तुम्ही केरळ मधून बोटीने पश्चिम दिशेने सरळ जाल तर कुठल्या देशांत पोचाल ? उत्तर आहे सोमालिया. जगांतील सर्वांत गरीब, मागासलेले, गृहयुद्ध आणि इतर गोष्टींनी वाट लागलेले पण, नैसर्गिक दृष्टिकोनातून सर्व काही असलेले महत्वाचे राष्ट्र. सोमालीयात पेट्रोल पासून सर्व काही आहे पण तेथील हिंसेमुळे काहीही करणे अशक्य आहे.
सोमालीलँड हा सोमालियाचा उत्तरेकडचा भाग. म्हणजे हॉर्न ऑफ आफ्रिका ज्याला म्हणतात त्याच्या बाजूचा भाग हा अनेक वर्षे सोमालिया पासून स्वतंत्र होऊ पाहतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता कुणीच दिल्याने पती कुणी पहिला नाही पण कुंकू लावून फिरते अशी ह्या भागाची अवस्था आहे. इराण मधील घडामोडी आणि इतर अनेक भूराजकीय घटनांमुळे सोमालीलँड ला एक महत्वाची संधी निर्माण झाली आहे. ह्यांत भारतासाठी सुद्धा बऱ्याच संधी आहेत.
सोमालिआ मध्ये गृहयुद्ध नेहमीची बाब आहे. सोमालियन सरकारने ह्या भागाला सापत्नभावाची वागणूक दिली आहे. युरोप आणि अमेरिकेने अब्जावधी डॉलर्स सोमालियाला एड म्हणून दिले असले तरी सोमालियाने चीन ची आपली मैत्री जास्त खोल केली. ह्याला प्रत्युत्तर म्हणून सोमालीलँड प्रदेशांत तैवान शी आपली मैत्री वाढवली. ह्यावर ट्रम्प ह्यांनी काही सकारात्मक टिपण्णी केली आणि सोमालीलँड चर्चेत आले. इस्राएल ने ह्या देशाला मान्यता दिल्याने आणखीन चारचा सुरु झाली.
पण सोमालीलँड चे एक आणखीन वैशिष्टय आहे. सोमाली सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सरकारी निर्बंध आणि जाचापासून सोमालीलँड दूर राहिले आणि तेथील लोकांनी आपली प्रगती आपल्या हातांत घेतली. इथे बारापैकी मुक्त आर्थिक व्यवस्था निर्माण झाली आणि अब्जवधीचे उद्योग निर्माण झाले तसेच ह्या आफ्रिकन भागांतील सर्वांत चांगले बंदर सुद्धा. सोमालीलँड चे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे इजिप्त, पाकिस्तान आणि बाकीच्या सोमालिया ने अमेरिकेकडून पैसे उकळण्याचे एक तंत्र निर्माण केले आहे. ते म्हणजे छुप्या पद्धतीने विविध आतंकवादी समूहांना वर काढणे आणि नंतर त्यांना काबूत ठेवण्यासाठी अमेरिकेकडून पैसे उकळणे. सोमालीलँड ने ह्याचा प्रखर विरोध करून आपल्या प्रदेशांत अल शबाब सारख्या हत्यारबंद समूहांना अजिबात थारा दिला नाही. २००१ पासून देशांत शांततापूर्ण पद्धतीने निवडणूक तसेच सत्तांतर होत आहे.
सोमालिया हे कागदोपत्री एक राष्ट्र असले तरी सोमालीलँड चे आपले चलन, आपली कायदा आणि सुव्यवस्था आहे आणि इतर सोमालिया पेक्षा ते जास्त प्रभावशाली आहे असे दिसून येते. ह्याचा अर्थ सोमालीलँड सिंगापूर आहे असा कुणी घेऊ नये पण सोमाली प्रदेशांत किमान ह्या अ-मान्यता प्राप्त देशाने राजकीय स्थिरता इथे शक्य आहे हे दाखवले आहे.
भारतासाठी संधी
सोमालिया आणि ह्या भागांतील चाचेगिरी भारतासाठी (आणि जगासाठी) डोकेदुखी झाली आहे. भारतीय नौसेनेने ह्या भागांत मोठ्या प्रमाणात कार्यात्मक वचनबद्धता दाखवली आहे. भारतीय नौसेना कार्यरत असताना भारतासाठी अनुकूल असे एखादे राष्ट्र ह्या भागांत असेल तर भारतासाठी हा एक मोठा धोरणात्मक फायदा ठरेल. सोमालीलँड ला मान्यता नसली तरी भारतासारख्या महत्वाच्या राष्ट्राने मान्यता दिल्यास सोमालीलँड ला ते हवेच असेल.
UAE भारताचे मित्र राष्ट्र असून ते मोठ्या प्रमाणात सोमालीलँड मध्ये गुंतणवूक करत आहे तसेच बंदर विस्तार करत आहे. मित्र राष्ट्र तसेच मनुष्यबळ आणि इतर तांत्रिक साहाय्य भारताला देणे शक्य आहे आणि आर्थिक फायदा सुद्धा आहे. UAE इथियोपिया सोबत आपले व्यापार संबंध वाढवू पाहत आहे आणि त्यासाठी त्यांना सोमालीलँड महतवाचे आहे. भारताला सुद्धा इथिओपिया सोबत संबंध वाढविणे शक्य आहे आणि त्यांत फायदा आहे.
इथिओपिया आफ्रिकेतील सर्वांत जास्त लोक असलेले द्वितीय क्रमांकाचे राष्ट्र आहे. भूबंद असल्याने त्यांना बंदर नाही. सोमालीलँड मधील बर्बरा हे बंदर इथिओपिया साठी महत्वाचे आहे आणि त्याला जोडण्याचे काम सध्या यूएई करत आहे. इथिओपिया एक मोठे मार्केट आहेच पण त्यांच्या कडे सुपीक जमीन आहे. त्यामुळे UAE सोमालीलँड आणि इथिओपिया ह्यांना ह्यांत खूप फायदा आहे. इथिओपिया सारख्य गरीब पण वर येऊ पाहणाऱ्या राष्ट्राला देण्यासारखे भारताकडे खूप काही आहे. चांगली बँकिंग व्यवस्था, आउटसोर्सिंग, चलन व्यवस्था इत्यादी इत्यादी. त्याशिवाय UAE कडे पैसे असले तरी सामरिक बळ नाही जे भारत देऊ शकतो.
सोमालिया मध्ये तुर्की आणि पाकिस्तान जम बसवला आहे. तुर्की सोमालिया च्या सैन्याला प्रशिक्षण देते. पाकिस्तान ने २०२४ मधेय मोगादिशू शी संरक्षण करार केला. (पाकिस्तानी संरक्षण करार म्हणजे वेश्येने साखरपुडा केल्या सारखे आहे). त्यामुळे भारतासाठी सोमालिया भविष्यांत डोकेदुखी ठरू शकते.
होर्मूझ बंद झाल्यानंतर लोकांच्या नजर Bab el Mandeb वर आहेत. सध्या भारताची ५०% निर्यात आणि ३०% इंधन इथून येते. उद्या इराणी किंवा पाकिस्तानी उत्तेजित समूहांनी इथे गडबड केल्या भारतासाठी आणखीन डोकेदुखी ठरू शकते. अमेरिका आणि चीन ने आपली बस्तान बाजूच्या डिजबोटी मध्ये खूप आधीपासून बसवले आहे आणि चीन सोमलीलँड च्या विरोधांत आहे.
भारताकडून ह्या दिशेने हालचाली सुरु आहेत असे माझे स्रोत सांगत आहेत. प्रधानमंत्र्यांनी काही महिने आधी इथिओपियाला भेट दिली तेंव्हा विविध सोमालीलँड माध्यमांनी अशी चर्चा केली होती. इस्रायली माध्यमांनी सुद्धा भारताने सोमालीलँड ला मान्यता द्यावी असे आवाहन केले होते आणि हल्लीच अनेक भारतीय भूराजकीय संकेतस्थळांनी अश्या बातम्या/मते प्रकाशित केली.
एक तर खरोखर भारताची तशी तयारी असावी किंवा इस्राएल भारतीय मत निर्माण करू पाहत आहे असे आम्ही म्हणू शकतो. पण सत्य काहीही असले तर भारतासाठी हा प्रदेश महत्वाचा आहे. थेट मान्यता नाही दिली तरी भ्रष्ट मोगादिशुला आपल्या बाजूने वळवून सोमालीलँड मध्ये भारत आपले सामरिक सामर्थ्य, व्यापारी संबंध आणि धोरणात्मक गुंतवणूक UAE ला विश्वासात घेऊन करू शकतो. चीन, पाकिस्तान आणि तुर्की ला शह म्हणून हे भारतीय धोरण महत्वाचे ठरू शकते.
त्याशिवाय भारताने मागील काही दशकांत मेहनत घेऊन विविध मुस्लिम राष्ट्रांचा विश्वास संपादन केला आहे. पूर्वी मुस्लिम राष्ट्रे पाकिस्तान ची बाजू घेतील अशी एक खात्री कुणालाही वाटायची पण आता तसे राहिले नाही. भारतीय आर्थिक प्रगती आणि विश्वासार्ह परराष्ट्र धोरण ह्यामुळे UAE, सौदी, अफगाणिस्तान सारख्या मुस्लिम देशांत सुद्धा भारतीय मताला महत्व आहे. कुणी म्हणेल कि अफगाणिस्तान सारख्या देशाचे महत्व ते काय, पण देश गरीब असला तरी त्याचे भौगोलिक स्थान भारतीय हिता साठी खूप महत्वाचे आहे. काश्मीर विषयावर पाकिस्तान ला कायमचा शह देण्यासाठी पाकिस्तानी मित्रदेश कमी करणे आवश्यक आहे. सोमालीलँड हे मुस्लिम राष्ट्र (!) असल्याने त्याला भारताच्या बाजूने वळवले तर भारताचा फायदा आणि पाकिस्तान चे नुकसान आहे.
भारत सोमालीलँड ला थेट मान्यता इतक्या लवकर देईल असे वाटत नाही पण अमेरिका सारख्या मोठ्या राष्ट्राने पुढाकार घेतला तर भारत सुद्धा त्यांत भाग घेईल हे शक्य आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
१. आंतरराष्ट्रीय स्तरावर…
१. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता कुणीच दिल्याने पती कुणी पहिला नाही पण कुंकू लावून फिरते अशी ह्या भागाची अवस्था आहे.
२. इस्राएल ने ह्या देशाला मान्यता दिल्याने आणखीन चारचा सुरु झाली.
विरोधाभास वाटत आहे.
सोमालिया, सुदान, झाम्बिया, युगांडा, र्वांडा, बुरुंडी वगैरे देश म्हटलं की फारशी चांगली प्रतिमा मनात उभी राहत नाही, पण तो कदाचित माझ्या biased perception चा दोष आहे. पण तरीही अन्नधान्य विशेषतः कडधान्यांच्या आयातीसाठी टांझानिया, मोझाम्बिक, मालवी आणि या इतर देशांवर भारत अवलंबून आहे. थोडीशी शोधाशोध केल्यावर दिसले की ऑस्ट्रेलियातून, अगदी कॅनडा व रशियातूनही कडधान्ये आयात होतात!
त्याशिवाय, सामरिक, व्यापारी, आर्थिक दृष्टिकोनांतून अश्या वरील (तुलनेने अदखलनीय) देशांचे आपले एक महत्व असते हे खरे!
बाकी, या विषयावर काही लिहिण्याची माझी पात्रता नाही, पण वाचत राहण्याची जिज्ञासा नक्कीच आहे. अजूनही असे माहितीपूर्ण व जिज्ञासावर्धक लिहीत राहा.
- (भूराजकीय जिज्ञासू) कांदा लिंबू
खुप वेगळ्या विषयाचा लेख
खुप वेगळ्या विषयाचा लेख