Skip to main content

मिपा दिवाळी अंक २०२२ - लेखकांना आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 15/09/2022 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे. या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही . आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत. तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची. या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता. लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये. आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता. जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका. काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच. आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल. अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती. मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं... आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत -टीम मिपा दिवाळी अंक

वाचने 21660
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by साहित्य संपादक

आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत अंक प्रकाशित होणे अपेक्षित
ब्वॉरं. देर ना हो जाये कही दे ना हो जाये.

In reply to by सस्नेह

लेखकांना अप्रूप असते हो कधी आपला लेख प्रकाशित होतोय आणि वाचकांच्या त्यावर उड्या पडताहेत :)

In reply to by मालविका

हेच म्हणतो, आता दिवाळी झाली पण तुळशीच्या लग्नाआधी तरी अंक प्रकशित व्हावा.

दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यासाठी काही मदत हवी असल्यास हक्काने सांगावे.

पोटा पाण्याचे उद्योग आणि व्यक्तिगत जीवनातील अडचणी संभाळून संपादक मंडळ मिपा चे व्यवस्थापन बघत असतात याची कल्पना आहेच. या वीकेन्ड ला वेळ मिळेल आणि अंक प्रकाशित होईल अशी आशा आहे. मुद्दाम कोणी करत नाही. अनेक वेळा अडचणी अशा अडचणी येतात की वेळेवर काम करता येत नाही आणि कारण पण सांगता येत नाही. मी स्वतः या स्थितिचा अनेकदा अनुभव घेतला आहे. तेव्हा माझे संपादक मंडळास समर्थन आहे. जमेल तसे करा. पण नक्की दिवाळी अंक प्रकाशित करा. धन्यवाद.

+१

मी एक लेख पाठवला होता तो दिवाळी अंकात सामाविष्ट झाला नाही. आणि आता पुन्हा "पाठवलेले संदेश" बघत असताना तिथेही तो दिसत नाहीये. ५ ऑक्टोबरच्या आसपास मिपा बंद होते तेव्हा काहीतरी गडबड झालेली दिसते. मिपाच्या विदामधून माझा लेख पुर्णतः उडालाय.. असो. वाचक एका लेखाला मुकलेत :)

In reply to by तर्कवादी

मी सुद्धा दिवाळी अंक २०२२ साठी एका वेगळ्या विषयावरील मोठा लेख ७ ऑक्टोबरला पाठविला होता. लेख लिहिण्यासाठी बरेच दिवस लागले होते. लेख आवडल्याचे संपादक मंडळाने कळविले होते. नंतर काही व्याकरणाच्या चुका सुधारून सुधारीत लेख १-२ दिवसांनी पुन्हा पाठविला होता. परंतु दिवाळी अंकात तो लेख नसल्याने संपादक मंडळाने तो लेख अंकात समावेश न करण्याचे ठरविले असावे असे मला वाटले. "पाठविलेल्या संदेशा"तही तो लेख दिसत नाही. नक्की काय झाले आहे ते माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

"पाठविलेल्या संदेशा"तही तो लेख दिसत नाही. नक्की काय झाले आहे ते माहिती नाही.
५ - ७ ऑक्टोबरच्या आसपास मिपाचे सर्वर क्रॅश झाले असावे आणि जुना विदा पुनर्स्थापित (रिस्टोर) केला असे बहुधा दिसते. अनेक धाग्यांतले प्रतिसाद सुद्धा उडाले होते. पण दिवाळी अंकाबाबत संपादक मंडळाने निदान पुन्हा संदेश पाठवून लेख हरवल्याबद्दल सांगायला हवे होते म्हणजे तो पुन्हा पाठवता आला असता. आणि इतके दिवसांत पाठवलेले संदेश आपण काही पुन्हा तपासले नाहीत त्यामुळे आपल्याही लक्षात आले नाही... असो. आता काही करता येण्यासारखे नाही ...

In reply to by तर्कवादी

२०-२१ ऑक्टोबरला मी "पाठविलेले संदेश" तपासले होते. तेव्हा सर्व संदेश होते. पण आता दिसत नाहीत.

In reply to by तर्कवादी

दिवाळी अंकाकरिता लेख पाठवून मी तो प्रसिद्ध होण्याची वाट बघत होतो. दिवाळी अंकाला मोठा विलंब झालाच पण माझा लेखही प्रसिद्ध झाला नाही. मिपावरील एक नवीन सदस्य आणि लेखक म्हणून माझा उत्साहभंग झाला. पण नंतर मला दिसले की तो लेख "पाठवलेले संदेश" मधूनही नाहीसा झालाय. तांत्रिक गोंधळामुळे हे झाले असावे म्हणून मी "जाऊ दे झालं ते झालं" म्हणत ते विसरण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझे वरील प्रतिसाद वाचून साहित्य संपादक या आयडीने मला व्यक्तिगत संदेश पाठवून तांत्रिक गोंधळामुळे त्यांच्याकडेही तो लेख आता नसल्याचे सांगितले आणि मला लेख पुन्हा पाठवण्याची सुचना केली, मी लेख पुन्हा पाठवल्यास तो दिवाळी अंकात प्रकाशित केला जाईल असे साहित्य संपादकांनी सुचविल्यामुळे माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. वास्तिविक त्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबरला मी जेव्हा तो संदेश वाचला त्यानंतर काहीच तासांत मला कामानिमित्ताने बेंगळुरुच्या प्रवासाला निघायचे होते. तरीही मी त्या गडबडीतही पुन्हा लगेच लेखाची माझ्याकडील आवृत्ती व्यवस्थित तपासून साहित्य संपादक आयडीच्या संदेशाला उत्तरात लेख पाठवला. आणि पुन्हा एकदा सुरु झाली ती प्रतिक्षा. पण दिवसांमागून दिवस गेलेत पण लेख प्रकाशित झाला नाही. आणि साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेशाद्वारे मोजून ४ वेळा विचारणा करुनही काहीच उत्तर मिळाले नाही. या प्रकारामुळे माझी घोर निराशा झाली आहे. आता दिवाळी अंकातील इतर लेखही वाचायचे मन होत नाही की मिपावर यायचाही फारसा उत्साह राहिला नाही. मिपाला कदाचित नवीन लेखक नको आहेत असेच वाटते. असो.

In reply to by तर्कवादी

मिपाला कदाचित नवीन लेखक नको आहेत असेच वाटते.
स्वानुभवावरून सांगतो, असं आजिबात नाहीये. गैरसमज नसावा. :) सं - दी - प

In reply to by तर्कवादी

मीही दोन लेख पाठवले होते,त्यातील एक प्रकाशित झाला.इच्छा असेल तर लेख आताही इतर सदरात प्रकाशित करु शकता.गैरसमज नका करून घेऊ.गोष्टी, थोडं इकडे तिकडे होतं असतं.

In reply to by Bhakti

गैरसमज नाही. वर म्हंटल्याप्रमाणे आधी तांत्रिक गोंधळामुळे लेख नाहीसा झाला व प्रकाशित झाला नाही हे माझ्या लक्षात आलं.. त्यावर मी "जाऊ दे" म्हणत सोडूनही दिलं पण पुन्हा लेख मुद्दाम मागवणे पण तो प्रकाशित न करणे आणि दहा-अकरा दिवसानंतरही लेखाची पोच, प्रसिद्ध न करण्यामागचे कारण याबद्दल काहीच उत्तर न देणे- ते ही चार वेळा विनंती करुन हे अगदीच निराशाजनक आहे.
इच्छा असेल तर लेख आताही इतर सदरात प्रकाशित करु शकता
त्यात मजा नाही. निदान तो लेख तरी मी इतर सदरात प्रकाशित करणार नाही. दिवाळी अंकाकरिता लिहिलेला लेख दिवाळी अंकाच्या सजावटीसह सन्मानाने प्रसिद्ध झाला तरच गंमत आहे. बरं लेख प्रसिद्ध न होण्यामागचं कारणही समजत नाही हा खरा उद्वेग आहे. त्या लेखात काहीही नकारात्मक नव्हतं, द्वेषमूलक, कुणावर टीका करणारं, बीभत्स ई असं काहीही नव्हतं... एका यशस्वी गायिकेबद्दल असलेला साधासा लेख होता तो. .. असो. माझी निराशा मला व्यक्त कराविशी वाटली इतकंच. इतर लेखकांना नाउमेद करण्याचा हेतू नव्हता. तुम्ही लिहीत रहा.

In reply to by तर्कवादी

सहानुभूती दर्शविणारे प्रतिसाद अशा वेळेला दुःखात भरच घालतात हे इतरांना समजावे म्हणून हा प्रतिसाद.

माझा अनुभव याउलट आहे. कथा फक्त प्रसिद्धच झाली नाही तर त्यावर टीमने कामही केलं आहे. मी पाठवलेली कथा आणि अंकात दिसते आहे ती कथा यांची तुलना केली. बऱ्याच ठिकाणी शुद्धलेखन, विरामचिन्हे यांवर मूळ कथेमध्ये सुधारणा करून ती प्रसिद्ध केली आहे. नवीन लेखक म्हणून ते वाचून नक्कीच कसं लिहायला पाहिजे हे समजण्यास मदत झाली. आपली वैयक्तिक कामे, प्राधान्यक्रम सगळं सांभाळून हे करणाऱ्या लोकांबद्दल आदर द्विगुणित झाला आहे. धन्यवाद मिपा

In reply to by श्वेता व्यास

+१ अगदी !मिपा गणेश लेखमाला माझा लेखसुद्धा टर्मिनेटर यांनी व्यवस्थित करुन दिला.पैजारबुवांनीही रेसिपी शुद्धलेखन नीट करुन दिले.मी अनेकदा संपादक मंडळांना शुद्धलेखन व इतर दुरुस्ती करून देण्याची विनंती केली,त्या तत्काळ झाल्या. धन्यवाद.