गंधमाहात्म्य
गंधाचे आणि आपले नाळेचे नाते आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नुकतेच जन्मलेले बाळ, डोळेदेखील न उघडता आपल्या आईला ओळखते ते केवळ आईच्या गंधावरून, तिच्या अंगाच्या वासावरून. श्वास आणि वास ह्यांचेसुद्धा असेच एक अतूट नाते आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत वास आहे. श्वास संपला की वास संपला. वास-गंधाचे हे नाते डोळे उघडल्यापासून डोळे मिटेपर्यंत आपल्याबरोबर राहते.
वास आणि गंध, दोघांचा अर्थ जरी एकच असला, तरी कपडे आणि वस्त्र किंवा दागिने आणि आभूषणे ह्यात जो फरक आहे, तोच ह्या दोघांत आहे. एकात अगदी साधेपणा आहे, तर दुसऱ्यात एक दिमाख आहे. एकात रूक्षपणा आहे, तर दुसऱ्यात माधुर्य आहे, एकात गरज आहे, तर दुसऱ्यात गझल आहे. वास पसरतो, पण गंध दरवळतो. तसे पाहू गेल्यास हे दोन्ही शब्द एकदम नि:पक्षपाती, निरुपद्रवी आहेत. नुसते ‘वास’ किंवा ‘गंध’ म्हटल्याने फारसे काही कळत नाही, पण त्याला ‘सु’ अथवा ‘दु’ लावल्याने त्याचे खरे स्वरूप समोर येते. ‘सुवास’, ‘सुगंध’ हे शब्ददेखील प्रसन्न करतात. पण तेच ‘दुर्गंध’ ‘दुर्वास’ हे नुसते शब्द ऐकूनदेखील नकोसे वास आल्यासारखे वाटते. काय म्हणालात? ‘दुर्वास,’ ‘सुवास’च्या विरुध्द अर्थाचा शब्द नाही? तरीच शाळेत मी ‘सुवास’च्या विरुद्ध ‘दुर्वास’ लिहिल्यावर गुरुजींनी दुर्वास ऋषींसारखा चेहरा करून, पेपरावर शापरूपी भोपळा काढला होता.
रामायण, महाभारत हे स्त्रियांमुळे घडले, असे खूपशा इतिहासकारांचे म्हणणे आहे, मात्र वास, गंध हेच रामायण-महाभारताच्या मुळाशी आहेत असे जर म्हटले, तर ते वावगे ठरू नये. असे बघा, घीवर कन्या मत्स्यगंधेच्या कोमल तनूच्या गंधाने शंतनूला कुरू वंशाच्या सम्राटाला आकृष्ट केले आणि पुढचे महाभारत घडले. तोच प्रकार रामायणात. वनवासात सीतेला आधी कस्तुरीमृगाच्या गंधाने आणि नंतर त्याच्या रूपाने भुरळ पाडली, त्याच्या पुढचे रामायण तर सर्वश्रुत आहेच. म्हणजे बघा - जगातल्या दोन महाकाव्यांच्या निर्मितीला गंध किती कारणीभूत आहेत ते.
गंधाचे एवढे महत्त्व असूनसुद्धा वास, गंध ह्या अनुभूती दुर्लक्षिलेल्या आहेत. पंचेंद्रियांच्या प्रत्येक अनुभूतीला एक नाव आहे. डोळ्यांनी जे पाहतो, त्या अनुभवाला सुंदर, अप्रतिम, तेजस्वी, ओंगळ, भोंगळ, चमकदार, अशी नावे आहेत. ह्याच डोळ्यांनी दिसण्यात येणाऱ्या रंगांना तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा अशी नावे आहेत. कानाने जे ऐकतो, त्याला सुमधुर, सुश्राव्य, कर्णकर्कश, बेसूर अशी नावे आहेत. जिभेने घेतलेल्या अनुभूतीला गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट अशी नावे आहेत. स्पर्शालादेखील आपण नावे दिली - मऊ, राकट, कणखर, गरम, नरम, थंड वगैरे. मग वासाला नावे न देऊन वासाचीच का वासलात लावून टाकली? कोणत्याही वासाला स्वत:चे असे नाव नाही. कोणत्याही वासाचे अथवा गंधाचे वर्णन करताना आपण नेहमी तुलनात्मकच बोलतो, उदा., 'मोगऱ्यासारखा वास, केवड्यासारखा वास, कचऱ्यासारखा दुर्गंध, कुजलेला वास, करपलेला वास, (तुलनात्मक) तिखट वास, आंबूस वास, गोड वास, (चवीच्या संदर्भाने) इत्यादी. असे का झाले असावे?
