मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिनडोक भाषांतरे

सुनील · · काथ्याकूट
"मायकल जॅक्सनच्या गाण्याच्या ६५ दशलक्ष सीडीज विकल्या गेल्या" - एक बातमी. आता इथे ६५ दशलक्ष म्हणजे नक्की किती ह्याचा अंदाज (मनातल्यामनात का होईना) पण किंचित आकडेमोड केल्याशिवाय किती लोकांना येतो? विशेषतः ज्यांचे शिक्षण भारतात झाले आहे (माध्यम कोणतेही असो) त्यांना मिलियन-बिलियन पेक्षादेखिल लाख-कोटी ह्या संज्ञा अधिक परिचयाच्या वाटतील. मग, मिलियनचे दशलक्ष असे बिनडोक भाषांतर करण्यामागे काय हेतू असावा? *** "दक्षिण पूर्व अशियाई देशांत....." - दुसरी एक बातमी. सुदैवाने भारतीय भाषा ह्या दिशाविषयक शब्दांबाबत अधिक समृद्ध आहेत. दक्षिण-पूर्व ह्याला आग्नेय असा विवक्षित शब्द आपल्याकडे आहे. नैऋत्य मोसमी वारे असा शब्दप्रयोग भूगोलाच्या पुस्तकात असे तसेच वायव्य सरहद्द गांधी, ईशान्येकडील राज्ये, असे शब्द प्रयोगदेखिल वापरात आहेत. तरीही, दक्षिण-पूर्व असा शब्द वापरणे हे बिनडोक भाषांतराचेच उदाहरण नव्हे काय? *** "बंगालच्या खाडीत....." - टिव्हीवरील निवेदिका. मुंबईच्या आसपासच किती खाड्या आहेत मग संपूर्ण बंगालात किती खाड्या असतील, असा विचार मनात येतो. त्यातील नक्की कोणत्या खाडीबद्दल बोलणे चालले आहे याचा अंदाज घ्यायला गेलो, तेवढ्यात समजते की बातमी बंगालच्या उपसागराबद्दल आहे! भाषा-भाषांत तेढ नको, श्रेष्ठ-कनिष्ठ वाद तर त्याहूनही नकोत. तरीही एखादी भाषा ज्या भौगोलिक परिसरात जन्मते-वाढते त्याचा त्या भाषेच्या शब्दसंपत्तीवर पुष्कळ परिणाम होतो, हे मान्य होण्यास हरकत नसावी. महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे तर, हिंदी भाषा जेथे रुजली-जन्मली तिथे आसपास कुठेही समुद्रकिनारा नाही! तेव्हा निदान समुद्रविषयक शब्दतरी मराठीने हिंदीतून उसने घ्यावे, असे काही नाही! तेव्हा हादेखिल बिनडोक भाषांतराच एक प्रकार!

वाचन 10268 प्रतिक्रिया 48