन घातल्याचं." ती गाउनचा वरचा भाग एखाद्या परीच्या पंखासारखा मागेपुढे हलवत म्हणाली.
“अगं, पण अस्सा गाउन घालण्यात मजा आहे की काढण्यात?" आलोक म्हणाला.
"हं! मी तेच म्हणतीये... काढण्यातच मजा आहे!" असं म्हणत तिने गाउनचा तो वरचा प्लेन भाग काढला. आतमध्ये पांढऱ्याच रंगाचा, पण छोट्या फुलांची नक्षी असलेला स्लीव्हलेस गाउन होता. पण अर्ध्या मिटलेल्या नेत्रांच्या आलोकवर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही.
मग ती तावातावाने गेली अन जुना गाउन घेऊन आली. मी पुन्हा डोळे मिटले. तिने तो जुनाच गाउन घातला. नवीन गाउन तर चोळाबोळा करत तिने त्याच्याच अंगावर फेकला. रागाने! त्याने तो नवीन - अगदी नवीन गाउन पांघरुणासारखा गुंडाळून घेतला, एकदा त्या नवीन कापडाचा त्याने वास घेतला. कूस बदलली आणि घोरायला लागलादेखील.
तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती भिंतीकडे तोंड करून झोपली. हवेत आता गारवा होता, तरी तिने फॅनचा वेग वाढवला. पण तिला झोप काही लागली नाही.
मलाही झोप काही येईना अन आलोकचं ते वागणं काही कळेना. पण एक आनंदी वाटणारं जोडपं भांडलं होतं, रुसलं होतं. मला हेच तर हवं होतं. मनात म्हणालो, अब आयेगा मजा!
च्या मातेला! अशी सोनेरी संधी तर मी सोडलीच नसती. माझ्या डोळ्यांसमोर स्वतःहोऊन रंगात येणारी माझी यक्षीण आली. पण असो. तुम्ही ना.. चावटच आहात! लगेच तुमचं अंतर्ज्ञान माझ्यापेक्षा जास्त पळायला लागलं असेल.
माणसाने निखळ आनंद सोडलाय आणि तो विकृतीचा आनंद लुटायला लागलाय .
----------
मी थोडंसं अंतर्ज्ञानाला कामाला लावलं - खरं तर आभाही शिकलेली. पण नोकरी करायची नाही, असं आलोकचं मत होतं. बरं, आलोकला लठ्ठ पगाराची नोकरी होती, त्यामुळे आभाने नोकरी करावीच, अशी काही गरज नव्हती. पण अलीकडे आलोकच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या.
आजकाल हे असं आहे. जास्त पैसे, जास्त जबाबदारी! त्यामुळे जास्त मानसिक ताण. मग असे प्रसंग घडतात. खरं तर दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम, दोघेही एकमेकांशी जुळवून घेतात. पण कामाच्या ताणाने असं होतंच. पण याचा अर्थ आभा कामात नसतेच, असा आहे? बिचारी! सकाळी उठल्यापासून धावपळ करत असते. एक भांड्याला लावलेली बाई सोडली, तर सगळी कामं स्वतःच करते. एकूण एक आणि व्यवस्थित. घरकाम करणं हा फुलटाइम जॉबच आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत न संपणारा.
आलोकला हे माहीत नाही. मग काय करावं बरं?
मला दुखावलेल्या आभाची कणव आली. अन - त्या आलोकचा राग आला. तुम्ही पुन्हा म्हणाल, बाई म्हणून लगेच कणव आली. तुम्ही ना बुवा अगदीच माझ्या पत्नीसारखाच विचार करता! पण तसं नाही. तिचा मूड घालवला म्हणजे आलोक तिचा अपराधी आहेच.
आभा खरंच एक गोड पोरगी होती!
माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.
---
सकाळ झाली. आलोकला जाग आली. त्याने रोजच्या सवयीप्रमाणे डोक्यावरून हात फिरवला. आताशा त्याच्या डोक्यावरचे केस विरळ व्हायला लागले होते. पण त्याच्या हाताला दाट केस लागले. त्याचा हात मानेपर्यंत खाली उतरला. केसच केस. मानेवरही केस.. म्हणजे? आभा?.. रात्रीचा राग काढत्ये की काय? गळ्यात गळा घालून.
पण त्याने डोळे उघडले आणि तो शहारलाच. त्याच्या अंगावर आभाचा गाउन होता. जुना. तो धडपडत उठला. पलीकडे आलोक झोपलेला होता. नवीन गाउन गुंडाळून. म्हणजे? डबल रोल?
आलोक आरशापाशी गेला आणि त्याच्या पायातलं त्राणच गेलं. तो नखशिखांत ‘आभा' होता. आभाआलोक!
स्वतःचं शरीर आणि त्याच्यावरची ती नवीन वळणं वळणं पाहून तर त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याने डोळेही चोळले आणि.. गाउन तर त्याने उचलून फराफरा डाव्या-उजव्या बाजूला नाचवूनही पाहिला.
मग तो "शी बाई!" असं म्हणाला. अन बापरे! हे तर तो अगदी बायकांच्या स्टाइलमध्ये, तस्से लाडिक हातवारे करत म्हणाला. आता त्याने पुन्हा डोक्याला हात लावला आणि तो चुकून पुन्हा "शी बाई!" असं म्हणाला.
तो मनाने पुरुष होता, पण शरीराने बाई झाला होता.
तो आभाच्या शरीरात गेला होता. म्हणजे त्याचं मन, त्याच्या जाणिवा तशाच राहिल्या होत्या; पण शरीर? ते मात्र आभाचं होतं.
मी त्याचं केलं होतं असं - त्याच्या मनाचा अंश आलोकच्या शरीरातही होता अन एक अंश आभाच्या शरीरात. तर आभाचं मन मात्र मी बंद करून टाकलं होतं.
तिच्या सर्व मानसिक जाणिवा मी बंद केल्या होत्या. आता आलोकच्या मनाचा तो अंश आभाचं आयुष्य जगणार होता. तिचं शरीर, तिचं मन, तिच्या पूर्ण अस्तित्वाचा अगदी अणू अन रेणू. तिचं सुखदुःख, तिच्या सर्व जाणिवा, तिचे मूड्स अन मूड स्विंगस्, हे सगळं अनुभवणार होता.
सुरुवात तर चांगली झाली होती. अब आयेगा मजा! मी मनात म्हटलं.
आता बेट्याला कळणार होतं - एका स्त्रीचं आयुष्य काय असतं ते! तिची जाणीव - तिची उणीव!
तो आभाआलोक झाला होता. मी म्हटलं, हे बरंय! कारण बायकांच्या जातीला काय भोगावं लागतं, ते कळेल यक्षीण काय म्हणते ते! वर, ते स्वतः सहन न करता, आलोकला नुसतं पाहून मला कळणार होतं.
गोमय उडताना तर पाहायचं, पण स्वतःचा पाय न भरवता!
त्याने ओरडून आलोकला जागं केलं. मी वरून त्याची गंमत पाहात होतो.
आलोक जागा झाला. आभाआलोकने काय झालंय हे सांगायचा प्रयत्न केला. सगळंच उघड झालं असतं. मी त्याचा आवाजच बंद केला. त्याच्या घशातून नुसतीच हवा बाहेर पडली. त्याला कळेना, असं काय होतंय. त्याने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा नुसतीच हवा बाहेर फेकली गेली.
“अगं, असं काय करतेस?” आलोकने विचारलं.
“काही नाही, उठा. ऑफिसला उशीर होईल. मी चहा ठेवते,” आभाआलोक म्हणाला. हे वाक्य त्याच्या तोंडातून व्यवस्थित बाहेर पडलं, तेही आभाच्या आवाजात.
आलोकच्या लक्षात आलं. तो आभा झाला होता. आभाआलोक! तो आभाच्या आवाजात बोलू शकत होता. पण झालेल्या बदलाचं मात्र तो कोणाला सांगू शकत नव्हता. त्याच वेळी दुसरा आलोक मात्र फक्त आलोकच होता.
च्या आयला! हे काय झेंगट मागे लागलंय, त्याला वाटलं. अन केलंय कोणी? - तो विचारात पडला.
च्या मातेला - मजा! मला वाटलं. पण मी ठरवलं होतं की फार ताणायला नको. काही घटिकांची गंमत पुरे.
माझा हा मायावीपणा मला जाम आवडला. खरं तर मला असं वाटलं की ही गंमत पाहण्यासाठी यक्षिणीला बोलवावं. पण जाऊ दे. ती मला काही निवांतपणे ही गंमत अनुभवू देणार नाही.. मला वाटलं.
‘आलिया भोगासी' म्हणत आभाआलोकने आवरायला सुरुवात केली. त्याने गिझर चालू केला. पेपरवाला आला. आलोकने पेपर घेतला. तो निवांतपणे चहा पीत, पेपर वाचत बसला. आभाआलोकची घाई, डबा करायची अन आलोक मध्ये मध्ये तिला पेपरमधल्या बातम्या सांगत होता - संसारात लुडबुड करते म्हणून जावयाने सासूला हाणले वगैरे.
पण ती बातमी मला जाम आवडली.
पेपर वाचून झाल्यावर, ‘उशीर झाला’ म्हणून तो कोकलत अंघोळीला गेला.
बाथरूममध्ये गेल्यावर आलोक आतूनच ओरडला, “आभा, माझे कपडे..”
ही आलोकची रोजचीच सवय होती. त्याच वेळी बेल वाजली. दूधवाला आला होता. शुद्ध पाहिजे, भेसळ नको म्हणून ते अलीकडे गवळ्याचं महागाचं दूध घेत होते.
आभाआलोकची धांदल उडाली. त्याने टॉवेल आणि अंतर्वस्त्र आणलं.
पुन्हा बेल वाजली. मग आभाआलोक बाथरूम सोडून दरवाजात गेला. त्याने टॉवेल खांदयावर टाकला, दार उघडलं आणि आलोकची इनर चुकून दूधवाल्यापुढे केली. भांडं धरावं तशी त्याने ती इनर दोन बाजूंनी धरली होती. भैया बिचारा बुचकळ्यात पडला.
“बहेनजी, यामंदी दूध कैसे देणार? हेलातर बीचमंदी होल है. पूरा दूध खाली पडून जाएल!”
“तो क्या? तुम दूध डालो ना, तैसे तर इस्को खालच्या बाजूलाही दोन होल है ना!” तो पार गोंधळून म्हणाला.
“अरे, बहेनजी, दूध नीचे गिर जायेगा ना!" भैया म्हणाला.
“अरे, ऐसे है क्या?" असं म्हणत आभाआलोकने जीभ चावली.
भैय्या बधिर! त्याला कळेना, या सरळ बाईला आज हा चावटपणा काय सुचलाय म्हणून. आभाआलोकने नंतर आणलेलं भांडं त्याने गुपचुप घेतलं, दूध दिलं आणि तो गेला.
मग आभाआलोक बाथरूमकडे गेला. आलोकने दार जरासं किलकिलं केलं आणि कपडे घेतले. बाथरूममध्ये असलेल्या आलोकला आभाच्या शरीरातून पाहताना त्याला गंमत वाटली आणि थोडीशी लाजदेखील! अन आश्चर्यदेखील! स्वतःला पाहून त्यालाच ते वाटलं - की आभासारख्या सुंदर पोरीला आपण कसे काय आवडले असू? पोटसुट्या कुठचा!
नशीब! आलोकला घाई होती. नाहीतर त्याने ओढलं असतं आत. म्हणजे पंचाईतच की!
आभाआलोक स्वयंपाकघरात शिरला. भाजी नव्हती. आरवची बिस्किटं नव्हती. काल हॉटेलमध्ये गेल्याने ही कामं राहून गेली होती. जाता जाता वाटेत ही कामं सहज होण्यासारखी होती. पण आलोकच म्हणाला होता, ‘राहू दे. चांगल्या हॉटेलमध्ये जाताना आतून भाजी डोकावणारी पिशवी घेऊन जायची का?’
आता कारमध्ये ती पिशवी टाकल्यावर कोणाला दिसणार होती? पण तरी आभा काही बोलली नव्हती. तिनेही कंटाळा केला होता. पण त्याच्यामुळे अडणार होतं खरं.
आभाआलोकला पहिल्यांदा या अवतारात अवघडल्यासारखं वाटलं. तरीही हा चमत्कारिकपणा त्याला अनुभवावा वाटला. फक्त कंबरेखालचा भाग रोजच्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या तुलनेत जाड वाटत असल्याने त्याला नेहमीच्या चालीने चालणं जमत नव्हतं.
हा ते कॅटवॉक का काय म्हणतात ते - पण हे तर 'फॅटवॉक' वाटत होतं बिचाऱ्याला.
आलोक पूर्णपणे आभाच्या शरीरात विरघळून गेला होता. पण त्याच्या मनाची सत्ता मात्र तिच्या शरीरावर नव्हती. त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट अगदी सहीनसही आभासारखी करत होता. रोजची कामं आभा ज्या पद्धतीने व क्रमाने करते, त्या क्रमानेच तोही करत होता. पण मध्येच त्याचं मूळ मन उसळी मारून वर येत होतं .
आलोकला साधा चहा करता येत नसे. पण आता आभाआलोक सराईतपणे भाजी करत होता. आता भाजी नसल्याने त्याने बटाट्याची भाजी करायला घेतली होती. आलोकला न आवडणारी. भाजी झाल्यावर त्याने उपमा करायला घेतला.
आलोक शर्ट-पॅन्ट चढवत होता. त्यानंतर त्याने बूट काढले. बुटातून मोजे बाहेर काढले. मोज्यांना वास येत होता. ते त्याने बोळा करून बाथरूममध्ये फेकले. ही आलोकची खास सवय. आदल्या दिवसाचाही जोड त्यामुळे बाथरूममध्ये असाच कुठेतरी पडला होता. आज घालायला मोजेच नव्हते, कारण कालचा जोड पाण्यातून काढायला आभा विसरली होती. आभाआलोकने निमूटपणे कपाटातून मोज्यांचा नवीन जोड काढला आणि आलोकपुढे धरला.
आलोक घाईघाईने आवरत होता. ऑफिसची बॅग, डबा, पाकीट, गाडीच्या किल्ल्या, सुटे पैसे. एकीकडे उपमा खात होता. दुसरीकडे वाढलेल्या पोटावरचा पट्टा आवळत होता.
झुंबरावर एका अवस्थेत बसून माझा झुंबरलाल झाला होता - म्हणजे माझी झुंबरं लाल झाली होती. मला रग लागली होती. मी माझा आकार पूर्ववत केला. खाली उतरलो.
ही माणसं खातात तरी काय, हे पाहायला मी किचनमध्ये शिरलो. हाणला मग तो उपमा की काय तो. किसलेलं खोबरं चांगलं भुरभुरून. वर शेव, कोथिंबीर, लिंबू. अर्थात गुपचुप. अहा! काय चवदार होता. आभाच्या हाताला चव होती. सुग्रण खरी. आता तो तिला काही खायला मिळणार नव्हता. पण राहिलेल्या उपम्याची आठवणही आभाआलोकला राहणार नव्हती. ते माझं काम.
आभाआलोकने भाजीत मीठ घातलेलं नव्हतं. सराईतपणा असला, तरी बायकांच्या हातून मीठ बऱ्याचदा विसरतं. मी अगदी व्यवस्थित मीठ मिसळलं. पण फक्त डब्यातल्या भाजीतच.
आलोक ऑफिसला पळाला.
मग आभाआलोकला आठवलं - त्याने भाजीत मीठच घातलेलं नव्हतं. त्याने भाजी चाखून पाहिली. ..अळणी! त्याने जीभ चावली. भाजीत मीठ नसलं की त्याला स्वतःला येणारा राग आठवला. बटाट्याची भाजी, त्यातून अळणी, त्याने भाजीत मीठ घातलं. आता आलोक चिडणार होता खरा. त्याला क्षणभर काही सुचेना.
तो सोफ्यावर बसला. अस्वस्थपणे पाय हलवत.
च्या आयला! हे काय होऊन बसलंय भलतंच? त्याला वाटलं.
आधी तो निराश झाला. पण परत त्याला वाटलं, जसा हा बदल आपोआप झाला, तसंच पुन्हा पहिल्यासारखं होईल. का होणार नाही? नक्की होईल. त्याचं मन आशावादी झालं.
अर्थात, मीही तसं करणारच होतो. त्याला अद्दल घडली की तेवढं पुरेसं होतं.
तो सोफ्यावरून उठला. त्याला वाटलं, कामाला लागावं. जे आहे त्याला तोंड तर देऊ या. आणि - आभा असण्याची वेगळीच मजा आहे, जोपर्यत असे आहोत, त्याचीही मजा घेऊ या. थ्रिल!
आभाआलोकने आरवला उठवलं. तो उठायलाच तयार नव्हता. त्याचं आवरलं. त्याला दूध दिलं. त्याला बिस्किटं हवी होती. ती संपलेली होती. पण दुसरी होती. आलोकला आवडणारी. तो रडायला लागला. संध्याकाळी आणू असं सांगून आभाआलोकने कशीबशी त्याची समजूत घातली. त्याला दूध-बिस्किटं दिली.
मूळ आभा कित्ती गोड पोरगी. तिला पोराची जेवढी काळजी, तेवढीच नवऱ्याची.
मग आरवच्या अंघोळीचा कार्यक्रम होता. बापरे! त्याने नुसता धुमाकूळ घातला. त्याला पाण्यात खेळायला आवडायचं. त्या बाबतीत तो बापावर गेला होता. आभाआलोक अर्धा भिजला. नंतर तर आरवने हळूच, आभाआलोकचं लक्ष नसताना शॉवर सोडला. आभाआलोक तर मग पूर्ण भिजला. आभाआलोकला राग आला. त्याने आरवला धपाटा ठेवून दिला. तो रडायला लागला. त्याची समजूत घालता घालता पुरेवाट झाली.
आरव म्हणाला, “आपण पावसाळ्यात ट्रिपला गेलो होतो, तेव्हा तुम्ही दोघे जण धबधब्यात कसे पाणी खेळत होता. कसे भिजत होता. हां? बाबा तर म्हणाले की तुला जास्त ऊत आलाय म्हणून! आणि मी खेळलो तर तू मला मारतेस? बाबा तुझ्याशी पाणी खेळले तर तुला ते चालतं. हे बरंय!" तो भोकाड पसरून बसला. त्याची समजूत घालताना त्याचं डोकं फिरलं.
नंतर आभाआलोक स्वतः अंघोळीला गेला.
कपडे काढल्यावर त्याला आभाच्या शरीराकडे पाहून छान वाटलं की अशी सुंदर बायको आपल्याला लाभली आहे म्हणून.
साबण लावताना त्याला उगाच वाटलं की .. आलोकपेक्षा वेळही जास्त लागतोय अन साबणही. साबण लावताना मध्येच त्याला गंमत वाटत होती, तर एकदा लाज. अंगाला साबण लावून झाला, तोंडाला साबण लावून झाला, त्याच वेळी पाणी गेलं. त्यात डोळ्यात साबण गेलेला. च्या आयला!
मग बादलीत असलेल्या, थोड्या उरलेल्या पाण्यात त्याने आधी डोळे धुतले आणि अंघोळ उरकली.
कपडे घालताना त्याला ब्राचा हुक लवकर लावता येईना. कशा लावतात या बायका? असं म्हणत त्याने बायकांना हात जोडले. त्यामुळे झालं असं की ती ब्रा पडली खाली अन झाली ओली. च्या मारी! आता आली का पंचाईत? मग तो टॉवेल गुंडाळून तसाच बाहेर निघाला. मोकळंमोकळं फीलिंग अनुभवत. खट्याळ हसत.
‘जाऊ दे साला! घालायलाच नको' असं तो मनाशी म्हणाला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की हे पुरुषांच्या बनियनसारखं काम नाहीये - की नाही घातला तरी चालतंय. मग तो गप बाहेर आला. त्याने कपाटातून एक नवीनच ब्रा काढून घातली.
सवयीचं नसल्याने त्याला क्षणभर जीव कोंडल्यासारखं वाटलं ..बाईच्या आयुष्यासारखं!
त्याने स्ट्रॅपमध्ये दोन्ही बाजूंना अंगठे अडकवले आणि तो त्यांच्याशी आलटून पालटून खेळू लागला, लहान पोरासारखं तो ते ताणू लागला. तालात. मग मध्येच त्याने जीभ चावली. तो खजिल झाला आणि पुन्हा कामाला लागला.
टाकीचं पाणी संपलं होतं आणि आता दिवसभर ते येणारही नव्हतं. कॉर्पोरेशनचं पाणी आज बंद होतं.
या सगळ्या सूचना पेपरमध्ये येतात. पण बहुतांश बायका त्या वाचत नाहीत. बऱ्याचश्या बायकांना घरकामामुळे व दुपारच्या टीव्हीच्या खास बायकांसाठी असलेल्या कटकारस्थानी मालिकांमुळे वाचायला वेळ मिळत नाही. अन व्हॉट्सॲप - तेही राहिलं होतं.
बिल्डिंगमध्ये चालेल्या आरडाओरड्यामुळे आभाआलोकला पाण्याची परिस्थिती कळली. त्याने कपाळावर हात मारून घेतला. तो बाथरूममधून बाहेर आला. पाण्याचं सगळं काम त्याने तसंच ठेवलं.
आरवला निबंध लिहून हवा होता. गणितं सोडवून हवी होती. आभाआलोकने आधी निबंध लिहिला. त्याच वेळी आरवने इतकं डोकं खाल्लं की नंतर त्याला गणितं सोडवता येईनात.
आभाआलोक म्हणाला, “किती रे त्रास देतोस? बाबांना का विचारत नाहीस मग?”
“बाबांना अभ्यास घेता येत नाही.”
“कशावरून?”
“मला हे अनिकेतने सांगितलं. त्याची आई म्हणते, मुलांचा अभ्यास फक्त आईलाच घेता येतो. बाबांचा काही उपयोग नसतो.”
“अनिकेतच्या आईला भेटायला पाहिजे.”
“खरंच आई, तू भेटायला पाहिजेस तिला, ती इतकी मस्त आहे. ती अनिकेतला काय पाहिजे ते देते. लगेच देते. खाऊ, खेळ, कपडे, सगळं पटापट. तुझ्यासारखी ती आखडत नाही!”
आभाआलोकला आधी तर राग आला, पण त्याने त्या अन्याच्या आईला पाहायचं मात्र ठरवून टाकलं.
च्या मातेला! मी खिदळलोच. पण त्या दोघांना आवाज जाऊ दिला नाही.
तेवढ्यात व्हॉट्सॲपवर कामवाल्या बाईचा निरोप आला - आजारी असल्याने दोन दिवस येणार नाही म्हणून. आभाआलोकच्या पायाखालची जमीनच सरकली.
यावर कडी म्हणजे आरव म्हणाला, "मी आज शाळेत जात नाही.”
“का रे?”
“आज रिक्षावाले काका येणार नाहीत.”
“येणार नाहीत?" आभाआलोक मोठ्याने ओरडला आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. शाळेतल्या मुलांची रिक्षातून वाहतूक करण्याच्या प्रश्नावर सगळे रिक्षावाले काका आज संपावर होते. काल आरवने हा निरोप दिला होता. पण गडबडीत आभा तो विसरली होती.
"च्या आयला!" तो न राहवून उद्गारला.
"आई, काय हे बाबांसारखं? बॅड मॅनर्स!" आरव म्हणाला.
आता आरवला शाळेत सोडणं भाग होतं. आभाआलोकने त्याला आवडणारी चिंतामणी कलरची आभाची साडी कपाटातून काढली. त्या साडीच्या स्पर्शाने तो रोमांचित झाला. मग परकर. तो मॅचिंग परकर सापडेचना. पण बेट्या सापडला एकदाचा. डोक्याला वैताग! नाहीतर काय? साडी नेसायची म्हणजे परकर पाहिजे, पुन्हा तो मॅचिंग पाहिजे. त्याने नाडी न बांधताच पुन्हा बायकांना हात जोडले आणि त्यामुळे परकर ढिशक्यांव.. पडला खाली. पण खरी गंमत पुढे होती. त्याला साडी नेसताच येईना. बायकांना साडी का आवडते अन त्या ती कशी नेसतात? राम जाणे! त्याला वाटलं.
