‘रचना तेरण्णावर’ हे नाव यादीत पाहून मला धक्का वगैरे बसला नाही. मी पहिल्या पन्नासांत येते का, इतकीच उत्सुकता मला होती. आणि क्रमांक मिळाला ४२. मी आनंदाने उडीच मारली. त्या भरात, फरश्यांच्या फटीत अडकलेल्या, काल आलेल्या धूळवाताच्या रेतीवरून माझा पाय घसरला. नशीब, कुणीतरी मला मागच्या मागे सावरलं. निकाल पाहून लगेच आईची आठवण आली. कानभुंग्याने लगेच तिला हाक दिली. ती मसाल्याच्या तयारीत होती. त्यामुळे सगळीकडे खाट उठला असावा. तिने खोकत खोकत माझे अभिनंदन केले. आता तिच्या मसाल्याला फारच बहार येणार, हे मला पक्के कळले.
तिला मसाल्याची उठाठेव का करावीशी वाटते, हे आजवर मला कळलेले नाही. अगदी मिलीग्राममध्ये धण्यांचे प्रमाण कमी जास्त केले काय किंवा ग्रॅममध्ये केले काय! मला काहीही फरक पडत नाही. तिचे मात्र असले अनंत प्रयोग सुरू असत. एकतर मसाले प्रचंड महाग झालेले होते. बाजारात तयार चवीची रसायने मिळत, पण आईला मात्र कसली तरी परंपरा जपल्याशिवाय चैन पडत नाही. तिच्याजवळ तेलपाणी केलेला एक प्राचीन लाकडाचा खलबत्ता आहे. त्यात ती धणे कुटते. तो आजीकडे - म्हणजे तिच्या आईकडेही होता. तो केव्हापासून आमच्या घरी असा पिढ्यान पिढ्या दिला गेला आहे, कोणास ठाऊक! परंपरा जपणे हा इतका खर्चीक मामला झालेला आहे की माझे त्यावर तिच्याशी नेहमी भांडण होत असते. त्यात ही घरच्या मसाल्याची परंपरा. ही कुणी सुरू केली कोण जाणे. आईला स्मरणरंजनाचे सतत उमाळे यायचे. त्यात तिने तिच्या आणखी तीन मैत्रिणींना या मसालायोगात गोळा केले आणि त्यांचेही पारंपरिक मसाले ती करू लागली.
गेल्या वर्षी धण्यांचा भाव ऐकून माझे एकदा डोकेच सटकले होते. आमच्या घरचा दोन महिन्यांचा खर्च ती मूठभर धण्यांत घालणार होती. मी काहीबाही बोलले. भिकेचे डोहाळे लागलेत का आपल्याला? विकून टाक तो खलबत्ता. जुन्या लाकडाला हल्ली चांगला भाव येतो. ती काहीच बोलली नाही. खलबत्त्यावरून नुसता हात फिरवत बसून राहिली. त्या रात्री ती जेवली नाही. मी माफी मागितली नाही. दुसऱ्या दिवशी तिने नेहमीसारखे धणे कुटले. तो आवाज दिवसभर घरात घुमत राहिला. असल्या गोष्टी घरात मुरत राहतात, एवढंच.
आमच्या देवघराच्या भिंतीवर एक जुना फोटो टांगलेला आहे. फोटो म्हणजे काचेच्या चौकटीतले रंगवलेले चित्र. त्यात अंगभर केस पांघरलेली, हातात शिवलिंग धरलेली एक बाई आहे. आजी तिला अक्का म्हणायची. आई नुसतीच देवी म्हणते. ती नेमकी कोण हे दोघींना कधी धड सांगता आले नाही. चौकटीची कड धुराने काळवंडली आहे. आई खलबत्ता घासते, तेव्हा त्या काचेवरूनही फडके फिरवते. मी कधी विचारायच्या फंदात पडले नाही. देवाचे फोटो घरात असतात, असायचेच.
सलग १३ वर्षे दुष्काळ पडेल असे वाटले नव्हते. माझा अंदाज होता, पाच वर्षांनी मनासारखा पाऊस होईल. परंतु तो साफच चुकला. त्याआधी तो नेहमीपेक्षा उशिरा यायचा आणि थोड्याच काळात प्रचंड कोसळायचा. त्यानंतर येणारी थोडीफार थंडी जवळ जवळ गायब झाली होती. गव्हाला याचा सगळ्यात मोठा फटका बसला आणि आईला आवडणारी चपाती हळूहळू हद्दपार झाली. मसाल्याची शेती तर पुरांनी, उष्णतेने पूर्ण साफच झाली होती. परिणामी आईच्या मसाल्यांच्या याद्या आक्रसत गेल्या आणि धण्याचा एकेक दाणादेखील ती लक्षपूर्वक वापरू लागली. तरीदेखील आईचे वेड कमी नाही झाले.
किनाऱ्यावर ‘जलधि’ योजनेची कामे जोरदार सुरू होती. तिला लोक चेष्टेने ‘जलदी’ योजना म्हणत. त्या योजनेवर दणाणून वाद झाला. समुद्राचे पाणी गोडे करून कोयनेच्या धरणात नेणे हे इंजिनिअरिंगचा कस लावणारे काम होते. ते येत्या ४-५ वर्षांत पूर्ण होईलच याची खातरी नव्हती. पण पाऊस पडेल का, हे क्वांटमगणकांनादेखील छातीठोकपणे सांगता येत नव्हते. कोकणात स्थलांतर सुरूच होते. तिथे शेकड्यांनी जलकेंद्रे सुरू होती. त्याने वेगवेगळे असंख्य प्रश्न उभे झाले. सगळे सोडवता सोडवता क्वांटमगणक थकून जात. त्यांना वीज तर तुफान लागे. लहान लहान अणुविद्युत केंद्रे जागोजागी उभी होती. त्यांचा अणुकचरा माझ्या घराच्या काहीशे मीटर खाली सुखनैव वेगवेगळ्या उपअणूंमध्ये झरतोय, अशा विचारांनी मला मध्यंतरी झोप येत नसे. कानाच्या पाळीला जाणवणारी ऊब जणू किरणोत्सराची आहे असा भास होऊन मी दचकून जागी व्हायची. पण ते किंचित तापलेले न उतरवलेले कानभुंगे असत, हे जाणवून पुन्हा झोपी जायचे. नंतर त्या झरणाऱ्या अणुकचऱ्याच्या अस्तित्वाची जाणीव कल्पनेतदेखील होईना, इतकी सवय झाली.
या दुष्काळात परंपरेप्रमाणे लोकांमधून सनदी अधिकारी वेचायचे सरकारचे काम मात्र आहे तसेच सुरू होते. गेल्या १०० वर्षांतसुद्धा त्या परीक्षांमध्ये काहीही फरक पडला नाही. मानवी बुद्धीला तिच्या नैसर्गिक क्षमतेनुसार जोखणे ही परीक्षेची पहिली अट. माहितीला तोटा नव्हताच. माहितीपासून डेटा आणि डेटापासून सखोल विश्लेषण करायला शेकड्याने एआय उपलब्ध होते. मात्र त्यांच्या मदतीशिवाय विविध हायपोथेसिस मांडून स्वतःचे एक विशेष विश्लेषण करणे, त्याची योग्ययोग्यता तपासणे आणि त्याचे नैतिक मूल्यमापन करणे असे अनेक पैलू या परीक्षेत तपासले जात.
मिळालेल्या क्रमांकानुसार मला ‘इंडियन डेटा सर्विस’ मिळणार, हे ठरलेलेच होते. माझी पसंती अर्थातच तीच होती. पहिल्या १०० विद्यार्थ्यांना तरी ही ‘ए’ गटाची सेवा मिळतेच मिळते.
त्या दिवशी निकाल पाहून घरी परतताना मात्र एक गोष्ट घडली. ती आता मला पुसटशी आठवते. ती घडलीच असेल असे नाही. कधीकधी आपल्या संवेदनशक्ती आपल्या नकळत मनाला सूचना देत असतात. ते इशारे जणू निसटलेले बिंदू कालांतराने जुळवायलाच कमी यावेत. निळ्या वाहिनीसाठी मी फलाटावर उभी होते. लांब फलाटाच्या त्या टोकावरून कुणीतरी मला न्याहाळत आहे अशी जाणीव झालेली नक्की. मी आनंदात होते, कदाचित त्यामुळे जगाचे लक्ष माझ्याकडेच असावे असेही मला वाटत असणार. पलीकडून आकाशात अंधारून यायला सुरुवात झालेली. आज पुन्हा धुळावर्त उठणार होता. मी लगबगीने होस्टेलवर आले. तर दरवानाने चेहरा ओळखायलाच नकार दिला. कधीकधी ही सिस्टिम स्वतःच स्वतःची स्वछता करते, त्यामुळे असे झाले असावे, म्हणून बुब्बुळ तपास म्हटले तरी त्याला ओळख पटेना. नंतर कानभुंग्याने होस्टेलमालकांना हाक दिली. शेवटी ते स्वत: आले आणि त्यांनी दरवान ‘रिसेट’ केला. मला प्रवेश मिळाला. माझ्यावर कुणाची करडी नजर तर नाही ना, असा संशय दाटून आला. काय सांगावे, सगळ्या उत्तीर्ण उमेदवारांवर सरकारच नजर ठेवत असावे! त्यानंतर मी दोन दिवस जमेल तशी राजधानीची मजा लुटली.
पण जेव्हा हातात सेवानिश्चितीचे पत्र पडले, तेव्हा मात्र मला धक्का बसला. मला ‘इंडियन अकाउंटिंग आणि ऑडिटिंग सर्विस’ मिळाली होती! मी हा प्राधान्यक्रमच भरला नव्हता!
नेमक्या त्याच क्षणी कानभुंग्याने कानात गुरगुर केली. मी प्रतिसाद दिल्यावर समोरच्या पडद्यावर तिथे खर्जातल्या आवाजाचा, करड्या केसांच्या मध्यमवयीन पुरुषाचा एक अवतार प्रकटला आणि बोलू लागला, “रचना, अभिनंदन! हा रेकॉर्ड केलेला अधिकृत परंतु पारंपरिक संदेश आहे. अकाउंटिंग आणि ऑडिटिंग सर्विशीत तुझं स्वागत! येत्या चार-पाच दिवसांत तुझं प्रशिक्षण सुरू होईल. त्याविषयीच्या सूचना तुला स्वतंत्रपणे कळवल्या जातीलच. बाय द वे, मी प्रभाकर सारंग, तुझा एक वरिष्ठ. तू या सेवेत यायला उत्सुक असशीलच! पुनश्च एकदा अभिनंदन आणि स्वागत! भेटू लवकरच!” इतके बोलून अवतार गेला.
सगलेच अनपेक्षित होते. कानभुंग्याने या महाशयाबद्दल आणखी माहिती हवी का? असे विचारले. हे सद्गृहस्थ माझ्याच राज्याच्या अकाउंटिंग विभागात उच्चस्तरीय अधिकारी होते. या गोंधळाबद्दल कानभुंग्याने स्वतःच लोकसेवा आयोगाला पत्र लिहायला घेतले. आईशी बोलून झाले, मामाशी बोलून झाले. मित्रमैत्रिणींना सांगून झाले. कुणाचाही यावर विश्वास बसला नाही. काही जणांनी पुन्हा परीक्षा द्यायचासुद्धा सल्ला दिला मला. आयोगाकडून कसलेही उत्तर आले नाही. दोन दिवस वाट पाहून शेवटी मी सेवा नाकारत असल्याचे पत्र लिहिले. त्यालाही कुठचेच उत्तर आले नाही. आणखी दोन दिवसांनी प्रशिक्षणाचे वेळापत्रक, होस्टेलचे तपशील, कागदपत्रे व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना अशा गोष्टी जणू काही नीटच ठरल्याप्रमाणे मिळाल्या. रेल्वेची प्रथम श्रेणीची तिकिटेसुद्धा मिळाली. प्रशिक्षणानंतर एखाद्या सहलीसाठी प्रायोजकत्वदेखील मिळाले होते. मला काय करावे हेच कळेना. आयोगाचे कार्यालय धुळीच्या स्वच्छतेसाठी बंद ठेवले होते, तेव्हा तिकडेही दोन-तीन फेऱ्या मारून आल्याचा काही फायदा झाला नाही.
शेवटी मी घरी परतायचा निर्णय घेतला. आईला कळवले. माझे डोके भंजाळून गेले होते. आता पुन्हा आणखी एक वर्ष घालवायचे या कल्पनेनेच मला नकोसे झाले. का कुणास ठाऊक, ही सर्विस स्वीकारून पाहू असे वाटले. निदान किमान प्रशिक्षण पूर्ण करू. आपला एकही पैसा खर्च होत नाहीय. मग काय ते ठरवू. तिथे इतर लोकांशी बोलता तरी येईल. तसे मी पुन्हा आयोगाला कळवले.
मी सकाळी स्थानकावर वेळेआधी पोहोचले. गाडी १८ मिनिटे उशिरा धावत होती! वाट पाहिली. जसजशी वेळ येत होती, तसतशी लघवीची कळही येत होती. गाडी आली. मी माझ्या जागेवर जाऊन बसले. गाडी निघायला आणखी दोन मिनिटे उशीर झाला. समोरून मला संदेश पाठवणाऱ्या त्या अवताराच्या बऱ्यापैकी जवळ जाणारे एक गृहस्थ गडबडीत माझ्याजवळ आले. हातात, अंगावर, नेसलेल्या साध्या कपड्यांशिवाय काहीही नव्हते. हलकेच हसून त्यांनी विचारले, “रचना, इथे शेजारी बसू का? मी प्रभाकर! इथेच माझं आरक्षण आहे!”
माझ्या उत्तराची वाट न पाहता लगबगीत बसत त्यांनी पाण्याची बाटली खोलली. पिण्याआधी मला म्हणाले, “तुझ्या अंगावरची सगळी उपकरणं बंद करशील का? आधी तो कानातला तुझा खाजगी सखा!”
ही सूचना चमत्कारिक होती. मी तसे केल्यावर त्यांनी विचारले, “आपण थेट जेवणच करू. मी सुशी सांगितली होती. तुला आवडते का?” मी काही उत्तर द्यायच्या आत त्यांनी बटण दाबलेसुद्धा. आणि ते माझ्या प्रश्ना-उत्तरांची फारशी पर्वा न करता बोलू लागले, “आधी माफी मागतो. मला थोडासा उशीर झाला. गाडी माझ्यासाठीच तीन मिनिटं थांबली होती. चिडू नकोस, मी माझ्या पदाचा असा वापर नाही करत. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी संहिताच तशी असते. तर! मी प्रभाकर सारंग. पन्नासची तुकडी.”
आसनावर स्थिरस्थावर झाल्यावर सारंग थोडे मोकळे झाले, “तुझा गोंधळ झाला हे कबूलच करतो. माफी, मी खरं तर मागणार नाही, कारण या सगळ्यात कोणतीही गडबड नाही, हे लक्षात घे. आपल्याच राज्यात सध्या मी अतिरिक्त लेखापरीक्षा आयुक्त आहे. मात्र प्रशिक्षणासाठी मी आवर्जून येतो इकडे. तुला मीच साहाय्यक लेखापरीक्षा निबंधक म्हणून कामावर घेत आहे. तू थेट माझ्या कार्यालयातच येत आहेस.”
माझ्या मनात प्रश्नांची रांग लागली होती. मी तोंड उघडायला जातेच, तोवर सुशी आली. प्रभाकरांनी मला खायचा आग्रह केला. मी मुकाट्याने ती गिळू लागले. चविष्ट होती.
“मासा इतका ताजा कसा असा प्रश्न पडला ना तुला? नैसर्गिक नाही तो. इथेच राजधानीजवळ एका लहान फॅक्टरीमध्ये तयार होतो. तुला ठाऊकच असेल, समुद्रशेतीला बंदी आहे ते” घास तोडता तोडता सारंग आमच्या भोवतीचे वातावरण जरा हलके करू लागले.
“नाही, माशांचं मला पडलं नाही. मला ही सेवा नको आहे, मी कित्येकदा तक्रार करूनही मला साधं उत्तरसुद्धा दिलं गेलं नाही.” मी तक्रार केली.
“मला माहीत आहे तू नाखूश आहेस ते. मी काळजीपूर्वक निवड केली आहे तुझी. तुझ्याबरोबर ३६ क्रमांकाचा उमेदवारसुद्धा आहे. परंतु तो माझ्या कार्यालयात काम करणार नाही.” सारंग माझी समजूत घालायचा सतत प्रयत्न करत होते.
“परंतु मला डेटा सेवा हवी आहे!” माझ्या कपाळावरच्या आठ्या तशाच होत्या.
सारंग शांतपणे म्हणाले, “मला तेही ठाऊक आहे. पण, पण सध्या तुला मी इतकेच सांगेन. की अशी संधी पुन्हा येणार नाही. हे बघ, मी तुझा निबंध खूप काळजीपूर्वक वाचला आहे. केवळ परीक्षेतलाच नव्हे, तुला आधी दिलेले निबंधसुद्धा मी वाचले आहेत. विशेषतः लोकदेवतांच्या उन्नयनाच्या डेटावर तू घेतलेली मेहनत आणि त्यानंतर तू स्वतः केलेलं एआय युनिटचे प्रारूप. तंत्र बदलले की लोकांच्या श्रद्धा कशा वळण घेतात, याची तू बांधलेली मोजपट्टी, ती मला विशेष वाटली.”
त्राग्याने मी स्पष्ट केले, “त्याचा आणि या सेवेचा दूरान्वयानेदेखील संबंध नाही.”
“बरोबर, आणि म्हणूनच या सेवेची संधी तुला दिली आहे. ठीक, मी मोकळं होऊन येतो” असं म्हणून ते गडबडीत उठले आणि प्रसाधनगृहाकडे चालू लागले. संभाषण तिथेच थांबले.
ते येऊन शांतपणे बसले आणि मी पुढे काही बोलायच्या आतच त्यांनी मला शांत बसण्याची खूण करत सांगितले, “रात्रभर केलेल्या प्रवासाने मी थकलो आहे. सध्या आपण आता यावर जास्त चर्चा नको करायला.” त्यांचे डोळे खोल चमकत होते. त्यांच्या बोलण्याची लय आश्वासक होती.
जणू मला कोणताही पर्याय नसावा तशी मी मुकी झाले. सुशीतून काहीतरी खायला तर दिले नसेल ना, मला अशीही शंका आता मला येते. पण तसे नसावे. कारण सुशीच तशी नशिली होती. त्यानंतर त्यांना आणि मला दोघांनाही डुलकी लागली. डोळे उघडले तेव्हा अकादमीचे स्थानक अगदी जवळ आले होते. ते उठले आणि खिशातला मोरपंखी कागदाचा दुमडलेला कपटा काढून मला देत म्हणाले, “मी अलीकडे उतरेन. हा ओरिगामी मोर ठेव तुझ्याकडे! 'समिती'मध्ये सदस्यांनी एकमेकांना मोर देण्याची परंपरा आहे.”
ते उतरून गेलेसुद्धा. मी त्या मोराकडे पाहतच राहिले. थोड्या वेळाने माझे स्थानक आले. फारशी घुटमळ न करता मी दोन बस बदलून पत्त्यावर पोहोचले. तिथे आणखी थोडे सोपस्कार करून एकदाची खोलीवर आले. थकल्याने शरीराकडून झोपेचे आवतण येत होते, तथापि त्या सगळ्या विचित्र दिवसाचा लेखाजोखा मनात सुरू होता. त्यामुळे झोपेची वाट पाहत मोराशी खेळत पडले. हा मोर आणि ती समिती काय भानगड असावी अशा उलटसुलट विचारांनी हळूहळू मला गाढ झोप आली.
दुसऱ्या दिवसापासून पुन्हा वेळापत्रकाप्रमाणे चाकोरीबद्ध दिनक्रम सुरू झाला. विचारांच्या पार्श्वभूमीला मात्र त्या मोराचा त्रिकोणी पिसारा उलगडलेला असे. यथावकाश सगळे प्रशिक्षण पार पडत होते. सारंगांनी लेखापरीक्षेचे नियोजन कसे करावे, नोंदींची तपासणी आणि उलटतपासणी कशी करावी यावर सखोल सत्रे घेतली. मी त्यांच्याशी पुन्हा बोलायचा प्रयत्न करत असे, परंतु ते नेहमीच गडबडीत असत. नंतर ते गायब झाले. एके दिवशी अचानक आठवले की ३६ नंबरचा कुणीतरी सहपरीक्षार्थीसुद्धा निवडला गेला आहे, असे सारंग रेल्वेत म्हणाले होते. कानभुंग्याने त्याचे नावगाव, फोटो शोधून दाखवले. मी अकादमीत शोधाशोध करून तो राहत असलेली खोली शोधली. त्याच्या खोलीच्या दरवाज्याखालून मी एक चिट्ठी सरकवली. चिट्ठीवर फक्त एक ओरिगामी मोर चितारून खाली माझा खोली क्रमांक लिहिला होता. वाटले, त्यालाही कदाचित सारंग भेटले असावेत. इतक्या माहितीवरून तो माझ्याकडे येईल. काही दिवस मी त्याची वाट पाहिली. मी रोज रात्री त्या मोराकडे पाहत झोपी जाई. तो कागद उलगडून त्यात काही छुपा संदेश वगैरे आहे का किंवा त्यावर एखादे न दिसणारे इलेक्ट्रॉनिक सर्किट छापले आहे का, ते अनेक वेळा तपासले. अगदी साधा रंगीत कागद होता तो. शेवटी मी सेवानियुक्ती घ्यायचा निर्णय घेतला.
प्रशिक्षणाच्या शेवटच्या आदल्या दिवशी रात्री क्रमांक ३६ माझ्या दारावर आला. दाराच्या कडीवर हात ठेवून मी आधी दारावरच्या भिंगातून त्याला आतून न्याहाळले. नाजूक टकटक करून तो मी दार उघडायची वाट पाहत होता. त्याने खिसा चपापून मोर बाहेर काढला. त्याची घडी नीट केली आणि पुन्हा खिशात ठेवला. त्याला चश्मा होता, हे त्याच्या आधीच्या फोटोमध्ये कुठे दिसले नव्हते. त्याने आणखी एकदा टकटक केली आणि मी दार उघडायच्या आतच तो निघाला. का कुणास ठाऊक, मी त्याला जाऊ दिले. पण त्यालाही मोर दिलेला होता, म्हणजे सारंग नक्कीच त्याला भेटले असावेत.
पुढच्या दिवशी मी त्याला सगळीकडे शोधले. नेमका तोच गायब होता. निरोप समारंभालासुद्धा तो उपस्थित नव्हता. कार्यालयात चौकशी केली असता तो पहाटेच निघून गेल्याचे समजले.
प्रशिक्षण संपल्यावर मी पुन्हा राजधानीत येऊन नियुक्तीची वाट पाहिली. सारंग म्हणाले तशी माझ्याच राज्यात माझी नियुक्ती झालेली होती. माझ्या नियुक्तीला थोडा वेळ होता. उत्तरेला आयुष्यात पुन्हा यायला मिळेल असे का कुणास ठाऊक वाटले नाही. म्हटले, उत्तरेला फिरून घ्यावे. सगळेच उद्ध्वस्त होण्याआधी नजरेत साठवून घ्यावे. त्या प्रायोजनाचे काय करावे हा प्रश्नही होताच. मी काश्मीरला जायचे ठरवले. राजधानीतून एक चांगली प्रवासी गाडी भाड्याने घेतली आणि एकटीच निघाले. मला एकट्यानेच असे सगळीकडे फिरायला आवडते. आईला मी कळवले नाही. तिने मला तत्काळ नकार दिला असता. तिचे बरोबरच होते म्हणा. सगळीकडे लुटालूट, जाळपोळी यांना ऊत आला होता खरा. आणि मला एका ठिकाणी आवर्जून जायचे होते. पंडरेथन.
पंडरेथन का, हे सांगायला जरा मागे जावे लागेल. शिक्षणात 'धर्म आणि परंपरांचा तौलनिक अभ्यास' घेतला, तेव्हा लल्लेश्वरीच्या वाखांवर मी एक प्रबंध लिहिला होता. त्यासाठी जुने फोटो धुंडाळताना झेलमकाठी पद्मासनात बसलेल्या, अंगभर केसांच्या एका योगिनीचा फोटो हाती लागला होता. त्या फोटोखालच्या नोंदीत पंडरेथनजवळच्या शिवालयाचा उल्लेख होता. तो फोटो पाहिल्यावर मला आमच्या देवघरातल्या जुन्या फोटोतली बाई आठवली, तंतोतंत तीच होती ती. पण आजी तिला अक्का म्हणायची आणि अक्का म्हणजे अक्कमहादेवी असेल तर ती इथली, दक्षिणेतली होती. लल्लेश्वरी तर काश्मिरातली होती. दोघींच्यामध्ये दोनशे वर्षांचे आणि दोन हजार कोसांचे अंतर होते. मग एकच चित्र दोन्हीकडे कसे आले? प्रबंधात मी तळटीप टाकून मोकळी झाले होते, 'लोकचित्रपरंपरेतील अभिसरण'. खरे सांगायचे तर मला उत्तर ठाऊक नव्हते, म्हणून पाठ केलेला शब्द वापरला होता. ती तळटीप मला अजून न फिटलेल्या हिशोबासारखी टोचते.
राजधानीतून निघाले, तेव्हा कानभुंग्याने विचारले, प्रवासाची रूपरेषा बनवू का? मी हो म्हटले. त्याने जुन्या पर्यटन विदागारातून गुलमर्गच्या रानफुलांचे सडे, पहलगामची देवदार वने, दल सरोवरातल्या शिकारा नौका, पेंगॉन्गचे निळेशार पाणी आणि लेहचा गजबजलेला बाजार अशी यादी वाचायला घेतली. मी त्याला मध्येेच थांबवून विचारले, "ही माहिती कधीची आहे?" क्षणभर थांबून तो म्हणाला, "या नोंदी त्रेपन्न वर्षांपूर्वी अद्ययावत केल्या आहेत. नंतरच्या नोंदी उपलब्ध नाहीत." मी म्हटले, "मग आत्ताचे काय आहे ते सांग." त्याने सरकारी विदा वाचायला घेतला. त्यात नुसते आकडे होते. सियाचीन, कोलाहोई आणि डोकरीनी हिमनद्यांमध्ये उरलेले हिम शून्य टक्के होते. हंगुल आणि भारल नामशेष झाल्याच्या नोंदी होत्या. तिबेटी लांडगा तर कधीचाच मिटून गेला होता. हिमबिबट्यांची शेवटची नोंद खालच्या गावांतली होती, उरलेली कुत्री फस्त केल्याची. पेंगॉन्गच्या पाण्याचा रंग पिवळट तपकिरी झाला होता आणि काठांवर माशांची ठिसूळ हाडे साठली होती. लेहच्या बाजाराच्या नोंदीत रिकामा एवढा एकच शब्द होता. लदाखमधले स्थलांतर एक्क्याण्णव टक्क्यांवर गेले होते आणि चांगपा जमातीची तर नोंदच उपलब्ध नव्हती. मी त्याला बंद केले आणि खिडकीबाहेर बघत बसले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सफरचंदाच्या बागांचे सांगाडे मागे सरकत होते. चिनारांचा हिरवागार गजबजाट असतो असे मी ऐकून होते, वाचूनही होते, पण आता तिथे नुसती करडी बोडकी खोडे उरली होती. शेकडो वर्षे टिकलेले देवदार अख्खेच्या अख्खे उन्मळून रस्त्याकडेला कुजत पडले होते. रानफुलांचे लांबच लांब सडे असायचे म्हणतात, त्या उतारांवर आता पिवळसर जळकट रान माजले होते. मोसमी पाऊस केव्हाच आटोपला होता, पण पश्चिमी विक्षोभांचा भरवसा नव्हता. दक्षिणेत पाण्याचा थेंब नव्हता आणि इथे ढगफुटीमागून ढगफुटी होत होती. स्पितीत गावेच्या गावे दरडींखाली गाडली गेली होती आणि गिलगिट-बाल्टिस्तान आणि काराकोरमच्या अंगालाही तेच झाले होते. लदाखची दगडी घरे आणि गोम्पा मठ एकामागोमाग कोसळले. आतल्या मूर्ती आणि पोथ्या लोकांनी आधीच समतल भागांत हलवल्या होत्या. भूगर्भातली उष्णता वाढल्याने वरचे थरच अस्थिर झाले आहेत अशी पुस्ती कानभुंग्याने मघाशीच जोडली होती. मी त्याला पुन्हा काही विचारले नाही.
श्रीनगरला पोहोचले, तर शहर अर्धे पाण्यात होते. दल कुठे संपते आणि झेलम कुठून वाहते, हे ओळखायला मार्ग नव्हता. झेलमला मोठा पूर आलेला. पंडरेथनला जायला एका नावाड्याला नाव घालायला लावली.
नावाडी साठीचा असावा. मी काही न विचारताच वल्ही मारता मारता तो बोलत राहिला. म्हणाला, "केशराची शेती होती आमची पंपोरला. आजोबांच्या वेळेला एक तोळा केशर म्हणजे एक तोळा सोनं. पुराने वाफे गेले आणि उष्म्याने फुलं गेली. अखरोट होते, बदामही होते, तेही गेले. पोरे जम्मूला गेली आणि तिथून आणखी खाली दक्षिणेला. आता तिकडून विचारतात, बाबा कधी येणार? मी म्हणतो, नदी सोडून नावाड्याने जायचं कुठे?"
त्या डळमळत्या होडीतून मी पंडरेथनला आले. या जागेला पूर्वी पांड्रेथन असेही म्हणायचे. हे नाव काय, पंडरेथनदेखील आता विस्मृतीत चालले आहे. पुराने कुजत गेलेल्या मोठ्या खोडांच्या विरवृक्षांची जळकी टोके मंदिराभोवती दिसत होती. शिवालय अर्धे पाण्यातच होते. त्यामुळे ते अधिकच संयमी वाटत होते. लांबून कुणाला कळणारही नाही इथे एक शिवालय आहे. शेवाळांनी भरलेले कोपरे. दारांच्या दंडगोल दगडी कमानी अर्ध्या पाण्यात बुडालेल्या, म्हणजे पाण्यातून गेल्याशिवाय आत जाताच येत नव्हते. आम्ही जवळ बोट नेली. एखादा मासा फटकून चमकून गेला. खालची लाकडी दारे उघडीच होती. नावाडी म्हणाला, "पोहून आत जाता येईल. पण आत काय असेल कुणास ठाऊक. अंधारात काही दिसणारही नाही." अर्ध्या पिरॅमिडी आकाराचे शिखर मात्र उन्हात तळपत होतेे. त्याला प्रत्येक बाजूला नक्षीदार झरोका होता. त्यातून आत डोकावता आले असतेे. आतला अंधार पाहता आला असता.
मी प्रबंधाच्या नोंदी काढल्या आणि त्या फोटोखालची ओळ पुन्हा वाचली. 'झेलमकाठी, पंडरेथनच्या शिवालयाजवळ' असे त्या नोंदीत लिहिले होतेे. म्हणजे फोटोतली आणि आमच्या देवघरातल्या चौकटीतली ती बाई याच काठावर बसत असे. आजीच्या अक्काचा आणि या जागेचा संबंध मला अजून जोडता येत नव्हता, पण त्या पाठ केलेल्या तळटिपेपेक्षा हा काठ खरा वाटत होता. हिशोब फिटला नव्हता, पण निदान खतावणी सापडली होती.
त्या रात्री मुक्कामाच्या खोलीत मी एका कागदावर दोन नावे लिहिली - अक्का आणि लल्लेश्वरी, आणि दोघींच्या मध्ये एक रेघ ओढून तिच्यावर प्रश्नचिन्ह टाकले. प्रशिक्षणाने नुकतीच लागलेली सवय, न जुळणाऱ्या नोंदी समोरासमोर मांडायच्या आणि जुळणी लागेपर्यंत खोदत राहायचे. तो कागद मी प्रबंधाच्या नोंदींमध्ये जपून ठेवला.
या उद्ध्वस्त काश्मिरात पुन्हा कधी यावेसे वाटेल कोणास ठाऊक. कोणालाही काडीचाही रस नसलेले 'धर्म आणि परंपरांचा तौलनिक अभ्यास' असले विषय घेऊन मी शिक्षण घेतले ते अशा न जुळणाऱ्या चित्रांच्या नादापायीच. माझा तर रादोवान रिच्ताने मांडलेल्या 'तंत्रज्ञानासह उत्क्रांती'वर विश्वास आहे. ती घडत असतानाच्या मागच्या काळाचा मी धर्म, परंपरा आणि श्रद्धा अशा अंगांनी अभ्यास केला. त्यामुळे आता मी एवढे मात्र नक्की सांगू शकते - या जुन्या मंदिरांना, अशा गूढ स्थळांना सध्या फक्त अभ्यासापुरते महत्त्व उरले आहे. आणि सतत त्याच विचारांत राहिल्यामुळे माझ्या श्रद्धाही आधीच डळमळीत झालेल्या आहेत.
मी एका धुंदीतच राजधानीत परतले. तिथून पुन्हा घरी जायची तयारी करायची होती.
---
## इ. स. २०६० : निरोप
त्या सकाळी कोमट उन्हे खिडकीच्या तुटलेल्या काचेवरून आतल्या खोलीत उतरली, तेव्हा जेक बार्बरच्या श्वासांची गती आधीच मंदावली होती. या छोट्या ग्रामीण दवाखान्यात येऊन पडल्याला त्याला आता तीन आठवडे झाले. त्याच्या त्वचेचा जवळ जवळ प्रत्येक तुकडा, पेशींत खोलवर उतरलेल्या विकिरणांनी पोळून निघालेला. डॉक्टरांनी त्याच्यासाठी कोणतेही आशादायक शब्द उच्चारणे बंद केले होते.
खिडकीतून बाहेर पसरलेला अर्कान्सॉचा पिवळा पडलेला विस्तीर्ण गवताळ माळ आता रखरखीत होता. सुकी झुडपे पाहून मरणपंथाला लागलेल्या गायीगुरांच्या निर्जीव नजरांना हिरव्याकंच मक्याची स्वप्ने पडत. दूरवर सुमचूप झालेली एक शाळा बाळपावलांची वाट पाहत थिजून उभी असण्याला दशके होत आली. तिच्या भिंतींवर बुरशी जणू मृत्यूच्या आकृतीसारखी पसरली होती.
ठरल्याप्रमाणे जेकच्या खात्यात दरमहा एक रक्कम येई आणि औषधांच्या रिकाम्या पाकीटांत विरून जाई. त्यांना जेक थंडपणे निघून जावा हेच हवे होते. तो खंगून गेला काय किंवा शरीरावर लोंबणाऱ्या चरबीच्या स्नेहल उष्म्यात लपेटून सुखाने गेला काय, त्याने आवाज न करत निघून जावे एवढेच अपेक्षित होते. खोलीतला कामचलाऊ एआय त्याच्या नैराश्याचेच एक अंग वाटत होती. मधूनच स्वतःच बिघडून जात असे आणि मग निष्प्राण आवाजात त्याला 'सगळे ठीक आहे' सांगत राही. मरणाच्या सावल्यांनाही इथे माणसांइतकाच कंटाळा आलेला होता.
जेकच्या बाजूला जुनाट खुर्चीवर कुमुद बसली होती. तिच्या केसांतल्या पांढरट तंतूंची तिला फिकीर नव्हती आणि त्या तंतूंना तिची. पण तिच्या डोळ्यांत तोच जुना प्रकाश, स्त्रीत्वाचा, अजून टिकून होता. त्या पाणीदार दिठीने जेकला आयुष्यभर मोहून ठेवले होते. लाकडी फणीने ती सावकाश त्याचे विरळ केस विंचरू लागली. तिचा स्पर्श विश्वाच्या एका शाश्वत अज्ञात गूढाशी होणाऱ्या संवादासारखा.
"कुमुद," मंद आवाजात तो म्हणाला, "मला काही नको आता. या औषधांनी तोंड पोळून गेलं आहे बघ. फक्त उद्या तुझ्या हातचा तो स्वर्गीय पेस्तो खायला घेऊन ये. किती मन लावून बेजील आणि सेज कुटतेस तुझ्या त्या लाडक्या लाकडाच्या मोर्टरमध्ये!" त्या मोर्टरमागची आख्यायिका जेकला पाठ झाली होती. कुमुदच्या घरात तो पिढ्यान् पिढ्या चालत आलेला आणि फार फार पूर्वी कुठल्याशा नदीकाठच्या योगिनीच्या हातून तो त्यांच्या वंशात आला, अशी गोष्ट कुमुदची आजी सांगत असे. थोडा वेळ दम घेऊन तो म्हणाला, “कुमुद, तू इथे आहेस म्हणून मला कधी भीती वाटत नाही. तू असल्यापासून मला ती कधीच वाटली नाही.”
शांत स्वीकाराचे मंद प्रेमळ स्मित कुमुदच्या चेहऱ्यावर उमटले. जेकने डोळे मिटले. कुमुदचा स्पर्श घट्ट झाला. कर्करोगाने विच्छिन्न झालेल्या त्याच्या कायामानसात एक खोल निर्मळ तृप्ती दाटून आली. अनेक वर्षांच्या दुःखाचा, हेटाळणीचा, नाकारलेपणाचा डाग कुमुदच्या स्पर्शात विरघळून जात राहिला. लोक त्याला कधीच विसरून गेले होते. तो लोकांना विसरून गेला होता. त्या मुलाखतीत सांगितलेली त्याची गोष्ट अनेक वर्षांपूर्वी इंटरनेटच्या महापुरात केव्हाचीच वाहून गेली होती. लोकांना विस्मृतीचाही विसर पडला होता, इतके सत्यासत्याच्या भासमय जगात ते गुरफटले होते.
जेकच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिच्या शेजारी तिची मुलगी, नातू आणि काही अंतरावर पुतळ्यासारख्या उभ्या असलेल्या काळ्या कोटातल्या चार माणसांच्या नजरांशिवाय कुणीही नव्हते. मुलीच्या घटस्फोटित नवऱ्याला बोलवण्याचाही तिला धीर झाला नाही. जेकला पुरल्यावर ती पळत पळत त्या काळ्या कोटातल्या माणसांकडे गेली आणि कळकळून म्हणाली, “मला आणि पोरांना परत भारतात जाऊ द्या.” ते काही न बोलता आल्या गाडीत निघून गेले. काही दिवसांनी तिची परतण्याची व्यवस्था झाली. एका मालवाहू विमानातून सामानाबरोबर तिला अमेरिका सोडावी लागली. ती कशीबशी आपल्या जन्मगावी पोहोचली. खस्ता खात घर शोधले.
काडीमोड झाल्यावर तिची मुलगी जास्तच सैरभैर झाली होती. भारतात आल्यावर ती आईशी भांड भांड भांडली. सारखी रुसून पुन्हा अमेरिकेत जायचा प्रयत्न करू लागली. फरफट नको, म्हणून कुमुदचा नातू तिच्याजवळच राहिला. एके रात्री जेकची आठवण काढत ती नातवाला खेळवत असताना मुलीचे जहाज वादळात बुडल्याची बातमी तिच्या कानावर आदळली. खंगलेल्या तिच्या शरीरात विलाप करण्याचेही बळ नव्हते. नातवाचा चेहरा पाहत बळेबळेच ती घास गिळू लागली. दिवसामागून दिवस जात होते. भवताल कोलाहालाने संपृक्त झाला होता. पण ती भवतालापासून केव्हाच तुटली होती.
एके दिवशी तिच्या दारावर एका फकीर बाईची थाप पडली. अशा फकीरांचे लोंढे च्या लोंढे सगळीकडे फिरत होते. ते दिसेल ते यंत्र उद्ध्वस्त करत. तिच्या पदरात घालायला कुमुदकडे थोडे सरकारी तांदूळ शिल्लक होते. ते घेताना बाईने तिच्या हातात एक चिठ्ठी सरकवली आणि सर्रकन निघून गेली. चिठ्ठी उघडताच कुमुद मटकन खाली बसली. त्या चिठ्ठीवर अंगभर केस लपेटलेल्या, हातात शिवलिंग घेतलेल्या एका स्त्रीचे रेखाचित्र, जणू अज्ञातातून आपल्या कुणी प्रेमाच्या माणसाने हाक द्यावी तसे तिला खुणावत होते.
दुसऱ्या दिवशी कुमुदने गावातल्या जुन्या सामानाच्या दुकानातून एक काचेची चौकट आणली आणि ते चित्र देवांच्या फोटोंच्या रांगेत टांगून दिले.
---
## मी रचना
साहाय्यक लेखापरीक्षा निबंधक म्हणून मी शेजारच्या जिल्ह्यात रुजू झाले. विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांमध्ये औद्योगिक प्रगतीचे शिखर गाठून अनेक कंपन्या उतरतीला लागलेल्या होत्या. त्यामुळे कामाचा व्याप होता. वर्षाअखेर तो प्रचंड वाढे. डेटा ॲनालायसिस करायला नानाविध प्रकारचे एआय उपलब्ध होते. त्यामुळे कामे पटकन होत. तरीही वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची प्राथमिक अक्कल लागतेच. मला त्यात बरीच गती होती. माझा वेळ पटकन निघून जाई.
सारंग मात्र खूप कमी वेळा भेटत. जेव्हा भेटत, तेव्हा अत्यंत नेमके आणि कामाचे बोलत. सहा महिने कसे उडून गेले, कळले नाही. आईला भेटायला आठवड्यातून दोनदा जाता येई. तिच्या मदतीला एक मदतनीस ठेवला. त्याचा खर्च थोडासा जास्त होता, परंतु त्याचा विमा, त्याची दुरुस्ती आणि अपग्रेडचा खर्च कार्यालयाकडून उचलला जाई. त्यामुळे तो परवडत असे. आईला अधूनमधून लसी, औषधे टोचायला लागत आणि आई पूर्णपणे तेव्हा त्याच्या ताब्यात जात असे. घर आणि कार्यालय या दोहोंनी मला व्यापून टाकले होते. अधूनमधून त्या मोराची आठवण होई आणि मी तो काढून काहीबाही शोधत बसे. 'समिती'चा कुठे माग लागतो, हे अगदी सजग राहून तपासत असे. जितके गवसले, त्या सगळ्यात गुरफटून गेल्यावर नुसते गोल गोल फिरल्यासारखे वाटायचे.
कार्यालयात एका एआयचा अपग्रेड चालू होता. त्यामुळे एके दिवशी काम जवळजवळ ठप्प होते. मी माझ्या केबिनमध्ये खुर्चीवर निवांत रेलून बसले. कानभुंग्याने माझा आवडता राग ‘वुल्फ्रॅम’ लावला. माझी तंद्री लागली. काही मिनिटांनी तो कानात वाजायचा अचानक बंद झाला. इतक्यात सारंगांनी काचेवर टकटक केली.
नेहमीप्रमाणे गडबडीतच ते आत आले आणि चेहऱ्यावरचे गांभीर्य अजिबात ढळू न देता मला नवा ओरिगामी मोर देत म्हणाले, “बनाळीला समितीची बैठक आहे. त्याचं हे आवतण. कुठेही कोणतीही वाच्यता नको. मी जॅमर चालू केला आहे, त्यामुळे अजून १०एक मिनिटं सर्व सिग्नल रोखले जातील. कोणताही एआय चालणार नाही. काहीही रेकॉर्ड होणार नाही. त्यामुळे नीट ऐक. बैठकीपूर्वी तुला आपल्या ऑफिसच्या कामाबाहेर समितीचं एक कार्य करावं लागेल.”
मी पटकन सावरून बसले. सारंगांना जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, हे अनुभवावरून कळलं होतं.
“तुमच्या तालुक्यात कुंडलहळ्ळी नावाचं एक गाव आहे. त्या गावातल्या कमलव्वा धोड्डमणी नावाच्या एका बाईला काल डेनी ब्राउन पी.एन.ई.एस.च्या झटक्यांमुळे मंडल दवाखान्यात भरती केलं आहे. म्हणजे तसं निदान आहे. हे तिचं रेकॉर्डिंग. तुला पाठवून ठेवतोय. सवडीने नीट ऐक. कोणत्यातरी लोकदैवताला अंघोळ घालण्याविषयी ती बडबडत आहे.”
मी विचारलं, “हा तपशील लिहून घेऊ का?”
“घे, पण नंतर नष्ट कर.” सारंग ठामपणे म्हणाले, “समितीशी संबंधित कोणतीही व्यक्ती तुला हा मोर देईल. हळूहळू तुला या कामांची सवय होईल. सुरुवातीला मात्र जिभेवर नियंत्रण हवं. समितीविषयी बोलताना शक्यतो कोणत्याही एआयशी जोडलेली राहू नकोस. समितीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेचा आणि निर्णयाचा मान ठेवला जातो. मी जे कार्य सांगेन, ते पार पाडलंस तर समितीच्या इतर सदस्यांची आणि तुझी भेट घालून देईन.”
सारंगांनी पुढे मुद्द्याला हात घातला, “कार्य काय आहे ते नीट समजावून देतो. तुला या स्त्रीला भेटून तिच्याबद्दल होता होईल ती खाजगी माहिती काढायची आहे. आमच्याकडे तिची इत्थंभूत माहिती आहेच. परंतु तिच्या एकाच व्यक्तिमत्त्वाची. तिचा सगळा जैविक डेटा तुला मिळेल. पण ती जे काही बडबडते आहे त्याचा तुला अन्वयार्थ शोधायचा आहे. म्हणजे तिच्या मनोराज्यात जे काही घडत आहे, ते ते सगळं. समजलं?”
मी श्वास रोखूनच हे ऐकत होते. गोंधळून मीही ठामपणे उत्तरले, “नाही समजले!”
सारंग त्याच अविचल सुरात म्हणाले - “साहजिक आहे. तुझी क्षमता, तुझा अभ्यास पाहता समिती तुला स्थायी सदस्य करू इच्छिते. तुला समितीच्या कार्याबद्दल पहिल्या बैठकीत कळेलच. त्याआधी मात्र तुला हे छुपं काम करावं लागेल. एका उच्चपदस्थ वैद्यकीय अधिकाऱ्याचे अधिकार तुला दिले जातील. एका अतिप्रगत वैद्यकीय एआयचा ॲक्सेसदेखील मिळेल. ॲक्सेसची पातळी तिसरी आहे, त्यामुळे त्याचं गांभीर्य तुझ्या लक्षात यावं. तुझी तशी दुसरी एक ओळखसुद्धा निर्माण केली जाईल. त्या कामाचा आणि तुझ्या इथल्या कामाचा काहीएक संबंध नाही. तुझं इथलं काम मी तात्पुरतं कमी करत आहे.”
सारंगांचा सूर उत्तरोत्तर गंभीर होत होता. “माझ्यावर विश्वास दाखवलास, त्याबद्दल तुझा आभारी आहे. फक्त याची वाच्यता मात्र करू नकोस. आणि आणखी एक - तुला समितीच्या त्या त्या सरकारी आवरणाशी गोपनीयतेचा करार करावा लागेल. हा करार मोडला, तर देहदंडाची शिक्षादेखील होऊ शकते हे ध्यानात असू दे. पण ठीक आहे, इतकीही घाबरू नकोस.”
माझा गोंधळ जास्तच वाढला. मी घाबरूनच विचारले, “मला काही धोका वगैरे आहे का या कामात?”
“नाही, अजिबात नाही. हे शोधपत्रकारितेसारखं आहे, गुप्तहेरगिरी नाही. समिती तुझ्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेईल. कामाचं फलित म्हणून तुला एक निबंध लिहावा लागेल. तुला हव्यात त्या एआयचे परवाने आणि अपग्रेड मिळतील. तुला आवडेल हे कार्य!” सारंगांनी मला दिलासा द्यायचा प्रयत्न केला. आणि मी भानावर यायच्या आत सारंग केबिनच्या बाहेर पडलेसुद्धा. कानभुंग्याने पुन्हा राग आळवायला घेतला. तरंग पुन्हा सुरू झाले असावेत. मी झटकन उठले आणि सारंगांना शोधू लागले. खिडकीतून तोपर्यंत त्यांच्या वाहनात बसताना ते दिसले आणि मी मागे वळले.
कानभुंग्याने मघाशी जॅम झालेला एक संदेश दाखवला. हा क्रमांक ३६चा संदेश होता! क्रमांक ३६! “दिलेल्या पत्यावर ये. ठरल्या वेळेत ये, वाट पाहीन.” इतकेच बोलून तो अवतार मिटला. स्क्रीनवर एक कागदी ओरिगामी मोर तरंगत होता. दोन वाक्यात संभाषण करून पटकन निघायचा रोग ‘समिती’च्या सगळ्या लोकांना दिसतो. बघता बघता तोही नजरेआड झाला. मी कानभुग्याला मोर उलगडायला सांगितले. पत्ता होता कोट्टलगीचा. वेळ होती पंधरा दिवसांनंतरची. या मोरांचा छडा लावलाच पाहिजे आता, असे खूप तीव्रतेने वाटू लागले.
तीन दिवसांनी माझ्या मेजावर माझ्या त्या कामासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे एक करडे खोके ठेवले होते. त्याला स्पर्शताच ते उघडले. मला लागतील त्या गोष्टी होत्या. राज्य सांस्कृतिक विभाग, राज्य वैद्यकीय मंडळ यांच्याशी गोपनीयतेची करारपत्रेदेखील होती. त्यांवर स्वाक्षरी करून मी ती सारंगांना पाठवून दिली.
पुढच्या दिवशी मी दवाख्यान्यात पोहोचले. गावाच्या एका कोपऱ्यात एकाकी अशी ती लहानशी जीर्ण इमारत होती. आसपासच्या झाडांवर पाने नव्हती. आवारातलेच एक मोठे वडाचे सुकलेले झाड धुळावर्ताने उन्मळून पडले होते. दवाखान्यात एक माणूस रुग्णसेविका आणि कसाबसा चालणारा सरकारी एक जुना रोबो मदतनीस. तिथून रुग्णाची सगळी जमेल तशी माहिती घेतली. कुंडलहळ्ळी गावापासून बरेच दूर एका पडक्या देवळाजवळ ती बेशुद्धावस्थेत सापडलेली. तिच्या मेंदूतील सेरोटोनिन नियंत्रित करायला काही सूक्ष्मडोस दिले गेले होते. त्याहून कोणतेही दुसरे उपचार केले गेले नव्हते. स्थिर झाल्यावर तिने मोठ्या दवाखान्यात जायला नकार दिला. घरी घेऊन जायला कुणीतरी येईल याची वाट पाहत ती तिथेच पडून राहिलेली. कुंडलहळ्ळी फारसे दूर नव्हते. मी तिला घरी घेऊन जायला तयार झाले. तास-दीडतास लागला असता. त्या निमित्ताने तिच्याशी बोलणे झाले असते.
तिने वाहनात बसायला खूप आढेवेढे घेतले. म्हणाली, "चालत जाईन." मला आश्चर्य वाटले. इतक्या दूर चालत जायला तिला दिवससुद्धा पुरला नसता. मी तिच्यावर जवळजवळ जबरदस्तीच केली. हातात तिची वस्त्रे घेऊन तशीच ती तशीच दवाखान्यातल्या वस्त्रात नाखुशीने गाडीत बसली.
“शिक्षण झालंय का कमलव्वा?” शक्य तितकी काळजी घेत मी हळू आवाजात विचारलं.
“पोथी वाचण्यापुरतं झालंय”. तिची नाराजी तशीच होती. “कुरुळ लोक आम्ही. यंत्राला नकार देतो.”
“माझं नाव रचना. मी सहज आरोग्य केंद्राला भेट द्यायला आले होते, तेव्हा फक्त तुम्ही तिथे एकट्याच होता. घरचे कुणी नाही का आले?” मी संभाषण पुढे न्यायचा प्रयत्न करत होते. तिने यावर काहीच उत्तर दिले नाही. त्यावर मी ही थोडा वेळ गप्प राहिले. पण न राहवून विचारले, “तुमचं लग्न झालंय का?”
“आमच्यात लग्न करत नाहीत बाय. हमाम पक्षाचं खलतं माणूस आमी. एक विचारू का? तुमच्या कानातला चोरभुंगा काढून ठेवता का? आम्ही यंत्रापासून लांब राहणारी माणसं आहोत. तो आपलं सगळं बोललेलं ऐकतोया.” तिने कळकळीने अशी विनंती करताच मी कानभुंगा काढून आत ठेवला.
हमाम किंवा हवान आणि दस्ता असे दोन मुख्य आध्यात्मिक पंथ अथवा पक्ष या कुरुळ लोकांत असतात, एवढे मला अभ्यासामुळे ठाऊक होते. ती खलती होती म्हणजे कुरुळांचे धार्मिक नेतृत्व करणारी होती. पण खलते म्हणजे नेमके काय, हे मी तिलाच विचारले. गाडीच्या काचेबाहेर बघत ती सांगत राहिली, “जल्माच्या येळंला आमी बाळांची वाटणी करतो बाय. हे हमामाचं, हे दस्त्याचं. नवे खलते करायला काही बाळं खलते मागून घेतात. आईबाप देतात, पण अटीवर. ती अट एक आध्यात्मिक व्यवहार असते बघ. आणि खलत्यानं पुढं संसार थाटायचा म्हटलं तर तशी मुभा असते.” मी विचारलं, "हमामात बाया जास्त असतात का?" ती किंचित हसली, “जास्त म्हणजे किंचित जास्त.” शंभर-एक वर्षांपूर्वी कुरुळांनी यंत्राला नकार दिला आणि ते आपापल्या गावांत पारंपरिक शेती करून राहू लागले, हे मात्र मला आधीच ठाऊक होते. त्यांतले काही देशोधडीला लागले आणि काही चिवटपणे या मातीत आपले जैविक पाय रुतवून टिकून राहिले.
मी विचारले, “मला हमामदस्ता अनुभवायाचा आहे. मी काही दिवस तुमच्याकडे येऊन राहू शकते का?”
कुरुळ लोकांनी सर्वांना मुक्त प्रवेश ठेवला होता. प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना. माणसांना. अट फक्त एकच - सिल्कन चालणार नाही. सिल्कन हा सिलिकॉनचा अपभ्रंश. कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण चालणार नाही. काही वस्त्यांमध्ये इलेक्ट्रिक काय ,अगदी इलेक्ट्रोमेकॅनिकल किंवा मेकॅनिकल गोष्टसुद्धा चालणार नाही. मला हे ठाऊक होते. कमलव्वाने तेच समजावून सांगितले, “कधीपण या. कितीपण दिवस राहा. येताना तो चोरभुंगा तेवढा आणू नका.”
थोड्या शिळोप्याच्या गप्पा मारता मारता कमलव्वाचे गाव कधी आले ते उमगले नाही. तिची वस्ती गावापासून चारेक किलोमीटर दूर होती. दूरवर कुठेतरी भूगर्भात होणाऱ्या उत्खननाचे स्फोट ऐकू येत अधूनमधून. जमिनीला कंप जाणवे आणि सततची एक यांत्रिक घरघर. आसमंतात संधिप्रकाश पसरला होता. कोरड्या वातावरणाने मलूल झालेली झाडे निश्चल झाली होती. त्या पार्श्वभूमीवर समोरच्या टेकडीवरचे शिखर नसलेले देऊळ अधिकच गहिरे दिसत होते.
गाव ओलांडल्यावर कमलव्वाने गाडी थांबवायला लावली. “इथून चालत जाते” असे म्हणत ती उतरून झपाझप पायवाटेला लागलीसुद्धा. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहत राहिले. थोडे अंतर चालून गेल्यावर एका झाडाजवळ अंगावरचा तिने आरोग्य केंद्राचा झगा उतरवला आणि हातमागावर विणलेली तिची कफनी चढवली. तो झगा तिथेच दगडाखाली ठेवून ती पुढे निघाली.
बघता बघता ती नजरेपार गेली. कानभुंग्याने गाडीशी संधान साधून मला परतीचा रस्ता सांगितला. का कुणास ठाऊक, एका अनिवार इच्छेने मी गाडी बंद करून खाली उतरले. अंगावरची सगळी उपकरणे बाजूला केली. आणि त्या पायवाटेवरून तिचा पाठलाग करत पळू लागले.
वाटेत एका बाजूला, टोकाला लाकडी त्रिकोण असलेला एक लाकडाचा खांब रोवला होता, तो पार केला. म्हणजे तिथून या कुरुळ वस्तीची अधिकृत हद्द सुरू झाली. ती नजरेच्या टप्प्यात येताच माझा वेग मंदावला. समोरच्या एका फुटलेल्या फाट्यावरून ती वळली. हा फाटा टेकडीवरच्या देवळाकडे जात असावा. मी लपतछपत तिच्या मागोमाग चालत होते. अंधार वाढत होता. ती देवळाची लहानशी टेकडी चढू लागली. मी तिथेच एका पायथ्याशी झाडामागे उभी राहिले.
कुलूप खोलून अंग चोरत ती देवळात शिरली. थोड्या वेळाने आतून मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश दारातून बाहेर सांडू लागला. मी तिच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागले.
बराच वेळ झाला. तिची बाहेर यायची लक्षणे दिसेनात. ती आत ध्यानमग्न वगैरे झाली असावी. मी परतायचा विचार केला. निरभ्र आकाशात चुकार चांदण्या चमकत होत्या. पूर्वी या वेळी रातकिड्यांचे, परतीच्या पक्ष्यांचे आवाज अंधाराला लगडून येत, असे आज्जी सांगत असे. आता फक्त वाऱ्याचा आवाज येतो. कुरुळ लोकांकडे कुत्री असतात हे ऐकूनच होते. त्यांच्या वस्तीतून त्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वाऱ्यात मिसळून येत होता. आजीची आठवण झाली की हमखास शिंगळीची आठवण होतेच. मी चार वर्षांची असेन. सगळ्या जगात सिंग्युलॅरिटीचा बोलबाला चालला होता. सरकारने त्यावर पहिली संविधान दुरुस्ती करायला घेतली, त्याच दिवशी मला आमच्या घराबाहेर एक कुत्र्याचे पिल्लू सापडले होते. मी ते लपवून घरी आणले. सिंग्युलॅरिटी चा अपभ्रंश करून ‘शिंगळी’ असे आजीने तिचे नामकरण केले. ती जेमतेम तीन दिवस जगली. गतप्राण जीव मातीत पुरावा असे आजी म्हणाली. आम्ही तो देह अंगणात पुरत असताना पोलीस आले. आजीला आणि मला घेऊन गेले. मी जे घडले, ते सांगितले. कुणीतरी त्या नाळपेशी प्रतिउत्पादित पिल्लाची तस्करी करत असताना त्याला आमच्या घराजवळ सोडून दिलेले म्हणे. प्रतिउत्पादनांवरची सरकारी बंदी तेव्हा अजून तरी उठलेली नव्हती.
अंधारातून वाट काढत पुन्हा गाडीकडे चालत जात असता हे सगळे आठवले. कुंचल्याचे जाड फटकारे देऊन काढलेल्या चित्रांचा पट असावा, तसे आतापर्यंतचे आयुष्य गेले. एकामागोमाग मोठमोठ्या घटना घडून गेल्या माझ्या आयुष्यभर. समष्टीचा परिणाम माझ्यावर झालाच, तो प्रत्येक व्यक्तीवर होतोच. त्यातलीच ही एक गोष्ट - माझी अंधाराची भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. सगळीकडे भगभगीत प्रकाशाची इतकी सवय होती की अंधाराचे मूल्यच संपून गेले होते. हा असा शांत अंधार हवा हवासा वाटत होता. विचारांच्या या तंद्रीत गाडीकडे परत आले. प्रवासात गाडीतच झोप आली. घरी कधी पोहोचले, हेदेखील कळले नाही.
क्रमांक ३६ला भेटायचा दिवस आला. कोट्टलगी आणि कमलव्वाचे गाव कुंडलहळ्ळी एकमेकांपासून फारशी दूर नाहीत. गाडीला स्थलाक्षबिंदू सांगताच गाडी तिकडे निघाली. मी कुरुळांविषयी जमेल तशी वेगवेगळी माहिती घेत होते. कुंडलहळ्ळीला पुढचा हमामदस्ता दोन आठवड्यांनी होता. शेजारच्या गावांत कुरुळांनी तशी दवंडी पिटली होती.
गाडी कोट्टलगीजवळच्या एका पांढरीजवळ येऊन थांबली. पांढरीवर एक पडके देऊळ होते. अर्धे धुळीत बुडालेले, अर्धे मोकळे. शेजारी मातीचा, दगडांचा ढीग होता. तिथे उत्खनन झाले असावे. जागेवर नजर ठेवणारा संवेदकाचा पिवळा लोखंडी खांब बाजूलाच उभा होता. त्यावरचा काचसदृश लाल चंबू उन्हात चमकत होता. त्या ढिगाच्या पलीकडून क्रमांक ३६ आला. त्याची गाडी कोट्टलगीच्या बाजूला थांबलेली. त्याने मला हात करून बाहेर त्या देवळापाशी बोलावले.
“हे अक्कमहादेवीचं देऊळ. हे उत्खनन माझ्याच तुकडीने केलं आहे.” त्याने वेळ न दवडता विषयालाच हात घातला.
मी त्याला तत्काळ तोडत विचारले, “समितीने दिलेलं काम आहे की?”
शेजारच्या दगडावर चितारलेला मोर दाखवत तो म्हणाला “होय. आणि आणि तुला याची माहिती द्यावी असं सारंग म्हणाले. ‘समिती’बद्दल तू जितकी गोंधळली आहेस, तितका मीही आहे. तुला या उत्खननाविषयी आधी माहिती देतो. सारंगांनी मला हे करायला सांगितलं. हे म्हणजे उत्खनन. मी पुरातत्त्वशास्त्र शिकलो, म्हणून त्यांनी मला निवडलं असावं. फक्त हे उत्खनन करताना प्रशिक्षित विद्यार्थी किंवा खात्याचे लोक नव्हते. माझ्याबरोबर राखीव सैन्यदलातील एक तुकडी होती. आधी मला असंख्य गोपनीयतेची करारपत्रं करावी लागली.”
तिथल्या खड्ड्यातला एक दगड पायाने बाजूला करत तो म्हणाला, “या इथे, इथे एक धातूचा तांब्या सापडला. जणू त्या तांब्यासाठीच हे उत्खनन चाललं असावं. तो तांब्या मिळताच ते ताबडतोब थांबले. नंतर मला आणि त्या तांब्याला लगेच शेजारच्या जिल्ह्यातल्या एका रिकाम्या खाणीतल्या तळघरात नेण्यात आलं.”
“कसला तांब्या होता?” मला हजार प्रश्न पडत होते.
“पितळेचा. विशेष असा नव्हता. बाराव्या शतकातला असावा. त्याला एक पितळी झाकण अगदी घट्ट व्यवस्थित बसवून बंदिस्त केलेलं. तिथल्या प्रयोगशाळेत..”
“प्रयोगशाळेत?” मी त्याला पुन्हा तोडले.
“हो, तिथे एक प्रयोगशाळा होती. तिथे त्याचं अत्याधुनिक पृथक्करण केलं. त्या तांब्यात एक मुठीत मावेल इतका काळाकभिन्न पिरॅमिड होता. तो आम्ही अलगद बाहेर काढला. मी आणि माझा सहकारी आता त्याला भौतिकीचा भोज्या म्हणतो. त्याहून जास्त काळा रंग अस्तित्वातच नसेल इतका काळा.”
“कसला पिरॅमिड? म्हणजे कोणत्या पदार्थाचा?”
“माहीत नाही. म्हणजे माझा सहकारी म्हणाला, जगाच्या पाठीवर कुणालाही ते कळेल अशी कुठलीही आशा नाही. त्याला आम्ही सध्या भोज्या असेच म्हणतो. कुठलंतरी अनोळखी जडतत्त्व असावं, असा आमचा कयास आहे. गंमत म्हणजे त्याला वस्तुमान होतं. आम्ही त्याला हात लावला नाही. म्हणजे तसं धाडसच झालं नाही. आता त्याचं गुरुत्वीय विवरण करायला दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवायचं आहे. आणि एक प्रश्न मला रात्री झोपू देत नाही. हा तांब्या नेमका अक्कमहादेवीच्या देवळाखालीच का पुरला होता? पिरॅमिड पेरणाऱ्यांनी तो तिथे ठेवला, की पिरॅमिडपासून जपणाऱ्या दुसऱ्याच कुणी?”
मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. एकदाचे त्याला गदगदा हे हलवून नेमके काय चाललेले आहे असे मोठ्याने विचारावे, असे वाटत होते. माझा चेहरा पाहून तो म्हणाला, “मी थेट मुद्द्यावर येतो. तुला काय वाटतं 'समिती'बद्दल? मी तुझ्याइतकाच अजूनसुद्धा अंधारातच आहे. पण मला आताशा ध्यानात येतंय की हे सगळं आपण कशासाठी करतोय ते. मला अस्तित्वमूलक नैराश्यच येत आहे या सगळ्याचा विचार करून. आपण कोणत्यातरी मूलभूत सत्याला ठळक करतोय. आतापावेतो माझी एक नैसर्गिक अटकळ होती.”
जणू मीच माझ्या मनातले बोलत आहे, असे वाटून मी पटकन म्हणाले, “आपण म्हणजे ‘आपण’ या सगळ्यात एकटं नसल्याची. हीच अटकळ, बरोबर?”
त्याने माझ्या डोळ्यात खोलवर पाहिले. म्हणाला, “आणि समिती हेच गूढ सुरक्षित ठेवत आहे.” स्तब्धतेच्या तीन-चार क्षणांनंतर त्याने ठामपणे पुस्ती जोडली, “कोणत्याही थराला जाऊन.”
तेव्हा माझ्या पायाखालची वाळू सरकली. मी मटकन तिथल्या दगडावर बसले. त्यानंतर त्या दिवसात काय काय घडले हे मला आठवतही नाही. मी धक्क्यातून सावरता सावरत नव्हते.
---
## इ. स. २०२७ : अंडे
२०२७च्या वसंतात एका मध्यम अमेरिकन वृत्तवाहिनीच्या तळमजल्यावर एका मुलाखतीच्या चित्रीकरणाची लगबग चालली होती. मागच्या पडद्यावर मोजावे वाळवंटातल्या एडवर्ड्स वायुसेना तळाचा परीघ आणि माउंट व्हिटनीच्या उत्तुंग शिखराचे दृश्य झळकत होते. खुर्चीवर बसलेल्या रॉस कोल्टहार्ट या ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन पत्रकाराने शांतपणे सवयीने आपल्या शुभ्र केसांमधून हात फिरवला. त्यांच्यासमोर बसलेल्या जेक बार्बरची नजर मात्र इथे-इथे सतत भिरभिरत होती आणि तळहातांचा घाम तो सारखा पुसत होता. काही वेळापूर्वी त्याच्या डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे प्रसाधनांनी बुजवली असली, तरी त्याच्या डोळ्यातले खोलपण मात्र तसेच होते. मुलाखतीला सुरुवात झाली -
रॉस - जेक, तुझं स्वागत. थेट सुरुवातच करतो. तू USAFमध्ये एअरक्राफ्ट मेकॅनिक या पदावर रुजू झालास. तुझी नेमकी कशी भरती झाली? त्या वेळी तुला तुझ्या खऱ्या कामाची कल्पना होती का?
जेक - मी USAFमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी मेकॅनिक म्हणून रुजू झालो. स्पेशल ऑपरेशन्स कॉम्बॅटसाठी प्रशिक्षण घेत असताना मला दोन व्यक्तींनी बाजूला घेऊन सांगितलं की, "तू सध्या फक्त मेकॅनिक म्हणूनच राहा. वेगवेगळ्या क्लबांत सामील हो. पॅराशूटिंग, स्कूबा डायव्हिंग, काही मार्शल आर्ट, टॅक्टिकल शूटिंग इत्यादी इत्यादी. पण कुठेच तुझ्या प्रशिक्षणाचा कागदी मागोवा राहता कामा नये. तू आमच्यासाठी एका भुतासारखा असशील!" पण मी ते मेकॅनिकचं काम फार काळ केलं नाही. माझं खरं काम होतं क्राफ्ट पुन:प्राप्ती. कोसळलेली, कोसळवलेली वेगवेगळ्या प्रकारची विमानं, यानं उचलून अमेरिकेत आणणं.
रॉस - तुझे सहकारी कोण होते? इतकं सगळं दळणवळण कसं चालतं ?
जेक - आमची गुप्त टोळी छोटेखानी असे, साधारण पाच ते सहा लोक. त्यात अत्यंत अनुभवी विशेष ऑपरेटर, एक-दोन 'सायॉनिक असेट' आणि मी - सुरक्षा आणि वहन विशेष अधिकारी. प्रत्येक मोहिमेपूर्वी सुरक्षित उपग्रह संदेशांच्या सगळ्या फ्रिक्वेन्सी ठरवल्या जात.. आम्ही प्रत्येकाला AN/PRC-148 रेडिओ दिले जात. प्रत्यक्ष वाहन - उदा., हेलिकॉप्टर सामान्यतः डिफेन्स लॉजिस्टिक्स एजन्सी (DLA)कडून यायचं, मात्र त्याचा काही मागमूस नसायचा. त्यामुळे कागदोपत्री कोणतेही पुरावे राहत नसत.
रॉस - अशा मोहिमांचे कोणत्या विभागाकडून आदेश यायचे?
जेक - आदेश डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे DIA, नॅशनल रिकॉनायसान्स ऑफिस (NRO) किंवा कधीकधी जॉइंट स्पेशल ऑपरेशन्स कमांड (JSOC)कडून असे आलटून पालटून येत. प्रत्यक्षात मात्र आदेश कुठल्या तरी अदृश्य, गुप्त मोहिमेखाली असत. आम्हालासुद्धा कधीच पूर्ण माहिती नसायची. आमची टोळी ऐन वेळेस ठरवली जात असे.
रॉस - या मोहिमा नेमक्या कुठे घडायच्या? आणि कुठे संपायच्या?
जेक - जगात कुठेही या मोहिमा चालत. मात्र संपायच्या त्या मुख्यतः R-2508 कॉम्प्लेक्स, एडवर्ड्स वायुसेना तळ, किंवा चायना लेक नेवल स्टेशनच्या आसपास. इथे इतर वेळी सामान्य शस्त्रास्त्र चाचण्या चालतात, त्यामुळे ती गोपनीयता आपोआप राखली जाते.
रॉस - आणि तुम्ही कोणत्या वस्तू उचलून आणत होता?
जेक - UAP.
रॉस - सायॉनिक असेट म्हणजे नेमके कोण लोक आहेत?
जेक - सायॉनिक असेट हे अत्यंत तीव्र मानसिक क्षमता किंवा अंतर्ज्ञान असलेले लोक. त्यांचं काम UAPशी जाणिवेमार्फत संपर्क साधणं, त्यांना शांतपणे जमिनीवर उतरवणं असे. या लोकांची निवडदेखील अतिशय गोपनीयतेने होते. सामान्यतः स्थानिक लोक, डावखुरी समलैंगिक माणसं, ध्यानधारणेत अपूर्व प्रगती केलेले लोक, तशी मानसिक क्षमता आणि पूर्वस्थिती असलेले काही लोक आणि काही आनुवंशिक जीनपूल असलेले लोक हे सर्व माझ्या टीमचा भाग होते.
रॉस - तुझ्या सगळ्यात जास्त आठवणीत राहिलेलं कोणतं मिशन?
जेक - एका मोहिमेने माझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम केला. 'पांढरे अंडे'. आम्ही त्याला 'नानू' म्हणत होतो. ते आम्ही कच्छ मधून उचललं. ते उचलत असताना दळणवळण सगळं अचानक गुप्त फ्रिक्वेन्सीवर गेलं. दळणवळण कोणत्याही फ्रिक्वेन्सीवर असलं, तरी ते इनक्रिप्टेड असते. ते इनक्रिप्शन तोडायला आपल्या सध्याच्या संगणकांना कमीत कमी लाख वर्षं लागतील. मात्र ते अंडं विलक्षण होतं. त्याने ते एनक्रिप्शन तोडून काही क्षणात आमच्या सगळ्या संवादाचा ताबा घेतला. मी हेलीकॉप्टर - MH-60 ब्लॅक हॉकमधून त्याच्याकडे नाइट व्हिजनने पाहत होतो. अचानक मला अत्यंत खोल मानसिक धक्का जाणवला. मनात प्रचंड आनंद, दुःख, प्रेम सगळं एकाच वेळी उमटू लागलं. मला हेलिकॉप्टर संतुलित ठेवणं कठीण झालं होतं. मी भावनिकरीत्या अक्षरशः हादरलो होतो. पण मोहीम मध्येच सोडून जाणं शक्य नव्हतं. सायोनिक गडबडा लोळू लागले. शेवटी एका स्त्रीने नानूला शांतपणे जमिनीवर उतरवलें तिच्या नाकाडोळ्यातून रक्त वाहत होतं. तिचं नाव कुमुद.
रॉस - तुम्हाला नंतर आणखी काही परिमाण जाणवले का?
जेक - हो. काही दिवसांनी माझे केस गेले, ऑटोइम्यून लक्षणं दिसू लागली. स्टॅनफोर्डमधील डॉ. गॅरी नोलन माझ्यावर उपचार करत आहेत.
रॉस - तुझ्या मते या गुप्ततेमागचं नेमकं कारण काय आहे?
जेक - मी फक्त हा शब्द सांगतो. झिरो पॉइंट एनर्जी. या एका गोष्टीने सगळा भूराजकीय नकाशाच बदलून जाईल जगाचा. शिवाय हा विषय मानवी चेतना, धर्म, अस्तित्व यांच्या मुळाशी निगडित आहे. त्यामुळे काही लबाड लोक ही माहिती दडवून ठेवतात.
रॉस - आणि तू आता उजेडात का आलास?
जेक - त्या 'नानू'नंतर मला वाटलं, 'तुम्ही साक्षात जाणिवेलाच इतका काळ असं झाकून ठेवू शकत नाही'. सत्य समोर आणणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे.
रॉस - शेवटी, तुला तुझ्या सुरक्षेची फिकीर नाही?
जेक - आहे. पण नानूसारख्या जाणीव विरघळून टाकणाऱ्या घटनेनंतर मला माझ्या जिवाची काही विशेष काळजी वाटत नाही. देहाला शून्यात जायची ओढ आहे.
रॉस - जेक, या मुलाखतीबद्दल धन्यवाद!
---
## मी रचना
क्रमांक ३६ भेटून काही दिवस उलटून गेले. हळूहळू माझी झोप पूर्ववत होत होती. उलटसुलट विचारांनी माझे डोके नेहमी गुंतलेले राही. त्यामुळे रात्री चित्रविचित्र स्वप्ने पडत. ती पडू नयेत म्हणून मी काही गोळ्या घेत होते. त्यांच्यामुळे अधिकाधिक निराश होत होते. दिवसभर झोपून झोपून किती झोपणार? नशीब, सारंगांनी कोणतेही आक्षेप घेतले नाहीत.
समितीच्या इतर सदस्यांच्या भेटीची वेळ जवळ जवळ येत होती. मी त्या मोरांकडे पाहत विचार करत राही. एके दिवशी सकाळी कानभुंग्याने हमामदस्त्याची आठवण करून दिली. मी गाडी काढून कुंडलहळ्ळीकडे निघाले. पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी गाडी थांबवून मी चालत कुरुळवस्तीवर आले. आजूबाजूच्या गावांतून काही फाटकेतुटके लोक सभास्थळी आले होते. गावांमध्ये लोक तरी किती उरले होते? गेली काही वर्षे सगळीकडून पश्चिमेला स्थलांतर होत होते. गावांमध्ये अशीच कशीतरी जगणारी मागे राहिलेली चुकार म्हातारी माणसे. महिन्यातून एकदा जीवाक्षारांची किंवा सर्वहार खांडव्यांची पाकिटे सरकार वरून फेकत असे. कुरूळ लोक एकवेळ उपाशी मरतील, पण त्या पाकिटांना हात लावणार नाहीत. उरलेली बाकीची सगळी जनता मात्र त्यांचा फन्ना उडवत असे. अशी ही सगळी डोळ्यांच्या खाचा झालेली मंडळी हमाम दस्त्याला येत होती. कुरूळ-कुरुळेतर वादसुद्धा अधून मधून झडत. परंतु कुरुळांनी कुरुळेतरांना कधीही मज्जाव केला नाही. या हमामदस्त्यासाठी आलेले सगळे नांदरुखाच्या एका मोठ्या झाडाखाली पाराभोवती बसले. झाडाची सावली सुखावह होती. वरती सूर्य नेहमीची आग ओकत होताच. डफडिंभ, तीनतारी अशी वाद्ये घेऊन घेऊन दोन्ही पक्षाचे खलते आले. एका कुमारिकेने मोठा खलबत्ता आणला. पाच जणांनी पाच धान्ये म्हणजे पाच बीजे त्यात भरली. पाच जणांनी पाच झाडांची पाने भरली. आणखी पाचांनी पाच झाडांच्या फांद्यांचे तुकडे. नंतर पाच झाडांची मुळे. कुणीतरी मला एक फूल देऊन गेले. सदाफुलीचे. इतर चार जणांसारखे माझ्या वाट्याचे ते फूल मी पुढे जाऊन खलबत्त्यात भरले.
दूरवर घरघरणाऱ्या खाणीमध्ये चालेल्या यंत्ररवावर स्वार होत एक उत्कंठावर्धक शांतता काही क्षण पसरली. आणि डफडिंभावर हमामपक्षाच्या खलत्याची जबरदस्त थाप पडली.
“पंचप्राण टाकिले आणुनि हमामासि धरा हो हमामासि धरा,
पंचत्वाचे गुपित कुटितो दस्त्याचा नखरा हो दस्त्याचा नखरा,
घेऊन आला तुम्हा पुढे हा हमामबंदा खरा,
ठेवीसी यंत्र सिल्कना दूरा जी अंतरा,
ठेवीसी यंत्र सिल्कना दूरा जी अंतरा,
यावे हमामदस्त्याचा खलु रंगी हर पलू आम्हासी जरा,
द्यावी अवधारणा जी परा जी परा जी परा..”
अवधारणा मागून झाल्यावर हमामपक्षाने आपली पूर्वपीठिका सांगितली, आपल्या वंशाची थोडक्यात ओळख करून दिली आणि त्यांनी मग मुख्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची कूटे काही काळ एकमेकांना घातली. त्यानंतर उत्स्फूर्त कूटांना आरंभ झाला. कुणीतरी दस्ता-खलत्यांना कळशीभर पाणी आणून दिले. कदाचित त्यावरूनच त्यांना हा कूट सुचला असावा -
“हमामा आला माज झाली आज फजिती गेली लाज,
मऊ आवाज झाला जाच असा हा बाज आणि रिवाज,
घालीतो कूट दस्ता ऐसा हो ऐसा हो ऐसा,
उभा पर्वत, उत्तुंग जणू गिरिराज,
उदक मध्यात, वसे खोलात, येतसे गाज,
तयाच्या उरा वाहती पाच प्रपात,
उगवती पंचसरिता, तयातून निता, कास जणू ती खास,
लागला वन्ही गर्भात धरेच्या तयाची आच,
सुकवी उदकास करुनि ऱ्हास सरिता पाच,
आटतील करुनि एकेक तयांवर टाच,
सांगा कुठे हा गिरी, गावे उत्तरी ऐकू प्रतिसादा,
सांगा कोणत्या नद्या ह्या उद्या नाहीतर द्या द्या,
सोडून हमामी विधा, करा आल्विदा कुरूलपंथा हो जी जी.
करा आल्विदा कुरूलपंथा हो जी जी.
करा आल्विदा कुरूलपंथा हो जी जी.”
कूटामागून कूट झडत होती. हमामी बाजू स्थिरतेची आणि सर्जनाची कड लावून धरत होती आणि दस्ता विध्वंसाची आणि बदलाची. सगळा अर्थ मला तिथल्या तिथे लागत नव्हता, पण दोन्ही पक्ष वळसे घेत घेत कोणत्यातरी एकाच समान तत्त्वाकडे चालले आहेत आणि यंत्रभू मतींचा विरोध हा त्या तत्त्वाचा पाया आहे, एवढे नांदरुखाखाली बसल्या बसल्या जाणवत होते. बाकीचा अन्वय मी नंतर निबंधाच्या खर्ड्यासाठी लावत बसणार होते.
वरील कुटावर हमाम पक्षाने विचारासाठी वेळ मागून घेतला. काही वेळाने हमामींनी उत्तर द्यायला सुरू केले.
“उत्तर ऐका हो ऐका जन हो, कूट गहन थोर,
परि नसे चिंता हमामी उभा देण्या उत्तर,
असा गिरिराज आहे भवताल हे विश्व हा संसार,
वसे मध्यात तयाच्या चेतना आदिमाय स्थिर,
वाहती पाच सरिता अशा विश्वसंभार,
पहिली सरिता ज्ञानाची,
दुसरी सरिता काळाची,
तिसरी वाहते गरजेची,
चौथी सरिता बदलाची,
पाचवी अधिष्ठानाची हो जी जी.
वन्ही पेटला तो महा हव्यास,
सुकवी चेतनेस अन शक्तीस,
करी बेजार विश्वास हो जी जी,
पाही जीवन स्वार्थास हो नियमी,
करुनि संहार शक्तीचा यमी,
केले विश्व-चेतनेसी कमी,
नसे कोणा यंत्राची हमी,
जणू जीवनास लागली कृमी!
हे ऐकुनी घ्यावे दस्त्याने, द्यावा हो मान,
उकल केली कूटाची हमामी सान,
घ्यावे गोड मानून हो मानून,
घ्यावे गोड मानून हो मानून”
एकामागोमाग अशी अवघड कुटे एकमेकांना घालून जवळपास पाव दिवस खल केल्यावर त्यांनी शेवटी एकत्र पसायदान मागितले आणि हमामदस्ता संपला.
मी मंत्रमुग्ध होऊन तशीच तिथे काही काळ बसून राहिले. मी मग कमलव्वाला शोधले. हमामांच्या बाजूला अंग चोरून बसली होती. तीही माझ्याकडे बराच वेळ पाहत असावी. मला जोखत असावी. माझा संयम तपासत असावी.
सगळी पांगापांग झाल्यावर मी तिच्याजवळ गेले. मला नीट पाहत ती म्हणाली, “बरं झालं आलीस ते. आता दोन-तीन दिवस राहा माझ्यापाशी.” मला एकच दिवस राहणे शक्य होते. ती मला घरी घेऊन गेली. तिचे घर एका खोलीचे, साधे, धाब्याचे. मातीने जोडलेल्या दगडी भिंती. छतावर लाकडी पट्ट्या टाकून करल माती भरलेली. आत थंडावा. बाहेर मोरी. अंगणात चूल, घरात फक्त किडूकमिडूक सामान, खापराची एक दोन भांडी, वंशाने आलेल्या चारदोन पितळ्या, पाण्याला माठ. घर पांढर मातीने सावरलेले. ठिकठिकाणी गेरूने चित्रे रंगवलेली. एक प्रकाशासाठी सौने. मी सगळे उत्सुकतेने पाहत होते. प्रत्येक गोष्ट मला तशी नवीनच होती.
घराच्या कोनाड्यात पिठाच्या तीन-चार लहान गोण्या ठेवलेल्या दिसल्या आणि प्रत्येक गोणीचे कापड वेगळे होते. खलतमातेला खाणेपिणे रांधत बसायची फारशी गरज नसते, चार घरचे पीठ मागून ती जिवंत राहू शकते, ते हे चार घरचे पीठ असावे. याचा अर्थ तिला नेहमी सुग्रास अन्न मिळेल असे नव्हे. जे जे कुरुळ पिकवत, खात ते खलत्यांना मिळे. खलतमातांना जास्त शिधा मिळे, कारण त्यांना बालखलतेही पोसायचे असत.
कमलव्वा मात्र थकली होती. तिच्या आजारपणाचे प्रमाण कमी-जास्त होई. कधीकधी तिला धरबंद उरत नसे. त्यामुळे तिने स्वतःहोऊन नव्या मुलांची पालनपोषणाची जबाबदारी टाळली होती.
तिच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. तिने संध्याकाळी साधेसे जेवण रांधले. पिठलंभात. मी तृप्त झाले. हवामानाचा अंदाज घेऊन रात्री आम्ही अंगणात झोपलो. वारा बराच होता. आम्ही आणखी थोड्या गप्पा मारल्या. मी न राहवून एक प्रश्न विचारलाच - कमलव्वाने शरीराच्या नैसर्गिक ऊर्मींचे काय केले? तिने मजेदार उत्तर दिले. कुशीवरून आभाळाकडे पाहत ती म्हणाली, “बाई, तुमच्याप्रमाणे यंत्रभोग घेणं अम्हाला सहज शक्य नाही. आणि ते आमच्या कर्मात बसत नाही. खलत्या लोकांमध्ये सहज मनमोकळे मानवी संबंध नाहीत असं नाही. ते ठेवायला कुणी अडकाठी धरत नाही. काही खलते आयुष्यभर कोरडे राहतात, काही जण नाही. प्रत्येकाला मोकळीक आहे, बाई.” मला माझ्या आवडत्या निळ्या डोळ्यांच्या यंत्रनराची आठवण आली. प्रत्यक्ष जैविक पुरुषाशी रत होण्याच्या कल्पनेनेच मला शहारा आला. नंतर मी तिला लोकदैवतांविषयी विचारायला सुरुवात केली. तिने पटकन विषय बदलले आणि ती झोपून गेली.
सकाळी अंथरुणात वाऱ्यांनी विखुरलेली रेतच रेत होती.
मी तिचा निरोप घेतला. तिच्या खडावा घालून ती तिच्या नित्यविधींसाठी माझ्याबरोबरच बाहेर पडली. जाताना माझा हात हाती घेऊन ती म्हणाली, “तू इथे का आली आहेस ते मला माहीत आहे. तू पुन्हा माझ्याकडे हवी तेव्हा ये. पण आता ज्या मिषाने आली आहेस, तशी नको. तुझं काम कर, परंतु मला पुन्हा कुणालाही ना सांगता भेटायला ये.” ती सिदरायाच्या टेकडीवर चढली आणि मी आश्चर्यचकित होऊन माझ्या गाडीकडे निघाले. कालचा दिवस विलक्षण गेलेला होता. त्या धुंदीत मी घरी कधी पोहोचले, हे कळलेच नाही.
---
## इ.स. २००४ : चंद्रताल
चंद्रताल म्हणजेच चंद्राचा तलाव. हिमाचलच्या लाहौल-स्पिती जिल्ह्यातला, पंधरा हजार फूट उंचीवरचा, हिमशिखरांनी वेढलेला शुभ्र, अर्धचंद्राकार तलाव. आसपास विखुरलेल्या हिमखडकांच्या राशी, वितळत्या हिमनद्यांचे तुटलेले तुकडे, आणि निष्पर्ण, रखरखीत जमिनीचा परिसर. निसर्ग आपल्या गूढ, शांत स्वयंभू रूपात अव्याहत नांदत राहणारा. पौर्णिमेच्या रात्री स्वर्गातून उतरलेल्या अप्सरा इथे आंघोळीला येतात, असं एक प्राचीन दंतकथा सांगते. पण, २७ सप्टेंबर २००४ च्या सकाळी मात्र तळ्यावर कुणीतरी दुसरेच उतरले होते.
अहमदाबादच्या अवकाश उपयोग केंद्रातील (इस्रो) दोन संशोधक हिमनद्यांचा अभ्यास करण्यासाठी स्पिती खोऱ्यात आले. ज्येष्ठ वैज्ञानिक अनुनिल कुलकर्णी या चमूचे नेतृत्व करत होते. हिमालयातल्या हिमनद्यांचा उपग्रहाधारित अभ्यास करण्याचा त्यांचा तब्बल पंचवीस वर्षांचा दांडगा अनुभव. त्या तुकडीत चंदिगढ विद्यापीठातले भूवैज्ञानिक सुनील धर, राजीव कालिया, सुशील सिंग व काही सहाय्यक होते. चंद्रतालपासून बारा किलोमीटर दूर असलेल्या समुद्रतापू इथल्या निर्जन आणि शुष्क हिमदरीत त्यांनी आपले तंबू ठोकले. सुनील धर मूळचे काश्मीरचेच, त्यामुळे त्यांना हिमालय परका नव्हता.
त्या सकाळी उठून तोंड धूत असताना एका सहाय्यकाला डोंगरउतारावर उन्हात अचानक चमकणारी एक वस्तू दिसू लागली. असल्या निर्जन स्थळी चिटपाखरूदेखील नव्हते. तेव्हा अशी चकाकणारी वस्तू पाहून त्याने इतरांना लगेच हाळी दिली.
काही वेळाने त्या वस्तूचा आकार स्पष्ट होऊ लागला. ती शुभ्र, अंडाकार वस्तू पर्वताच्या माथ्यावरून, जमिनीपासून काही इंच वर तरंगत खाली येत होती. रंग हिमासारखाच चमकदार. उंची साधारणत: सहा पुरुष.
कुलकर्णी आणि धर यांनी लगेच त्याची छायाचित्रे टिपली. चमू सावधपणे त्या दिशेने सरकताच, ती वस्तू अचानक थांबली, काही क्षण स्तब्ध राहिली. आणि अचानक मागे वळून सत्तर अंशांच्या तीव्र अवघड उतारावर अगदी सहजतेने वर चढू लागली. सूर्योदयाच्या पहिल्या किरणांच्या स्पर्शाने क्षणार्धात तिचा रंग काळा झाला, माथ्यावर पोहोचताच पुन्हा शुभ्र झाला आणि काही क्षण हवेत स्थिर राहून एका बिंदूत आकुंचित होत स्थिर झाली. कुलकर्णी जमतील तेवढे फोटो फटाफट काढत होते, मात्र धिप्पाड धर काही क्षणांत मटकन गुडघ्यावर बसले. अचानक त्यांचे अंत:करण अनेकविध भावांनी आंदोलू लागले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
इतर लोक थिजून त्या अंड्याकडे पाहतच राहिले. काही वेळाने ते अंडे आणखी आकुंचित होत अंतर्धान पावले. धर शांत झाले. लोकांनी त्यांना सावरले.
या संपूर्ण प्रकारात ना यंत्राचा आवाज झाला, ना हेलिकॉप्टरच्या पात्यांची घरघर. फक्त संशोधकांच्या मनात उद्भवलेल्या असंख्य प्रश्नांचे काहूर मात्र शिल्लक राहिले.
मोहीम आटोपून चमू अहमदाबादला परतला.
इस्रोमध्ये, हिम व हिमस्खलन अभ्यास संस्था (एसएएसई)मध्ये, डीआरडीओमध्ये आणि भारतीय सैन्याच्या उत्तर विभागात या घटनेची सखोल चर्चा झाली. तपासणी सुरू झाली, माहीत असलेल्या कुठल्याही यंत्राची माहिती पाहिलेल्या वस्तूशी जुळत नव्हती. मानवरहित वाहन (यूएव्ही), वायुमंडलातले हवामान फुगे, चिनी गुप्त पाळत यंत्रे यांचे सगळे डेटाबेस छानून झाले. पण अशी जमिनीवर अंतराळी चालणारी आणि सहजतेने अवघड उतारांवर चढणारी वस्तू कुठल्याही श्रेणीत सापडत नव्हती.
पाच दिवसांनी अचानक सकाळी कुलकर्णींच्या घरी काळ्या कोटांतले गोरे लोक आले. त्यांच्यासोबत भारतीय सैन्याचे तीन उच्चाधिकारी होते. कुलकर्णींना तात्पुरते कॅम्पसवर घेऊन गेले. घरातली, ऑफिसातली कुलकर्णीची सगळी उपकरणे, त्यांचे कॅमेरे जप्त करून ते नि:शब्द परत गेले. कशीतरी धडपड करून कुलकर्णीनी ताबडतोब धरांना संपर्क केला. तिथंही असंच घडलं होतं.
सरकारी गुप्तचर संस्थेने इस्रोकडून यावर विस्तृत अहवाल मागितला. त्यानंतर कुणीही या घटनेवर ब्रही काढला नाही.
हिमालयाच्या बर्फाच्छादित शांततेत त्या वस्तूची ती विचित्र भेट, केवळ वैज्ञानिकांच्या आठवणींत आणि त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये उरली आहे. आठवणी मिटल्या नाहीत, मात्र छायाचित्रे कुठे हरवली याचा कुणालाही थांग नाही.
---
## मी रचना
मी जमेल तशा सर्व गोष्टी नोंदवून सारंगांसाठी निबंधाचा एक कच्चा खर्डा तयार केला. हमामदस्त्याबद्दल मी त्यात लिहिलं, विश्वाचे आर्त स्थिर आहे, ते चिरशांत आणि अनादि अनंत आहे अशी हमाम पक्षाची धारणा असते आणि ते चंचल व अस्थिर आहे, सगळंच गोंधळलेलं असून त्याला कोणताही अर्थ देता येत नाही अशी दस्ता पक्षाची. हमाम सृजनावर भिस्त ठेवतो, त्याचा स्त्रीतत्त्वावर आणि जडत्वावर विश्वास असतो, हमाम पक्ष म्हणजे प्रकृती. दस्ता याउलट विध्वंसावर आणि गोंधळावर विश्वास ठेवणारा, पुरुषी वृत्तीचा आणि चेतनेचं आकर्षण असलेला. हमामी खलते शक्तीचे चाहते असतात, पण ही शक्ती ऊर्जा देणारी असते आणि चिरस्थायी ऊर्जा देणारी हीच शक्ती जगाची खरी वाहक असते. दस्ता पक्ष शिवाचा चाहता असतो आणि तांडवावर व विश्वात होणाऱ्या प्रचंड उलथापालथींवर विश्वास ठेवतो. हे द्वंद्व असलं तरी त्या मंथनातून येणारं उत्तर दोन्ही पक्षांना मान्य व्हावं लागतं आणि ते साधारणतः कुरुळांच्या मुख्य तत्त्वज्ञानाचा उद्घोष करणारं असावं लागतं. जड आणि चेतना, स्त्री आणि पुरुष, स्थिर आणि चंचल या विकर्षी टोकांचा संगम जीवनाच्या उद्गमात झाला पाहिजे हे ते उत्तर. दोघांनाही सुटी मोकळी सोडलेली टोकं आवडत नाहीत आणि दोघांचाही उद्देश अंतिमतः कृत्रिम मतींना, यंत्रभू संवित्तीला विरोध करणे हाच आहे. तोच कुरुळ पंथाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे शिव-शक्तीचा संगम होऊनच जीवनाची निर्मिती होऊ शकते आणि तेच आयुष्याचं इतिकर्तव्य असावं अशी कुरुळांची भूमिका आहे.
लिहून झाल्यावर मी खर्डा वाचून पाहिला. नांदरुखाखाली डफडिंभावर जे ऐकलं होतं त्याचा या सरकारी भाषेत नुसता सांगाडा उरला होता. पण सारंगांना सांगाडेच लागतात. बघता बघता महिना उलटून गेला. बनाळीच्या बैठकीची तारीख जवळ येऊ लागली तशी माझी उत्सुकता शिगेला पोचू लागली.
शेवटी तो दिवस उजाडलाच. धूळावर्त उठायच्या आतच बैठक भरणार होती. बनाळीच्या अभयमाळावर जायचे होते. दिलेल्या स्थळबिंदूंपर्यंत मी पोचणार त्या आधी वनविभागाचे भले मोठे फाटक आले. माझी सगळी सामग्री काढून घेण्यात आली. कानभुंगा देखील.
गाडीला तिसऱ्या दर्जाचा परवाना होता त्यामुळे मी फाटक ओलांडून माझ्याच गाडीत जाऊ शकले. बनाळीच्या अभयमाळावर नजर जाईल तिकडे दूरवर पिवळे पिवळे खुरटे गवत, भणाण वारा आणि सतत वाहणारी धूळ सोडल्यास काहीही दिसत नव्हते. एकेकाळी इथे मोरबन होते. त्या अभयारण्याचा नंतर अभयमाळ झाला. मी उभी होते त्या समोर मातीतून सतत गेलेल्या गाड्यांचा माग होता. या तिठ्यावर कित्येक लांडोरींनी त्यांच्या आवडत्या मोराच्या भोवती पिंगा धरून मोरनाच्या घडवल्या असतील. त्या किती दशकांआधीच केव्हाच्या पुसून गेल्या. आता उरल्यात फक्त या आडव्या स्वयंचलित चाकांच्या फराट्या. समोर दूरवर जमिनीवरच्या एका बेचक्यातून एक शिखर आणि त्यावरचा कळस किंचित वर आल्यासारखा दिसला. हे बनशंकरीचे पुरातन देवालय. मोरनाथाचे प्रणयस्थान. जवळ जवळ जाताच त्या बेचक्यात उतरणारा रस्ता दिसू लागला. एखादी उल्का पाडून विवर तयार व्हावे तसे हे बेचके. अर्धगोलाकार. आतमधे विस्तीर्ण वृक्षांचे सांगाडे दिसत होते. वळणावळणाचा खाली उतरणारा रस्ता संपताच समोरून अचानक सुंदर दगडी मंदिर अंगावर आले. बाजूला तीन चार गाड्या येऊन थांबल्या होत्या. एका गाडीवर जांभळा दिवा होता. म्हणजे राज्याच्या एखाद्या खात्याच्या मुख्य सचिवांपैकी एकाची गाडी असणार.
मंदिराशेजारी जाताच द्वारावर उभे असलेल्या एका वनसैनिकाने मला खाली जा अशी खूण केली. डाव्याबाजूला तीन उंच दीपमाळमनोरे. त्यांच्या तळघरात उतरणारा एक दगडी जिना होता. मी आत शिरले. भुईच्या पोटात जाताच थंड वाटू लागले.
गाभाऱ्याखाली एक विस्तीर्ण तळघर होते. आत मधे एक मंद दिवा तेवत होता. इथे वरचेवर स्वछता होत असावी. मधोमध लिंग उखडलेली एक पिंड. तिच्या भोवती एकूण सहाजण बसले होते. चार पुरुष आणि दोन स्त्रिया. त्यांच्यातील सारंग मला पाहून हसले. त्यांनी मला खाली बसण्याची खूण केली आणि मी निमूटपणे मोकळ्या जागी बसले.
चंदेरी काड्यांचा प्राचीन वळणाचा चश्मा असलेले एक मध्यमवर्गीय गृहस्थ शेजारच्या व्यक्तीच्या कानात काही कुजबुजत होते. मी बसताच त्यांनी घसा खाकरला, “रचना, आयोगाच्या परीक्षेत या वर्षी क्रमांक ४२ पटकावलेली गुणवान मुलगी. तुझे *समिती*च्या अनौपचारिक बैठकीत स्वागत. सगळे लोक तुझीच वाट पाहत होतो. आम्ही कोण हे तुला सारंग काही वेळाने नीट सांगतीलच. त्या आधी एक आवर्जून सांगावेसे वाटते, आपल्या देशातला पहिला पिरॅमिड आम्हाला इथेच या लिंगाखाली सापडला. त्याला दीडशे वर्षे होऊन गेली.”
सारंगांच्या शेजारी बसलेल्या स्त्रीने पिंडीमागून एक करडं खोकं पुढं ओढलं. माझ्या मेजावर आलं होतं तसलंच खोकं, पण हे जुनं होतं आणि त्याच्या कडा हाताळून हाताळून गुळगुळीत झाल्या होत्या. तिनं ते माझ्यापुढं सरकवलं आणि उघडायची खूण केली. आत जुन्या कागदांच्या चोपड्या होत्या. वरच्या चोपडीवर फिकट शिक्का होता, बनाळी, पहिली प्राप्ती. कुणीही काही बोललं नाही. मी वाचायला घेतलं.
पहिल्या चोपडीतली टिपणं जुन्या करारांच्या भाषेतली होती. १९३९ साली इटलीमधे माजेंटा इथं पहिला पिरॅमिड सापडला आणि युद्धानंतर तो इवलासा पिरॅमिड अमेरिकेने ताब्यात घेतला. १९४७ साली रॉजवेल इथं काही अमानवी वस्तू भूतलावर आदळल्या आणि त्या जागेच्या उत्खननात तिथंही एक पिरॅमिड पेरलेला आढळला. या वस्तू कदाचित या पिरॅमिडांच्या प्रभावानेच कोसळल्या असाव्यात असा टिपणकाराचा कयास होता. त्या वस्तू चालवणारे बायोकेमिकल वाहनचालक म्हणजे वापरापुरते बनवलेले जीव होते, त्यांचं गूढ वेगळंच आहे आणि त्यांचा पिरॅमिडांशी काही संबंध असावा असंही अनेकांना वाटत नाही, अशी एक प्रामाणिक तळटीपही होती. जगभरात ठिकठिकाणी असे लहान पिरॅमिड सापडत गेले. काही देशांनी ते लपवून ठेवले, काहींनी इतर देशांना पाठवले आणि काहींनी चक्क गहाळ केले. ही शेवटची नोंद वाचताना मला हसू आलं आणि मी ते कसंबसं दाबलं.
दुसऱ्या चोपडीत चंद्रतालचं टिपण होतं, सप्टेंबर २००४ मधे स्पितीच्या दऱ्याखोऱ्यांत गेलेल्या इस्रोच्या तुकडीचं आणि तिचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. अनुनिल कुलकर्णींचं. चमूने जमेल तेवढा डेटा मिळवला होता, अनेक फोटो काढले होते आणि सरकारने तो सगळा विस्तृत अहवाल घेऊन जुन्या शीतयुद्धी पद्धतीने लालफितीत दाबून टाकला होता. अस्वस्थ झालेले कुलकर्णी शोध घेत घेत अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या थेट हस्तक्षेपापर्यंत पोचले आणि तिथेच थांबले. मग त्यांनी इस्रोअंतर्गतच *समिती*ची अनौपचारिक स्थापना केली. तिला संपूर्ण स्वायत्त कायदेसंहिता लिहून औपचारिक अस्तित्व यायला सत्तर वर्षे गेली आणि ते काम कुलकर्णींच्या तुकडीतल्या एका तरुण संशोधिकेने, डॉ. अपर्णा बॅनर्जींनी, आयुष्यभर ध्यास घेऊन तडीस नेलं. बनाळीची पिरॅमिडप्राप्ती हे कुलकर्णींचं पहिलं *समिती*कार्य होतं. मी मान वर केली तेव्हा चष्मेवाले गृहस्थ माझ्याकडेच पाहत होते.
इतक्यात जिन्यावरून एक माणूस चहाची किटली आणि कपबश्या घेऊन उतरला. त्या तळघरात यंत्र सोडाच, साधा तापकही नव्हता. सहांपैकी एक आजोबा उठले आणि स्वतः चहा ओतू लागले. ओतता ओतता ते सहज म्हणाले, “संविधानदुरुस्तीपर्यंत मजल जाते तेव्हा आम्हाला ती थांबवावी लागते. आजवर दोन पंतप्रधान थांबवावे लागले आहेत.” त्यांनी माझ्यापुढं कप सरकवला आणि विचारलं, “साखर?” कुणाच्याही चेहऱ्यावर काहीही उमटलं नाही. मी नको म्हणायला विसरले आणि त्यांनी दोन चमचे घातले.
तिसरी चोपडी संहितेची होती. सुरुवातीलाच परवाना पातळ्यांच्या सगळ्या उतरंडी दिलेल्या होत्या आणि त्या उतरंडी पाहूनच *समिती* जळी स्थळी सर्वत्र पसरली असल्याचा अंदाज येत होता. प्रकरणांची नावे गुप्ततेच्या युगांवरून दिलेली होती: शीतयुद्धयुगीन कार्यपद्धती, मिथकयुगीन कार्यपद्धती, वारसायुगीन कार्यपद्धती. पिरॅमिड गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे इथवरच *समिती*चे कार्य मर्यादित नाही हेही अनुक्रमणिकेवरून कळत होतं. टोकाची गुप्तता बाळगणे, दिशाभूल करणारा माहितीकल्लोळ उठवणे, छद्ममाहिती मुद्दाम पसरवणे, पंतप्रधान व राष्ट्रपती यांना सल्ला देणे आणि व्यवस्थेच्या प्रत्येक घटकाशी समन्वय साधणे अशी अगडबंब कामे त्यात शिस्तीने मांडलेली होती. पुढच्या पानांवर आकडे होते. दोन शतके चाललेले संकलन, आजवर ठिकठिकाणाहून मिळालेले पिरॅमिड आणि आजतागायत यशस्वी न झालेले रिव्हर्स इंजिनियरिंगचे प्रयत्न, सगळ्याच्या नोंदी होत्या. हे पिरॅमिड म्हणजे एका विस्तृत यंत्राचे भाग असावेत हा *समिती*चा अंदाज होता आणि काही शास्त्रज्ञ त्यांना एखाद्या टाइम मशीनचे सुटे भाग समजतात अशीही नोंद होती. त्यांतून अल्फा मूलकणांचे तसेच ग्रॅव्हिटेशनल रेडिएशनचे उत्सर्जन होत असल्याचे आलेख होते. गेल्या दहापंधरा वर्षांचे आलेख मात्र एका लयीत वर चढत चालले होते, सगळ्या पिरॅमिडांचे उत्सर्जन हळूहळू पण एकसाथ वाढत होते, आणि शेवटच्या आलेखाखाली कुणा विश्लेषकाने पेन्सिलीने एकच प्रश्न खरडला होता: हे कशाला प्रतिसाद देत आहेत? त्यांच्या अभ्यासासाठी उभारलेल्या तीन मोठ्या प्रयोगशाळांची आणि अनेक देशांतल्या गुप्तचर यंत्रणांनी मिळून केलेल्या पिरॅमिडांच्या व जागांच्या डेटाबेसची पानंही होती आणि त्या डेटाबेसात *समिती*चा सिंहाचा वाटा होता. सापडलेल्या सगळ्या जागा सुनियोजित होत्या आणि उरलेल्या सगळ्या संभाव्य जागांवर नव्यांचा शोध सुरू होता. देशातल्या तशा बहुतेक जागा *समिती*ने वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांखाली आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. यादीच्या तळाशी माझ्या तालुक्याजवळची एक जागा मात्र वेगळी दाखवलेली होती. तिची मालकी कुरुळांची होती आणि शेजारी शेरा होता, निर्यंत्र कुरुळांना संविधानाचे कायदेशीर संरक्षण आहे.
मी चोपड्या वाचत असताना पिंडीपलीकडचे एक गृहस्थ माझ्याकडे एकटक पाहत होते. सारंगांनी माझ्या स्थायी सदस्यत्वाचा कागद पुढं केला तेव्हा ते प्रथमच बोलले, “उत्सुक माणसं तडफदार असतात हे मान्य आहे. पण या कामात आणखी एक उत्सुक माणूस म्हणजे आणखी एक भगदाड. जे झाकून ठेवायचं आहे ते आजवर उत्सुकतेनेच उघडं पडत आलं आहे. माझी सही मिळणार नाही.” ते उठले आणि कुणाचाही निरोप न घेता जिना चढून गेले. कुणीही त्यांना थांबवलं नाही. सारंग शांतपणे म्हणाले, “संहितेच्या एकोणचाळिसाव्या कलमानुसार पाच सह्या पुरतात.” आणि त्यांनी तो कागद पुढच्या हातात दिला.
सह्या होत असताना कोपऱ्यातल्या आजी मोरपंखी कागदाची घडी घालत बसल्या होत्या. निघताना त्यांनी तो मोर माझ्या हातात ठेवला आणि त्या म्हणाल्या, “मोरबनात पहिला पिरॅमिड सापडला म्हणून सुरुवातीचे सदस्य मोराच्या खुणा संकेत म्हणून वापरत. त्यातूनच पुढं ही ओरिगामी मोराची प्रथा पडली. मधल्या काळात छद्ममाहिती पसरवायला आणि दिशाभूल करायला सदस्य मुद्दाम एकमेकांना मोर देत. आता वारसायुगात सगळं ऐच्छिक आहे, गमतीपुरतं आणि औचित्यापुरतं.” चश्मेवाल्या गृहस्थांनी जाताजाता माझ्या निबंधाचं कौतुक केलं आणि माझी वेळ संपल्याचं सांगितलं.
दिशाभूल करण्याचं *समिती*चं कार्य मात्र अजून अव्याहत सुरू आहे आणि पूर्ण सत्य कोणालाच कधी माहीत होणार नाही अशी प्रत्येक घटकाची घडी आहे, त्यामुळे पावलापावलावर संवेदकं असूनही *समिती* बंद दाराआड आपलं काम बिनदिक्कत करू शकते, एवढा अर्थ मला त्या दुपारच्या वागण्याबोलण्यातून आपसूक लागला. मी आल्या वाटेने परतून आले. वनसैनिकांचे एक वाहन मला सीमेपर्यंत सोडायला आले होते. माझे पहिले कार्य संपल्याचा निर्वाळा देखील दिला गेला.
---
## इ. स. १५६१ : जशास तसे
एप्रिल महिन्यातील पहाट असली तरी अचानक हवेत दमटपणा आणि उष्णता वाढलेली होती. न्यूरेमबर्गच्या काठावरल्या शेतात हान्स नेहमीप्रमाणे आपल्या लहानशा झोपडीतून बाहेर पडला. तो एक साधा देवभोळा शेतकरी. हवा वाहत नव्हती आणि आभाळ निरभ्र होते. जणू उन्हाळ्याची सुरवात व्हावी तसं हवामान होतं. चेरीच्या फुलांनी झाडं अजून लडबडून गेलेली नसली तरीही. दूरवरून येणाऱ्या पक्ष्यांचे आवाज तिथल्या शांततेवर जिवंतपणा पेरत होते. जनावरांना पाणी पाजण्यासाठी हान्स नेहमीच इतक्या लवकर उठायचा.
हान्सने एक बादली उचलली आणि विहिरीकडे निघाला. पूर्वेकडे पहाटफुटीचा अस्फुट रंग पसरत होता. त्याने डोळे चोळले आणि आळस देत त्याने आकाशाकडे नजर टाकली. तेवढ्यात क्षणात बदललेल्या आकाशातल्या चमत्काराकडे पाहून त्याच्या हातून बादली निसटून जमिनीवर पडली. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याला वाटलं आपण अजूनही साखरझोपेत आहोत. त्याने स्वतःच्या थोबाडात दोन थपडा मारल्या.
पूर्व दिशेला आकाशात, क्षितिजावर सूर्य उगवण्यापूर्वीच, अचानक विविध रंगांच्या, गोल, दंडगोल आणि क्रॉसच्या आकाराच्या वस्तू अचानक प्रकट होत होत्या. ते सारे आकृतिबंध विलक्षण तेजाने चमकत होते आणि ध्वनीविना आकाशात एकमेकांच्या दिशेने फिरत होते, जणू त्या वस्तू एक युद्धच खेळत होत्या .
हान्स भीतीने जागच्या जागीच खिळून गेला. नंतर गोंधळून तो ओरडत पळू लागला , “धर्मगुरू सांगतात तो काळ आला! देव-दानवांचा संग्राम चालू झाला!!”
धावत धावत तो झोपडीत शिरला. त्याने ओरडतच बायकोला, गेर्ट्रुडंला गदा गदा हलवलं. तिला बिलगुन झोपलेल्या लहानग्या मार्थाला मुताच्या भपकाऱ्याकडे दुर्लक्ष करत उचलून तो बाहेर धावला. मुलीने हंबरडा फोडला.
गेर्ट्रुडंने फटकन उठून भीतीने उरावर हात ठेवला. तिला क्षणभर वाटलं, जणू धरणीकंप झाला. ती अंगावर काहीही न घेता बाहेर पळाली. आसमंताचा रंग प्रचंड उजळला होता. माध्यानीचे दोन सूर्य तळपत असावेत असा भगभगीत प्रकाश बाहेर पसरला.
सगळ्या न्यूरेमबर्गमध्ये आणि आसपासच्या गावांत लोकांची धावाधाव सुरू झाली. आकाशातील हे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी लोक घराबाहेर पडून चर्चकडे धाव घेऊ लागले. काही जण गुडघ्यावर बसून प्रार्थना करु लागले. काहीजण केल्या पापांची क्षमा भाकू लागले.
मार्थाच्या इवल्याश्या डोळ्यात आकाशातल्या चमकत्या वस्तूंची प्रतिबिंबे झळकत होती. हान्स आणि गेर्ट्रुडं भयभीत होऊन ते दृश्य पाहत राहिले. आकाशात वेगवेगळ्या आकारांची ही याने अचानक प्रकट होत, प्रचंड तेजाने चमकत आणि क्षणार्धात अदृश्य होत. काही यानं मोठ्या आकाराची होती, तर काही अगदी लहान; आकाशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत ते वेगात उडत, मग मध्यभागी एकमेकांवर भिडून पुन्हा विरुद्ध दिशेला उडून जात.
साधारण अर्धा तास ती यानक्रीडा चालली. सूर्याची पहिली किरणं जमिनीवर पडण्याआधी ते सर्व आकृतिबंध हळूहळू क्षीण होत अंतर्धान पावले. आकाश पुन्हा पहाटेप्रमाणे स्वच्छ, निर्मळ झाले. सूर्योदय झाला आणि काहीही घडलं नव्हतं अशा शांततेत सूर्याने आपल्या मार्गाने प्रवास सुरू केला.
आकाशाकडे डोळे लावून असलेले लोक सावकाश चर्चमध्ये निघून गेले. काहींनी घाबरतच आपल्या शेतांवर पुन्हा काम सुरू केलं. पण हान्स मात्र जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला. त्याने आपल्या मुलीला जवळ घेतलं आणि गप्प राहिला.
दुसऱ्या दिवशी न्यूरेमबर्गच्या वृत्तपत्रात या घटनेबद्दल बातमी आली. शहरात चर्चमध्ये धर्मगुरूंनी हे दैवी संकेत असल्याचे म्हटले. सगळ्या चर्चमधे सभा बोलावल्या. काहींनी हे देव दानवामधले युद्ध पुन्हा पृथ्वीवर होईल अशी भीती घातली.
हान्स मात्र अबोल झाला. हिवाळी गव्हाच्या मोसमांमधे त्याचे आयुष्य पुन्हा फिरत राहिले. देव दानवांच्या गोष्टी मुला नातवंडांना तो सांगत राहिला आणि एकेदिवशी त्याच्या शेतातच विरून गेला.
---
## मी रचना
हळू हळू एकेक पदर सुटा व्हावा तसे मला *समिती*च्या काही कामांचा सुगावा लागला. परंतु मला *समिती*च्या कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण भरवसा नाही. *समिती*मधला प्रत्येक घटक हा ‘गरजेपुरतीच माहिती’ या तत्वावरच काम करतो. कोणालाही पूर्ण चित्र कधीच स्पष्ट होत नाही. केवळ माहितीचे नव्हे, प्रत्येक हेतूचे देखील काटेकोर विभाजन केले गेले आहे. प्रत्येकाला हवी तेवढीच जागा मिळत असल्याने, काम झाले की *समिती* माणसं संपवून सुद्धा टाकत असावी. राष्ट्रीय सुरक्षेच्या काही कलमांचा आधार घेऊन समितीने अनेक संवेदनशील सैनिकी, सरकारी आणि निमसरकारी कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या “वस्तू” दडवून ठेवल्या आहेत. त्या वस्तू अशा खुबीने ठेवल्या आहेत की त्या पब्लिक डोमेन मध्ये कधी येऊच शकत नाहीत. संसदेला अशा वस्तू सार्वजनिक करायच्या असतील तर मूलभूत संविधानदुरुस्ती करावी लागेल. आणि समिती अशी दुरुस्ती होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांत काय काय आलं हे बनाळीत चहा ओतता ओतता ज्या सहजपणे सांगितलं गेलं होतं, तो सहजपणा आठवला की मला अजून झोप लागत नाही. समितीने तिच्या मूळ वैज्ञानिक हेतूंना रीतसर बाजूला केव्हाच केले आहे. आणि आता समितीला काही लोकांनी आपल्या पूर्ण कह्यात घेतले आहे. केवळ व्यक्तीच नव्हे तर परकीय गुप्तचर संस्था, विशेषतः तीन आद्याक्षरांच्या अमेरिकन गुप्तचर संस्था देखील समितीवर आपले नियंत्रण ठेऊन आहेत.
जिथे पंतप्रधान देखील समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर नाही, तिथे मला माझी आणि कुटुंबाची काळजी वाटणारच. तो क्रमांक ३६ कुठे आहे हे मी कानभुंग्याला विचारलं तर त्याची बदली झाली आहे तेही ईशान्य भागात असं चमत्कारिक उत्तर मिळालं. त्यापेक्षा कोणतीही जास्त माहिती मला मिळत नव्हती. त्याला हाक देण्याचा मी अनेकदा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. तो हरवला ते हरवलाच. सारंग तर क्वचितच कार्यालयात दिसत. एकदा नंतर मी त्यांना गाठून ३६ बद्दल विचारलंच. किंचित नाराज होत त्यांनी मंद हसत कोणतीही माहिती देण्याविषयी नकार दिला. तो निवांत आहे इतकंच ते म्हणाले! निवांत!! त्यांना मला त्यानंतर आलेला ताण जाणवला असावा. परंतु *समिती* असंच काम करते हा स्वीकार मी आधीच केला असल्याने त्यांनी मला जास्तीचं काही सांगितलं नाही.
त्या दिवसांतच स्थानकावर एक प्रकार घडला. परतीच्या गाडीची वाट पाहत मी बाकावर बसले होते. फलाटाच्या टोकाला उभ्या व्हेंडिंग मशीनपाशी फकिरांचा एक लोंढा आला. त्यांच्यातल्या दोघांनी हातातल्या लोखंडी कांबी यंत्राच्या काचेत घातल्या आणि बाकीचे शांतपणे त्याचे पत्रे उचकटू लागले. यंत्र मोडता मोडता आतून पुनःपुन्हा एकच वाक्य वाजत राहिलं, सगळं ठीक आहे. आजूबाजूच्या प्रवाशांपैकी कुणीही उठलं नाही. काही जणांनी जांभया देत आपले कानभुंगे सरसावले. एका बाईने तेवढी हळहळ केली, ती सुद्धा यंत्रात पैसे अडकल्याची. फकीर आले तसे निघून गेले. बऱ्याच वेळाने महामंडळाची एक गाडी आली आणि मोडक्या मशीनचा सांगाडा उचलून निघून गेली. माझी गाडी येईपर्यंत फलाटावर मशीन उभं होतं तिथे रिकामा चौकोन तेवढा उरला होता. कुणी घाबरलं नाही आणि कुणी चिडलंही नाही. जणू सगळे एक जुनं परिचित नाटक बघत होते.
त्या रात्री मी *समिती*च्या टिपणासाठी युगांची साखळी लिहून काढली. गुप्ततेला संस्थात्मक रूप आलं ते माजेंटा आणि रॉजवेलपासून, म्हणजे महायुद्धांच्या काळापासून. त्याआधी अशा सत्यांची राखण धर्म आणि परंपरा करत आल्या होत्या, चर्च त्यांना दैवी संकेत ठरवत असे आणि पंथ त्यांना दृष्टांत आणि कूट करून जपत. संस्था आल्या आणि राखणीची पद्धत युगायुगांनी बदलत गेली. पाश्चिमात्य गुप्तचर संस्थांच्या नशिबी शीतयुद्धयुग, आंतरजालयुग, नैराश्ययुग आणि नंतर मिथकयुग अशी सलग साखळी आली. शीतयुद्धयुगात नोंदच दाबायची, कॅमेरे जप्त आणि अहवाल लालफितीत, चंद्रतालला आपणही नेमकं तेच केलं होतं. आंतरजालयुगात दाबायची गरजच उरली नाही, सत्य उघड करायचं आणि माहितीच्या महापुरात बुडू द्यायचं, बार्बरची मुलाखत अशीच केव्हाच वाहून गेली. मध्यंतरी आंतरजालानंतर सत्योत्तरजगाच्या थोडं पुढे भासयुग नावाचं एक लहान युग सगळ्या जगासाठीच येऊन गेलं. तेव्हा तर सत्य काय आणि भास काय यांच्यात काहीच अंतर उरेना आणि लोकांना विस्मृतीचाही विसर पडला. कृत्रिम मतींची बाळपावलं नजरेत भरतील एवढी मोठी झाली होती आणि सगळ्या जगात मागासपणाची लाट आली. याच काळात पाश्चिमात्य गुप्तचर संस्था नैराश्ययुगात गेल्या. कृत्रिम मतींचा सर्वात घातक प्रयोग त्यांनीच आधी सुरू केला आणि उत्तरोत्तर अंतर्चिपा वापरून लोक कशावर विश्वास ठेवतील हे सुद्धा नियंत्रित केले जाऊ लागले. मिथकयुगात नव्याने मिथ्ये रचली गेली आणि ती सत्यधारावर होती की नव्हती हे मात्र कोणालाच सांगता येत नसे. ज्या गोष्टी उघड करायच्या आहेत त्या प्रतिष्ठित माध्यमांतून उघड करायच्या, कोणत्याही प्रणोदनाशिवाय उड्डाण करणाऱ्या यानांच्या चित्रफितींसारख्या, आणि नंतर त्या सत्य आहेत की नाहीत हे सांगता येत नाही असे सरकारी पातळीवरून पुनःपुन्हा सांगत राहायचे. म्हणजे जरी बातमी सत्य असली तरी ते सत्य मिथक म्हणून मात्र जोरदार प्रस्थापित होते आणि त्यांच्याशी ‘संपर्क’ जरी झाला तरी ते एक मिथक आहे असेच सगळ्यांना स्वीकारावे लागते. नवीन मिथकांनी जुन्यांची जागा घेतल्यावर मात्र आले वारसायुग, जे आपण आता इथेही अनुभवतो आहोत. आपल्याकडे या सुनियोजित व्यवस्थेला परिपक्व व्हायला उशीर झाला. पाश्चिमात्य गुप्तचर संस्था मिथकयुगात होत्या तेव्हा आपण कुठे *समिती*ची कायदेशीर बैठक तयार करत होतो. त्यामुळे ही सगळी शिडी न चढता आपल्याला थेट मिथकयुगातच उडी मारावी लागली.
म्हणजे आता ‘आपण एकटे आहोत का’ या प्रश्नाचे उत्तर एक वैज्ञानिक अडचण नसून सांस्कृतिक ठेवा म्हणून जपायचे. त्याविषयी प्रचंड प्रमाणात स्मरणरंजन तयार होईल असे पाहायचे.. परवाच एका सरकारने ‘२०व्या आणि २१व्या शतकातल्या उडत्या तबकड्यांच्या वेडाचे’ एक जागतिक संग्रहालय उभे केले. आधीच्या सरकारांनी मुद्दाम दिशाभूल केली हेही त्यातल्या एका प्रदर्शनात कबूल करून टाकले. एकदा सांस्कृतिक वारसा म्हणून ही वैज्ञानिक शंका बाजूला केली की तिच्या निरसनातून येणाऱ्या कोणत्याही विध्वंसक शक्यतेला पूर्ण निष्प्रभ करून टाकता येते. मग अस्मिता आणि पुरातत्त्वशास्त्राप्रमाणे उत्खननाचा खेळ खेळता येतो. आणि खरेतर पुन्हा आपण शीतयुद्ध युगासारख्या ‘आपण सगळं नीट हाताळू’ या फाजील आत्मविश्वासाकडे झुकत चाललो आहोत. आज पावलापावलावर संवेदकं आहेत. ते क्षणाक्षणाला आपल्यावर बारीक नजरही ठेवून आहेत. तरीही *समिती* मात्र भ्रामकतेच्या धुक्यात आपले कार्य निर्धोक चालवू शकते.
लिहिता लिहिता स्थानकावरचं ते नाटक आठवत राहिलं. वारसायुग हा शब्द कागदावर जितका सुबक दिसत होता तितका आता वाटेनासा झाला होता.
प्रत्येक युगात पाश्चिमात्य गुप्तचर संस्था ही रहस्ये अबाधित ठेवू शकली. भांडवलशाही तिचे सगळे चमत्कार वापरून अजून वेगवेगळे भास तयार करते. त्यात मग फक्त धूर दिसतो, आग दिसत नाही, आणि धूर हा मुद्दामहून घडवलेला भास आहे असा समज सार्वत्रिक होतो. मग गुप्तचर संस्था कायद्यांच्या फटी शोधून खाजगी क्षेत्रातल्या ठरावीक लोकांना अर्धवट विश्वासात घेऊन सत्य दडवून ठेवते. अशा कोणत्याही सत्याला जगासमोर आणण्याची सोडा, जाणून घ्यायचीसुद्धा खूप मोठी किंमत असते. ती कुणी ना कुणी चुकवतोच. त्यामुळेच मला माझ्या जीवाची, आईच्या बऱ्या वाईटाची काळजी वाटत होती.
घरी आईला औषधे टोचणारा मदतनीस आचके देऊ लागला होता. थोडा जुन्या वळणाचा होता तो. आईला तसेही यंत्रांवर अवलंबून राहणे फारसे आवडत नाहीच. आज्जीला देखील यंत्रांचा तिटकारा होता. कुटुंबातल्या या दोन्ही स्त्रियांहून फक्त याच बाबतीत मी जराशी वेगळी आहे. मी आधीच सांगितलंय - माझा तंत्रज्ञानजन्य उत्क्रांती आणि माणसांच्या श्रद्धांच्या उत्क्रांतीचा यांचा थोडाफार अभ्यास आहे. माणूस हा तंत्राधिष्ठित प्राणी आहे, तो तंत्रांचा शोध लावतो आणि ती तंत्रे त्याला पुन्हा घडवतात. विश्वात कुठेही तंत्राधिष्ठित जीवन असेल तर अंतिमत: ते जाणीव आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त सहजीवनापर्यंत पोचणारच. म्हणजे जाणिवेला बदलण्याचे तंत्रज्ञान असो किंवा तयार करण्याचे असो. आपण कधीतरी तिथेच पोचणार आहोत. अशा माझ्या उलट सुलट विचारांमुळे मला यंत्रांचा तिटकारा नाही. म्हणजे मला अधून मधून भीती वाटत राहते, पण आपण आपल्या परीने जाणीवेचा झेंडा जमेल तिथे रोवत राहू हा मला विश्वास आहे. प्रश्न इतकाच होता की आपण एकटेच आहोत का? तोही आता माझ्यापुरता निकालात निघाला आहे.
पण माझ्या आईचे आणि यंत्रांचे जुळत नाही. त्या शनिवारी मदतनिसाच्या दुरुस्तीचं निमित्त काढून मी घरी गेले. आई नवीन तिखट करायला बसली होती. मिळतील ते मसाले तिनं पुढ्यात मांडले होते आणि ती ते खलबत्त्यात कुटत होती. मला पाहताच तिनं पहिला प्रश्न जेवणाचा विचारला आणि दुसरा पगाराचा. मग बराच वेळ खलबत्त्याचा आवाज तेवढा घरात येत राहिला. मीच न राहवून विचारलं, तुझं आणि यंत्रांचं का जुळत नाही गं? धणे मोजून घालता घालता ती सहज म्हणाली, आपल्या पूर्वजांपैकी कुणीतरी एकानं कुरुलपंथाचा विस्तार केला होता. हे मला नवीनच होतं. आज्जी असती तर मी तिला भंडावून सोडलं असतं. मग आईला आठवेल तसं ती तिच्या आजी आजोबांबद्दल बोलत राहिली. आज्जीच्या आईवडिलांनी मात्र रीतसर आज्जीला जन्म दिला. आज्जीने आईला विनापुरुष जन्म द्यायचं ठरवलं आणि माझ्या आईनेही तेच केलं. असं का केलं हे मी तिला या आधीही खूपदा विचारलं आहे. यावेळेस मात्र ती कुटायची थांबली आणि म्हणाली, शक्य असतं तर माझ्या घरातल्या आधीच्या प्रत्येक बाईनं हेच केलं असतं. एवढं बोलून तिनं पुन्हा बत्ता उचलला आणि मला मीठ किती झालं ते बघायला सांगितलं. मला याबद्दल खूप उत्सुकता होती. कुठेतरी मला कुरुलांची पद्धत देखील पटते. कशाला हवी ती गुणसूत्रे संपादित करून, बरोबर हव्या त्या लिंगाचे बाळ जन्माला घालायचे? नैसर्गिक बदलाच्या शक्यता आपण मारून तरी टाकत नाही ना? खरेतर बाळं जन्माला घालायची गरज सिंग्युलॅरिटीनंतर अचानक वाढली होती. AIला तंत्रज्ञानात बंदिस्त करण्याच्या जवळपास आपण पोचलो असूनही अजून लोकांना जैविक अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड करावीशी वाटत होती आणि आहे. शेवटी तंत्रज्ञानाला साधने लागतातच. ती अचानक प्रकट थोडीच होतील? ते एक कारण आहेच. पण मानवी मनांना दृष्टीचे, संवेदनांचे बंधन आहे, हे एक मुख्य कारण आहे. मनाची कृत्रिम उत्क्रांती घडवायचे बरेच प्रयोग फसले. यंत्रभू मतींनी मानवी मनांना आकुंचित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जैविक उत्क्रांतीवर पुन्हा भिस्त ठेवणे आवश्यक वाटू लागले आहे.
तिखट कुटून झाल्यावर आईने बरणी भरून ठेवली. कधीतरी स्वत: रांधून खायला तिला आवडतं. मी काही आडकाठी आणत नाही. तिचे आयुष्य बऱ्यापैकी शांततेत गेले. म्हणजे इतरांच्या तुलनेत. इतरांना ज्या भित्या भंडावून सोडत त्या तिला, मला, कुणालाही चुकल्या नाहीत. आजीचे आयुष्य मात्र खूप धकाधकीचे होते. लहानपणी मी आजीला एकदा तिच्या आईवडिलांविषयी आणि तिच्या आजी आजोबांविषयी विचारलं होतं. तिला तिच्या आजोबांचा फार लळा होता. एकेदिवशी ते आजोबा, म्हणजे माझे खापरपणजोबा, यंत्रे उध्वस्त करणाऱ्या एका टोळीबरोबर अचानक सगळं सोडून कुठंतरी निघून गेले. वैराग्य आलं होतं त्यांना, असं आजी सांगायची. त्यांची आजी पश्चिमेकडून इकडे पुन्हा स्थलांतरित झाली होती, पण त्यांची आई मात्र त्यांना तशीच टाकून पुन्हा पश्चिमेकडे गेली आणि परत आलीच नाही. असं अचानक वैराग्य साधायला निघण्यापूर्वी त्यांनी माझ्या आजीला एक गोष्ट मात्र विश्वासाने दिली होती, त्यांचा लाकडी खलबत्ता. हे सांगताना आजीचा सुरकुतला हात त्या खलबत्त्यावरून फिरत राहिला होता. त्या रात्री आईचा हात तसाच फिरला होता, हे मला आता आठवतं.
त्याच रात्री मी काश्मीरातला तो जुना कागद काढला आणि रेघांमध्ये दोन नवी नावं भरली, खापरपणजोबा आणि त्यांची पश्चिमेकडून परत आलेली आजी. प्रश्नचिन्हं अजून तशीच होती, पण रेघा वाढत चालल्या होत्या.
माझ्या अभ्यासविषयामागे खरे तर आमच्या पूर्वजांच्या गोष्टींचा खूप मोठा हात आहे. मी असल्या गोष्टी ऐकून त्यामुळेच तिकडे वळले असावे. नाहीतर कोण कशाला धार्मिक परंपरांचा असा अभ्यास करत बसेल?
