Skip to main content

दिवाळी अंक २०२२ - द्वाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 05/11/2022 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
"वाचूनही कविता नच कळली असे न माझे व्हावे कोश कोणते यास्तव घरी मी आणुनी ठेवावे?" विचारले ऐसे मी कविला - हसुनी खिन्न तो वदला, "कविता माझी आजवरी का कळली कोणाला?" "शब्दांची आतशबाजी अन् मोडजोड मी करितो - जरा रेटुनी अर्थ त्यातूनी शोधावा तो मिळतो. जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित ते ते मजला गमते दुर्बोधाच्या गर्द सावलीत कविता माझी रमते. शब्द बुडबुडे केवळ असती अर्थही अवघा भास सत्य चिरंतन ऐस जाणुनी शिणवू नको मेंदूस. अर्थ जसा गवसेल तसा तो ठोकुनी दे ना तूही शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची फिरवशील ना द्वाही?"

वाचने 4098
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित ते ते मजला गमते दुर्बोधाच्या गर्द सावलीत कविता माझी रमते. कविवर्य ग्रेस आठवले. आपल्याला शब्दांशी चांगले खेळता येते. सुदंर रचना.

दुर्बोधाची गर्द सावली .. - छान. आवडल्या या ओळी. अर्थ जसा गवसेल तसा तो ठोकुनी दे ना तूही शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची फिरवशील ना द्वाही?" हे आवाहन लक्षवेधीच ... नक्कीच अनंतयात्री एकंदरीत छान कविता!

जे जे अमूर्त, जटिल, अकल्पित ते ते मजला गमते सगळी कविताच क्लास आहे!

छान कविता. "शक्य तिथे मम श्रेष्ठत्वाची फिरवशील ना द्वाही?" हे मस्तच!

मस्त

आवडली!!! दुर्बोधाच्या गर्द सावलीत कविता माझी रमते. हे खास.