हाडे गोठवणारी थंडी आणि ही गोगलगायीला लाजवणाऱ्या गतीने धावणारी रात्र. रात्र कसली, थंडीत मरणाची वेळ आली म्हणजे काळरात्रच! असे त्याला मनातून वाटले आणि त्याने अवघडलेल्या अंगाने कूस बदलली. कूस बदलतानाही शरीर साथ देत नव्हते. अंगातले सगळे जोड करकर करीत कुरकुरल्यासारखे त्याला वाटले. उगीचच कूस बदलली असेही त्याच्या मनात आले. आजची रात्र सरली तर उद्या काय? असा एक नेहमीचा प्रश्नही त्याच्या समोर झाडावरून टपकन एखादे फळ पडावे तसा पडला, पण पाल झटकावी त्या गतीने त्याने 'उद्याचे उद्या बघता येईल!' असे मनातल्या मनात म्हणून झटकून टाकला. विचार झटकला, पण त्याबरोबर अचानक पावसाची सर यावी, तशी दुसऱ्या विचारांनी दाटी केली.
शिरीषने मागे उसने दिलेले त्याचे पैसे कालच मागितले होते. घरी खाण्यापिण्याची आबाळ चालली होती. वाणसामानाची यादी आईने दिली होती, ती कुठे ठेवली ते आत्ता नीट आठवेना. पण उद्या जर का सामान नाही आणले, तर खायला काही मिळणार नाही याची त्याला खातरी होती. वडिलांनी त्यांच्या एका मित्राचा नंबर दिला होता आणि त्यांना फोन करून त्या कंपनीच्या पत्त्यावर सकाळी लवकर उठून जायला सांगितलेले, नव्हे, बजावलेले त्याला आठवले. त्या विचाराने तर आणखीनच अस्वस्थ होऊन त्याची झोपमोड झाली. तेवढ्यात अचानक आकाशातून ढगांच्या छातीला फाडून एक कर्णकर्कश्श आकाशवाणी त्याच्या कानातून मेंदूवर आदळली.
"जगात एल निनो का फेल निनोने गरमाई वाढली, पण आमच्या साहेबांना पंखा पस्तीसवर असल्यामुळे शिमल्यात असल्यागत वाटत असेल. तुझा बाप गेलाय दूध आणि पेपर आणायला, तो यायच्या आधी ऊठ आणि बाथरूमला तोंड दाखव तुझं. आज पण उशीर केलास तर दिवसभर मला मेलीला ऐकून घ्यावं लागेल. ह्यांना लहानाचं मोठं करा, शाळा शिकवा, रोज पाच वेळा गिळायला द्या, तरी आपणच ऐकत जन्म काढा. कधी ह्या भोगातून सुट्टी मिळेल रे रामा परमेश्वरा. उठतोय का नाही रे माझ्या कर्मा. अजून किती तोंडाचा फेस पाडू तुझ्यापुढे?"
नाइलाजाने अंगावरची चादर बाजूला करीत रात्री दोन मिनिटांसाठी का होईना, स्वप्नात आलेली ती कशी दिसत होती ह्याचा विचार करीत त्याची पावले बाथरूमच्या दिशेला कूच झाली.
बाहेरून पेपर आणि दूध घेऊन पावले घरात शिरली आणि आकाश हादरवणाऱ्या दुसऱ्या गर्जनांना सुरुवात झाली.
"साहेब उठले, का अंगावरून मोरपीस फिरवून त्यांना जागं करायचं आहे अजून? लोळून आमच्या सात पिढ्यांवर उपकार करून झाले असतील, तर बूड हलवून पुढचे उपकार करा म्हणावं साहेबांना. ते कुलकर्णी साहेब समोरून मला विचारत होते तुमच्या मुलाचा फोन आला नाही म्हणून. जसं काय त्यांनाच गरज आहे. दिवसभर दुसऱ्या कामात होता म्हणून थाप दिली त्यांना. दिवसभर साहेब उंडारत होते हे कळलं त्यांना, तर आयुष्यात कधी मला समोर उभे करणार नाहीत. तो तुझा मावसभाऊ भेटला होता. एक पोरगी घेऊन आलाय साहेबांसाठी. पण साहेबांचा कामाचा पत्ता नाही अजून. काय कप्पाळ कमवतोय म्हणून सांगणार मुलीकडच्यांना! आत्ताच नाही म्हणून सांगून टाकलं त्याला, पण अजून किती वर्षं उंडारणार आहे हा कटाळ्या? चहा दे मला लवकर झाला असेल तर."
"दुधासाठी थांबले होते, चहा टाकलाय. दूध घालून उकळून देते. नाष्टा झाला की त्या मनोजकडे जाऊन या. परवा ॲक्सिडेंट होऊन पाय मोडून घेतलाय त्याने. बघायला गेला नाहीत, तर एकुलता एक मामा आला नाही म्हणून वहिनी ऐकवतील मलाच. उद्या त्या सुनीताच्या मुलीच्या साखरपुड्याला सगळे येतीलच. तुम्ही जाऊन या, परत आपल्याला बाजारात पण जायचंय."
बाथरूममध्ये गेलेली पावले सावकाश बेडरूमकडे गेली. बेडरूमकडून पुन्हा हॉलमध्ये येऊन टीव्हीसमोरच्या सोफ्यावर बसली. टीव्हीसमोरच्या टीपॉयवर पोह्याची प्लेट आणि चहाचा कप आदळला. टीव्ही आणि नाष्टा सुरू झाला.
तेवढ्यात दरवाजावर धाडधाड असा आवाज आणि मोबाइलच्या रिंगटोनचा जयघोष एकाच वेळी झाला. दोन पावले दरवाजाकडे गेली आणि दोन पावले मोबाइलकडे झेपावली.
दरवाजा उघडताच कपाळावरच्या आठ्या आणखी दाट झाल्या. दरवाजाबाहेर एक पोलीस फौजदार आणि एक हवालदार असे दोघे जण उभे होते.
"काल दुपारी आपले चिरंजीव कुठे होते, माहीत आहे का?"
फौजदारसाहेबांच्या या प्रश्नावर दरवाजा उघडायला गेलेली पावले एकवार हॉलकडे वळाली आणि पुन्हा दरवाजाकडे रोख करून मूकपणाने उभी राहिली. त्यांच्या उत्तराची वाट न पाहता फौजदारसाहेबच पुढे बोलले, "काल आपल्या एरियामध्ये किडनॅपिंगचा प्रकार तुमच्या चिरंजीवांच्या धाडसामुळे रोखण्यात पोलिसांना यश आलं, त्याबद्दल आज पोलीस मुख्यालयात पोलीस कमिशनर साहेब स्वतः हजर राहून त्याचा सत्कार करणार आहेत. तेव्हा दुपारी तीन वाजता तुम्ही सर्व जण तयार रहा. आम्ही गाडी पाठवूच तुम्हाला घ्यायला. हेच सांगायला मी आलो होतो. ठीक आहे. भेटू या कार्यक्रमात. अच्छा, येतो मी."
दरवाजा बंद झाला तसा फोनवरचा संवाद सुरू झाला.
"अग बोल ना सुवर्णा. एवढ्या सकाळी फोन केलास इतक्या दिवसांनी. ठीक आहे ना सर्व...."
"..... काय म्हणतेस! आमच्या ढम्याला कोण घेणार ग टीव्हीवर? कोणत्या चॅनेलवर म्हणतेस? ४२० नंबर का? एक मिनिटं हं... लावते... अग बाई! अहो, बघताय का. आपला ढम्या टीव्हीवरच्या मालिकेत आलाय."
दरवाजाकडे गेलेली पावले लगबगीने पुन्हा हॉलमध्ये आली.
काही वेळापूर्वी लांब लांब गेलेली सारी पावले टीव्हीसमोरच्या सोफ्यावर जवळ जवळ आनंदाने बसली.
- संदीप भानुदास चांदणे
मिसळपाव
प्रतिक्रिया