Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : अलक - अनुभव

लेखक मालविका यांनी मंगळवार, 02/11/2021 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
कोरोनाने एक वर्षभर सगळंच बंद. शाळा बंद, काम घरून चालू. अजूनही पुढचं वर्ष आलं तेही तसंच. परत शाळा नाही हे मे महिन्यात कळल्यावर त्याने मुलांसह गाव गाठलं. कधीतरी सुट्टीसाठी जाणारी सगळी गावात खूप दिवसंकरिता राहायला आली. त्याने मुलांना आपलं शेत दाखवलं. नुसतंच दाखवलं नाही, तर गडीमाणसांबरोबर त्यांना शेतात कामालादेखील लावलं. सुरुवातीला जरा कुरकुर केली मुलांनी, पण मग त्यांना त्यातली मजा कळायला लागली. भातशेती कशी करतात हे केवळ पुस्तकात वाचलेलं ज्ञान समोर कृतीत बघताना छान वाटत होतं. नांगरणी, पेरणी करताना वेगळा अनुभव मिळाला. लावणीच्या वेळी तर चिखलात मनसोक्त खेळले. आता दिवाळी आली. शेतातला भात कापणीला तयार झाला. हे थोडं जास्त कसरतीचं काम त्यांना अवघड गेलं. पण स्वतःच्या मेहनतीवर पोरं खूश होती. या दिवाळीला नुसतेच नवीन कपडे घेऊन फटाके फोडण्यापेक्षा दारच्या गडी माणसांना फराळ आणि कपडे वाटप करून मिळणारा आनंद त्यांना जास्त समाधान देऊन गेला.

वाचने 2461
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मातीत खेळलो की मातीशी नाळ जुळायला लागते अतिशय उत्तम केलेत

ठीक वाटली. धन्यवाद.