दिवाळी अंक २०२१ : दवबिंदू
दवबिंदू
धुक्यावर अलगद होउन स्वार
नभातून उतरे दवबिंदू फार
रात्रीच केली प्रवासाला सुरुवात
पहाटेच आले झाडा पानाफुलात
दवांनी हळूच आगळीक हो केली
हळूच आले ते पानाफुलांच्या गाली
दवांनी पाडली पानाच्या गाली खळी
पानातुन उमले इवलीशी कळी
फुलाला घातला दव हिऱ्यांचा टोप
पानांच्या गळ्यात हिऱ्यामोत्यांचा गोप
वाऱ्याने झाडाची हळू काढली खोडी
हळूच केली त्याने दंगामस्ती थोडी
झाडावर मारली इवली फुंकर
फुलांवरून घसरे मोती सरसर
झाडाच्या अंगावर आला की शहारा
पाहून हसला गाली खट्याळ वारा
दवांच्या गारव्यात फुला वाजे थंडी
सूर्याने घातली किरणांची रे बंडी
किरणांना पाहू दवबिंदू रुसले
फुरंगटून जात धुक्यात बसले
फुलाला दव म्हणे जातो आम्ही आता
पहाटे येऊ पुन्हा मारायला बाता
दिवसभर फूल उन्हात रापले
रात्री दवांचे स्वप्न बघत झोपले
पहाटे दवांने केले ओले शिंपण
फुलाभोवती घाली मोत्याचे कुंपण
फुलाला आली पहाटे पहाटे जाग
दवांनी भरली पुन्हा एकदा बाग
सौ. उज्वला ढमढेरे
चिंचवड पुणे ३३
वाचने
4744
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
गोड गोड
दिवसभर फूल उन्हात रापले रात्री दवांचे स्वप्न बघत झोपले:)फुलराणी
छान
छान.
कविता आवडली
छान कविता.
आवडली
कवीता तर कवीता