Skip to main content
लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 17/10/2026 20:28 या दिवशी प्रकाशित केले.

SITTING IS NEW SMOKING 

बैठे काम हे धूम्रपानाच्या इतकेच धोकादायक आहे असे गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनात आढळून आलेले आहे. पूर्वी एक काऊचं पोटॅटो 

(couch potato) असा  वाक्प्रचार होता आता त्यात बदल होऊन mouse potato हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.    

आजच्या जगात बरीच माणसे तासन तास सतत बसून राहून संगणकावर काम करत असतात. दुर्दैवाने  तब्बल ८२ टक्के लोक जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्लेल्या पातळीची शारीरिक हालचाल करत नाहीत आणि जवळ  जवळ ४० टक्के लोक कामाच्या वेळेत  एकही  ब्रेक घेत नाहीत. 

त्यातच घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास सरासरी दीड ते दोन तासांनी वाढलेले आढळले. यामुळे  या लोकांना पुढच्या दहा ते पंधरा वर्षात होणाऱ्या मेंदूचा स्ट्रोक आणि हृदय विकारात भयावह वाढ होण्याची शक्यता आहे.    

बाकी सर्व घटक ( लठ्ठपणा, मानसिक तणाव, धूम्रपान, अतिरिक्त मद्यपान, मधुमेह इ )  बाजूला ठेवले तरी  केवळ बसून राहणे यामुळे आपल्याला हृदयविकाराचा अतिरक्तदाबाचा आणि लकवा( स्ट्रोक/paralysis)  धोका भरपूर  हालचाल करणाऱ्या माणसांपेक्षा ६० टक्क्यांनी जास्त असतो.
त्याच बरोबर या लोकांमध्ये रक्तातील साखर आणि कोलेस्टिरॉलचे प्रमाणही वाढते या मुळे त्यांना मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता वाढते.

व्हेरीकोस व्हेन्स ( पायाच्या रक्तवाहिन्या अतिरिक्त फुगून येणे) आणि पायाच्या रक्ताच्या वाहिन्यांत रक्ताची गुठळी होणे ( deep vein thrombosis) यांचे प्रमाणही बरेच वाढते.

बराच वेळ संगणकावर बसल्यामुळे मान दुखी आणि कंबर दुखीचे प्रमाण सुद्धा फार वाढलेले आहे. यात घरातून काम करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे याचे कारण बहुसंख्य लोकांनी कोव्हीड मध्ये घरच्या डायनिंग टेबलावरच काम करणे सुरु केले. डायनिंग टेबल हे जेवण्यासाठी असल्याने त्याची उंची संगणक टेबलापेक्षा जास्त असते यामुळे लॅपटॉप वर बसल्यास सारखे खांदे उंच करून टाईप करावे लागते यामुळे या लोकांमध्ये  मान दुखी नि खांदे दुखीनं फार मोठ्या प्रमाणात दिसून येते.       

याशिवाय घरात ergonomic खुर्ची नसल्यामुळे तिशी पस्तिशीतील माणसांचे पाठदुखीचे प्रमाण सुद्धा भयावह प्रमाणात वाढलेले आहे.

माणसे रोजच पाठ दुखी किंवा मानदुखी  होते म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा पटकन एक डोलो ची गोळी घेऊन आजचा दिवस साजरा करतात. पण जसे वय वाढत जाते तसा हा त्रास मानगुटीवर बसू लागतो. आताच पन्नाशीच्या आसपासच्या भरपूर लोकांना स्पॉण्डयलोसिस चा त्रास दिसून येतो आहे.       
 
सतत बसून राहिल्यामुळे आपले एकंदर स्नायूंचे प्रमाण कमी होते यामुळे वृद्धावस्थेत अपघातांचे प्रमाण वाढणार आहे.

संशोधकांनी १ लाखाहून अधिक लोकांच्या बसण्याच्या वेळेचा आणि शारीरिक हालचालींच्या पातळीचा समावेश असलेल्या १३ अभ्यासांचे विश्लेषण केले. त्यांना असे आढळून आले की, जे लोक कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसून घालवतात, त्यांच्या मृत्यूचा धोका लठ्ठपणा आणि धूम्रपानामुळे होणाऱ्या धोक्यासारखाच असतो. 

परंतु, दिवसातून ६० ते ७५ मिनिटांचा मध्यम स्वरूपाचा एरोबिक शारीरिक व्यायाम जास्त वेळ बसून राहण्याचे दुष्परिणाम पूर्णपणे भरून काढतो (नष्ट करतो).

या संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे:

• मोठा धोका: कोणत्याही व्यायामाशिवाय ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहिल्याने मृत्यूचा धोका लठ्ठपणा आणि धूम्रपानाइतकाच वाढतो.


• उपाय: दररोज नियमितपणे केलेला मध्यम स्वरूपाचा एरोबिक व्यायाम या धोक्याविरुद्ध ढाल म्हणून काम करतो.


• 'मध्यम स्वरूपाचा व्यायाम' म्हणजे काय?: यासाठी तुम्हाला मॅरेथॉन धावण्याची गरज नाही. जलद चालणे, सायकल चालवणे किंवा बॅडमिंटन/टेनिस खेळणे यासारख्या गोष्टींचा यात समावेश होतो.

वर लिहिलेलं हे आपण संगणकावर सह्ज गुगलून पाहू शकता. काही दुवे असे आहेत

https://healthcare-bulletin.co.uk/article/sitting-is-the-new-smoking-st…

https://www.mayoclinic.org/healthy-lifestyle/adult-health/expert-answer…

https://www.apolloclinic.com/blog/sitting-new-smoking  

दुर्दैवाने केवळ नियमित व्यायाम करणे कॅन्सरच्या  (कर्करोग) धोक्यापासून पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाही  हे अगदी अलीकडच्या जुलै २०२६ मधील एका महत्त्वाच्या संशोधनातून  समोर आले आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/workouts-not-enoughlong-sitti…


संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

• ३० मिनिटांचा नियम: एकाच ठिकाणी सलग ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते.

• वाढणारा धोका: सलग बसण्याच्या वेळेत प्रत्येक १ तासाची वाढ ही कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका साधारणपणे ९ ते १० % ने वाढवते.

• कॅन्सरचे प्रकार: यामुळे प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयाशी (Metabolism) संबंधित कॅन्सरचा धोका वाढतो. उदा. आतड्याचा (Colorectal), स्तनाचा (Breast), यकृताचा (Liver), स्वादुपिंडाचा (Pancreatic) आणि गर्भाशयाचा (Endometrial) कॅन्सर.

• व्यायाम पुरेसा नाही: तुम्ही आठवड्याला १५० ते ३०० मिनिटे व्यायाम करत असाल, तरीही दिवसभर सलग अनेक तास बसून राहिल्यामुळे शरीराला होणारे नुकसान केवळ त्या व्यायामाने पूर्णपणे भरून निघत नाही.

यासाठी काय करायला हवे?


डेस्क जॉब करणाऱ्या लोकांसाठी, थोड्या थोड्या कालावधी नंतर नियमितपणे हालचालींचे छोटे ब्रेक  घेणे हे अत्यंत  महत्त्वाचे आहे.

जर तुमचे काम ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटरसमोर सतत बसून राहण्याचे असेल, तर दर ३० मिनिटांनी एक टाइमर किंवा अलार्म लावा. दर अर्ध्या तासानंतर फक्त १ ते २ मिनिटांसाठी उभे राहा, थोडे ताणून घ्या (Stretching), फोनवर बोलताना चालत बोला ( बरेच लोक काम करताना बराच वेळ फोन वर बोलत असतात त्यांहा हे बोलणे फिरत फिरत करणे सहज शक्य आहे.)    किंवा पाणी पिण्यासाठी थोडे फिरा. 

 

ही छोटीशी हालचाल देखील तुमच्या शरीराची चयापचय प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी आणि आजारांचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी आहे.

या विषयावर विपुल साहित्य जालावर उपलब्ध आहे.

बऱ्याच वेळेस कळतं पण वळत नाही किंवा कामाच्या व्यापात/ ताणात लक्षातच येत नाही  अशी स्थिती बहुसंख्य लोकांची आहे.  

पण वर म्हटल्याप्रमाणे सुरुवात तर करा.

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता,
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो!

- दुष्यंत कुमार  

 

         


वाचने 89
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पूर्वी कामगाराच्या काम करण्याच्या पद्धतीवर संशोधन व्हायचे. त्यातून सुधारणा सुचवल्या गेल्या. कामाचे नियम, पद्धती बदलल्या गेल्या.

 

आता संगणकावर काम करणारे कामगार पद्धतीत गणल्या जात नाहीत. कामगार संघटना नाहीतच. काम बळजबरी करावे लागते. नवे नवे शिकण्याची गरज, भारतीय लाला मानसिकतेचे कंपन्या अन व्यवस्थापन, मानसिक ताण, आडनीड वेळेच्या शिफ्ट हे अतिशय घातक पद्धतीने वाढले आहे. 

संगणक कामगारांची ही बहूदा पाचवी (की चौथी?!) पिढी असेल. अजूनही म्हणावा तसा गंभीरपणा ना कर्मचारी घेतात न व्यवस्थापन.

 

 

 


In reply to by पाषाणभेद

मस्त एसीची हवा खात, बसून, कॉफी रिचवत काम असते तरीही समस्या?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

तसे हिमनग असतात. 

आयटी अतिशय मोठे फिल्ड आहे. अनेक सिस्टम, टेक्नॉलॉजी, प्रोसेस, डिपार्टमेंट आहेत. येथे माणूस गौण आहे.