नशा - एक चिंतन!
नशा!
आमच्या असे लक्षांत आले आहे की नशा या विषयावर मि. पा. वर बरेच लिहिले जाते. त्यातील बहुतेक लाईट, थट्टामस्करीच्या स्वरूपातील असते. काही जि़ज्ञासू लोकांनी ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने विचारलेले प्रश्न असतात, तर काही अज्ञ कॉमेंन्टस ही असतात. परंतु प्रस्तुत प्रयत्न मात्र या विषयावर काही गंभीर विचार मांडण्याचा आहे.
नशा म्हणजे काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे. मटेरिया मेडिकाच्या व्याख्येनुसार (मराठीत अनुवादित) जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात. लक्षात घ्या, "शांत" किंवा "आनंदी" अवस्था नव्हे, तर "शिथील" अवस्था! या अवस्थेत माणूस शांत अथवा उत्तेजित, किंवा आनंदी अथवा दु:ख्खीही असू शकतो.
जेंव्हा मादक पदार्थाचे सेवन केले जाते तेंव्हा त्या पदार्थातील मादक द्रव्य रक्तात शोषले जाते. मेंदू प्रथम शिथील अवस्थेत जातो कारण शरीरातील जास्त रक्तपुरवठा हा मेंदूला होतो. मज्जसंस्था शिथील झाल्याने हलके वाटू लागते. एरवीच्या वेदना, दु:ख्ख, चिंता सुसह्य वाटू लागतात. जेंव्हा अधिक मादक द्रव्य रक्तात जाते तेंव्हा हळूहळू मज्जासंस्थेचा स्नायूंवरचा ताबा सुटतो (पावले अडखळणे, वगैरे...). सरतेशेवटी, मादक द्रव्याचा अतिरेक झाल्यास मज्जासंस्था आपले काम तात्पुरते थांबवते, त्यालाच आपण "माणूस आउट झाला" असे म्हणतो. हा परिणाम फक्त मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन केल्यावरच होतो आणि तोसुद्धा तात्पुरताच असतो.
सर्वसाधारणपणे नशा ही दारू किंवा मदिरेमुळे येते असे मानले जाते पण ते तितकेसे खरे नाही. मदिरेखेरीज इतर अनेक पदार्थ नशा आणू शकतात. मदिरा जरी द्रवपदार्थ म्हणून सेवन केली जात असली तरी इतर अनेक मादक पदार्थही द्रवात घालून सेवन केले जातात, उदा. भांग. पदार्थ सेवनाच्या इतरही पद्धती असू शकतात, उदा. तंबाखू चावून किंवा धुम्रपान करून, अफू चिलिमीतून, तपकीर आणि कोकेन नाकातून आत ओढून, हेरॉईन इंजेक्शन घेऊन वगैरे... सर्व प्रकारांचा उद्देश व परिणाम सारखाच असतो.
नशेच्या दुष्परिणामाबद्द्ल बरेच लिहिले व बोलले जाते. ते खरे नशेचे दुष्परिणाम नसून मादक पदार्थांच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम असतात. हे परिणाम मुख्यत: मेंदूवर नसून इतर अवयवांवर असतात. उदा. धूम्रपानाचा फुफ्फुसांवर तर दारुचा यकृतावर दुष्परिणाम होतो. असे दुष्परिणाम हे अती व/वा दीर्घकालीन सेवनानेच होतात. तसे परिणाम मादक पदार्थांमुळेच नव्हे तर इतरही पदार्थांमुळे होऊ शकतात. उदा. जास्त गोड पदार्थ खाल्ले की मधुमेह होउ शकतो तसेच जास्त तेलकट पदार्थ खाल्ले तर रक्तवाहिन्या अरुंद होऊन हार्टऍटॅक येऊ शकतो. आमच्या माहितीतल्या एका मादक पदार्थाचे सेवन तर सोडाच पण मांसाहारही न करणार्या आयुष्यभर शाकाहारी असलेल्या गृहस्थाला हार्टऍटॅक आलेला आम्हाला माहिती आहे. जास्त तिखट पदार्थ वारंवार खाल्ले तर आतड्याचे अल्सर (व मूळव्याध!) होऊ शकतात. तेंव्हा अती सर्वत्र वर्जयेत हा नियम मादक पदार्थांनाच नव्हे तर सगळ्याच पदार्थांना लागू पडतो. नशेचे खरे दुष्परिणाम म्हणाल तर नशील्या अवस्थेत जर मन एकाग्र करावी लागणारी कामे (उदा. ड्रायव्हिंग, हेवी मशीनरी चालावणे वगैरे) करायचा प्रयत्न केला तर धोका संभवू शकतो. पण सुरक्षित वातावरणाची खात्री करून माफक नशा करण्यात कसलाही गंभीर धोका नसतो.
नशा करणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही, हे पाश्चात्य फॅड आहे असाही एक हास्यास्पद मुद्दा मांडला जातो. याच्याइतकं असत्य तर काही नाही!! अगदी आर्यांच्या काळापासून भारतात नशापान होत असल्याचे दाखले आहेत. आमच्या पुरातन ग्रंथामध्येही आमचे देवादिक व ऋषीमुनी सुरापान करत असल्याचे दाखले आहेत. ज्या विवेकानंदांचा आधुनिक संत म्हणून सार्थ उल्लेख होतो ते ही तंबाखूचे सेवन करीत असल्याच्या नोंदी आहेत. हे सेवन त्यांच्या परमेश्वरप्राप्तीच्या आड येऊ शकले नाही. आजही भारतीय बहुजनसमाजामध्ये मदिरा, भांग यांचे सेवन मुक्त पद्धतीने केले जाते. तेंव्हा हा प्रतिबंध (टाबू) फक्त आपले काहीतरी वेगळे कृत्रिम वैशिष्ट्य निर्माण करून पोट भरणारर्या पुरोहितवर्गाने निर्माण केला आहे असे माझे मत आहे.
आणि गंमत म्हणजे हे लोक सुद्धा स्वतःच्या नकळत नशा करीत असतात ज्याची त्यांना जाणीवही नसते. उदा. चहात टॅनिन व कॉफीत कॅफिन नांवाचे मादक द्रव्य असते. कोकाकोल्यात व इतर सॉफ्ट ड्रिंक्समध्येही कॅफिन असते. श्रीखंडाने येणारी सुस्ती त्यातील जायफळामध्ये असलेल्या मादक द्रव्यामुळे येते. इराण्याच्या चहात खसखस उकळ्वलेली असते, ती खसखस व अफू ही एकाच झाडापासून तयार होतात. "शक्तिवर्धक" द्राक्षासवात अल्कोहोल असते. पण अज्ञानामुळे हे सर्व दुर्लक्षिले जाते. तेंव्हा पुढ्च्या वेळेस मदिराभक्तांना नांवे ठेवाल तेंव्हा आधी जरा विचार करा की आपण खरोखरच नशामुक्त आहोत का!!! मी इथे फक्त पाच-सहा उदाहरणेच दिली आहेत पण ही यादी खूप मोठी आहे, तुमच्या फार्मसी शिकणार्या स्नेह्यांना विचारा...मदिराभक्तांबद्दल तर असे म्हणता येईल की ते आपली आवड प्रगटपणे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा दर्शवतात!
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नशा ही सर्वस्वी वाईट गोष्ट आहे हा समज चुकीचा आहे. कधीकधी नशा हे वरदान ठरते! देव करो आणि वेळ न येवो पण जर कधी तुमचे पोट कापून ऑप्रेशन करायची वेळ आली तर ते ऍनेस्थेशिया दिल्याशिवाय करायला तुम्ही तयार व्हाल का? तेंव्हा तुम्हाला दिली जाणारी मादक द्रव्ये तर दारू सोडाच पण कोकेन व हेरॉईनच्या तोंडात मारणारी असतात. परंतु त्या वेळेस ती वरदानच ठरतात. अपघातात खूप जखमी झालेल्या माणसाला बरे करतांना त्याच्या वेदना सुसह्य करण्यासाठी मॉर्फिनसारखी अतिशय मादक द्रव्ये दिली जातात ति नशा चूक की बरोबर? कॅन्सर झालेल्या रोग्यांना अखेरच्या अवस्थेत निदान मॄत्यूपूर्वी त्यांच्या वेदना विसरता याव्यात व शांतपणे मॄत्यू यावा यासाठी मॉर्फिनची इंजेक्शने दिली जातात ती नशा चूक की बरोबर? अगदी साधे उदाहरण द्यायचे तर आजची एकतरी शहरी महिला एपिड्यूरल किंवा तत्सम इंजेक्शन घेतल्याशिवाय बाळंतपण करून घेईल काय?
सारांश काय की नशेत चांगले किंवा वाईट असे काही नाही, ती एक अवस्था आहे. मात्र ही अवस्था एखाद्या बाह्य पदार्थाच्या सेवनानेच प्राप्त होऊ शकते. मानवी शरीर आपल्याआपण ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकत नाही. जीवनातील इतर सर्व गोष्टीप्रमाणेच तिचा अतिरेक वाईट असला तरी तिच्या माफक अंगिकारामध्ये काहीही गैर, असंस्कृत वा अपायकारक नाही.
तळटीपः एका रसायनशास्त्राच्या अभ्यासकाच्या व भाकडतथांवर विश्वास न ठेवणार्या संशोधकाच्या नजरेतून वरील विचार मी मांडले आहेत. त्यांत काही चुका असल्यास माझ्या नजरेस आणाव्या, मी सुधारणा करीन. आपले विचारही मोकळेपणाने मांडावेत. मात्र हा एक गंभीर चर्चेचा प्रयत्न असल्याने ते वातावरण कायम ठेवावे ही विनंती. मला जाणीव आहे की कधीकधी वात्रटपणा करायचा मोह (मलाही) अनावर होतो. त्यासाठी कृपया नवीन धागा सुरु करावा वा मला वैयक्तिक विरोप पाठ्वावेत. मी निश्चित उत्तरे पाठवीन.
आपला,
पिवळा डांबिस
वाचन
16764
प्रतिक्रिया
26