Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 15/10/2026 11:32 या दिवशी प्रकाशित केले.

यही बस कहना है,

जीवन एक तंदूर है |

हर किसीको रोस्ट होना है||

आग को ही दोस्त बनाओ,

फिर तो हर मंजर सुहाना है|

बस,यही कहना है.....||

 

या वर्षी मार्तंड अतिशय तापला. २०२६ चालू वर्षांत गत वर्षांपेक्षा जगभरात अधीक उष्ण तापमान असण्याचा अंदाज वतर्वला जात होता. अगदी तसेच घडले.मे महिन्यात  कुल्लू मनाली आणी पुण्याचे तापमान एकसारखेच होते. हिमाचल भटकंतीमधे मी नमूद केले आहे. शिमला,मंडी थंड हवेची ठिकाणे तरीही दुपारी वातानुकूलित यंत्रे चालू होती. रोहतांग शिखरावर टी-शर्ट, पंजाबी ड्रेस घालून पुण्या मुंबई प्रमाणे पर्यटक बिन्धास्त फिरत होते.

३ जुलै २६ रोजी अमरनाथ यात्रा सुरू झाली. अवघ्या ५ ते ६ दिवसांतच नैसर्गीक बर्फाचे शिवलिंग ९०% पेक्षा जास्त वितळून छोटे झाले.यात्रा राखी पौर्णिमेपर्यंत कशी चालणार, स्थानिकांच्या पोटावर गदा येणार  का काय असे प्रश्न सर्वांनाच  भेडसावत होते. वैश्विक उष्णतेचा परिणाम चर्चांना उधाण आले........

पावशा,कारुण्य कोकीळ पक्षांचा ओरडून ओरडून घसा बसला तरीही वळवाच्या पावसाने तोंड दाखवले नाही.जुलै,ऑगस्ट मधे कोकण,प.महाराष्ट्र भागात दमदार पाऊस झाला.धरणे भरल्याच्या वार्ता आल्या.पेरण्या झाल्या. उर्वरित महाराष्ट्रात मात्र वरुणराजाने हात अखडता घेतला.केलेल्या पेरण्या वाया गेल्या. फळबागांनी माना टाकल्या.हिरवीगार बाल्यावस्थेत संत्री,मोसंबी टप टप खाली पडू लागली. तरूण इंजिनियर,नऊ लाखाचे पॅकेज सोडून शेतीकडे वळाला.कारल्याचे पिक लावले.पाण्या अभावी पिक खुरकटले,कारली पिवळी पडली.पीक काढून टाकण्याची पाळी आली. सप्टेंबरच्या मध्यावर पावसाने दडी मारली. आजतागायत तोंड दाखवले नाही.सौम्य झालेला मार्तंड पुन्हा उग्र झाला. उन्हाच्या झाळयांनी जनजीवन विस्कळीत झाले. धरणे, तळी, विहीरींतल्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन सुरू झाले.काहि नीं लवकरच तळ गाठला.आक्टोंबर हिट सप्टेंबरमधेच सुरू झाली.  टि व्ही वरील बातम्या बघताना कवी ना. धो महानोरांची कवितेची आठवण झाली.

पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं

गळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं

वेढून नेणारी रित्या नभी वहाटूळ

आसमंत वेटाळून काळजाची कळ

दुःख पेलण्या एवढं बळ नाही

डोलां कडू काल्यावण्यांनी भारावला

गला कोवल्या गर्बाला जल्माआधी

वनवास वो मालवला, दिस मालवला...

 

महादेववाडीतल्या जंगलात मुनिया, शुभ्रकंठी, हळद्या,सुभग कोकीळा, कोतवाल,वेडा राघू, चिमण चंडोल,भटचंडोल आणी नेहमी दिसणारे इतर पक्षी दिसेनासे झाले. पावसाळ्यात भेट देणारे खाटीक,गप्पीदास,हुपुप सारख्या पक्षांनी जंगलाकडे पाठ फिरवली. एकंदरित, राज्यावर दुष्काळाचे सावट दाटून आले. चालू खरीप हंगामात एकूण ३५८ पैकी ३०५ तालुके अधिकृत दुष्काळग्रस्त (Trigger-1) जाहीर करण्यात आले. हे प्रमाण राज्याच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे ७५ टक्के.उर्वरित भागातही थोडीफार अशीच परिस्थिती आहे. दुष्काळ नियमन समितीचे गठन आणी मिटींगा चालू झाल्या. बॅक कर्ज,पाण्याचे नियोजन, फ्री अन्नधान्य वाटप,चारा छावण्यावर विचार विमर्ष चालू झालाय. केंन्द्रीय पथक पहाणीसाठी येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले पुढारी,सरकारी बाबू, कर्मचारी बांधावरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

भेगाळलेल्या जमीनी,वाळलेली पिके,चाऱ्या अभावी वणवण करणारी जित्राबं,शेळ्या बकऱ्या,तळ गाठलेल्या विहीरी, हांड्यावर हांडे ठेवून मैलोन्मैल पाण्यासाठी पायपीट करणाऱे आबालवृद्ध पाहून पोटात  कालवाकालव होऊ लागली.कोरडी ठाक नदीपात्रे टि व्ही वर झळकू लागली.पत्रकार वयोवृद्धांशी पुर्वीच्या दुष्काळाची आणी सद्द्य परिस्थीतीची तुलनात्मक चर्चा करत आहेत. माझ्या मनात  जुन्या आठवणीनीं फेर धरला. टॅकंरच्या मागणीत लाक्षणीय वाढ  झाली आहे.शहरी भागात सुद्धा दहा टक्के पाणीकपात जाहीर झाली आहे.भाज्यांचे भाव कडाडले आहेत पण बाजारात उपलब्ध आहेत.

 

हे सर्व बघताना,नाशिकला होणार्‍या कुंभ मेळ्याची तयारी ही  होताना दिसत आहे. आजच,टाईम्स ऑफ इंडीयामधे कुंभमेळ्या साठी चार धरणातून  १९०.७९ कोटी लिटर (MCM, मिलियन क्युबीक मिटर)पाणी देणार अशी बातमी वाचली.म्हणजे येवू घातलेला नाशिक कुंभमेळा पाणीटंचाई मधे आणखीनच भर घालणार असे दिसते.

मी परंपरावादी हिन्दू मताचा असूनही यावेळेस कुंभमेळ्यात फक्त अत्यावश्यक धार्मिक विधी  कार्यक्रम करावेत.ते ही स्थानिक भाविकांनी, श्रद्धाळू व साधू संतानीच.भक्त,आखाडे,संतमहात्म्ये यांनी नाशीकला या वेळेस गर्दी करून परिस्थीतीची गंभीरता वाढवू नये. घरीच स्नान करावे गंगा स्त्रोत्र म्हणावे."मन चंगा तो कठौती में गंगा",असे म्हणतात.वैयक्तिक (कदाचित आनाठायी) मत आहे. तरीही,कुंभमेळ्या मागचा व्यापारी दृष्टिकोन नजरेआड करता येत नाही.

मी स्वतः सन बहात्तरच्या भीषण दुष्काळाचा अनुभव घेतला आहे.जाणत्या वयात होतो. इतक्या वर्षानंतर काही आठवणी पुसट झाल्या असतील पण त्या भयंकर परिस्थीच्या पाऊलखुणा आजही मना आहेत.

संत तुकोबाराय यांच्या वेळेस सलग सात वर्ष दुष्काळग्रस्त परिस्थीती होती. महाराजांनी जे भोगले त्यामुळेच विरक्ती आली. ती खालील अभंगातून त्यांनी व्यक्त केलीय.अगदीआशीच परिस्थिती सन बहात्तरच्या दुष्काळात  झाली होती.

 

अभंग क्रमांक १

"बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त झाली । देवे माया सोडविली ॥

पोर मेले बरे झाले । देवे मायाविरहित केले ॥

माता मेली मजदेखता । तुका म्हणे हरली चिंता ॥".

 

अभंग क्रमांक २

"बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥

अनुतापें तुझा झालों मी शरण । पावावया चरण विठोबाचे ॥ध्रु.॥

बरें जालें जळो आली ही संपात्ति । बरी ही विपत्ति सुखा आली ॥२॥

बरें जालें बाईल कर्कशा । इहलोकीं आशा, तुटली माझी ॥३॥".

 

सन सत्तरमधे वडिलांनी Early exit मारली.मी सर्वात मोठा.मामा शिक्षणासाठी पुण्यात घेऊन आला.आयुष्यातला खरा दुष्काळ तेंव्हाच सुरू झाला.आसो,माझे रडगाणे बाजूला ठेवतो. तर सांगायचा उद्देश  असा की.....

सत्तर ते त्र्याहत्तर,सलग तीन वर्ष पाऊस कमी तर काही ठिकाणी अजिबातच पडला नाही.जमीनी भेगाळल्या.कोरड्याठाक पडल्या. चहूकडे फक्त फुफाटा.एकादशी आली आख्या राज्यभरातील वारकरी पांडुरंगाला साकडे घालायला पंढरीत पोहचले.चंद्रभागा सासुरवाशीणी सारखी कोपर्‍यात रुसून बसली होती.

श्रावण गेला,पोळ्याला कसाया कडे गेलेल्या जित्राबांच्या आठवणीने डोळ्यात  टिपूस सुद्धा आले नाही.(इतकी पाण्याची कमतरता). श्रावणी सोमवारी उपलब्ध असलेल्या पाण्याने देव गाभाऱ्यात कोंडले."अल्ला मेघ दे,शामा मेघ दे", रडवेल्या सुरात आम्हीं मुलानींही दोन कळश्या पाणी देवाच्या मढ्यावर घातले. ज्याच्या बद्दल मनात श्रद्धा भोळाभाव राखला तोच दोन वर्षा पासून रूसला होता. वैतागलेल्या सामान्य माणसांची भाषाच बदलली होती. काय धर्म, काय जात सर्व अंतर दुष्काळाने मिटवले होते.गावात सिदेश्वरास कोंडून साकडे घातले. भीमाबाई  महादेवाच्या  कुंडात वाट वाकडी करून पंढरपुरात पांडुरंगाला भेटायला जाते पण यावर्षी कुंडातली पाण्याची धार अभिषेक पात्रातून पडणाऱ्या धारे एवढीच, तळातले खडक बेवारस उघडे पडले होते. गणपती,गौराई आल्या पण केवळ उपचार म्हणून सण झाला.

धान्य,साखर,तेल बाजारातून गुडूप झाले. रेशनवरच्या पाम तेल, खांडसरी आणी लाल गव्हांबरोबर दिवाळी गोड झाली. 

सुलतानी मार पडली तर बंड करता येते पण आस्मानीचे काय करायचे. लहानथोर,गरीब श्रीमंत सज्जन दुर्जन सारेच हवालदिल झाले अन्नधान्याचा तुटवडा,लोकांना खायला नाही, प्यायला पाणी नाही. गाव खेडी उजाड होऊ लागली होती.जनावरं चारापाणी नाही, म्हणून टाचा घासून मृत्यूमुखी पडत होती. काही कसायाच्या दावणीला जात होती. माणूस चिंचेचा पाला,रान गवत खाऊन जगायची धडपड करत होता.भूकबळी वाढले, महागाई कमालीची वाढली.पाण्यासाठी कित्येक किलो मिटर पायपीट करावी लागत होती.भीमा पुर्ण सुकली.नदीपात्रात चाळीस फुट खड्डे खोदून वाटी फुलपात्राने धोतराचा कपडा लावून गढूळ पाण्याने कळशी,हांडे तासाभरात कसेबसे भरत होते.ग्रामपंचायतीने वाड्यातले नळ रस्त्यावर आणले.खड्डयात उतरून पाणी भरावे लागायचे तेंव्हा कुठे थोडेफार पाणी मिळायचे. 

मायबाप सरकारने विदेशातून मदत मागितली.अमेरिकेतून किडके लाल गहू, लाल ज्वारी (मिलो), मक्या बरोबरच काँग्रेस गवताचे बीज पण मायदेशी आले आणी वणव्या सारखे पसरले.देश त्या वेळेस अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर नव्हता. एक्काहत्तरच्या लढाईने अर्थिक बोझा आणखीन वाढवला होता. युद्धकैद्यांची त्यात भर पडली.

(काॅग्रेस गवताच्या संसर्गाने श्वसनाचा त्रास होतो असे कळल्याने पुढे याच्ये समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न झाले,आता बरेच प्रमाणात उपज कमी झाली आहे.). कृपया राजकिय पक्षाशी याचा संबध जोडून गंभीर विषयाला कलाटणी देऊ नये ही कळकळीची विनंती.

कुठे,कुठे रांग लावायची?पाण्यासाठी,दुकानात घासलेट साठी, रेशन दुकानात लाल गहू,लाल ज्वारी,तेल इ.साठी....नळावर पाण्यासाठी.... रेशन दुकानात धान्य आल्यावर जंगलात वणवा पसरावा त्याप्रमाणे  गावात बातमी पसरायची.गावात धावपळ सुरू व्हायची. नाहीतर गाव पोट खपाटीला घेवून गपगुमान पडलेलं असायचं.शहरात थोडी सुसह्य परिस्थीती होती. कमीत कमी काळ्या बाजारात धान्य पैशे देवूनतरी मिळायचे. लातूर भागाकडे तर पाणी रेल्वेने जात होते असे ऐकून होतो.

मी नुकताच मॅट्रिक पास झालो होतो. तालुक्याचे गाव, पी डब्ल्यू डी, पंचायत समीती सारख्या सरकारी कार्यालयात रोजगार हमीचे प्रकल्प राबवले जात होते. रो. ह. योजनेत पुरूषाला तीन रू.आणी बाईला अडीच रू. दिवसाकाठी मजूरी मिळायची.पाझर तलाव,नाला बंडींग, रस्ते दुरूस्ती असे कामांचे स्वरूप, एकुणच  काय  अंगमेहनतीची कामे आणी खायची वाण........

मॅट्रिक  आसल्याने रोजंदारीवर आकडेमोडीचे काम मिळाले.माझे नाव  पाझर तलावाच्या कामावर असलेल्या मजूरांच्या रोस्टर मधे टाकून पंधरा दिवसाला पंचेचाळीस रूपये, हिच माझी पहिली कमाई.मजूरांच्या रोस्टरवर नाव जरी असले तरी काम मात्र बाबूचे, हेडक्वार्टरला. पंधरवडय़ात विलीज जीपमधे  इंजिनियर बरोबर साईटवर जायचे, झालेल्या कामाचे मोजमाप करून,आकडेमोड करायची.कामाचा मोबदला मोजमापावर आवलंबून असल्याने मजुरांचे गॅगंमन आशाळभूत नजरेने ,"साहेब,फुलरेट द्या बरं का !",अशा विनवण्या करायचे. एकुण खर्चाचा हिशेब काढायचा. खजांची बाबू बरोबर जाऊन पगार वाटप करायचे.पगार मिळाल्यावर उन्हाने रापलेल्या,अर्धपोटी चेहर्‍यांवर आशेची किरणे स्पष्ट  दिसायची.भल्याभल्या बळी राजाला मजूरी करावी लागली. पुढे,सरकारने मजूरी बरोबर सुकडीचे वाटप सुरू केले. "सुकडी", म्हणजे सुक्का गोड शिरा.पाणी टाकून शिजवायचा, मिळाल्यावर लेकरा बाळांच्या तोडांत गोडगोड पडू लागले.अर्थात ही सर्व परिस्थिती खेड्यापाड्यातली. आणी देश खेड्यापाड्यानींच  बनलेला. तालुक्यात,शहरात पाणीटंचाई होती पण खाय प्यायचे एवढे वांधे नव्हते. 

बिनचूक,मनलावून काम करण्याची सवय आणी कामातली गती पाहून वरच्या साहेबांनी मला हंगामी सरकारी नोकरीत रूजू करून घेतले व तालुक्यातील दुर्गम भागात "कळमोडी ",पाझर तलावावर मिस्त्री म्हणून नेमणूक  केली.तीन आकडी पगार  मिळू लागला. 

अवांतर-: सेवानिवृत्ती नंतर मला कळाले की कळमोडी, १.५१ टी एम सी क्षमतेचे एक मोठे धरण झाले आहे. खुपच आनंद  झाला

अतिशय भयानक परिस्थिती होती.बरेच लोक शहराकडे पलायन करते झाले.तेव्हां लोक संख्या आजच्या तुलनेत खुप कमी होती.

नको त्या काळ्या आठवणी.

सद्य परिस्थितीवर बोलताना मिपाकर मित्रांनी  काही आठवणी अनुभव शेअर केले.

"त्या काळात केवळ जगण्यासाठी मराठवाड्यातून पुण्यात येऊन रस्त्यावर राहणारी गोरगरीब कुटुंबं पाहिली आहेत.

यावेळेस पाण्याचे दुर्भिक्ष्य होण्याची शक्यता आहे आणी ते भीषण असणार. जनावरांना चारा पण मिळणार  नाही.-रामचंद्र ".

"इंदौरहून बातमी आहे की बोरिंगचे पाणी आता पासूनच कमी झालेले आहे.जे एरवी मार्च एप्रिलमध्ये होते. पाऊस खूप कमी पडला आहे यंदा.आम्ही रहातो तो भाग संपूर्णपणे बोरिंग पाण्यावरच अवलंबून आहे.-चित्रगुप्त".

"शनिवारी सासुरवाडीच्या गावी, सोलापूर जिल्ह्यात मुक्काम होता.खरीप हंगामातील पीक पाण्याअभावी वाया गेल्यात जमा आहे. निदान नवरात्रात तरी एखादा पाऊस पडेल आणि हाताशी आलेलं पीक वाचेल, अशी मृगजळासारखी आशा शेतकरी अजूनही बाळगून आहेत.

गेली कित्येक वर्षं जपलेली फळझाडं आता पुढचे आठ महिने कशी जगवायची, हा मोठा प्रश्न आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी काठोकाठ भरलेली विहीर ऑक्टोबरमध्येच तळाला गेली आहे.-गणेशा".

"ही अवस्था सगळीकडे आहे,भातशेतीची तर पूर्ण वाट लागली आहे.यावर्षी माणसांचे नाही झाले तरी जनावरांचे खूप हाल होणार आहेत. -विशाल धनवडे".

"बहात्तर मधे पुण्यात घरातले नळ रस्त्यावर आले होते.आर्धा पुरूष खोलीचे खड्डे करून नळाचे तोटी बसवली होती. पाण्याला फोर्स नव्हता. वाटी वाटीने कळशी भरावी लागत असे.-बहात्तरचा दुष्काळ पिडीत.".

"बापरे-पुणेकरांना तर सवयच नाही पाणी जपून वापरायची- त्यात खाली नवीनच हाॅटेल चालू होते आहे तो पण पाणी खेचणार. बिल्डिंग मधे आतापासूनच बोंब आहे. दुपारी १२-४  पाणी बंद केले तरी लोक कासावीस होतात.-राजेंद्र मेहंदळे".

"मी दररोज जंगलात फिरायला जातो. नवीन झाडे लावली आहेत. त्यांना कसे वाचवायचे हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गीक तळी साठ टक्के सुकली आहेत.- अस्मादिक".

तुलनात्मक सद्य परिस्थिती बहात्तर पेक्षा काही वेगळी नसेल पण या वेळेस अन्नधान्य साठा मुबलक  उपलब्ध आहे.दळण वळणाची साधनांमुळे पब्लिक डिस्ट्रीब्युशन व्यवस्था पण सक्षम असणार आहे. परंतू,पाण्याचे योग्य नियोजन हे फार मोठे अव्हान असणार आहे.

तरणताल,वाहन सफाई सारखी फिजूल खर्ची थांबेल.व्यक्तिगत पातळीवर सुद्धा पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.अजून आठ महिने पडले आहेत पाऊस येण्यासाठी.......

असो ईश्वरेच्छा बलियसी........

प्राप्त परिस्थितीत प्रत्येक सरकार शक्य तेव्हढे जनहितार्थ काम करते. बहात्तर मधे कै श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. मुख्य मंत्री कै वसंतराव नाईक होते. देश एक्काहत्तर च्या लढाई मुळे आणी दुष्काळामुळे कैक वर्ष पाठिमागे ढकलला गेला.

मिपाकरांनी त्यांचे अनुभव वाचकांसमोर मांडावेत ही विनंती.


वाचने 227
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

  ते दिवस आठवलेकी अंगावर काटा येतो.

त्याकाळी मी अभिनव कला विद्यालयात शिकत होतो. गावावरून एस.टी ने जेवण डबे यायचे. डब्यात मिलोची एक भाकरी यायची. अर्धी सकाळी अर्धी रात्री. घरातील लहान भावंडे देखील . खड्डे खोदकामावर जायचे. फार वाईट दिवस. १९७२ चा दुष्काळ फारच भिषण होता. पिण्‍याचे पाणी मिळविण्यासाठी २ मैल पायपीट करावी लागत होती.


सुकडी", म्हणजे सुक्का गोड शिरा.

दुष्काळ असा आजवर पाहिलाच नाही. १९७२ तर जन्म ही झाला नसल्याने माहीत नाही . परंतु लहानपणी खेडेगावात अंगणवाडीत सुकडी खाल्लेली आठवतेय. कोरडीच खायचो. 

उकाडा वाढतोय हे मात्र खरे. दुष्काळ नको पडायला ...


अत्ताच उन्हाळ्यात टॅंकर वाऱ्या वाढल्या होत्या. १०-१० फोन करुनही टॅंकरवाला यायचा नाही. त्याचे म्हणणे "दिवसाला ७००-८०० फोन येतात , कोणाकोणाचे फोन घेत बसु?" त्याचे ड्रायवर सकाळी ४ वाजल्यापासुन पासुन फेऱ्या घालुन थकले होते. 

 

४ महिने जरा बरे गेले तो परत तीच परिस्थिती येणार वाटते. आमच्या कडे १२-४ पाणी बंद करायला सुरुवात केलेय.  पण बाहेर बघतो तर गाड्या धुणे , ओव्हरहेड टाक्या वाहुन जाणे, वगैरे यथासांग चालु आहे. कालच एके ठिकाणी घराखालचे गैरेज प्रेशर वॉशने धुणारा महाभाग दिसला. समोरच्या दुकानदाराला विचारले तर म्हणे हे रोजचेच आहे. मागच्या अनुभवातुन लोक शिकले नाहीत. जूनपर्यंत वेळ कसा काढणार माहित नाही.


दुष्काळाच्या आठवणी भयानक आहेत. आजी पणजीकडून क्वचित कधी ऐकल्या होत्या. पणजी सांगे तिच्या सासूबाई साखर कुलुपामध्ये ठेवत असे. आणि एकूणच त्यांचा काटकसरीचा स्वभाव या दुष्काळानेच शिकवलं असणार.

लोकांना पाण्याचा गैरवापर करताना पाहताना खरोखर संताप होतो. पुण्यामध्ये तरी पाण्यावर मीटर लावलाच पाहिजे त्याशिवाय पाण्याची उधळपट्टीवाले सुधारणार नाहीत.   


कालच इन्स्टावर खारुताई एका पाइपजवळ ,प्राण जाऊन निपचित पड्लेली रील पाहिली...काळू नदी आटली आहे.मराठ्वाड्यातले धरण कोरडी पडली आहेत.😓

तुमच्या १९७२ च्या या दुष्काळी आठवणी चर्र्र्र्रर्र करुन गेल्या...

महाराष्ट्राच्या इतिहासात 'दुर्गादेवीचा दुष्काळ' हा इ.स. १३९६ ते १४०८ (सुमारे १२ वर्षे) या कालखंडात पडलेला अत्यंत भीषण आणि विनाशकारी दुष्काळ म्हणून ओळखला जातो. या प्रदीर्घ काळ चाललेल्या अन्न आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतातील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. सलग पाऊस न पडल्यामुळे नद्या-विहिरी आटल्या, शेती नष्ट झाली आणि लाखो लोकांना उपासमारीमुळे आपला जीव गमवावा लागला. गावेच्या गावे ओस पडल्यामुळे अनेक भाग स्मशानासारखे (ज्याला 'दुर्गाडी' म्हटले जायचे) भयाण झाले होते, ज्यावरून या दुष्काळाला 'दुर्गादेवीचा दुष्काळ' हे नाव पडले. या ऐतिहासिक आपत्तीच्या काळात अन्न शोधण्यासाठी लाखो लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले, ज्याचे विदारक वर्णन आजही लोकस्मृतीत आणि ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पाहायला मिळते.

या दुष्काळाशी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लोकपरंपरा जोडलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील दामाजीपंत (जे विजापूरच्या बादशहाचे कारकुन होते) त्यांनी भुकेलेल्या आणि गरजू लोकांसाठी बादशहाची सरकारी धान्याची कोठारे खुली केली होती. ही घटना मानवी मदत आणि दातृत्वाचे एक महान प्रतीक म्हणून आजही ओळखली जाते. 


१९७२ च्या दुष्काळाच्या गोष्टी वाचुन मन भुतकाळात गेलं... अत्यंत वाईट दिवस होते.. रॉकेल, धान्य, साखर अश्या बाबींसाठी ८-८ १०-१० दिवस थांबायला लागायचं गेली २०-२५ वर्षे आता रेशनचं आजिबात काही घेत नाही पण त्यावेळी रेशन म्हणजे वरदान वाटायचं. मिलोची भाकरी खाणं नित्यनियमाचं झालं होतं. काळाबाजार प्रचंड प्रमाणात होत होता... तेव्हा मी शाळेत होतो... शाळेचं सामान वह्या, पुस्तकं ई काहीच घेता येत नव्हतं ... असं करत करत ७६-७७ साल उजाडलं आन आणीबाणी, लोकांना तुरुंगात टाकणं असले प्रकार सुरु झालं .. दिवस दहशतीचे होते ! 

आता ही परिणाम दिसायला लागलेत... पण देव करो, इतकी वाईट वेळ न येवो.