मग ह्याच्या आयला - त्याच्या आयला! असं करत, मनात म्हणत त्याने कशीतरी साडी गुंडाळली. चार वेळा सोडली. निऱ्या तर जमेचनात.
“च्या आयला!” आरव म्हणाला, “अगं आई, आज साडी काहीतरी विचित्रच दिसतीये."
“आं? आरव, काय हे?" तो म्हणाला, “असं बोलतात - च्या आयला?"
“मग काय आई, तू का बाबांसारखं बोलतेस असं?"
“बरं बरं, नाही बोलणार."
मग मी त्याच्या मदतीला गेलो. अश्शी साडी नेसली गेली की बस! पुरुषच काय, बायकाही वळून पाहतील असा त्याचा आकार झाला होता. ते तुम्ही फिगर का काय म्हणता ते.
पण माझं हे काम त्याला कळलं नाही.
माझी बायको म्हणते की मी नुसता उत्तरीय सावरत गावभर फिरत असतो, ते काही खरं नाही. ती आता इथे असती, तर तिला कळली असती माझी करामत! पर्सनल ग्रूमिंग एक्स्पर्ट वगैरे. पण जाऊ दे. ती नाहीये तेच बरंय. नाहीतर तीच आभाची साडी माझ्या गळ्याला गुंडाळून तिने आवळली असती.
चापूनचोपून नेसली गेली होती साडी. आरशात पाहून आभाआलोक स्वतःवरच खूश झाला. तो छान दिसत होता. त्याने गालावरून हात फिरवला. मऊ मऊ सायीसारखे गाल. दाढीची कटकट नाही. तो शीळ वाजवू लागला.
आरवने डोळे विस्फारले. “आई, तू बाबांसारखी शिट्टी का वाजवतेस? च्या आयला!”
आभाआलोकने डोळे मोठे करून आरवकडे पाहिलं. पोरगं ना! आता सारखंच च्या आयला करायला लागलंय.
संकटं काही कमी नव्हती. आभाची टू व्हीलर नेमकी बंद पडली होती. ती काही केल्या चालू होईना. आता चालत जावं लागणार होतं. तशी आरवची शाळा जवळ होती. आभाआलोकने त्याला चालत चालत शाळेत सोडलं. चालायची सवय राहिली नव्हती...
त्यात रस्त्यात वळून पाहणाऱ्या बायका अन पुरुष. त्यांच्या नजरा. नकोशा. बायकांच्या जळक्या अन पुरुषांच्या विचित्र. आभाआलोकला तर त्या नकोच व्हायला लागल्या. त्याला कुठून याची सवय?
त्यात खालच्या भागाचा जडपणा. भरभर चालणं जमेना अन चाल बदललेली. त्याला तो शब्दच आठवेना. मग मी त्याच्या मनाला आठवण करून दिली - गजगामिनी!
तो परत आला. त्याने कुलूप उघडलं. दरवाज्यातून पाऊल आत टाकतोय न् टाकतोय, तोच समोरची दिशा पाण्याचं विचारायला आली.
आभाआलोक खूश झाला. आभा होण्याचा हा फायदा त्याच्या डोक्यातही आला नव्हता. कारण त्याला दिशा आवडायची. दिसेल तेव्हा तो तिच्याकडे पाहत असायचा. आभाने त्याला बऱ्याचदा हटकलंही होतं.
प्रत्येकाला शेजाऱ्याचीच बायको सुंदर वाटते!
तीही एखाद्या मालिकेतील हिरॉइनसारखीच होती दिसायला. सुंदर चेहऱ्याची. गोरीपान आणि फॅशनच्या बाबतीत तर अख्ख्या बिल्डिंगमधल्या बायका तिच्यावर जळायच्या. नवीनच तर लग्न झालेलं तिचं.
तशी दिशा खूपदा दिसायचीही नाही. तो दिवसभर कामाला जायचा. दिशा दिसणार तरी कधी? फ्लॅट संस्कृतीमध्ये प्रत्येक जण बंद दरवाजाआड दडलेला!
तर दिशा चक्क त्याच्या घरात! त्याला काय करू न काय नको असं झालं. पण सध्या तरी फक्त बोलण्यावरच भागवावं लागणार होतं.
दिशाचं पिण्याचं पाणी संपलं होतं. ती घरात आली आणि तिला एकदम चक्करच आली. ती आभाआलोकच्या गळ्यातच पडली. तो गडबडलाच. पण त्याने एकदा स्वतःच्या शरीराकडे पाहिलं आणि तो सावरला. या अवतारात - काही हरकत नव्हती…
दिशा अतिशय आकर्षक होती, सुंदर होती, जवळून पाहताना त्याला ती आणखीनच सुंदर भासली. तिच्या अंगाला आफ्टरशेव्हचा वास येत होता. च्या मायला! हिच्या अंगाला हा वास कसा? मग त्याची पेटली.. तिचा नवरा ते लावत असणार आणि जाताना.. आं आं..
त्याने तिला धरलं. दिवाणावर आणून झोपवलं. आपल्या मिठीत दिशा आहे या विचाराने त्याला क्षणभर आनंद झाला आणि नंतर घाम फुटला.. कोणी पाहिलं तर?
छे! आतातरी शंका घ्यायला काही जागाच नाही!
दिशा आपल्या गळ्यात कशाला पडेल? तिला काय माहीत आपली ‘अंदर की बात..’ पण त्या क्षणाला त्याला तरी कुठे माहीत होती तिची ‘अंदर की बात!'
तो विचार करत होता, “आपल्याला फक्त जवळ बसायचं होतं, पाहायचं होतं, बोलायचं होतं, इथे तर ही गळ्यातच पडली. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!
पण दिशा एकच नव्हती. देवाने दिल्यामुळेच ‘दोन’ होती! दिशा प्रेग्नन्ट होती.
त्याने विचारलं, “दिशा, काय होतंय तुला?”
“चक्कर येतीये...”
त्याची एकदम पेटली, “गोड गुपित का? अं?”
दिशा लाजली, फिकटसं हसली. त्याने तिला नीट बसवलं. पाणी दिलं.
मग तिने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, "माझी पहिलीच वेळ. मला बघायला, समजावून सांगायला, सांभाळून घ्यायला कोणीच नाही. इथे मी आणि मिस्टर दोघेच जण. ते दिवसभर कामाला जातात, मग तर मी अगदी एकटीच.”
त्याने तिला जवळ घेतलं. पाठीवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातलं पाणीही नाजूकपणे टिपलं आणि सांगितलं, “तुला काहीही त्रास झाला तर मला सांग. संकोच करू नकोस. मी आहे ना!”
त्याने हंडाभर पिण्याचं पाणी तिला दिलं. दिशा गेली. जाण्यापूर्वी तो तिला सांगायला विसरला नव्हता - "नवऱ्याला जरा लांबच ठेव, बरं का दिशा."
तिच्या नवऱ्यावर सूड उगवल्याचं तेवढंच समाधान!
तिने आश्चर्याने डोळे विस्फारले.
“तो आफ्टर शेव्हचा वास येतोय ना.." तो म्हणाला.
ती लाजली. गोड लाजली. तिचं गुपित आभाला कळलं होतं ना.
“त्यांनी नाही. मीच लावलंय ते. मला.. मला ते लोशन लावावंसं वाटतं."
‘ओह! मग माझं देऊ का लावायला?' असं तो मनात म्हणाला.
मग तो तिला पुढे म्हणाला, “हं! होतं असं या दिवसात."
ती गेल्यावर त्याला वाटलं, दिशाने अजून ही गोष्ट कोणाला सांगितलेली दिसत नाही. नवऱ्याला तरी सांगितलीये की नाही, कोणास ठाऊक? काय बायका असतात.. खरंच! पण स्वतःकडे पाहिल्यावर, आता स्वतः बाई असल्याने तो खजिल झाला.
आपल्याला बिल्डिंगमधलं एक फार मोठं गुपित कळलं, याचा त्याला आनंद झाला.
आभाच्या आधी हे गुपित त्याला कळलं होतं. आणि हे तो तिला सांगणार होता. अर्थात मूळ रूपात गेल्यावर. तिला हे इतर बायकांच्या आधी कळणार होतं. आणि इतरांच्या आधी आपल्याला एखादं गुपित कळलंय, हे इतर बायकांना सांगताना बायका काय खूश होतात!
पण हे आपल्याला कसं कळलं, असं तिने विचारलं तर? काय सांगणार तिला? तो घाबरला. पुन्हा ती विचारायची, तुला कसं माहीत? तिचा लॅब रिपोर्ट आणायला तू गेला होतास? आं? एवढं सहकार्य? एवढं स्त्रीदाक्षिण्य? तेव्हा तुझं काम आड येत नाही?
त्याने सहज नळ चालू करून पाहिला. त्याला पाणी येत होतं. संपूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त त्याच्याच नळाला पाणी येत होतं. अर्थात, ही करामत मी केली होती. मुद्दाम! त्यामुळे त्याने कपडे धुतले. भांडी घासली. भांड्यांचा खरखर आवाज त्याला अगदी नकोसा झाला.
तो जेवायला बसला. बेल वाजली. दरवाजात सेल्समन होता, त्याने त्याला कटवलं. पाच मिनिटांनी पुन्हा बेल वाजवली. दुसरा सेल्समन. त्यालाही कटवलं. तो वैतागला. मध्येच एकदा मीही बेल वाजवून पाहिली. पुन्हा त्याला दार उघडावं लागलं. त्यात बाहेर कोणी नाही. पुन्हा त्याची चडफड. मला मज्जा!
त्याला ऑफिसमध्ये सतत वाजणारा फोन आठवला. एक काम त्या फोनमुळे मन लावून होत नाही. अन एकदम त्याला त्याच्या फोनची आठवण झाली अन बापरे! व्हॉट्सॲपच्या एकेक मेसेजची आठवण झाली. ऑफिसमधले काही जण अगदी हुकलेले आहेत. वाट्टेल ते मेसेज पाठवतात. पार अध्यात्मापासून ते वात्रटपुराणापर्यंत!
ऑफिसमधली डॉली छान दिसते. पण मध्ये कोणीतरी तिचे ओठ प्रचंड सुजले आहेत, असे फोटो पाठवले होते. त्यावरून चर्चा - नक्की काय घडलं असावं? ..नंतर कळलं, नवनवीन ॲपमध्ये हे वाटेल ते प्रकार करता येतात.
पण आज तो त्या फोनला आणि त्याच्यावरच्या गंमतीजंमतींना मुकला होता.
मग त्याने आभाचा मोबाइल शोधला. त्याची बॅटरी पूर्ण उतरली होती. त्याने तो चार्जिंगला लावला. धडाधड मेसेज यायला लागले. अन आईचे खूपसे मिस्ड कॉल. मग त्याने आईला - म्हणजे सासूबाईंना फोन केला.
बापरे! म्हातारी जाम पकवते साली! तो मनात म्हणाला.
त्या बोलतच होत्या, इकडचंतिकडचं. मध्येच त्या आभाच्या बहिणीबद्दल बोलायला लागल्या. तिचा नवरा काहीएक ऐकत नाही, कसा ऐकत नाही. अन मग - ह्या नवऱ्यांना कसं मुठीतच ठेवलं पाहिजे.
त्याला तर त्यांना जाम झाडायची इच्छा झाली. पण तो गप्प बसला.
मग तो म्हणाला, “अगं आई, कालची गोष्ट." मग त्याने तो गाउनचा किस्सा सांगितला.
त्यावर त्या म्हणाल्या, “असं केलं त्याने? जाऊ दे. तू तो गाउन घालूच नकोस."
“मग काय करू आई? अगं, वाया जाईल ना!"
“काही नाही जात. मला दे घालायला.”
“तुला?" तो ओरडला.
“त्यात ओरडण्यासारखं काय गं? मला असा गाउन घालायची कित्ती इच्छा होती. ह्यांनी मला कधी घेऊच दिला नाही."
“हं!"
“पण नको. जावईबापूंनी पाहिलं तर?"
“त्यांना कळणार तरी आहे? माझा गाउन तुझ्या अंगावर आहे म्हणून?" आभाआलोक हे वाक्य अगदी आभाच्या थाटात बोलला. त्यावर म्हातारी खुदुखुदू हसली.
मग तो सासूबाईंवरच्या रागाने, पण तो राग स्वरात न दाखवता म्हणाला, “आणखी काय देऊ तुला? माझे इनर देऊ का?"
त्यावर म्हातारी पुन्हा खुदुखुदू हसली अन म्हणाली, “अगं, नको. मला होणार नाहीत. उगा उशीची खोळ तक्क्याला कुठली बसायला?"
पुढे ती शहाणी म्हातारी म्हणाली, “लग्न झालं तेव्हा सुरुवातीच्या दिवसात तुला हा मुलगा आवडला नव्हता ना, मग आता गं?”
त्यावर आभाआलोक म्हणाला, “नाही गं. मी तर यांना खूपच आवडले. अन मलाही ते. पण त्यांना सासूच आवडली नाही. अन ते अजूनही!"
हे वाक्य बोलताना तर त्याला नुसत्या उकळ्या फुटत होत्या.
म्हातारीने फोनच ठेवला.
दुपार झाली. जेवणानंतर त्याने आभाच्या सवयीप्रमाणे टीव्ही लावला. पुढे न सरकणाऱ्या, तीच तीच कंटाळवाणी कथानकं असणाऱ्या त्या रटाळ मालिका पाहून त्या रोज बघणाऱ्या बायकांच्या सहनशीलतेचं त्याला कौतुक वाटलं. पण त्या मालिकांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. प्रत्येक मालिकेतील स्त्रीचे किंवा पुरुषाचे बाहेर संबंध होते.
त्याला क्षणभर वाटलं, काय दाखवतात?
त्याला पुढे वाटलं, आपल्याला नाही दिशाची आठवण येत. पण आपल्याला नुसतं बघावंसं वाटतं. आता काय करत असेल?पडली असेल. पडली असेल की पहुडली असेल? पहुडली असेल म्हटल्यावर त्याला शिरशिरी आली. नंतर पडली असेल असं प्रकर्षाने वाटल्याने त्यालाही पडावंसं वाटू लागलं.
तो पडला. त्याची गंमत करायला मी बेल वाजवली. त्याने दरवाजा उघडला. दरवाजात कोणीच नव्हतं. तो चडफडला .
पुन्हा बेल वाजली. एक बाई होती. काही विकायलाच आली होती.
“ताई, मी हेअर रिमूव्हर आणलं आहे विकायला. एक बाटली घेतली तर दुसरी फ्री ...”
आभाआलोकचे डोळे लकाकले. चला, बरं झालं. किती वेळा त्याने आभाला सांगितलं होतं. पण ती कंटाळा करत होती. हातात आज वेळ आहे, संधी आणि लोशनही आहे. ते काम आजच्या आज पार पाडायचं असं त्याने ठरवूनच टाकलं .
पण आभाचं मन जेव्हा पुन्हा जागृत होईल, तेव्हा तिला हा प्रश्न पडेल ना की हे काम आपण तर केलं नाही म्हणून.. मग हे काम कोणाचं? त्याला विचार पडला अन हसू आलं.
ती बाई तर पोपटच होती . ती म्हणाली, "पाहिलंत ताई, आमचं प्रॉडक्ट वापरणाऱ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर अस्संच हसू फुटतं.”
“ते राहू द्या, तुम्हाला कसं परवडतं एका बाटलीवर दुसरी बाटली फ्री द्यायला?” त्याने विचारलं.
“कंपनीची स्कीमच आहे ना. बरं, त्याचं असं आहे की एक बाटली वापरली की आठ दिवसात परत केस वाढतात. मग ते काढण्यासाठी दुसरी बाटली पाहिजेच ना..”
त्याच वेळी पलीकडच्या विंगमधल्या देखणेबाई आल्या. “अगं आभा, घेऊ नकोस हे भलतंसलतं. मागे मी असंच दारावरचं हेअर रिमूव्हर घेतलं अन माझं पार अस्वल व्हायची वेळ आली होती!"
“अस्वल? काय जादूबिदू असते की काय याच्यात?”
“तसं नाही गं. चांगल्या कंपनीचं नव्हतं ना. ते लावल्यावर खूप भराभरा केस वाढायला लागले गं. पहिल्यापेक्षा जास्त.”
देखणेबाई नुसत्या नावालाच देखण्या होत्या. अस्वलाचं काय सांगावं त्यांनी, गोरिलाच होत्या खरं म्हणजे त्या. आणि जर त्या रिमूव्हरने असे केस वाढत असतील, तर?.. मग देखणेबाईंनी ते स्वतःच्या नवऱ्याच्या टकलावर थापायचं ना! तिथे तरी.. पण त्याच्या टकलाची जमीनच नापीक साली!
शेवटी, काही खपलं नाही, म्हणून ती बाई परत फिरली. बहुतेक रागाने, हाताने स्वतःचे केस उपटण्याची इच्छा होत.
एव्हाना आभाआलोक वैतागला होता. आभाला घरी काय कामं असतात, काय धावपळ असते ते त्याला कळून चुकलं होतं. पण आभाची भूमिका आता त्याला चालू ठेवणं भागच होतं. त्याला पर्याय नव्हताच.
पण जे कामं आपल्या वाट्याला आलंय ते प्रामाणिकपणे केलंच पाहिजे .
तसा आलोक पुन्हा आपल्याला खराखुरा आलोक होता येईल या आशेवर आभाची कामं प्रामाणिकपणे करत, आलेला क्षण ढकलत होता.
तो बेडवर पडला, दमून. डोळे मिटल्यावर त्याच्या डोळ्यांसमोर सकाळपासूनची दृश्ये यायला लागली. त्याने आभाच्या कामांना आणि तिच्या कार्यशक्तीला मनोमन नमस्कार केला. त्याला त्याची पूर्णतः जाणीव झाली.
मग तो गुडुप झाला. स्वप्नातही त्याला मंगळागौर, डोहाळजेवण, प्रसूतिगृह असली स्त्रियांची पण दचकवणारी स्वप्नं पडत होती.
---
संध्याकाळ झाली. तो आरवला आणायला शाळेत गेला. त्याला घेतलं. येताना त्याला आवडणारी बिस्किटं घेतली. भाजी घेतली. घरी आल्यावर त्याने आरवला दूध-बिस्किटं दिली. घर आवरलं. झाडलोट केली. कपडे आवरले, लावून ठेवले. रात्रीच्या स्वैपाकाची तयारी केली.
ऑफिसमध्ये उशीर होईल, नऊपर्यंत येतो म्हणून आलोकचा फोन येऊन गेला.
आभाआलोकने आरवचा अभ्यास घेतला. त्याला खाऊ घातलं. टीव्ही बघता बघता आरव झोपला. मग आभाआलोकने मालिका बघण्याचा सपाटा लावला.
आलोक अकरा वाजता आला. त्याचं जेवण बाहेरच झालेलं होतं. आभाआलोक उपाशीपोटी ताटकळत होता. उशीर होईल म्हणून सांगितलं, पण जेवण करून आला हा. आपला काही विचार? आभाआलोकला वाईट वाटलं.
त्याला स्वतःचे असे जुने प्रसंग आठवले. तो वरमला.
त्याने निमूट जेवून घेतलं. एकट्याने. त्यामुळे त्याला नीट जेवणच गेलं नाही. त्याने सगळं आवरून ठेवलं.
ते बेडवर पडले. आभाआलोकने नवा गाउन चढवला. झिरोचा बल्ब लावला.
आलोक म्हणाला, "काल माझं चुकलं. मी असं बोलायला नको होतं.”
आभाआलोक म्हणाला, "नाही, असं काही नाही.”
तो पुढे म्हणाला, “तुला असं वाटलं असेल की मी आज मुद्दाम बटाट्याची भाजी केली. तुला उचकवण्यासाठी. तीही अळणी. होय ना? म्हणून आता मला न सांगता बाहेर जेवला का?"
आलोक म्हणाला, "नाही नाही, सॉरी! मला माहीत आहे. काल माझ्यामुळेच भाजी घ्यायची राहिली. पण खरं सांगू? आजची भाजी इतकी चवदार झाली होती की बास! सगळ्यांना आवडली.”
चवदार? आभाआलोकला कळेचना की मुद्दाम आपल्याला उचकवायला हा असं बोलतोय?
त्या चवदार भाजीचा कर्ता मी, कालच्यासारखा झुंबरावर पडलो होतो.
दोघांचा समेट झाला. आलोकने आभाआलोकला जवळ घेतलं आणि तो तिच्या कानात पुटपुटला, “सॉरी!“
आभाआलोक आता पुढे काय होणार या कल्पनेने भलताच उत्तेजित झाला.
मला गच्च डोळे बंद करून घ्यावे लागले.
प्रसन्न रात्र होती. मलाही लगेच झोप लागली.
----
मला कोणीतरी उठवत असावं - दिशा की आभा? की..
डोळे उघडले, तर समोर यक्षीण! मी डोळे चोळले. खातरी केली की तीच आहे म्हणून.
माझा जरा दुरावा सहन होत नाही तिला. पडली ना लगेच गळ्यात! लाडाने.
“काsय? मी बोलले तर एवढं लागलं होय? मला सोडून पळून आलात? लपून बसलात? मी काय तुम्हाला शोधू शकत नाही असं वाटलं होय?" तिने मादक स्वरात विचारलं.
आलोक, आभा, आरव झोपलेले होते.
तिला पाहून मला आनंद झाला. मी तिला प्रेमभराने आलिंगन दिलं. तिने मी इथे काय करतोय, म्हणून विचारलं. मग मीही तिला माझी सगळी गंमत सांगून टाकली. गोड आभाबद्दल आणि आलोकच्या चुकीच्या वागण्याबद्दलही तिला सगळं सांगितलं.
आणि एक गोष्ट यक्षिणीच्या लक्षात आली. बायकांना हे बरं कळतं हां, अन बरोबर कळतं!
आभाच्या शरीराने गर्भ धारण केला होता.
‘जावे त्याच्या वंशा' या म्हणीची सत्यता पाहावी, एवढाच माझा उद्देश होता. इथे तर आभाआलोकच्या पोटीच वंश आला होता. याची मी आधी कल्पनाच केली नव्हती.
आभाआलोकला दिशासारख्या चकरा येणार होत्या, उलट्या होणार होत्या.
त्याला आता मूळ रूपात पाठवणं गरजेचं होतं.
मी तशी जादू सुरू करणार, तोच यक्षिणीने मला थांबवलं. ती म्हणाली, “राहू दे या शहाण्याला तिच्याच शरीरात!"
मी आश्चर्याने डोळे विस्फारले. "का?"
ती म्हणाली, “याला शिक्षा घडलीच पाहिजे. एवढी गोड पत्नी शहाण्याची, तरी हा तिला असं बोलतो. याला वाटतं ना बायकांना काही समस्या नसतात म्हणून? भोगू दे याला बायकांचे भोग अन बाळंतकळा! बसू दे नऊ महिने शंख करत.” तिने शंख वाजवण्याची मुद्रा करून दाखवली.
मी आधीच सांगितलं, आम्ही खोडकर असतो म्हणून!
तरीही हे काही बरोबर नव्हतं. ही गोष्ट मला पटली नव्हती, एक पुरुष म्हणून तर नक्कीच नाही. आलोकवर हा अन्याय होता. अहो, मला कळतंय, हे योग्य नाहीये म्हणून. पण बायकांच्या समोर कोणाचं चालतंय होय?
मला खरंच कळेना की मी काय करावं?
यक्ष विचारतो तो यक्षप्रश्न. इथे एका यक्षिणीमुळे एका यक्षालाच हा यक्षप्रश्न पडलाय!
मिसळपाव
प्रतिक्रिया