खाण्याच्या कोणत्याही पदार्थाला चव तर असावी लागतेच, त्याच्याशिवाय त्याला एक रूपदेखील असावे लागते. आणि ह्या चवीला, रूपाला, गंधाची साथ लाभली, मग तर अगदी ‘सोने पे सुहागा.’ कितीही चांगला पदार्थ असला आणि जर त्याला चांगला गंध नसला, तर तो पदार्थ घशाखाली उतरणे कठीणच असते. ह्याच्याच अगदी उलटे म्हणजे, एखादा नावडता पदार्थ श्वास रोखून म्हणजेच वास रोखून खाल्ला, तर त्याची अप्रिय असणारी तीव्रता कमी होते. लहानपणी, पोट साफ होण्यासाठी महिन्यातून एकदातरी एरंडेल तेल प्यावे लागायचे. ते पिताना श्वास रोखला तर त्याची अप्रिय चव कमी होते, हा मला त्या वेळी लागलेला एक शोध होता - म्हणजेच वासाचे महत्त्व आणि माहात्म्य कळून येते. नाक चोंदले असेल तर पापड आणि कापड ह्यांच्या चवीतही फारसा फरक जाणवत नाही. हिंदीतदेखील सोन्यासारख्या मूल्यवान धातूला जर सुगंधाची जोड लाभली तर काय होऊ शकते, हे ‘सोने पे सुहागा' ह्या म्हणीवरून कळून येते.
वासाची इतकी महती आहे की रसनेलादेखील गंधाची जोड हवी असते. अतिशय उत्कृष्ट, चविष्ट जेवण असेल तरी त्याला गंधाची जोड हवीच असते. एकच जेवण गॅसच्या शेगडीवर केले, लाकडांच्या चुलीवर केले किंवा कोळश्याच्या आचेवर केले, तरी प्रत्येक जेवणाची चव बदलत जाते. इथे यू.एस.मध्येसुद्धा पिझ्झ्यांची जाहिरात करताना ‘गॅस फायर्ड बर्नर’पासून ‘कोल फायर्ड' आणि आता ‘वूड फायर्ड बर्नर’ अशी चवींची चढती क्रमवारी लावली जाते आणि त्याचे श्रेय जाते अर्थातच वासाला, गंधाला.
वास, गंध ह्या अदृश्य अनुभूती आहेत. वासाला रूप नाही, रंग नाही, आकृती नाही, पण प्रकृती मात्र आहे. लहानपणापासून आपण जे काही वास अनुभवत मोठे होतो, तेच एक प्रकृती बनून जातात. एखाद्या रानातून फिरताना अचानक एखादा परिचित असा छान वास आला, की लगेच आपण म्हणतो, ‘चाफ्याच्या फुलाचा वास येतोय, किंवा ‘आसपास केवडा असावा बहुतेक' किंवा ‘एखादा प्राणी मरून पडलाय असं वाटतं.” हे सर्व आपण आपल्या पूर्वानुभावरून ओळखतो. प्रत्येक वासाला आपण एक प्रकृती बहाल केली आहे आणि तो परिचित वास आला की आपण लगेच तो ओळखतो.
माझे गुजरातमधले मित्र मला नेहमी म्हणायचे की “तुमच्या मुंबईत एक प्रकारचा अप्रिय असा वास येतो. गुजरातहून येताना एकदा का गाडीने डहाणू-पालघर सोडले की त्याची सुरुवात होते.” जोपर्यंत मी मुंबईत राहत होतो, तोपर्यंत मला कधीच असा वास आला नाही. परंतु बडोद्याला पोस्टिंग झाल्यावर, ज्या ज्या वेळी मी मुंबईला ट्रेनने आलो, तेव्हा हा वास नेहमीच येत राहिला. बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे वास आपल्या आजूबाजूला सतत भरून राहिलेला असतो, आधी त्यांची आपल्याला सवय होते आणि मग ते आपल्याला जाणवेनासे होतात.
पूर्वींच्या वधुपरीक्षेच्या काळात अनुभवी मंडळी आपापल्या परीने मुलीची परीक्षा घेत असत. मुलीला हळू आवाजात प्रश्न विचारून तिची कर्णेंद्रिय शाबूत आहेत का नाहीत हे तपासले जायचे, सुईत दोरा ओवायला सांगून चक्षुपरीक्षा व्हायची, नृत्य करायला अथवा गाणे म्हणायला सांगून पायात, आवाजात दोष नाही ना, ह्याची खातरी केली जाई. पण मुलीला वासाचे ज्ञान कितपत आहे ह्याची परीक्षा घेतली जात असे की नाही, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. म्हणजे बघा, होणाऱ्या सूनबाईला स्वयंपाकघरात भात करपला अथवा दूध उतू गेले, तर पडवीत काम करताना कळणार की नाही, हे कसे तपासता येणार? अत्तराच्या रूपाने सुवास जपून ठेवून पुन्हा निर्माण करता येतो, पण दुर्गंध किंवा अप्रिय वास जतन करून हवे तेव्हा पुन्हा निर्माण केल्याचे ऐकिवात नाही, म्हणजेच गंधपरीक्षा हा विषय वधुपरीक्षेत नसावाच. चला, परीक्षेत तेवढाच एक विषय कमी.
खूप वर्षांपूर्वीची ही मी अनुभवलेली एक सत्य घटना आहे. त्या काळी चर्चगेटहून बोरिवलीकडे येणारी लोकल ट्रेन मालाडला पंचाहत्तर टक्क्याहून जास्त रिकामी होई. त्यामुळे खूपसे फेरीवाले आपला माल विकायला मालाडला ट्रेनमध्ये चढत. एकदा रात्री बाराच्या सुमारास मी बोरिवलीला घरी परतत होतो. मालाडला नेहमीप्रमाणे ट्रेन रिकामी झाली आणि एक फेरीवाला डांबराच्या गोळ्या (नॅप्थालीन बॉल्स) विकायला ट्रेनमध्ये चढला. पांढऱ्या गोळ्यांचे ते पाकीट तो आठ-आठ आण्याला विकत होता. ट्रेनमध्ये सीट्सवर बसलेल्या काही मंडळींनी ती पाकिटे विकत घेतली. त्यातल्या एका-दोघांनी ती पाकिटे उघडली आणि त्यातल्या गोळ्या चक्क तोंडात टाकल्या. जितक्या वेगाने त्यांनी त्या तोंडात टाकल्या होत्या, त्याच्या दुप्पट वेगाने त्यांनी त्या थुंकून टाकल्या. त्यांचे ते प्रताप बघून बसलेल्या इतर मंडळींची हसता हसता पुरेवाट झाली. मला त्या वेळी जो प्रश्न पडला होता, तो आजही तसाच आहे - त्या मंडळींना डांबराच्या गोळ्या तोंडात टाकताना गोळ्यांचा उग्र वास आलाच नसावा का? नसेलच बहुतेक, वास-गंधांनी हरताळ पुकारल्यावर अशा डांबराच्या गोळ्या खाव्या लागतात मग.
माझ्या शाळेत जायच्या-यायच्या वाटेवर एक देशी दारूचा गुत्ता होता. त्या काळी बोरिवलीला खूप झाडे-झुडपे असल्यामुळे तो गुत्ता रस्त्यापासून दूर, आत दाट झाडीत होता. तरीदेखील तेथून जाताना देशी दारूचा उग्र भपकारा नाकात गेल्यावाचून राहत नसे. एवढा सगळ्यांना माहीत असलेला, बेकायदेशीर दारूचा गुत्ता पोलीस बंद का करीत नसावेत? असा प्रश्न मला नेहमी पडे. कदाचित पोलिसांना त्या दारूचा वास येत नसावा, अशी मी समजूत करून घेतली होती. थोडे मोठे झाल्यावर कळले की वासावारून गुन्हाचा माग काढणे हे काम पोलिसांच्या कुत्र्यांचे आहे, पोलिसांचे नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनची स्वत:ची अशी हद्द असते, त्याचप्रमाणे प्रत्येक कामाचेदेखील अगदी कडक वाटप झालेले असावे, म्हणून कुत्र्यांनी करायचे काम पोलीस स्वत: करीत नसावेत. खरे-खोटे त्या पोलिसांना आणि त्यांच्या कुत्र्यांनाच ठाऊक.
