Skip to main content

कोरी पाटी....

लेखक उमेश तुपे यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

कोरी  पाटी....

 

शाळेच्या मोडकळीस आलेल्या खिडकीतून अन्वय एकटक बाहेर पाहत होता. वर्गात बहुधा आज त्याचे लक्ष नव्हते. खिडकीतून दिसणाऱ्या पिंपळाची सळसळ तो खिन्नपणे ऐकत होता. वर्गात सुरू असलेल्या पाठांतराचा आवाज पत्र्याच्या पडवीत बऱ्याच वेळेपासून घुमत होता. अचानक पिंपळाच्या फांदीवर घुबड बसले आहे, असे त्याला वाटले.. पण तेथे ते नव्हते. त्याला वाटले, पिंपळावर खरोखर घुबड उतरावे आणि त्याने एकदा त्याचा खरा आवाज आपल्याला ऐकवावा. पण असे काहीच घडले नाही. त्याला  वाईट वाटले. त्याचे डोळे भरून आले. सकाळचा प्रसंग त्याला पुन्हा आठवला. त्याने हळूच आपल्या डाव्या गालावरून हळुवार हात फिरवला. अजूनही तो  सुजलेला होता. शाळेत आल्यापासून त्याला तेच ते परत-परत आठवत होते. सकाळी आपण उगाचच बाबांना इतक्या घाईगडबडीत आपली वही दाखवली,  कदाचित ती दाखवली नसती, तर आपल्याला एका चुकीची दुसऱ्यांदा शिक्षा मिळाली नसती. 

अन्वयचे वर्गात लक्ष नाही, हे शिक्षकांच्या आता लक्षात आले होते. त्यांनी अन्वयला दरडावत आपली वही घेऊन पुढे बोलावले. अन्वय अगदी शांतपणे उठून हळूहळू पुढे आला. शिक्षकांनी काल दिलेल्या अभ्यासातील प्राणी आणि पक्षी यांचे आवाज त्याला वाचायला सांगितले. तो आपल्या वहीतील एकेक शब्द खडाखड वाचू लागला... सिंहाची - गर्जना, वाघाची - डरकाळी, मोराचा - केकारव, घुबडाचा - ***  इथपर्यंत आल्यानंतर अचानक त्याचे डोळे भरून आले आणि कंठ दाटून आला. त्याचे शब्द ओठांमध्येच विरले. त्याने आपल्या वहीतील 'धु' या लाल पेनाने काट मारलेल्या अक्षरावर अंगठा ठेवून ते अक्षर झाकण्याचा अटोकाट प्रयत्न करून 'घु' असे वाचन करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्याला बाबांचे डोळे आठवले आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहू लागले. अचानक अन्वयला काय झाले, हे कुणाच्याच लक्षात आले नाही. शिक्षकांनी त्याला समजावून  शांत करत जागेवर बसवले. 

अन्वय शांतपणे आपल्या वहीतील धुत्कार हा शब्द एकटक पाहू लागला. डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे तो हळूहळू नाहीसा झाला. पिंपळ अजूनही सळसळत होता. अन्वय खोल विचारात बुडाला.  प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक पक्ष्याला आवाज असतोच का? त्यांचा आवाज शब्दात खरेच लिहिता येतो का? असे असेल, तर मुंगीचा आवाज कसा असतो? फुलपाखरू कसे ओरडते? ते का बरे आपल्या पुस्तकात नाही. बाबांना तर सगळेच माहीत असते? हा विचार त्याच्या मनात येताच त्याला एक कल्पना सुचली. त्याच्या चेहऱ्यावर मंद का होईना, पण हसू उमटले. आता तो शाळा सुटण्याची वाट पाहू लागला. कधी एकदा घरी जाईन असे त्याला झाले होते. 

एकदाची शाळा सुटली आणि तो घरी आला. घरी आल्याबरोबर तो आजीकडे गेला. त्याने आजीला विचारले, "आजी, मला बाबांची पहिलीची वही हवी आहे."  आजी क्षणभर गोंधळली. अन्वय बाबांची 'पहिलीची' वही का मागत आहे, हे तिला काही केल्या समजेना. आजी अन्वयला समजावण्याच्या सुरात म्हणाली, "अरे बाळा, बाबांच्या वेळेला पहिलीला वही नव्हती." आजीच्या या उत्तराने अन्वय चकित झाला आणि आश्चर्याने त्याने आजीला विचारले, "म्हणजे बाबा पहिलीला असताना काही लिहीतच नव्हते का?" आजी म्हणाली, "अरे, तसे नाही, म्हणजे बाबाच्या वेळेला पाटी होती.. पाटीवरती पेन्सिलने लिहायचे आणि लिहून झाले की पुन्हा पुसायचे." "म्हणजे झालेल्या साऱ्या चुका आपणच पुसायच्या? मग तर एका चुकीची एकदाच शिक्षा" असे आश्चर्याने म्हणत त्याने आजीकडे बाबांच्या पाटीचा हट्ट धरला. 

आजीला अन्वयचे बोलणे काही समजले नाही, पण त्याच्या हट्टापायी ती अडगळीच्या खोलीत जाऊन बाबांची पाटी शोधू लागली. अन्वयने आपल्या दप्तरातील वही बाहेर काढली. 'धुत्कार' या शब्दासकट लाल पेनाने काट मारलेले पान त्याने टरकन फाडले. मग त्याने एकेक पान मागे उलटले. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर आजीला बाबांची जुनी कापराची पाटी एकदाची सापडली. अन्वयने घाईघाईने ती हातात घेतली. तिच्या कोपऱ्यांची झीज झाली होती. उत्सुकतेने त्याने तिच्याकडे पाहिले. तिच्यावरील धूळ साफ केली. ती आपल्या दप्तरात मावेल की नाही असे त्याच्या मनात येऊन गेले. तो खिडकीजवळ गेला. त्याने ती उजेडात धरली. तिरपी केली. कुठेतरी काहीतरी दिसेल म्हणून नखाने खरडून पाहिले.. निरखून पाहिले.. खोल खोल पाहिलं.. काळ्या रंगांच्या पलीकडे. पण.. ती कोरी होती, एकदम कोरी!  

@ उमेश तुपे, अहिल्यानगर  

दिवाळी अंक वर्ष

वाचने 70
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया