एक वाद्य आणि तीन पिढ्या
यापूर्वी मैफलीत व्हायोलीन पाहिले होते कुणा प्रथितयश गायकाच्या साथीला. पण ते प्रमुख वादक म्हणून नाही. असामान्य म्हणून श्रीधर पार्सेकरांचे फक्त नाव ऐकून होतो. पण त्यांचे वादन कधी ऐकले नाही. प्रमुख वादक म्हणून व्हायोलीन पाहिले ते व्ही.जी. जोगांच्या हातातले साधेसुधे व्हायोलीन. लालसर रंगाच्या पॉलिशमधले. व्हायोलीनचे ते रूपडे फारसे आकर्षक नव्हते. मधूनच गजाची तक्रार करीत किरटा स्वर काढणारे. गजही छोटासाच. सुमार दर्जाच्या त्या व्हायोलीनमधून व्ही.जी. जोग दैवी स्वरातून अलौकिक वादन करीत. त्या काळी गजाला बांधलेले केस घोड्याच्या शेपटीचे असतात, असे कुठेसे ऐकलेले. कधीकधी गज व्हायोलीनच्या तारांवरून पुरेसा ध्वनी निर्माण न करतांच घसरूं लागे. मग गज धूपासारख्या कसल्याशा चिक्कट रेझीनवर घासला जाई आणि गज पूर्ववत ध्वनी निर्माण करूं लागे.
व्ही.जी. जोग बृंदावनी सारंग https://www.youtube.com/watch?v=bJvS8glmU2c
नंतरच्या काळात त्यांनी लांब गज वापरला, पण किरटे ध्वनी काही पूर्ण थांबले नाहीत.
राग जोग https://www.youtube.com/watch?v=0QXJiDFzpBs
डॉ. एन. राजम.
मी त्यांना कधी प्रत्यक्ष पाहिले नाही वा कधी भेटलोही नाही. चित्रवाणीच्या पडद्यावर त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले की जणू साक्षात सरस्वतीचेच दर्शन होते. माझ्यापुरते मी त्यांना विदुषीताई म्हणतो. त्यांच्या हातातल्या गजाने प्रथम माझे लक्ष वेधून घेतले होते.
फिलहार्मनिक ऑर्केस्ट्रातल्या वादकांच्या गजासारखा दिमाखदार, लांबसडक गज. फिलहार्मनिक ऑर्केस्ट्रातल्या व्हायोलीनवादकांचे गज खास शाही सोहळ्यात राष्ट्रप्रमुखांना मानवंदना देणार्या सैनिकांच्या एकलयीतल्या डौलदार पदलालित्यासारखे डौलदार, एका लयीत हलताना दिसतात. तस्साच लांबसडक गज. गजावर नाजूक, लांबसडक बोटांतली स्थिर, ठाम पकड. व्हायोलीनमधून निघणारा मंद्रस्वरांना ठळक करणारा भारदस्त टिंबर. स्वरमध्याचे ठाव घेणारी आलापी. ठरावीक स्वरांवर वजन देत विचारपूर्वक केलेले मॉड्युलेशन स्वरावलीला मोहक, रेखीव आकार देतें.
चेन्नईत १९३८ साली जन्मलेल्या विदुषीताईंनी आपले पिताश्री ए. नारायण अय्यर यांच्याकडून कर्नाटक संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. विदुषीताईंचे बंधू टी.एन. कृष्णन हेदेखील कर्नाटक संगीतातले सुप्रसिद्ध व्हायोलीनवादक होते. गायकी अंगाने व्हायोलीनवादन करणार्या विदुषीताईंनी नंतर मुसिरी सुब्रमण्यम अय्यर यांचे शिष्यत्व पत्करले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर कर्नाटक संगीत विश्व त्या नक्कीच गाजवू शकल्या असत्या.
पण काही माणसे वेगळ्याच मातीची बनलेली असतात. ही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडतात. सुख, समृद्धी, सुरक्षित, ऐशआरामाचे सुखासीन आयुष्य, प्रसिद्धीच्या झोताची झळाळी, कशाचीच भुरळ न पडता आपल्या ध्येयाच्या पूर्णतेचा अपूर्व ध्यास घेऊन आगळावेगळा मार्ग चोखाळतात. समोर दिसणारे अनेक राजमार्ग सोडून वहिवाट नसलेली एखादी अनवट, अवघड स्वीकारतात आणि ती वाट आपल्या चमकदार कर्तृत्वाच्या अपूर्व झळाळीने ती अनवट वाट उजळून ठेवतात.
दक्षिण भारतातील सुखाचे घर सोडून त्या गुजरातेत राहायला गेल्या. एक अपूर्व ध्यास घेऊन. पंडित ॐकारनाथ ठाकूर यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यास घेऊन. 6B पेन्सिलीच्या वा व्हाईट बोर्ड मार्करच्या जाड रेषांनी छोट्या छोट्या नक्षीदार रेघोट्या निघाव्यात, काही रेषांच्या पुंजक्यातून एखादे छोटेसे नक्षीदार चित्र निर्माण व्हावे, तसे पाच-दहा छोट्या छोट्या स्वरमालिकांतून उमलणारे आकर्षक स्वरचित्र; अशा आकर्षक स्वरचित्रांतून मांडलेली आलापी, विलंबित आणि द्रुत ख्याल हे मला जाणवलेले ॐकारनाथांच्या ख्यालगायनातील वैशिष्ट्य. पुढील दुव्यावर याची झलक दिसून येते.
ॐकारनाथ ठाकूर - मालकंस - https://www.youtube.com/watch?v=Ia1X6S5rims
खाली दिलेल्या दुव्यावर विदुषीताईंचे मधुवंती रागातले कन्या आणि नातींसह केलेले वादन मी जेव्हा ऐकले, तेव्हा मला त्या स्वरांतून सतत ॐकारनाथांची गायकी ऐकू येत राहिली. ॐकारनाथांची आवाज लावण्याची पद्धत, सुरुवातीला संयत स्वर लावून आलाप घेताना मॉड्युलेशनचा मुक्त वापर विदुषीताई करतात. द्रुतकडे झुकलेल्या मध्यलयीतल्या एकीतून निघणारी दुसरी अशा छोट्या छोट्या नक्षीदार स्वरावली. काही आवर्तनानंतर या छोट्या स्वरावलींचे तुकडे जोडले जाऊन अचानक देखणे स्वरचित्र झाल्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय.
फक्त जाड ठळक रेषांची जागा आता त्याच वळणाच्या पण आकर्षक रंगातल्या स्केचपेनमधून निघणार्या नाजुक रंगीत रेषांनी घेतली होती. सुखद आश्चर्य म्हणजे अंगावर येणार्या थरारक ए ऽऽ एऽऽऽ एऽऽ एऽऽऽऽ अशा एकारी तानांचे स्वरचित्र मात्र स्वतःचा कायापालट करून येते. आपली मनोमन वाहवा घेऊन वेगळ्याच नाजूक स्वरूपात मनात रेंगाळू लागते. तू-नळीवर विदुषीताई, त्यांची कन्या संगीता शंकर आणि संगीता शंकर यांचे बहारदार वादन ऐकले आणि हरखून गेलो. एकतर मधुवंती हा माझ्या आवडत्या सुंदर रागांपैकी एक आणि निवडलेली लयही बर्यापकी वेगाची; शास्त्रीय संगीत ऐकण्याचा सराव नसलेल्यांसाठी कंटाळवाणी न वाटणारी. शक्यतो पुढील तू-नळी चित्रध्वनी होम थिएटर वा हेडफोनवर ऐकावी.
व्यवस्थित केलेले व्यावसायिक चित्रीकरण. छोट्या आकाराचे दीर्घवर्तुळाकृती सभागृह. त्यातला प्रकाशित केलेला मंच. समोरून मंचाकडे पाहताना डावीकडे दिसणारा लांब केसांचा स्निग्ध नजरेचा बाळसेदार तबलजी. त्याच्यानंतर रागिणी, मध्यभागी विदुषीताई, त्यांच्या बाजूला त्यांची कन्या संगीता तिच्या बाजूला तिची दुसरी कन्या नंदिता शंकर. मधुवंतीची पकड केव्हा मनाची पकड घेते कळत नाही. दीर्घ पल्ल्याच्या seamless आलापांतून व्यक्त होणारा ठोस, सौंदर्यपूर्ण स्वरविलास. नंदनवनातल्या एखाद्या सुंदर बागेत बसून स्वरानंद घेतो आहे असे वाटले.
विदुषीताईंच्या आलापीच्या एकदोन आवर्तनांनंतर त्यांची कन्या संगीता शंकर स्वर उचलते. तिच्या व्हायोलीनचा ध्वनी येतो. आश्चर्याचा गोड धक्का. तेच टिंबर, दोन्ही वाद्ये एकाच स्वरात मस्त लागलेली. तोच आकर्षक, बांधेसूद स्वरविचार आणखी रेखीव, स्पष्ट करणार्या छोटे तुकडे जोडून निर्माण केलेल्या तशाच स्वरावली.
दहाव्या मिनिटाला सवाल-जबाब सुरू होतात. रागिणी शंकर आणि तिच्यापाठोपाठ नंदिता शंकर. तबलजीच्या बाजूला बसलेल्या रागिणीच्या काहीशा कृश, कोमल शरीरावर खट्याळ शाळकरी मुलीसारखा चेहरा. देवीला वाहिलेल्या प्राजक्तासारख्या नाजूक फुलाचे व्यक्तिमत्त्व. पण व्हायोलीनमध्ये तेच टिंबर, तोच भारदस्त स्वर. वादनात वयाला न शोभणारा दिमाखदार ठेहराव. कधी गज अतिशय धीमेपणे व्हायोलीनच्या तारेवरून सरकतो आहे पण चपल, हरकती, मुरक्यांसारक्या स्वरावली निघताहेत. झोंकदार स्वरवळणावरून जाताना हिने मानेला दिलेला हलकासा हेलकावा. चेहर्यावर मनासारखी सुरावट जमल्याचा अपार आनंद. आपल्या आनंदाची गोष्ट म्हणजे ध्वनियोजनेतून डावीकडचे आवाज डावीकडून आणि उजवीकडचे आवाज उजवीकडून येतात. प्रतिध्वनी मात्र किंचित त्रासदायक; त्यामुळे तबल्याचे बोल स्पष्ट ऐकू येत नाहीत. पण रसभंग मात्र होत नाही.
बैठक भारदस्त घेतली असली, तरी नंदिताच्या चेहर्यावरचे कोवळेपण लपत नाही. नंदिताने स्वरावलीचा ताबा घेतला, तेव्हा मात्र धक्क्यांची नवलाई ओसरली होती. तरीही ठळकपणे जाणवले ते तेंच टिंबर, तस्सेच धीमे, स्थिर, शिस्तबद्ध गजकाम आणि स्वरांची तीच नजाकत. सुरांशी लपालपी आणि लयीशी शिवाशिवी खेळत केलेली दोघींचीही मांडणी आत्मविश्वासपूर्ण. कुठेही घाई नाही, गडबड नाही, मिजासही नाही.. केवळ स्वरमाध्यमातून नम्रतेने केलेली ईश्वराराधना. मी कणमात्र आहे आणि संगीतसागर अफाट, अपार आहे हे सांगणारे सादरीकरण. तरीही चेहर्यावर अधूनमधून विलसणारा भोज्जाला शिवल्याचा निखळ आनंद.
या दोघींचे सवाल-जबाब सुरू झाले आणि ध्यानात आले की छोट्या छोट्या, मधुर हरकतींनी युक्त असा स्वरमाला जोडून मोठे नक्षीदार स्वरचित्र उभे करणारी हीच ती ॐकारनाथांची शैली. पण अरेच्चा, स्केचपेनच्या नाजूक, रंगीत रेषांनी बनलेले हे रेखाचित्र सपाट कॅनव्हासवर नाही, तर झुळझुळत फडकणार्या तलम रेशमी वस्त्रावर आहे. दोघी जणी तालाला असे सुरेख झोके देऊ लागतात की हवेत लहरणार्या या सुंदर वस्त्राबरोबर आपणसुद्धा हवेत लहरतो.
ठोस, रेखीव स्वरविचारामुळे लयीच्या दोन ठोक्यांतले अंतर प्रशस्त वाटते. तालाशी झिम्मा खेळता खेळता समेवर येतानाच्या स्वरावली घेताना कुठेही घाईगडबड दिसत नाही. प्रत्येक सम समोर बसथांबा दिसावा तशी दिसत राहते अणि येऊन जाताना मस्त राजेशाही दिमाखात, तोर्यात मिरवून जाते. तबलजी जेव्हा स्वरांचा पाठलाग करतो, तेव्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करता मनोहर बोलाक्षरे काढताना घाटदार तालाची सृष्टी उभी करतो त्यामुळे स्वरसौंदर्य आणखी आणखी खुलून दिसते. मंद्रसप्तकातल्या गमकयुक्त ताना वजनदार असून रेखीव सौंदर्यामुळे बोजड वाटत नाहीत.
चित्रदिग्दर्शकाची मांडणी फारच कल्पक आहे. शेवटी एकेका वादकाचे एकल स्वरदर्शन सुरू असताना त्या त्या वादकाच्या चेहर्यावरील मनोहर विभ्रम आपल्याला पडद्यावर दिसतात आणि कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते.
एकापेक्षा जास्त गायक-वादक जेव्हा समूहाने सादरीकरण करतात, तेव्हा स्वरविचाराच्या मांडणीच्या एकसंधतेला छेद जाण्याची शक्यता असते. वैयक्क्तिक महत्त्वाकांक्षेतून सहकार्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्नही होतात्त. सादरीकरण उंचावण्यासाठी आव्हाने, प्रतिआव्हाने दिली जातात. इथे चार व्यक्ती, चार वाद्ये असली तरी मांडणी रेखीव, एकसंध, एकजिनसी. कुठेही शिवण दिसत नाही, ठिगळ लागल्याचा भास नाही. जणू मंचावर एकच व्यक्ती एकच वाद्य आहे. वाद्ये चार, वादक चार. पण फलरस, साखर इत्यादी पाण्यात विरघळून सुधारस बनावा, तसे इथे सारे वादन एकजिनसी. हा सुधारस रसनेने नव्हे, तर कानांनी चाखायचा आहे. विदुषीताईंच्या चेहर्यावर कौतुकाची निसटती छटा, पण करडी नजर धारदारच.
स्वरगंगेच्या प्रवाहातून प्रवास करतांना बावीस मिनिटे चाललेला हा स्वरानंद संपन्न होतो आणि एका स्वरानंदाची अनामिक पण विलोभनीय आठवण मागे ठेवून जातो.
तीन पिढ्या मधुवंती - https://www.youtube.com/watch?v=bD_HbiO4hC8
सुगम संगीताच्या रसिकांसाठी आणखी काही दुवे खाली देतो आहे.
करम की गती न्यारी - https://www.youtube.com/watch?v=ax6lSmn56_8
संगीता शंकर अणि महेश राघवन - Breezy Sunday: https://www.youtube.com/watch?v=1m6af3__IS8
रोजा जानेमन - नंदिनी शंकर आणि महेश राघवन - https://www.youtube.com/watch?v=2YHEnW0XT2M
तुम जो मिले हो - https://www.youtube.com/watch?v=GzQhmLhA5Kw&list=OLAK5uy_kWGI9-4wenKCaT…
आज जाने की जिद ना करो - फरीदा खानुम - https://www.youtube.com/watch?v=_gNUQsj1O7g
आज जाने की जिद ना करो - नंदिनी शंकर - https://www.youtube.com/watch?v=r67XAdA3owY
वंदे मातरम - https://www.youtube.com/watch?v=958tIi0JSJo
रागदारी वाद्यसंगीतात जास्त स्वारस्य असलेल्यांसाठी आणखी दुवे -
एन राजम आणि रागिणी - राग बागेश्री - https://www.youtube.com/watch?v=csGk5oMvo_w
नंदिनी शंकर - बागेश्री - https://www.youtube.com/watch?v=HcdScgfNMWY
रागिणी शंकर - बिहाग - https://www.youtube.com/watch?v=Xpc_zNWS848
वाचने
11724
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
छान लिहिलंय. खरं तर अनेकदा
छान लिहिलंय. खरं तर अनेकदा
फारच सुरेख
धन्यवाद ....
शास्त्रीय संगीत हा माझा
In reply to धन्यवाद .... by सुधीर कांदळकर
छान लेख
सुंदर लेख, या विषयातील
सुंदर लेख
रसग्रहण वाचून थक्क झालो
अनेक अनेक धन्यवाद ......
टिंबर, मॉड्युलेशन, जुगलबंदी, चर्चमधील ऑर्गन वगैरे..
In reply to अनेक अनेक धन्यवाद ...... by सुधीर कांदळकर
@तुषार काळभोर .....
खूपच छान!
सुंदर लेख !
@ चित्रगुप्त : ......
जुगलबंदी
In reply to @ चित्रगुप्त : ...... by सुधीर कांदळकर
॒@ नितीन पालकर .....
सहवादन सहगायन हा शब्द प्रयोग
@ नीळकंठ देशमुख: माझ्या समजुतीप्रमाणे .......