"हुश्श!"
कानातले हेडफोन काढता काढता गौरवने सुस्कारा सोडला. त्याचं वर्क फ्रॉम होम जोरात चालू होतं. ऑनलाइन मीटिंग संपल्याबरोबर लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये डोकं खुपसत पुन्हा काम सुरू करायच्या बेतात होता.
" काय रे.. आज बरीच गरमागरमी झाली मीटिंगमध्ये?" क्षितिजा म्हणाली.
"हो ना. क्लायण्टने वेळेवर इनपुट्स दिले नाहीत आणि वर प्रपोजल वेळेत आलं नाही म्हणून आमच्यावर शेकवायचा प्रयत्न चालला होता त्यांचा. त्याचवरुनच चाललं होतं. आता मॅटर रुस्तुमसरांपर्यंत पोहोचणार.. मग काही टेन्शन नाही."
"ओके." क्षितिजा थोड्याच वेळापूर्वी बाहेरून आली होती. शेजारच्याच खुर्चीत विसावत तिने गप्पा सुरू केल्या.
ती म्हणाली, "गौरव, मी तुला मागे म्हणालेच होते... जरा आउटिंगला जाऊ या. या दिवाळीला वर्ष व्हायला आलं बघ."
गौरव - "अरे हो.. कामाच्या धबडग्यात हे जरा बाजूलाच पडलं बघ. असो. हे बघ, मला दिवाळीनंतरच थोडीफार सुट्टी मिळू शकते. हा प्रोजेक्ट काही संपायला एक-दोन आठवडे सहज लागतील."
"ठीकाय. मलाही दिवाळीनंतर लगेचच यायला जमेल असं वाटतंय! आणि हो.. प्रतुलमामांनासुद्धा विचारायचं का? तेसुद्धा सोबत आले तर मजा येईल."
"ओह.. शुअरली.. येस्स. आज संध्याकाळीच कल्पना देऊन ठेवतो."
गौरव आणि क्षितिजा.. तरुण जोडपं. दोघांचंही करिअर मार्गी लागत होतं. गौरव आयटीमध्ये, तर क्षितिजा वैद्यकीय क्षेत्रात. एका क्लासमध्ये ओळख, काही वर्षं मैत्री, मग प्रेम आणि विवाह असा त्यांचा प्रवास होता.
मागच्या दिवाळीनंतर लगेच गौरवच्या आईचं - म्हणजे निलूचं मोठं ऑपरेशन पार पडलं होतं. ऑपरेशननंतरच पाहिलं वर्ष खूप महत्त्वाचं होतं. वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करणं, त्याचे रिपोर्ट्स डॉक्टरना दाखवणं, डॉक्टरांनी बदलून दिलेली औषधं वेळोवेळी घेणं यात पुर्ण वर्ष गेलं. यात गौरवच्या बाबांची - म्हणजे भावेशची महत्त्वाची साथ होती. ठरल्या वेळी वैद्यकीय तपासणीसाठी नियोजन करणं, डॉक्टर्सकडे घेऊन जाणं हे अगदी न चुकता घडत होतं. औषधं आणि आहार-विहार या बाबतीत क्षितिजा काटेकोरपणे लक्ष देऊन होती. पोस्ट-ऑपरेशन या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या. हे सगळं अपेक्षित आणि व्यवस्थित पार पडलं. एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने सर्वांना छान दिलासा मिळाला. आणि म्हणूनच क्षितिजाने प्रपोजल दिलं की “आई-बाबांना आउटिंगला घेऊन जाऊ या.”
अर्थातच गौरवनेही सहमती दर्शवली. पण गौरवला ८ दिवसांची सुट्टी मिळाली नाही. प्रोजेक्ट्स एकामागून एक पाइपलाइनमध्ये होते. दिवाळीला जोडून एखाद दिवस सुट्टी मिळू शकेल असं सांगण्यात आलं.
..आणि दोघांनीही एकत्र बसून पुण्यापासून लांब, पण फार लांब नाही, असं ठिकाण म्हणजे गुहागरला जायचा प्लान बनवला. दोन रात्री तीन दिवस (2N 3D). दिवाळी संपल्यावर लगेच सुट्टी टाकून ठेवली. गुहागर निसर्गरम्य तर आहेच आणि शिवाय सुंदर बीच.. शिवाय व्याडेश्वर, हेदवी, वेळणेश्वर इथली मंदिरं.
प्रतुलला - म्हणजे निलूच्या भावाला कल्पना दिली. त्यानेही सुट्टीची चाचपणी करून रजा मंजूर करून घेतली.
दिवाळीनंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी सहल ठरली.
गौरव, क्षितिजा, निलू आणि भावेश असे चौघे जण + प्रतुल, सोबत त्याची पत्नी मनश्री, त्यांची मुलगी आत्मिका आणि निलूची आई म्हणजे गौरवची आजी असे चौघे जण. एकूण ८ जण. प्रवास कारने. गौरवची निळी कार आणि प्रतुलची पांढरी कार - दोन गाड्या. सहल पक्की झाली.
राहण्यासाठी हॉटेलचा / रिसॉर्ट्सचा शोध सुरू झाला. दिवाळीनंतरचा सिझन पीक असल्याने अनेक हॉटेल्स आधीच बुक झाली होती. बरीच शोधाशोघ केल्यावर व्हाइट सॅंड रिट्रीट सापडलं. व्हॉट्सॲपवर फोटो मागवले. छान वाटले, दरसुद्धा फार महाग नव्हते, ठीकच होते. तारखाही मोकळ्या होत्या... बुक करून टाकलं.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता पुण्याहून चांदणी चौकमार्गे दोन्ही कार्स निघाल्या. साडेनऊला मुळशीला पोहोचून लेक व्ह्यू रेस्टॉरंटमध्ये झकास नाश्ता झाला. वातावरण सुंदर होतं. हिवाळ्यातली कोवळी सोनेरी उन्हं ऊबदार अनुभव देत होती. मुळशी जलाशयाच्या बाजूने अनेक फोटो काढले गेले. ताम्हिणी घाट, माणगाव, गोवा हायवे, चिपळूण या मार्गाने गुहागरला पोहोचायला दुपारचे अडीच वाजले. गाड्या थेट सुरुची या प्रसिद्ध व्हेज रेस्टॉरंटजवळ नेल्या. सुरुची फुल्ल होतं. जागा मिळायला बरंच वेटिंग होतं. मग मोर्चा मुख्य रस्त्यावरच्या हॉटेल योगेश्वरी इथे वळवला. जागाही मिळाली आणि जेवणही उत्तम होतं.
चारपर्यंत व्हाइट सॅंड रिट्रीटला पोहोचून चेक इन केलं. जवळच होतं गुहागर बीचपासून १०-१२ मिनिटाच्या अंतरावर, अंजनवेल रोडवरच होतं.
थोडा वेळ विश्रांती घेतली. ४ वाजायला आले होते.. अन वेध लागले ते अंजनवेलचं लाइटहाउस अर्थात टाळकेश्वर दीपगृह पाहण्याचे.
कारण या लाइटहाउसमध्ये फक्त संध्याकाळी दोन तास - म्हणजे दुपारी ४नंतरच प्रवेश असतो. इतर वेळी फक्त बाहेरून पाहता येतं. १५-२० मिनिटात दीपगृहाला पोहोचलो. नाममात्र तिकीट होतं (बहुधा प्रत्येकी रु. १०/-) सगळ्यांचं काढलं. १२-१३ वर्षांची आत्मिका लाइटहाउस पाहायला खूपच उत्सुक होती. प्रथमच लाइटहाउस पाहत होती. सगळे जण लाइटहाउसमधल्या दोन-तीन मजली गोलाकार जिन्याने वर पोहोचलो. ७७ वर्षांची निलूची आईदेखील दुखरे गुडघे सांभाळत तो जिना वर चढून आली. शेवटचा लोखंडी जिना मात्र अरुंद.. एका वेळी एकच जण जा-ये करू शकत होता. तिथेच होती लाइटहाउसची मुख्य लँटर्न रूम आणि ऑप्टिकल लाइटिंग सिस्टिम यंत्रणा. याच रूमला २ x २ फुटाचं एक छोटं गवाक्ष आहे, यातून बाहेर आलं की लाइटहाउसची बाल्कनी आहे.. ओपन टू एअर... भणाण सागरी वारा! काय सुंदर दृश्य दिसलं अथांग निळ्याशार सागराचं इथून! डोळे भरून हे दृश्य मनात साठवून घेतलं. काही फोटोही काढले.
टाळकेश्वर लाइटहाउसच्या प्रवेशद्वाराजवळच टाळकेश्वर महादेव मंदिर होतं. मंदिर पेशवेकालीन असल्याचं सांगितलं जातं. असं सांगितलं जातं की गुहागर येथील प्रसिद्ध 'व्याडेश्वर' मंदिराचं मूळ शिवलिंग तीन भागात भंग पावलं होतं. त्यापैकी एक भाग असगोली येथे गेला (बाळकेश्वर / वालुकेश्वर) आणि दुसरा भाग अंजनवेलला कातळवाडीच्या डोंगरावर आला, तिथे हे मंदिर बांधण्यात आलं, ज्याला 'उद्धालकेश्वर' असं नाव होतं. या नावाचं सुलभीकरण ते 'टाळकेश्वर' या नावाने ओळखलं जाऊ लागलं. परिसर सुंदर अशा दीपमाळांनी आणि तुळशी वृंदावनाने सुशोभित झाला आहे. इथली निरव शांतता मनाला भावून गेली. महादेवाचं दर्शन घेतलं. १०-१५ मिनिट शांतता उपभोगली, एक स्तोत्र म्हटलं. मंदिराच्या मागील बाजूने समुद्राचा सुंदर देखावा दिसत होता, तो पाहिला.. मावळतीची तयारी करत असलेला सूर्य हळूहळू सौम्य होत चालला होता.
मग मोर्चा वळवला जवळच असलेल्या गोपाळगडाकडे. वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ जवळील डोंगरसड्यावर गोपाळगड हा किल्ला आहे. 'अंजनवेल गावचा पहारेकरी' असं याला संबोधलं जातं. प्राचीन काळी व्यापारी वाहतूक करण्यासाठी नदीच्या पात्रांचा उपयोग होत असे. या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोपाळगडाचा उपयोग होत असे. गोपाळगडाचं बांधकाम आदिलशाहीत झालं असावं. पुढे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी किल्ल्याच्या बांधकामाला बळकटी आणली. पुढे जंजिऱ्याच्या सिद्दीने हा किल्ला जिंकला आणि नंतर कालौघात १८१८ साली गोपाळगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या भोवती खंदक आहे. पडलेल्या अवस्थेत तरी मजबूती जाणवणारी तटबंदी आहे. किल्ल्याच्या विहिरी, जोती, कोठार असे अवशेष दिसतात. (मध्यंतरी गोपाळगडच्या मालकीचा वाद चर्चेत आला होता. शासकीय कागदपत्रातील तांत्रिक त्रुटींमुळे आतील जमीन अजूनही खासगी नावांवर आहे, परंतु हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक असून पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतो.)
हे सर्व पाहून होत असतानाच सूर्यास्त सुरू झाला. जवळच्या तटावरून सागरात बुडणारा सोन्याच्या गोळा अनिमिष नेत्रांनी पहिला. एक यादगार संध्याकाळ मनाच्या रोजनिशीत नोंदली गेली होती!
रात्र झाली, तशी व्हाइट सॅंड रिट्रीटला परतले. जेवणाबद्दलची कल्पना केअरटेकरला देऊन ठेवली होती. आठ-साडेआठला कोकणी पद्धतीची रुचकर थाळी मिळाली. व्हाइट सॅंड रिट्रीट हा ४ ड्युप्लेक्सचा व्हिला होता. दोन ड्युप्लेक्स युनिट बुक केले होते. यातल्या एकात गौरव, क्षितिजा, निलू आणि भावेश आणि दुसऱ्यात प्रतुल, मनश्री, आत्मिका आणि निलूची आई. जेवण झाल्यावर सगळे गौरवच्या रूममध्ये जमले. गप्पा, गोष्टी, गाणी अन मग आवडीचा पत्ते खेळण्याचा कार्यक्रम सगळ्यांनी एन्जॉय केला.
दुसऱ्या दिवशीची सुंदर सकाळ उजाडली. सोनेरी उन्हांत व्हाइट सॅंड रिट्रीट ड्युप्लेक्सची इमारत चमकत होती. आजूबाजूची हिरवाई आणि लांबून दिसणारा समुद्र हे मोठं रमणीय दृश्य होतं.
चहा पाणी आणि इतर अशी आवराआवरी करून गौरवने प्रतुलच्या दरवाज्यावर टकटक केलं. दरवाजा उघडून प्रतुल उत्तरला, "तुम्ही व्हा पुढे. आम्ही येतोच मागाहून." गौरव, क्षितिजा, निलू अन भावेश थेट बीचवर. पोहण्याचं साहित्य - म्हणजे स्विमिंग कॉस्चूम्स सॅकमध्ये सोबत घेतलं होतंच. पाच-सात मिनिटाच्या अंतरावर कॉर्नरवर जांभळादेवीचं मंदिर होतं. देवीचं दर्शन घेतलं. कोकणातील कोणतंही मंदिर सकाळच्या प्रसन्न वेळेत अनुभवणं हा एक सोहळाच म्हणायला हवा! इथूनच गुहागर बीच सुरू होतो. ही पुळण (बीच) सुमारे सहा-सात कि.मी. पुढे पसरली आहे. या भागाला जांभळादेवी बीच असं म्हणतात. चौघेही या बीचवर प्रवेशते झाले. नजारा तर सुंदरच होता. तुरळक लोक समुद्रस्नान करत होते.
"जायचं का इथेच समुद्रात?" इति गौरव
"नको, मेन बीचवरच जाऊ. तिथे जास्त मजा येईल असं वाटतं." क्षितिजा उत्तरली.
काही वेळातच ते गुहागरच्या मुख्य बीचला पोहोचले. गाडी पार्किंग एरियात लावली. अंगावरचे कपडे काढून कारमध्ये ठेवले आणि अंगावर स्विमिंग कॉस्च्यूम्स चढवल्या.
भावेश म्हणाला, "तुम्ही तिघे जण जा समुद्रात पोहायला. मी फोटो काढायला थांबतो इथे. प्रतुल वगैरे आले की मग येईन."
"आत्मिका टाईमपास करत आवरणार आणि आजी तर वेळ लावतातच आवरायला. त्यांना यायला बराच वेळ लागणार. आता कशाला एकटे थांबताय? चला आमच्याबरोबरच. चौघांनाही सोबतच मजा करता येईल आणि समुद्रात खेळताना फोटोबिटो तर नकोच. कंटाळा आलाय अशा फोटोंचा.. वाटल्यास नंतर बीचवर सगळे मिळून काढू." गौरव उत्तरला.
"हो बाबा, चलाच आमच्याबरोबर. अन तो मोबाइल ठेवून टाकू गाडीत." क्षितिजाचा आग्रह.
"ठीकाय.. पण गाडीची चावी.. ती कोण सांभाळणार? इथे एखाद्या शॉपमध्ये वगैरे ठेवायची का?" भावेशचा प्रश्न
"कशाला कुणाकडे ठेवायची? माझ्या कॉस्च्यूमला आहे की झीप पॉकेट. त्यात ठेवतो." गौरव त्याच्या झीप पॉकेटकडे बोट दाखवत उदगारला.
"अरे, पण चावीत पाणी जाईल ना? इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं त्यात. काही गडबड झाली म्हणजे?" भावेशची शंका.
"अहो बाबा, चावी पूर्ण सील असते आजकाल. हे बघा.. आहे की नाही सील? नाही पाणी जाणार. चला आता." गौरवने आत्मविश्वास दाखवत भावेशचा मोबाइल गाडीत ठेवलादेखील. गाडी चावीवरच्या रिमोटने लॉक केली आणि चौघेही पुळणीच्या दिशेने चालू लागले.
सुरूच्या बनातून पुळणीवर पावलं टाकताना प्रचंड उत्साह वाटत होता. सकाळचे साडेआठ म्हणजे तशी लवकरची वेळ असल्याने बीचवर तुरळक माणसं होती. पुळणीवरची पांढरी मऊ रेती सुखद स्पर्श देत होती. ऊबदारपणाचा स्पर्श असणारा काहीसा थंड वारा, सर्वसाधारण स्वच्छता तर होतीच. चौघेही आनंदाने समुद्रात प्रवेशते झाले. एकेक लाट येत होती, त्याला सामोरे जात, लाटांचं अंदाज बांधत, पाण्याची खोली पायांनी चाचपत सुरक्षितपणे त्यांचं डुंबणं सुरू झालं.
निलेश, निलू दोघानांही समुद्रात डुंबणं आवडत होतंच. पाण्याच्या बाबतीत निलू धीट होती. समुद्र असो वा रेसॉर्टचा स्विमिंग टॅंक.. ती पाण्यात शिरून खेळायला उत्सुक असायची. आताही दोघे डुंबण्यात रमून गेले. तिकडे आणखी जरा खोल पाण्यात गौरव-क्षितिजा पाण्यात डुंबत होते. दोघेही उत्तम स्विमिंग करणारे असल्याने पाण्यात खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटत होते. मधूनच भावेश गौरवला विचारायचा, "गाडीची चावी आहे ना खिशात? नाहीतर समुद्राच्या लाटात वाहून जायची!" गौरवही "आहे चावी, डोण्ट वरी" असं सांगत काळजीचं निराकरण करायचा.
अर्धा-पाऊण तास होऊन गेला अन प्रतुल, मनश्री, आत्मिका अन निलूची आई पुळणीवर आले. उत्साहात "आम्ही आलोय, आम्ही आलोय" म्हणत बागडत आले. तिघे जण पोहणायचे कपडे नेसून पाण्यात आले. निलूची आई मात्र रेतीतल्या खडकावरून दुरूनच आनंद लुटत बसली. बराच वेळ सातही जणांचं डुंबणं, पाण्यात खेळणं सुरू राहिलं.
मधूनच आत्मिका आजीकडे गेली. तिला आग्रह करू लागली, "आजी, तूपण पाण्यात चल. भीती वाटत असेल, तर खोल पाण्यात नको येऊस.. पण पाय तरी भिजवायला ये." क्षितिजाही आजीकडे धावली अन आग्रह करू लागली. आजी एकदाची तयार झाली. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. पाण्यात पाय भिजवता भिजवता तिलाही गंमत वाटू लागली. भीड चेपत जरा खोल पाण्यात - म्हणजे चक्क छातीएवढ्या पाण्यात आली. निलूही आईच्या मदतीला आली. प्रथमच समुद्रात शिरल्याने निलूची आई खूपच आनंदी झाली. चौघी-पाचही जणी पाण्याचा आनंद घेऊ लागल्या.
दोन तास होऊन गेले. आता पाण्यातून बाहेर निघण्याची वेळ झाली. सगळे जण पाण्याबाहेर आले. प्रतुल आणि मंडळी मागून येत होतेच.
गौरव कारचे दरवाजे उघडण्यासाठी खिशातून चावी काढून रिमोटवरील 'डोअर ओपन'चं बटन दाबू लागला. "अरेच्चा.. उघडतच नाहीये." एकदा बटन दाबलं, दोनदा.. तीनदा.. अनेकदा.. नाही म्हणजे नाहीच. तोपर्यंत सर्व जणकारपर्यंत पोहोचले. गौरवने चावी कारच्या की-होलमध्ये सरकवून फिरवली. दरवाजा उघडला. हुश्श.. सगळे चेहरे उजळले.
कारमधील कपड्यांच्या बॅगा पटापट काढल्या गेल्य. कपडे बदलण्यासाठी पार्किंग एरियातच एक-दोन आडोसे केले होते, तिथे जाऊन चौघेही जण कपडे बदलून आले. ओले कपडे एका बॅगमध्ये घालून डिकीत टाकले.
क्षितिजा अन निलू मागच्या सीटवर बसले. भावेश को-ड्रायव्हरच्या. गौरवने डायव्हर सीटवर बसून इग्निशनमध्ये चावी टाकली अन फिरवली.. पण.. ढिम्म. आणखी एक-दोनदा फिरवली, पण इंजीन ढिम्मच!
बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, असं समजून गाडीचा हॉर्न, म्युझिक सिस्टिम, हेड & टेल लॅम्प्स इ सर्व तपासून बघितलं. इग्निशनमध्ये चावी टाकून पुन्हा क्रॅन्क करून बघितली. अन..
क्षणात इंजीन लॉक्ड (ENGINE LOCKED ) असा मेसेज डॅशबोर्डवर झळकला. अरे बाप रे! हा प्रकार पहिल्यांदाच झाला होता. काय झालं असेल? गौरव पुटपुटला. असा वेगळा मेसेज कसा काय आला? भावेशही चरकला. चावी काढून परत फिरवली, तरी असाच मेसेज येत राहिला.
त्याने या मेसेजची कारणं गूगलवर शोधली -
१. बॅटरी / चार्ज क्षीण झालाय किंवा संपून गेलाय, त्यामुळे चुकीचे सिग्नल पाठवले जाऊन असा मेसेज येऊ शकतो.
२) चावी रिमोटमधील इम्मोबिलायझर आणि ट्रान्सपॉन्डर सिस्टिममध्ये बिघाड असणं.
३) चुकीची चावी लावल्यामुळे (चोरीची शक्यता) इम्मोबिलायझर युनिट गाडी स्टार्ट होऊ देत नाही.
ओह माय गॉड! गाडी इम्मोबिलाइझ झालीय! आता स्टार्टच होऊ शकणार नाही!
त्याने ताबडतोब काशिनाथ साळवीला फोन लावला. काशिनाथ साळवी म्हणजे पुण्यातल्या कार सर्व्हिस स्टेशनचा टेक्निकल ॲडव्हायझर! गाडी सर्व्हिसिंगला टाकताना त्याच्याशी ओळख झालेली. गौरवच्या मित्राचा भाऊच निघाला, मग आणखी मैत्री झाली. काशिनाथचा फोन सतत एंगेज्ड लागत होता.
तोपर्यंत प्रतुल आणि इतर तिघे आले. गौरवने त्याला ENGINE LOCKED चा इश्यू सांगितला. प्रतुल म्हणाला, "अरे, हा तर वेगळाच प्रॉब्लेम उद्भवला की. असो. करू आपण सॉर्ट आऊट, तोपर्यंत नाश्ता तरी करून घेऊ."
अकरा-सव्वा अकरा तर वाजलेलेच होते. मग चालत सगळ्यांची मिरवणूक पोहोचली मेन रोडवर असलेल्या सुरुचीमध्ये.
"दडपे पोहे आहेत का?" सर्वांना इथल्या टेस्टी दडपे पोह्यांची चव चाखायची होती.
"किती पाहिजेत? आठ?.. जरा थांबताल का? लगेच तयार करून देतो."
थोड्याच वेळात दडपे पोहे आले. टेस्ट तर अप्रतिमच!
गौरवचा नाश्ता पूर्ण झाल्यावर त्याने सहज म्हणून नेटवरून 'जवळचे डीलर आणि सर्व्हिस स्टेशन' असा शोध घेतला. चिपळूणचा क्रमांक मिळाला. त्यांना प्रॉब्लेम सांगितल्यावर "तुम्हाला गाडी चिपळूण सर्व्हिस स्टेशनला आणावी लागेल. आम्ही तपासून दुरुस्त करून देऊ शकतो" असं सांगितलं.
चिपळूण इथून साधारण ५० कि.मी.. म्हणजे क्रेनने गाडी न्यायला लागणार. किती खर्च होणार.. बाप रे! यावर विचार सुरू असताना काशिनाथ साळवींचा फोन आला. गौरवने त्याला प्रॉब्लेम सांगितला.
"काय रे, रिमोट की पाण्यात पडली की काय?" काशिनाथ
"छे रे.. मीच रिमोट-की खिशात ठेवून समुद्रात डुबक्या मारल्या. गुहागर बीचला आलोय ना." गौरव.
पलीकडून काशिनाथ मार्मिकपणे हसला आणि म्हणाला, "डोण्ट वरी. तुझ्याकडे दुसरी चावी म्हणजे डुप्लिकेट चावी आहे का?"
आहे, पण घरी पुण्याला आहे."
"अर्रर्र.. बॅटरी जुनी किंवा ड्रेन झालीय का? बाकीची बॅटरी ऑपरेशन्स होताहेत का?"
"हं. बॅटरी ऑपरेशन्स तर होतायत आणि नवीन बॅटरीची दोनच वर्षे झालीयत. ड्रेन-ब्रीन तर अजिबात नाहीये. सगळी इलेट्रिक फंकशन्स चालताहेत."
"ठीकाय.. मग, की-रिमोटमधला सेल बाहेर काढ, नीट पुसून काढ. वाटल्यास थोडा वेळ रिमोट आणि सेल दोन्ही उन्हात ठेव आणि परत ट्राय कर. आणि याने अगदीच झालं नाही, तर नवीन सेल टाक रिमोटमध्ये."
आता सेल कुठे मिळेल हे शोधायचं काम आलं. तेवढ्यात त्याला गुहागरमधल्या ऑथोराइझ्ड सर्व्हिस स्टेशनचा क्रमांक मिळाला. तिथल्यावैद्य साहेबांशी बोलला. “गाडी इम्मोबिलाइझ झाली असेल तर तर चिपळूण सर्व्हिस स्टेशनलाच न्यावी लागेल. इथे ते काम होणार नाही.” त्यांनी सेलवाल्याचा पत्ता दिला अन "नवीन सेल टाकून होतंय का बघा. काही अडचण अली तर फोन करा" असं सांगितलं.
दरम्यानच्या वेळेत प्रतुल त्याच्या गाडीतून इतरांना व्हाइट सॅंड रिट्रीटला सोडून आला आणि गौरवबरोबर सेल आणायला बाजारपेठेत गेला. तशाच स्पेसिफिकेशनचा नवीन सेल घेतला. गाडी बीच पार्किंग एरियातच उभी होती, तिथे येऊन की-रिमोटमध्ये सेल टाकून गाडीचे दरवाजे उडतात का ते पाहिलं, पण काहीच उपयोग नाही झाला. चान्स घेऊन बघावा, म्हणून इग्निशनमध्ये चावी टाकून पुन्हा क्रॅन्क करून बघितली. तिथेही 'नन्नाचा पाढा' - इंलीन लॉक्ड (ENGINE LOCKED ) असाच मेसेज!
की-रिमोट जास्त वेळ उन्हात ठेवून पाहिला. अगदी व्हाइट सॅंड रिट्रीटला जाऊन हेअर ड्रायरचा ब्लोअर मारून पाहिला.. नो यूज! गाडी सुरू झाली नाही ती नाहीच. आता सगळे हवालदिल झाले. ट्रिपचा बट्ट्याबोळ झाल्यात जमा.
तेवढ्यात वैद्यसाहेबांचा फोन - "झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह?" नाही असं सांगितल्याबरोबर त्यांनी चिपळूणमधील की-रिमोट एक्स्पर्टचा नंबर दिला. त्याला फोन केल्यावर त्यांना येण्या-जाण्याचे मिळून साडेतीन हजार आणि रिमोट की रिपेअरिंगचे जे असतील ते, असे चार्जेस सांगितले. प्रकरण महाग होत चाललं होतं.
सोमवारी गौरवचं ऑफिसला जाण मस्ट होतं, कारण क्लायंटबरोबर महत्त्वाचा रिव्ह्यू होता. उद्या - म्हणजे रविवारी कमीत कमी दुपारी ३पर्यंत निघून पुण्याला पोहोचणं अत्यंत आवश्यक होतं. गाडी पार्किंगमध्येच सोडून दोघेही जण व्हाइट सॅंड रिट्रीटला परतले. सर्वांबरोबर जेवण झालं.
जेवताना भावेश म्हणाला, "मी काय म्हणतोय गौरव.. मी जातो एसटीने पुण्यात आणि आपल्या घरची ड्युप्लिकेट कीज घेऊन येतो ना. आता निघतो, रात्री पुण्याला घरी पोहोचेन, दोन-चार तास विश्रांती घेईन अन उद्या सकाळी निघून दुपारपर्यंत पोहोचेन इथे."
गौरव - "नको बाबा. खूप दगदग होईल तुम्हाला. अगदी खूपच गरज पडली, तरच या पर्यायाचा विचार करू."
गौरवने गाडी टो करून चिपळूण सर्व्हिस स्टेशनला दाखल करायची, असं ठरवलं, गत्यंतर नव्हतं.
कार कंपनीच्या RSA (रोड साईड असिस्टन्स) ला फोन केला. गाडी गुहागर ते चिपळूण टो करायचे खूप पैसे सांगितले, आणि टोइंग क्रेन "आता उपलब्ध नाही, उद्या दुपारनंतरच येऊ शकेल" हे सांगितलं. आता झाली का पंचाईत! तेवढयात गौरवला सुचलं, त्याच्या गाडीच्या इन्शुरन्समध्ये RSA (रोड साईड असिस्टन्स) टोइंग कव्हर आहे का, ते बघावं.. थँक्स गॉड, ते होतं!
तो लगेच कामाला लागला. त्याच्या इन्शुरन्स ॲडव्हायझरला फोन लावून परिस्थितीची कल्पना दिली आणि लवकरात लवकर गाडी टो करून चिपळूणला न्यायची व्यवस्था करण्याची विनंती केली.
चिपळूण सर्व्हिस स्टेशनचे टेक्निशियन रमाकांत खाडिलकर यांच्याशी गौरवचं बोलणं झालं. ENGINE LOCKED होऊन इम्मोबिलाइझ झाल्याचे सविस्तर तपशील सांगून 'गाडी आज रात्री किंवा उद्या सकाळी सर्व्हिस स्टेशनला आणत आहे' याची कल्पना दिली, अर्जन्सीबद्दल सांगितलं.
"पण सर, नवीन चावी सेटअप करायची असेल, तर ब्लॅंक चावी लागेल ना. आधी त्या ब्लॅंक चावीला ग्रूव्हिंग, शेपिंग, मग सॉफ्टवेअर सेटअप. तुमच्या कार-कीचे फोटो आणि गाडी मॉडेल लिहून पाठवून द्या. आमच्या स्टॉकमध्ये स्पेअर चावी नसेल, तर मागवावी लागेल, ज्याला ४ ते ६ दिवस लागतील."
हे ऐकून गौरव हॅंगच झाला. "दुसरं काही करता येणार नाही का?"
"तुम्हाला दुसऱ्या सर्व्हिस सेंटरमधून चावी मिळाली आणि आमच्या स्टेशनला पोहोचवली, तर करता येईल."
"ठीक आहे, शोधतो."
आशेचा एक किरण दिसू लागला होता.
इकडे इतरांचा आराम करून झाल्यावर प्रतुलने त्यांना दोन रिक्षा करून दिल्या अन हेदवी, वेळणेश्वर, व्याडेश्वर इ. बघून यायला सांगितलं. तो गौरवसोबत मदतीसाठी थांबला.
प्रतुल आणि गौरव दोघेही स्पेअर ब्लॅंक चावी कशी मिळवता येईल याच्या मागे लागले. पुणे सर्व्हिस स्टेशनला हा स्पेअर असल्याचं कळलं, पण चिपळूणला पोहोचायला बराच वेळ लागेल, असं लक्षात आलं. प्रतुलला अचानक आठवलं की मनश्रीचा एक चुलत भाऊ सातारा इथल्या सर्व्हिस स्टेशनमध्ये मॅनेजर आहे. लगेच त्यांना फोन लावून स्पेअर चावीबद्दल विचारणा केली. गाडी आणि चावीचे तपशील सांगितले अन काय सरप्राइझ.. स्पेअर चावी त्यांच्याकडे होती. पेमेंट केलं की चावी ताब्यात मिळेल, पण! आता ती चिपळूणपर्यंत कशी आणायची? हा प्रश्न उरला होताच.
तासाभराने इन्शुरन्स ॲडव्हायझरचा फोन आला, "मी टोइंगची सोय करतोय. पण क्रेन चिपळूणहून उद्या सकाळीच गुहागरला पोहोचू शकेल."
गौरव - "क्रेन संध्याकाळी नाही का येऊ शकणार? म्हणजे गाडी रात्रीच चिपळूणच्या सर्व्हिस स्टेशनला देता येईल. सर्व्हिस इंजिनिअर्सना सकाळीच दुरुस्तीला सुरुवात करता येईल, प्लीज बघा ना!"
इन्शुरन्स ॲडव्हायझर - "करतो प्रयत्न. जमत असेल तर करतो फोन."
गौरवला आठवलं की त्याच्या मित्र कैवल्य उर्फ केजे याची सासुरवाडी साताऱ्याची आहे. तो आणि क्षितिजा दोघंही त्याच्या लग्नाला साताऱ्याला गेले होते.
गौरवने केजेला फोन करून परिस्थिती सांगितली आणि काही मदत होईल का अशी विचारणा केली. केजेचे सासरे शरद घाडगे हे शहरातले अनुभवी ॲडव्होकेट होते. त्यांच्या अनेक ओळखी होत्या. हा एक सॉलिड योगायोग होता की ॲड. घाडगेसाहेब नेमके त्याच वेळी त्यांच्या नातेवाइकाच्या कार खरेदीसाठी साताऱ्याच्या कंपनी शो रूमला भेट दयायला गेले होते. मग तर स्पेअर चावी खरेदीचा प्रश्न सुटलाच होता. काही वेळाने घाडगेसाहेबांचा थेट गौरवलाच फोन आला, "चावीचे डिटेल्स पाठव. मी इथे पेमेंट करतो आणि चावी ताब्यात घेतो. आणि ती चिपळूणला पाठवायची जबाबदारी माझी. डोंट वरी."
घाडगेसाहेबांनी चिपळूणला कोण जाणार आहे किंवा जाऊ शकेल याची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे एक मित्र एसटीमध्ये कंट्रोलर होते, ते म्हणाले, "सकाळी सातारा-रत्नागिरी बस सकाळी साडेसात वाजता असते. त्याच्या ड्रायव्हरकडे चावी दिली, तर ११पर्यंत चिपळूणला पोहोचू शकेल. त्यांना थेट एसटी स्टॅंडवरून चावी घेता येईल.” घाडगेसाहेब लगेचच त्या ड्रायव्हरचा क्रमांक मिळवून त्याचाशी संपर्क साधण्याच्या मागे लागले.
इकडे गौरवच्या डोळ्यापुढे सोमवारच्या दोन महत्त्वाच्या मीटिंग्ज आणि क्लायण्टसमोर प्रेझेंटेशन असा कार्यक्रम नाचत होता. काही वेळातच दोन रिक्षाने हेदवी, वेळणेश्वर फिरायला गेलेली सहा जणांची टीम परतली. सुंदर स्थळदर्शन झालं म्हणून मंडळी खूश होती. व्हाइट सॅंडवर येऊन फ्रेश झाल्यावर पुन्हा सुरुचीला जायचा बेत ठरला. दोन फेऱ्या मारायला प्रतुलची गाडी होतीच.
सगळे जस्ट सुरुचीला पोहोचले आणि गौरवच्या फोनची रिंग वाजली. हा इन्शुरन्स ॲडव्हायझरचा फोन. "साहेब, टोइंग क्रेनची सोय झाली, बरं का. रात्री साडेनऊ-दहा वाजता क्रेन गुहागर बीचला पोहोचेल. तुमच्या गाडीचं लोकेशन पाठवून ठेवा. ड्रायव्हर आणि गाडी नंबर पाठवून ठेवतो थोड्याच वेळात." गौरव जाम खूश झाला. धडपडीला यश येत होतं.
गौरव आणि प्रतुल यांनी जेवण आटोपून इतरांना व्हाइट सॅंडला नेऊन सोडलं अन गुहागर बीच गाठला. ठरल्यावेळी क्रेन घेऊन ड्रायव्हर आला. गाडी टो करून चिपळूणच्या दिशेने रवाना झाला. गाडी सर्व्हिस स्टेशनला व्यवस्थित दाखल झाली, याची खातरी करण्यासाठी दोघेही प्रतुलची पांढरी कार घेऊन क्रेनच्या मागोमाग निघाले. रात्री ११ वाजता सर्व्हिस स्टेशनच्या अटेण्डण्ट गार्डच्या ताब्यात गाडी देऊन गौरवने चिपळूण सर्व्हिस स्टेशनचे टेक्निशियन रमाकांत खाडिलकर यांना मेसेज करून ठेवला - 'गाडी रात्रीच सर्व्हिस स्टेशनला दाखल करत आहे. चावी पोहोचवण्याचीही सोय करत आहे. तपशील नंतर सांगेन.' त्यांचा OK Thumbचा रिप्लाय आला.
दोघांनाही व्हाइट सॅंडला परतायला रात्रीचा दीड वाजला. तेव्हा बाकीचे निद्रेच्या अधीन होऊन निश्चिंत झाले होते.
रविवारची दिवस उजाडायला आला होता. सकाळी सहा वाजता गौरवच्या मोबाइलवर मेसेज झळकला. त्यात सातारा-रत्नागिरी एस.टी. ड्रायव्हरचं नाव, गाडी क्रमांक, फोटो इ. माहिती होती. या गाडीतून स्पेअर रिमोट-की येणार होती. अरेंजमेंट झाल्या होत्या.
नास्ता झाल्यानंतर गौरव, क्षितिजा & भावेश सकाळी ९च्या गुहागर-चिपळूण एसटी बसने चिपळूणला जायला निघाले. क्षितिजा बऱ्याच वर्षांनी एसटी बसने प्रवास करत होती. तिकिटात तिला ५०% महिला सवलत मिळाल्याने बोनस मिळाल्यासारखी खूश होती. बस साडेदहाच्या सुमारास पोहोचली. काही वेळ वाट पहिल्यानंतर रत्नागिरीची बस आली.
या बसचे ड्रायव्हर वाघमोडे यांना भेटून त्यांच्याकडून स्पेअर रिमोट-कीचा छोटा बॉक्स घेतला. गौरवने ड्रायव्हर वाघमोडेंना आणि एसटी कंट्रोलरसाहेबांना धन्यवाद दिले. घाडगेसाहेबांनाही फोन करून चावी मिळाल्याचं सांगितलं व आभार मानले. तिघेही रिक्षा करून सर्व्हिस स्टेशनला पोहोचले. सर्व्हिस स्टेशन थोडं दूर हायवेला होतं. टेक्निशियन खाडिलकर वाटच पाहत होते. त्यांच्याकडे रिमोट-की ब्लॅंक प्रोग्रॅमिंगला सुपुर्द केली. सगळं पूर्ण व्हायला अडीच-तीन तास लागतील, असं सांगितलं! तोपर्यंत ते रिसेप्शनच्या वेटिंग रूममध्ये बसले. यासंबंधी काही कॉम्पुटर एन्ट्री करून झाल्यावर खाडिलकर यांनी गौरवला हाक मारली. "या चावीला ग्रूव्हिंग आणि शेपिंगसाठी आता एक्स्पर्टकडे पाठवावं लागेल. आमच्याकडे माणूस नाहीय आता. तुम्ही जाल का ही चावी घेऊन? वाटल्यास मी गाडी अरेंज करतो."
अर्थात गौरवला नाही म्हणायचं कारणच नव्हतं.
थोड्या वेळात ते चावी एक्स्पर्ट विजय चौधरी यांच्या वर्कशॉपला पोहोचले. त्यांनी चावी ताब्यात घेतली, चावी ब्लॅंकचं निरीक्षण करत गाडीच्या मॉडेलची चौकशी केली आणि उद्गारले, "ही चावी तुमच्या मॉडेलची नाही, दुसरीच आलीय." "अरे बाप रे.." गौरव पुटपुटला. आता काय करायचं? असं प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. विजय चौधरी उत्तरले, "डोण्ट वरी. मी देतो माझ्याकडील.. अर्थात त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील. आणि ती साताऱ्याहून मिळालेली स्पेअर रिमोट की परत करून टाका, मिळतील पैसे परत." या खातरीने गौरवने होकार दिला. अर्ध्या-पाऊण तासात त्या चावी ब्लॅंकला ग्रूव्हिंग आणि शेपिंग करून दिलं, पुन्हा सर्व्हिस सेंटरला परतून चावी टेक्निशियन खाडिलकरांकडे सुपुर्द केली. आता प्रोग्रामिंग बाकी. याला दोन तास तरी लागणार होते. दरम्यानच्या काळात गौरव, क्षितिजा अन भावेश जवळच्या हॉटेलमध्ये जेवून परतले.
वेटिंगमध्ये बसून दोन-अडीच तास झाले.. काम पुर्ण झाल्याचा काहीच निरोप आला नाही. खाडिलकरांना भेटल्यावर "रिमोट की प्रोग्रामिंग तांत्रिक अडचण यात आहे. दोन चाव्या असतील, तरच प्रोग्रामिंग करता येईल. सिस्टिमच तशी आहे. आमच्या दुसऱ्या टेक्निशियनने हेड ऑफिसशीसुद्धा कन्सल्ट केलंय. आता दुसरी चावी मिळाल्याशिवाय नाही इश्यू सॉल्व्ह होणार!"
गौरवच्या अंगावर काटाच आला. हा असला काही प्रॉब्लेम येईल, याची कल्पनाच आली नाही. 'एकच चावी अशी कशी प्रोग्रामिंग करता येणार नाही?' हा प्रश्न त्याला छळू लागला. सहज ही शंका विचारायला त्याने थेट चावी एक्स्पर्ट विजय चौधरी यांनाच फोन लावला.
"बहुतेक एकच चावी प्रोग्रामिंग करता येईल असं वाटतंय. मी मागच्या वर्षी असं काही केल्याचं आठवतंय. एक काम करा, लगेचच खाडीलकरसाहेबांना माझी अर्धा तासानंतरची व्हिजिट शेड्युल करायला सांगा. सिस्टिममध्ये शेड्युल जनरेट होऊन मला एसएमएस आला की की मी तिकडे येऊन ट्राय करीन."
खाडीलकरसाहेबांना सांगून विजय चौधरी यांची व्हिजिट शेड्युल केली. आता चार वाजत आले होते. येत्या दोनेक तासात गाडी सुरू झाली, तर पुण्याकडे रिटर्न प्रवास सुरू करता येईल, असा विचार करत गौरव बसला. प्रतुल आणि बाकीचेही पोहोचले होते.
अर्ध्या तासात एक्स्पर्ट विजय चौधरी पोहोचले, खाडिलकरांना भेटून कार ताब्यात घेतली. ड्रायव्हर सीटमध्ये बसून रिमोट-की इग्निशनमध्ये खुपसली. कारच्या कनेक्टरला लॅपटॉप जोडला, प्रोग्रामिंग सुरू केलं. 'आता तरी नक्की होईल ना' या टेन्शनमध्ये असलेला गौरव को-ड्रायव्हरच्या सीटमध्ये बसला.
मागच्या सीटवर आत्मिका & निलू.. काय काय घडतं आहे या उत्सुकतेत..
विजय चौधरी एकेक पॅरामीटर तपासत सेट करत होते, काही इनपुट्स देत होते. काही प्रोसिजरसाठी ते इंटरनेटवर जाऊन माहिती घेत होते. "ओके.. आय सी.. अच्छा.." असे उदगार काढत त्यांचं काम सुरू होतं. त्यांनी अनेक पॅरामीटर्स पुन्हा तपासले. काही इनपुट्स दुरुस्त केली.. "ओक्के.. आय थिंक नाऊ डन" असे उदगार काढत इग्निशनमध्ये चावी फिरवली अन.. अर्ध्या सेकंदात..
..ढुरुम्म ..ढुरुम्म ..ढ्रुमम्म ..र्हूम्म्म ..र्हूम्म्म ..र्हूम्म्म..
..अन स्टार्टर सुरू होण्याच्या आवाजाने सर्वानी कान टवकारले ..इंजीनही स्टार्ट झालं! कार जिवात जीव आल्यासारखी थरथरायला लागली. हृदयाचे ठोके वाढले. गौरवाचा जीव भांड्यात पडला! आत्मिका तर नाचायलाच लागली. निलूचा चेहरा उजळून निघाला.
भावेश, प्रतुल, मनश्री, क्षितिजा यांनी कारकडे धाव घेतली. निलूच्या आईने लांबूनच टाळ्या पिटल्या. आनंदाने "व्वा.. गाडी सुरू झाली" असे उदगार! एक अनिश्चितता संपली होती. रात्री पुण्याला पोहोचून गौरवला उद्या कामावर जाता येणार होतं!
पेमेंटसाठी गौरव खाडिलकर साहेबांना भेटला. ते म्हणाले, "सुरू झाली ना गाडी? गुड. मी सुचवेन की आता याची ड्युप्लिकेट चावीही लगेचच करून घ्या. कारण तुमची जुनी चावी आता उपयोगाची नाही. नव्या ड्युप्लिकेट चावीचं प्रोग्रामिंगसुद्धा आता बनवलेल्या या नव्या चावीबरोबर पेअर करून घ्यावं लागेल. मी सांगतो चौधरींना. डिस्काउंटही मिळेल." पडत्या फळाची आज्ञा मानून लगेचच नवी ड्युप्लिकेट चावी बनवून घेऊन प्रोग्रामिंग व पेअरिंग करून घेतलं.
पेमेंट आणि रिसिटच्या औचारिकता पार पडल्यावर दोन्ही कार पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. थोड्याच वेळात मुंबई-गोवा हायवे वर दोन्ही कार्सनी वेग पकडला..
सैलावलेल्या गौरवने म्युझिक सिस्टिमवर गाण्यांची एक प्लेलिस्ट लावली.
पहिलंच गाणं सुरू झालं - 'हम तुम एक कमरेमें बंद हो..'
"..और चाबी डूब जाय" भावेशने पुढची ओळ जोडून दिली अन मनमोकळ्या हास्यात सर्व जण सामील झाले.
मिसळपाव
प्रतिक्रिया