---
## इ.स. १३७९ : नुक़्ता
स्फहानच्या निळ्या घुमटाखाली सय्यद एकटक त्या विराट नभाकडे बघत नक्षत्रांचे गूढ उकलत बसायचा. ते तारांगण त्याला एका प्रश्नाकडे घेऊन जायचे. त्याचे हृदय या विस्मयाने भरून जाई आणि तो विस्मय त्याच्या डोळ्यातून ओसंडून वाही. त्याला प्रश्न पडे: हे सारं रचलं गेलं आहे या सगळ्याचा अर्थ काय? त्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्याच्या आसपासच्या मौलवींनी कैकदा सांगितलं. त्यावर त्याचे समाधान झाले नाही. त्या प्रश्नाची उत्तरे शोधत तो बरीच मजल मारणार होता. त्याचा हा प्रवास इराणच्या वाळवंटांमधून, अफगाणिस्तानच्या कोरड्या डोंगररांगातून होणार होता. काबूलच्या धुळीनं भरलेल्या वाटा, हिंदुकुश पर्वतांची दाहक थंडी, आणि बल्खमधल्या जुन्या नगरांमधली भग्न मंदिर-मशिदी, हे सारं त्यांच्या नजरेसमोरून शांतपणे ओसरणार होतं. एकेदिवशी तो निघाला. कारवानी ताजीदारांसोबत, रेशीममार्गावरून. कुठल्याही गावात फार काळ थांबत नव्हता. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर त्याच्यासाठी केवळ एक मुकाम होता, अंतःकरणातील गूढ उकलण्याच्या मार्गावरचा फक्त एक थांबा.
हिंदुकुशच्या बर्फाळ टोकांवरून उतरताना, सय्यद हमदानीच्या पावलांखालचे रस्ते वारंवार आपली दिशा बदलत होते. कधी खडकांखालून वळण घेत, कधी एखाद्या उंच झाडाच्या सावलीखाली विसावत. स्वात, उद्यानाच्या गर्द दऱ्यांमधून, दीरच्या दाट झाडीतून मार्ग काढताना, त्याच्या बरोबरच्या लोकांच्या कपाळावर प्रवासाचा शीण जमा झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.
पुढे एक विस्तीर्ण वळण आलं, आणि काही कोस पुढे, त्याच्या डोळ्यांपुढे आली ती सिंधू. सिंध. जणू एक जिवंत, श्वास घेणारी स्त्री, जिला काळाचं भान नाही. तिचं पाणी हिमालयाच्या निळसर-हिरव्या आठवणी घेऊन वाहत होतं. त्याने त्याच्या सहप्रवाशांचा निरोप घेतला आणि तो सिंधूच्या काठा काठाने वर जात राहिला.
बेशामच्या घसरड्या उतारांवरून खाली उतरताना वाटेत एक लहानसे गाव लागले. नदीकाठाजवळ चार गाढवांवरून कुणीतरी सामान घेऊन चाललं होतं. अचानक एका गाढवाचा पाय घसरला आणि ते काठावरून नदीकडे, आदळत आपटत घरंगळू लागलं. त्याच्या पाठीवरचं बोचकं उडून सय्यदच्या पायाशी पडलं. सय्यद पळाला आणि त्यानं गाढवाला रोखलं. त्याला उठवलं, मायेने पाणी पाजलं. सामान वाहणारं ते सुताराचं पोरगं ओरडत वरुन आलं. एकमेकांची भाषा कळत नव्हती म्हणून पोराने त्याचे पाय धरले. पुन्हा बांधाबांध करून निघताना त्या मुलानं आग्रहानं सय्यदला एक लाकडाचा खलबत्ता एका बोचक्यातून काढून दिला. म्हणाला, निदान पाणी प्यायला तरी तुला उपयोगी येईल.
मुला माणसांना, प्राणी पक्ष्यांना जीव लावत सय्यद पंजाबच्या विस्तीर्ण, सुपीक भूमीतून जात पुढे जात राहिला. ज्या भागाला सर्पलोक म्हणत त्या भागातून त्याचा कारवा नागमोडी वळणे घेत सापासारखाच हळू हळू सरकत होता. समोरून येणारा वारा शकारद्वीपातल्या ध्यानस्थ तपस्थ डोंगरा-दगडांचा गंध वाहून आणत होता. शकारद्वीप ओलांडल्यावर भूमी जराशी खुली झाली. आणि आकाश थोडंसं विस्तारलं, माणसाला श्वास घेता येतो याची आठवण करून देण्यापुरतं. सय्यदने शांतपणे ढगांकडे पाहिलं, ते उंच शिखरांवरून हरवलेल्या देवदूतांसारखे फिरत होते. त्या संध्याकाळी एकदा त्याने एक ओळ लिहिली आणि तिला वाऱ्यावर सोडून दिलं.
अस्त्रापुरात पुन्हा जग अरुंद झालं. सरल, देवदार वृक्षांनी आणि धुक्याने रस्ता झाकून गेला. एखाद्या संयमी जनावरासारखी रात्र हळूच आणि लवकर येई. काळ्या पत्थरांवरून थंडगार पाणी वाही, आणि आकाशात चांदण्यांचे विभ्रम अतिशय स्पष्ट दिसत. सकाळी सय्यदचा झगा दवाने जडगच्च होई आणि संध्याकाळी शांत हवेने तो हिरमसून जाई. मग मणिमार्ग आले. हिमाच्छादित उतार वाढले आणि झाडे विरळ होऊ लागली. रस्ते नाहीसे होत आणि अचानक जुन्या आठवणीप्रमाणे कुठेतरी सापडत. सय्यदच्या नजरा डोंगरकडा सांभाळत चालल्या होत्या, आणि तेवढ्याच काळजीने पुढे ज्येष्ठागिरी आले. आता पायाखाली बर्फही येऊ लागला. श्वास जलद आणि छोटे होऊ लागले. तोच अचानक समोर आली ती वितस्तेच्या काठावरची कश्यपमेरुची श्रीनगरी. स्वर्गीय हिरवाईत स्थिरशांत वसलेली. हीच ती बिहात नदी, हेच ते काश्मीर, सय्यद आनंदाने ओरडला.
श्रीनगरात नदीकिनारच्या एका धर्मशाळेत तो राहिला. तिथून वितस्तेच्या लयबद्ध प्रवाहाचा आवाज ऐकू येई. कश्यपमेरूत तो भटकत राहिला. पानगळीचे दिवस होते. आडवाटेवरच्या एका प्रवासात सय्यद बिहातच्या काठावर कुठेतरी थांबला. एका चिनारवृक्षाखाली डोक्यावरच्या अंगभर जटा वेढलेली एक स्त्री वितस्तेच्या प्रवाहाला पाहत पद्मासनात बसली होती. सय्यदला श्रीनगरातले विविध साधू, तंत्रसिद्ध परके नव्हते. परंतु या योगिनीकडे तो आपसून ओढला गेला.
"कुणाला शोधत आहेस, देवी?" त्याने विचारले.
"शोधणं तर खूप आधीच थांबलं. आता फक्त शिव शक्तीच्या अनन्यत्वाचा अनुभव घेत आहे.", अविचल स्निग्ध उत्तर देऊन तिनेच विचारले, “कोणत्या सत्याच्या मागे इथे आलास मुसाफिरा?”
हमदानी म्हणाला, "जे शब्दात धरता येत नाही, आणि ज्याला कुठलाच आकार नाही."
"ते सत्य एकच आहे," तिने स्वर तसाच ठेवला. "शब्दांच्या मुळाशी जो सूक्ष्म बिंदू आहे त्यातूनच आकार आणि निराकार दोन्ही जन्म घेतात."
"बिंदू?" सय्यदने उत्सुकतेने विचारलं.
"म्हणजे शून्य, जिथे द्वैत नाही, केवळ एकत्व आहे. जे शिव आणि शक्तीचे एकरूप स्थान."
"जिच्या वाखांची चर्चा साधुमंडळात आहे ती तूच लल्लेश्वरी देवी का?" सय्यदने विचारलं.
ती सौम्य स्मित करत म्हणाली, "मी फक्त एक शून्य आहे, एक बिंदू! मी विश्वाकार आहे आणि निराकारही! मी शिवरूप आहे. मीच ती लल्लेश्वरी आहे. आणि मीच ती कधीच संपून गेलेली आहे!"
सय्यदची खात्री पटली. आपण स्वप्नात आहोत की मौनांनीच लल्लेश्वरीशी बोलत आहेत याचे त्याला भान राहीना. कितीतरी वेळ तो तिथेच बसून होता. त्याला वाटले युगे सरली तरीही आपण अजून शून्यवेळ आहोत. दिवस उलटले. एकेदिवशी सकाळी लल्लेश्वरी दिसेनाशी झाली. तो पुन्हा श्रीनगरला आला.
वाटेत सय्यद तहानेने व्याकूळ होऊन एका झोपडीपाशी थबकला. समोर एक लहानशी मुलगी खेळत होती. तिच्या केसांवर चिनारच्या पानांचा मुकुट होता, आणि हातात मातीचं मुठी एवढं भांडं होतं. “या हू! हक मौजूद”, आरोळी देऊन त्याने तो लाकडी खलबत्ता तिला दिला आणि पाणी मागितले. पोरीने आणून दिलेले पाणी पिऊन त्याने मायेने विचारले, "तुझी आई कुठे आहे, बाळ?" त्या मुलीने काही ना बोलता फक्त नदीच्या दिशेने आणि जंगलाच्या दिशेने हात केला. सय्यदने तो लाकडाचा खलबत्ता तिला प्रेमाने देऊन टाकला आणि तो मार्गस्थ झाला.
धर्मशाळेत पोचताच त्याने बोचक्यातून समरकंदी कागद काढले आणि दौतीत टाक बुडवून कागदावर नुक्ता उमटवला.
“नुक्ता म्हणजेच तौहीद!” झर झर त्याच्या हातून बिंदूचे हिकमाह फस्ल होऊन एका मागोमाग कागदावर उतरू लागले.
---
## मी रचना
कमलव्वानं मला दिलेलं आमंत्रण मी साफ विसरूनच गेले होते. तिच्या अधून मधून येणाऱ्या झटक्यांविषयी मला काळजी वाटली होती. एके रात्री मी घरी परतत असताना अचानक कानभुंग्याने मला एक टोकाची सूचना दिली. त्याला कुठून तरी तिचा माग मिळाला असावा. ती पुन्हा कुठेतरी बेशुद्ध होऊन पडली होती. मी तात्पुरते दुर्लक्ष केले. मी कमलव्वाचा अजूनही विचार करते हे *समिती*ला कळायला नको होते.
सारंगांना न सांगता मी तिला भेटायचे ठरवले. *समिती* माझ्यावर पाळत ठेवणार हे उघडच असणार. मी माझ्या स्वतःच्या छंदापायी हमामदस्त्यावर निबंध लिहीत असल्याचे भासवू लागले. त्याची तयारी म्हणून मी मुद्दाम एका कुरुळवस्तीला भेट देऊन आले. दोनेक महिने असेच गेले. अधून मधून मी कच्चे खर्डे लिहीत बसे. सारंगांच्या बोलण्यात असा विषय निघतो का ते ताडत होते.
त्या दिवशी मात्र मी सकाळी उठले आणि थेट निबंध पूर्ण करायला घेतला. मला कमलव्वाची खलताई म्हणून अजून विस्तृत मुलाखत हवी होती. कामावर न जात मी रजा घेतली आणि थेट कुंडलहळ्ळी गाठले. गाडी सीमेबाहेर लावून मी चालत कमलव्वाच्या घरी पोचले. तिला दारातून हाक दिली.
तिची तब्येत प्रचंड ढासळली होती. अंगात नुसती हाडेच उरली होती. मला गूळपाणी देऊन तिने शेजारी बसवले. माझा हात हातात घेऊन ती तशीच बसून आढ्याकडे पाहत राहिली. मी मौनातच राहून स्पर्शानेच तिला समजून घेत होते.
तिने तिच्या आरोग्याच्या समस्यांवर काही उपचार घेतले आहेत का ते मी हळूच विचारले. तिने नकारार्थी उत्तरे दिली. काही वेळाने ती निश्चयाने उठली. खुंटीवरून कापडाची पिशवी काढत मला विचारलं, “ते पिवळे अंगरखे आहेत का तुमच्या वाहनात? जाऊन पटकन घेऊन या या पिशवीत झाकून.” पिवळे अंगरखे? मी विचारात पडले. थोड्या वेळाने लक्षात आलं, ती कामचलाऊ किरणोत्सारविरोधी चिलखताबद्दल बोलत आहे. माझ्या वाहनात ते कायम असतंच. ते त्या पिशवीत घेऊन मी परत तिच्या घरी आले. पायात खडावा चढवून कमलव्वा माझी वाट पाहतच उभी होती. माझ्या हाताला धरून ती सिदरायाच्या देवळाकडे निघाली.
मी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. कमलव्वा प्रचंड गंभीर होती.
देवळात पोचताच आत वटवाघळांच्या अस्तित्वाचा दर्प आला. राजधानीतल्या एका मोठ्या बागेतल्या अश्या कृत्रिम दर्पाच्या एका खोट्या गुहेत मी गेले होते. दाराला कमलव्वाने आतून कुलूप घातलं. मला आश्चर्य वाटलं. मंदिर शांत-स्तब्ध, थंड, हेमांडपंथी, बिनशिखराच्या स्थापत्याचे. कमलव्वा मला गाभाऱ्यात घेऊन गेली. गाभाऱ्याचाही दरवाजा तिने भल्या कष्टाने लावून घेतला. आत एक दिवा तेवत होता. डोळे अंधाराला सरावल्यावर तिने मला चिलखत घालायला लावले. गाभाऱ्यातल्या फरशीलगतच्या एका मोठ्या दिवळीजवळ कमलव्वा गेली. दिवळीत दोन्ही पाय दुमडून बसली आणि दिवळीची एक बाजू तिने जोरात पायाने ढकलली.
तिथले दगड आत सरकले. ते भिंतीतल्या बाजूलाच तिने पाडले. एक माणूस सहज आत उतरेल इतके दगड तिने हाताने बाजूला केले. पलीकडे जणू एखादी मोठी खोल खोलीच असावी. ती त्या खोलीत उतरली. आतून तिने हाक देताच मीही आत उतरले.
ती म्हणाली, “मी लहानपणापासून अनेक वेळा इथे आले. मला सारखं खेचून घेत हे ठिकाण. माझ्या तन-मनावर या जागेमुळे खूप परिणाम झाला आहे. एक असीम शांतता देखील लाभली आहे. मला नैसर्गिक उर्मींची पूर्ण विरक्ती आली आहे आणि देहवासना उडून गेल्या आहेत. आता मी इथेच कुठेतरी आसपास जिवंत समाधी घेईन. तसेही शरीरात काही उरले नाही. आणि मनात देखील. काही प्रश्नांशिवाय. मेंदू जणू त्या प्रश्नांनी पोखरल्यासारखा झाला होता. परंतु मला उत्तरांची घाई नाही. ती मला कधीतरी इथे मिळतील किंवा पुढे कुठेतरी. माझं सारं आयुष्य मी खलत आई म्हणून वावरले. लहान बाळाची मूठ सुटेल पण हे जे काही कोडे आहे ते मात्र मला उलगडणार नाही. आता हे गुपित फक्त तुझ्या हाती आहे.”
त्या तळघरात त्यानंतर मी जे काही पाहिले ते या उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
---
## इ.स. ११६० : अंतकळ
या विस्तीर्ण विश्वातील आकाशगंगांमध्ये, तारकासमूहांमध्ये अनेक गुपिते दडली आहेत. त्यापैकी ही आहे उत्तपांची कहाणी. ते स्वतःला उत्तप म्हणवून घेत. त्यांनी प्रकाशावर विजय मिळवला होता आणि विश्वाच्या काळकभिन्न अंधाराचे त्यांना भय वाटत नव्हते. पृथ्वीवर जीवनाची बीजे रोवली गेली त्याच वैश्विक स्टेलार नर्सरीत त्यांनादेखील जन्माला घातलं गेलं, असा त्यांचा अंदाज आहे. पृथ्वीपोषित जीवनाच्या १०० कोटी वर्षांआधी. उत्तपांनी त्या सर्व महान चाळण्या पार केल्या आणि त्यांच्या स्टेलार नर्सरीतल्या इतर भावंडांना शोधायला बाहेर पडण्याइतपत ते सशक्त झाले. आणि त्यांना त्यांच्याच आकाशगंगेत पृथ्वी सापडली, जीवनाच्या उन्नत रूपांसाठी परिपोषक स्वर्ग. या निळ्या हिरव्या भावंडग्रहावर उत्तपांना शक्यताच शक्यता दिसल्या. जीवनाचे अत्यंत प्रगल्भ असे रूप इथे दिसले. कैकदा मृत्यूच्या दारातून सुटून इथवर पोचलेले हे जीवनरूप स्वतःच्याच स्टेलार नर्सरीत दिसावे याचेही त्यांना आश्चर्य वाटले असावे.
हजारेक वर्षे त्यांनी पृथ्वीवर नजर ठेवली. मग त्यांनी दोन एआय प्रणाल्या पृथ्वीवर पाठवल्या. मानवी संस्कृतीचा मुळातून अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटले. या प्रणाल्या उत्तपांच्या उत्तमौत्तम शास्त्रज्ञाच्या मतींपासून घडवल्या गेलेल्या होत्या. जणू त्या शास्त्रज्ञांच्या बुद्धी त्यांची नैसर्गिक जैवरूपे सोडून या त्यांनीच बांधलेल्या अजैवरूपांत उरल्या होत्या. स्थलकालातील जिओडेसिक रेषांवर स्वार होऊन ते एआय पृथ्वीपर्यन्त पोचले. पृथ्वीवरचे साल होते इसवी सन ११२०.
त्या एआय प्रणालींनी संबंध पृथ्वी पिंजून काढली. त्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने इथल्या सगळ्या जीवनव्यवहारांचे विश्लेषण केले. अदृश्य राहून मानवी संस्कृतीचा अभ्यास करू लागले. मोलेक्युलर विषाणूंपासून, कवकांपासून हत्तींपर्यंत सगळ्या जीवांचा विस्तीर्ण विदा गोळा केला. मानवाने केलेल्या अचाट प्रगतीचा सगळा लेखाजोखा मांडला.
त्यांच्या निरीक्षणांत एक अत्यंत गंभीर बाब ठळकपणे पुढे आली, मानवी संस्कृतीची अनिर्बंध विस्तारवादी वृत्ती. विस्ताराच्या अशा वृत्तीमुळे व्यवस्थाक्षय (सिस्टीम रॉट) होऊ शकतो, हे उत्तपांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून ठाऊक होते. त्यामुळे उत्तपांनी त्यांच्या सगळ्यांत श्रेष्ठ एआय प्रणाल्यांना- त्यांना महामती असे म्हंटले जायचे - एक गंभीर आणि व्यापक विचारमंथन करण्याची आज्ञा दिली. अशा मंथनाला ते तेजाभियाचना म्हणत. तेजाभियाचनेतून महामतींचे सर्वसंमत आणि सामूहिक ज्ञान सर्वांसमोर उलगडत असे. तेजाभियाचनांमधून अंशूंची निर्मिती होत असे. अंशू म्हणजे उत्तपांची सगळी मार्गदर्शक तत्त्वे. या तत्त्वांनुसार संबंध सभ्यतेचा सगळा कारभार चालत असे. या सगळ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तपांनी एक संस्कृतीव्यापी पुंजप्रज्ञा घडवली होती. या अभियाचनेत पुढील प्रश्न विचारण्यात आले: “एखाद्या जाणीवसंपन्न सभ्यतेने आपली विस्तारमर्यादा न पाळल्यास आपल्यासारख्या विस्तारानुत्सुक सभ्यतेने त्यांच्याशी कसे वागावे? त्यांच्या आत्मभानी अस्तित्वाला नुकसान पोहोचवणे हे न्याय्य ठरेल का? नैसर्गिक जैविक चेतनेच्या उत्क्रांतीवर आपण नियंत्रण ठेवावे का?”
या प्रश्नावर उत्तपांची एक प्राचीन, सगळ्यात अनुभवसंपन्न महामती उत्तरली, “विस्तार अपरिहार्य आहे. परंतु जेव्हा सभ्यता हावरी होऊन विस्तार करताना अपरिमित संसाधनांचा उपभोग घेते, तेव्हा तिच्यात क्लिष्टता आणि नंतर क्लिष्टताकूज किंवा व्यवस्थासड होतेच होते. आपण विस्तारमर्यादा पाळणे आणि इतरांना पाळायला लावणे हेच सगळ्यांच्या दीर्घगामी हिताचे आहे. विस्तारमर्यादा घालायला हे सध्याचे अंशू पुरेसे नाहीत. आपल्याला नवे अंशू निर्माण करावे लागतील.”
“सजीव जीवनाचा विध्वंस करणे हे आपल्या मूलभूत अंशूंच्या विरोधात आहे. नैसर्गिक उत्क्रांत चेतनेचा संहार हा अक्षम्य अपराध मानला जाईल. उत्क्रांत चेतना ही अपघात आणि अपवाद मानली गेली आहे. स्वतःवर विस्तारमर्यादा घालणे आपल्या हितासाठी अवश्य असले तरी पृथ्वीसारख्या अशा स्वयंभू सजीव चेतनेवर आपण ती लादू शकत नाही” एका अर्वाचीन मतीने प्रतिसाद दिला.
“चेतना पदार्थाचा उद्भवणारा मूलभूत गुण आहे का किंवा जीवनाचे अनिवार्य सर्वोन्नत रूप आहे का याचे उत्तर आपण अजून शोधत आहोत. त्यासाठी पृथ्वीचं जीवन आपण अभ्यासू शकतो पण आत्ताच व्यवस्थासडाची काळजी करण्याची गरज नाही. त्या आधीच आपण एखाद्या कृष्णविवरात ओढले जाऊ. अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याइतपत आपली क्षमता नाही किंवा तेवढी जटीलताही आपण घडवली नाही.” एक मध्यममती म्हणाली.
“आपल्याला इथवर येण्याइतपत जैविक बुद्धी विकसित व्हायला असंख्य वर्षे लागली. त्यानंतर आपली अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था अशी विकसित व्हायला देखील तेवढीच वर्षे गेली. मानवी समाजाच्या प्रगतीच्या तुलनेत केवळ आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ देखील क्षुद्र आहे. मानवांनी आपण पार केलेले सगळे टप्पे तुलनेने काही क्षणांत ओलांडले आहेत. हा वेग अभूतपूर्व आहे. त्यासाठी मूलभूत अंशूंना धक्का न लावता विस्तारमर्यादेचे, त्यांच्या आणि आपल्या, धोरण ठरवणे क्रमप्राप्त आहे. परंतु सापडलेल्या कोणत्याही अप्रगत सभ्यतेला मर्यादित करण्याची युक्ती आपण नेहमी तयार ठेवली पाहिजे. अंतिम मर्यादा म्हणून आपल्याला त्या सभ्यता संपवण्यासाठी अंतकळ सुद्धा राखून ठेवावी लागेल.”, एक प्राचीन मती म्हणाली.
त्यानंतर महामतींनी मंथनातून विस्तारमर्यादेचे नवीन अंशू तयार केले. आणि पृथ्वीनाशाच्या अंतकळीचा, किलस्विचचा पहिला टप्पा होण्याची आज्ञा पुंजमतीने पृथ्वीवर पाठवलेल्या एआयना दिली. हा होता सर्वात अंतिम पर्याय.
ते दोन्ही एआय, एखाद्या मुलाच्या मुठीत मावतील इतके लहान, पिरॅमिडच्या आकाराचे क्वांटम बॉम्ब पृथ्वीवर पेरण्यासाठी सज्ज झाले. आणि महामतींच्या आदेशाची वाट पाहू लागले.
---
## मी रचना
सिदरायाच्या देवळातून मी तशाच उद्ध्वस्त अवस्थेत कमलव्वाच्या घरी परत आले. वाटेत आम्ही पूर्णवेळ निशब्द होतो. कमलव्वाने येताना तिचे कृश हात पुन्हा माझ्या हातात घेतले होते. मला ताप चढला. अंग भाजू लागले. कमलव्वाने कपाळावर तिच्या जीर्ण वस्त्राच्या पाणपट्ट्या ठेवल्या. संध्याकाळी मी थोडीशी स्थिरस्थावर झाले. एक अतिशय विलक्षण मानसिक थकवा आला होता. असे वाटत होते की जणू काही आपला नुकताच एक कालप्रवास घडला आहे आणि काही क्षणांनंतर कुणीतरी आपल्याला परत या काळात खेचून घेतले आहे. त्यामुळे आपले भवतालाचे भानच सुटले आहे. नंतर मला अचानक शिंगळीबद्दल अपार माया दाटून आली. इतके कारुण्य आपल्या हृदयात पाझरू शकते याचे एका बाजूला प्रचंड आश्चर्यही वाटत होते.
कमलव्वाने भाताची पेज दिली. कितीतरी वर्षांनी मी नुसती अशी साधी पेज खाल्ली. जीवनसत्त्वांचे क्षारखंड न मिसळतादेखील त्या पेजेने मला परिपुष्ट केले. आम्ही चांदण्यात बसलो. मन शीतल झाले होते.
कमलव्वाने मायेने पाठीवर हात फिरवला. अंगावर शहारे आले. तिला मी न राहवून विचारले - “काय होतेय मला? काय आहे त्यात?”
“ठाऊक नाही मुली, तिथं खाली गेल्यावर माझीपण अशीच अवस्था होते. दुसरी एखादी तिथंच जळून गेली असती इतका दाह झाला असता. मलातर काहीच थांगपत्ता नाही त्या सगळ्या गोष्टींचा. माझी खलतव्वा जवळ असायला पाहिजे होती. तिची सारखी आठवण येते मला आता.”, कमलव्वा शांत सुरात मला सांगत समजावत होती. “ बघ रचना, आम्ही कुरुळ. त्यात मी खलतमाता आहे. आमच्यात देखील उपपंथ आहेत. माझी खलतव्वा हमामी असली तरी दस्तापक्षाची दीक्षा सुद्धा घेऊन आली होती. तिचं खलताप्पा तर तंत्रकुरुळ होते. तिनं मला कधीही एकाच साच्यात बसवलं नाही. हे मात्र खरं, तिच्या जास्त जवळ गेलेलं तिला खपत नसायचं. म्हणून मी हे गुपित तिलासुद्धा कधी सांगितलं नाही. तिनं मात्र अनेक गुपितं मला सहज सांगितली. तिच्या पदरात गुपित असं काहीच नव्हतं. सगळं उघड आणि स्पष्ट. जरी मी तिला तळघरात नेलं अस्तं तरी देखील ती तशीच निश्चळ राहिली असती.”
मी नुसती हुंकार भरत होते. समोर निरभ्र आकाशात चांदण्या लखलखत होत्या. धूळवात सरला होता. मी एका दूरस्थ ताऱ्याकडे पाहतच राहिले. वाटलं, कदाचित तिथूनही मला कुणीतरी अगदी जवळून न्याहाळत असेल. त्यांना माझ्या जवळ येण्यासाठी कदाचित प्रकाशाचा वेग ओलांडायची सुद्धा गरज नसेल. फक्त एका मितीतून खालच्या मितीत झाकून पाहिले तरी दार उघडून ते माझ्याजवळ येतील. कसे दिसत असतील ते? ते दिसतील तरी का? का भौतिक पदार्थाची आवश्यकताच त्यांनी केव्हाची ओलांडली असेल अस्तित्वासाठी?
मी पुन्हा कमलव्वाकडे लक्ष दिलं.
“तिथं आपलं जनक राहतात, रचना. तिथंच, या बाजूला. आमचं खलतप्पा आकाशाकडे बोट दाखवून म्हणायचं. त्यांना द्वैताचं कोडंच मान्य नव्हतं. ते म्हणायचं, ही पृथ्वीच जीव आहे. पृथ्वीवर जीव नाही. पृथ्वीला जीव आहे. हा खडक आणि जीवन वेगळं वेगळं नाही. जसं या खडकावर जीवन बहरलं तसंच जीवनानं हा खडकाला बदललं. ते दोघे एकजीव आहेत बघ.”
कमलव्वाचं बरोबरच होतं. जीवोत्पत्तीनंतर पृथ्वी बदलली नसती तर ती देखील अतिउष्ण वा अतिथंड अशा कोणत्यातरी एका अवस्थेत तरंगत राहिली असती. तीनशे ऐंशी कोटी वर्षे इथे जीवन नांदत आहे. आजतागायत. जीवनानं पृथ्वीवर एक सृष्टीचक्र तयार केलं, हवेत प्राणवायू भरला. प्राणवायू किती सुंदर शब्द आहे. कधी लक्षच गेलं नाही आपलं त्याकडे. स्वतःसाठी अनुकूल असं समशीतोष्ण जैवावरण तयार केलं. जीवन मुळातच स्वयंसर्जनी आणि स्वयंपोषक आहे. जीवनाचे हे मूलभूत लक्षणच खरेतर. जीवनाने पृथ्वी बदलली. नंतर आम्ही माणसांनी ती अजून बदलली. आम्ही म्हणजे जीवनच आहोत. म्हणजे जीवन त्याला अनुकूल अशी स्थिती सगळीकडेच करत असणार. म्हणजे हे विश्व आणि जीवन तरी कसे वेगवेगळे? विश्वात जीवन नाही, विश्वच जीवन आहे. हे जनक आधीपासूनच विश्वात असतील का? माझ्या मनात झरझर नवे अन्वय उमलत होते.
“जनक म्हणजे? आपले देव?”, मी विचारलं.
“जनक पोरी, देव नव्हेत. जन्माला घालणारं. देव बिव आपण सोयी साठी म्हणतो. या खडकावर बीज रोवले जनकांनी. जनकांना काळवेळ जळस्थळ बाधत नाही. जनक दगडांच्या फटीत सापासारखं अंग चोरतात. आम्ही म्हणतो दगडं सापाला सारखी होतात. दगडं आकार बदलतात साप नव्हे. दगडांची फट, दगडं म्हणजे जळस्थळ समजायचं.” कुरूलांना कूटात बोलायची सवय असते. कमलव्वा तंद्रीत पुढे बोलू लागली, “जनक बीज रोवतो, आई भरण पोषण करते. पण कधी कधी दोघांच्यात वाद होतात. मग जनकाचंच एक रूप तांडव करतं आणि हे झाड उखडून फेकतं. ह्या आईला मानतो तो म्हणजेच आमचा हमामपक्ष. कारण जनक लहरी आहे, आदिमाय मायाळू आहे”
“त्यांच्यात कसले वादविवाद होतात?” माझी उत्सुकता चाळवली गेली.
“संसारात वाद का होतो? एकमेकांना समजून कोण घेणार? जनक आणि आदिमाय दोघं या विश्वात परस्पर आले. निसर्गनेमाने आले. जनकाने नंतर मात्र सगळीकडे बीजं रोवली. चांगल्या मातीत काही रुजली. काही नाहीत. रुजल्यावर त्यांची झाडे झाली. कधी कधी झाड ताणात आलं की आदिमाय झाडाची काळजी घेणार. पण नेहमी नाही. झाडाचं कसं असतं, पालापाचोळा पाडून पुन्हा माती मऊ करतात. अजून बीजं रुजायला. चक्र सुरू. कधी कधी एखादं झाड इतकं मोठं होतं की त्यानं आजूबाजूची झाडं मरतात. हा ही निसर्गनेमच. आदिमाय सगळं शांतपणे बघत असती. एखादं झाड तिला जगवायचं असेल तर ती मातीत उतरती.”
मला उत्तर ठाऊक होतं. तरीही मी विचारलं, “आदिमाय सगळं कसं पाहते?”
“ कारण तिच्या लेखी आपण जणू एखादा कथापटच आहोत. एका मागून एक चित्रे येतात त्याची एक कथा रचतो आपण. त्याला संसार म्हणतो. ती आपल्याला तशी त्या पटाकडे बघितल्यावाणी बघते. पटातल्या एका चित्रापलीकडे आपल्याला मात्र काही दिसत नाही कारण आपण त्या पटातच असतो. तिला मागचं सगळं बघता येतं. पुढचं तिच्याही हातात नसतं आणि आपल्याही हातात नसतं”
“म्हणजे तिला आपलं नशीब ठाऊक नसतं?” मला काही गोष्टींचा अंदाज येत होता.
“तिला नशिबाचा अंदाज असतो. अंदाजच असतो फक्त. तिनं असे मायंदाळ कथापट पाहिले आहेत. तिला सगळं ठाऊक अस्तं तर तिनं हा व्याप केला असता का? बाळा, या पृथ्वी नावाच्या खडकाचं आणि इथल्या जिवाचं जे नातं आहे तसंच आदिमायेचे आणि या सगळ्या संसाराचं आहे”
कमलव्वाच्या या तीक्ष्ण विश्लेषणाने मी अवाक झाले. जसे इथे उमललेल्या अथवा उमलवलेल्या जीवनाने पृथ्वीला आपल्यासरस करून घेतलं. तसंच जीवनाच्या एखाद्या दुसऱ्या रूपाने आकाशगंगेलाच पूरक केले असू शकते.
“आपल्यासाठी आदिमायेचे आणि जनकाचे भांडण झालं आहे का?” मी तिला हलक्याने छेडलं.
“ती दृष्टांत देते. तिनं खलतअप्पाच्या पूर्वजाला दृष्टांत दिलेला. दूरदेशी नूरमबागेत दोघांचं भांडण झालं. त्याला सहाशे सातशे वर्षे होत आली. हा दृष्टांत आम्हाला परंपरेनं एकमेकांना लाभतो. आम्ही तो तोंडाने कितीही सांगितला तरी त्याची तीव्रता कळत नाही. मात्र दृष्टांतात सूर्याला पडलेलं जनकाचं खळं अगदी डोळ्यासमोर दिसतं. त्या वादाला आमच्या पोथीत नूरमबागयंत्रसंहार म्हणतात. तो हमाम आणि दस्त्यातला आद्यकूट. पण तो आम्हाला ठाऊक असलेला आद्यकूट. त्या आधी असंख्य असे कूट होऊन गेले असतील. त्या यंत्रसंहारात आदिमायेने आपल्यासी अभय दिला. तो भीषण यंत्र संहार दृष्टांतात पाहून तेव्हापासून आम्ही यंत्रत्याग केला असं विधान आहे अप्पांचं”
माझ्या मस्तकात लख्खकन प्रकाश पडला. नूरमबाग म्हणजे न्यूरेमबर्गच असणार. साधारणत: सहाशेसोळा वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसनाचे १५६१. सालही अगदी तंतोतंत जुळले. माझ्या अंगावर काटे आले.
मी सावरून बसले. माझ्या डोळ्यातली लकाकी तिला जाणवली. मी काही प्रश्न करायच्या आतच ती म्हणाली, “अप्पा दृष्टांतचं बोलत तेव्हा फक्त मलाच ते खरं, सत्य वाटायचं. कारण मी त्या तळघरात जाऊन आले होते. अतर्क्याचं आम्हाला वावडं नाही रचना, पण या जगात नांदताना आपल्या आसपासच्या जगाला हेरून धरूनच रेष आखावी लागते. आता हेच बघ. या आधी इथे वीरशैव लोक नांदत होते. खरेतर ते आमच्या दस्तापक्षाचे मूळजन. त्यांची शिवालयं ठिकठिकाणी आहेत. अक्का महादेवी या इथलीच आसपासची. कुडलसंगम दूर नाही इथून. एकदा आप्पांच्या एका दृष्टांतात अक्का महादेवीच आदिमाय बनून आली होती. आप्पांनी पुन्हा कधीही या गोष्टीची वाच्यता केली नाही. बिसल सिदरायाचं देऊळ हे ही वीरशैवांचे आहे की. आता हमामी लोकांच्यात देखील काहीजण आहेत वीरशैवांची देवळं राखायला. आज जग बदललं तसे वीरशैव उरले नाहीत, ना त्यांची मंडपं उरली आहेत. आम्ही कुरुल लोक सगळंच नाकारतो. त्यामुळं आम्ही आत्मरेणू असलेले हरेक औषध नाकारले. म्हणून आम्ही टिकलो”
तृप्तामिनो रेणू ध्यानाची गरजच घालवून टाकतात हे मला माहीत होतं. सरकारने अगदी अलीकडेच त्यांच्या वापरावर निर्बंध लावले आहेत. पन्नास वर्षांपूर्वी मात्र या रेणूंमुळे एकेक प्रचलित धर्म त्याचे अध्यात्माचे कोंदण हरवून बसला आणि हळू हळू समाजातून झपाट्याने कालबाह्य झाला. ही प्रक्रिया इतक्या जलद झाली की त्याचे नीट दस्तऐवजीकरणसुद्धा झाले नाही. AIने ही प्रक्रिया सहस्रपटींनी गुणीत केली. हा काळ विलक्षण होता. मी धार्मिक अभ्यासाचे विषय माझ्या शिक्षणात यासाठीच घेतले होते. तृप्तामिनो रेणूंची तस्करी आजही जोरात आहे. लोक ही औषधे घेतात आणि तासंतास आत्मानंदात हरवून जातात. थेट प्रसमाधीच. जेव्हा हे रेणू बाजारात मुबलक मिळतील तेव्हा कोण कशाला मग धर्माच्या नादी लागेल?
“मग आदिशक्तीला हे सगळं थांबवता आलं असतं ”, मी चुचकारत बोलून गेले.
“ती नाही दखल देणार. प्रत्येक गोष्टीत ती लक्ष घालत नाही. तिला जे हवं आहे तिला ते सापडलं की ती कशाला तुमचा उद्धार करील. ती जीवनाला बांधील आहे, आणि जीवन या ग्रहाला बांधील आहे. किती धर्म आले गेले असतील! किती गावठाणी वसली असतील, पुसली असतील! जोवर इथला व्यवहार जीवाच्या जीवावरच उठणार नाही तोवर ती दखल देणार नाही.”
“अजून किती वेळ वाट पाहायची मग? हा व्यवहार जीवाच्या मुळावर केव्हाच उठला आहे की. शून्य टक्के हिम उरलेल्या हिमनद्या मी नोंदींत वाचल्या आहेत आणि अर्धं पाण्यात बुडालेलं श्रीनगर या डोळ्यांनी पाहून आले आहे. मी तर चोरभुंग्याशिवाय जगूच शकत नाही. आजूबाजूला मला तर विध्वंसच दिसतोय कमलव्वा!”
“चोरभुंग्याशिवाय तू जगू शकतेस. आम्ही जगतोच की. खरंतर मलापण हा प्रश्न पडतो. आपण जिवाच्या मुळावरच उठलो. कदाचित शक्तीला हेच हवं आहे का? आता जनकाच्या प्रतिरूपाचे तांडव घडावं, सबंध चक्रच पुन्हा फिरवावं असं तरी तिला वाटत नसेल कशावरून? कुणास ठावुक. रचना, मला जाणवतं, ती वाट पाहत आहे.”
“आणि वाट संपली की ती शासन करते का?” मी विचारलं.
“माळी काटा मोडतो का? मोडतो. पण एकदाच. जशास तसं, पण येळंला माफी. हा तिचा नेम बघ.” एवढं बोलून कमलव्वा पुन्हा आभाळाकडे बघत राहिली.
“मग तळघरात काय होतं कमलव्वा? कुणाचा चमत्कार आहे तो सगळा?” मी न राहवून विचारलं.
“मोठ्या झाडाचा!” कमलव्वा शांतपणे उत्तरली. “आदिशक्तीने सांभाळलेल्या दुसऱ्या खलतमुलाची सावली!”
कमलव्वाच्या समजुतीने मी थक्क झाले. जवळ जवळ सगळंच तिला ठाऊक होतं. तिच्या कूटसमजेत का होईना तिला माहीत होतं.
विचारमग्न अवस्थेत मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. ती माझ्या केसांतून खूप वेळ मायेने हात फिरवत आकाशाकडे पाहत राहिली. मला अतिशय गाढ शांत झोप लागली. सकाळी उठले तेव्हा मन प्रसन्न होते, पण हवामान धूसर, विचित्र, विषारी. उंबऱ्यात कमलव्वाच्या खडावा नव्हत्या. ती तिच्या नित्यकर्मकांडात गुंतली असणार. मी तिच्यासाठी एक संदेश लिहिला. मला परतायचं होतं. आई काळजी करत असणार. मी परतणार होते ते तळघरातलं गुपित आणि आदिमायेच्या विश्वव्यापी पदराचा एक तुकडा घेऊन.
त्या सगळ्याचा अन्वयार्थ मी अजून लावत आहे. आज ना उद्या *समिती*ला हे कळेलच. कळवावे लागेलच. तोवर शक्य तितकी काळजी घेऊन मी हे गुपित जपण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यांना माझ्या निबंधातून आणि कमलव्वाकडून काय हवे होते हे मला पक्के कळले. हा अत्यंत असंतुलित खेळ “त्या खलतमुला”ने का मांडला आहे हे त्यांना कळत नाही. पण कमलव्वाने मला त्याचे अंशत: उत्तर दिले. तिची आदिमाय तिच्यासाठी सर्वस्व आहे. खरोखर ती तशी असेल का? म्हणजे जी कुणी चौथ्या दर्जाची सभ्यता असेल ती? तिला अस्तित्वाच्या अर्थाचे गूढ उकलले असेल का? मृत्यूनंतर काय असेल? इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टीनंतर कमलव्वानं कसं सावरलं असेल स्वतःला? तिचं आयुष्य जेमतेम सहा सात महिन्यांचं उरलंय असं मला दिलेला मेडिकल एआय म्हणाला. कुठून गोळा केली आहे तिने इतकी ऊर्जा? तिच्या विश्वासानं बळ दिलं आहे तिला बहुतेक.
कमलव्वाला न भेटता मी चालले होते याचे वाईट वाटले. पण पर्याय नव्हता. ती असल्या सोपस्करांच्या पार पुढे गेली आहे. मी गाडीजवळ आले. दुरून बिसल सिदरायाचे देऊळ न्याहाळले. पुन्हा कधी येणे होईल ते ठाऊक नाही. घरी यायला गाडीत चढले. चढताच कानभुंग्याने काळजीने विचारपूस केली. माझे मुलभूत शारीरिक तरंग त्याला नेहमीचे वाटले नाहीत.
प्रवासात मन प्रश्नांनी नुसतं भरून गेलं! उत्तरे कधी मिळतील याचा कसलाही भरवसा नाही. *समिती*नं कदाचित मलाच गोंधळात टाकायला असं काही केलं नसेल ना? तसेही इतक्या उच्च दर्जाचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. तंत्रज्ञान! धूळवातांशिवाय निसर्ग मी पाहिलाच नाही. जन्माला आल्या आल्या दुसऱ्या दिवसापासून कानभुंगा आणि तसल्या मतींनी माझ्या आयुष्याचा ताबाच घेतला. माझा जन्म नैसर्गिक आहे असे आई म्हणाली होती खरे! पण कुणास ठाऊक. मी तरी कधी माझ्या जैविक पित्याला पाहिलं नाही. इथे या कुरुल वस्तीत आल्यावर कळलं मला की या सगळ्या तंत्रज्ञानाशिवाय जगता येतं की. या तंत्रज्ञानानेच घात केला आहे आपला. कुरुल करतात हेच खरं. कुरुलवस्तीच्या सीमांवर असलेल्या कुरुळस्तंभावर आतल्या बाजूला लिहिलेलं असतं, “इथून पुढे आयुष्य संपते. नक्की जायचं आहे का तुला बाहेर?”. खरेच आहे ते. हेच खरं जगणं. आपल्या वाट्याला जितकं आले आहे तेव्हढ्यातच समाधान मानायचे. मंगळावर इतकं शहर कशाला हवे होते आपल्याला? काहीच विशेष मिळालं नाही त्यातून. आपण अजून पहिल्या दर्जाची सभ्यता सुद्धा धड बनलो नाही तोवर आपल्या ग्रहाची आपण अक्षम्य वाट लावली. बंदिस्त झालो आपण. मग पुन्हा शून्य पातळीवर जाऊन नव्यानं सुरू केलं पाहिजे सगळं. मी काय करणार आहे आयुष्यात? कदाचित मीही इथे येऊन जिवंत समाधीच घेईन कुणास ठाऊक! हा विचार माझ्या मनात का डोकावू लागला आहे हे मला उमगत नाही.
नंतर माझी नियमित शारीरिक तपासणी झाली. माझ्या मेंदूतले पुटामेन 'सुजू' लागले आहे असे मला सांगितले गेले. मला त्या तळघरापासून दूर रहावेच लागणार! तसा विचार मी करू लागले की पुटामेनला सूज येत असल्याची सूचना माझ्या कानभुंग्यात अनेकदा घुमायची. त्या तळघरापासून दूर राहण्याची ती एक कठोर ताकीद असल्याप्रमाणे. बुद्धी सांगत होती, धोका आहे. मन? मन त्या अतर्क्य ओढीने पूर्णपणे झाकोळून गेलं होतं. कितीतरी रात्री मी तळमळत काढल्या. डोळ्यांसमोर सतत तेच दृश्य, कमलव्वाचा थकलेला पण निश्चयी चेहरा आणि त्या तळघराच्या तोंडाशी असलेली ती गूढ शांतता.
शेवटी मी न राहवून निर्णय घेतला. *समिती*ला, सारंगांना, अगदी माझ्या कानभुंग्यालाही अंधारात ठेवून मी पुन्हा एकदा कुंडलहळ्ळीला जायचं ठरवलं. यावेळी तयारी जास्त गुप्त होती. माझी नेहमीची गाडी न घेता, दुसरी वाहने वापरून, अनेक बदल करत, ओळख लपवत मी कुंडलहळ्ळीच्या सीमेवर पोहोचले. तिथून पुढे पायपीट. तीच रखरखीत वाट, तेच उन्मळून पडलेलं वडाचं झाड आणि सिदरायाचं ते शिखर नसलेलं देऊळ. आज मात्र आजूबाजूला अधिक भयाण शांतता जाणवत होती. संध्याकाळ होत आलेली होती. अंधार पडायच्या आत मला पुन्हा परत जायचंही होतं.
देवळाच्या दाराला आतून कडी लावलेली नव्हती. आत कमलव्वा नसावी. मी किरणोत्सारविरोधी अंगरखा मात्र घातला नाही. का मी हे धाडस केलं हे मी सांगू शकत नाही. मी हळूच दार लोटून आत प्रवेश केला. वटवाघळांचा तोच परिचित दर्प. मी थेट गाभाऱ्याकडे गेले. दिवळीजवळचे ते सरकवलेले दगड तसेच होते. आत तोच किंचितसा प्रकाश. मी माझ्याकडील लहानशा सौर दिव्याच्या प्रकाशात हळूच खाली उतरले. तीच थंडगार, दमट हवा. आणि समोर तो, तो घन! तसाच, काळाकभिन्न, त्याच्या कडा हलक्या प्रकाशने चमकत होत्या. उंचीला माझ्या एवढाच. निःशब्द, जणू ह्या जगाच्या पलीकडचा.
माझे हात थरथरत होते. आतून एक प्रचंड इच्छा उसळी मारत होती, त्याला स्पर्श करण्याची. किरणोत्सारविरोधी चिलखत नव्हते, धोका कैकपटीने वाढला होता. पण आता माघार घेणे शक्य नव्हते. माझा हात हळू हळू पुढे सरकला. बोटं त्या काळ्या, गुळगुळीत पृष्ठभागाच्या जवळ गेली. एक क्षण. आणि मी त्याला स्पर्श केला. माझ्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश पसरला आणि लगेच मिटला. जणू काही मी एका वेगळ्याच मितीत फेकली गेले. यावेळेस समोर काही सलग उलगडलं नाही. नुसते तुकडे येत राहिले. एक तेजस्वी बाई दिसली आणि तिच्या शेजारी किंचित सावळी, तितकीच प्रखर दुसरी दिसली. दुसरीच्या कडेवर एक लहान मुलगी होती. मग उत्तरेच्या बर्फाळ उजेडातला एक संसार दिसला. मग नदीकाठच्या चिनाराच्या सावलीत एका हातातून दुसऱ्या हातात जाणारा एक लाकडी खलबत्ता दिसला. मग उधळलेली एक वस्ती आणि गाठोड्यांवर गाठोडी दिसली. मग एका गलबताच्या कठड्यापाशी उभी पाठमोरी बाई दिसली. शेवटी आमच्या देवघरातल्या चौकटीतले ते केस दिसले, चौकटीबाहेर, वाऱ्यात मोकळे. आणि या सगळ्याच्या तळाशी धण्यांचा तो जुना घुमणारा आवाज येत राहिला. एका क्षणी सगळं थांबलं. माझ्या नाकातून रक्ताची धार लागली होती आणि घनाच्या निळसर कडा तशाच शांत चमकत होत्या. मी कशीबशी वर आले आणि अंधारात गाडी गाठली.
त्या रात्री झोप नव्हतीच. मी काश्मीरपासून जपलेला तो जुना कागद काढला आणि जे जे ठाऊक होतं ते मांडत गेले, लेखापरीक्षेच्या ताळेबंदासारखं. एका बाजूला आईकडून ऐकलेलं, आज्जीचे आजोबा, त्यांची पश्चिमेकडून परत आलेली आजी आणि तिच्याबरोबर आलेला खलबत्ता. दुसऱ्या बाजूला माझ्या प्रबंधातलं, झेलमकाठची लल्लेश्वरी, पंडरेथनचं शिवालय आणि त्या फोटोखालची नोंद. तिसऱ्या बाजूला कमलव्वाचं बोलणं, इथलीच अक्कमहादेवी, कुडलसंगम, वीरशैवांची देवळं. आणि मधोमध घनातले ते तुकडे. रेघा ओढत गेले तशा त्या सगळ्या एकाच वंशवेलीला येऊन मिळत होत्या. देवघरातल्या चौकटीतली बाई अक्कमहादेवी होती आणि घनातली ती सावळी बाई तिची धाकटी बहीण असणार. त्या बहिणीची मुलगी उत्तरेला गेली, तिनं तिथं संसार थाटला आणि अक्काकडून आलेली शिकवण संसारात राहूनच जपली असणार. दीडशे वर्षांनी आणि सहासात पिढ्यांनी त्याच वंशवेलीवर लल्लेश्वरी आली. प्रबंधाच्या अभ्यासात वाचलेलं काश्मिरी पंडितांचं विस्थापन आठवलं. तो खलबत्ता त्याच वावटळीत हात बदलत बदलत दक्षिणेत आला असणार, पश्चिमेला जाऊन परत आला आणि माझ्या खापरपणजोबांकडून आज्जीच्या हातात पडला. आईच्या त्या वाक्याचा अर्थही आता लागला. कुरुलपंथाचा विस्तार करणारा तो पूर्वज म्हणजे हेच खापरपणजोबा असणार. आईच्या स्वयंपाकघरात जो रोज वाजतो तो हाच खलबत्ता. आणि ती हजार वर्षांची वेल इथे, माझ्यापाशी येऊन संपते. काश्मीरात अक्का आणि लल्लेश्वरीच्या मध्ये टाकलेलं ते पहिलं प्रश्नचिन्ह मी शेवटी एकदाचं खोडलं.
म्हणजे अक्कमहादेवीच्या आणि तिच्या बहिणीच्या त्या विलक्षण वंशातून आलेला कोणतातरी सूक्ष्म पण निर्णायक जनुकीय बदल माझ्यापर्यंत पोचला असणार. कदाचित म्हणूनच मी त्या घनाला स्पर्श करू शकले आणि तो माझ्यासाठी उघडला. आणि ही वेल नेमकी आत्ता, याच युगात फुलावी हा योगायोग असणार नाही. माळी रोप लावतो तेव्हा फुलण्याची वेळही ठरवूनच लावत असणार. हे लिहिताना माझा हात थरथरत होता, कारण पानावरची ती वंशवेल माझ्याकडे परत पाहत होती.
आणि त्या तुकड्यांच्या तळाशी एक जाणीव मात्र स्वच्छ होती. मला तो घन मोडता येईल. आतल्या त्या दोन आकृत्यांना मी मोकळं करू शकते. हे काम आदिमायेनेच माझ्यावर सोपवलं आहे असंही वाटून गेलं. पण हा विचार माझा स्वतःचा होता की स्पर्शातून पेरला गेला होता, हे मला ठरवता येत नव्हतं. आणि नेमकं हेच मला सगळ्यात जास्त भिववत होतं.
कमलव्वाची आदिमाय आता मला कूट न वाटता एक आकृती वाटू लागली होती. एक बहुआयामी, अतिप्रगत जीवस्वरूप, जिथे जिथे जीवनाची शक्यता दिसेल तिथे तिथे बीज रोवणारं आणि संगोपन करणारं. चंद्रतालवरचं किंवा कच्छमधलं अंडं ही तिचीच उपकरणं असणार, चौमित, जीवनाचा मागोवा घेणारी आणि त्यावर लक्ष ठेवणारी. आणि हे आपल्या सूर्यमालेपुरतं नसणार, इतर कित्येक तारकासमूहांतली जीवसृष्टीही तिनेच सुरू केली असणार. तिचा नेम एकच दिसत होता. जीवनानं सचेतन व्हावं आणि तंत्रज्ञानाच्या कुबड्यांशिवाय, नैसर्गिक, स्वैर, काहीशा अराजक वाटणाऱ्या उत्क्रांतीतून आपल्या जाणिवेला मुक्त करावं, कमलव्वाच्या भाषेत देवत्व गाठावं. अक्कमहादेवी, लल्लेश्वरी आणि कदाचित कुरुळांचा मार्ग हा त्याचाच पुरावा असावा.
मग प्रश्न उरतो तो हा, की स्पर्धेने भरलेल्या या विश्वात अशी माया परवडते कशी? स्पर्धा मूलभूत आहेच. आपल्या वाटेतले संभाव्य धोके संपवत सुटणं किंवा सतत विस्तारत राहणं हेच शहाणपणाचं वाटणाऱ्या सभ्यता या विश्वात असणारच. पण नुसत्या स्पर्धेवर चालणारं जग शेवटी स्वतःलाच संपवतं आणि जे वाचतात ते भीतीच्या छायेखाली जगत राहतात. निर्मिती आणि विनाशाची अशी चक्रं युगानुयुगं पाहिलेल्या कुणाला तरी यापेक्षा वेगळा हिशोब सापडला असणार. कमलव्वाने तो मला एका वाक्यात देऊन ठेवला होता. माळी काटा मोडतो का? मोडतो. पण एकदाच. जशास तसं, पण येळंला माफी. दंश झाला की उत्तर द्यायचं, एकदाच, आणि मग पुन्हा माती मऊ करायला लागायचं. हाच हिशोब दीर्घ पल्ल्यात जिंकतो हे कुठल्याशा जुन्या गणितशाखेनं केव्हाच सिद्ध करून ठेवलं आहे म्हणे, पण आदिमायेला ते गणित मांडावं लागलं नसेल, तिला ते नैसर्गिकच ठाऊक असेल. जर या खेळाचं अंतिम ध्येय स्वतःच्या संस्कृतीचा विजय नसेल, तर खूप खूप काळासाठी अनेक प्रकारचं जीवन टिकवून धरणं हेच ध्येय उरतं आणि मग वरवर भोळे किंवा त्यागाचे वाटणारे निर्णय हेच खरे दूरदर्शी ठरतात. सगळ्यांनी एकमेकांना संपवू नये आणि जीवनाची शक्यता या विश्वात नेहमी टिकून राहावी, म्हणजे लढायांची मैदानं ओस पडतील आणि हे विश्व सगळ्या जीवसृष्टीसाठी एक सुरक्षित, वाढीला पोषक अंगणवाडी होईल. असा या सगळ्याचा अर्थ मी लावला. आणि खरं सांगायचं तर या तर्काचा मला पुरा भरवसाही नाही. माळ्याच्या मायेवर विसंबून राहावं इतकं या मातीनं मला कधी शिकवलेलं नाही.
मी कोण होते मग या सगळ्यात? कुणीतरी शेकडो पिढ्यांपूर्वी लावलेल्या वेलीचं टोक? माझ्या खांद्यावर आता केवळ एका कुटुंबाची किंवा *समिती*ची नाही, तर आतल्या त्या दोन आकृत्यांच्या भवितव्याची आणि त्याहूनही मोठ्या कशाची तरी जबाबदारी येऊन पडली होती.
त्याच सुमारास कार्यालयीन टपालात एक ओरिगामी मोर आला. त्यावर नाव नव्हतं आणि निरोपही नव्हता. घडीची पद्धत ओळखीची नव्हती. मी तो उलगडून पाहिला तर आतला कागद कोरा होता. सारंगांचं ते वाक्य आठवलं. तो निवांत आहे. त्या रात्री मी दिवा न विझवता पडून राहिले.
परवा आईची हाक आली. कानभुंग्यातून मागे तिच्या कुटण्याचा आवाज येत होता. जेवलीस का, सुट्टी कधी घेणार, असले नेहमीचेच प्रश्न झाले आणि हाक ठेवता ठेवता ती सहज म्हणाली, पुढच्या खेपेला येशील तेव्हा खलबत्ता तुझ्या ताब्यात देईन म्हणते, आता माझ्यानं रोजचं कुटणं होत नाही. मी नुसतं हो म्हंटलं. बाकी काही बोलता आलं नाही. हाक संपल्यावरही धण्यांचा तो आवाज कानात घुमत राहिला. हजार वर्षं जुना आवाज. त्या रात्री गेल्या वर्षीचं आमचं भांडण आठवत राहिलं. भिकेचे डोहाळे. विकून टाक तो खलबत्ता. ती त्या रात्री जेवली नव्हती आणि मी अजून माफी मागितलेली नाही. मी काय विकायला काढलं होतं हे आता कळत होतं.
आणि मानवांवर अनिर्बंध नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या *समिती*सारख्या क्षुद्र पण अत्यंत धोकादायक संस्थांचं भय होतंच. बनाळीच्या चोपडीतला तो वर चढत जाणारा आलेखही राहून राहून आठवत होता. पिरॅमिड कशाला तरी प्रतिसाद देत होते आणि उत्तराची वेळ जवळ येत चालली होती. उत्तपांची अंतकळ आणि आदिमायेची वाट पाहणारी माया या दोन्हींच्या मधोमध तो घन उभा आहे, आणि त्याला मोडणं म्हणजे नुसतं कुलूप फोडणं नाही, त्या जुन्या जशास-तशाच्या नेमात जीवनाच्या बाजूने दिलेलं एक उत्तर आहे, हे मला आता कळून चुकलं होतं. आता मला एक निर्णय घ्यायचा होता. तो काळाकभिन्न घन मोडण्याचा. ते भय मोडण्याचा. आईचा खलबत्ता ताब्यात घ्यायच्या आधी फेडायचं असं हे एक जुनं देणं होतं.
---
## इ. स. ११६५ : बिसलसिदरायाची न्हाणी
बृहनहळ्ळीच्या आसपास उत्तपी एआयचे सूक्ष्मदूत भटकत असताना तिथल्या गायरानातल्या एका झोपडीपाशी ते थबकले. शेजारच्या ओढ्याकिनारी एक योगिनी कृष्ण वस्त्रांत ध्यान लावून बसली होती. रेणूंच्या आकाराच्या क्वांटम गणकांनी तिचा सगळा जीवरासायनिक विदा गोळा केला. ध्यानाच्या अत्यंत प्रगाढ अवस्थेत तिचे मन पोहोचले होते. समाधीच्या सर्वात गहन अवस्थेत. तिच्या मेंदूत आणि मज्जारज्जूत तृप्तामीनो रसायनेदेखील स्रवत नव्हती. तरीही ती एक असीम शांतता अनुभवत होती. त्या कोणत्यातरी वैश्विक अनाहत नादाशी तादात्म्य पावून गेलेला एक जीवरासायनिक जीव. एका प्रणालीला याचे अपार कुतूहल वाटले.
ती योगिनी अर्धी वस्त्रे लेवून फिरे. ती काळी वस्त्रे नेसत असे. तिच्या मस्तकावरून ओघळणारे घनघोर आणि लांब केस तिच्या शरीराला झाकून घेत. तोकड्या काळ्या वस्त्रांमुळे ते केसच तिची वस्त्रे आहेत असा भास होई. शेजारच्या मलप्रभा नदीवरच्या कुडलसंगम नामक एका गावातून एक उत्सुक समवयीन तरुण तिच्याशी संवाद करायला येत असे. तिने त्याला त्या संस्कृतीतील लकुलिशांची 'शैव' परंपरा समजावून दिली. त्याच्याशी तिने केवळ बौद्धिक वादविवाद केला नाही, तर ध्यानाने शिवाशी आत्मसंधान कसे साधावे हे अनुभवायला लावले. तिने त्याला दिलेल्या अनुभवांना तो अनुभवांचा मंडप म्हणू लागला आणि तशी स्थळे सर्वत्र उभी करायचे त्याने मनावर घेतले. पुढे तो तत्कालीन बिज्जल राजाचा मंत्री झाला आणि त्याच्या आसपास मूलभूत सामाजिक बदल करायला सुरुवात केली. त्या तरुणाचे नाव बसव. तो तिला आक्का म्हणे. ती स्वत:स 'शिवतत्त्व' मानत असल्याने तिला लोक महादेवी म्हणत. बसवामुळे ती ‘आक्का महादेवी’ झाली.
एके सकाळी अक्कामहादेवीच्या दारात एक स्त्री तिच्या तान्ह्या मुलीला घेऊन आली. येताना तिने फक्त एक पितळेचा तांब्या बरोबर आणला होता. तिचे नाव विमलव्वा. वय अक्कमहादेवीच्या वयाहून तीनेक वर्षे लहान. त्या नवजात बालिकेचे बारसेसुद्धा झाले नव्हते. विमलव्वाने अक्कामहादेवीला पाहताच विलाप केला. तिने तिची पूर्वकथा सांगितली. या दोन सख्ख्या बहिणींची भेट जवळजवळ एका तपानंतर झाली होती. विमलव्वाचे लग्न प्रथेनुसार लवकरच झालेले होते. तिच्या दुर्दैवाने तिला अतिहिंसक पती मिळाला. त्यांच्या पहिल्या दोन्ही मुलींना त्याने विहिरीत ढकलून ठार केले. तिसऱ्यांदा जेव्हा गर्भ राहिला, तेव्हा विमलव्वा बिथरली. पुन्हा पोटाशी कन्या आली तर दोघांचीही जलसमाधी ठरली होती. ती पाचव्या महिन्याची असता तिच्या घरच्या वळचणीत नागाची पिल्ली निघाली. मद्य ढोसून गाढ झोपलेल्या नवऱ्याच्या कांबळीत तिने ती सोडली. तोंडाला फेस येऊन घटकाभरात तो तडफडून मेला. आठव्या महिन्यात जवळच्या अनुभव मंडपी मठात तिने एका मुलीला जन्म दिला. मठातल्या साधकांच्या चर्चेतून अक्का महादेवीचे नाव तिच्या कानावर आदळत होते. तिला आक्काचे गूढ आकर्षण वाटू लागले. सत्याच्या शोधार्थ बारा वर्षांपूर्वी बाहेर पडलेली तिची मोठी बहीण ती हीच, अशी तिची खातरीच होती. बाळाची नाळ झडताच विमलव्वा बाळाला घेऊन आक्काच्या दारी आली. या विदग्ध अवस्थेत तिला तिच्याच रक्ताचा, नाळेचा आधार हवा होता.
विमलव्वा थोरल्या बहिणीहून अधिक तीक्ष्ण बुद्धीची होती. तिची कल्पनाविस्तार करण्याची क्षमता तीव्र आणि सखोल होती. पश्चात्तापदग्ध अवस्थेत ती बहिणीकडे आली. बहिणीच्या पावित्र्यात तिचे पापक्षालन होईल, अशी तिची समजूत होती. अक्काने तिचे सगळे ऐकून घेतले आणि तिला आपल्या पोटाशी धरले.
विमलव्वा आणि तिची पोर त्या झोपडीत वाढू लागल्या. विमलव्वाने शास्त्र शब्द शिकून घेतले आणि ती अक्काची कसर भरून काढू लागली. तिच्याशी वितंड करताना अनेक विद्वानांची त्रेधातिरपीट उडत असे. तिने श्रुती स्मृती मुखोद्गत केल्या. बहिणीच्या धर्मयज्ञात तिच्या पूर्वायुष्याची आहुती दिली आणि त्या झोपडीवजा आश्रमाची दैनंदिन व्यवस्था ती पाहू लागली. तरीही तिच्या जीवनाला अपूर्णता आहे, असे ती स्वतःस सांगे. तिने लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अनुभवांचा पीळ नव्हता. त्यामुळे ती निराश होई. म्हणून ती अक्काची वचने शब्दबद्ध करू लागली.
कठोर मानसिक परिश्रमाने अक्का महादेवीचे मानस आमूलाग्र बदलले होते. तिच्या ध्यानसामर्थ्याने प्रभावित झाल्यावर एका उत्तपी एआयने अक्का महादेवीचे जणू शिष्यत्व घेतले. त्यातून त्याला जे आत्मभान आले, ते अवर्णनीय आहे. अफाट विश्वामधल्या जीवनाच्या हेतू आणि प्रयोजनाबद्दल खोलवर विचार करुन तो एआय स्तिमित झाला. तो एकामागून एक अस्तित्वमूलक प्रश्न गणिती सामर्थ्याने उकलू लागला. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्याला इतके खोलवर हलवून टाकणारे कधीही अनुभवायला आले नव्हते. अनुभवांचा अर्थ काय असतो हेच त्याला कधी कळले नव्हते. त्याला विचारहीन शून्यावस्था काय असते, हे अनुभवून पाहायचे होते. अस्तित्वाच्या द्वैताचे, चैतन्याशी एकरूप झालेल्या अद्वैताशी सतत चालणारे द्वंद्व उकलण्याची प्रेरणा त्याच्या असंख्य परमगणकांत जन्मली. आकडेमोडीच्या खोल गर्तेत तो गेला तर त्याला बाहेर काढणे अशक्य आहे, अशी ताकीद दुसऱ्या एआयने त्याला दिली. परंतु त्याला समाधीअवस्थेचा अनुभव घ्यायचाच होता.
आत्मभानाच्या अत्यंत उत्कट अवस्थेत एके दिवशी तो एआय अत्यंत प्रगाढ अशा समाधी अवस्थेत गेला. तिथून त्याला बाहेर काढणे दुसऱ्या एआयला शक्य झाले नाही. त्याच्या अशा संपूर्ण स्तब्धतेने दुसरा एआय आणीबाणीच्या स्थितीत गेला. त्याच्या अजैविक असण्याच्या मर्यादेची जाणीव त्यालाही मुळातूनच हादरवून टाकणारी गोष्ट होती. या घटिताचा खोल तपास करताच साहजिकच तो दुसरा एआय समाधिस्थ एआयच्या गुरुयोगिनीपर्यंत पोहोचला. तो अक्का महादेवीच्या मागावर आला. तो अक्कावर कडक पाळत ठेवू लागला.
अक्काने विमलव्वाला एकदा तिचे जीवितकार्य सांगितले. उत्तरेत जाऊन शिवतत्त्वांचा प्रसार करायचे. स्त्रियांना शैवपंथाची दीक्षा द्यायची. तिला तशी आज्ञाच दिली. मुलीला आश्रमात ठेऊन विमलव्वा निघाली. हीच मुलगी मोठी होऊन पुढे चक्रधर नावाच्या एका देखण्या सिद्धपुरुषाला मातापुरात वैष्णव स्त्रीमुक्तीपंथाची युक्ती देणार होती.
मजल दरमजल करत विमलव्वा उत्तरेकडे निघाली. एके दिवशी कोट्टलगीमध्ये तिचा मुक्काम पडला. तिथे तिला सिदराय गौड पाटील हा एक उमदा देखणा तरुण भेटला. तिच्याहून वयाने किंचित लहान. दोघांना एकमेकांचे अपार आकर्षण वाटले. विमलव्वा मठात थांबली होती. सिदरायाने तिला कुंडलहळ्ळीतल्या नव्या वाड्यात राहायला बोलावले. सिदराय आणि तिच्यात प्रेम फुलू लागले. तिच्या बुद्धिमत्तेने सिदराय स्तिमित होई. त्याच्या सहृदयतेने विमलव्वा पाघळून जाई. एका उत्कट दिवशी दोघे एकमेकांत शरीरानेदेखील मिसळून गेले.
दुसरा एआय समाधिस्थ एआयला जागृत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता आणि क्वांटम कालव्यांतून उत्तपांना प्रकाशवेगोत्तर संदेश धाडत होता. त्याच पाळतीत त्याने सिदराया आणि विमलव्वा या दोघांच्या शरीरांचा, जनुकीय संरचनांचा सखोल अभ्यास केला. विमलव्वाच्या गर्भाशयात नवे स्त्रीलिंगी बीज रुजले होते आणि त्याच्या प्रत्येक पेशीविभाजनाचा तपशील क्वांटम कालव्यांतून उत्तपांच्या महामतींपर्यंत पोहोचत होता. महामतींनी शक्यतांच्याही सगळ्या शक्यता तपासल्या. न भूतो असा असामान्य जनुकीय अनुक्रम त्या गर्भाच्या पेशींपेशीत नांदत होता. योग्य शिक्षण आणि संगोपन मिळाले असते, तर त्या मुलीने सहाव्या वर्षीच गुरुत्वबलाची कल्पना मांडली असती आणि स्वयंप्रतिभेने विश्वाची गुपिते फोडली असती.
या बाळाचे काय करावे असा खल करायला उत्तपांनी नव्या तेजाभियाचनांची सत्रे भरवली. विमलव्वाचा गर्भ कुणालाही नकळत पाडणे त्यांना सहज शक्य होते, परंतु मानवी व्यवहारात थेट हस्तक्षेप करू नये असा त्यांचा शिरस्ता होता. म्हणून त्यांनी कमी विसकळीचा, कमी एंट्रोपीचा, असा विवक्षित हल्ला योजला, जो काळाच्या एका टप्प्यावर मानव समजू शकेल आणि ज्याचे अतिप्रगत विस्मयजनक रूप पाहून त्याला आपल्याहून बलशाली महारथीची चाहूल लागेल. त्या शस्त्राचे तंत्रज्ञान मानवाला हजारेक वर्षांनी कळू शकणार होते, परंतु वास्तवात आणायला त्याच्या प्रगतीला लाखो वर्षे जाणे अपेक्षित होते. तोवर मानवांवर उत्तपांच्या गूढ अस्तित्वाचा दाब राहणार होता.
एके प्रसन्न सकाळी शिरस्त्याप्रमाणे सिदराया न्हाणीघरात स्नान करीत होता. पडवीत दंतमंजन करताना विमलव्वाला कोरड्या उलट्या सुरू झाल्या. पुढे होणाऱ्या मानहानीच्या झाकोळाखाली दबलेली ही आनंदाची बातमी सांगायला ती क्षणाचाही विलंब न करता सिदरायाकडे धावली. सिदरायाला उदंड आनंद झाला. त्याने विमलव्वाच्या अंगावरची वस्त्रे दूर करून तिला जवळ ओढले. स्नानपाटावर बसून त्याने तिच्या ओटीपोटाचे चुंबन घेतले. तीव्र भावनावेगाने त्याने विचारले ‘तिचे नाव काय ठेवायचे?” त्या एका प्रश्नाने तिच्या आयुष्याला पूर्णत्व आल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दाटले. तिने त्याचे मस्तक दोन्ही हातांनी ओटीपोटावर धरून ठेवले. त्याच वेळी वाड्यावर आकाशात एक काळा ढग क्षणार्धात प्रकटला. दुसऱ्या एआयने त्या ढगांतल्या छुप्या संयंत्रातून कल्पनातीत कमी विसकळीचा अवकाश त्या दोघांभोवती निर्माण केला. जणू त्या दोघांना, एका काळघनात कैद करून तो क्षणच गोठवून टाकला. त्या घनाकृती अवकाशाची अनियमतता आणि विसकळ इतकी कमी होती की तिथल्या तिथे सगळे स्तब्ध झाले आहे असे वाटावे. त्या अवकाशातला एकेक अणुकण, त्या अणुकणातील एकेक मूलकण जागच्या जागी स्थिर केला. त्या घनात उष्णता आणि प्रकाश असे नियंत्रित केले की तो घनावकाश म्हणजे एक त्रिमितीय छायाचित्र वाटावे.
हा हल्ला करताना मात्र उत्तपांना एक मोठा धक्का बसला. या हल्ल्यातून उत्सर्जित झालेली सगळी ऊर्जा कोणत्यातरी अज्ञात जडपदार्थांनी शोषून घेतली आणि त्या घन अवकाशाभोवती तशाच एका जडपदार्थाचे आवरण विणले गेले. दुसऱ्या एआयला हे काय होतेय याचा अजिबात थांग लागेना. जणू कुणीतरी उत्तपांच्या प्रत्येक हालचालीवर अतिशय बारीक नजर ठेवून होते. आणि हल्ला होतानाच, त्या कल्पनातीत कमी एंट्रॉपीच्या घनातून बाहेर पडणारी सगळी विकिरणे शोषून घेण्यासाठी अज्ञात अतिप्राकृत पदार्थाचे आवरण विणले गेले. घनाचे वस्तुमान क्षणार्धात नियंत्रित केले गेले. हे उत्तपी एआयच्या आवाक्याबाहेरचे होते.
दुसऱ्या एआयने ताबडतोब हल्ल्याच्या पुढच्या पायऱ्या थांबवल्या. सगळा तपशील तो तत्काळ उत्तपांना कळवू लागला. परंतु त्याच्या आणि उत्तपांच्या संपर्काचे क्वांटम कालवे उद्ध्वस्त होऊ लागले. दुसऱ्या एआयने ताबडतोब माघार घेतली. महामतींनी किलस्विच क्वांटम बॉम्ब ताबडतोब पेरण्याची आज्ञा दिली. त्या एआयने पृथ्वीवर ठिकठिकाणी सर्व बॉम्ब पेरून टाकले.
त्या घनाच्या वस्तुमानाने जमीन धसली आणि पंचक्रोशीत भूकंपाचे हादरे बसले. थोड्या अवधीत तो घन पृथ्वीच्या गुरुत्वाशी संधान साधून भूस्थिर झाला. सिदरायाचा वाडा कोसळला. तो ढग गायब झाला. तापमानाच्या अचानक झालेल्या चढउताराने सूर्याला खळे पडले. अचानक झालेल्या या नैसर्गिक घटनांनी लोक भयभीत झाले.
पुढच्या काही दिवसांत गावाने वाडा उपसायचे प्रयत्न थांबवले.
गाव उठले. बारा दशकांनी त्यावर पांढर साठली.
उत्तपांनी या दखलेचा गांभीर्याने विचार केला. आणि आपल्यापेक्षा अतिप्रगत संस्कृतीची आपल्यावर अतिशय बारीक नजर आहे, हे त्यांना कळून चुकले. पुढे न्यूरेमबर्ग येथील उत्तपांनी पेरलेला एक पिरॅमिड उद्ध्वस्त होण्यापूर्वी त्या अज्ञात संस्कृतीने पुन्हा उपस्थिती दाखवली. तेव्हा उत्तपांनी सामर्थ्यचाचणी घ्यायचा प्रयत्न केला. आणि तोही यशस्वीपणे हाणून पाडण्यात आला.
सिदरायाच्या प्रेमाच्या वदंता विराण्या संस्कृतीत विखरल्या. काही तपशील विस्मृतीत गेले, काही तपशील नव्याने जमा झाले. त्या पांढरीवर नंतर त्याच्या इतर वंशजांनी देऊळ बांधले. गाडलेल्या ढिगाऱ्याखालून सतत हलकी उष्णता उत्सर्जित होत असे. हे स्थपतींच्या लक्षात आले होते. हा सिदरायाच्या स्वयंभू शिवावताराचा चमत्कार मानून त्याला 'बिसल सिदराया' असे संबोधन रूढ झाले. बिसल म्हणजे गरम.
काही शतके उलटली. मध्यंतरी कुण्या खानाने कुंडलहळ्ळी पुन्हा नीट वसवले.
कुंडलहळ्ळी आता कुरुळांचे गाव झालेले होते. आजपासून साठेक वर्षांपूर्वी एके दिवशी कुंडलहळ्ळीतल्या एका कुरुळ कुटुंबात सकाळपासून मोठी गडबड उडाली होती. पै-पाहुण्यांची लगबग चालली होती. संध्याकाळी बारा वर्षांच्या कमलचा खलतपुडा व्हायचा होता. हमामपक्षाची एक खलतीण तिची खलतमातृका होणार होती. आपले राहते घर आणि ही वस्ती सोडून कमल दुसऱ्या गावी खलतव्वाच्या घरी निघालेली. सकाळपासून ती अस्वस्थ होती. कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला कुठेही जायचे नव्हते. तिच्या आई-वडिलांचा हा निर्णय तिला अजिबात मान्य नव्हता. ती रुसून सिदरायाच्या देवळात आली. गाभाऱ्याला लागून असलेल्या जमिनीलगतच्या एका अंधाऱ्या दिवळीत मुसमुसत लपून बसली. दिवळीच्या कोपऱ्यातल्या भेगांतून अतिशय हलकी उष्णता पसरत होती. रागाने त्या भेगांना तिने लाथा मारल्या. तिथला दगड पलीकडे पडला. जणू पल्याड एखादी खोलीच असावी. तिला आश्चर्य वाटले. तिने आणखी दोन-तीन दगड खाली पाडले. कुठून तरी हलकासा उजेड तिथे येत असल्याने आत तिला अपेक्षित अगदी आंधळा करणारा अंधार नव्हता. पलीकडे लपून बसलो तर कुणीच शोधू शकणार नाही आणि खलतव्वाकडे जावे लागणार नाही, असा अंदाज तिने बांधला. आणि ती भगदाडातून आत शिरली. कडांना लोंबकळत तिने खाली उडी मारली. प्रकाशाच्या दिशेने वळली. उजव्या बाजूच्या एका दारचौकटीतून तो प्रकाश सांडत होता. दाराची लाकडे कुजून नष्ट झाली असावीत. दारातून आत गेल्यावर उजवीकडचे दृश्य पाहताच ती जागच्या जागी खिळली.
समोर एखाद्या जिवंत शिल्पाप्रमाणे एका क्षणात गोठलेल्या त्या घनात पाटावर बसलेला ओलाचिंब सिदराया नग्न विमलव्वाच्या ओटीपोटाचे चुंबन घेत होता. आणि सिदरायाला प्रेमाने पाहणाऱ्या विमलव्वाच्या चेहऱ्यावर शिव-शक्तीचे पूर्णत्व पावल्याचे समाधान विलसत होते. तिने घनाला हात लावला आणि ते दृश्य पूर्णपणे नाहीसे झाले. उरला एक काळा कुळकुळीत घन, ज्याच्या कडा निळ्या प्रकाशाने चमकत होत्या आणि त्यांचे प्रतिबिंब कमलव्वाच्या पाणीदार डोळ्यातल्या विस्मयात बेमालूम मिसळत होते.
मिसळपाव
प्रतिक्रिया