गावातील निवडणुकांचे किस्से
सदर लेखन काल्पनिक आहे. यातील पात्रे, स्थळे, पक्ष आणि घटना लेखकाच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. यांचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्ती, राजकीय पक्ष, संस्था किंवा प्रत्यक्ष घडलेल्या घटना यांच्याशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा वा कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही.
आमचं गाव म्हणजे मराठवाड्यातलं एक तालुक्याचं ठिकाण. आमचे आमदारसाहेब राज्याच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ. त्यांचा पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा. त्याला आपण 'अमुक पक्ष' म्हणू, आणि आमच्या आमदारसाहेबांना 'मोठे साहेब' म्हणू.
आमच्या घरी राजकारणाचा वारसा आधीपासूनच आहे. माझे वडील एकेकाळी याच अमुक पक्षाचे नेते होते. थोरले बंधू दुसऱ्या, राज्यपातळीवरच्या 'तमुक पक्षाचे' गावातले अगदी स्थापनेपासूनचे पदाधिकारी होते. आता ते सक्रिय राजकारणात नाहीत. मधले बंधू म्हणजे खरे मुत्सद्दी - सगळ्याच पक्षांशी मैत्री ठेवून, आपला धंदा सांभाळणारे.
आमच्या गावात राष्ट्रीय पातळीवरचा आणखी एक पक्षही आहे. त्याला आपण 'फमुक पक्ष' म्हणू.
मी राजकारणात नसलो, तरी माझं राजकारणप्रेम आणि त्याचा अभ्यास सर्वश्रुत आहे. आज घरात कुणीही सक्रिय राजकारणात नसलं, तरी विशेषतः निवडणुका आल्या की आमच्याकडे अजूनही थोडीफार वर्दळ असते. तिथे चर्चिले गेलेले हे काही किस्से.
१ : दुपारीच साजरं झालेलं नववर्ष
नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. मतदानाची तारीख ७ जानेवारी. पंधरा दिवस आधी प्रचार सुरू झाला. खाणं-पिणं, प्रचार, सभा, बैठका यांचा धुरळा उडू लागला. आमच्या गोदामातूनच अमुक पक्षाकडून देशीच्या किमान पाच-सहाशे चपट्या तरी वाटल्या गेल्या.
मग 'थर्टी फर्स्ट'चा दिवस उजाडला. अमुक आणि फमुक, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी सकाळपासूनच घरोघरी वाटप सुरू केलं. मांसाहारी लोकांसाठी अर्धा किलो मटण आणि एक देशी खंबा; शाकाहारी लोकांसाठी अर्धा किलो खवा, रवा, साखर वगैरे. (त्या वेळी शाकाहारींसाठी पनीरची फॅशन अजून यायची होती!) गावातले बहुतेक सर्वसामान्य लोक दुपारीच मस्त पिऊन, खाऊन झोपी गेले. संध्याकाळी घरून दमदाटी सुरू झाली, "दुपारीच पिणं झालं ना? आता पुन्हा बाहेर पडायचं नाही!" परिणामी बाहेर अशी परिस्थिती झाली की थर्टी फर्स्टचा दिवस, दारू-मटण वाटायला कार्यकर्ते तयार, पण खायला-प्यायला लोकच कमी!
जणू त्या वर्षी आमच्या गावात नव्या वर्षाचं स्वागत रात्री बारा वाजता नव्हे, तर दुपारी बारा वाजताच झालं!
नव्या वर्षाचं स्वागत
२ : तेरा मतांची गोची
हा किस्सा त्याच निवडणुकीतला. आमच्या वॉर्डात फमुक पक्षाचे एक दिग्गज नेते उभे होते. अनेक वेळा नगराध्यक्ष राहिलेले, आणि १९९५पासून कधी पक्षाकडून तर कधी अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवत आलेले. त्यांच्या विरोधात अमुक पक्षाचे एक तुलनेने किरकोळ स्थानिक कार्यकर्ते. या अमुक उमेदवाराचा वॉर्डातला निवडणूक कारभार पाहणारे विश्वासू कार्यकर्ते म्हणजे माझे न-राजकारणी, मधले बंधू. आणि तिसरे उमेदवार म्हणजे तमुक पक्षाकडून आमचे राजकारणी, थोरले बंधू! तमुक पक्षाची मतं फमुककडे वळू नयेत, म्हणून हे बंधू रिंगणात उतरले होते. हे गावात सगळ्यांनाच माहीत होतं.
आमच्या वॉर्डात अमुक आणि फमुक या दोन्ही पक्षांकडून इतका पैसा खर्च झाला, की तेवढ्या पैशात एखाद्या उमेदवाराने आमदारकीची निवडणूकही सहज जिंकली असती. इतर वॉर्डांतले लोक आमच्या वॉर्डातल्या लोकांचा हेवा करत होते. त्या काळात आमच्या वॉर्डात एकेका मतासाठी पाच हजार रुपये भाव मिळाला. आणि दुपारी चार वाजेपर्यंत मतदान न करता थांबलेल्या काही हिशोबी मतदारांना तर दरडोई चौदा हजार रुपयेसुद्धा मिळाले!
अर्थातच फमुक पक्षाचे नेते पडले आणि मोठ्या साहेबांच्या भरघोस पाठिंब्याने अमुक पक्षाचे उमेदवार निवडून आले. आमच्यासहित बहुसंख्य मतदारांनी त्यांनाच मतदान केलं होतं. इथपर्यंत सगळं ठीक होतं.
पण त्यात आमची काही काळ एक विचित्र गोची झाली. आमच्या घरात एकूण तेरा मतं. आम्ही सगळ्यांनी अमुक पक्षालाच मतदान केलं होतं. पण तमुक पक्षाचे 'डमी' उमेदवार - म्हणजे आमचे राजकारणी बंधू, यांना योगायोगाने नेमकी तेराच मतं मिळाली! झालं. कुजबुज सुरू झाली, "बघा, कांदा लिंबूच्या घरच्यांनी ठरल्याप्रमाणे अमुक पक्षाला मत न देता आपल्या घरच्याच माणसाला मत दिलं!"
अर्थात राजकीय वर्तुळात या कुजबुजीवर कुणीही विश्वास ठेवला नाही. पण तेरा हा आकडा अपशकुनी का मानतात, हे त्या दिवशी आम्हाला चांगलंच समजलं!
३ : दहा हजारांची काटकसर
गावातल्या राजकारणात सगळेच एकमेकांच्या ओळखीचे. कुणाशी मैत्री, कुणाशी 'न-मैत्री', पण ओळख सगळ्यांशी. हा किस्सा आमच्या न-राजकारणी, म्हणजे मधल्या बंधूंच्या एका मित्राचा. त्यांना आपण 'डॉक्टरसाहेब'' म्हणू या.
डॉक्टरसाहेब जवळच्याच एका खेडेगावातून आमच्या गावी स्थलांतरित झालेले. शेती तिकडे, व्यवसाय इकडे असा एकूण सेटअप. पण राजकारण त्यांच्या रक्तातच मुरलेलं. त्यामुळे इथे येऊन, बाहेरगावचे असूनसुद्धा, त्यांनी आपल्या पत्नीसाठी अमुक पक्षाचं तिकीट मिळवलं. हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होता.
दुसरीकडे, आमच्या थोरल्या बंधूंचे एक बालमित्र होते. एकेकाळी नगरसेवक राहिलेले, पण आता परिस्थिती जरा खालावलेले. त्यांनी हिशोब मांडला, 'आपण अपक्ष अर्ज भरला की अमुक पक्षाकडून अर्ज मागे घेण्यासाठी ऑफर येणारच.' या आशेवर त्यांनी आपल्या पत्नीचा अपक्ष म्हणून अर्ज भरून ठेवला.
तिसऱ्या उमेदवार होत्या तमुक पक्षाच्या महिला उमेदवार. त्यांनी अर्ज मागे घेण्याच्या चार दिवस आधीच अमुक पक्षाकडून पैसे घेतले, आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि नवरा-बायको दोघेही पंधरा दिवसांसाठी परगावी 'देवदर्शनाला' निघून गेले.
आता रिंगणात दोनच उमेदवार उरल्या - अमुक पक्षाच्या अधिकृत उमेदवार, म्हणजे डॉक्टरीणबाई, आणि माजी नगरसेवकांच्या पत्नी, अपक्ष उमेदवार
मित्रमंडळींनी डॉक्टरसाहेबांना सल्ला दिला, "डॉक्टर, त्या अपक्षाला बोलवा. काहीतरी तोडपाणी करा आणि अर्ज मागे घ्यायला लावा. वहिनी बिनविरोध निवडून येतील. खर्चही वाचेल आणि गुलालही लवकर उधळता येईल."
मोठ्या साहेबांचा पाठिंबा, पक्षनिधी, स्वतःचा पैसा अशी सगळी तयारी असलेल्या डॉक्टरसाहेबांना बहुधा निवडणूक जिंकण्यापेक्षा निवडणूक लढण्याची खुमखुमी जास्त होती! सुरुवातीला त्यांनी बरेच आढेवेढे घेतले. शेवटी दहा हजार रुपयांपर्यंत ऑफर द्यायला ते कसेबसे तयार झाले. आणि बोलणी करण्याची जबाबदारी त्यांनी टाकली आमच्या मधल्या बंधूंवर!
बंधू मध्यस्थ म्हणून गेले. माजी नगरसेवकांनी पहिल्याच फटक्यात आकडा सांगितला, "पंचवीस हजार. त्याच्या खाली बोलायचं नाही."
बंधूंनी डॉक्टरांना निरोप दिला. डॉक्टरसाहेब दहा-बारा हजारांच्या पुढे सरकायला तयार नव्हते "अहो, आपण अमुक पक्षाचे उमेदवार आहोत. हरण्याचा प्रश्नच येत नाही. निवडणूक लढवून त्यांना हरवू. आधीच पैसे कशाला उधळायचे?"
डॉक्टरसाहेबांचा हा आत्मविश्वास पाहून बंधूंनी हात जोडले. तोडपाणी काही झालं नाही.
पण गावात कुठलीही गोष्ट गुप्त राहत नाही. अर्ज मागे घ्यायच्या आदल्या रात्री हे प्रकरण कुणीतरी शेजारच्या जिल्ह्यातल्या तमुक पक्षाच्या एका आमदारांच्या कानावर घातलं. आमदारांनी लगोलग आपला माणूस पाठवला आणि अपक्ष उमेदवाराच्या घरी पन्नास हजार रुपये पोहोचते केले. सोबत निरोप दिला, "अर्ज अजिबात मागे घ्यायचा नाही. निवडणुकीत खर्च करायला आणखी पैसे देतो."
आता वॉर्डातलं वातावरण बघू. इथलं सर्वसाधारण जनमत आधीपासूनच तमुक पक्षाच्या विचारधारेकडे झुकलेलं. त्यात'"आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार विकला गेला' याची चीड, आणि 'अमुक पक्षाने बाहेरगावचा उमेदवार आमच्या माथी मारला' याचा राग. दोन्ही भावना एकत्र झाल्या.
डॉक्टरसाहेबांनी आणि अमुक पक्षाने प्रचंड पैसा ओतला, पण निकाल लागला, तेव्हा अपक्ष उमेदवार बाई दणदणीत मतांनी निवडून आल्या!
दहा-बारा हजार वाचवायला गेलेल्या डॉक्टरसाहेबांना त्या दिवशी कळलं, की राजकारणात काटकसर हीच काही वेळा सगळ्यात महागडी गोष्ट ठरते.
४ : पैसा अमुकचा, गुलाल बबन्याचा
हा किस्सा एका आरक्षित वॉर्डाच्या निवडणुकीचा. तेव्हा प्रभाग पद्धत होती आणि या प्रभागात तीन वॉर्ड होते.
कोणत्याही वॉर्डात खरोखर निवडून येऊ शकतील असे चार-पाच जण तरी असतातच. इथे त्यातले दोघे महत्त्वाचे - रावसाहेब, भाऊसाहेब आणि आणखी एक जण बबन.
रावसाहेबांना अमुक पक्षाचं तिकीट हवं होतं. पण मोठ्या साहेबांनी त्यांना तिकीट न देता भाऊसाहेबांना दिलं. आता रावसाहेब नाराज होऊन काही पक्षविरोधी रिकामटेकडे उद्योग करू नयेत, म्हणून साहेबांनी एक युक्ती केली. भाऊसाहेबांच्या प्रचारात पैसे वाटपाची व रोज कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी रावसाहेबांवरच सोपवली! ज्याचं तिकीट कापलं, तोच पैसेप्रमुख!
तिसरे बबन, म्हणजे माझा शाळेपासूनचा मित्र बबन्या. त्याने एका किरकोळ पक्षाचं तिकीट काही हजार रुपये मोजून विकत घेतलं. बबन्याला सगळ्या वॉर्डात मिळून फार तर तीस-चाळीस मतं पडतील, असा सर्वांचा व खुद्द बबन्याचाही प्रामाणिक अंदाज होता. जमलं तर तोडपाणी करून अर्ज मागे घ्यायचा, असा खरं तर त्याचा विचार होता.
सगळ्यांचा आपापल्या परीने प्रचार सुरू झाला.
निवडणुकीच्या आदल्या रात्री अमुक पक्षाकडून अगदी शिस्तीत पैसेवाटप सुरू झालं. पद्धत ठरलेली - कोणत्या घरात किती मतं आहेत त्याप्रमाणे लोकांना बोलवायचं, पैसे हातात ठेवायचे, कुणाला मत द्यायचं ते नीट समजावून सांगायचं आणि शेवटी लेकरांची शपथ घ्यायला लावून पाठवून द्यायचं.
भाऊसाहेब निश्चित निवडून येणार, असा एकंदर माहौल होता. आणि रावसाहेबांना काहीतरी करून यात काड्या करण्याची इच्छा होत होती.
त्यांनी हळूच एका कोपऱ्यात जाऊन बबन्याला फोन लावला. "बबन, इथे आमच्या पक्षाचं पैसेवाटप चालू आहे. बघ काय करायचं ते."
थोड्याच वेळात बबन्या आपल्या चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन तिथे हजर झाला. मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करून 'आत्ता निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार करतो. या प्रभागातली निवडणूकच रद्द करायला लावतो!' अशी धमकी देऊ लागला.
अमुक पक्षाचे लोक चांगलेच घाबरले. सगळ्यात जास्त तोंडचं पाणी पळालं ते याच प्रभागातल्या इतर दोन वॉर्डांच्या उमेदवारांचं. निवडणुकीत आधीच प्रचंड खर्च झालेला. आता निवडणूक रद्द झाली, तर तो सगळा खर्च पाण्यात, आणि फेरनिवडणुकीत पुन्हा नव्याने खर्च! बबन्याच्या कॅमेऱ्याने तिघांचंही गणित बिघडवलं होतं.
मग रातोरात बैठक बसली आणि तोडपाणी ठरलं. ठराव असा झाला -
किरकोळ पक्षाचा बबन्या हा एक उमेदवार, अमुक पक्षाचे भाऊसाहेब व इतर दोन वॉर्डांचेअसे तीन उमेदवार आणि निवडक कार्यकर्ते असं सगळ्यांनी मिळून प्रभागात घरोघरी जायचं आणि सांगायचं, "हे पैसे ठेवा. पण या वॉर्डात भाऊसाहेबांना मत देऊ नका, त्याऐवजी बबनला मत द्या. प्रभागातल्या इतर दोन वॉर्डांसाठी मात्र आमच्याच अमुक पक्षाच्या दोन उमेदवारांना मत द्या."
आणि हे सांगत होते स्वतः भाऊसाहेब! अमुक पक्षाचे अधिकृत उमेदवार, स्वतःच्याच विरोधात प्रचार करत होते.
लोकही प्रामाणिक. खाल्ल्या पैशाला जागले. प्रभागातल्या दोन वॉर्डांसाठी अमुक पक्षाला आणि या वॉर्डासाठी बबन्याला भरभरून मतदान झालं.
ज्याला फार तर तीस-चाळीस मतं मिळाली असती, तो आमचा बबन्या प्रचंड बहुमताने निवडून आला!
पैसे अमुक पक्षाचे, प्रचार अमुक पक्षाच्या उमेदवाराचा, आणि गुलाल बबन्याच्या कपाळाला. रावसाहेब मात्र त्या दिवशी सगळ्यात जास्त खुनशी आनंदात दिसत होते!
५ : साहेबांचा बँड वाजला
हा किस्सा निवडणुकीनंतरच्या चर्वितचर्वणातला.
आमच्या गावातलं एक मध्यम आकाराचं प्रस्थ. ओलिताची मोठी शेती, मार्केटमध्ये आडत, पैसा-अडका भरपूर. त्यांनी आपल्या चिरंजीवांना राजकारणात 'लाँच' करायचं ठरवलं आणि प्रचंड पैसा खर्च करून अमुक पक्षाकडून उमेदवारी मिळवली. अमुक पक्षाचा उमेदवार म्हणजे निवडून येणारच, याची त्यांना पक्की खातरी.
म्हणून मग विजयाची तयारीही तशीच जंगी. मतमोजणीच्या दिवशी निकाल लागताच विजयी चिरंजीवांना घोड्यावर बसवायचं आणि तहसील कार्यालयापासून ते आपल्या वॉर्डापर्यंत बँड वाजवत मिरवणूक काढायची. पाच हजार रुपयांवर बँड ठरला. घोडा ठरला. गुलाल आला. हार आले. प्रचंड प्रचार झाला, निवडणूक झाली व मतमोजणी सुरू झाली.
अनेकदा होतं काय, तर लोक पैसे घेतात, अमुक आणि तमुक दोन्ही पक्षांकडून घेतात, शपथाही घेतात, पण म्हणून ते शपथ घेतल्याप्रमाणे मतदान करतातच असं नाही! "खा त्यांचं मटण, दाबा आमचं बटन" हा नारासुद्धा काही वेळा प्रभावी ठरतो. झालं. मतमोजणीत अमुक पक्षाचे चिरंजीव पडले. आणि निवडून आला फारसा श्रीमंत नसलेला दुसराच एक उमेदवार.
या विजयी उमेदवाराने तडक त्याच बँडवाल्याला गाठलं. "हे बघ, मी काही तुला पाच हजार देऊ शकत नाही. एक हजार देतो. चालत असेल तर माझ्यासाठी वाजव."
बँडवाला व्यवहारी माणूस. बसून राहण्यापेक्षा हजार बरे, असं म्हणून त्याने त्या दिवशी नव्या नगरसेवकाच्या विजयी मिरवणुकीत जोरदार बँड वाजवला.
चार दिवसांनी हा बँडवाला पराभूत चिरंजीवांच्या तीर्थरूपांकडे, म्हणजे साहेबांकडे, पैसे मागायला गेला.
साहेब - "मी निवडणूक हरलो. तुझ्याकडून बँड वाजवून घेतला नाही. मग पैसे कशाचे?"
बँडवाला - "साहेब, तुम्ही मला बुक केलं होतं. तुम्ही हरलात त्याला मी काय करू? मी काय एकटा नाही, माझ्या पोरांनासुद्धा मला पैसे द्यावे लागतात."
साहेबांनी एक पैसाही न देता त्याला पाठवून दिलं.
मग बँडवाल्याने वेगळाच मार्ग पत्करला. तो दिवसातून अनेक वेळा साहेबांच्या दारात येऊ लागला. काहीही न बोलता फक्त नमस्कार करायचा आणि परत जायचा. सकाळी नमस्कार, दुपारी नमस्कार, संध्याकाळी नमस्कार. साहेब घरी नसले, तर "साहेबांना नमस्कार सांगा" असं सांगून जायचा. तरीही साहेब काही बधेनात.
असे काही दिवस गेले.
सोळाव्या दिवशी सकाळी सहा वाजता साहेबांच्या घरासमोर बँडबाजा येऊन उभा ठाकला. बँडवाल्याने आपल्या सगळ्या पोरांना चांगले कपडे घालून आणलं होतं. आणि त्याने शिस्तीत बँड वाजवायला सुरुवात केली.
भल्या पहाटे बँड वाजतोय म्हटल्यावर हळूहळू लोक जमा झाले. "कोणाकडे काय कार्यक्रम आहे?" अशी चौकशी सुरू झाली.
बँडवाला मधूनमधून बँड थांबवून सांगू लागला, "साहेबांनी मला पाच हजारांची सुपारी दिली होती. मी पोरांना तयार केलं, चांगले कपडे घातले, बँडबाजा घेऊन दिवसभर तयार बसलो. त्या दिवशी दुसऱ्या कुणाची सुपारी घेतली नाही. आता साहेब निवडणूक हरले, त्याला मी काय करू? माझा तर पोरांवर खर्च झाला ना! ठीक आहे, पूर्ण पाच हजार देऊ नका, चार हजार तरी द्या." असे म्हणून पुन्हा वाजवू लागला.
हळूहळू लोकांचं मत बँडवाल्याच्या बाजूने तयार होऊ लागलं. लोक आपसात कुजबुजू लागले, "साहेबांची एवढी मोठी ओलिताची शेती, मार्केटमध्ये आडत, पैसा-अडका भरपूर. आणि गरीब बँडवाल्याचे चार हजार मात्र साहेब देत नाहीत. साहेबांचं हे बरोबर आहे का?"
निवडणुकीत जे जनमत साहेबांना मिळालं नव्हतं, ते आता त्यांच्या विरोधात दारात तयार होऊ लागलं होतं. आणि पार्श्वसंगीत म्हणून बँड वाजत होता!
बराच वेळ हा प्रकार चालला. शेवटी कंटाळून साहेबांनी बँडवाल्याच्या हातात चार हजार रुपये ठेवले आणि स्वतःची सुटका करून घेतली.
निवडणुकीत साहेबांचा बँड वाजला होताच. पंधरा दिवसांनी तो पैसे मोजून, पुन्हा एकदा, अधिकृतपणे वाजला!
नोट: या धाग्यातील व्यंगचित्रे कृबुच्या मदतीने काढली आहेत.
- कांदा लिंबू
मिसळपाव
प्रतिक्रिया