Skip to main content

आठवणी दाटताना

लेखक बबन ताम्बे यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

आठवणी दाटताना - साठ सत्तरच्या दशकातील खेड्यातले मनोरंजन

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी खेडेगावात मनोरंजनाची साधने मर्यादित होती. जागरण, कीर्तन, प्रवचन, भजन याबरोबर गणेशोत्सवातील नाटके, लोकनाट्य तमाशा आणि कधी कधी पडद्यावरचा सिनेमा ही लोकांची मनोरंजनाची साधने. अर्थात लहान-थोरांपासून ते सगळं एंजॉय करायचे. त्याच्याच आठवणींचा घेतलेला हा धांडोळा.

 
१. जागरण गोंधळ

माझ्या आत्याचे घर आमच्या समोरच होते. शेतकरी कुटुंब असल्यामुळे बैलगाडी, शेतीची अवजारे, घराच्या मागच्या भागात गुरेढोरे सगळे होते. घरी दूधदुभते भरपूर होते. सकाळी सकाळीच आत्या किंवा तिची सून माठात मोठी रवी ठेवून दोरीने रवी फिरवून ताक घुसळायची. तिच्या घरी धार्मिक कार्ये खूप चालायची. दर वर्षी जागरण घालायची. जागरण घालणारा वाघ्या-मुरळीचा एक ग्रूप पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध होता. आत्या दर वर्षी त्याच मंडळींना जागरण करण्यासाठी सुपारी द्यायची.

रात्री आठनंतर वाघे लोक दिमडी, तुणतुणे वाजवत, खंडोबाची भक्तिगीते म्हणत पेटलेली दिवटी घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात देऊन गावाच्या शिवेपर्यंत मिरवणुकीने नेत. तिथे म्हसोबा किंवा कुठले दैवत असेल तिथे तळी भरून परत घरी पेटलेली दिवटी घेऊन येत. ती दिवटी जागरणाच्या ठिकाणी स्थानापन्न करत आणि त्यानंतर जागरण सुरू होई. खंडोबाची भक्तिगीते सुरू होत. थोड्याच वेळात दिमडी वाजविणारा वाघ्या दिमडीचा आवाज टिपेला नेई आणि तमाम जमलेली पब्लिक ज्याची आतुरतेने आत्तापर्यंत वाट पहात असायची, ती मुरळी नाचत नाचत प्रवेश करायची. वास्तविक ही मुरळी म्हणजे चमकदार ठिपके असलेली नऊ वारी साडी (चंद्रकळा?) नेसलेला आणि मॅचिंग ब्लाउज घातलेला मध्यम उंचीचा पुरुष होता. तो काळासावळा पण रेखीव आणि देखणा होता. नाक अगदी गरुडासारखे होते. माफक मेकअप करून बाईचे रूप घेऊन त्याने एन्ट्री घेतली की शिट्या टाळ्या सुरू होत. पुरुष व्वा असे चित्कारत, बायका त्याच्या सौंदर्याकडे कौतुकाने पाहत त्याने कोणती साडी घातलीय, कानात काय घातलेय, नाकात कुठली चमकी घातलीय, डोक्यात फुलांची वेणी कशी घातलीय याची आपसात चर्चा करत.


अशा या लोकांच्या लाडक्या मुरळीने लोकांना आवडणारे, हमखास हिट होणारे गाणे नाचत सुरू केले की पब्लिक नुसते पागल होई. तुळशीच्या वृंदावनी, जना घाली तुळशीला पाणी' अशी त्या गीताची ओळ अजूनही आठवते. तो खूप सुरेख गायचा. मग कुणी चार आणे फेकत, कुणी आठ आणे, एखादा खूपच दर्यादिल एक रुपया मुरळीच्या हातात देई. खंडोबा, म्हाळसा, बानुबाईची भक्तिगीते पहाटेपर्यंत चालत. ते झाल्यानंतर मुरळीच्या अंगात येई. लोक आपापली गाऱ्हाणी सांगत. अंगात आलेली देवी त्यांना उपाय सांगे. कुणाला उपवास करायला सांगे, कुणाला जेजुरीला जाऊन देवाचे कार्य करून यायला सांगे. लोकांची त्या वेळी श्रद्धा होती, त्यामुळे ते इमानेइतबारे तो उपाय करून बघत. शेवटी लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला की जागरण गोंधळ संपे. लोक आपापल्या घरी जात.

२. लोकनाट्य तमाशा

चैत्रात महाराष्ट्रातील गावोगावी जत्रा भरतात. त्या जत्रेचा अविभाज्य भाग म्हणजे लोकनाट्य तमाशा. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ही तमाशाची पंढरी समजली जाते. महाराष्ट्रातून सर्व तमासगीर तेथे येऊन राहुट्या ठोकून असतात. गावोगावची प्रमुख मंडळी तिथे तमाशाची सुपारी ठरवायला येतात. पण हल्ली तमाशाचे स्वरूप खूप म्हणजे खूप बदललेय. आता तमाशा म्हणजे फक्त ऑर्केस्ट्रा झालाय. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी तमाशा हा लोकरंजनाचा महत्त्वाचा भाग होता. तो त्याचे मूळ स्वरूप टिकवून होता. 

त्या वेळी खेडेगावांमधे तमाशा हे शेतात काबाडकष्ट करणाऱ्या, दमून भागून येणाऱ्या कष्टकरी जनतेची चार घटका मनमुराद करमणूक करणारे लोकप्रिय साधन होते. तमाशाला लोकाश्रय भरपूर होता. त्यामुळे नामवंत तमासगीर त्यांचा ताफा घेऊन गावोगावी मोकळ्या मैदानात मोठा तंबू टाकून तिकीट लावून तमाशाचे प्रयोग करत. हा तंबू अगदी एखाद्या सर्कसएवढा मोठा असे. हे तमासगीर भरपूर पुरुष कलाकार, नर्तकी, तमाशासाठी लागणारा स्टेज, तंबू, विद्युत् सामग्री मोठ्या ट्रकमध्ये घालून गावोगावी जात. चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक पुणेकर, दत्तोबा तांबे, विठाबाई नारायणगावकर, काळू-बाळू, गुलाबराव बोरकर, रघुवीर खेडकर अशी काही प्रमुख नावे आठवतात. यांच्या तमाशांना तुफान गर्दी व्हायची. गावातील लोक गर्दी करायचेच, तसेच आसपासच्या अनेक वाड्यावस्तीतील लोक बैलगाड्या करून तमाशा पहायला येत.

प्रथम पठ्ठे बापूरावांना वंदन करून नांदी झाली की नर्तकी अवतरत. ढोलकी वाजविणारा तुफान वेगात ढोलकीची टणटण सुरू करी, नर्तकी त्या लयीत नाचायला सुरुवात करत. मग सुरू होई गवळण. कृष्ण आणि पेंद्या बाजाराला दही दूध विकायला निघालेल्या गवळणींची वाट अडवतात. या गवळणींत एक मावशी असते. पुरुषच साडी नेसून मावशीची भूमिका करतो. याला सोंगाड्या म्हणत. तो एकापेक्षा एक विनोद करून प्रेक्षकांना खदखदून हसवत असे. (मराठी चित्रपटात गणपत पाटील टाइप किंवा नुकताच नटरंग चित्रपटात अतुल कुलकर्णीला जसा नाच्या दाखविलाय, तसा कुठल्याही तमाशात नव्हता. अजूनही नसतो. तो उत्तरेला हिंदी नौटंकीत असतो. महाराष्ट्रातील तमाशात हा औषधालाही नसताना मराठी चित्रपटात हा बायकी नाच्या का दाखवीत होते, हे कोडेच आहे.)

कृष्णापासून सुटका करून घेण्यासाठी गवळणी गाणी म्हणत. त्यानंतर काही लावण्या होत आणि मग एक फार्स. दत्ता महाडिक, दत्तोबा तांबे हे फार्सचे बादशहा होते. इतके तुफान हसवत की पब्लिक लोटपोट होत असे. त्यानंतर सुरू होई वगनाट्य. 

ही दोन-तीन तासांची वगनाट्ये दर्जेदार असत. ऐतिहासिक वगनाट्ये अक्षरशः खिळवून ठेवत. 'चित्ता फाडीला जावळीचा' हे छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांच्यातील संघर्षाचे वगनाट्य पाहिल्याचे आठवते. पांढराशुभ्र भरजरी पोषाख घातलेले रुबाबदार, तडफदार शिवाजी महाराज आठवतात, तसेच चंद्रकांत ढवळपुरीकरांनी भूमिका केलेला मस्तवाल चंद्रराव मोरे आठवतो. एक सो एक कसलेले ॲक्टर असत. तसेच दुसरे वगनाट्य होते - 'महाराष्ट्र झुकत नाही'. औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्यातील संघर्षावर. चंद्रकांत ढवळपुरीकर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत. त्यांची एंट्रीच अंगावर शहारे आणत असे. झिरझिरीत वस्त्रे घातलेला रुबाबदार संभाजी पाहून संभाजी महाराज असेच असले पाहिजेत, असे वाटे. औरंगजेबासमोर त्याचा शिपाई जेव्हा तप्त सळया संभाजीच्या डोळ्यात घालतो, तेव्हा प्रेक्षक ओरडत, औरंगजेबाला शिव्या घालत. नंतर कळायचे की त्या तप्त सळया म्हणजे वर लाल जिलेटीन पेपर लावलेले रॉड असत. तलवारींचा खणखणाट, तुताऱ्यांचा आवाज, बॅकग्राउंडला वाजणारी ढोलकी, नगारे लढाई अगदी जिवंत करत. प्रेक्षकांना अगदी त्या काळातच आहोत असे वाटे, इतकी उच्च दर्जाची ही वगनाट्य असत. 

ही मोठी मोठी तमासगीर मंडळी वगनाट्यात ट्रिक सीन्सदेखील दाखवत. पौराणिक नाट्यात अदृश्य होणारा साधू, मस्तकावर वाहती गंगा धारण करणारा शिवशंकर, 'संत ज्ञानेश्वर'मध्ये चालणारी भिंत, 'श्रीकृष्ण-कंस'मध्ये गोवर्धन उचलणारा कृष्ण असे सीन्स अफलातून दाखवत. ते सारे आठवले की आता मोठी खंत वाटते. काळाच्या ओघात ते सारे लोप पावले. आता उरलाय तो फक्त ऑर्केस्ट्रा. ते तरी काय करणार म्हणा! आज खेड्यापाड्यातसुद्धा अभिरुची बदललीय. त्यांचे पोट भरायचे वांदे झालेत. त्यामुळे प्रेक्षकांना जे आवडतेय तेच ते देणार. 

३. गणेशोत्सवातील स्थानिक नाटके

गावात प्रत्येक आळीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. एका मंडळाने ऐतिहासिक नाटक बसवले, तर दुसरे सामाजिक नाटक बसव असे. ही सगळी मंडळी गावातीलच हौशी मंडळी होती. स्त्री भूमिका करायला मात्र पुण्यावरून नट्या येत. कारण गावात कुणी स्त्रिया नाटकात काम करायला तयार नसत. आता चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी रात्री साडेनऊला पुण्यावरून शेवटची एसटी यायची, तीसुद्धा आली तर आली. अशा परिस्थितीत त्या नट्या कधी रिहर्सल करत, त्यांना किती पैसे मिळत त्याच जाणे. पण अशी कामे करत की प्रेक्षक जागचे हलायचे नाहीत. सर्व नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळे. स्थानिक नट नाटकातील स्वगते किंवा संवाद खड्या आवाजात बोलू लागला की टाळ्यांचा कडकडाट होई. इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते वगैरे नाटके अत्यंत तडफेने सादर केली जात. नेपथ्य, वेषभूषा यात हयगय केली जात नसे. ध्वनी आणि प्रकाशयोजना चोख ठेवली जात असे. गावातीलच दोन तरुण शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची भूमिका तडफदारपणे पार पाडत. औरंगजेब साकारणारा नट असा काही अफलातून अभिनय करी, की लोकांमध्ये नकळत चीड निर्माण होई. तीच गोष्ट सामाजिक नाटकांची. त्या वेळी मधुसूदन कालेलकरांची नाटके प्रसिद्ध होती. गावातीलच सुशिक्षित, तरुण शिक्षक दिग्दर्शक, मुख्य भूमिका पार पाडत. दिवा जळू दे सारी रात, अबोल झालीस का, अश्रूंची झाली फुले ही नाटके प्रेक्षकांना खिळवून ठेवत, रडवत.

४. सिनेमा

चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी गावात एकच ओपन थिएटर होते. एक खूप जुना वाडा पाडून  मोकळी जागा केली होती. त्यात मागे सिनेमाचा पडदा बांधत. समोरच्या जागेत प्रेक्षक खाली बसत. चारी बाजूंना आठ-नऊ फूट उंच भिंत होती. आत जायला पुढच्या भिंतीला एकच दरवाजा होता. त्यातून प्रेक्षकांना आत सोडत. लहान मुलांना चार आणे, मोठ्यांना आठ आणे असे तिकीट होते. सहसा मराठी चित्रपट, तेही ब्लॅक अँड व्हाइट असत. चंद्रकांत, सूर्यकांत, निळू फुले, दादा कोंडके,अरुण सरनाईक लोकप्रिय होते. थांब लक्ष्मी कुंकू लावते, वारणेचा वाघ, सुगंधी कट्टा, मुंबईचा फौजदार, पिंजरा, सोंगाड्या वगैरे लोकप्रिय चित्रपट लागत. शो रात्री साडेनऊ वाजता सुरू व्हायचा, पण संध्याकाळी पाच वाजल्यापासून गावात चित्रपटाची जाहिरात सुरू व्हायची. दोन लोखंडी चाकांच्या गाड्यावर चित्रपटाची दोन पोस्टर  टेकवून ठेवलेली असत. एक जण तो गाडा ढकलत असे, त्यापुढे ताशा वाजवणारा आणि साधे पत्र्याचे नळकांडे (भोंगा) घेतलेला अनाउन्सर. ताशा वाजवणारा थांबला की अनाउन्सर नळकांडे तोंडाला लावून "कुर्र ऐका आणि लक्षात ठेवा...." अशी सुरुवात करायचा. ही त्याची टिपिकल आरोळी होती. ती ऐकली की पोरेटोरे जमा होत. मोठी माणसे कान देऊन ऐकत. मग "आज रात्री ठीक साडेनऊ वाजता.." असे दोनदा म्हणून चित्रपटाचे नाव, कलाकार, खेळाच्या जागेचे नाव हे सगळे तो भोंग्यातून सांगायचा. अशा रितीने पूर्ण गावभर तो चित्रपटाची जाहिरात करायचा. हा अनाउन्सर प्रोजेक्टर ऑपरेटरचेही काम करायचा. मध्येच फिल्म तुटली, तर जोडायचेही काम करायचा. असा मल्टीटास्क हॅण्डल करणारा मनुष्य होता तो. 

थोड्या काळाने ते थिएटर बंद पडले. मग लोकांची चित्रपटाची हौस पूर्ण व्हायची गणेशोत्सवात आणि गावोगावी जत्रा असत, तेव्हा. गावात दोन-तीन गणेश मंडळे होती. ते गणेशोत्सवात फुकट चित्रपट दाखवीत. रस्त्याच्या मध्ये पडदा बांधलेला असे. पडद्याच्या दोन्ही बाजूंना प्रेक्षक बसत. रात्री नऊचा टाइम असे. लोक साडेआठलाच येऊन बसत. पण शेवटची मुक्कामाची एसटी पुण्यावरून चित्रपटांची रिळे घेऊन आल्यावरच चित्रपट सुरू होई. सहसा ही एसटी काही ना काही कारणाने कधीच वेळेवर यायची नाही. चित्रपट सुरू व्हायला कधी अकरा-साडेअकरादेखील वाजत. तोपर्यंत जमलेल्या प्रेक्षकांना थोपवून धरण्यात आयोजकांची त्रेधातिरपीट उडे. माइक हातात घेतलेला निवेदक "एसटी आता नारायणगावपर्यंत आली आहे. थोड्याच वेळात दाखल होईल" वगैरे आश्वासने देऊन लोकांना थोपवून धरायचा. त्यात मध्येच कधीकधी भुरभुर पाऊस यायचा, लोक आडोशाला पळायचे, थांबला की पुन्हा जागा पकडायला पळापळ अशी सगळी धांदल उडायची. पण लोकांची सहनशक्ती आणि हौस दांडगी. कितीही वाजता सुरू होऊ द्या, पिक्चर पाहूनच जाणार. 

रिळे आली की प्रोजेक्टर ऑपरेटर प्रोजेक्टर चालू करायचा. त्याचा फोकस पडद्यावर पाडून ॲडजस्ट करायचा. आम्ही पोरे फोकसच्या मध्ये हात घालून पडद्यावर हाताची सावली पडली की आनंदाने ओरडत असू. मग रिळे लावल्यावर चित्रपट सुरू होई. टायटल्स सुरू होत आणि त्यानंतर सर्व जनता चित्रपटामध्ये गुंग होई. सूर्यकांत, चंद्रकांत व्हिलनची पिटाई करत असले की आनंदाने त्याच्या प्रत्येक ठोशाला हैया, हुय्या ओरडत. व्हिलन (राजशेखर किंवा निळू फुले) आला की बायाबापड्या शिव्या देत. लव्ह सीन बराच वेळ असला की प्रेक्षक "ए, सोड, सोड" असा आरडाओरडा करीत. अशी एकंदरीत सगळी धमाल असे. रात्री उशिरा चित्रपट संपल्यावर लोक आनंदाने घरी जात. 

जंजीर जेव्हा पहिल्यांदा पडद्यावर पाहिला, तेव्हा आम्ही पोरे फारच भारावून गेलो. दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येक जण अमिताभने यंव केले, त्या सीनमध्ये त्याने, प्राणने कशी फायटिंग केली याचीच रसभरीत चर्चा करीत होतो. जंजीर, हाथी मेरे साथी, आराधना हे हिंदी पिक्चर, तेही रंगीत पाहिल्यानंतर आमचे डोळे दिपले होते. मराठी कृष्णधवल चित्रपट आम्हाला मिळमिळीत वाटायला लागले. मराठीतली बऱ्याचशा चित्रपटातील तमाशाटाइप नाच गाणी, धोतर, फेटा घातलेले हिरो, व्हिलन आणि नऊवारीतल्या हिरोइन यांच्या तुलनेत ते चिकणेचोपडे फॅशनेबल हिरो हिरोइन, खतरनाक व्हिलन, संगीत, गाणी, हिरो फायटिंग करताना दाखवलेले स्टंट, त्या वेळचे ढिशाव ढिशाव, पॉश गाड्या, बंगले, पिक्चरमध्ये दिसणारी मुंबई, फॉरेन हे सगळे पाहून हिंदी पिक्चर हवेहवेसे वाटू लागले. दरम्यान शाळेच्या पटांगणात पुन्हा तिकीट लावून चित्रपट दाखविणे सुरू झाले. त्यामुळे काही निवडक हिंदी पिक्चर पाहता आले. सिनेमाचे तिकीटही आठ आणे असे माफक असायचे. पटांगणाभोवती बांबू रोवून त्याला पांढरे पडदे लावत. त्याला कनात म्हणत. त्यात एक ओपनिंग ठेवून तिथून तिकीट घेतलेल्या प्रेक्षकांना आत सोडत. हिंदीतले सगळे हिरो आता आवडायला लागले होते. अमिताभ, धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र, शशी कपूर, हेमामालिनी आमच्या गळ्यातले ताईत झाले होते. एखादी बाईसुद्धा कुणा पोरीने थोडा नट्टापट्टा केला की "स्वतःला हॅमामालीनीच समजायला लागलीय जणू" असे तिला हिणवायची, एवढा बदल होऊ लागला.

शोले रिलीज झाला, तेव्हा खेडेगावात लगेच बघायला मिळणे दुरापास्तच होते. पण त्याची कीर्ती कानावर आली होती. पिक्चर नाही, पण त्याच्या LP रेकॉर्ड गावात आल्या होत्या. एखादे लग्न किंवा काही समारंभ असेल, तर स्पीकरवर त्या रेकॉर्ड लावत. लोक शोले ऐकायला गर्दी करत. विरू, जय, गब्बरसिंग, ठाकूर, बसंती आणि इतर पात्रांचे संवाद, गाणी, पार्श्वसंगीत स्पीकरमधून पूर्ण गावात घुमत असे. गब्बरसिंग झालेल्या अमजदखानचे "कितने आदमी थे?", नंतरचे हसणे, "ये हाथ मुझे दे दो ठाकूर" आणि त्यानंतरचे संजीवकुमारचे जिवाच्या आकांताने "नय" ओरडणे आसमंत भेदून जाई.

काळ पुढे सरकला. शिक्षण झाले, नोकरी लागली. नव्वद साली गावी जाऊन पाहिले, तर गल्लोगल्ली मिनी थिएटरचा जमाना आला होता. व्हिडिओ कॅसेट आणि व्हीसीआरचे आगमन झाले होते. शहर आणि गाव यातली तफावत दूर होत चालली होती. शहरात रिलीज झालेला पिक्चर चार-पाच वर्षांनी गावात पाहायला मिळायचे दिवस इतिहासजमा झाले होते. मुंबई-पुण्याला रिलीज झालेल्या पिक्चरची पायरेटेड कॅसेट त्वरित व्हिडिओ थिएटरमध्ये दाखविली जात होती. बसायला बाकडे होते. तिकीटही माफक - म्हणजे दोन रुपये होते. शाळकरी पोरे, तरुण मुले, मुली यांना चित्रपट पहायची चटक लागली होती. थिएटर सतत भरलेले असायचे.

आता तोही काळ बदलला. गावात डिश अँटेना, LED टीव्ही, सेट टॉप बॉक्स, असंख्य चॅनेल्स आल्या. बहुतेकांकडे मोठ्या स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही आहेत. इंटरनेट आहे. OTT आहे. हवा तो चित्रपट पाहिजे तेव्हा पाहतात. 

। कालाय तस्मै नमः ।

दिवाळी अंक वर्ष

वाचने 35
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया