मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाबो

रमेश माने · · काथ्याकूट
1 ''गुलाबो'' प्रिय सायकल... खरं सांगू, वयात आलं की एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. आज 3 जून जागतिक सायकल दिवस. मी आता 45 वर्षाचा आहे पाच वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या चाळीसाव्या वर्षी मी तुझ्या प्रेमात पडलो. त्यावेळेस मला तुझी हळू हळू गोडी वाटायला लागली होती. सुरवातीला दहा वीस तीस चाळीस अगदी पन्नास किलोमीटर पर्यंत चा केलेला प्रवास, त्या प्रवासामध्ये जवळची प्रेक्षणीय स्थळे मंदिर, बाग-बगीचे ,ऐतिहासिक ठिकाण चा तुझ्यासोबत केलेला प्रवास मनाला आनंद देणारा होता . नंतर मला तुझी सवय झाली सुरुवातीला तुझ्यासोबत तासभर फिरणारा मी नंतर मात्र चार चार तास तर कधीकधी दिवसभर फिरू लागलो . तुझ्यामुळे मला तिन्ही ऋतूंचा आनंद घेता आला . पावसाळ्यात चिंब भिजता आले , कडाक्याच्या थंडीमध्ये पूर्ण गारठलो तर उन्हाळ्यामध्ये तहानेने व्याकुळ झालो. पहाटेचा मंद वारा , पावसाळ्यातील हिरवीगार गर्द झाडी , हिवाळ्यातील गुलाबी थंडी, उन्हाळ्यातील रस्त्यावरच्या डांंबरावरून हवेत उडणाऱ्या उष्ण लाठा अनुभवायला मिळाल्या . निसर्गाच्या अगदी जवळ जाता आले. तुझ्या सोबत केलेला रात्री-अपरात्री चा प्रवास सुद्धा मला हवाहवासा वाटतो. तुझ्यामुळे मला अनेक नवनवीन मित्र भेटत गेले. संसाराच्या रहाटगाडग्यात कधी नैराश्य आले तर त्यातून बाहेर काढायला मला तुझी खुप मदत होते. तुझ्या सोबत निर्मनुष्य रस्त्यावरून चालताना जमीन आणि चाकाच्या घर्षणातून येणारा आवाज,पावसाळ्यात तुझ्या चाका मधून उडणारे पाण्याचे फवारे मनाला कोण आनंद देतात म्हणून सांगू.... तुझ्या सोबत केलेला अष्टविनायक गणपती दर्शन, जेजुरीचा खंडोबा, देहू ,आळंदी, भुलेश्वर, रामदारा ,पंढरीचा विठोबा, ग्रामदैवत श्री गिरिजा शंकर, लोणावळा ,महाबळेश्वर ,रायगड, शिवनेरी, वडू-तुळापुर, मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया , तेलंगणा,आंध्र प्रदेश मधील श्रीशैल उज्जैन चा श्री महाकाल, गुजरात मधील श्री सोमनाथ, उत्तर प्रदेश राज्यातील प्रभू श्री रामाची अयोध्या, श्री क्षेत्र काशी विश्वनाथ ते अगदी भारतीय नकाशा चे शेवटचे टोक असणाऱ्या कन्याकुमारीचा प्रवास...! या प्रवासामध्ये तुझ्यासोबत ''व्यसन मुक्त भारत व प्रदूषण मुक्त भारत'' चा दिलेला संदेश मनाला समाधान देणारा आहे. या प्रवासामध्ये दोन-तीन वेळा धडपडलो सुद्धा पण तुझ्या आकर्षणामुळे त्यातून लगेच सावरलो . असो आपल्याला अजून खूप प्रवास करायचा आहे. शेवटी काय ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येया पर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण...! बरोबर ना तुझाच रमेश

वाचने 1750 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कर्नलतपस्वी 03/06/2025 - 09:43
नवर्‍याला थोडंफार सुखचैन भेटतं बघा. असचं म्हणतो. मस्त संवाद. नोकरीमुळे सायकल सुटली पण अकरा नंबरची सायकल वर खुप फिरलो आणी आजही दहा बारा किमी दररोज चालवतो. (सब कुछ दौडके करना पडता था ,अब पैदल चलता हूं)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 03/06/2025 - 10:56
गुलाबोची आठवण मस्त. सायकल दिनाच्या शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे