मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तचिंतन

राघव · · काथ्याकूट
डिस्क्लेमर: धर्म या संकल्पनेबद्दल, मी, माझ्या अल्पमतीने, केलेला हा विचार आहे. एकामागून दुसरा विचार निघत जातो, प्रश्न पडत जातात अन त्यांचे उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे कदाचित थोडा विस्कळीतही वाटेल. मला गद्य लिहिणे काही तितकेसे सहज जमत नाही. मांडायचा प्रयत्न करतोय. चु.भु.द्या.घ्या. ---------------------------------------------------------------- धर्म. काय शब्द आहे हा नाही? जबर. काय व्युत्पत्ती याची तेही नक्की माहीत नाही. पण हा शब्द, त्यामागची संकल्पना अस्तित्वात यायचे मुळात कारणच काय असावे? जर धर्म या संकल्पनेशिवाय माणसे जगली असती तर कशी जगली असती? (किंबहुना ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधी तसे जगत असतीलच की.. पण निश्चित ऐतिहासिक संदर्भ माहित नसल्यामुळे मला त्याबद्दल मत व्यक्त करता येत नाही.) मला वाटतं धर्म ही संकल्पना अनिर्बंध जमावाला एका ठिकाणी बांधण्यासाठी वापरण्यात आली असावी. त्यामुळे प्रत्येक धर्मात काही ना काही नियम,अनुशासन पद्धती आहेत. अन त्यायोगे पुष्कळ मोठ्या समाजाला एकविचार-एकाआचाराने बांधण्याचे काम केले जाते. पण फक्त तोच एक दृष्टीकोन असावा असे मात्र वाटत नाही. सर्व धर्मातली एक समान गोष्ट बघीतली तर ती म्हणजे सर्व धर्म माणसाला ईश्वराभिमुख होण्यास सांगतात. प्रत्येक धर्माच्या संकल्पने प्रमाणे ही ईश्वर संकल्पना मांडलेली आहे. जर केवळ समाज अनिर्बंध होऊ न देणे हे मूळ कार्य असते तर ईश्वर संकल्पना रुजवण्याचे काय कारण असेल? एकवेळ असेही धरून चालू की काही लोकांना समाजावर सत्ता गाजवायची असणार अन त्यांनी अशी संकल्पना मांडून स्वत:ला त्याचा प्रेषीत, दूत असे म्हटले असावे. पण असेही लोक होऊन गेलेत ज्यांनी समाजवृत्ती सुधारण्यासाठी ईश्वर या संकल्पनेचा वापर केला. आता प्रश्न उठतो तो समाज सुधारणे साठी ईश्वर संकल्पनेची मुळात गरजच काय? नाही? या संकल्पनेशिवाय कुणाची वृत्ती सुधारू शकत नाही काय? नक्कीच सुधारू शकते. जे इतरांसाठी, कोणतीही अपेक्षा न ठेवता पुत्रवत प्रेमाने, कार्य करू शकतात त्यांची वृत्ती नक्कीच सुधारणार. किंबहुना ते इतरांची वृत्ती सुधारण्यास मदतही करू शकणार. आता समजा, अशी मदत करणार्‍याने असा अभिमान धरला की माझ्याचमुळे या इतरांची वृत्ती सुधारते आहे. मी आहे म्हणूनच हे सर्व होतंय, मी नसतो तर हे झाले नसते.. तर त्यात गैर काय? त्याच्याच प्रयत्नांमुळे इतरांची वृत्ती सुधारते हे तर खरेच कि नाही? पण तसे करताना नकळत तो स्वत:ची वृत्ती बिघडवत तर नाही ना? खरेच अशी वृत्ती सुधारण्याची गरज आहे काय? समाजमन कलुषित झाले तर परिणाम आणखी वाईट होतील काय? जसे उदा.- गुन्हा घडू नये यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते - १.शिक्षेचा धाक २.मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे उच्चाटन. यापैकी केवळ एक असून चालत नाही. कायदा, गुन्हा घडल्यावर शिक्षा देवू शकतो. गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी कठोर शिक्षा देवून धाक बसवू शकतो. पण मूळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे उच्चाटन तो करू शकत नाही. किंबहुना तसे उच्चाटन करण्याचे कायद्याचे कार्यच नाही. असे कार्य करण्यासाठीच वर उल्लेख केल्याप्रमाणे समाज वृत्ती बदलण्यास मदत करणारे पुढे येतात. ते सेवाभावाने हे कार्य करत असतात. जे परार्थी भावनेने (इतरांचे दु:ख न बघवल्यामुळे स्वत:चे नुकसान सोसून इतरांस मदत करणेच आपले जीवनकर्तव्य असे मानणे) समाजोन्नतीस मदत करतात त्यांना समाजसुधारक म्हणतात. अन जे नि:स्वार्थी - भगवदार्थी भावनेने (हे जग भगवंताचे असून सर्व कार्याचा कर्ता तोच आहे असे काया-वाचा-मने मानणे) या बाबतीत समाजोन्न्तीसाठी मदत करताना लोकांस ईश्वराभिमुख करतात त्यांना संत म्हणतात. रूढी,परंपरा या पुर्वापार चालत आल्यात म्हणून पाळणे सर्वथा अयोग्य. त्या तशा का पाळल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे असतेच. बयाचदा प्राप्त परिस्थितीत केलेली एखादी गोष्ट रूढी,परंपरा म्हणून धर्माला चिकटते. धर्मावर चढलेली अनावश्यक जळमटे "अलगद" दूर करणेच योग्य. पण रूढी योग्य नाही म्हणून धर्मच चुकीचा असा सरसकट अर्थ काढणे म्हणजे काही वैद्न्यानिक दृष्टीकोन नाही. आपण अगदी साध्या साध्या गोष्टी सवय म्हणूनही सांभाळतो. अगदी सहज केल्याप्रमाणे. त्यामागची कारणमिमांसा जाणून मग ते करणे जास्त योग्य असे मला वाटते. जसे- आपण देवळात जातो. बाहेर चपला काढतो अन मग भगवंताच्या भेटीला जातो. का? आपण चपला घालून देवळात का नाही जायचे? काय हरकत आहे? यामागची मूळ संकल्पना अशी असावी: एक म्हणजे आपल्या चपलांना लागलेली घाण आत मंदिरात येऊ नये म्हणून. शिवाय, आपण भगवंताच्या दर्शनाला त्याच्याविषयीचे प्रेम, कृतद्न्यता याशिवाय कसलीही कामना न करता जाणे सगळ्यात योग्य. किंबहुना आपण आपल्या आईच्या भेटीला जसे प्रेमाशिवाय काहीही मनात न ठेवता जाऊ, अगदी तसेच जाणे योग्य. पण होते मुळात भलतेच. आपण भगवंताकडे जातो अन कळत-नकळत काही तरी सहज मागून जातो. म्हणून, बाहेर चपला काढतांना, बाहेरचे सर्व जग विसरून;चपलांसोबतच बाहेरच ठेवून, मग भगवंताची भेट घ्यायची असते. जेणेकरून मागण्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही. याविचाराला अमलात आणण्यासाठीचे ते एक प्रतीक आहे. विवेकविचाराने स्वत:मधे बदल घडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समाजमन सुधारण्याचे पहिले पाऊल नाही काय? तसे करत असतांना आणखीही काही गुण आपल्यात आलेत तर ते चांगलेच असणार. जसे - यम, नियम मूळात संतांची शिकवणच मोठी सुंदर आहे. ते प्रयत्नांना नेहमीच प्राधान्य देतात. पण १००% प्रयत्नानंतर मिळालेले फळ हे जसे असेल तसे हसतमुखाने स्विकारावे सांगतात. त्यात स्वत:ला सुधारण्याचेच मूळ सामावलेले आहे. नाही? शुभम

वाचन 3262 प्रतिक्रिया 14