Skip to main content

भ्रमाचा हा पडदा...

लेखक दीपाली ठाकूर यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

               गुरू कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल किंवा ज्ञानाचा परीस तुम्हाला कधी स्पर्शून जाईल, हे सांगता येत नसतं. फक्त त्यासाठी तुम्ही टिपकागदासारखं असायला हवं; आधीच पाण्याने थबथबलेल्या नव्हे, कारण असा टिपकागद काय कप्पाळ शोषून घेणार? त्याचा काही भाग तरी कोरडा असेल, तरच हे शक्य होईल.

               ही प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे आयुष्यात काही गणितं अशी समोर येतात, जी अगदी सोपी वाटतात. आपण एकेक पायरी सोडवत आनंदाने खाली उतरत असतो आणि शेवटच्या पायरीवर आल्यावर समजतं - डाव्या आणि उजव्या बाजूचं समीकरण जुळून आलेलंच नाहीये. (LHS ≠ RHS) सोप्या दिसणाऱ्या या गणितात ‛हातच्यांनी’ किंवा ‛डोक्यावर घेतलेल्या’ आकड्यांनी किंवा ‛कंसात’ लपलेल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी घोळ करून ठेवलेला असतो. खऱ्या गणिताप्रमाणे इथे मागे जाऊन ते सुधारता येईलच, अशी शाश्वती नसते. फार फार तर पुढच्या वेळी तशीच चूक घडू नये म्हणून काळजी घेता येते.

            अशाच एका घटनेमुळे जेव्हा मी बरेच दिवस अस्वस्थ होते, तेव्हा लेक विचारत समोर आली. 
“काय झालं?” 
“काही नाही गं. ‛तेच’ एक रामायण पुरून उरतंय अजून.”
“आई, तुला नेमका कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय?” 
“इतक्या ‛छोट्याशा’ गोष्टीचं एवढं अवडंबर केलं गेलं त्याचा.” 
“पण जर गोष्ट मुळात ‛छोटीच’ आहे, तर तूसुद्धा ती का धरून ठेवलीयेस? तू सोडून दे.”

             हेच ते ज्ञान आणि हाच तो गुरुमंत्र! बस्स, ठरवलं, आता छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून आपण लहान व्हायचं नाही.

              ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड सिंड्रोम’ (AIWS) नावाचा एक न्यूरोसायकॉलॉजिकल आजार आहे. या आजाराला हे नाव कसं पडलं त्यामागचं कारण आहे. लुईस कॅरॉल यांची ‘ॲलिस इन वंडरलँड’ ही सुरस, चमत्कारिक कथा. कथेत लहान मुलांच्या कल्पनाविश्वात असतात, तशा अनेक अतर्क्य, काल्पनिक गोष्टी आहेत. छोटी अ‍ॅलिस तिच्या बहिणीबरोबर एका बाकावर बसलेली असते. कंटाळलेली असते. तिला समोरून ‛उशीर झालाय’ म्हणत घड्याळात बघत चाललेला पांढरा ससा दिसतो. ती त्याच्या पाठी बिळात तर शिरते; पण पुढे मात्र एका लहानशा दरवाजातून तिला आत जाता येत नाही. तिला जवळच एक द्रवाची बाटली दिसते. तो द्रव पिताच ती अगदी लहान होते आणि त्या दरवाजातून आत शिरते. बाहेर बागेमध्ये एरवी छोटीशी दिसणारी अळीही तिच्यापेक्षा खूप मोठी झालेली बघून ती गोंधळते. तिला एक केकचा तुकडा दिसतो. तो खाल्ल्यावर ती घरापेक्षाही मोठी होते. आता तिला सगळ्याच गोष्टी अगदीच लहान दिसू लागतात.

             असंच काहीसं होतं या AIWS आजारात. हा आजार झालेल्या व्यक्तीला स्वतःचं शरीर अ‍ॅलिससारखं लहान वा मोठं झाल्यासारखं भासू लागतं. इतर वस्तूही त्यांच्या मूळ आकारापेक्षा कधी लहान, तर कधी मोठ्या दिसू लागतात. अंतर, वेळ यांचंही नेमकं भान राहत नाही.

              मला वाटतं, आपण सर्वच जण कधी ना कधी या आजाराने ग्रासले गेल्यासारखं वागतो. कधी गरजेला ‛मुंगी’ होऊन साखर खातो, तर कधी मोठेपणाच्या हव्यासापोटी ‛ऐरावत’ होऊन अंकुशाचा मारही खायला तयार असतो. स्वतःला न्यूनगंडामुळे ‛खुजे’ समजतो. रंग, रूप, उंची, बुद्धी, भाषा, गरिबी.. न जाणो, अशा किती न्यूनगंडांना आपल्या आत पोसत स्वतःला ‛आक्रसून’ घेणारी माणसं असतात आवतीभोवती. काही अर्ध्या हळकुंडाने पिवळी होत स्वतःला ‛महान’ समजणारीही असतात. भ्रमाचा भोपळा फुटतो कधीतरी आणि गोष्टीतल्या त्या कोल्ह्यासारखी गत होते. सांगू गोष्ट? सांगतेच.

         तर, या गोष्टीत झालं असं की, एक कोल्हा सकाळीसकाळीच शिकारीसाठी बाहेर पडला एके दिवशी. नुकत्याच डोंगराआडून उगवलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांमुळे त्याला त्याची लांबच लांब सावली दिसली. इतकी मोठी सावली बघून तो हुरळून गेला. सावलीवरून आपल्या आकाराचा अंदाज करू लागला. स्वतःला महाकाय समजू लागला. याच भ्रमात तो शिकार शोधत फिरू लागला. वाटेत कोंबडी, ससा यासारखे अनेक प्राणी त्याला दिसले; पण छे! आपल्यासारख्या अवाढव्य प्राण्याची भूक अशा लहानसहान प्राण्यांनी कशी भागणार? आणि अशा चिमुरड्या, किरकोळ प्राण्यांची शिकार करणं आपल्या इभ्रतीला शोभेल होय? असा विचार करून त्यांना सोडून तो मोठी शिकार शोधत राहिला.
              हळूहळू सूर्य माथ्यावर येऊ लागला, तसतशी त्याची सावली आखूड होऊन त्याच्या पायापाशी येऊ लागली. दिसेनाशी होत जाणारी सावली पाहून त्याचा मोठेपणाचा फुगा आता फुटत चालला होता. एव्हाना पोटातही भुकेचा आगडोंब उसळला होता. भुकेला कोंडा म्हणून त्याला कोणताही फुटकळ प्राणी चालणार होता; पण आता सारे प्राणी उन्हामुळे आपापल्या निवाऱ्याच्या जागी पोहोचले होते. त्यामुळे बिचाऱ्या कोल्ह्याच्या नशिबात त्या दिवशी मात्र कडकडीत उपवास आला.

गोष्ट तर संपली; पण दहावीच्या परीक्षेतील गुणांचे फुगवटे घेऊन आमच्याकडे अकरावीत आलेल्या मुलांना कधीकधी साधं लिहिता, वाचतादेखील येत नसताना पाहिलं, की मला ती गोष्ट पुन्हा आठवते. ‛लहान’ माझी बाहुली, ‛मोठी’ तिची सावली’ हे कधी समजेल, मुलांच्या या गुणांवर भिस्त असणाऱ्या त्यांच्या पालकांना? बेभरवशाच्या सावलीपेक्षा आरसा बरा, तो दाखवायला हवा. भविष्यातील उपासमार टळेल. अभ्यास करायच्या, कलागुण जोपासायच्या वयात त्या गोष्टींचं महत्त्व ‛कमी’ आणि मौजमस्तीचं आयुष्यातलं स्थान मुलांना जास्त ‛मोठं’ वाटतं; पण ताटातली भाजी आणि लोणचं-चटणी यांचं प्रमाण उलट करून कसं चालेल?

               मुलंच नाही, आपण मोठेही चुकीचं भिंग हातात घेतो. ‛लांबची’ माणसं मग आपल्याला ‛जवळची’ वाटतात; पण ‛जवळची’ माणसं कधी ‛दूर’ जातात, समजत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं ‛कुसळ’ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं ‛मुसळ’ दिसत नाही. आपण ‛राईचा पर्वत’ करतो. ‛लहान’ तोंडी ‛मोठा’ घास घेतो. आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या ताटातील घास आपल्याला ‛मोठा’ दिसतो. दुःख मात्र स्वतःचं ‛मोठं’ मानून ‛परदुःख शीतल’ समजतो.

             सुखदुःखाचं तरी मोजमाप कसं करतो आपण? ‛सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे!’ ‛किनारा’ चित्रपटात गुलजारजींनी लिहिलेल्या एका गाण्याच्या आधी त्यांच्याच आवाजात एक वाक्य आहे, “जिंदगी कभी पल में गुजर जाती है.. कभी जिंदगी भर एक पल नही गुजरता.. ” प्रतीक्षेशी, वेदनेशी जोडलेल्या क्षणांच्या पायांमध्ये मणमण बेड्या असतात. फूलपाखराचे पंख घेऊन येणारे सुखाचे दिवस म्हणून ‛भुर्रकन’ उडून गेल्यासारखे वाटतात आणि दुःखाचा एकेक क्षण मात्र एकेक ‛पर्वासारखा’ वाटतो.

            ऐंशीच्या दशकात आलेला ‛हनी, आय श्रंक द किड्स’ हा सिनेमा अशाच एका आकारिक कथानकावर बेतलेला. यात मि. सेलेंस्की असं एक विद्युतचुंबकीय यंत्र तयार करण्याच्या प्रयत्नात असतात, ज्यायोगे समोर येणारी कोणतीही वस्तू आकुंचन पावून अगदी लहान होणार असते. त्यांचा हा प्रयोग यशस्वी तर होतो; पण दुर्दैवाने एखाद्या वस्तूवर न होता त्यांच्या स्वतःच्या दोन मुलांबरोबरच शेजारी मि. थॉमसन यांच्याही दोन्ही मुलांवर तो यशस्वी होतो. ही चारही मुलं लहान म्हणजे, अवघ्या पाव-पाव इंचाची होतात. त्या चौघांसाठी मात्र सभोवती आता एक अजस्र विश्व असतं. लॉनमधील गवत त्यांच्यासाठी जंगलासमान होतं. पाण्याचा एकेक थेंब म्हणजे प्रलय, जिवाशी खेळ होतो. अशा अनेक संकटांचा सामना करत असताना एक छोटीशी मुंगी त्यांना पाठीवरून वाहून नेते, विंचवापासून वाचवते; पण त्यांना वाचवताना स्वतः मृत्युमुखी पडते. सिनेमात मि. थॉमसन यांच्या तोंडी मुलाशी संवाद साधत असताना या अर्थाचं एक वाक्य आहे,  “मोठं’ व्हायचं असेल, तर काहीतरी ‛मोठं’ करायला हवं.” लहानशी मुंगी सिद्ध करून दाखवते, मोठेपण आकारात नाही; आचारात असतं, विचारांत असतं.

            AIWS सिंड्रोममध्ये मेंदूतील बिघाडामुळे ‛दृष्टीमध्ये’ दोष निर्माण होतो. म्हणून आकार, अंतर यांचं मोजमाप चुकतं; पण आपण मात्र कित्येकदा ‛दृष्टिकोनातील’ दोषांमुळे यांत गल्लत करतो. स्वतःला, आजूबाजूच्या माणसांना, घटनांना आपापल्या चश्म्यातून लहान-मोठ्या आकारांत बघत असतो; पण जे दिसतं, ते खरं असतंच असं नाही. केवळ जन्माला आधी येण्याने कुणी ‛मोठं’ होत नाही आणि स्वतःचा मोठेपणा विसरून लहानांमध्ये लहान झाल्याने कुणी ‛लहान’ होत नाही. एका ‛लहानशा’ पाण्याच्या थेंबाचं मोल हवेच्या ‛मोठ्या’ बुडबुड्यापुढे फोल ठरवणं ही बौद्धिक दिवाळखोरीच. सत्याची जाणीव करून देणारा क्षण म्हणजे स्वतःच विणलेल्या या भ्रामक जाळ्यामधून मोकळं होण्याचा क्षण, मग ती जाणीव कुणामुळे का होईना! तोच ज्ञानाचा परीसस्पर्श! अंतरातील आत्म्याची झालेली भेट!!
       

          ‛भ्रमाचा हा पडदा। डोळा अंधार मांडतो। 
           सत्याचा हा मार्ग। जीवा उमगत नाही ॥
           तुका म्हणे हरीविण। सर्व माया हाची भ्रम।
           ओळखावा आत्माराम। तोचि एकची शाश्वत ॥’

दिवाळी अंक वर्ष

वाचने 78
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया