जो जिवंत तो मरेल, पण निर्जीव मात्र जगेल
ख्मेर रूजने १९७५ हे 'शून्य वर्ष' जाहीर करून तेथून पुढचा कंबोडिया एक पूर्णतः शेतीनिष्ठ ग्रामीण देश बनवण्याचे ठरवले. या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी नॉम पेन्ह आणि इतर सगळ्या मोठ्या शहरातील लाखो लोकांना शारीरिक कष्टाचे आणि शेतीशी संबंधित काम करण्यासाठी खेड्यापाड्यात सक्तीने हलवण्यात आले. या साच्यात बसू न शकणारे बुद्धिजीवी लोक, भिक्षू, धार्मिक अल्पसंख्य गट आणि आधुनिक विचाराचे 'वाटणारे' (उदाहरणार्थ चश्मा वापरणारे) अशा लोकांना अतिशय हालअपेष्टा सोसायला लावण्यासाठीच बनवलेल्या तुरुंगांमध्ये डांबून काही काळाने त्यांच्यासाठी देशभरात बनवलेल्या 'घाऊक दफन केंद्रात' अतिशय क्रूरपणे मारून टाकण्यात आले. हा नरसंहार कमीत कमी खर्चात करण्यासाठी डोक्यावर जाड दंडुक्याचे फटके मारणे, गळफास लावणे, धारदार शस्त्राने गळा कापणे, गुदमरवून ठार मारणे असे विविध प्रकार वापरले गेले. ख्मेर रूजच्या कित्येक सैनिकांनी खेळ म्हणून बालकांना आणि लहान मुलांना झाडावर आपटून ठार करणे, वर उडवून गोळ्यांनी टिपणे, जिवंत असतानाच संगीन वापरून त्यांचे पोट चिरणे असे उद्योग तर केलेच, तसेच अशा सगळ्या 'खेळात' नरमांसभक्षणसुद्धा केले गेले, असे आरोप झाले. अनेकांना सदैव अर्धपोटी राहणे नित्याचे केल्यामुळे असे काही झाले असणे सहज शक्य आहे.
पूर्ण कंबोडियाभर ख्मेर रूजने केलेल्या नरसंहाराचे प्रमाण, प्रकार आणि मारलेल्या लोकांना पुरलेल्या जागा हे सगळेच इतके विविध आणि विस्तृत प्रमाणावर होते की मारलेल्या लोकांच्या संख्येबद्दल जगभरातील तज्ज्ञ अनेक वर्षे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे अंदाज करत होते. हे सगळे अंदाज लक्षात घेऊन ख्मेर रूजमुळे मारले गेलेल्यांची संख्या १५ लाख ते ३० लाख किंवा १९७५ सालच्या कंबोडियाच्या लोकसंख्येच्या २०% ते २५% असावी, असा सध्याचा एक सर्वमान्य विचार आहे.
ख्मेर रूजच्या या पराक्रमामुळे निदान शहरी लोकवस्तीतल्या प्रत्येकाला इ.स. १९७५ ते १९७९ या काळात अनेक वेळा वाटून गेले असेल - "जो जिवंत तो मरेल".
'जुने जाऊ द्या मरणालागून, जाळुन किंवा पुरून टाका' हेच बोधवाक्य असल्यासारखे वागत कंबोडियाच्या सगळ्याच 'जुन्या' लोकांना मारून आणि पुरून टाकणाऱ्या ख्मेर रूजने जणू काही 'जो जिवंत तो मरेल, पण निर्जीव मात्र जगेल' हे या लेखाचे शीर्षक सार्थ करत कंबोडियाच्या जुन्या वैभवाचे प्रतीक असलेल्या 'अंकोर वाट' मंदिर समूहाला मात्र काहीही इजा पोहोचवली नाही.
सुमारे ९०० वर्षांपूर्वी ख्मेर वंशाच्या सूर्यवर्मन दुसरा या हिंदू राजाने इ. स. ११२२ ते ११५० या काळात 'अंकोर वाट' मंदिर समूह बांधला. त्या काळात विष्णू ही तेथील मुख्य देवता होती. इ.स. १२व्या शतकाच्या शेवटी शेजारील राजांच्या हल्ल्यामुळे त्या वेळच्या जयवर्मन सातवा या राजाने आपली राजधानी अंगकोर थॉम येथे हलवली. तसेच त्याने बांधलेली अंकोर वाट मंदिर समूहातील नवी मंदिरे विष्णु मंदिरे असण्याऐवजी 'बौद्ध' मंदिरे झाली. इ.स. १५व्या किंवा १६व्या शतकापासून राजाश्रय तसेच लोकाश्रय नाहीसा होत गेल्याने या मंदिरांची व्यवस्थित देखभाल झाली नाही आणि ती जीर्णावस्थेत जाऊ लागली. जरी त्या मंदिरांतील भिक्खू आणि स्थानिक भक्त यांची ये-जा चालू राहिली, तरी त्यांचा सुवर्णकाळ संपला आणि त्यानंतर हळूहळू आजूबाजूच्या जंगलाने मंदिरांवर आक्रमण सुरू केले. असाच काही काळ गेल्यावर जंगलाने त्यांचा ताबा घेतला आणि हा एकेकाळचा भव्य दिव्य जागतिक वारसा जनमानसातून पुसला गेला.
सगळ्याच जगाच्या भाग्यामुळे असेल, इ.स. १८६० साली Henri Mouhot (फ्रेंच उच्चार आनरी मूओ) या फ्रेंच शोधकाला स्थानिक लोकांच्या मदतीने गवत आणि जंगलातील वाढ यात बरेचसे झाकले गेलेले 'अंकोर वाट'चे 'अवशेष' (अर्धवट ढासळलेली मंदिरे, विस्थापित शिल्पे आणि जंगलाच्या ताब्यातील इमारती) दिसले. त्याने जुजबी साफसफाईतून जे काही जंगलाच्या तावडीतून सोडवता आले, त्याची रेखाचित्रे जगापुढे मांडून जगाला या असाधारण ठेव्याची ओळख करून दिली आणि त्या सगळ्याच मंदिरांचा तातडीने जीर्णोद्धार करण्याची गरज जाणवून दिली. त्या भागाची सत्ता जेव्हा फ्रेंचांकडे आली, तेव्हापासून सुरू झालेले जीर्णोद्धाराचे काम मागील काही दशकांत इतर अनेक राष्ट्रांनी हातभार लावूनसुद्धा अजूनही पूर्णतः संपलेले नाही, इतका या अंकोर वाटमधील सगळ्या मंदिर समूहाचा अवाढव्य विस्तार आणि त्याच्या पुनरुज्जीवनाचा व्याप आहे.
सध्या जपान, फ्रान्स, चीन, भारत, जर्मनी, अमेरिका, दक्षिण कोरिया अशा अनेक वेगवेगळ्या देशांतील तज्ज्ञ आपापल्या देशातर्फे मदत म्हणून या मंदिर समूहाच्या जीर्णोद्धारात वेगवेगळ्या भागात कार्यरत तर आहेतच, त्याखेरीज जागतिक स्तरावरील Coordinating Committee for the Safeguarding and Development of the Historic Site of Angkor (ICC-Angkor) आणि World Monuments Fund अशा संस्था या बहुमूल्य ठेव्याच्या जतनकार्यात व्यवस्थापन, आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य अशा विविध प्रकारे सहभागी आहेत.
'अंकोर वाट'च्या ४०० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या आणि वेगवेगळ्या अवस्थेत असलेल्या १०००पेक्षा अधिक देवळांशी संबंधित वेगवेगळ्या काळातील इमारती, शिल्पे आणि नगररचनेचे इथे फक्त विहंगमावलोकन केलेले आहे. हे स्थळ अशा धार्मिक तऱ्हेच्या स्थळांतील जगातले सगळ्यांत मोठे स्थळ आहे. जगातील सर्व कॅथॉलिक ख्रिश्चन लोकांचे मुख्य भक्तिस्थळ असलेल्या Vatican Cityचा विस्तार फक्त १२० एकर आहे, हे लक्षात घेता अंकोर वाटच्या भव्यतेची कल्पना यावी.
सुमारे हजार वर्षांपूर्वी, त्या काळातील मोजमाप, बांधकाम, यंत्रसामग्री या सगळ्याच बाबतीत जे काही मर्यादित तंत्रज्ञान उपलब्ध होते, ते वापरून अशी भव्य रचना बनवली गेल्याबद्दल जागतिक दर्जाच्या अनेक स्थापत्यविशारदांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आतापर्यंत बऱ्यापैकी सुस्थितीत आणलेल्या मुख्य देवळाची ५ शिखरे हिंदू विचारधारेतील मेरुपर्वताचे प्रतीक मानली जातात. या चौरस बांधकामातील मध्यवर्ती देवळाचे शिखर ६५ मीटर (म्हणजे सध्याच्या सुमारे १५ ते २० मजली इमारतीइतके) उंच आहे. चारही कोपऱ्यातील देवळांची शिखरे अशा तऱ्हेने बांधली गेली आहेत की या पांचही शिखरांची बाह्याकृती उमलत्या कमळासारखी दिसते. ही बाह्याकृती सध्याच्या कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर विराजमान आहे. या मंदिराच्या रचनेइतकेच त्याचे प्रांगण, विशेषतः त्या प्रांगणाभोवतालच्या भिंतीवरील एकूण १,००० चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची विविध भित्तिशिल्पे भव्य आणि वैविध्यपूर्ण आहेत. त्यातील 'समुद्रमंथन' हे चित्र हिंदू पौराणिक कथांबद्दलचे एक जागतिक महत्त्वाचे शिल्प मानले जाते. मंदिरात वेगवेगळ्या प्रकारची अशाच उच्च दर्जाची सुमारे ३,००० अप्सरांची भित्तिशिल्पे आहेत.
मिसळपाव
प्रतिक्रिया