आणि डबा वाजला
आमच्या गावातला छोटू सोनार लोकांची भविष्यं सांगायला लागला आणि कसलीही जाहिरातबाजी न करता आजूबाजूच्या गावात त्याच्या नावाची चर्चा चालू झाली. छोटूची प्रसिद्धी वाढू लागली. लोक त्याच्याकडे यायचे, हात दाखवायचे, कुणी कुंडली दाखवायचे, आपापली गाऱ्हाणी मांडायचे. छोटू सगळं काही कान देऊन ऐकायचा. हळूहळू त्याचा हसरा चेहरा गंभीर होत जायचा. डोळे मिटून तो काही वेळ विचार करायचा. मग काहीतरी उपाय सांगायचा. लोकांना बरं वाटायचं. ते त्याला पैसे देऊ करायचे. कोणी काही भेटी आणलेल्या असत, कुणी नुसताच नारळ द्यायचे. लोकांनी स्वखुशीने आणलेल्या भेटी छोटू आनंदाने स्वीकारायचा. ते स्वीकारणंही त्याला भागच होतं. कारण आतल्या खोलीत चुलीपुढे डोक्याला हात लावून बसलेली त्याची बायको असायची. दप्तरांचा पसारा तसाच ठेवून लवंडलेली आणि तशीच गाढ झोपी गेलेली दोन मुलं असायची.
लोकांची नशिबं बदलणाऱ्या छोटूला आपलं स्वतःचं दारिद्र्य मात्र घालवणं शक्य होत नव्हतं. गावातल्या सुशिक्षित अशा गणल्या गेलेल्या घरात लहानाचा मोठा झालेला छोटू. उंचीने वाढायला नकार दिल्यामुळेच कदाचित ‘छोटू’ हे नाव त्याला चिकटलं असावं. लाघवी बोलणं, बारीक आवाज आणि स्वभावातला नम्रपणा यामुळे त्याच्याशी बोलणाऱ्यांची मनं तो सहजपणे जिंकू शकत असे, किंबहुना कुणाचं मन त्याच्याकडून दुखावलं जाण्याची शक्यता तशी फार कमी होती. तरीही अधूनमधून त्याच्या घरातून भांड्यांची आदळआपट व त्यानंतर होणाऱ्या पती-पत्नीच्या भांडणात छोटूच्या तोंडून निघणाऱ्या अस्सल घाणेरड्या शिव्या रस्त्यावर ऐकायला येत, तेव्हा लोकांना त्याची खरी ओळख पटत असे. घराबाहेर वावरताना छोटूचं बोलणं, त्याचा आवाज, उच्चार जर कोणी ऐकले, तर नवख्या सुशिक्षिताला हा ब्राह्मण आहे की काय अशी शंका आल्यास त्यात काहीच नवल नव्हतं.
छोटूची आई पूर्वी गावची सरपंच होती. त्यामुळे गावात प्रतिष्ठित गणल्या जाणाऱ्या लोकांची त्याच्या घरी नेहमी उठबस असे. छोटूची एक बहीण पूर्वी बालवाडीच्या वर्गात शिक्षिका होती. एकंदरीत, गावातील इतर अशिक्षित लोकांपेक्षा यांचं घराणं सरस ठरे.
आडनाव ‘सोनार’ असलं, तरी त्याचा व सोन्याचा काडीमात्र संबंध नव्हता. त्याचे पूर्वज सोन्याचा धंदा करत असतीलही; पण आता मात्र छोटूची अवस्था ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ अशीच काहीशी होती. पूर्वी छोटू किराणा दुकान चालवायचा. पण लोकांची संख्या वाढली, तशी दुकानांचीही वाढली. या नव्या स्पर्धेत टिकून राहणं त्याला जमलं नसावं. दुकानाचे काहीच अवशेष शिल्लक राहिले नाहीत आता. त्यामुळे उदरनिर्वाहाचं काहीच साधन शिल्लक नाही असं वाटून छोटूने हा नवा मार्ग स्वीकारला असावा. इतर व्यवसायांच्या तुलनेत इथे त्याला फारसे स्पर्धक नव्हते. दर मंगळवारी, शुक्रवारी अंगात देवी येणाऱ्या अनेक बायका गावात असल्या, तरीदेखील केवळ आपल्या वाक्चातुर्याने त्या सगळ्यांवर मात करून लोकांना आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लावण्याचं कसब छोटूत नक्कीच होतं. इतरांहून अधिक परिणामकारक पद्धतीने तो भविष्य सांगू शकत होता. शिवाय ते खोटं ठरलं तरी जे प्रत्यक्षात घडलं तेच त्याने पूर्वी कसं कथन केलं होतं, हे तो लोकांना पटवून देऊ शकत होता. छोटूच्या या धंद्यासाठी चार लोकांना बसण्यापुरती जागा त्याच्या घरात होती. त्याला या धंद्यात गुंतवणूक करण्यासाठी पैशाची गरज नव्हती. आपल्या नाजूक शरीरयष्टीमुळे कष्टाची काम करणं त्याला जमण्यासारखं नव्हतं. छोटूने या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार नक्कीच केला असावा आणि विचारपूर्वकच हा धंदा स्वीकारला असावा.
सुरुवातीला गावातल्या लोकांना त्याची ही भंपकगिरी वा भामटेगिरी वाटत असली, तरी छोटूकडे येणाऱ्या बाहेरच्या गावातल्या लोकांचा लोंढा जसा वाढला, तसे गावातलेही लोक त्याच्या सांगण्यावर खूप विश्वास ठेवू लागले. मग दुखण्याने त्रासलेले, साडेसातीने ग्रासलेले, जीवनाला कंटाळलेले, भांडणाला वैतागलेले, भुतांनी झपाटलेले असे हरतऱ्हेचे मनोरुग्ण छोटूकडे यायचे. यामध्ये अशिक्षित अडाणी होते, तसेच चांगले पदवीधरही होते. मग कोणी नोकरी मिळत नाही म्हणून, कोणी लग्नाचा योग जुळून येत नाही म्हणून छोटूकडे येत. छोटूने दिलेला अंगारा, मंत्र घेऊन जात आणि आश्चर्य असं की बेकारांना नोकऱ्या मिळत, योग नसलेल्यांची लग्न जुळत, दोन-चार महिने अंथरुणाशी एकरूप झालेले ठणठणीत बरे होत, साडेसाती नाहीशी होई, भुतं पळून जात, घरातले कलह मिटत. मग हळूहळू गावात या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार आपोआप होई. लोकांचा विश्वास वाढे.
या सगळ्याचा परिणाम असा झाला की लोक आपल्या घरातले अनेक निर्णय छोटूला विचारूनच घेऊ लागले. निवडणुका जवळ आल्या की प्रचारानंतर ताण आलेले उमेदवार छोटूकडे येऊन कौल लावू लागले. काळजीने ग्रासलेल्या चेहऱ्याची ही माणसं छोटूच्या घरातून हसत बाहेर पडत. एकाच निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दोन उमेदवार कौल लावण्याच्या निमित्ताने छोटूकडे येत नि त्याने दिलेला कौल बघून दोघेही हरखून जात, हे पाहून कुणाला आश्चर्य वाटलं नाही तर नवलच आहे.
छोटूचं माहात्म्य ऐकून कित्येक जणांना नक्कीच त्याच्याविषयी कुतूहल वाटे. किंबहुना त्याला भेटण्याची इच्छा अनेकांना होई. भूत, भविष्य, जादूमंतर, करणी अशा गोष्टींना केवळ अंधश्रद्धा मानून त्यावर अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या माझ्याही मनात छोटूला भेटण्याविषयीची उत्सुकता निर्माण झालीच होती. परंतु आमच्या भेटीचा हा योग मात्र जुळून येत नव्हता.
तशी छोटूला विचारण्यासारखी माझी काहीच अडचण वा समस्या नव्हती. मी कुठल्याही संकटात नव्हतो. तसं काही असतं, तरीदेखील मी स्वतःच मार्ग शोधला असता.. पण असं असूनही केवळ करमणूक म्हणून मी त्याच्याकडे जाण्याचा विचार करत होतो. त्याला नेमकं काय विचारावं याबाबतही माझ्या डोक्यात विचार सुरू होतेच. पुढे फार काळ काही मला विचार करावा लागला नाही किंवा छोटूला स्वतःहोऊन जाऊन काही विचारण्याचा प्रसंगही माझ्यावर आला नाही, तरीसुद्धा त्याला भेटण्याची संधी मात्र मला मिळालीच.
त्याचं झालं असं की, एकदा आमच्याच गावातला एक जण घरातून अचानक बाहेर पडला, तो चार-पाच दिवस कुणाला कुठे सापडलाच नाही. आमच्या शेजारीच त्याचं घर होतं. त्याच्या घरच्यांनी त्याचा बराच शोध घेतला. शेवटी हताश झाल्यावर कोणीतरी छोटूला जाऊन विचारण्याचा सल्ला त्यांना दिला. मग त्या घरातला एक जण छोटूकडे गेला. त्याच्यासोबत मीही गेलो. छोटूच्या घरी पोहोचलो, तेव्हा आमच्या गावाला लागून असलेल्या कडगावचा एक माणूस छोटूसमोर येऊन बसला होता. त्याचा बैल हरवल्याचं तो हात जोडून छोटूला सांगत होता. एकदा बाजूच्या देव्हाऱ्यातल्या देवांना त्याने नमस्कार केला. त्या शेतकऱ्यानेही मग देवांना आणि छोटूला नमस्कार केला. चिंतातुर चेहऱ्याने तो छोटूच्या शांत कोऱ्या करकरीत चेहऱ्यावरचे भाव न्याहाळीत बसला होता. छोटू काय सांगतो हे ऐकण्यासाठी तो अधीर झाला होता.
छोटूने एकदा देवाकडे पाहिलं. एकदा आम्हावरूनही नजर फिरवून समोरच्या तांब्यात असलेला लालसर रंगाचा द्रव पदार्थ थोडासा प्राशन केलं. डोळे मिटले. तोंडातल्या तोंडात काही मंत्र पुटपुटले. मग डाव्या हातात एक पत्र्याचा डबा घेऊन उजव्या मांडीखाली ठेवलेले काही खडे उजव्या हाताने उचलले. मूठ बंद करून त्याभोवती तो डबा त्याने दोन-तीनदा फिरवला. मुठीतला एक खडा डब्यात टाकला. खडा डब्यात पडल्यावर त्याचा खड्कन आवाज झाला. मग छोटूने डोळे उघडले नि समोर हात जोडून बसलेल्या त्या शेतकऱ्याला तो म्हणाला,
“बैलाचा शोध चालू ठेवा, डबा वाजलेला आहे.”
छोटूच्या बोलण्याचा अर्थ न लागल्याने त्याने विचारलं, “डबा वाजला म्हंजे काय व्ह?”
यावर आवाज वाढवत थोडसं रागाच्या सुरातच छोटू म्हणाला, “म्हणजे काय ते विचारायचं नाही. मी सांगतो तेवढंच ऐकायचं. चला.”
वास्तविक ‘डबा वाजणे’ आणि ‘बैल सापडणे’ या दोन बाबींचा परस्परांशी काही संबंध नसला, तरी त्याबद्दल उलट प्रश्न करणं हे त्या माणसाच्या हिताचं नव्हतं. पुन्हा एकदा छोटूच्या पावलांना स्पर्श करून तो निमूटपणे निघून गेला. छोटूने तांब्यातला सगळा द्रव पदार्थ एका घोटात संपवला. रिकामा झालेला तांब्या घेऊन तो आतल्या खोलीत गेला नि एक दोन मिनिटांत त्यात आणखी थोडा द्रव पदार्थ घेऊन तो बाहेर आला. आपल्या जागेवर बसता बसताच त्याने विचारलं,
“कसं काय दिनूदा, कशाची काळजी करता?”
“बाबा कुटं गेलाय.. चार दिवस झालं, काय पत्त्या न्हाई.” दिनूने सांगितलं.
छोटूने डोळे मिटले. दिनू बोलतच होता.
“घरात भांडून गेलाय. पाहुण्यांकडंबी चौकशी केली. सगळीकडं हुडकून झालंय. खरं काय गावना झालाय. कुटं दडून बसलाय का काय, काय समजना झालंय.”
छोटूने पूर्वीप्रमाणेच काहीतरी मंत्र पुटपुटले. आधी डबा हातात घेऊन जे काही केलं होतं तसंच पुन्हा एकदा केलं. डब्यात एक खडा टाकला. त्याच्यात खड्कन आवाज झाला. डोळे उघडत चेहऱ्यावरची रेषा जराही हलू न देता छोटू म्हणाला, “डबा वाजला. तुम्ही शोध चालू ठेवा.”
काहीही कळलं नसलं, तरी कशातही स्पष्टीकरण छोटूकडे न मागता आम्ही निघालो. त्याआधी छोटूने दिनूला खुणावलं, तसं कमरेच्या बटव्यातून एक नोट बाहेर काढून ती दिनूने छोटूसमोर धरली. छोटूने एक डोळा बारीक करत नोटेकडे पाहिलं आणि म्हणाला, “ते देवासमोरच ठेवा. आम्ही काही त्याला हात लावणार नाही. जे द्यायचं ते देवासाठी." दिनूने देवासमोर ती नोट ठेवली.
पुढच्या एक-दोन दिवसांत भरल्या ओढ्यात तरंगत असलेलं दिनूच्या बाबांचं प्रेत मिळालं. वाहता वाहता ते मध्येच कुठेतरी अडकलं होतं. दिनूच्या घरावर शोककळा पसरली होती. दिनूला तर अक्षरशः वेड लागायचीच वेळ आली होती. तो दुःखात पार बुडून गेला होता. घरातल्या किरकोळ वादावादीवरून बाबांनी एवढ्या टोकाला जायला नकोच होतं, असंच त्याला वाटत होतं. एका बाजूला भांडणाबद्दल पश्चात्ताप, तर दुसऱ्या बाजूला बाबा गेल्याचं दुःख होतं. पण असं कितीही दुःख असलं, तरी त्यातून सावरणं त्याला गरजेचं होतं. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होत गेली आणि पुन्हा एकदा दिनूला छोटूने सांगितलेल्या भविष्याची आठवण झाली. त्याला छोटूचा रागच आला होता. जे वाईट व्हायचं होतं ते झालंच होतं. आता छोटूकडे स्पष्टीकरण मागायचं त्याने ठरवलं. मलाही खूप काही जाणून घ्यायचं होतं. छोटू पुढे काय सांगतो हेही पाहायचं होतं. त्यामुळे ज्या दिवशी तो छोटूकडे जाणार होता, त्याच दिवशी त्याच्या थोडंसं आधी मी छोटूकडे गेलो. कडगावच्या बैल हरवलेल्या शेतकऱ्याने तर माझ्याआधी हजेरी लावली होती. छोटू भविष्य सांगण्यासाठी अजून बसला नव्हता. आतल्या खोलीतच त्याचं काहीतरी काम चाललं होतं. तो बाहेर येईपर्यंत मी त्या शेतकऱ्याशी बोलू शकत होतो. मी काही विचारण्याआधी त्यानेच मला विचारलं,
“कंच्या गावचं जी?”
“मी इथलाच, करंबळीचाच.”
“तुमची काय आडचन?”
“मं? अडचण… माझी नाही; आमच्या एका शेजाऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी आलो होतो. तुमचा बैल सापडला की नाही अजून?” विषय बदलत मी विचारलं.
“व्हय जी, गावला बगा. आगदी दुसऱ्या दिशी गावला. म्हाराजांचं तेवडं लय उपकार झालं बगा गरिबावर. हेंच्या आशीर्वादानंच गावाला आमचा बैल, न्हाईतर…..”
छोटू आवरून बाहेर आला. आपल्या जागेवर स्थानापन्न झाला. एक वेळ समोरच्या देवाला नमस्कार करून त्याने आमच्याकडे पाहिलं. कडगावच्या त्या शेतकऱ्याने उठून छोटूला नमस्कार केला आणि तो त्याच्यासमोरच बसला. दोन्ही हात उंचावून छोटूने बसल्याबसल्याच त्याला भरभरून आशीर्वाद दिले. मग अतिशय भारावून आणि छोटूच्या उपकाराखाली दबून गेलेल्या त्या माणसाने बोलायला सुरुवात केली.
“म्हाराज, म्या कडगावचा संतू पाटील. बैल हरावला म्हनूनश्यान तुमच्याकडं आलो व्हतो. तुमी हुडकायला सांगितलं आनि लगेच दुसऱ्या दिशीच बैल गावला बगा. वड्याच्या पल्याड इंजलाच्या उसाच्या मळ्याजवळ चरालता.”
“मला माहीत होतं, म्हणून तर मी ‘शोध चालू ठेवा’ असं बोललो होतो.”
“पर, ‘डबा वाजला’ म्हटल्यावर म्या भ्यालो हो.” संतूने आपली शंका बोलून दाखवली.
“अहो, भ्यायचं कशाला? मग आम्ही असून उपयोग काय, सांगा बघू? तुमचा बैल मला डब्यात दिसत होता. त्याच्या गळ्यात घुंगरू आहेत की नाही?”
“हाईत की. बैल कुटंबी आसला तरी नुसतं घुंगराच्या आवाजानं कळतंय, त्यो आमचा बैल हाय म्हनून. गल्लीतलं न्हानगं पॉरसुदिक घुंगराच्या आवाजावरनं आमचा बैल बरोबर वळीकतंय.”
“अहो, तुमच्या बैलाच्या गळ्यातल्या त्या घुंगराचा आवाज मला डब्यातून ऐकायला आला. म्हणून मी म्हणालो, ‘डबा वाजला’.” छोटूने आपलं विधान स्पष्ट केलं.
मग काखेतल्या पिशवीतून काहीतरी बाहेर काढत संतू नम्रपणे म्हणाला, “लई उपकार झालं म्हाराज या गरिबावर. म्या फुल ना फुलाची पाकळी म्हनून, ह्यो टावेल, टोपी आनि कापडं घीऊन आलोय. ते तेवडं मोठ्या मनानं घेवा. न्हाई म्हनू नगसा.”
“भक्तांने प्रेमाने दिलेलं मी नाकारत नाही. पण हे नाही आणलं असतं तरी चाललं असतं. आता मी हे घेतो. तेही तुम्ही आग्रह करताहात म्हणून. मी कोणाचं मन दुखावणार नाही. तुम्ही आता हे देवापुढेच ठेवा.”
छोटूच्या सूचनेप्रमाणे त्या भक्ताने ती भेट देवापुढे ठेवली. मग छोटू म्हणाला,
“आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मला भेटायला यायचं आणि मी दिलेला अंगारा घरात सगळ्यांना लावायचा. सगळी इडा पिडा निघून जाईल. येताना फक्त एक नारळ आणायचा. तुमच्या मर्जीने पैसे ठेवा. एवढेच पाहिजेत असं काही नाही.” छोटूने मंत्र दिला आणि भक्तिभावाने संतू पाटलाने त्याच्यापुढे अक्षरशः लोटांगणच घातलं.
बाहेरून आणखी कोणीतरी आलं. छोटूला अनेकांच्या समस्या सोडवायच्या होत्या. संतू निघाला आणि दिनू आत आला. दिनूच्या चेहऱ्यावरची दुःखाची जागा आता रागाने घेतली होती. त्याचे डोळे लालसर दिसत होते. हाताच्या मुठी आवळून तो छोटूसमोर उभा होता. आता पुढे काय होणार आहे याचा अंदाज मला येत होता. परंतु जराही विचलित न होता छोटू म्हणाला,
“दिनूदा, वाईट झालं. खरंच, फार वाईट झालं. जे व्हायला नको होतं ते झालं. नियतीपुढे कुणाचं काय चालतं! मरण यायचं म्हटलं तर ते कसंही येतं. ते टाळणं कदापि शक्य नाही.”
छोटूचं बोलणं म्हणजे दिनूच्या जखमेवर जणू फुंकर होती. त्याचा राग थोडासा कमी झाला होता. तरीही थोड्याशा करड्या आवाजात तो म्हणाला,
“खरं, तुमी तर शोध चालू ठेवा म्हनाला व्हता. डबाबी वाजलाता. मग हे असं झालंच कसं?”
“तुमचा बाबा ओढ्यात बुडून मेल्याचं मला डब्यात दिसलं होतं. मग पुढे वाहून जायला नको म्हणून तर मी शोधायला सांगितलं होतं. ‘डबा वाजला’ असं मी म्हणालो होतो. मग सांगा बघू, तुमच्या बाबांचा डबा वाजला की नाही?” छोटूने आपलं विधान स्पष्ट केलं.
***
दिवाळी अंक वर्ष
वाचने
30
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया