अजित पारसनीस यांचा अल्प परिचय
श्री. अजित पारसनीस हे महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक आहेत. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक (१९९४), पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह (१९९४), जातीय सलोखा राखण्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महात्मा गांधी शांती पुरस्कार (२००२) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (२००६) प्राप्त झाले आहे. २००४मध्ये अणुसुरक्षाविषयक तज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता.
______________________________________________
"अनईझी लाइज द हेड दॅट वेअर्स अ क्राउन" असे शेक्सपियरने म्हटले आहे. त्यात थोडा बदल करून हल्लीच्या काळामध्ये असेही म्हणता येईल, "अनईझी लाइज द हेड दॅट वेअर्स अ पोलीस कॅप."
ज्या डोक्यावर पोलिसांची टोपी असते, ते डोके नेहमी अशांत असते. घर असो वा कार्यालय, कामाचा दिवस असो वा सुट्टीचा दिवस असो, पोलिसांच्या डोक्यामध्ये विचारांचा भुंगा फिरतच असतो. इतर नोकऱ्यांमध्ये कार्यालय संपले की दुसऱ्या दिवशी परत कार्यालयात येईपर्यंत काही काम नसते. परंतु पोलीस खात्यामध्ये मात्र संध्याकाळी आणि रात्रीच कामाचा जोर असतो. प्रश्न पुढे उभे असतात आणि ते कसे सोडवायचे याबद्दलचा विचार सतत चालू राहतो.
सामान्य जनतेला याबाबतची कल्पना नसते. प्रसारमाध्यमांकडूनही पोलिसांचे चुकीचे चित्र रंगविले जाते. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये पोलिसांविषयी फारशी चांगली भावना नसते. त्यामुळे पोलिसांना किती कठीण परिस्थितीमध्ये काम करावे लागते, याची सामान्य नागरिकांना कल्पना नसते.
समाजाकडून आणि प्रसारमाध्यमांकडून सतत होणारी टीका सहन करत आणि कायम शारीरिक आणि मानसिक ताणाला तोंड देत अवघड कामे करावी लागतात. प्रसंगी जीव धोक्यात घालूनही काम करावे लागते. अनेक चित्तथरारक प्रसंगांना सामोरे जावे लागते. असाच एक माझ्या आयुष्यातील चित्तथरारक दंगलीचा अनुभव मी आपल्यासमोर मांडणार आहे.
१९९२ सालच्या अखेरीस माझी मुंबईला नेमणूक करण्यात आली. दिनांक ५ डिसेंबर रोजी मी पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक या पदाचा कार्यभार दुपारनंतर स्वीकारला. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की, परिमंडळ एकमध्ये भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड, डोंगरी, पायधोनी या जातीयदृष्ट्या अतिसंवेदनशील विभागांचा समावेश होतो. या भागात बहुसंख्य मुसलमान वस्ती असून हिंदूंची संख्या अगदी कमी आहे.
मुंबईत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. मला या विभागाची भौगोलिक माहिती नव्हती, लोकांची माहिती नव्हती, माझी कोणाशीही ओळख नव्हती. अगदी माझे अधिकारी आणि पोलीससुद्धा माझ्या माहितीचे नव्हते.
मी पदभार स्वीकारल्यावर प्रथम माझ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुसऱ्या दिवशीच्या बंदोबस्ताबाबत चर्चा केली. स्थानिक परिस्थिती समजून घेतली आणि काही भागात फिरून बंदोबस्त जो नेमला होता, त्याची पाहणीही केली.
त्यानंतरचा दिवस म्हणजे दिनांक ६ डिसेंबर हा माझ्या मुंबईतल्या नोकरीचा पहिलाच दिवस. त्या दिवशी बाबरी मशिदीची घटना घडली आणि मुंबईवर आभाळ कोसळले.
पूर्ण देशामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ठिकठिकाणी जातीय दंगली घडल्या. परंतु मशिदीची घटना जरी अयोध्येत घडली असली, तरी देशातील सर्वात भीषण जातीय दंगल अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये न घडता ती मुंबईमध्ये घडली.
सुरुवातीला आमच्या भागात अल्पसंख्याकांचे जमाव रस्त्यावर उतरले आणि दगडफेक, जाळपोळ, लुटालूट अशा घटनांना सुरुवात झाली. परंतु आम्ही सुरुवातीला ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली आणि जमावाचा सुनियोजित हिंसाचार वगैरे एकदम कमी करण्यामध्ये आम्हाला यश मिळाले. थोड्याफार घटना घडतच होत्या. परंतु परिस्थिती पुष्कळच काबूत आल्यासारखी होती.
पण आमचे अग्निदिव्य संपले नव्हते. डिसेंबर महिना आम्ही खूपच तणावाखाली, परंतु संघटित हिंसाचार नियंत्रणाखाली ठेवून काढला.
जानेवारी महिना सुरू झाला. आम्हाला त्या वेळी कल्पना नव्हती, परंतु दंगलीचा दुसरा टप्पा आता सुरू होणार होता.
दिनांक ५ जानेवारी १९९३ रोजी डोंगरी येथील एका मालवाहतूक कार्यालयामध्ये काही माथाडी कामगार झोपले होते. काही असामाजिक घटकांनी रात्री त्यांच्यावरती हल्ला करून पाच माथाडी कामगारांची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रचंड तणाव निर्माण झाला. पुढे दोन-तीन दिवसांनी राधाबाई चाळ पेटवून देण्याची घटनाही घडली.
जनतेमध्ये प्रक्षोभ उसळला. संतप्त माथाडी कामगार रस्त्यावर उतरले. मृत माथाडी कामगारांचे देह रस्त्यावर ठेवण्यात आले आणि त्या ठिकाणी दिवसभर सभा घेऊन रागावलेले माथाडी नेते भाषणे करत राहिले. त्यांची मागणी होती की, मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी यावे. तोपर्यंत मृतदेह हलवले जाणार नाहीत. प्रचंड तणाव त्या ठिकाणी होता. आम्ही दिवसभर तेथे बंदोबस्त करत होतो आणि कामगारांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.
संध्याकाळच्या सुमारास श्री. रोहिदास पाटील आणि श्री. अजित पवार हे दोन मंत्री त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कामगारांना काही आश्वासने दिली. त्या ठिकाणी भाषणे केली. त्यानंतर कामगार ते मृतदेह हलविण्यास तयार झाले आणि ते मृतदेह तिथून हलविण्यात आले.
आम्हाला सुटका झाल्यासारखे वाटले आणि तिथून निघून आम्ही डोंगरी पोलीस स्टेशनला आलो. त्या दिवशी कोणी जेवलेले नव्हते. संध्याकाळ झाली होती, तेव्हा खायला काहीतरी स्नॅक्स मागवायला सांगितले आणि सध्याच्या परिस्थितीवर आम्ही चर्चा करू लागलो.
आणि बातमी आली की, गोल देवळाकडे काहीतरी गडबड झाली आहे.
गोल देवळाच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय संवेदनशील आहे. गोल देवळाच्या एका बाजूला मुसलमान वस्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला हिंदू वस्ती आहे. त्यामुळे ही खबर मिळताच आम्ही सगळे जण आपापल्या गाड्यांमध्ये बसून गोल देवळाकडे धावत सुटलो.
भेंडीबाजार नाक्याच्या अलीकडे माझ्या गाडीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गाडी तिथेच सोडून मी पायीच गोल देवळाकडे एकटा जायला निघालो. पण पाहता पाहता त्या रस्त्यावर सात-आठ हजारांचा अल्पसंख्याकांचा जमाव जमा झाला आणि त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी मला अडविले आणि घेरले. त्यांची आणि माझी वादावादी सुरू झाली.
मी अगदीच एकटा होतो आणि एवढ्या प्रचंड जमावामध्ये मी एकटाच सापडलेलो होतो. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.
झाले असे होते की, अशी अफवा पसरली होती की गोल देवळाच्या पलीकडे जो हिंदू भाग आहे, तिथले तरुण अल्पसंख्याकांच्या घरामध्ये शिरून त्यांना मारहाण करत आहेत. त्यामुळे जमाव बिथरून रस्त्यावर आला होता.
मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हता.
मधल्या काळात आमच्या एका इन्स्पेक्टरने तिथल्या एका मौलानांना जीपमध्ये घालून त्यापलीकडच्या भागामध्ये नेले आणि जाऊन तेथील परिस्थिती दाखविली. तेथे काहीही घडलेले नव्हते. मग त्यांनी परत येऊन जमावाला तसेच सांगितले आणि आम्ही सर्वांनी जमावाला शांत करून कुठल्याही प्रकारचा बळाचा वापर न करता त्यांना पांगविण्यामध्ये यशस्वी झालो.
त्या रस्त्यावर टेलिफोन केबलसाठी चर खणण्याचे काम चालू होते. जमाव गेल्यावर आम्हाला असे आढळून आले की, या चरामध्ये बहुसंख्य समाजाच्या आठ लोकांचे नुकतेच मारलेले मृतदेह टाकण्यात आले होते. म्हणजे जमावाचा पुढचा भाग जेव्हा माझ्याशी बोलत होता, तेव्हा मागच्या बाजूला त्या मधल्या भागात जेवढे दुसऱ्या समाजाचे लोक मिळाले त्यांना मारून टाकण्यात आले होते आणि या दंगलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती.
त्या वेळी कामाच्या गडबडीमध्ये माझ्याही लक्षात आले नाही. परंतु नंतर विचार करता असे जाणवले की मीही हिंदू, त्यातून पुन्हा पोलीस. त्या वेळी अल्पसंख्याकांचा पोलिसांवर बराच राग होता. परंतु तरीही जमावाने मला काहीच अपाय केला नाही. नंतर असे समजले की, मी जमावाशी उर्दूमध्ये बोलत होतो. त्यामुळे मीही अल्पसंख्याक समाजाचा आहे असा त्यांचा समज झाला. त्यामुळे मला कोणीच अपाय केला नाही.
आयुष्यामध्ये कुठली गोष्ट कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. त्या दिवशी माझे उर्दूचे ज्ञान माझ्या कामी आले आणि कदाचित त्यामुळे त्या दिवशी माझे प्राण वाचले. जीवनामध्ये कधी काय उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
आता दंगल भीषण स्वरूप धारण करू लागली होती आणि आमचे अग्निदिव्य चालूच राहिले.
दिनांक ७ जानेवारीच्या रात्री रघुनाथ महाराज रस्त्यावर दंगल चालू आहे, असा संदेश मिळाल्यावरून मी त्या ठिकाणी माझ्या स्टाफसह तत्काळ पोहोचलो. समोर दोन भिन्न जमातींचे जमाव समोरासमोर उभे ठाकले होते. त्यांच्यामध्ये रणकंदन सुरू होते.
मी जमावावर अश्रुधूर सोडण्याचा आदेश दिला. उत्तरादाखल जमावातून आमच्यावर गोळीबार झाला. एक गोळी सणसणत माझ्या कानाजवळून निघून गेली. मग मीही गोळीबाराचे आदेश दिले. त्यामुळे जमाव थोडा मागे हटला, परंतु पांगला मात्र नाही. त्यांची आपापसात लढाई सुरूच राहिली.
आता जमावाजवळ जाण्याखेरीज दुसरे काही गत्यंतर नव्हते.
एका बारीक बोळातून मी माझ्या काही लोकांसह जमावाकडे जाऊ लागलो. परिस्थितीची कल्पना करा. रात्री साडेअकराचा सुमार होता. सगळीकडे काळाकुट्ट काळोख होता. रस्त्यावरचे सर्व दिवे ट्रिपिंग करून बंद करण्यात आले होते. घरातले दिवेदेखील पूर्णपणे बंद होते. त्यामुळे नीट काही दिसत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तसेच पुढे सरकत होतो.
अशा वेळी आपले अंतर्मनसुद्धा खूप जागरूक असते. मला अचानक धोक्याची जाणीव झाली. वरून काहीतरी येत आहे असे वाटले. मी मागच्या बाजूला उडी घेतली आणि बचावासाठी माझा डावा हात वर घेतला. एका उंच इमारतीच्या टोकावरून कोणीतरी बाटली फेकून मारली होती. पण मी मागे उडी घेतल्यामुळे व हात वर केल्यामुळे माझा कपाळमोक्ष टळला. पण ती बाटली माझ्या वर केलेल्या हातावर प्रथम आपटली आणि मग खाली पडली.
जेव्हा उंचावरून काही वजनदार वस्तू फेकली जाते, तेव्हा ती एखाद्या मिसाइलप्रमाणे जोरात येते आणि या मिसाइलचा पहिला फटका माझ्या डाव्या मनगटावर बसला. बघता बघता माझ्या मनगटावर लिंबाएवढी सूज आली. वेदना होऊ लागल्या. परंतु समोर दंगल सुरू होती, त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. मी खिशातून रुमाल काढून तो मनगटाभोवती बांधला आणि आम्ही तसेच आगेकूच केले. जमावाच्या जवळ पोहोचून आम्ही लाठीचार्ज सुरू केला आणि अखेर त्या जमावांना पांगविले.
आम्ही घटनास्थळी उभे राहून पाहणी करत होतो. सर्वत्र गडद अंधार होता. अश्रुधूर, अर्थातच आम्ही सोडलेला, आमच्या डोळ्यांत जाऊन डोळ्यांची चुरचुर होत होती. तसेच धूरही हवेत तरंगत होता.
तेवढ्यात पलीकडे काही हालचाल जाणवली. त्यामुळे आम्ही पुढे सरसावलो. पाहिले तर तेथे माझे साहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर झेंडे आणि काही पोलीस उभे होते. पोलिसांनी बंदुका खांद्याला लावल्या होत्या आणि निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होते.
मला पाहून झेंडे चकित झाले आणि म्हणाले, "सर, आपण होय? आम्हाला वाटलं ते लोक परत आले. आम्ही आता फायरिंगची तयारी करत होतो." मी म्हटले, "अरे देवा! म्हणजे एकाच्या फायरिंगमधून वाचलो होतो, आता दुसऱ्या फायरिंगमध्ये सापडणार होतो की काय?"
तेवढ्यात दुसरीकडे गडबड सुरू झाली. गडबड तर सगळीकडे चालू होती. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळावे लागत होते. हाताला आता प्रचंड वेदना होत होत्या. परंतु त्या परिस्थितीमध्ये स्वतःकडे न पाहता परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे हे आवश्यक होते.
शेवटी पहाटे साडेतीन-चार वाजता जेव्हा घटना कमी होऊ लागल्या, तेव्हा मी सेंट जॉर्जेस हॉस्पिटलला गेलो. तेथे तपासून घेऊन औषधोपचार सुरू केला. माझा डावा हात स्लिंगमध्ये घालून माझ्या गळ्याभोवती अडकविला आणि पुन्हा आमची ड्युटी सुरू!
दंगलखोर आता आराम करायला गेले होते, परंतु ते भाग्य पोलिसांच्या नशिबी नसते.
दिनांक ८ रोजीही दंगलीचे स्वरूप रौद्र होते. जिकडे तिकडे आगी, लुटालूट, भोसकाभोसकी, दगडफेक असे सर्व प्रकार धिंगाणा घालत होते. आमची पळापळ सुरूच होती.
माझ्या हातालाही खूप वेदना होत होत्या. खिशामध्ये वेदनाशामक औषधे होती, पण ती रिकाम्या पोटी घेता येत नव्हती. त्या भागात खायला काहीच मिळत नव्हते. संपूर्ण भाग बंद होता. त्यामुळे कधी फुटाणे, कधी शेंगदाणे, कधी सुका पाव असे जे काही मिळेल ते खाऊन वेळ भागवावी लागत होती. बऱ्याच वेळा काहीच मिळत नव्हते, तेव्हा उपाशी राहावे लागत होते. माझ्या जवानांना जे खायला मिळेल तेच मी खायचो.
दुपारी नमाजाच्या वेळी मी गस्त घालत फिरत होतो. मी नूरबाग जंक्शन येथे आलो, तेव्हा नूरबाग मशिदीमधला नमाज संपला आणि मुसलमान बांधवांचा जमाव बाहेर पडू लागला.
एवढ्यात उमरखाडी भागातला एक हिंदू जमाव समोर आला.
दोन्ही जमाव समोरासमोर पाहून त्या दोन्ही जमावांचा गैरसमज झाला की आपल्यावर हल्ला होत आहे. त्यामुळे दोन्ही जमाव आक्रमक झाले. ते एकमेकांशी भिडणार असे वाटल्यामुळे मी माझ्या थोड्या स्टाफसह त्या दोन्ही जमावांच्या मध्ये जाऊन उभा राहिलो आणि त्यांना एकमेकांपर्यंत पोहोचण्यापासून थांबविले.
दोन्ही जमावांकडून दगडफेक चालूच होती. परंतु ते दगड एकमेकांना न लागता मध्ये उभ्या असलेल्या आम्हा पोलिसांना लागत होते. माझ्या उजव्या पायावर चांगलेच दगड लागले, पण आम्ही धीराने तसेच मध्ये उभे राहिलो आणि शेवटी समोरच्या एका जमावावर एक गोळीही झाडली आणि त्या जमावांना एकमेकांशी लढू दिले नाही.
माझा एक हात गळ्याभोवती बांधला होता, पायाने लंगडत होतो, परंतु तसाच सगळीकडे धावत राहिलो.
रात्री संदेश आला की चार नळ या ठिकाणी एक जमाव ट्रॅफिक पोलिसांवर गोळीबार करत आहे. त्या हद्दीचे इन्स्पेक्टर वयस्कर होते आणि ते त्या ठिकाणी जायला घाबरू लागले. मग मी त्यांना म्हटले की, "मी तर चाललो आहे. तुम्ही माझ्या मागे तरी याल का?"
तेव्हा ते म्हणाले, "सर, इथली पोरं पोलिसांच्या गाड्या उलट्या करून टाकतात."
अर्थात हे खरे होते. मी स्वतःही ते पाहिले आणि अनुभवले होते.
तेव्हा मी त्यांना म्हणालो की, "असे जायचे नसते. मी तुम्हाला दाखवतो कसे जायचे ते."
मग मी पाच-सहा पोलीस गाड्यांचा ताफा तयार केला. त्यामध्ये एसआरपीच्या गाड्यादेखील होत्या. एसआरपीच्या जवानांना आधीच सूचना दिल्या होत्या की, तेथे फायरिंग चालू असेल तर हुकमाची वाट न पाहता उतरल्याबरोबर ताबडतोब फायरिंग सुरू करायचे आहे.
आमचा ताफा धडधडत त्या ठिकाणी पोहोचला आणि तिथे गोळीबार सुरू असल्यामुळे एसआरपीच्या जवानांनी गोळीबार सुरू केला.
जमावाची पांगापांग होताना दिसल्यावरती मी तत्काळ फायरिंग थांबविले आणि त्यानंतरही गोळ्यांचे आवाज येत राहिले.
तेव्हा मी त्या एसआरपीच्या अधिकाऱ्याला ओरडलो की, "तुम्हाला सांगितले तर फायरिंग थांबवा, कळत नाही का?" तो मला म्हणाला, "सर, आम्ही कोणीही फायरिंग करत नाहीये. फायरिंग समोरच्या बाजूने होतेय."
तेव्हा मी पाहिले, तर खरेच समोरच्या बाजूने जमावाकडूनच फायरिंग होत होते. पण तो जमाव तर लांब पळाला होता.
मग आम्ही थोडे जवळ जाऊन पाहिले, तर एक मनुष्य गोळी लागून पडलेला आढळून आला. तेव्हा मी पुन्हा एसआरपीवर चिडलो आणि त्यांना म्हणालो, "इतक्या राउंड झाडल्या आणि एकच गोळी लागली तुमची!"
परंतु सत्य तसे नव्हते. कारण नंतर थोड्या थोड्या वेळाने बातम्या येऊ लागल्या. वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये वेगवेगळे लोक जाऊ लागले. त्या गोळीबारामध्ये एकूण आठ लोक मयत झाले आणि नऊ-दहा जण जखमी झाले.
९ तारखेला सकाळी जेव्हा मी गस्त घालत चार नळपाशी आलो, तेव्हा असे आढळून आले की, रात्रीच्या फायरिंगचा जबरदस्त परिणाम झाला होता. काळे कुत्रेसुद्धा बाहेर पडायला मागत नव्हते.
एवढ्यात बिनतारी संदेशावर संदेश मिळाला की, दोन टाकी येथे लष्कराचे ध्वजसंचलन सुरू होते. अल्पसंख्याक समाजाच्या तीनशे स्त्रियांनी त्यांचा रस्ता अडविला आहे.
मी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. लष्कराची तुकडी उभी होती. त्यांच्यापुढे पोलीस उभे होते आणि त्यापलीकडे काही अंतरावर त्या स्त्रिया उभ्या होत्या. त्या तिथून हलायचे नाव घेत नव्हत्या.
मी परिस्थितीची पडताळणी केली आणि माझ्या अश्रुधूर पथकाला पुढे बोलावले. त्यांना आदेश देऊन आम्ही अश्रुधुराचा एक गोळा त्या स्त्रियांच्या दिशेने फायर केला.
त्या थोड्या मागे हटल्या, पण पुन्हा तशाच उभ्या राहिल्या. मग आम्ही अश्रुधुराचा आणखीन एक गोळा त्यांच्या दिशेने झाडला. त्या आणखी मागे हटल्या आणि आम्ही पुढे सरसावलो. असे करत आम्ही तो रस्ता मोकळा करून घेत होतो.
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बारीक बारीक चिंचोळ्या अशा अनेक गल्ल्या आहेत. तेथे लोकवस्तीही अत्यंत दाट आहे. त्या गल्ल्यांमधून त्यांचे पुरुष आमच्यावर मिळेल त्या हत्याराने हल्ला करून आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. बाटल्या, दगड, पेट्रोल बॉम्ब आणि बंदुकादेखील आमच्याविरुद्ध वापरल्या जात होत्या.
त्या भागात प्रचंड कोलाहल माजला होता. सगळीकडे आरडाओरडा होत होता. अश्रुधुराचा धूर पसरलेला होता.
तेवढ्यात कोणीतरी आम्ही फेकलेला अश्रुधुराचा गोळा उचलून फुटायच्या आतच उलटा फेकला. तो नेमका माझ्या तोंडावर येऊनच फुटला. प्रचंड प्रकाश चमकला आणि नंतर सगळीकडे अंधकार पसरला. मी बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळलो.
सुदैवाने हे ठिकाण जे.जे. हॉस्पिटलपासून अगदी जवळ होते. शिवाय कर्फ्यू असल्यामुळे रस्त्यावर अजिबात वाहतूक नव्हती. त्यामुळे अक्षरशः एक-दीड मिनिटामध्ये मला जे.जे. हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी "काय झाले?" विचारले असता अश्रुधूर सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब प्राणवायूचा मुखवटा माझ्या तोंडावर लावला आणि त्वरित प्राणवायूचा पुरवठा सुरू केला.
त्यानंतर माझी तपासणी करून मला अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आले. नंतर तेथून मला मुंबई हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. माझा चेहरा सुजला होता. भुवया जळल्या होत्या. आठवडाभर इस्पितळात राहावे लागले.
नंतर डॉक्टरांनी असा खुलासा केला की धुरामुळे आणि गॅसमुळे माझ्या शरीरातील आणि रक्तातील प्राणवायूची पातळी अत्यंत धोकादायकरीत्या कमी झाली होती. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे प्राणवायूचा पुरवठा त्वरित सुरू झाला. अन्यथा बिकट प्रसंग ओढवला होता.
काही काळ मी आणि मृत्यू एकमेकांच्या डोळ्यांत डोळे रोखून पाहत होतो.
अखेर मृत्यू मागे हटला आणि मी या अग्निदिव्यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो.
मिसळपाव
प्रतिक्रिया