Skip to main content

एक आणि शून्यात रमणारी माणसं - अनिल अवचट

लेखक एक_वात्रट यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक अनिल अवचट यांचं २७ जानेवारी २०२२ रोजी निधन झालं. ते माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक होते. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, चांभार, सुतार, लोककलाकार, वेश्या अशा समाजाच्या गरीब, उपेक्षित वर्गाला आपल्या लेखनात स्थान देऊन हा वर्ग आणि मध्यमवर्ग यांच्यातला दुवा बनण्याचं काम अवचटांनी केलं. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटून, त्यांचं निरीक्षण करून, त्यांच्यासोबत राहून त्यांनी आपले लेख लिहिले. समाजाच्या खालच्या स्तरातल्या या लोकांचा जीवनसंघर्ष नेमका कसा आहे, त्यांच्या जगातले प्रमुख प्रश्न कोणते, त्यांची सुखद:खं कोणती याचं त्यांनी आपल्या लेखांमधून चित्रण केलं. ह्या लेखनामुळे समाजातला हा बहुजनवर्ग नेमका जगतो कसा, याची थोडीबहुत कल्पना मध्यमवर्गाला आली. पूर्वग्रहाच्या भिंती गळून पडल्या आणि ह्या समाजाविषयी, त्यांच्या समस्यांविषयी मध्यमवर्गीय लोकांच्या मनात थोडी सहानुभूती जन्माला आली. आज माझ्यात जी थोडीफार संवेदनशीलता आहे, त्याचं श्रेय काही प्रमाणात अवचटांनाही द्यावं लागेल.

समाजात घडत असलेल्या नवीन घडामोडींविषयी, चळवळींविषयी जाणून घेणं, त्या करणाऱ्या लोकांच्या भेटी घेणं आणि त्या लोकांना प्रेरित करणाऱ्या विचारांना समजून घेणं हा अवचटांच्या आवडीचा प्रकार होता. का कोण जाणे, एके दिवशी अचानक, अवचटांनी जर आयटी क्षेत्राविषयी लेख लिहिला, तर तो कसा असेल असा एक मजेशीर विचार मनात आला - म्हणजे २००० साल आहे, भारतात आयटी क्षेत्राचा उदय होत आहे आणि प्रत्येक नव्या घडामोडीकडे कुतुहलाने पाहणारे, त्या क्षेत्रातील लोकांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊ पाहणारे अवचट सर ह्या क्षेत्राकडेही तितक्याच उत्सुकतेने पाहतात आणि त्या वर्षीच्या दिवाळी अंकात ह्या क्षेत्राविषयी लिहितात असं काहीसं. लिहायला सुरुवात केली आणि लेख भरभरा सुचत केला. लेख पूर्ण झाल्यावर वाटलं, आपल्या आवडत्या लेखकाला आदरांजली वाहण्याचा याहून दुसरा चांगला मार्ग कुठला असू शकेल?

पुन्हा एकदा - हा लेख विनोदी आहे, तो जास्त गंभीरपणे घेऊ नये. अवचटांचा किंवा इतर कुणाचाही उपमर्द करण्याचा या लेखाचा हेतू नाही.

दोनेक महिन्यांपूर्वी येरवड्याच्या तुरुंगात माझं एक छोटंसं काम होतं. ते लवकर उरकलं, तेव्हा तसाच पुढे विश्रांतवाडीला एका मित्राकडे जाऊ म्हणून निघालो. थोडं पुढे गेलो, तर डावीकडे काचेच्या इमारतींची एक भलीमोठी रांग दिसली. तिथलं दृश्य मोठं गमतीदार होतं. काही लोक रस्त्यावर उभ्या केलेल्या चहाच्या, वडापावच्या गाड्यांभोवती गर्दी करून होते, काही मुली सिगारेटी ओढत मोठमोठ्याने हसत होत्या, काही लोक चहाचे कप हातात धरून कुठल्यातरी विषयावर तावातवाने चर्चा करत होते. बहुतेक सगळे लोक तरुण - म्हणजे तिशीच्या आतले दिसत होते आणि प्रत्येकाच्या गळ्यात एक ओळखपत्र लटकवलेलं होतं. मी मित्राच्या घरी गेलो आणि त्याला विचारलं, "अरे, हे सगळं आहे तरी काय?" मित्र माझ्याकडे बघत हसून म्हणाला, "म्हणजे तुला माहीत नाही? अरे, ते आयटी पार्क आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी बनलंय. भारत आयटी क्षेत्रात एक महासत्ता बनतोय. तुला काहीच कल्पना नाही?"

मग मी हळूहळू माहिती काढत गेलो. Y2K ह्या शब्दामुळे कॉम्प्युटर्सची थोडीफार माहिती होतीच. त्याशिवाय कॉम्प्युटरमुळे सारं जग कसं बदलतं आहे आणि त्यामुळे भारतातही मोठी स्थित्यंतरं कशी घडून येत आहेत, यावरचे अनेक लेख वाचले होतेच. मी मित्रांना, ह्या क्षेत्राशी ज्यांचा संबंध असू शकेल अशा लोकांना प्रश्न विचारायला लागलो. माहिती शोधत असतानाच एक मोठी आयटी कंपनी आतून पाहण्याचा योग अगदी अचानक जुळून आला. प्रत्येक कंपनीचा सीएसआर नावाचा एक विभाग असतो. कुठल्याही कंपनीला कमावलेल्या नफ्यापैकी दोन टक्के नफा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा लागतो. पुण्यातल्या वाहनं बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीत काम करणारे जोशी त्यांच्या कंपनीच्या सी.एस.आर. फंडाद्वारे आमच्या संस्थेला नियमितपणे मदत करत. काही कामासाठी आज त्यांना फोन केल्यावर एका वर्षांपूर्वी आपण ती कंपनी सोडून आता एका मोठ्या आयटी कंपनीत आल्याचं त्यांनी सांगितलं. "मला आयटी कंपन्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, मी तुमची कंपनी पाहू शकतो का?" असं मी त्यांना विचारल्यावर त्यांनी तत्काळ होकार दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच मी त्यांच्या कंपनीच्या गेटपाशी हजर झालो. कंपनीच्या आत शिरण्यासाठी मात्र बरेच सोपस्कार पार पाडावे लागले. आधी कुणाकडे जाणार हे सांगावं लागलं. त्यानंतर त्या माणसाने जोशींना फोन करून त्यांनी मला खरंच बोलावलं आहे, याची खातरी करून घेतली. त्यानंतर ओळखपत्र दाखवावं लागलं आणि फोटो काढून घ्यावा लागला. त्यानंतर गळ्यात घालायला एक तात्पुरतं ओळखपत्र देऊन मला आत सोडण्यात आलं.

सुरक्षारक्षकाने दिलेल्या सूचनांनुसार मी चालू लागलो. संपूर्ण काचेची इमारत. इमारतीसमोर विस्तीर्ण लॉन. जिकडे तिकडे स्वच्छता आणि टापटीप. मोकळ्या जागांवर चाफ्याची झाडं लावलेली. जागोजागी फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या.

जिना चढून मी पहिल्या मजल्यावर पोहोचलो. सगळीकडे चौकोनी आकाराचे हौदे. (त्यांना क्युबिकल्स म्हणतात, हे नंतर समजलं.) हौद्यात आत शिरायला छोटीशी जागा. आत चारही कोपऱ्यांमध्ये कॉम्प्युटर ठेवलेले. समोर मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर लोक वापरतात तशा चाकांच्या खुर्च्या. आणि खुर्च्यांवर बसलेले, समोरच्या कॉम्प्युटरकडे बघत शांतपणे काम करणारे कर्मचारी.

हॉलच्या शेवटी जोशींची केबिन होतं. केबिन भलतीच मोठी होती. मी आत गेलो, तर ते फोनवर कुणाशीतरी इंग्लिशमध्ये बोलत होते. त्यांनी माझं हसून स्वागत केलं आणि कानाला लावलेल्या टेलिफोन रिसिव्हरकडे हात दाखवत 'पाच मिनिटं थांबा' अशी खूण केली. पंधरा मिनिटांनी त्यांचा फोन संपला.

"माझ्या अमेरिकेतल्या बॉसशी बोलत होतो. काल कंपनीत काय झालं हे त्याला रोज सकाळी फोन करून सांगावं लागतं." जोशी म्हणाले. "चला, जरा कंपनीत एक चक्कर मारून येऊ." असं त्यांनी म्हणताच आम्ही कंपनी फिरायला निघालो.

"कंपनीची पुण्यात ही एकच शाखा आहे आणि इथे साधारण हजार कर्मचारी काम करतात. जवळपास सहा विभाग आहेत, ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर्स बनवून द्यायचं काम करतात. म्हणजे कार कंपन्यांची सॉफ्टवेअर्स बनवणारा विभाग वेगळा आणि बँकांची सॉफ्टवेअर्स बनवणारा विभाग वेगळा."

"पण सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय?" मी त्यांना प्रश्न केला.

"सॉफ्टवेअर म्हणजे संगणक प्रणाली. कॉम्प्युटर म्हणजे निर्जीव हार्डवेअर. त्यामुळे त्याच्याकडून हवं ते काम करून घेण्यासाठी एक संगणक प्रणाली गरजेची असते. वापरकर्त्यांकडून माहिती घ्यायची, तिच्यावर प्रक्रिया करायची, ती व्यवस्थित साठवून ठेवायची आणि ती मागितली की पुन्हा त्यांच्यासमोर सादर करायची, असं काहीसं संगणक प्रणालीचं स्वरूप असतं. आता बँकेचं उदाहरण घेऊ. पूर्वी बँका एका वहीत आपले सगळे हिशोब लिहून ठेवायच्या. पण त्यात अनेक चुका व्हायच्या. आता सगळ्या बँका सॉफ्टवेअर वापरतात, त्यामुळे कुणी खात्यातून पैसे काढले किंवा टाकले की एका क्षणात त्याची नोंद होते. आज दिवसभरात किती पैसे जमा झाले आणि किती काढले, याचा हिशोब एका सेकंदात लावता येतो.

चला, तुमची एका टीमशी ओळख करून देतो, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षच कळेल सॉफ्टवेअर कसं बनतं ते.” जोशी म्हणाले.

"प्रत्येक टीममध्ये साधारण दोन प्रकारचे लोक असतात, सॉफ्टवेअर बनवणारे आणि नंतर ते टेस्ट करणारे." चालता चालता जोशी सांगत होते.

"टेस्ट करणारे म्हणजे?" मी विचारलं.

"टेस्ट करणारे म्हणजे सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करतंय की नाही हे तपासणारे. त्यात काही चुका राहिल्या नाहीत हे पाहणारे. क्वालिटी कंट्रोल माहीत आहे ना तुम्हाला? तीच संकल्पना." जोशींनी उत्तर दिलं.

"हे साने. हे डेव्हलपर्सची टीम लीड करतात आणि हे जाधव. हे टेस्टर्सची टीम लीड करतात." जोशींनी माझी दोघांशी ओळख करून दिली.

"तुम्ही इथे कोणतं सॉफ्टवेअर बनवता?" मी सानेंना विचारलं.

"आम्ही एका मोठ्या ऑटो कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवतो. ही जर्मनीची कंपनी आहे."

"पण सॉफ्टवेअर कसं बनवायचं हे तुम्हाला कोण सांगतं?" मी विचारलं.

"क्लायंट सांगतो. सॉफ्टवेअरमध्ये काय काय पाहिजे याची सगळी स्पेसिफिकेशन्स तो देतो, मग तसं सॉफ्टवेअर आम्ही बनवतो." सानेंनी उत्तर दिलं.

"किती डेव्हलपर्स आहेत तुमच्या टीममध्ये?" मी विचारलं. "बारा जण आहेत." सानेंनी सांगितलं.

"मला तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप कसं करता, ते जरा दाखवता का?" मी असं म्हणताच साने मला एका तरुण मुलाकडे घेऊन गेले. मुलगा २३-२४ वर्षांचा असावा. वर अगदी साधा, करड्या रंगाचा टी-शर्ट, खाली एक अतिशय ढगळ जीन्स आणि पायात स्पोर्ट्स शूज. डोळ्यांवर जाड भिंगाचा चश्मा, केस मागे वळवलेले. आम्ही जवळ आलो तरी त्याचं आमच्याकडे लक्ष गेलं नाही, तो एकटक कॉम्प्युटर स्क्रीनकडेच पाहत होता. मध्येच तो छताकडे पाही, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटे आणि मग सलग सात-आठ शब्द टाइप करी. मी स्क्रीनकडे पाहिलं. समोर दिसणारी सगळी अक्षरं इंग्लिश होती, पण शब्द काही ओळखीचे वाटत नव्हते. मला फक्त print हा एकच शब्द ओळखता आला.

"एक सॉफ्टवेअर बनवायला किती वेळ लागतो?" मी सानेंना विचारलं.

"हा!" साने हसले. "ते त्या सॉफ्टवेअरवर अवलंबून असतं. छोटं सॉफ्टवेअर एका महिन्यात बनू शकतं, मोठ्या सॉफ्टवेअरला एक वर्षही लागू शकतं."

त्यानंतर साने त्यांच्या टीममधल्या तीन-चार जणांना घेऊन कुठल्यातरी मीटिंगसाठी निघून गेले. जोशींना फोन आला, तेव्हा तेही त्यांच्या केबिनकडे गेले. त्यानंतर मी आणि जाधव गप्पा मारत बसलो.

"तुम्ही डेव्हलपर्सच्या चुका काढता, मग तुमची आणि त्यांची रोज भांडणं होत असतील?" मी विचारलं.

"होतात कधीकधी." जाधव म्हणाले."कधीकधी एखादा बग डेव्हलपर लोक फार पर्सनली घेतात."

"बग म्हणजे?" मी त्यांना थांबवत विचारलं.

"बग म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये राहिलेला एखादा दोष, एखादा डिफेक्ट. म्हणजे बघा, तुम्ही एक कॅल्क्युलेटर बनवला. आता मी काय करणार? दहाला शून्याने भागणार. असं केल्यावर तुमचं ॲप्लीकेशन क्रॅश होता कामा नये. तिथे शून्याने भागता येणार नाही असा संदेश दिसायला हवा."

"अच्छा, आता समजलं." मी मान डोलावत म्हणालो.

"एखादा बग त्यांच्या जिव्हारी लागतो. मग ते आमच्याशी भांडायला लागतात." जाधव पुढे सांगू लागले. "तरी मी त्या माणसाला समजावून सांगतो, हे बघ, तू वैयक्तिकरित्या घेऊ नकोस. तुझ्या कामात दोष आढळला, तो मी दाखवला. तुझं-माझं काही वैर नाहीये. आपला काय बांधाला बांध लागून आहे का? तू विनाकारण चिडतो आहेस."

"पण तरी एखादा तुमच्यावर डूख धरून राहत असेल ना?" मी विचारलं.

"हो, होतं तसं कधीकधी. माझ्या बाबतीत नाही, पण माझ्या मित्राच्या बाबतीत एकदा तसं घडलं होतं. तो रोज दुचाकीवर ऑफिसला यायचा. एकदा संध्याकाळी घरी जायला निघाला, तर त्याच्या दुचाकीची सीट कोणीतरी फाडलेली, आतला स्पंज ओरबाडून बाहेर काढलेला. असं तीन-चारदा झालं. तो बिचारा खूप वैतागून गेला. शेवटी त्याने HRकडे तक्रार केली. मग त्यांनी सीसीटीव्ही तपासले, तेव्हा त्याच्याच टीममधला एक डेव्हलपर तो प्रकार करताना दिसला. HR ने त्याला बोलावून खूप झापलं, शिवाय दुरुस्तीचे सगळे पैसे त्याला द्यायला लावले. तेव्हा कुठे त्याने तसं करायचं बंद केलं."

"अरे बापरे! हे तर भयानकच आहे." मी म्हणालो.

एवढ्यात जोशी परत आले आणि आम्ही पुढे निघालो. ऑफिस बरंच मोठं होतं. पुढे एका बाजूला चक्क खेळायची सोय होती. टेबल टेनिसचं टेबल होतं, कॅरम होता आणि आणि मी आजपर्यंत कधीही न पाहिलेला एक खेळही होता. दोन जण एकमेकांसमोर उभे राहून तो खेळ खेळत होते. एक छोटं टेबल होतं. त्या टेबलाला साधारण सहा इंचाच्या लाकडी पट्ट्यांचं कुंपण होतं. कुंपणाच्या फळ्यांमध्ये लोखंडी सळया आडव्या घातलेल्या आणि त्यांना एक-एक, दोन-दोन प्लास्टिकच्या बाहुल्या चिटकवलेल्या. दोन प्रकारच्या बाहुल्या होत्या, पांढऱ्या आणि लाल. एक बॉल त्या टेबलावर फिरत होता आणि त्या सळया मागेपुढे हलवून, त्या बाहुल्या वापरून तो बॉल प्रतिस्पर्धी खेळाडूच्या गोल पोस्टात ढकलायचा दोन्ही खेळाडू प्रयत्न करत होते.

"फूसबॉल म्हणतात त्याला." जोशींनी माहिती दिली.

पुढे आम्हाला डायनिंग एरिया लागला.

"इथे आमचे कर्मचारी जेवण करतात." जोशी म्हणाले. "संध्याकाळचा नाश्ताही इथेच आम्ही देतो."

मी पाहिलं तर जागा अगदी ऐसपैस दिसत होती. ४० तरी टेबलं असावीत. सगळीकडे भयानक स्वच्छता होती, पुण्यातल्या सगळ्यात पॉश हॉटेलपेक्षाही जास्त. मी बी जे मध्ये शेवटच्या वर्षाला होतो, तेव्हा ससूनमध्ये इंटर्नशिप करायचो. एका छोट्याशा खोलीत आम्ही तीन-चार जण जेवायला बसायचो. डुगडुगणारं टेबल, औषधांचा वास, जेवण जायचंच नाही. मनात म्हटलं, इथं किती छान सोय आहे, किती नशीबवान आहेत हे लोक.

जेवणकक्षात कॉफी घेऊन आणि पुढे दोन-तीन आणखी डिपार्टमेंट्स पाहून आम्ही परत फिरलो. आम्ही परत आलो, तर ते दोघे जण अजूनही तो खेळ खेळतच होते.

"यांना आज काम नाही का?" मी जोशींना विचारलं.

त्यांनी एक उसासा सोडला आणि म्हणाले, "आता काय सांगू तुम्हाला? ह्या दोघांनी रिझाइन केलं आहे. ते सध्या नोटिस पिरियडवर आहेत. आता दोन महिने ते काही काम करणार नाहीत, नुसता असा वेळ घालवणार."

"पण मग तुम्ही काहीच नाही करू शकत?" मी विचारलं.

"काय करणार? आम्ही खूप बोलतो, पण ते ऐकत नाहीत. त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीतीही दाखवू शकत नाही, कारण त्यांनी आधीच राजीनामा दिला आहे." ते कसंनुसं हसून म्हणाले.

बरीच मोठी चक्कर मारून आम्ही पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आलो.

“पण एवढ्या मोठ्या कंपनीत काय चाललंय हे तुम्हाला कळतं कसं?” मी विचारलं.

"ती सगळी माहिती मला इथे बसल्याबसल्या कळते, हे पहा." जोशींनी मला त्यांच्याजवळ बोलावलं आणि त्यांच्या स्क्रीनवर दिसणारा तक्ता ते मला समजावून सांगू लागले. "हा माझा डॅशबोर्ड. हे बघा, ही सहा डिपार्टमेंट्स आहेत. प्रत्येकाचं काम ठरवून दिलेलं आहे. आपलं ठरवून दिलेलं काम झालं की नाही, याचा रिपोर्ट प्रत्येक डिपार्टमेंट हेडला दररोज द्यावा लागतो. जर काम झालं असेल तर इथे हिरवा चौकोन दिसतो, नाहीतर तो चौकोन लाल होतो."

ते मला ही गोष्ट समजावून सांगत असतानाच अचानक त्यांनी दुसरी खिडकी उघडली. "एक ईमेल आला आहे, त्याला पटकन रिप्लाय करतो." असं म्हणत त्यांनी कीबोर्डवर टायपिंग करायला सुरुवात केली.

"Please do the needful. FYI&A." असं लिहून त्यांनी कुठेतरी क्लिक करताच ती खिडकी बंद झाली आणि पुन्हा आधीची खिडकी दिसू लागली.

"FYI हे जे तुम्ही आत्ता लिहिलं, त्याचा अर्थ काय?" मी त्यांना विचारलं.

"ओह! ते होय! ती आमची आयटी इंडस्ट्रीची एक वेगळी भाषा आहे. त्याचा अर्थ 'फॉर युवर इन्फॉर्मेशन अँड ॲक्शन' - म्हणजे ही जबाबदारी तुझी आहे, तू यावर कार्यवाही कर असं मी माझ्या एका कलीगला सांगितलं." ते म्हणाले.

"आयटी क्षेत्र म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असा एक समज सगळीकडे पसरत चाललाय. आयटीतले लोक दिवसभर चकाट्या पिटत असतात, ते काहीच काम करत नाहीत असा आरोपही अनेक जण करतात. तो प्रत्यक्षात खरा आहे का?" मी असं विचारल्यावर जोशी लगेच म्हणाले, "नाही, हा समज चुकीचा आहे. आता हे खरं आहे की एका कारखान्यात एका दिवसात जेवढं काम होतं, तेवढं एका आयटी कंपनीत होत नाही. मी आधी एका वाहन कंपनीत होतो, मलाही हा फरक जाणवतो. इथे लोक सकाळी चहा प्यायला जातात, एक तास जेवण करतात आणि संध्याकाळी नाष्टा आणि चहासाठी एक तास घालवतात. इथे काम खूपच कमी वेळ होतं. पण कधीकधी एका महिन्याचं काम एका आठवड्यात करावं लागतं. परवा माझ्या टीममधले लोक रात्रभर काम करत होते. ते सकाळी सात वाजता घरी गेले आणि पुन्हा अकरा वाजता ऑफिसात हजर झाले. आयटी म्हणजे पावपट काम आणि चौपट पगार असा काही लोकांचा समज झालाय, तो अजिबात खरा नाहीये. लोकांनी उगाच कुणाचं ऐकून ह्या क्षेत्रात येऊ नये."

जोशींशी गप्पा मारता मारता एक वाजला. जोशी मला 'आता जेवूनच जा.' असा आग्रह करत होते, पण मी नकार दिला आणि तिथून निघालो.

जोशींची आयटी कंपनी खूप मोठी होती. पण लहानही आयटी कंपन्या असतात, असं मला अनेकांनी सांगितलं होतं. आता मला अशी एखादी छोटी आयटी कंपनी बघायची होती. आमच्या योगवर्गात येणाऱ्या नेर्लेकरांनी 'माझ्या भावाची आयटी कंपनी आहे' असं एकदा सांगितल्याचं आठवलं, तेव्हा त्यांच्याकडे गेलो. त्यांनी तिथूनच त्यांच्या भावाला फोन लावला, तेव्हा ते म्हणाले, "या की. कधीही या कंपनी बघायला. दुपारी मला जरा मोकळा वेळ असतो, तेव्हा शक्यतो दुपारी या."

पुढच्या बुधवारी दुपारी त्यांच्याकडे गेलो. साधारण ८० लोक असलेली एक छोटी आयटी कंपनी ते चालवतात.

ही कंपनी साधी होती. आधीची मोठी कंपनी एका आयटी पार्कात होती, तर ही डेक्कनच्या एका छोट्या गल्लीत एका जुन्या इमारतीत चालवली जाणारी. या कंपनीत शिरणंही खूपच सोपं होतं. मी गेलो तर बाहेर दोन सुरक्षारक्षक बसलेले. "नेर्लेकरांनी मला बोलावलं आहे." असं सांगताच ते हसले आणि "हो, साहेबांनी सांगितलंय तुम्हाला आत पाठवायला." असं म्हणून त्यांनी मला लगेच आत सोडलं.

आतून मात्र ही कंपनी त्या दुसऱ्या कंपनीसारखीच होती. स्वच्छता, टापटीप इथेही होतीच, त्या दुसऱ्या कंपनीइतका भपकेबाजपणा नव्हता एवढाच फरक. नेर्लेकर अगदी साधे होते. वीस वर्षे अमेरिकेतल्या आयटी कंपनीत काम करून ते भारतात परत आले होते आणि आणि इथे आल्यावर त्यांनी ही छोटीशी आयटी कंपनी सुरू केली होती.

मागच्या कंपनीच्या तुलनेत इथलं वातावरण थोडसं घरगुती, अनौपचारिक होतं. नेर्लेकरांनी माझी सगळ्यांशी ओळख करून दिली. आम्ही त्यांच्या केबिनमध्येच गप्पा मारत बसलो.

"अमेरिकेच्या तुलनेत भारतात काम करण्याचा अनुभव कसा आहे?" मी असं विचारताच नेर्लेकर ताडकन म्हणाले, "अनुभव अजिबात चांगला नाही. अमेरिकेत कामं पटापट होतात, इथं साध्या साध्या गोष्टींसाठीही खूप झगडावं लागतं. अजून आपल्याला साधे रस्ते नीट बनवता येत नाहीत. इथे अनेकदा वीज जाते आणि मग जनरेटर सुरू करावा लागतो."

आयटी क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले, "ह्या क्षेत्रात भयानक वाढ होणार आहे, सरकारने या क्षेत्राकडे जरा बारकाईने लक्ष द्यायला हवं. योग्य पावलं उचलली, तर भारत या क्षेत्रात महासत्ता बनू शकतो. सरकारने या क्षेत्राला उत्तेजना मिळेल अशी धोरणं आणायला हवीत."

"तुम्हाला मुख्यतः कुठल्या समस्या भेडसावतात?" असं मी विचारल्यावर ते म्हणाले, "इथे स्पर्धा खूप आहे. तुम्ही जर तासाला २५ डॉलर्स असा दर दिला, तर दुसरी कंपनी ते काम १५ डॉलर्समध्ये करायला तयार असते. शिवाय आमचा नफा डॉलर-रुपयाच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो. जर रुपयाच्या तुलनेत डॉलर गडगडला, तर आमची परिस्थिती अवघड होते. इथे पगारही जास्त द्यावे लागतात. आमच्या कंपनीत फ्रेशरलाही ३० हजार रुपये पगार आहे, इतर क्षेत्रात हा पगार १२ हजारांपेक्षा जास्त नसतो."

"आणि लहान कंपन्यांना भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कर्मचाऱ्यांची गळती." ते पुढे म्हणाले. "इथे कुणीही एका कंपनीत दोन वर्षांपेक्षा जास्त थांबत नाही. लॉयल्टी हा शब्द यांच्या डिक्शनरीतच नाहीये. कुणी ५ हजार रुपये जास्त देऊ केले की हे चाललेच तिकडे. आणि मोठ्या कंपन्या जेवढा पगार देऊ शकतात, तेवढा आम्ही नाही देऊ शकत. त्यामुळे चांगली हुशार मुलं आमच्याकडे टिकतच नाहीत, ती लगेच दुसरीकडे पळतात. लहान कंपन्यांना इथे टिकाव धरणं खूप अवघड होत चाललंय. काही वर्षांनी तुम्ही पहा, या क्षेत्रात फक्त मोठ्याच कंपन्या दिसतील."

जोशींना विचारलेला प्रश्न मी नेर्लेकरांनाही विचारला. "आयटी म्हणजे फक्त मजा नाहीये, तो समज पूर्णपणे चुकीचा आहे. इथे स्ट्रेस भयानक असतो. अनेकदा आम्हाला जेवायलाही वेळ मिळत नाही. अनहेल्दी खाणंही इथे भरपूर होतं. त्यामुळे तुम्ही बघा, जास्त वजनाची समस्या इथे जवळपास प्रत्येकालाच जाणवते." त्यांचं उत्तरही थोडंसं जोशींसारखंच होतं.

नेर्लेकरांशी बोलून निघालो, तेव्हा आता आयटीबाबतचा आपला पूर्वग्रह नाहीसा होत चालला आहे असं काहीसं वाटायला लागलं होतं.

त्यानंतर काही दिवसांनी 'नल दमयंती' हे वधुवर सूचक मंडळ चालवणाऱ्या देशपांडेबाईंची भेट झाली. बाईंना समाजकार्याची आवड आहे आणि हे विवाहमंडळ चालवण्यामागे अर्थप्राप्तीपेक्षाही लोकांची लग्न जमवणं हाच प्रमुख उद्देश आहे. सामान्य लोकांची लग्न तर त्या जुळवतातच, तसंच दोनशेहून अधिक अपंग लोकांचीही लग्नं त्यांनी आत्तापर्यंत आपल्या संस्थेमार्फत जुळवली आहेत.

"काय, कसं चाललंय काम?" असं त्यांना विचारताच त्या थोडंसं चिडूनच म्हणाल्या, "ह्या आयटीतल्या लोकांनी आमचं जगणं अवघड करून टाकलंय बघा."

आयटी शब्द ऐकताच मी कान टवकारले. "का बरं? आयटीतल्या लोकांनी काय केलंय?" मी विचारलं.

"अहो, ज्या पोरीला बघावं तिला आयटीतलाच नवरा हवाय. या पोरांना परदेशात जायचा चान्स असतो आणि शिवाय पगारही बक्कळ. प्रत्येकीची अट एकच - मुलगा आयटीतला पाहिजे. आता शंभरातली पाच लोक असतील आयटी क्षेत्रात, इतर मुलांनी करायचं काय? ह्या ५ लोकांमुळे इतर ९५ मुलांचं लग्न जमणं अवघड होऊन बसलंय."

'अरे बापरे!' मी मनात म्हणालो. आयटी क्षेत्राचे फक्त फायदेच मी आत्तापर्यंत पाहत आलेलो होतो, पण त्याचे काही तोटेही आहेत, हे देशपांडेबाईंशी बोलल्यावर जाणवायला लागलं.

आयटीतल्या लोकांना जास्त वजनाची आणि मानसिक ताणाची समस्या जाणवते हे कळल्यावर मी त्या अनुषंगाने थोडी माहिती शोधायचा प्रयत्न केला. माझा बॅचमेट आकाश पवार हा पुण्यातला प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आहे. योगायोगाने पुण्यातली दोन प्रमुख आयटी पार्क्स आहेत, त्याच भागात त्याचं क्लिनिक आहे. एका रविवारी मी त्याला फोन केला. सकाळी त्याची ऑपरेशन्स असतात आणि संध्याकाळी तो रात्री नऊपर्यंत त्याच्या क्लिनिकमध्ये पेशंट्स बघतो. "उद्या रात्री नऊनंतर येतोस का?" असं त्यानं विचारल्यावर मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी रात्री नऊला मी त्याच्या क्लिनिकमध्ये हजर.

"आयटीतल्या लोकांना आरोग्याच्या समस्या इतरांच्या तुलनेत जास्त असतात, हे अगदी शंभर टक्के खरं आहे." आकाशने बोलायला सुरुवात केली. "आणि का नाही होणार असं? त्यांची दिनचर्या बघ. लिफ्टमधून खाली उतरायचं, गाडीवर बसायचं की लिफ्टने पुन्हा ऑफिसमध्ये. चालायची गरजच नाहीये कुठे. परत दिवसभर त्या कॉम्प्युटरवर बसायचं, उठणं नाही, हालचाल नाही, मग होणार काय? तुला सांगतो, ह्यातल्या पाचपैकी तीन माणसांचं वजन जास्त असतं. बऱ्याचदा हे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात, म्हणजे झोपही नाही. आणि नोकरीत ताणतणाव किती? बरं, व्यायाम करतील तर तसंही नाही. व्यायामाचं ह्यांना आहे वावडं. तुला एक किस्सा सांगतो, मला कालच कोणीतरी सांगितला. बेंगलोरला एक आयटी कंपनी आहे आणि ती आहे नेमकी चौथ्या मजल्यावर. काहीतरी बिघाड झाल्यामुळे बिल्डिंगमधली लिफ्ट बंद पडली, तर ह्या लोकांनी जिने चढायला नकार दिला. कंपनीला दोन दिवस सुट्टी जाहीर करावी लागली. आता बोल!" आकाश त्याचं नेहमीचं गडगडाटी हास्य करत म्हणाला.

"आणि यांची मजा करायची संकल्पना काय, तर मॉलमध्ये जाणं किंवा पिक्चर बघणं. तिथं गेलं की परत अरबटचरबट खाणं. यांचं आरोग्य चांगलं राहणार कसं?" आकाश पुढे बोलला.

"आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या हृदयावरही होत असेल, हो ना?" मी विचारलं.

"अर्थात." आकाश उत्तरला. "अरे, माझ्याकडे येणाऱ्या ५ तरुण लोकांपैकी ४ लोक आयटी क्षेत्रातले असतात."

आकाशशी बोलल्यावर तर माझं आयटी क्षेत्राविषयीचं मत पूर्ण बदललं. इतके दिवस जुजबी काम करणारे, गल्लेलठ्ठ पगार घेणारे, परदेशाच्या वाऱ्या करणारे नशीबवान लोक असं काहीसं माझं त्या लोकांविषयीचं मत होतं. आता त्यांना होणारा कामाचा त्रास, त्यांना सहन करायला लागणारा ताण या गोष्टीही दिसायला लागल्या.

मध्ये काही दिवस गेले आणि एके दिवशी अचानक सकाळमध्ये 'आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसमोर नैराश्याचे आव्हान' या शीर्षकाचा एक लेख वाचनात आला. लेखिका होत्या अनघा कोरकर. 'अरे, ही तर आपली अनघा!' मी मनाशी म्हणालो. ती कॉलेजात मला दोन वर्षं सीनियर होती. मुक्तांगणच्या सुरुवातीच्या काळात काही वर्षे तिने इथे येऊन समुपदेशनाचं कामही केलं होतं.

मी फोन करून तिच्याकडे गेलो. इतर लोकांपेक्षा आयटीतल्या कर्मचाऱ्यांवर जास्त ताण असतो का आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो, हे मला तिच्याकडून जाणून घ्यायचं होतं.

"हो, त्यांच्यावर इतरांपेक्षा नक्कीच जास्त ताण असतो." अनघा सांगू लागली. "हा माणूस आयटीमध्ये लागला, म्हणजे आता हा लवकरच परदेशी जाणार असा अनेकांचा समज असतो. आपण लवकरात लवकर परदेशी गेलं पाहिजे ह्या अपेक्षांचं ओझं घेऊनच प्रत्येक आयटी कर्मचारी काम करत असतो. पण आयटीतले सगळेच कर्मचारी परदेशी नाही जाऊ शकत, तिथल्या काही निवडक कर्मचाऱ्यांनाच ही संधी मिळते. त्यामुळे होतं काय, जे लोक परदेशी जाऊ शकत नाहीत त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. माझा एक पेशंट होता, तुला परदेशी पाठवणार, असं कंपनीने त्याला तीन वेळा सांगितलं आणि पाठवलंच नाही. ह्या गोष्टीचा त्याच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. तो नंतर एकदम विचित्र वागायला लागला. तो रोज सकाळी उठायचा, आवरायचा आणि सुटकेस भरून बाहेर पडायला बघायचा. कुठे चाललास असं विचारल्यावर म्हणायचा, माझं विमान आहे आत्ता, मी अमेरिकेला चाललोय म्हणून."

"अरे बापरे, भयंकरच प्रकार." मी म्हणालो.

"हे तर काहीच नाही. माझा एक दुसरा पेशंट आत्महत्या करायला निघाला होता. 'तुम्हाला कंपनी परदेशी का पाठवत नाही?' असं विचारून विचारून त्याच्या बायकोने त्याला इतकं छळलं की तो पार नैराश्यात गेला. एका पॉईंटला त्याची स्थिती इतकी भयानक झालेली की तो नदीत उडी टाकायला निघालेला. माझ्याकडे आला म्हणून तो वाचला. आज तो लंडनमध्ये आहे. त्याने त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिला आणि लंडनमध्ये दुसरी मुलगीही मिळवली."

अनघा सांगत असलेले एकेक किस्से फारच भयानक होते. ते ऐकून लांबून सुंदर दिसणाऱ्या एखाद्या माणसाला जवळ जाऊन बघितल्यावर त्याचा भेसूर चेहरा दिसावा, तसं काहीसं मला वाटायला लागलं. हे किस्से ऐकल्यावर आयटीची ही बाजूही लोकांसमोर आली पाहिजे, असं मला प्रकर्षाने वाटू लागलं.

त्यानंतर बरेच दिवस गेले. मी कामाच्या गडबडीत अडकलो आणि आयटी क्षेत्राचा विचार काहीसा मागे पडला. मध्ये नेर्लेकरांच्या भावाची कंपनी कुठल्यातरी मोठ्या कंपनीने विकत घेतल्याची बातमी कळली. महाराष्ट्रातला एक मराठी उद्योजक कमी झाला, म्हणून मला वाईट वाटलं, पण स्वतः नेर्लेकर मात्र आनंदी दिसले. "मोठा हात मारला त्याने. आता मस्त ऐश करेल बेटा!" आपल्या भावाविषयी वाटत असलेलं कौतुक नेर्लेकरांच्या तोंडातून अगदी ओसंडून वहात होतं. त्यानंतर आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या ढेकणेमावशींच्या मुलाला आयटी कंपनीत नोकरी मिळाल्याची सुवार्ता त्यांच्याच तोंडून कळली. पेढे घेऊन आलेल्या ढेकणेमावशींच्या चेहऱ्यावर 'आता आपल्याला चांगले दिवस येणार!' हा आनंद अगदी स्पष्ट दिसत होता.

त्यानंतर काही दिवसांनी सगळ्या आयटी क्षेत्राकडे तटस्थपणे पाहणारा मी स्वतःच एक प्रोग्रॅमर बनलो. त्याचं असं झालं, मुक्तांगणमध्ये काही महिने राहून गेलेला एक मुलगा विशाल सुतार परवा मंडईत अचानक भेटला. व्यवस्थित वाटेला लागलेल्या विशालने आता कॉम्प्युटर विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. मी नको नको म्हणत असतानाही ‘तुम्हाला स्वस्तात देतो’ असं म्हणत त्यांने एक कॉम्प्युटर घरी आणून दिला. आता कॉम्प्युटर घरी आणलाच आहे, तर प्रोग्रॅमिंगही शिकून घ्यावं असं म्हणून मी यशवंत कानेटकरांचं 'लेट अस सी' हे पुस्तक बाजारातून घेऊन आलो. त्यात सांगितलेली सगळी सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल केली आणि पहिला सी प्रोग्रॅम लिहायला लागलो. पण काहीही केलं तरी तो प्रोग्रॅम चालेच ना! शेवटी बरीच खटपट केल्यावर आणि मुलीच्या एका कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या मित्राची मदत घेतल्यावर कसाबसा तो प्रोग्रॅम चालला आणि Hello world ही अक्षरं पडद्यावर झळकली. ती अक्षरं पाहून 'झकास!' असं मी मोठ्याने ओरडताच मुक्ता जवळ आली आणि "अरे वा बाबा! आता तू पण प्रोग्रॅमर झालास की!" असं मला थट्टेने म्हणाली. त्यावर आम्ही सगळेच खळखळून हसलो. 'प्रोग्रॅमर बनलो ते ठीक आहे, पण त्याबरोबरचे ताणतणाव मात्र यायला नकोत!' असं मी मनातल्या मनात म्हटलं आणि पुढचा प्रोग्रॅम टाइप करायला लागलो.

दिवाळी अंक वर्ष

वाचने 65
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया