Skip to main content

एका जल्लादाची - आणि आपलीही - गोष्ट

लेखक रिचर्ड न्युनिस यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

 

नोबेल शांतता पुरस्कार दर वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शुक्रवारी जाहीर होतात. २०२६ सालचा बहुमान दक्षिण आफ्रिकेच्या नावनेथम (नावी) पिल्लई ह्यांना दिला गेला आहे. गेली दोन वर्षं गुडघ्याला बाशिंग गुंडाळून आशाळभूतपणे ईशान्यकडे डोळे घालून बसलेल्या एका शहेनशहाला पुन्हा एकदा हात आणि गुडघे चोळत बसावं लागलं आहे, कारण नोबेल कमिटीने २०२५ सालचा पुरस्कारदेखील शहेनशहाला डावलून दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाची विरोधी पक्षनेता असलेल्या मारिया कोरीना मच्याडो हिला प्रदान केला होता.

जगातील अत्युच्च सन्मानापैकी एक अशी ख्याती असलेल्या नोबेल पीस प्राइझची २०२५ सालची मानकरी मारिया हिच्या नावाची घोषणा करताना नोबेल कमिटीचे अध्यक्ष जोर्गन फ्रेन्स ह्यांनी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की "गेले वर्षभर मारियाला भूमिगत राहावं लागलं आहे. तिच्या जिवाला धोका असतानादेखील ती देश सोडून गेली नाही. तिच्या ह्या निर्णयामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. सत्ताधारी जेव्हा एखाद्या देशावर हुकूमशाही आणि दडपशाही लादतात, तेव्हा लोकांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जे लढा उभारतात आणि सत्ताधाऱ्यांच्या निरंकुश सत्तेला आव्हान देतात, त्यांच्या निर्भयतेला दाद देणं अतिशय गरजेचं आहे." २०२६ सालचा पुरस्कार नावी पिल्लई यांना देताना नोबेल कमिटीने त्यांच्या निर्भीड वृत्तीला दाद दिली आणि पुन्हा एकदा सत्तांधांच्या विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या वृतीचा गौरव केला. सत्ताधाऱ्यांची ‘री’ न ओढता, न्यायमूल्यांची कास धरणाऱ्या आणि ‘एखाद्या लोकसमूहाच्या विरुद्ध विखारी प्रचार करत राहणे हा नरसंहाराचाच प्रकार आहे’ असं ठणकावून सांगणाऱ्या या नव्या नावी 'प्रभुणे' पिल्लई यांची त्यांनी पुरस्कारासाठी निवड केली.  

इ.स. १९७५मध्ये इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली, त्या वेळी जयप्रकाश नारायण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चरण सिंग, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी आदी अनेक नेत्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली, आणीबाणीविरुद्ध आवाज उठवला, तुरुंगवास सहन केला. त्यात स्वपक्षीय मोहन धारिया, चंद्रशेखर हेदेखील सामील झाले होते, कारण घाला वर्मावर होता, लोकशाहीच्या आत्म्यावर होता, हजारो जिवाचं मोल देऊन कमावलेल्या स्वातंत्र्यावर होता.

इंदिरा गांधींनी जे केलं ते उघडपणे केलं. पण बऱ्याच वेळा आणीबाणी अशी म्हशीसारखी अंगावर येत नाही. ती लपतछपत येते, मांजरीच्या पावलांनी. रात्र जशी कणाकणाने काळोख पसरवते, तशी. ती आपल्याला भुरळ घालते आणि मग घासच घेते. जोवर हे लक्षात येतं, तोवर उशीर झालेला असतो. कधी तर फारच उशीर झालेला असतो. 

ह्याबाबत दोन बेडकांची एक रूपक कथा प्रसिद्ध आहे - एका बेडकाला गरम पाण्याच्या रांजणात सोडण्यात आलं. चटका लागताच बेडूक क्षणार्धात उडी मारून रांजणाबाहेर पडला. दुसऱ्या बेडकाला मात्र साध्या पाण्याच्या भांड्यात सोडण्यात आलं. बेडूक मजेत होता. हळूहळू पाण्याचं तापमान वाढवलं गेलं. बेडकाने ते सहन केलं. तापमान आणखी वाढवलं. येणाऱ्या धोक्याची कल्पना नसलेला बेडूक सहन करीत राहिला आणि शेवटी शक्तिहीन होऊन उकळत्या पाण्यात मरून गेला.

एली विझेल हे नोबेल पुरस्कार विजेते. त्याचं ‘नाइट’ हे आत्मचरित्रामक पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. नाझी जर्मनीमध्ये ते यहुदी म्हणून जन्मले, हाच केवळ त्यांचा गुन्हा, म्हणून हिटलरच्या छळछावणीत त्यांची रवानगी झाली. सुदैवाने तेथून जिवंत बाहेर पडण्याचं भाग्य त्यांना लाभलं. ते म्हणतात की "इतरांवर जुलूम होत असताना आपण केवळ बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपण त्या जुलमात भागीदार होणं. कारण बघ्याची भूमिका फक्त जुलूम करणाऱ्याच्या फायद्याची ठरते, बळीच्या नाही." ते पुढे म्हणतात, "प्रेम’ ह्या शब्दाचा विरोधार्थी शब्द ‘द्वेष’ हा नाहीच.. तो आहे ‘मला काय त्याचे...’ हा भाव."

योगायोगाने ह्या विषयावरील दोन कविता वाचनात आल्या. दोन्हीही दुसऱ्या महायुद्धाच्या काळाशी संबंधित आहेत. त्यापैकी पहिली आहे मार्टिन नीमुलर ह्या जर्मन धर्मगुरूंची. हिटलरने जेव्हा जर्मनीच्या समाजमानसाचा वेध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या निशाणावर होते जर्मनीतील शिकले सवरलेले लोक. हिटलरचा होरा असा होता की एकदा या शिकल्या सवरल्या मंडळींची मनं आणि मतं कलुषित केली की पुढचा मार्ग सुकर होईल. आणि झालंही तसंच.

हिटलरने पहिला ‘गेम’ केला कम्युनिस्टांचा. त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती नाहीय, हे त्याला उमगलं होतं. कम्युनिस्ट विचारसरणीच्या एक लाख लोकांना छळछावण्यांत डांबून मारण्यात आलं. युद्ध संपल्यावर मार्टिन नीमुलर ह्यांनी अनेक ठिकाणी भाषणं दिली. त्यात हिटलरने केलेल्या कम्युनिस्टांच्या शिरकाणाविषयी ते म्हणतात, “त्या वेळी छळछावण्यांमध्ये कम्युनिस्ट लोकांना डांबलं गेलं होतं, हे आम्हाला ठाऊक होतं कारण तसं वर्तमानपत्रातदेखील छापून आलं होतं. पण कोणीही आवाज उठवला नाही. पर्वाच नव्हती कुणाला. कम्युनिस्टच ते. धर्मविरोधी. ख्रिस्ती धर्माला विरोध करणारे. ब्याद परस्पर जातेय तर जाऊ द्या. बायबलमध्ये आबेल आणि काईन ह्या दोन भावंडांची कथा आहे. मत्सराने ग्रासलेल्या काइनने आपल्या भावाला जीवे मारलं. ‘तुझा भाऊ आबेल कुठे आहे?’ असं देवाने काइनला विचारल्यावर काइन देवाला म्हणाला नव्हता का... ‘मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का?’ आम्हीही कम्युनिस्ट लोकांचे राखणदार नव्हतो...”

सुरुवातीच्या काळात मार्टिन नीमुलर हे हिटलरचे खंदे पाठीराखे नसले, तरी हिटलरविषयी त्यांना आस्था होती. आर्यन वंशाची शुद्धी होत होती, समाजाला घातक किंवा हानिकारक घटकांचा परस्पर बंदोबस्त होत होता आणि त्याला नीमुलरची मूक संमती होती.

मग समाजातील अपंग, आजारी, वृद्ध मंडळी, तसंच विकलांग मुलं ही भुईला भार आहेत, राष्ट्रीय संपत्तीला डोईजड आहेत असं हिटलरला वाटलं. अशा लोकांना छावणीत भरती करून त्यांना देवाघरी पाठवण्याचा प्लॅन तयार झाला.

मार्टिन नीमुलर म्हणतात की त्यांच्या एका ओळखीच्या माणसाने त्यांना ह्या प्लॅनविषयी सांगितलं. तो माणूसही ख्रिस्ती होता, आणि ह्या प्लॅनला त्याचा पाठिंबा होता! नीमुलर हादरले. पण काही करू शकले नाहीत. पण आता बाटलीतून बाहेर पडलेलं भूत केवळ विध्वंसच करीत राहणार, ह्याची त्यांना खातरी पटली आणि त्यांनी नाझी विचाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तोपर्यत उशीर झाला होता. १९३७ साली मार्टिन नीमुलर यांना अटक झाली आणि छळछावणीत त्यांचीही रवानगी झाली. टी-४ म्हणून कुप्रसिद्द झालेल्या ह्या प्रोग्रॅममध्ये अडीच लाख आजारी, वृद्ध आणि अपंग मंडळींना यमसदनी पाठवण्यात आलं.

दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या नाझी भस्मासुराचा अंत केल्यावर छळछावणीत खितपत पडलेल्या आणि नाझींनी अजूनही न मारलेल्या लोकांची सुटका झाली. त्यात आठ वर्षं यातनागृहात सडत पडलेले नीमुलरदेखील होते. सुटकेनंतर नीमुलर ह्यांनी अनेक ठिकाणी भाषणं दिली, त्यात त्यांनी अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्यात आपल्याला आलेल्या अपयशाची कबुली दिली आणि क्षमा मागितली. नीमुलर म्हणतात की "हिटलरने लोकमानसात द्वेष पेरायला सुरुवात केली, त्या वेळी जर्मनीमध्ये जवळपास चौदा हजार धर्मगुरू होते. हिटलरच्या अन्यायी राज्यसत्तेविरुद्ध हे सारे चौदा हजार धर्मगुरू भाविकांना घेऊन रस्त्यावर उतरले असते, तर कदाचित ते धरून तीस ते चाळीस हजार लोक मारले गेले असते; मात्र त्यांच्या बलिदानाने नाझी साम्राज्याच्या राक्षसी विस्तारवादाला खीळ बसली असती. एक लाख कम्युनिस्ट, अडीच लाख अपंग आणि वृद्ध यांच्याबरोबर युद्धात बळी पडलेले दोन ते अडीच कोटी सैनिकांचे आणि सहा ते सात कोटी सामान्य लोकांचे जीव वाचले असते." हे घडलं नाही, कारण नीमुलर आणि त्यांच्यासारखे चौदा हजार धर्मगुरू गप्प राहिले.

नीमुलर ह्यांच्या भाषणामध्ये त्यांनी ज्या प्रतिमा वापरल्या, त्यावरून पुढे एक छोटी कविता तयार झाली. मूळ जर्मनमध्ये असलेल्या ह्या कवितेचं इंग्लिश शीर्षक First They Came असं आहे. मार्टिन नीमुलर ह्यांच्या कवितेचं स्वैर मराठी रूपांतर खालीलप्रमाणे आहे -

नाझी जेव्हा कम्युनिस्टांना शोधत आले,

तेव्हा मी गप्प राहिलो,

कारण मी कम्युनिस्ट नव्हतो.

 

मग ते कामगार नेत्यांना पकडायला आले,

तेव्हाही मी काही बोललो नाही,

कारण मी कामगार चळवळीत नव्हतो.

 

त्यानंतर त्यांनी समाजवाद्यांना पकडून डांबून ठेवलं,

तेव्हादेखील मी गप्पच बसलो.

मी कुठे समाजवादी होतो?

 

मग त्यांनी ज्यू लोकांची धरपकड सुरू केली,

तेव्हाही मी चिडीचूप राहिलो,

कारण मी ज्यू नव्हतो.

 

आता ते मला शोधत फिरताहेत,

पण त्यांना विरोध करायला

कुणीच उरलं नाही...

 

आता दुसऱ्या कवितेविषयी...

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका आणि सोविएत रशिया ह्या दोन महासत्तांनी जग आपसात वाटून घेतलं. रशियाने युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया येथील अनेक देशांमध्ये आपल्याला अनुकूल अशा राजकीय पक्षांना सत्ता हस्तगत करायला मदत केली. अमेरिकेने रशियाच्या ह्या वसाहतसाहसाचा धसकाच घेतला आणि कम्युनिस्टविरोधी कायदे करायला सुरुवात केली. मकॅर्थर नावाच्या अमेरिकन सेनेटरने कम्युनिस्ट विरोधात इतकी विखारी मोहीम चालवली की अमेरिकेत युद्धसमाप्तीच्या नंतरचा काळ हे ‘मकॅर्थर युग’ म्हणून समजलं जातं. कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांवर बहिष्कार घातले गेले. त्यांना नोकरीतून काढण्यात आलं. हॉलीवूडमध्ये एक ब्लॅक लिस्ट तयार केली होती, त्यात अनेक नामवंत कलाकारांची नावं समाविष्ट होती. त्यांना काम मिळू नये ह्या उद्देशाने मोहीम चालवली गेली.

आपल्याला अडथळा ठरणाऱ्या व्यक्तीला आयुष्यातून उठवण्यासाठी पट्टीचे राजकारणी जे उपाय योजतात, त्यात एक आवडीचा आणि हमखास यशस्वी होणारा उपाय म्हणजे त्या व्यक्तीवर ‘देशद्रोही’ हा शिक्का मारणं. एकदा हा शिक्का बसला की त्याचा डाग पुसून काढण्यात त्या व्यक्तीची हयात जाते. अमेरिकेमध्येदेखील हाच प्रकार चालू होता. समाजातील धुरिणांना ह्याची कल्पना होती, तरीही अनेकांनी मौन बाळगणं पसंत केलं. सुदैवाने शेवटी न्यायपालिकेने हस्तक्षेप केला आणि ह्या बेबंदशाहीला चाप बसला. (धन्य ती  न्यायपालिका!)

ह्या ‘मौन’ काळात आणखी एक कविता जन्मली. The Hangman. ह्या कवितेचा जनक होता मॉरिस ऑगडन. हॉलीवूडमध्ये आपलं नाव कमावण्यासाठी आलेला एक होतकरू कलाकार. पण त्याच्यावर ‘कम्युनिस्टधार्जिणा’ असा नाहक शिक्का बसला आणि हॉलीवूडचे सारे दरवाजे त्याला बंद झाले. शत्रूंनी केलेल्या वारापेक्षा ज्यांना मित्र मानलं, त्यांचं मौन मॉरिसला अधिक व्यथित करणारं ठरलं आणि त्या विषण्णतेतून ह्या कवितेचा जन्म झाला. ह्या कवितेची नाळ मार्टिन नीमुलरच्या First They Came ह्या कवितेशी जोडलेली आहे. नीमुलरच्या कवितेहून मॉरिसची कविता खूपच लांबलचक वाटेल. पण त्यातील ज्वलंत प्रतिमा आपली उत्कंठा वाढवत ठेवतात आणि आपल्याला अंतर्मुख करतात.  

मॉरिस ऑगडनच्या 'The Hangman' ह्या कवितेचा स्वैरसा अनुवाद खाली दिला आहे.

 

जल्लाद आला, जल्लाद आला, गलका झाला

रक्त, आग आणि सोन्याचा दर्प गावभर पसरला

नजरेत लाचारी घोळत फिरला गावभर मोठ्या शौकात

शेवटी उभारला फाशीचा तक्ता त्याने भर चौकात

 

चौकीच्या बाजूला उभा राहिला मजबूत वधमंच

असेल चौकीच्या दरवाजापेक्षा काकणभर उंच

रुंदीही नव्हती त्या वधमंचाची फारशी

जेमतेम असते जशी एखाद्या दरवाजाची छानशी 

 

वेळ मिळेल तसा आम्हीही केला म्हणा विस्मय

कोण असेल बरे गुन्हेगार, आणि गुन्हा तरी काय

जल्लादाच्या वळवळत्या मुठीतील फास महाकाय

तोवर करू लागला होता जलद आणि अजब न्याय

 

आम्ही तसे अजाण, बुजलो, बावरलो, शहारलो

तारवटल्या त्याच्या शिशाच्या डोळ्यां पाहून घाबरलो

धीर करून शेवटी एकाने विचारलंसुद्धा

“कोणासाठी उभारलायस तू हा सूळ, जल्लाद दादा?”

 

त्याचे शिशाचे असूनही डोळे, क्षणभर लुकलुकले

सरळ उत्तर टाळून कोड्यात ते उत्तरले

“जो करील सेवा माझी जास्त व रास्त

त्याला सुळावरील फासाचा नजराणा देईन मस्त”

 

उतरला तो वधमंचावरून खाली

गचांडी एका परप्रांतीयाची त्याने धरली

अवधरले श्वास पुन्हा आम्ही भरले

“परदुःख शीतल” ओठ हळू पुटपुटले

 

उद्याच्या सूर्योदयाला, खात्रीच होती आम्हाला

की मंच हा निखळला जाईल, म्हणून सोपवलं त्याला 

जल्लादा हाती, आणि झुकवल्या आम्ही आमच्या माना मूक

गणवेशाला करावा लागतोच सलाम, त्यात कसली आली चूक

 

दुसऱ्या दिवशीचा सूर्य जरा म्लानच उगवला

सकाळच्या वाऱ्याशी न खेळला, न बागडला

बळेच थबकला, छपरावरून घरंगळला

चौकातील सुळाभोवती घुटमळाला, घुसमटला

 

उभा जल्लाद नेहमीच्या जागी, ऐट त्याची खास

आवळल्या मुठीत वळवळत होता फास

डोळ्यात शिशाचे गोळे, जबडा आक्रस्ताळी, 

आविर्भाव विश्वगुरूंचा, कर्तव्यकठोर नजर न्याहाळी 

 

“अहो, संपले ना तुमचे काम”, दिली आम्ही हाक,

“संपवला ना तो परप्रांतीय नापाक” 

आणि आमचे श्वास पुन्हा गोठले, कारण तो म्हणाला

“त्याच्यासाठी थोडाच होता हा सूळ उभारला?” 

 

आमच्या डोळ्यात डोळे घालून तो हसला खूप,

“एका माणसासाठी थोडाच होता हा इतका खटाटोप

तो परप्रांती फासावर चढवला नव्हता फुकट

नव्या फासाचा दोर ओढूनच करावा लागतो दणकट”

 

"खुनी, मारेकरी" एक ओरडला.."धिक्कार असो" दुसरा

जल्लाद गर्दीत घुसला, घोषणा देणाऱ्याला झाला सामोरा 

गुरगुरला तो, “ज्या परप्रांतीयाच्या गळ्यात बांधली मी फाशीची दोरी

सांग, त्याचा कोण लागतोस रे तू, साथीदार, मित्र की गोत्री?”

 

जल्लादाने त्याचा हात ठेवला घट्ट पकडून

आम्ही दचकून मागे सरलो, गेलो गारठून  

शब्द न फुटला आम्हा, हवाली केले त्याला एका दमात

आणि लवून केला जल्लादाच्या गणवेशाला कुर्निसात

 

आणि त्या रात्री मोठं आक्रित घडलं, ऐका सांगतो

जल्लादाचा वधमंच वाढला, विस्तारला चहूबाजूने तो

रक्ताला चटावलेला त्याचा सूळ

त्याला आता फुटले होते अजस्र मूळ

 

चौकीच्या पायऱ्याएवढा, कदाचित रुंद त्याहून

वाढला होता त्याचा वधमंच सुखावून

सुळाची उंची तर अजून वर होती गेली

चौकीवरच्या पाटीपर्यंत होती पोहोचली

 

जल्लादाची तिसरी पारध होता यहुदी एक

गलेलठ्ठ, कर्मठ धर्मांध, करायचा सावकारी, धंदे अनेक

“अरे, अर्ध्या गोवऱ्या त्याच्या स्मशानात आधीच गेल्या

काय तुमचं देणं घेणं अशा माणसाशी अर्धमेल्या?”

 

आणि आम्ही विचारलं चढवून आवाज जरा जास्त 

“ह्यानेच का केली तुमची सेवा बिनशर्त आणि रास्त?”

“नाही, नाही”, जल्लादाने हसत हसत म्हटलं

“हा फाशीचा खांब मजबूत आहे की नाही तेवढं जोखलं”

 

चौथा बळी एक काळा, जल्लाद फिरला हिरत

आक्रोशगीत त्याचं काळीज गेलं चिरत

जल्लाद म्हणे “आधीच तो काळा, त्यात भविष्य त्याला नाही

का करता चिंता तुम्ही त्याची, मला काही कळत नाही”

 

मग पाचवा, सहावा , सातवा.. ”जल्लाद दादा, सांगा तरी एकदा”,

दर वेळी आम्ही विचारलं “ह्यांनी का केली होती तुमची सेवा सदा” 

“तुम्हा शिकवतो आम्हा साऱ्या जल्लादांची ही खेळी 

तपासायची असते तरफ पायाखालची वेळोवेळी”

 

विचारायचं सोडून दिलं आम्ही, कशाला उद्याची बात

रक्ताचा हिशोब मांडत राहिला जल्लाद दिनरात

दिवसामागून दिवस गेले, रात्रींमागून रात्र

वधमंच आणि सूळ, महाकाय होत गेले मात्र

 

वधमंचावरील पाखर मग विस्तारत राहिली

सारा चौक व्यापला, तरीही उरली

भिववणारी वरची तुळई राक्षसी

सावली तिची चुंबे गावाच्या वेशी 

 

गावातून हिंडत जल्लाद चालत आला

ओसाड रस्त्यावरून माझं नाव पुकारत राहिला

गगनचुंबी त्या सुळाकडे गेली माझी नजर

म्हटलं, कोणीच उरलं नसावं आता जायला फासावर

 

म्हणून बोलावत असेल जल्लाद आता मला

मदत हवी असेल त्याला तो सूळ उखडायला

हुरूप आला मनी, हरखून गेलो मी

धावलो त्याच्या वधमंची, त्याच्या मुक्कामी

 

सुनसान आणि सुन्न झालेल्या त्या रस्त्यावरून

पोहोचलो मी, हसला तो मला पाहून

वळवळला त्याच्या व्यस्त मुठीत लठ्ठ

फासाचा दोर पिळदार अन घट्ट

 

परिचित शीळ घालत, ओढला त्याने खटका चटकन

तरफ उडली, खालील सापळ्याचं दार उघडलं झटकन

मिश्कील हास्य त्याच्या ओठात, डोळ्यात अक्कड

माझ्या मनगटावर घट्ट बसली त्याच्या हाताची पकड

 

“जल्लादा, दुष्टा”, मी किंचाळलो,  “चकवलंस तू मला

वधमंच नव्हता माझ्यासाठी तो, होता इतरांसाठी बांधला

मी नव्हतोच कधी तुझा अनुयायी, शिष्य वा बगलबच्चा

साफ खोटं बोललास माझ्याशी, दिलाचा नाहीस तू सच्चा” 

 

त्याचे शिशाचे मग डोळे ते लुकलुकले

“नाही काही खोटं, नाही मी तुला चकवलं

मी नेहमी बोललो सत्य, स्पष्ट आणि बेधडक सरळ 

केवळ तुझ्यासाठीच होता उभारला, वधमंच व हा सूळ

 

कुणी बांधली माझी पूजा, भींतिगर्भ आरत्यांनी भेकड

तूच ठरला माझा बगलबच्चा, अंधभक्त, निष्ठावंत भ्याड

पाठिंबा तुला द्याया आला का कोणी दौडत

सामाजिक ऐक्याचा झेंडा उंच फडफडवत?”

 

“मेले सारे” मी पुटपुटलो कष्टाने 

“नाही, मारले गेले” सुचवली दुरुस्ती त्याने

“आधी तो परप्रांतीय, नंतर तो यहुदी 

केवळ तू मारू दिलंस, म्हणून मारले मी सारे बंदी”

 

तुळईने झाकोळलं गेलं होतं सारं आकाश,

उभा त्याखाली मी, एकला, एकाकी, हताश

करकचून जल्लादाने बांधलं मला खांबाला  

"थांब मांगा" असं जरबेने दटावण्या त्याला

रिकाम्या अन सुन्या त्या चौकात आणि

उरलं ना कोणी, आलं ना कुणी... 

 

आल्बेर कॅमू हा नोबेल विजेता लेखक. त्याचे The Plauge हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. ह्या पुस्तकाचं लेखनदेखील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेलं आहे. अल्जेरियामधील एका शहरात प्लेगची साथ आली. सारेच शहर सोडून इतर ठिकाणी पळून जायचा प्रयत्न करत होते.. पण प्रशासनाने साऱ्या शहराची नाकेबंदी केली. प्लेग वाढत गेला. शहर सोडून जायची संधी असली, तरी तसं न करता लोकांची सेवा करू इच्छिणारा एक डॉक्टर, एक धर्मगुरू, एक पर्यटक, एक पत्रकार आणि एक नगरपालिकेचा सेवक ह्यांच्याभोवती कथानक फिरतं. शेकडो नागरिक दगावले. पण वेगवेगळ्या आस्थेने प्रेरित झालेले ह्या ‘हिरो’नी जिवाची बाजी लावून आजाऱ्यांची सेवा केली. वरवर पाहता हे कथानक तसं साधंसिधं आहे. पण आल्बेर छोट्या छोट्या वाक्यांद्वारे ह्या कथानकामागची पार्श्वभूमी ध्वनित करतो. प्लेग ही कोविडसारखी केवळ जनजीवन विसकळीत करणारी साथ नाही, तर ते तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या हुकूमशाहीचं प्रतीक असतं. तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहणारं, तुमची लढाऊ वृत्ती अजमावू पाहणारी शक्ती. The Plagueमधील ‘हिरो’प्रमाणे तिच्याशी दोन हात करून तिला नेस्तनाबूत करणार की त्या उंदराप्रमाणे तिच्यासमोर मान टाकून प्राण सोडणार? छोटी छोटी स्वच्छता पथकं तयार करून शहर जंतुविरहित करण्याचा प्रयत्न करणारा कादंबरीतील पर्यटक शेवटी प्लेगचा बळी ठरतो खरा, पण कॅमूने त्याच्या तोंडी घातलेलं एक वाक्य आपल्याला विचार करायला भाग पाडतं - ‘महामाऱ्या येतात आणि बळी घेऊन जातात. आपण महामारीच्या मृत्युतांडवाशी दोन हात करायचे की तिच्या हातात हात घालून मिरवायचं, हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं...’

 

कॅमू काहीही म्हणो, आपल्याला त्याचं काय, म्हणा!

 

रिचर्ड नुनीस

मेलबर्न

दिवाळी अंक वर्ष

वाचने 34
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया