Skip to main content

नेपाळमधील महापूर निसर्गनिर्मित?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/08/2026 10:10 या दिवशी प्रकाशित केले.

नेपाळमधील भोटेकोसी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे तांडव माजले आहे. शेकडो मृत्युमुखी पडले असून अजून काही शेकडोंचा संपर्क नाही. यात अनेक नेपाळी नागरिक व काही चिनी नागरिक आहेत. अनेक भारतीय नागरिक व परदेशी पर्यटक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक घरे, पूल संपूर्ण वाहून गेले आहेत.

ही नदी तिबेटच्या सीमेवरून नेपाळमध्ये प्रवेश करते. तिबेट चीनने बळकावला आहे. तेथील सीमेवर असलेले काही चिनी अधिकारी वाहून गेले आहेत.

 

भूकंप, भूस्खलन, हिमनद्यांचे वितळलेले पाणी, दरडी कोसळणे ही या महापुरामागील कारणे असावी असे सांगण्यात येत आहे.

माझ्या मते यामागे चीन आहे. मागील अनेक वर्षांपासून चीन, भारतात वाहून येणाऱ्या नद्यांवर, भारत सीमेलगत महाप्रचंड धरणे बांधत आहे. भविष्यात जेव्हा भारताविरूद्ध युद्ध होईल तेव्हा धरणे फोडून संपूर्ण ईशान्य भारत जलमय करून उर्वरित भारताचा ईशान्य भारताशी संपर्क नष्ट करून ईशान्य भारत बळकावणे हा एक उद्देश आहे. पाणी अडवून ईशान्य भारतात पाणीटंचाई निर्माण करणे हा सुद्धा अजून एक उद्देश आहे.

असेच एक धरण फोडून नेपाळमध्ये कशी वाताहत होते हे पाहणे हा प्रयोग चीनने केला असावा. तसेही नेपाळ चीनला बळकावयाचा आहेच. तिबेटनंतर, भारतीय भूभाग, आजूबाजूच्या अनेक देशांची लहानमोठी भूमी चीनने आधीच बळकावली आहे. चीनच्या दीर्घकालीन योजनांमध्ये तैवान, नेपाळ, भूतान व ईशान्य भारत बळकावणे हे मुद्दे आहेतच. बलुचिस्तानमध्ये अशांतता निर्माण करून आधी तो भाग पाकिस्तानपासून तोडून नंतर घशात घालणे ही चीनची योजना कार्यरत आहेच. त्यातून चीनला हिंदी महासागरात पोहोचण्यासाठी अजून एक मार्ग मिळेल (सध्या फक्त दक्षिण चीन समुद्रातून चीन हिंदी महासागरात पोहोचू शकतो).

एकंदरीत या बकासुराला आवरणे जगाने मनावर घ्यायला हवे.‌

 

जाता जाता - या योजना विनाविरोध प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतात चीनसमर्थक, चीनवर अंधविश्वास ठेवणारे भोळसट नेतृत्व सत्तेत असणे आवश्यक आहे. डोकलाम संघर्षाच्या वेळी गुपचुप चिनी राजदुताची भेट घेऊन ते लपवून ठेवणे,  कैलास पर्वत पाहण्यासाठी नेपाळमध्ये जाण्याचे नाटक करून तेथे चिनी मंत्र्यांची भेट घेणे, गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्यावरच अविश्वास दर्शविणे, सिंदूर मोहिमेनंतर भारतीय सैन्यावरच अविश्वास दर्शविणे, वारंवार अज्ञात देशात जाणे . . .  यांची सांगड घातली तर चीनला भारतात कोण सत्तेवर हवे आहेत व त्यासाठी चीनने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने काही भारतीय नेते कसे गळाला लावले आहेत हे स्पष्ट आहे.

भविष्यात चीनविरूद्ध युद्ध होणार, धरणात अडविलेले पाणी, चीन शस्त्र म्हणून वापरणार, गळाला लावलेले भारतीय नेते भारताविरोधात काम करून चीनला मदत करणार हे विद्यमान सरकारने लक्षात घेऊन तात्काळ पर्यायांची चाचपणी सुरू करायला हवी.


वाचने 264
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

लेख मला वाटले चीनविरुद्ध असावा पण शेवटी शेवटी लेखाचा मूळ उद्देश उघडा पडला! 

 

या योजना विनाविरोध प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतात चीनसमर्थक, चीनवर अंधविश्वास ठेवणारे भोळसट नेतृत्व सत्तेत असणे आवश्यक आहे. >>>
मग आता काय वेगळे नेतृत्व सत्तेत आहे का?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

चांगला चर्चा विषय आहे. शेवटचा उतारा सोडून देऊ. चीन कायमच आपल्या थोड्या थोड्या जागा बळकावतोय, सध्या सीमेशेजारी तीन नवे जिल्हे चीनने निर्माण केले अशी एप्रीलमधे बातमी होती. चीननं शिनजिगांगमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ एक नवा जिल्हा (काऊंटी) तयार केला आहे. सेनलोंग नावाचा हा नवा जिल्हा काराकोरम पर्वताच्या जवळ वसलेला आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीच्या हेतूंबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या जिल्ह्यामुळे भारताला असलेला धोका वाढला आहे, अशी चर्चा होती. 

चीनने नेपाळवर केलेला पाणीप्रलय प्रयोग असेल असे वाटत नाही, पण आयडिया चांगली वाटली. बाय द वे, नेपाळमधे हिमनदी फुटल्याने हा प्रलय आल्याचे नेपाळमंत्री यांनी काल सांगितले. गावचे गाव वाहून गेले, धरण, आणि त्यामुळे होणारं नुकसान भविष्यातले युद्धाचे नवे डावपेच असतीलही, पण काल पुराचे व्हीडीयो पाहात होतो तेव्हा लक्षात आलं की एकाकी पाणी आलं. असे पाणी अडवल्याचे दिसते आणि ते सर्व नव्या येणा-या पाण्यामुळे ते अनियंत्रित झाले. नागरी वसाहती निसर्गाच्या क्षेत्रात आक्रमण करायला लागल्या आहेत, त्यामुळे निसर्ग अधून मधुन आम्हाला नडू नका असा संदेश देतात, जीवित वित्त हानी अशावेळी मोठी होते असे दिसते. नद्या जोड प्रकल्प, धरणाचे पाणी, हे संशोधन अभ्यासाचे विषय आहेत. 

नेपाळचे मंत्री म्हणाले की, पर्यावरणाचे सामायिक संकट भविष्यात भारतावही येऊ शकते असे ते म्हणाले. हिमालयात बर्फ वितळला किंवा दुर्घटना घडली तर, थेट समुद्रपातळी वाढते त्यामुळे हिमालयातील ढासळते पर्यावरण ही एक समस्या आहे असे ते म्हणाले. भारत, चीन, नेपाळ आणि भूतान यांनी हिमालयाचं रक्षण करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. नेपाळमधून वाहणा-या काही नद्या गंडक आणि कोसी भविष्यात भारतासाठी धोका आहे असेही ते म्हणाले ( लोकसत्ता ) एकूण पर्यावरण, नद्या, वितळणारा हिमालय, शिखरे हे भविष्यातले धोकादायक क्षेत्र आहेत यात वाद नाही. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेपाळ प्रलय.

काठमांडूपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेला लांगटांग लिरुंग पर्वत तब्बल 7,234 मीटर म्हणजेच 23,733 फूट उंच आहे. या पर्वताच्या सुमारे 17 हजार फूट उंचीवरील भागातून जवळपास 2 हजार फूट रुंद म्हणजेच अर्ध्या किलोमीटरपेक्षा मोठा बर्फाचा तुकडा तुटला. हा महाकाय बर्फ आणि त्यासोबतचा खडक-मातीचा मलबा तब्बल 4 हजार फूट खाली घाटीत कोसळला... त्यामुळे ही 'हिमालयीन त्सुनामी' निर्माण झाली असं शास्त्रज्ञांचं, अभ्यासकांचे  म्हणणं आहे. 

( वाट्सॅपच्या महाप्रलयातून साभार )

 

-दिलीप  बिरुटे
 


चीनमध्ये अंतर्गत इतके प्रॉब्लेम वाढले आहे की चीनला हे असले राक्षसी प्रोजेक्ट करायला मनुष्यबळ एकत्र करणे पण कठीण जाते आहे. 

बऱ्याच आधी वाचले होते की चीन ब्रह्मपुत्रेवर (चिनी भाषेत सांगपो) सुद्धा एक धरण बांधणार आणि ते प्रसंगी फोडून पूर्ण आसाम पुरात लोटणार. 

नंतर लक्षात आले की ब्रह्मपुत्रा नदी तिबेट मधून जितके पाणी कॅरी करून आणते त्याच्यापेक्षा कैकपट जास्त वॉटर इनलेट नदीमध्ये सहाय्यक नद्या घेऊन येतात आणि त्या सगळ्या भारतीय हद्दीत आहेत. त्यामुळे चीनने इतके प्रयोग केले तरी impact पडण्यालायक पाण्याचा साठा करून त्याला व्हेपनाइज करून ब्रह्मपुत्रा वापरणे त्यांना शक्य नाही. खरे खोटे देव अन् एक्स्पर्ट मंडळी जाणे.


In reply to by वृषभ खोंडे

मागच्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर आपण सिंधू पाणीवाटप करार रद्द केल्यानंतर चीनही ब्रह्मपुत्रेवर धरण बांधून भारताचे पाणी रोखू शकेल का या प्रश्नावर उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा पण हेच म्हणाले होते. ब्रह्मपुत्रेने भारतात प्रवेश केल्यानंतर त्या पाण्यात पडणारा पाऊस तसेच उपनद्या यामुळे मिळणारे पाणी ध्यानात घेतले तर ६५-७०% पाणी भारतातच असते. त्यामुळे चीनने धरण बांधले तरी ते आपले पाणी रोखू शकणार नाहीत. उलट त्यांनी धरण बांधून पाणी रोखले तर चांगलेच आहे- दरवर्षी आसामात पुरामुळे जे नुकसान होते त्यात ३०-३५% पाणी कमी आले तर तेवढेच नुकसान कमी होईल असेही ते म्हणाले. हे मी कोणत्यातरी न्यूज चॅनेलवर बघितले होते त्यामुळे लगेच देण्यासाठी माझ्याकडे लिंक नाही. पण ते मी ऐकले होते हे नक्की. 

समजा चीनने धरण बांधले आणि आपल्याला नको तेव्हा धरणाचे दरवाजे उघडून भारतात पूर आणायचा प्रयत्न केला तर काय होईल? हिमंत बिस्व सर्मांचे म्हणणे तथ्याला धरून असेल आणिा ते धरण ब्रह्मपुत्रेवरच असेल तर फार परिणाम होणार नाही कारण आता येतो त्यापेक्षा मोठा पूर चीन आणू शकणार नाही. मात्र चीनने खोडसाळपणा करायला जर आणखी कोणत्या नद्यांमधील पाणी कालवे काढून ब्रह्मपुत्रेत आणून सोडले आणि ब्रह्मपुत्रेची पाण्याची पातळी वाढवली तर काही सांगता येत नाही. हा माझा तर्क आहे. त्या भागात अशा इतर नद्या कोणत्या, कालवे काढून ब्रह्मपुत्रेत पाणी आणून सोडणे शक्य आहे का- असल्यास किती वगैरे गोष्टी मला माहीत नाहीत.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

हाच संदर्भ डोक्यात होता पण विदा उपलब्ध नाही माझ्याकडे सुद्धा म्हणून जरा लेखणी आवरती घेतली होती. तुमच्यासारख्या सर्वमान्य विद्वत मिपाकराने लिहिल्यामुळे मात्र शिक्कामोर्तबच झाले म्हणायचे. 

 

ह्या निमित्ताने थ्री गॉर्जेस धरण आठवले चीनचे, हे धरण इतके मोठे आहे की त्यामुळे पृथ्वीच्या रोटेशन स्पीड वर पण प्रभाव पडल्याचे वाचले होते. तसेच उगाच राक्षसी महत्वाकांक्षा सिमेंट अन् दगडात कालवून हे अजस्त्र पांढरे हत्ती बांधण्यात ह्यांचा मोठा हातखंडा.


तिबेटच्या आजुबाजूला चीन सुमारे २०० लहानमोठी धरणे बांधत आहे. त्यातील काही पूर्वीच पूर्ण झाली आहेत, तर काही २०३० पूर्वी पूर्ण होतील. 

 

त्यातील महाप्रचंड म्हणजे मोटुआ/मेडॉग ही ५ धरणांची शृंखला ज्यातून ६०,००० मेगावॅट्स वीज निर्मिती होईल. ३-गॉर्जेस धरणाच्या तिप्पट वीज यातून निर्माण होईल. 

 

याव्यतिरिक्त शॉंगजिऑंकू, बैहेतन, तीन गॉर्जेस ही महाप्रचंड धरणे आधीच पूर्ण झाली आहेत. 

 

ही धरणे एकमेकांना जोडली तर त्यातून महाप्रचंड पाणी सोडून नेपाळ, ईशान्य भारत, बांगलादेश येथे अक्षरशः महाप्रलय निर्माण करता येईल. 


आता 'पुढारी' वाहिनीवर दोन निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा ऐकली. दोघेही या पुराचा उल्लेख वॉटरबॉम्ब असा करीत होते व भारत भविष्यात संभाव्य वॉटरबॉम्ब भारतावर फुटेल हे ग्ृहीत धरून उपाययोजना करीत आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

 

हे धरण तिबेटमध्ये फुटल्यानंतर चीनने नेपाळला माहिती देण्यास ४५ मिनिटे घेतली. तेथून नेपाळची सीमा २० किमी अंतरावर आहे. जर तात्काळ सूचना दिली असती तर निदान काही प्रमाणात प्राणहानी टाळता येणे शक्य होते. अशी शक्यता आहे की नेपाळला अंधारात ठेवून तेथपर्यंत पाणी पोहोचण्यास किती वेळ लागतो, किती नुकसान होते, किती परिणाम होतो हे चीन चाचपून पाहत असावा.  भविष्यात खरोखर असा महाप्रलय घडवायचा असेल तर ही माहिती नक्कीच कामी येईल.