मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हर्क्युलस मी होणार

परिकथेतील राजकुमार · · काथ्याकूट
काल कधी नाही ते वैकुंठात गेलो होतो. जवळच्या स्नेह्यांचा पत्ता कट झाला होता. बाकीचे विधी चालु असताना त्यांच्याच ऑफिस मधल्या दोन तरुणांमधला संवाद सहज कानावर आला. "यार, अती तेथे माती म्हणतात ते हेच.. पिकनीकला गेला होता, तिथेच खपला. सिलदेफिनाल चे बळी. नॅन्ड्रेनॉल पण घेत होता." नाव ऐकुन आधी वाटले च्यायला कोकेन वगैरे आजकल 'पुराने जमाने की बात' वगैरे झाले का काय? 'जंगलात' हे नवीन ड्र्ग्ज कुठले आलेत ? हा काय प्रकार बॉ? गुगुल बाबाला विचारायचे ठरवले. पण नीट स्पेलींग नव्हते माहीत. म्हणुन 'कामशेत' मुक्त विद्यापिठांच्या कुलगुरुना फोन लावला. गुरुवारी सुट्टी ह्यांना. घरच्या राहीलेल्या कामाचा बॅकलॉग हे गुरुवारी भरुन काढतात. त्यांनी सांगितले की दोन्ही गोळ्या 'पर्फॉर्मन्स एनहान्सर' आहेत. (ह्यांचा माझ्या बुद्धीमत्ते विषयी काय समज आहे ते देवाला ठाउक. 'परा'ला सगळ्यातले सगळे कळते अशा अविर्भावात हे मला माहिती देत असतात.) "नॅन्ड्रेनॉल खेळाच्या मैदानावर वापरले जाते." "सिदेफिनाल घरच्या मैदानावर वापरले जाते." (अरे देवा नारायणा , असे आहे होय !) "सिलदेफिनाल घेतल्यावर नसांना रक्त पुरवठा वाढतो." (कुठल्या?) मी विचारेले, "सर, ह्या गोळ्यानी माणुस मरतो?" "हो, डॉक्टरने ब्लड प्रेशर, डायबेटीस व इतर तपासणी केल्याशिवाय आणि त्यांनी सांगितलेल्या डोस बाहेर वापर केल्यास मरु पण शकतो." सहसा ४०+ चे पुरुष ह्या ह्या गोळ्यासाठी वेडे होतात. "पण आजकाल कॉलेज तरुणामधे सुद्धा हे वेड वाढले आहे. 'विरेंद्र सहवाग', 'ब्रायन लारा' होता येते असा त्यांचा गैरसमज असतो. एकदा का सवय लागली की पुर्ण आयुष्याचा सत्यानाश. सगळे नॉर्मल असताना वेळेच्या खुळचट्पणाचे बळी." हे मात्र गुर्जी सत्य सांगत होते. "काल ट्रिपल सेंचुरी रे" किंवा "चारशे धावा ठिकल्या रे रात्री" असे सांगणारे महाभाग माझ्या बघण्यात होतेच. मी विचारले, "प्रिस्क्रिप्शन शिवाय ह्या गोळ्या का दिल्या जातात?" "११० कोटी च्या देशात असे प्रश्न विचारायचे नसतात" असे गुर्जी म्हणाले. (महत्वाचे :- सिलेदेफिनाल म्हणजे सुहागरा नावाने विकले जाणारे वायाग्रा.) ----------------------------------------------------------------------------------------------- च्यायला हे ऐकुन मला तर शॉकच बसला. माझ्या माहितीत हॉस्टेलचे काही 'खेळाडु' आहेत जे ह्या औषधांचा सर्रास वापर करतात. दुसर्‍या दिवशी त्याच्या पासुन झालेले फायदे सुद्धा अगदी बढाई मारत सांगत असतात. जर आजच हे ह्या गोळ्यांच्या येव्हडे आहारी गेले असतील तर उद्या ह्या गोळ्यांशिवात ते काही करु शकतील का नाही ? हे एक प्रकारचे व्यसनच नाही का ? मग नक्की काय खरे आणी काय खोटे ? काय आहे हे मनावर पसरलेले गारुड ? हि कुठल्याही मेडिकल मध्ये सहजी उत्पन्न होणारी औषधे अपायकारक का उपायकारक ? आणी जर अपायकारक असतील तर सरकार त्यावर काही बंदी वगैरे का आणत नाही ? ह्या बाबत औषध कायदा काय सांगतो ? आणी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही औषधे तुम्हाला काही काळासाठी 'हर्क्युलस' बनवुन टाकतात, हा जो समज मोठ्या प्रमाणावर रुढ झाला आहे त्यात किती तथ्य आहे ?

वाचन 5386 प्रतिक्रिया 0