Skip to main content

निःस्वार्थी प्रेम

लेखक शर्वरी डोंगरे यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा आणि अजय एकमेकांचे शेजारी होते. दोघेही लहानपणापासून एकत्र राहत होते, एकत्र खेळत होते. दोघांचेही आई-वडील सुशिक्षित होते, प्रेरणाचे वडील शिक्षक होते, तर आई गृहिणी होती; इकडे अजयच्या वडिलांची शेती होती, ट्रॅक्टर होते, वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे ते शिकलेले असले, तरीही त्यांनी शेतीकडे आपले सारे लक्ष केंद्रित केले होते. अजयची आईही त्यांना शेतीच्या कामात मदत करत होती, त्यामुळे दोन्हीही कुटुंबे सुखी समाधानी होती.

प्रेम-आपुलकीचा मिलाप दोन्हीही कुटुंबांमध्ये होता. दृष्ट लागावी असेच ते शेजारी होते. एकमेकांच्या सुखदुःखात ते सामील व्हायचे किंवा कोणतीही अडचण आली, तर एकमेकांच्या मदतीला धावून यायचे, अशी त्यांची मैत्री होती.

दिवस कसे पटकन निघून जात होते. अजय आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, म्हणजे सर्व जमीनजुमल्याचा तो वारस होता. प्रेरणाचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांची बदली झाली, त्यामुळे त्यांना गाव सोडून बदलीच्या ठिकाणी कुटुंबासह जाणे भाग पडले होते. जामखेड गावातून आता ते दादर या शहराच्या ठिकाणी आले व दुसऱ्या दिवशी शाळेवर हजर झाले.

अजय आणि प्रेरणा ए,बी.पी. या कॉलेजमध्ये कला शाखेच्या शेवटच्या वर्षाला होते. दोघेही खूप हुशार असल्यामुळे अभ्यासात त्यांची कायम चढाओढ असायची. दोघेही मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने कॉलेजमध्ये सगळ्यांचे लाडके होते. प्रेरणा आता कॉलेज सोडून जाणार, म्हणून तिचा मित्रपरिवार खूप नाराज होता, पण तिच्या हाती काहीच नव्हते. तिलाही मित्रमैत्रिणींना सोडून जायचे नव्हते. पण तिने मनाची तयारी केली होती - आपण कितीही हट्ट केला, तरीही पप्पा काही ऐकणार नाहीत आणि बदली रद्द करणार नाहीत, त्यामुळे ती मनाविरुद्ध त्यांच्याबरोबर आली.

त्यांना तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ गेला. गाव आणि शहर यामध्ये खूपच फरक असतो. गावातील वातावरण प्रसन्न असते, शुद्ध हवा मनाला आनंद देते, त्याच्यविरुद्ध शहरामध्ये प्रदूषण खूप असते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. प्रेरणाच्या आईच्या बाबतीत तसेच काहीसे झाले. सुरुवातीचे एक-दोन महिने तिची आई मजेत होती. नंतर तिला अचानक ताप आला आणि अशक्तपणाही जाणवत होता, तरीही त्या घरातील सारी कामे करत होत्या, कारण प्रेरणाच्या कॉलेजची वेळ सकाळची असल्याने तिला लवकर जावे लागत असे आणि तिच्या वडिलांची शाळा लांब असल्यामुळे तेही घरातून लवकर निघत होते. सकाळी खूप गडबड असायची. त्या धावपळीत त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही. त्यांना वाटले की तापाची गोळी घेतली की बरे वाटेल. गावी असतानाही मी असेच करायचे, मग मला आता असा का त्रास होत आहे?

एके दिवशी प्रेरणा लवकर घरी आली. काही कारणास्तव कॉलेज लवकर सुटले होते. येऊन बघते, तर काय! आई स्वयंपाकघरात पडली होती. नशीब, दरवाजा उघडा होता, म्हणून.. नाहीतर काय झाले असते देव जाणे, अशा संभ्रमात प्रेरणा होती. तिने पटकन आईच्या डोळ्यावर पाणी शिंपडले. आईने हालचाल केली. आईला ताप आला आहे, आईचे अंग तापाने भाजते आहे. तिने आईला कसेबसे उचलून बेडवर झोपवले. आई ग्लानीत असल्याने प्रेरणा काय बोलत आहे हे तिला समजत नव्हते.

प्रेरणा खूप घाबरली होती, तिने पटकन तिच्या पप्पांना फोन केला. पण त्यांचा फोन काही लागला नाही, कारण ते ज्या शाळेत होते, तेथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. तिने फोन खाली ठेवला आणि आईच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या घालायला सुरुवात केली. जवळजवळ अर्धा तास तिने तसे केले. नंतर तिने बघितले, आईचा ताप कमी आला आहे. तेवढ्यात तिला कोणीतरी दार वाजवत असल्याचा आवाज आला आणि ती बाहेर आली. आईच्या गडबडीत ती स्वतः दार लावून घ्यायला विसरली होती. दरवाज्यात अजय उभा होता. त्याला पाहून तिला खूप आनंद झाला होता, कारण दोन महिन्यानंतर ते दोघेही एकमेकांना भेटत होते. दोघेही क्षणभर गप्प बसले. ती म्हणाली, "अरे अजय, तू असा अचानक कसा काय आलास? कालच तर फोनवर बोललास आमच्या सगळ्यांशी आणि आज असा.. मस्त, खरंच ग्रेट आहेस तू.." "हो, हो, किती बोलशील. मलाही काहीतरी बोलायला चान्स दे." तो तिला म्हणाला. "दरवाजा उघडा ठेवायला हे गाव नाही आहे, हे शहर आहे. इकडे दिवसाढवळ्या चोर चोरी करत असतात, आणि तुम्ही बिनधास्त दरवाजा उघडा ठेवला आहे." ती थोडी अस्वस्थ वाटली त्याला, त्याने विचारले, "काय झालं?" त्यावर तिने आईच्या तब्येतीबाबत सांगितले. तो म्हणाला, "कुठे आहेत काकू? मला त्यांना भेटायचं आहे." ती त्याला घेऊन आईकडे आली आणि पटकन स्वयंपाकघरात जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. तो तिच्या आईला विचारत होता, "काकू, कसं वाटतंय तुम्हाला? चला, आपण डॉक्टरकडे जाऊ. मी गाडी घेऊन आलो आहे." त्याने प्रेरणाच्या मदतीने त्यांना धरून गाडीत आणून बसवले. प्रेरणाने धावत जाऊन घराला कुलूप लावले व शेजारी तिच्या पप्पांसाठी निरोप देऊन ठेवला, कारण त्यांचा आताही फोन लागत नव्हता.

दादर शहर असले, तरीही मोठे गजबजलेले नव्हते, त्यामुळे प्रेरणाच्या खोलीपासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर एक दवाखाना होता, तेथे त्यांना आणले. डॉक्टरांनी तपासले, त्यांनी काही टेस्ट करण्यासाठी सांगितल्या आणि आजचा दिवस ॲडमिट करू या, असे सांगितले, प्रेरणा खूप घाबरली होती, तिला काय करायचे काहीच समजत नव्हते, कारण याअगोदर तिची आई एवढी कधीच आजारी पडली नव्हती. तिला रडू यायला लागले. अजयने तिला धीर दिला. तो म्हणाला, "एरव्ही तू सगळ्यांना धीर देतेस आणि आज स्वतःवर वेळ आली, तर खचून जातेस. वेडाबाई, काकूंना काहीसुद्धा झालं नाही, त्या लवकर बऱ्या होतील, बरं, तू तुझ्या पप्पांना फोन लागतो आहे का बघ. मी तोपर्यंत काय टेस्ट करायच्या आहेत त्या विचारून त्या करून घेतो, मी आहे तुझ्यासोबत," आणि तो तिच्याकडे बघून हसला. तिने डोळे पुसले आणि मानेने होकार दिला,

तिचे पप्पा त्यांच्यापासून जरा लांब उभे होते, पण त्या दोघांनी त्यांना पाहिले नव्हते. ते लगेच त्या दोघांच्या जवळ आले आणि प्रेरणाला म्हणाले, "बाळा, आईची तब्येत कशी आहे आता?" पप्पांना बघून तिला आणखी रडू आले. त्यांनी तिला जवळ घेतले व म्हणाले, "अगं रडूबाई, आपल्याबरोबर हा तुझा सर्वात जवळचा मित्र असताना काळजी करायची गरजच नाही. बाळा, तू काळजी करू नकोस. आता मीही आलो आहे ना.. अजय, अरे, तुझ्या पप्पांचा मला आत्ताच फोन आला होता, तेदेखील आम्हाला भेटण्यासाठी येत आहेत." त्यावर अजय म्हणाला, "पण जेव्हा त्यांना मी सांगितलं की मी दादरला तुम्हाला भेटायला जाणार आहे, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत. मग असे अचानक का येत आहेत ते?" त्यावर प्रेरणाचे पप्पा त्याला म्हणाले, "अरे, प्रेरणाची आई आणि तुझी आई जिवलग मैत्रिणी आहेत की नाही? मग त्यांना एकमेकींना भेटावंसं वाटलं असेल, म्हणून कदाचित येत असतील. असो. तू जास्त विचार करू नकोस."

तेवढ्यात समोरून डॉक्टर आले. ते म्हणाले, "काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, तुमचा पेशंट ओके आहे. मला जी शंका वाटत होती, तसं काहीही नाही. त्यामुळे ज्या टेस्ट मी तुम्हाला करायला सांगितल्या होत्या, त्या आता आपण नको करू या , बाकी ह्या गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्या त्यांना वेळेवर द्या. पाच दिवसांचा कोर्स आहे, तो पूर्ण करा, मग बघू या. हो, पण आजच्या दिवस त्या इथेच असू देत, कारण त्यांना अशक्तपणा भरपूर आहे. आम्ही सलाइन लावलं आहे. उद्याला त्या बऱ्या होतील." आणि डॉक्टर तेथून निघून गेले.

अजय प्रेरणाला चिडवत म्हणाला, "काय रडूबाई, ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले..?" आणि त्याच्याही डोळ्यातून पाणी आले, पण त्याने पटकन पुसले. एक गोष्ट प्रेरणाच्या पप्पांच्या लक्षात आली की हे दोघेही एकमेकांचे नुसते मित्र आहेत की यांच्यात आणखीही काही नाते निर्माण झाले आहे आणि हे दोघेही ते लपवत आहेत? तेवढ्यात अजय प्रेरणाच्या पप्पांना म्हणाला, "काका, आपण काकींना बघून येऊ" आणि ते तेथून निघून प्रेरणाच्या आईला बघायला गेले. ती आता पूर्ण शुद्धीवर आली होती. तिने अजयला विचारले, "तू कधी आलास? तुझी आई आणि बाबा कुठे आहेत? तेसुद्धा येणार होते ना.." तेवढ्यात प्रेरणा तिथे आली. ती म्हणाली, "आई, अगं, तुला बरं वाटत नाही आहे ना? आधी आराम कर, मग बोल काही ते."

तेवढ्यात अजयचे आई-वडीलदेखील दवाखान्यात आले. त्यांना बघून अजय म्हणाला, "तुम्ही दोघेही येणार होता ते मला का नाही सांगितलं?" त्यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, "तू गप्प बस. वहिनी, तुमची तब्येत कशी आहे? आणि अचानक कशा काय आजारी पडलात? आपलं काल सारं काही ठरलं होतं ना? मग हे काय?" त्यावर अजयची आई प्रेरणाच्या आईला म्हणाली, "शीला, तुला जावई पसंत आहे ना?" त्यावर प्रेरणाची आई हसली आणि म्हणाली, "विजू, तुला सून पसंत आहे ना?" दोघांचेही आई-वडील एकमेकांची मस्करी करत होते. मध्येच अजयची आई त्याला म्हणाली, "अजय, मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे आणि मला ती खूप आवडली आहे." अजय थोडा चिंताग्रस्त झाला. प्रेरणाच्या मनाचीही घालमेल सुरू झाली. तेवढ्यात प्रेरणाचे वडील तिला म्हणाले, "आम्हीदेखील तुझ्यासाठी एक मुलगा पसंत केला आहे." तरीही ती दोघेही गप्प होते.

शेवटी अजयचे वडील त्या दोघांनाही म्हणाले, "अरे, तुम्ही दोघं असे गप्प का? काहीच बोलत नाही आहात, तुम्ही तुमची पसंती आधीच केली नाहीत ना?" दोघेही एकदम नाही नाही असे म्हणाले. हे चौघेही हसू लागले. "अरे, आम्हाला खरं खरं सांगा, तुम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करता ना? आम्हाला उत्तर द्या." दोघेही एकमेकांकडे बघून नाही असे म्हणाले. त्यावर प्रेरणाचे पप्पा म्हणाले, "आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हे दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आपण प्लॅन केला की यांना बोलतं करायचं. एकमेकांवर किती प्रेम आहे, हे यांनी व्यक्त करावं. पण ही आपली मुलं - त्यांनी कधीच आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत, आपलं प्रेम आपल्या सर्वांपासून लपवलं. पण आपले संस्कार त्यांनी जपले, प्रेम त्यांनी मैत्रीपर्यंतच जपलं. यांचं हे प्रेम 'निःस्वार्थी' आहे, त्यात कुठलाच स्वार्थ नाही." दोघांनाही जवळ घेऊन ते म्हणाले, "प्रेरणा माझा होणारा जावई तुला पसंत आहे ना?" अजयचे वडील अजयला म्हणाले, "ही माझी होणारी सून तुला पसंत आहे ना?" दोघेही लाजले आणि आपलं अबोल असे प्रेम  त्यांनी आपल्या आईवडिलांकडून व्यक्त करून घेतले.

मन आणि भाव शुद्ध असेल तर सारे काही न मागताही मिळते. दोघांच्याही आई-वडिलांच्या आशीर्वादाने ते आज आनंदाने, सुखाने राहात आहेत. प्रेम म्हणजे नुसते शारीरिक आकर्षण नाही, तर प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम म्हणजे त्याग होय. प्रेमात खूप मोठी ताकद असते, हे या दोघांनीही सगळ्यांना दाखवून दिले.
----------------------
सौ. शर्वरी शेखर डोंगरे

दिवाळी अंक वर्ष

वाचने 31
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया