खूप दिवसांनी घराची बेल वाजली. हो, बंदच होती इतके दिवस आणि ती दुरुस्त करायला कुणाला वेळ तरी कुठे होता म्हणा! बाबांनी दरवाजा उघडला आणि तो आत आला. त्याला पाहिलं आणि हृदयात चर्रऽऽ झालं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि नेहमीप्रमाणे, त्याला काय वाटतंय याचा अदमास मी घेऊ लागले. आजतागायत याच्या मनाचा थांग लागलाच नाही मला आणि उगाच लोकांनी आम्हा बायकांना बदनाम करून ठेवलंय. प्रेमात पडलेल्या पुरुषाला लगेच ओळखतील बायका. पण मनात प्रेम असूनही ओठांवर न आणणारा तुझ्यासारखा बहाद्दर असेल, तर कुठलीच स्त्री त्याच्या मनाचा थांग लावू शकणार नाही.
ऑफिसमध्ये तू माझा सीनियर होतास. तुझ्या टीममध्ये मी जॉईन झाले, त्या वेळी माझी राहण्याची अडचण लक्षात घेऊन तू दीक्षाच्या फ्लॅटवर माझी सोय केलीस. खरं तर तुझा रूममेट मुकेश आणि दीक्षा हे दोघेही सोबत भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारे. एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मैत्रीच्या सुंदर प्रवासाला इथूनच सुरुवात झाली!
तू अत्यंत व्यवहारी व स्वाभिमानी होतास. आपण कुठे जेवायला गेलो, की स्वतःच्या वाटणीचे पैसे आवर्जून द्यायचास. म्हणायचास, “व्यवहार नीट असला की मैत्रीही नीट राहते.” महिन्याचा पगार झाला की गावी आईसाठी आणि बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवायचास. जबाबदारीच्या ओझ्याने तुला तुझ्या वयापेक्षा दहा वर्षांनी मोठं केलं होतं. ज्या वयात आपले इतर सहकारी ऑफिसमधल्या इतर मुलींच्या मागे-मागे करण्यात गुंतलेले असायचे, तू मात्र या सर्वांपासून कोसो दूर.. अलिप्त.. आपल्या रूक्ष चेहऱ्यामागे एक हळवं काळीज घेऊन जगणारा! मी तुझ्या प्रेमात कधी पडले, मला कळलंही नाही!!
मला मराठी साहित्य, कथा, कविता वाचायला खूप आवडायच्या. ऑफिसमध्ये बऱ्याचदा मोकळ्या वेळेत मी कथा-कवितांचं सादरीकरण करायचे. ऑफिसमधल्या लोकांच्या खास फर्माइशी असायच्या माझ्यासाठी. तूही त्यातला एक श्रोता असायचास. पण कौतुकाचा साधा एक शब्दही तुझ्या तोंडून कधी यायचा नाही. मला रोमँटिक चित्रपट खूप आवडायचे. वीकेंडला कुठला नवीन चित्रपट बघावा? असा आपल्या चौघांचा खल चालू झाला, की मी नेहमी कुठलीशी हळुवार प्रेमकथा असलेला चित्रपट सुचवायचे. मग तू कपाळावर आठी घालून “काय करू हिचं?” स्टाईलने माझ्याकडे बघायचास. तुझ्यामुळे बऱ्याचदा माझा प्रस्ताव बहुमताने फेटाळला जाई.
एकदा मात्र मी हट्टाने अडूनच बसले. त्या दिवशी ती सुंदर, हळवी प्रेमकथा असलेला चित्रपट पाहून आपण घरी चालत येत होतो. दीक्षा आणि मुकेश मागून चालत येत होते आणि आपण दोघं पुढे. खरं तर त्या सिनेमाची धुंदी अजून मनावरून उतरली नव्हती.
तू म्हणालास - “कसला फालतू चित्रपट होता. बिनडोक नुसता! कसे काय तुला असले रोमँटिक चित्रपट आवडतात गं? मला असले चित्रपट अजिबात पटत नाहीत. वास्तवात असं काही असतं का?”
माझ्या ढगात तरंगणाऱ्या कल्पनेच्या विमानाला तू वास्तवाच्या मुठीत गच्च पकडून जमिनीवर आपटलंस अगदी!
“मग तुझ्या मते वास्तवात नेमकं काय असतं म्हणे?” भानावर येत मी प्रतिप्रश्न केला.
“आपल्या मागे जे दोघं चालत येत आहेत ना, ते आहे वास्तव. गेले वर्षभर घरातल्यांना लग्नासाठी कसं तयार करायचं? याच विचारात आहेत. फार क्वचितच दोघांना आनंदी पाहिलंय मी. सतत आपलं लग्न कसं होईल याच तणावात असतात. बोलण्यातही तोच विषय. कधीकधी कुणाच्या घरचे जास्त आडमुठेपणा करतात, यावर आताशा त्यांच्यात भांडणंही होत असतात. आत्ताच ही तऱ्हा.. काय सुखाचा संसार करणार आहेत ही दोघं?” तू नुसता वैतागला होतास.
“मग काय झालं? म्हणून प्रेमच करायचं नाही माणसाने? प्रेम म्हटलं की रुसवे-फुगवे आले, विरोध आला, भांडणं आली, एकमेकांना मनवणं आलं...” मी माझी बाजू मांडू लागले.
“पण या सगळ्यांमध्ये प्रेम बाजूला पडून एकमेकांचे अहंकार आणि करपलेली मनं हेच शिल्लक राहतं. माणसं प्रेमात पडतात आणि ते मिळालं नाही, लग्न झालं नाही, की रडत बसतात. त्यापेक्षा प्रेम करावंच का म्हणतो माणसाने?” तू चिडून बोललास.
“हेच तर चुकतं माणसाचं. तुझंच बघ. प्रेम ‘करणं’ आणि ‘मिळवणं’ या दोन गोष्टींची गल्लत करतोयस तू.”
“म्हणजे? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला मिळावी ही भावना चुकीची आहे? मग काय अर्थ आहे प्रेम करण्याला?” तू गोंधळलास.
“तसं नाही अरे.. जशी नदी मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्यात सामावून घेते, तसे आयुष्याच्या प्रवाहात आपण अनेक व्यक्तींना प्रेमाच्या प्रवाहात सामावून घेतो. पण मग जोडीदाराचं प्रेम वेगळं व वैशिष्ट्यपूर्ण कसं? कारण त्यात मुळातच स्वार्थ असतो. आपला जोडीदार आपल्याला मिळावा, त्यानेही आपल्यावर तितकंच प्रेम करावं, कायम आपल्या सुख-दुःखात सोबत असावं, या सगळ्यात प्रेम ‘करणं’ बाजूला पडतं आणि प्रेम ‘मिळवणं’ यावरच सगळं येऊन थांबतं.”
मी माझा मुद्दा आणखी स्पष्ट करत म्हणाले,
“प्रेम करणं हे नदीइतकंच मुक्त, स्वच्छंदी आणि प्रवाही असायला हवं. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती आनंदात असावी, सुखी राहावी इतकीच स्वच्छ भावना महत्त्वाची. मग भले ती व्यक्ती सोबत असली, नसली तरी त्या व्यक्तीवर प्रेम करण्याला बाधा येत नाही ना!”
“पण जर आपलं प्रेम व्यक्तच नाही केलं, तर समोरच्याला कळणार कसं?” तू माझ्याकडे रोखून पाहिलंस.
का कुणास ठाऊक! तुझं असं रोखून बघणं मला असह्य झालं... तुझ्या डोळ्यांत आणि आवाजात एक प्रकारची व्याकूळता जाणवली मला.
“काय पाहतेस अशी? मी काहीतरी विचारलं तुला!” तू म्हणालास.
‘अरे वेड्या… प्रेमाला शब्दांची गरजच नसते! ते डोळ्यांतून अखंड वाहत असतं. उलट त्याचा प्रवाह जाणीवपूर्वक रोखावा लागतो… पापण्यांच्या खाली… अलगद! म्हणून तर आत्ता तुझ्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नाही मी....’ माझ्या मनातले शब्द ओठांवर येत नव्हते. माझ्या पापण्यांची आणि ओठांची सलज्ज थरथर तुला जाणवली की नाही, कुणास ठाऊक? पण तुझ्या “सांगितलं नाही तर कळणार कसं?” या प्रश्नाला “मला नाही माहीत..” असं मोघम उत्तर देऊन मी वेळ मारून नेली खरी!
आपल्याला भेटून एक वर्ष होत आलं होतं. वर्षभर केलेल्या कामगिरीनुसार मला 'बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आणि त्याबरोबर कन्फर्मेशनसुद्धा! मी अतिशय खूश होते त्या दिवशी. खरं सांगायचं तर तुझ्याही चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवशी तू स्वतःहोऊन माझ्याजवळ आलास. इतक्या दिवसात पहिल्यांदाच! "ऑफिस सुटल्यानंतर जेवायला बाहेर जाऊ" म्हणालास.
मी तुला म्हटलं की मला पाणीपुरी खायची आहे. आश्चर्य म्हणजे जराही वाद न घालता तू तयार झालास!
“मला मुकेशमुळे पाणीपुरीच्या सगळ्या चांगल्या जागा माहीत आहेत. आपण सगळेच जाऊ या” असं तू म्हणालास. मुकेश व दीक्षाने समजूतदारपणे काही कारण सांगून आपल्या सोबत यायचं टाळलं. तूही त्यांना पुन्हा आग्रह केला नाहीस!
पहिल्यांदाच.. आपण दोघेच.. एका बाइकवरून मनसोक्त भटकलो. जवळपास सात वेगवेगळ्या ठिकाणची पाणीपुरी खाऊनही माझं काही समाधान झालं नाही. शेवटी एका ठिकाणची पाणीपुरी मात्र अतिशय आवडल्याचं दिसताच माझ्यासाठी आणखी एक प्लेट स्वतः जाऊन घेऊन आलास! माझ्या चेहऱ्यावरची तृप्तता बघून सुखावलेला तुझा चेहरा पाहिला आणि पहिल्यांदाच जाणवलं, की हे केवळ एकतर्फी नक्कीच नाही. तुझ्या मनातही माझ्याबद्दल एक हळवा कोपरा असावा!
त्या दिवशी तुझा वाढदिवस होता. मी म्हणाले, “आपण दुर्गादेवीच्या देवळात जाऊ.” आपण चौघेही बऱ्याचदा जायचो तिथे. देवळाच्या बाहेर, नेहमीप्रमाणे मी अबोलीचा आणि तू मोगऱ्याचा गजरा देवीला वाहण्यासाठी घेतलास.
“काय तू नेहमी तो अबोलीचा गजरा घेतेस? वास तरी असतो का त्याला?” तू म्हणालास.
“परमेश्वराने या सृष्टीत सुगंध, रंग, रूप, स्पर्श, स्वर अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या आहेत. प्रत्येक वस्तूत यातील कोणता ना कोणता गुणधर्म असतोच. त्यामुळे देवासमोर सर्व वस्तू समान आहेत.” मी उत्तर दिलं.
“हो ना. पण तरी आपण देवाला जी गोष्ट आवडते, तीच देतो ना? जसं गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, सुगंधी फुलं! मोगऱ्याचा सुगंध तर लांबूनही जाणवतो. त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही.” तू म्हणालास.
“याहीपेक्षा मला असं वाटतं की, आपल्याला जी वस्तू आवडते ती समोरच्याला द्यावी. त्यात त्याग आहे, समर्पण आहे.” मी स्पष्ट केलं.
“पण समोरच्याला जे पाहिजे ते आणि जे आवडतं ते देणं यात प्रेम आहे, काळजी आहे, भक्ती आहे. तेही श्रेष्ठ नाही का?” तू नेहमीप्रमाणे वाद घालायला सुरुवात केलीस.
“प्रेम, भक्ती, त्याग, समर्पण या सर्व भावना ‘श्रेष्ठ’ असण्यापेक्षा ‘खऱ्या’ असणं गरजेचं नाही का? तुला आवडणारा सुगंधी मोगरा तू देवीला वाहणं जसं योग्य आहे, तसंच माझ्या प्रतिबिंबाची जाणीव करून देणारी ही अबोलीची फुलं देवीला वाहणंही तितकंच योग्य वाटतं मला. या फुलांचा रंग बघ, त्याचा टवटवीतपणा बघ. मला ही फुले चैतन्याचं प्रतीक वाटतात. मोगरा सुगंधाने अस्तित्व दाखवून देतो. पण अबोलीचं अस्तित्व स्वयंभू आहे. या देवीसारखंच!!”
“मला काही तुझं पटत नाही. मला मोगरा प्रचंड आवडतो. मोगरा न आवडणाऱ्या मुलीशी मी अजिबात लग्न करणार नाही.” तू अचानक गुगली टाकलीस.
“हो का? मलाही अबोली प्रचंड आवडते. त्यामुळे अबोलीचा गजरा न देता मला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या मुलाशी मीही लग्नच करणार नाही” असं म्हणून मी तुझा चेंडू स्टेडियमच्या बाहेर टोलवला!
परत येत असताना आपण दोघंही शांत होतो. आतापर्यंत कधीच न छेडलेला विषय आज अचानक ओठांवर आला होता. नकळत दोघंही नको ते आणि गरजेपेक्षा जास्त बोलून गेल्यासारखं वाटलं!
शनिवार-रविवार सुट्टी पाहून आपल्या ऑफिसमधल्या सगळ्यांनी भीमाशंकर येथे ट्रेकला जायचं ठरवलं. पावसाळा नुकताच संपून गेलेला. हिरवाईची शाल पांघरलेलं सह्याद्रीचं ते विशाल, पण लोभस रूप.. धुक्याने वेढलेली पर्वतशिखरं, सृष्टीच्या नवलाईच्या सुगंधाने वातावरण भारलेलं.. आणि सोबत तू!
तू ऑफिसमधल्या सहकाऱ्यांमध्ये गुंतला होतास. तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतास, कुणास ठाऊक? माझं मन मात्र धुक्यासारखं हलकं होऊन तुझ्याभोवती मोरपिशी रुंजी घालत होतं!
चालता चालता तू बराच पुढे निघून गेलास. मला मात्र चालताना धाप लागत होती. खूप थकल्यामुळे वाटेत असणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पाय सोडून बसलेच मी. “लवकर येते” असं सांगून सोबतच्या मैत्रिणींना पुढे जायला सांगितलं.
हळूहळू प्रवाहातल्या छोट्या रंगीबेरंगी माशांनी माझ्या पायाभोवती फेर धरला. त्यांच्या मोहक हालचाली पाहण्यात मी गुंग होऊन गेले. बराच वेळ गेला असावा. तुझे पाय माझ्या पायाच्या बाजूला दिसू लागताच मी बाजूला वळून पाहिलं. तू माझ्याकडे काळजीने पाहत असताना दिसलास.
“बापरे! कुणीतरी चक्क माघारी परत आलंय!” मी जरा चेष्टेतच बोलले.
“तू मध्येच थांबलीस असं कळलं, म्हणून पाहायला आलो. बरं वाटत नाहीये का?” तू अगदी मायेने माझ्या कपाळावर हात ठेवून मला ताप तर आला नाही ना? याची खातरी केलीस. तुझ्या त्या काळजीने भरलेल्या स्पर्शाने मी सुखावून गेले.
“म्हणजे? माझ्याकडे लक्ष ठेवून होतास म्हणायचं..” तुझी चोरी मी पकडली होती.
“चल लवकर. पुढे गेल्यावर वाटेत एक छान धबधबा आहे. तिथे थांबलेत सगळे.” तुझ्या चेहऱ्यावरची काळजी मला स्पष्ट दिसत होती.
“हे निर्मळ वाहतं पाणी, सुंदर निसर्ग, धुक्याने भारलेलं वातावरण इथेही आहेच की. आणखी एक गोष्ट जास्तीची आहे. ती म्हणजे शांतता! हे सर्व सुख सोडून पुढे का जायचं?” मी नकार दिला.
“चल लवकर. सगळे जण धबधब्यामध्ये एन्जॉय करत आहेत. सर्वांसोबत पोहोचायला हवं आपल्याला.” तू घाई करत म्हणालास.
“अशी घाई करून तिथे पोहोचलो तर ‘पर्यटन’ होईल, पण मला हा ‘प्रवास’ अनुभवायचा आहे.” मी म्हणाले.
“त्याने काय होईल?” तू.
“पर्यटनाने मजा मिळते, तर प्रवास आयुष्य समृद्ध करतो. कारण त्यात अनुभव आणि आठवणी असतात. आपल्यातलं आणि या निसर्गातलं अद्वैत अनुभवायचं असेल ना, तर इथे फक्त शांत बसून रहा. ही शांतता अनुभवणं हेच एक प्रकारचं ध्यान आहे. 'झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' असं ग्रेस का म्हणाले असतील, ते उलगडतं अशा वेळी! आयुष्य काय रे.. असंच निघून जातं. पण हेच ते काही क्षण असतात, जे आपल्याला जिवंत असल्याची जाणीव करून देतात. हे काही क्षण मिळणं खूप गरजेचं असतं रे!!”
का कुणास ठाऊक, पण माझा स्वर अतिशय भावुक झाला.
“तू ना, मराठीची प्राध्यापिका व्हायला हवी होतीस किंवा लेखिका! सॉफ्टवेअर इंजिनियर असणं शोभत नाही तुला. तुझं उरलेलं काव्यात्मक तत्त्वज्ञान रात्री शेकोटीच्या कार्यक्रमासाठी राखून ठेव. पण आता मात्र निघायला हवं आपल्याला. चल,” असं म्हणून तू माझे दोन्ही हात धरून उभंच केलंस मला.
“ऐक ना, मला नाही वाटत मी जराही चालू शकेन -”
“मी धरलाय ना हात तुझा. हळूहळू जाऊ या.” तू म्हणालास खरा, पण पुढच्या क्षणी मी कोसळले!!
तू धूसर दिसत होतास..
नंतर कधी ॲम्बुलन्सचा आवाज, हॉस्पिटलची गडबड, इंजेक्शन.. सलाईन…
आई-बाबांचा धूसर, चिंताक्रांत चेहरा
बीप.. बीप.. बीप…
असं काहीतरी अंधुकसं आठवतंय.
आणि आज अचानक तू घरी आला आहेस.
माझ्या फोटोसमोर अबोलीचा गजरा ठेवून तू शांतपणे उभा आहेस!
कधी नव्हे ते तुझे डोळे मला स्पष्ट वाचता येत आहेत.
तुला कळलंय,
खरं प्रेम माणसाला मुक्त करतं.. बांधून ठेवत नाही!!
आज तूही मुक्त आहेस आणि मीही!
माझ्या फोटोसमोर तू ठेवलेल्या अबोलीच्या गजऱ्यातून
तुझ्या प्रेमाचा सुगंध सर्व दिशांना दरवळतोय
अगदी माझ्यापर्यंत!
मिसळपाव
प्रतिक्रिया