आज कंपनीच्या गेटबाहेरून जाताना एका ट्रकला क्रेनने अलगद कॉईल चढवताना पाहिलं. ड्रायव्हर एसी केबिनमध्ये बसून मोबाईलवर बोलत होता. लोडरने बटण दाबलं, लोखंडी रनरवर कॉईल सरकली, पट्टे आवळले गेले. दोन मिनिटांचं काम. मी उगाच थांबलो. उन्हात उभा राहून त्या आवाजात नव्वदच्या दशकातला ठक् ठक् ऐकू लागलो.
तेव्हा आवाज वेगळा होता.
गोष्ट साधारण ९०-९२ सालची. आमच्या सीआरएम प्लांटला दिवसाला दहा-बारा गाड्या लागायच्या. सकाळी पाच वाजता सायरन व्हायचा, पण डिस्पॅचवाल्यांचा दिवस कधीच संपायचा नाही. गाडी लोड झाली की मिळणारे पैसे ही आमची खरी पगारवाढ होती. तेव्हा कायदा नव्हता, पावती नव्हती. ड्रायव्हर खूश झाला की शंभर-दीडशे रुपये हातात ठेवायचा. वीस-तीस रुपये मिळाले, तरी आम्ही चहा-सिगारेटसाठी वाटून घ्यायचो. आता पोरं सांगतात, दोनशे-तीनशे रुपये रेट झालाय. पण त्या वीस रुपयांत जी मजा होती, ती आजच्या यूपीआयच्या नोटिफिकेशनमध्ये नाही.
पहिलं लोडिंग म्हणजे युद्धच असायचं. कॉईल म्हणजे एखाद्या राक्षसी विळ्यासारखा दोन-तीन टनाचा गोल. तिला ट्रकच्या सपाट पाठीवर टिकवायची कशी? आम्ही लाकडाचे ओबडधोबड ठोकळे लावायचो. माप नाही, शास्त्र नाही. कॉईल ठेवली की ठोकळा इकडून तिकडे घसरायचा. जीव मुठीत धरून काम. कधीकधी ट्रक ब्रेक मारताच कॉईल सरकून केबिन फोडायची, ही भीतीच वेगळी.
मग हळूहळू अक्कल आली. तीन-तीन फुटाचे, बरोबर मापाचे ठोकळे कापायला लागलो. कॉईल ठेवून तिला मोठ्या खिळ्यांनी ठोकायचो. खिळे ठोकताना हातावर हातोडा पडायचा, पण कॉईल जागची हलायची नाही.
आणि मग देशमुख आला. देशमुख इंजिनिअर. देखणा, बारीक मिशी, सतत काहीतरी माप घेत फिरणारा. त्याने त्या चार ठोकळ्यांकडे बघितलं आणि म्हणाला, "हे काय गबाळ आहे?" त्याने ड्रॉइंग काढलं. लाकूड गेलं, त्या जागी लोखंड आलं. पहिले घुटके होते, आता रनर आले. एकच अचूक, तंतोतंत मापाचा रनर. चार ठोकळ्यांऐवजी एकच. त्याने डिझाईनवर डिझाईन बदलली. वेल्डिंग, कटिंग, ट्रायल. शेवटी सिस्टिम ओके झाली. कॉईल लाईनवर जोडायचा वेळ अर्ध्यावर आला. त्यामुळेच तरआमच्या पूर्ण डिस्पॅच डिपार्टमेंटला क्वालिटी कंट्रोलचं सर्टिफिकेट मिळालं होतं. तो आमचा हिरो होता.
पण हिरो फार काळ थांबत नाहीत. देशमुख फार दिवस राहिला नाही. परदेशी गेला. आला तेव्हा आम्ही त्याला ओळखलंच नाही. दाढी वाढवलेली, डोळे आत गेलेले, एखाद्या ऋषिमुनीसारखा.. नोकरी सोडून संन्यास घेतल्यासारखा वावरायचा. त्याच्यासोबत घुटे नावाचा दुसरा साहेब होता. तो अगदी उलटा. दिसायला एकदम शांत, मवाळ बोलणारा, पण आतून काड्या करणारा. कामगारांमध्ये तो कधीच आवडीचा झाला नाही. देशमुख निदान रागवायचा, शिव्या द्यायचा, पण मनात ठेवायचा नाही. घुटे गोड बोलून घात करायचा.
खरं सांगायचं तर घुटे-देशमुखपेक्षाही सीनियर असलेली माणसं होती. त्यांना आम्ही 'लुटारू' म्हणायचो. शिफ्ट इन्चार्ज होते, पण कामगारांकडूनच पैसे काढायचे. आम्ही घाम गाळून ट्रक लोड करायचो, ड्रायव्हरकडून शंभर रुपये मिळायचे, आणि हे येऊन छातीवर उभे राहायचे - "ए, कितना हुआ रे?" हिशोब मागायचे आणि आपला हिस्सा काढून घ्यायचे. ब्लॅकमेलच करायचे! पण गंमत म्हणजे देशमुख आणि घुटेने कधीच या पैशाच्या भानगडीत लक्ष घातलं नाही. ते त्यांच्या लोखंड-मापातच गुंतलेले.
आणि याच गर्दीत होता सुकीनाथ.
सुकीनाथ आमच्यापैकीच एक. वयाने चाळिशीचा, कपाळावर कायम चंदनाचा टिळा, तोंडात राम-नाम. दिसला की वाटायचं, किती सात्त्विक माणूस. पण तो आमच्या डिस्पॅचचा कृष्ण होता, फक्त त्याची बासरी चोरीसाठी वाजायची.
त्याची कला भारी होती. एखादा नवीन ट्रक आला, पंजाबी सरदारजी ड्रायव्हर, गाडी धुऊन-पुसून आणलेली. सुकीनाथ लगेच पुढे व्हायचा. "सरदारजी, आपकी गाडी नयी दिख रही है! बहोत बढिया! एक काम करो, साहब लोगों को थोडी खातिरदारी करनी पडती है। बाहर से कुछ नाश्ता-पाणी, पान-सिगरेट लेके आओ।"
सरदारजीला वाटायचं, नवीन गाडी आहे, लोड नीट झाली पाहिजे. तो बाहेरच्या कॅंटीनमध्ये जायचा. आम्ही सांगायचो, "अर्धा किलो पेढे आणा", तो आपल्या मनाने एक किलो आणायचा. सुकीनाथ ती मिठाईची पिशवी घ्यायचा, दोन-चार पेढेसाहेबांना, दोन-चार आम्हाला वाटायचा आणि बाकीची पिशवी आपल्या लॉकरमध्ये. संध्याकाळी लॉकर उघडला की आत अत्तराचा आणि पेढ्यांचा घमघमाट.
हा फक्त ट्रेलर होता. त्याची नजर ड्रायव्हरच्या केबिनवर असायची. ड्रायव्हर उन्हात गाडी लावून झाडाखाली जेवायला किंवा झोपायला गेला की सुकीनाथचं काम सुरू व्हायचं. केबिनमध्ये शिरायचा आणि हात साफ करायचा. कधी बूट, कधी स्वयंपाकाची कढई, कधी स्वेटर-मफलर. एकदा तर एक ड्रायव्हर गावाहून आंब्याच्या दोन पेट्या घेऊन आला होता, मुलांसाठी. सुकीनाथने दोन्ही पेट्या लंपास केल्या. एक-दोन आंबे साहेबांना दिले - "साहेब, ड्रायव्हरने दिले" बाकी घरी. कांदे, बटाटे, शेंगदाणे, मसाल्याच्या पुड्या, काहीच सोडलं नाही त्याने.
सुरुवातीला आम्ही हसायचो. "सुकीनाथने आज काय आणलं?" हा आमचा टाइमपास होता. पण नंतर गोष्ट हाताबाहेर गेली. त्याने मोबाइल चोरायला सुरुवात केली. तेव्हा मोबाइल म्हणजे श्रीमंतीचं लक्षण. ड्रायव्हर लोक ऑफिसमध्ये चार्जिंगला लावायचे, तिथून गायब. मग आमच्याच लोकांचे मोबाइल गायब होऊ लागले. लॉकरमधून जेवणाची, चहाची कूपन्स गायब होऊ लागली. सगळ्यांना माहीत होतं कोण करतंय, पण कोणी बोलत नव्हतं. कारण सुकीनाथच्या हाताखालचा एक पोरगाही हळूहळू त्याच वाटेने जाऊ लागला होता. चोरीची शाळा सुरू झाली होती.
तो पोरगा वेगळाच होता.
मिसळपाव
प्रतिक्रिया