टीप - सदर नाट्यात सामान्य लोक अंधश्रद्धेला बळी कसे पडतात, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच कोण आलंय? याचा खुलासा न करताच नाट्याचा शेवट केला आहे. आता हे वाचकांनीच ठरवायचं, कोण आलंय ते. यावरून वाचकांचे विचार, त्यांची सामाजिक जाणीव कशी आहे याचाही प्रत्यय वाचकांनाच येईल.
कोण येणार आहे?
(हॉलमध्ये सोफ्यावर टिना, क्रिशा बसलेल्या आहेत. इतर दोघी मैत्रिणी रिया आणि जिया बेडरूममध्ये आहेत. सेजल आणि किंजल किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत आहेत. एवढ्यात दाराची बेल वाजते.)
सेजल - (किचनमधून बाहेर येत) प्रिंजल आलीय वाटतं. (दार उघडते) अरे व्वा! तूच आलीस तर. ये. ये.
प्रिंजल - मग काय माझं भूत येणार होतं होय? (दोघी आत येताच सेजल दार बंद करते. इतर मैत्रिणींना बघत) अरे, टिशा, क्रिशा तुम्हीही आहात तर.
टिना - केवळ आम्हीच नाही, रिया, जिया, किंजलदेखील आहेत.
प्रिंजल (सेजलला) - म्हणजे तू सर्वांना बोलावलंस तर.
सेजल - मग काय करू? प्रसंगच तसा आहे.
प्रिंजल - काय झालंय? सांगा मला सविस्तर. (दोघी सोफ्यावर बसतात. )
सेजल - तेच सांगण्यासाठी तर तुम्हा सर्वांना बोलावलं आहे.
क्रिशा - हिने फोन केला आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आम्ही त्वरित आलो बघ.
सेजल - तुम्ही साऱ्या जणी माझ्या बेस्ट मैत्रिणी आहात. मी बोलावल्याबरोबर तुम्ही सगळ्या जणी आलात, म्हणून मी तुमची आभारी आहे. थॅंक्यू व्हेरी मच हा.
प्रिंजल - थॅंक्यू वगैरे नंतर. अगोदर तुझ्यावर असं कोणतं मोठं संकट आलंय ते सांग.
सेजल - बरं सांगते. ऐक. तुम्हाला माहीतच आहे की मी विवाह करणार नव्हते.
प्रिंजल - हो, त्याचं काय? शालेय जीवनात एका मुलाने तुझी छेड काढली होती .त्याचा रोष तू सर्व पुरुषजातीवर ठेवलास, हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे. पुढे बोल.
सेजल - परंतु माझ्या मातापित्यांची तीव्र इच्छा होती की मी विवाह करावा. त्यांच्या अंतिम क्षणात त्यांची हीच इच्छा व्यक्त होती. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्या़ंनी माझ्यासाठी सर्व काही केलं. मी त्यांच्यासाठी काहीही केलं नाही, याचं मला दुःख आहे. म्हणून मी निर्णय घेतलाय.
प्रिंजल - (उत्साहित होत) विवाह करण्याचा!
सेजल - होय.
प्रिंजल - मग बरं आहे की. एवढी सीरियस का आहे? कर की विवाह.
(एवढ्यात किंजल किचनमधून बाहेर भज्यांची प्लेट घेऊन येते.)
किंजल - हे घ्या. खा. (बेडरूममधील मैत्रिणींना हाक मारते.) रिया, जिया, बाहेर या. (त्या दोघी बाहेर येतात.)
रिया व जिया (दोघी एकदम) - हाय प्रिंजल. कशी आहेस?
प्रिंजल - हाय. मी बरी हाय.
टिना - तर आपण सात जणी पुन्हा एकदा एकत्र आलो तर.
क्रिशा - या सेजलच्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता.
प्रिंजल - तर मग सेजल, सविस्तर सांग. तुझ्या विवाहात अडचण कसली आहे?
सेजल - त्याचं झालं काय, की मी विवाहाचा विचार करत होते आणि एके दिवशी एक साधू दारात आला. मला पाहून माझी परिस्थिती, माझी मनीषा याबाबत सर्व काही खरं खरं सांगितलं.
प्रिंजल - अगं, तू या साधूबिधूच्या नादी लागू नकोस. हे साध्या भोळ्या लोकांना असेच शब्दात गुंडाळून फसवत असतात. आपणा सर्वांच्या समस्या सारख्याच असतात. ते खडा टाकून पाहतात. लागला तर लागला आणि आपण त्यांच्या शब्दजाळात फसत जातो.
सेजल - मला हे सर्व ठाऊक आहे. पण त्या साधूने जे सांगितलं ना, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
प्रिंजल - असं काय सांगितलं त्याने की तुझा विश्वास बसला त्यावर?
सेजल - माझा विवाह न करण्याचा निश्चय, त्यामागील कारणं, मातापित्यांची इच्छा, त्याचं जगातून जाणं हे सर्व जसंच्या तसं कथन केलं. आता अशी समस्या सगळ्यांनीच नसू शकते ना.
क्रिशा - म्हणून आम्हालाही चाट पडायला झालं.
टिना - सुरुवातीला मलाही हे पटलं नाही. पण पुढे त्याने जे सांगितलं, ते तर सुन्न करून जातं.
प्रिंजल - असं? तर सांग.
सेजल - तो साधू मला म्हणाला, तुझ्या जीवनात विवाहयोग आहे. तुझा जुना परिचयाचा मुलगा तुझा भावी पती होईल.
प्रिंजल - जुना मित्र? कोण बरं असेल?
रिया - त्या साधूने तिला तर डायरेक्ट सांगितलं की शालेय जीवनात इयत्ता दहावीत असताना एका मुलाचं हिच्यावर प्रेम होतं. त्याच्याशीच हिचा विवाह होणार.
प्रिंजल - (नवल प्रकट करीत) काय म्हणतेस?
जिया - मग आहे की नाही सुन्न करणारी बाब?
प्रिंजल - मग तो मुलगा कोण, हे कसं ओळखायचं?
क्रिशा - त्यांची खूणही त्या साधूने सांगितली आहे.
प्रिंजल - सांग ती खूण.
सेजल - तो मुलगा आपल्या दहावीच्या वर्गातील असेल. त्याचा विवाह झालेला नसेल. तो येताना सोबत घरातील लहान मुलाला घेऊन येईल आणि बहाणा करेल की ह्या मुलाच्या हट्टापायी आलो.
प्रिंजल - आणखी काही?
सेजल - तो वर्षातील ज्या दिवशी रविवारी अमावस्या किंवा पौर्णिमा असेल, त्या दिवशी येईल.
रिया - आणि आज रविवार आहे व अमावास्याही आहे.
प्रिंजल (शॉक बसल्यागत करत) - अरे बापरे! फारच भयंकर प्रकार आहे हा! याबाबत काय बोलू? माझी मती सुन्न झाली आहे.
टिना - मग आमचीही अवस्था तशीच झाली होती हे ऐकून.
प्रिंजल - तरीही मी म्हणेण की यावर विश्वास ठेवू नये. त्या साधूने तुझ्याकडं काही पैसे वगैरे मागितले का?
सेजल - एक पैसादेखील नाही. निरपेक्ष भावाने त्याने मला हे भविष्य सांगितलं आहे. मग आता तूच सांग, मी विश्वास का ठेवू नये?
प्रिंजल - मग तो मुलगा कोण असावा? काही अंदाज?
रिया - आपल्या दहावीच्या वर्गातील तीन मुलं अजूनही अविवाहित आहेत.
प्रिंजल - कोण कोण?
जिया - प्रणय, अजय आणि जितेंद्र.
टिना - पण जितेंद्र एकदम फेल गेलेला आहे. तो न आलेलाच बरा.
प्रिंजल - तुला कसं ठाऊक?
टिना - माहित्येय मला. मी पाहिलंय त्याला. तो मालवाहतूक लाईनमध्ये गेला. ट्रकचालक झाला. खूप पितो. दिवसभर झिंगून असतो. या ट्रक ड्रायव्हर लोकांचा भरोसा नाही. ट्रक घेऊन देशभरात फिरत असतात. भूक लागली की कुठेही तोंड घालतात. माझ्या सांगण्याचा अर्थ समजला ना?
प्रिंजल - होय. मग प्रणय कसा आहे?
जिया - तो एकदम मस्त मुलगा आहे सेजलसाठी. देखणा आहे. सुस्वभावी आहे. चांगला जॉब आहे. तोच यायला पाहिजे.
किंजल - पण त्याच्या घरी लहान मुलं नाहीत. त्याच्या भावाची मुलं मोठी झाली आहेत.
प्रिंजल - मग तिसरा कोण?
सेजल - अजय.
प्रिंजल - काय म्हणतेस? अजय? (सर्वांचे चेहरे प्रश्नमुद्रेत जातात.) तो तर...
सेजल - दिव्यांग आहे.
प्रिंजल - त्याचं तुझ्यावर प्रेम होतं शाळेत?
सेजल - असेलही. प्रेम हे मनाने करतात, शरीराने नव्हे. मी त्याच्या फिलिंगची कदर करते. परंतु आता समस्या ही आहे की आता नक्की कोण येईल?
टिना - जितेंद्र आला तर?
रिया - त्याला नाहीच सांग.
क्रिशा - प्रणय आला तर?
जिया - तर छान होईल.
किंजल - आणि अजय आला तर? तू करशील दिव्यांगाशी विवाह?
(क्षणभर शांतता)
प्रिंजल - यापेक्षा तू या भानगडीत पडू नकोस. ह्या तिघांना टाळ. आमच्यापैकी कोणाच्या तरी नात्यातील मुलाशी विवाह कर.
क्रिशा - होय. हेच उत्तम होईल.
सेजल: - पण साधूने भविष्य जसं सांगितलं तसंच घडतंय. विवाहाचा विचार नंतर करू. पण आता येणार कोण याचं टेन्शन आलंय.
रिया - तिघांपैकी कोणीही आलं तरी त्यांना कळू देऊ नकोस की तुला त्यांच्याबदल सर्व काही माहीत आहे. चहा-नाश्ता दे आणि निरोप घे.
सेजल - हो, मी तसंच करणार आहे. पण इथे कोणीही ऐरागैरा येणार नाही. शाळेत असताना माझ्यावर प्रेम करणारा मुलगा येणार आहे. तोही स्वतःहोऊन. माझ्या ओढीने.
प्रिंजल - मग जो येईल त्याच्याशी विवाह करणार तर?
सेजल - मी त्या तिघांच्या प्रेमाचा आदर करते. पण जीवनसाथी म्हणून जितेंद्र नकोय. अजय तर दिव्यांग आहे. राहिला प्रणय. त्याचा विचार करू शकते.
रिया - पण यापैकी येणार तर कोणी एकच. शिवाय साधू काय म्हणाला आहे, त्याच्याशीच तुझा विवाह होणार आहे. जितेंद्र किंवा अजय आला तर तू काय करशील?
क्रिशा - हे सर्व अंधश्रद्धा म्हणून सोडून दे. डोक्याचं टेन्शन जाईल. मला तर वाटतं कोणीही येणार नाही. ज्याचं तुझ्यावर दहावीत प्रेम होतं, त्याने एवढ्या वर्षांत त्याचं प्रेम व्यक्त केलं नाही, तो आता चाळिशीनंतर काय व्यक्त होणार?
टिना - पण जर खरोखरच कोणी आलं तर?
सेजल - जितेंद्र आला, तर विवाहाचा विचार रद्द. प्रणय आला, तर एका पायावर तयार.
प्रिंजल - आणि अजय आला, तर?
सेजल - काही समजत नाही. बहुतेक त्यालाही नकार.
रिया - पण मला वाटतं, आपण उगाच आपलं डोकं खपवतो आहे. हा सर्व भ्रम आहे. असं काहीही होणार नाही.
टिना - मलाही तसंच वाटतं.
प्रिंजल - बाकींचीचं काय मत आहे? (सर्व नाही या अर्थी माना हलवतात.) म्हणजे ठरलं तर. हा विषय इथेच संपवू या.
सेजल - हो गं. पण उगाच वाटतंय, कोणीतरी येईल.
प्रिंजल - बस झालं आता. हा विषय संपला. यानिमित्त आपण एकत्र आलोय, तर पार्टी करू या.
(एवढ्यात बेल वाजते. सर्वांच्या नजरा दाराकडे. मुद्रेवर असा भाव की दारात कोण आलं आहे?)
- समाप्त -:
लेखक
श्री. नवनाथ बाळकृष्ण तांडेल
मिसळपाव
प्रतिक्रिया