तुम्ही एक गोष्ट अनुभवली आहे का? आइसक्रीमला सर्वसाधारणपणे, वास नसतो.
पूर्वी - म्हणजे जवळजवळ १९८५-९०पर्यंत गॅस सिलिंडर (एल.पी.जी - कुकिंग गॅस) घेऊन येणारा डिलिवरी मॅन घरी सिलिंडर आणल्यावर स्वत:च्या जवळच्या पाना-पकडीने सिलिंडर बदलून द्यायचा. सिलिंडर बदलताना जुन्या सिलिंडरमधले एक काळ्या रंगाचे वॉशर (मराठीत त्याला वायसर म्हणतात, असा माझा कित्येक वर्ष समज होता.) तो काढून टाकायचा आणि नवीन लावायचा. त्या काढून टाकलेल्या वॉशरला भयंकर दुर्गंधी यायची. मी ते वॉशर मुठीत ठेवून मित्रांना तो वास घ्यायला लावायचो, पण सांगताना “बघ माझ्या नवीन अत्तराचा वास" असे सांगत असे, त्यामुळे अत्तराच्या वासाच्या अपेक्षेने वास घेणारे मित्र ती दुर्गंधी आल्यावर चिडायचे व मला मारायला धावायचे. एल.पी.जी.ला स्वत:चा वास नसतो, परंतु जर घरातील सिलिंडर काही कारणाने लीक झाला, तर तो घरच्या मंडळीना कळावा म्हणून ‘ईथाइल मरकॅप्टन’ नावाचे केमिकल त्यात मिसळले जाते आणि तो वास त्या केमिकलचा असतो, हे पुढे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत काम करायला लागल्यावर कळले. एका अर्थी तो आपला श्वास चालू ठेवण्यासाठी धोक्याचा लाल बावटा दाखवणारा वास असतो.
माझ्या लहानपणी आमच्या घरीच, आमच्या एका मामाचे लग्न लागले होते. ते बहुतेक मे महिन्यात लागले होते. आमच्या आईने त्या लग्नात वधु-वरपक्षाच्या स्त्रियांसाठी मोगऱ्याचे गजरे आणले होते, त्या लग्नात मला आठवणाऱ्या दोनच गोष्टी - कडक बुंदीचे लाडू आणि मोगऱ्याचे गजरे. आजही मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध आला की ते लग्नच आठवते.
एशियन पेंट्सची एक जाहिरात आहे - ‘हर घर कुछ केहता है’, त्याच धर्तीवर ‘हर घर का एक अपना गंध होता है' असे म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. प्रत्येक घराचा स्वत:चा असा खास वास असतो, तो त्या घरात राहणाऱ्याला जाणवत नाही, परंतु बाहेरून त्या घरात पाय टाकणाऱ्याला मात्र लगेच कळतो. लहानपणी स्काउटमध्ये ‘खरी कमाई' करण्यासाठी शाळेतून आल्यावर दुपारी घरोघरी काम करायला जाऊन स्काउटसाठी पैसे कमवायचे असंत. त्या वेळी प्रत्येक घराचा दरवाजा उघडला की वेगवेगळे वास येत. दुपारी घरची गृहिणी जेवणखाण आटपून निवांत बसलेली असायची. नुकतेच जेवण आटोपल्यामुळे घरात जेवणाचा वास सुटलेला असायचा. मासे खाणाऱ्यांच्या घरचा वास, व्हेजिटेरियन घरातला वास, घरात पाळीव प्राणी असले तर त्या घराचा वास, सतत बंद असणाऱ्या घराचा वास, धार्मिक घरातील उदबत्ती-धुपाचा वास, जमीन फिनाइलने पुसली असेल तर तो वास, असे वेगवेगळे वास एकाच दुपारी अनुभवयाला मिळत.
प्रत्येक घराचा जसा स्वत:चा असा खास वास असतो, तसा तो स्थानांचा, जागेचादेखील असतो. हॉस्पिटलमधला वास, देवळातला वास, स्मशानातला वास, सरकारी ऑफिसेसमधला वास, उडुपी रेस्टॉरंटमधला, चायनीज रेस्टॉरंटमधला, भाजी बाजारातला, फळ बाजारातला, मासळी बाजारातला वास, हे सगळे त्या त्या स्थानांची प्रकृतीच दर्शवतात.
पूर्वी आम्ही घासलेटचा (हा ‘गॅस ओ लाइट'चा अपभ्रंश आहे, असे कधीतरी वाचले होते) स्टोव्ह पेटवायला काकडा वापरायचो, तो काकडा पेटवण्यासाठी आमच्या घरी आई स्पिरिट आणून ठेवायची. ह्या स्पिरिटमध्ये बुडवलेला काकडा पेटवला की सुंदर निळ्या, पिवळ्या ज्वाळा निघायच्या. पण त्याहूनही जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्या स्पिरिटचा गोडसर वास. आम्ही त्या स्पिरिटच्या बाटलीत बोट बुडवून बाहेर काढायचो, हवेशी संपर्क आल्याबरोबर हवेत मंद वास सोडत स्पिरिट विरून जायचे आणि बोट थंडगार व्हायचे.
जे पट्टीचे पिणारे असतात, ते ग्लासात ओतलेले ड्रिंक ब्रँडी आहे की व्हिस्की की रम की व्होडका, हे नुसत्या वासाने ओळखू शकतात. त्याच्याहीपुढचे मुरब्बी त्या ड्रिंकचा ब्रँडही ओळखू शकतात असा दावा करतात. पण हे फक्त ‘चढे'पर्यंतच, एकदा का ती चढली की मग ही ब्रँडी, ती व्हिस्की, ही रम, ती व्होडका असा आपपरभाव राहत नाही आणि ‘सर्वधर्मसमभाव’ ह्याप्रमाणे, ‘सर्वड्रिंक्ससमभाव’ ही वृत्ती निर्माण होते आणि ब्रह्मानंदी टाळी लागते. मला मात्र प्यायल्याशिवाय साधे दूध आणि ताकातलाही फरक सांगता येत नाही, कदाचित तो कोणालाच सांगता येत नसावा, म्हणूनच 'दुधाने जीभ पोळल्यावर ताकही फुंकून प्यायले जाते' अशी म्हण अस्तित्वात आली असावी.
पट्टीचे सिगारेट ओढणारे, सिगारेटच्या नुसत्या धुराच्या वासाने सिगारेटचा ब्रँड ओळखू शकतात असा दावा करतात. हा दावा खरा किती आणि खोटा किती हे तेच जाणोत, मी मात्र विडी आणि सिगारेटमधला फरक नक्कीच ओळखू शकतो. आमच्या घरी घरकाम करायला एक आंध्रदेशीय गडी यायचा. तो सतत चुट्टयाची विडी ओढायचा, फक्त कोणाच्या घरात काम करायला शिरताना ती विडी जिन्यात, एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा. त्या चुट्टयाच्या विडीचा इतका उग्र दर्प यायचा की त्याने बिल्डिंगमध्ये पाय ठेवला रे ठेवला कीतो उग्र दर्प सगळीकडे पसरायचा आणि तो आज कामाला आला आहे की नाही, हे न विचारतादेखील सगळ्यांना कळायचे. अशीच एक बाई आमच्याकडे बडोद्याला घरकामाला यायची, तीदेखील एक विशिष्ट प्रकारची विडी ओढत असे, त्या विडीचा वासच तिच्या आगमनाची वर्दी द्यायचा.
आजही अनेक प्रकाराचे वास मनात घर करून आहेत. रस्त्यावर काम चालले असता येणारा डांबराचा वास, निरांजनातील, समईतील ज्योत विझता विझता येणारा वास, होम-हवन करीत असताना येणारा तूपमिश्रित समिधांचा वास, विविध फोडण्यांचा वास, मलेरियाच्या पांढऱ्या धुराचा वास, कल्हईवाल्याचा कल्हई लावतानाच वास, सारवलेल्या जमिनीचा वास, खारवलेल्या बोंबलाचा वास, पहिल्या पावसाचा आणि मातीच्या मिलनाचा वास, कोऱ्या पुस्तकांचा, कोऱ्या कपड्यांचा वास, दिवाळीतील फटाक्यांचे वास, समुद्रकिनाऱ्यावरचा वास, घनदाट वनराईने वेढलेल्या उंच डोंगरातील वास, कान्हेरी गुंफेतील एका गुंफेत वास्तव्य करून असलेल्या हजारो वाटवाघळांचा वास, राणीच्या बागेतील वाघ-सिंह ह्यांच्या पिंजऱ्याच्या आसपास येणारा उग्र वास, लाकडाच्या चुलीतील पेटलेल्या लाकडांचा वास, कित्येक दिवस न धुतलेल्या पायमोज्यांचा वास.. अशा कितीतरी वासांनी आपले गंधविश्व नक्कीच समृद्ध केले आहे.
चहाचा स्वत:चा असा खास वास असतो. सकाळी सकाळी जागे झाल्यावर आसमंतात तो वास भरून राहिला असेल, तर खुशाल समजावे की आजचा दिवस चांगला जाणार. गुजरात-राजस्थानमध्ये चहात एक प्रकारचा मसाला घालून चहाची चाहत वाढवतात. कॉफीचा दिवाणा ‘स्टारबक्स’च्या आसपास तरळत असलेल्या कॉफीच्या वासाने तरंगत कॉफी प्यायला आत वळला नाही तरच नवल.
गाय-बैलांच्या गोठ्यातील वास हा म्हशींच्या तबेल्यातील वासापेक्षा वेगळा येतो आणि घोड्याच्या तबेल्याचा आणखीनच वेगळा वास येतो, हे जाणकार नक्कीच मानतील.
मुंबईत असताना ऑफिसनिमित्ते बोरिवली-चर्चगेट हा रोजचाच प्रवास असायचा. गाडीत मित्रांच्या कृपेने बसायला जागा मिळाली की लगेच डोळे मिटायला लागायचे. कित्येक वेळा वांद्रयाच्या खाडीवरून गाडी जाताना, भरती असेल तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा आणि ओहोटी असेल तर धारावीच्या सांडपाण्याचा वास यायचा आणि मनातल्या मनात वांद्रयाच्या माउंट मेरीला नमस्कार घातला जायचा. तो समुद्राचा खारा वास आणि धारावीच्या गटाराचा वास अजूनही गंधविश्वात ठाण मांडून आहेत.
वेगवेगळ्या साबणांचा वास हा एक आणखी आवडता वास आहे. लहानपणी, आम्ही रेक्सोना, हमाम, लक्स, लाइफबॉय वगैरे साबण आलटून पालटून आणत असू. साबण वापरायला काढल्यावर त्याचे कव्हर - रॅपर आम्ही कपाटात कपड्यांच्या मध्ये ठेवत असू. ते रॅपरदेखील तीन-चार दिवस चांगलाच सुवास पसरवे. लिरिल साबणाच्या वासापेक्षा त्या साबणाच्या जाहिरातीतील मोकळे केस गोलाकार उडवणारी ललना जास्त लक्षात आहे. मोती साबण म्हणजे एक लक्झरी होती, त्याचा गोल वाटोळा आकार आणि त्याचा चंदनाचा सुवास दोघेही एकमेकांना पूरक होते. पुढे, ‘लॅक्मे’ ने घातलेली भुरळ आजही कायम आहे.
कुत्र्याचे घाणेंद्रिय अतिशय पॉवरफुल असते, त्याच जोरावर तो मनुष्याने केलेले गुन्हे शोधून काढतो. लहानपणी रस्त्यावर कुत्र्यांचे खेळ पुष्कळ पाहिले. खेळ दाखवणारा त्याच्या कुत्र्याच्या नकळत एखाद्या प्रेक्षकाचे घड्याळ काढून एका रुमालात बांधायचा. नंतर तो रुमाल कुत्र्याच्या तोंडात देऊन घड्याळाचा मालक शोधायला सांगायचा. कुत्रा बरोबर घड्याळ्याच्या मालकासमोर जाऊन उभा राही. कुत्र्याला वासाचे ज्ञान अतिशय उत्तम असते, हे तेव्हापासूनच माहीत झाले होते; पण खेळ करणाऱ्या एकाने बैलाला घेऊन हाच खेळ केला, तेव्हा तर मात्र एकदम चकितच झालो - म्हणजे सर्वच प्राण्यांचे घाणेंद्रीय इतके सक्षम असते तर.
कस्तुरी मृगाच्या नाभीत ‘कस्तुरी’ असते आणि तिच्या जोरावर तो माद्यांना आकर्षित करतो, हे ऐकून वाचून माहीत होते. पण खरी कस्तुरी कशी दिसते किंवा तिचा वास कसा असतो, हे छातीठोकपणे सांगणारा अजून कोणी भेटला नाही. पण अगदीच नाही असे म्हणता येणार नाही. खूप वर्षांपूर्वी एकदा बोरिवली रेल्वे स्टेशनवर गावठी औषधे विकणाऱ्यासारखा पेहराव असणारा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि मला त्याने "कस्तुरी हवी आहे का?" असे विचारले. मी कुतूहलाने हो म्हणताच त्याने एका डबीतून एखाद्या लहानशा सुपारीएवढी दिसणारी एक वस्तू किंवा बी बाहेर काढली. त्या वस्तूभोवती साधारण अर्ध्या इंचाइतके करडे काळे केस होते. मी पहिल्यांदाच ‘कस्तुरी’ (?) बघत होतो, त्यामुळे त्या गृहस्थाला "ही कस्तुरी आहे हे कशावरून?" असा प्रश्न केला. त्यावर त्या गृहस्थाने माझ्या तळहातावर ती वस्तू ठेवली, त्या तळहाताची मूठ वळायला सांगितली, दुसऱ्या हाताच्या मुठीने ज्याप्रमाणे अत्तर लावल्यावर आपण मुठी एकमेकांवर घासून अत्तर पसरवतो, त्याप्रमाणे करायला सांगून वास घ्यायला सांगितले. आणि काय आश्चर्य, माझ्या दोन्ही मुठींना एक प्रकारचा छानसा वास येऊ लागला. त्या गृहस्थाने त्या कस्तुरीची किंमत पन्नास रुपये सांगितली. माझा अजूनही पूर्ण विश्वास न बसल्यामुळे आणि असे फसवणारे लोक फार असतात असे ऐकल्यामुळे मी ती कस्तुरी घ्यायचे नाकारले. तीच माझी कस्तुरीशी पहिली आणि शेवटची भेट.
बालपणी वाचलेल्या अनेक परीकथांत राक्षस, चेटकिणी, भुते वगैरे असायचे. त्यातल्या त्यात माणसाचा वास येणाऱ्या राक्षसाची मला जास्त भीती वाटायची. ह्या राक्षसाची दृष्टी तीक्ष्ण असायची, कर्णेद्रिये तिखट असायची आणि त्यावर मात म्हणजे त्याला माणसाचा वासदेखील यायचा. अशा राक्षसाच्या तावडीतून राजकन्येला सोडवून आणायला गेलेला आपला शूरवीर त्या राक्षसाला आता कसा मारणार आणि त्या सुंदर राजकन्येला कसे सोडवणार, ह्याची चिंता त्या शूरवीरापेक्षा मलाच जास्त वाटायची. रामायणातला कुंभकर्ण ह्या राक्षसांचा जनक असणार. राम-रावण युद्धाच्या वेळेला त्याला उठवण्याचे सर्व उपाय थकल्यावर त्याच्या बाजूला लाडू-पेढ्यांची, इतर खाद्यपदार्थांची भांडी मांडून ठेवली, जेणेकरून त्या पदार्थांच्या वासाने त्याने उठावे आणि खरेच इतर सर्व उपाय थकल्यावर वासानेच त्याला उठवले. बघा किती अगाध महिमा तो वासाचा.
एव्हढे गंधमाहात्म्य लिहिल्यावर, गंधाला नाव का दिले नसावे ह्याचे उत्तर अचानक मला सापडल्यासारखे वाटते. एवढ्या अगाध महिमा, माहात्म्य आणि मान असलेल्या अनुभूतीला कोणी ‘नाव ठेवण्यास’ धजावेलच कसा?
'प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो' हेच शेवटी खरे.
मिसळपाव
प्रतिक्रिया