Skip to main content

सौरव नावाचे वादळ...

लेखक विकी शिरपूरकर यांनी शनिवार, 15/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही' हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या संघांची पाचावर धारण बसली आणि तो सर्वांत यशस्‍वी कर्णधार ठरला. मात्र त्‍याचा हाच स्‍वभाव नंतरच्‍या काळात त्‍याला अडचणीचाही ठरला. मात्र त्‍यावरही मात करून आज तो आपली सर्वार्थाने गाजलेली कारकीर्द संपवित आहे. भारतीय क्रिकेटची जिंकण्‍याची भूक वाढविणारा जिगरबाज खेळाडू सौरव चंडीदास गांगुली त्‍याचे नाव. तुम्‍ही-आम्‍ही आणि भारतीय संघातला प्रत्‍येक खेळाडू त्‍याला 'दादा' म्‍हणून संबोधतो. आपली संपूर्ण कारकिर्द अनेक वाद-विवाद आणि चढ-उतारांचा सामना करण्‍यातच घालवाव्‍या लागलेल्‍या या खेळाडूने आंतराराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये आपली 'दादागिरी' तशीच शाबूत ठेवली. आणि आता निवृत्ती घेऊन हे वादळ शांत झाले आहे. आपल्‍या दीर्घकाळच्‍या कारकिर्दीत एका लढवय्या सारख्‍या लढलेल्‍या सौरवने ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍दचा नागपूर येथील कसोटी सामना आपल्‍या कसोटी कारकिर्दीतीला शेवटचा असल्‍याचे जाहीर केल्‍याने दादाचे चाहते नक्‍कीच निराश झाले. मात्र दीर्घकाळापासून अपयशाचा सामना करत असलेल्‍या या वरिष्‍ठ खेळाडूने निवृत्त होताना ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍द ठोकलेल्‍या धावांनी आपल्‍यात अजूनही बरीच आग शाबूत असल्‍याचे दाखवून दिल्‍यानंतर निवृत्ती स्‍वीकारली हे दिलासा देणारेही आहे. संघातील युवा खेळाडूंना सतत पाठबळ देणे. त्‍यांच्‍यात धावांची आणि बळी घेण्‍याची भूक वाढविणे, आणि प्रतिस्‍पर्धी संघाला त्‍यांच्‍याच शब्‍दात अगदी संत तुकारामांच्‍या 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्‍या माथी हाणू काठी' शैलीतून उत्तर देणा-या दादाला म्‍हणूनच तर 'दादा' म्‍हणतात. ऑस्ट्रेलियासारखा बलाढय देश असो किंवा पाकिस्‍तान सारखा कट्टर पारंपरिक प्रतिस्‍पर्धी सौरवच्‍या नेतृत्‍वाखाली संघाने या देशांना त्‍यांच्‍याच भूमीवर पाणी पाजण्‍याचा इतिहास घडविला आहे. जितकी आग गांगुलीची बॅट धावा करून ओकत असे तितकीच गांगुलीच्‍या बॉडी लॅग्वेजमधूनही झळकायची. आणि म्‍हणूनच गांगुलीच्‍या नेतृत्‍वाखालील भारतीय संघ एकेकाळी जगातील बलाढ्य संघ समजला जात असे. विश्‍व चषकात अंतिम सामन्‍यापर्यंत मजल मारण्‍याची कामगिरीही त्‍याच्‍याच काळातली. आज भारतीय संघात तरुण खेळाडूंमध्‍ये जिंकण्‍याचा जो स्पिरिट दिसतो हे दादाच्‍या मेहनतीचेच फळ म्‍हणावे लागेल. दादाला आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पहिल्‍यांदा संधी मिळाली ती देखिल या लढाऊ वृत्तीमुळेच. क्रिकेटमध्‍ये प्रत्‍येक यशस्‍वी खेळाडूला विशेषणे दिली जात असतात. तद्वतच सौरवलाही 'द रॉयल बेंगॉल टायगर' म्‍हणून संबोधले जाते. मात्र हा वाघ केवळ कागदी नव्‍हता तर त्‍याची डरकाळी प्रतिस्‍पर्ध्‍यांना गर्भगळीत करणारी होती. हे त्‍याने अनेकदा सिध्‍द करून दाखविले आहे. एका बंगाली कुटुंबात जन्‍मलेल्‍या सौरवचा जन्‍म 8 जुलै 1972 साली कोलकात्‍यात झाला. वयाच्‍या 20 व्‍या वर्षी 1992 च्‍या सुमारास लढवय्यावृत्तीचा म्‍हणूनच सौरवला पहिली संधी मिळाली ती ऑस्ट्रेलियाच्‍या भूमीवर. त्‍यानंतर मात्र सलग चार वर्ष तो संघात नव्‍हता. 1996 च्‍या इंग्लंड मालिकेसाठी मिळालेल्‍या संधीचे सोने करीत त्‍याने या मालिकेत सलग दोन शतक कुटून आपल्‍यात किती क्षमता आहे हे दाखवून दिले. त्‍यानंतर मात्र दादाला मागे वळून पाहण्‍याची गरज भासली नाही. केवळ काहीच महिन्‍यात सौरव भारतीय संघातला सचिननंतरचा तगडा खेळाडू बनला. भारतीय संघाला एक तगडी धावसंख्‍या उभारून देण्‍यासाठी मैदानावर उतरणा-या या खेळाडून कधी सचिनच्‍या तर कधी सहवागच्‍या मदतीने अनेकदा संघाला तारून नेले आहे. मॅच फिक्सिंगच्‍या कीडीने ग्रासलेल्‍या भारतीय संघाला तारण्‍यासाठी 2000 मध्‍ये संघाची जबाबदारी सौरवकडे सोपविण्‍यात आली. सौरवने या दिव्‍यातून संघाला नुसते सावरलेच नाही. तर केवळ घरच्‍या मैदानावर जिंकण्‍याची क्षमता असलेल्‍या भारतीय संघाला विदेशी भूमीवरचा विजय काय असतो याची चवही चाखायला दिली. आपल्‍या संघ सहका-यांवर पूर्ण विश्‍वास टाकणा-या आणि त्‍यांच्‍या मैदानावरील बॉडी लॅग्‍वेजमध्‍ये प्रचंड बदल घडवून आणणा-या दादाने कर्णधारपदाच्‍या काळात अनेक नव्‍या चेह-यांना संधी दिली. लॉर्ड्सच्‍या मैदानावर ब्रिटीशांना त्‍याच्‍याच भूमीवर पराभूत केल्‍यानंतर टी-शर्ट काढून ज्‍या पध्‍दतीने सौरवने उत्तर दिले होते ते कधीही विसरण्‍यासारखे नाही. सौरवचे फटके आणि मैदानावरची फलंदाजीच त्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाबद्दल बरेच काही सांगून जायची विशेषतः षटकार ठोकण्‍याची त्‍याची ती खास 'स्‍टाईल'. क्रिकेटची पंढरी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या लॉर्डसच्‍या मैदानावर शतक ठोकण्‍याची इच्‍छा प्रत्‍येक फलंदाजाच्‍या मनात असते. क्रिकेटचा देव म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या सचिनलाही या मैदानावर शतक ठोकता आलेले नाही. त्‍या मैदानावर एकाच मालिकेत दोन शतके ठोकण्‍याचा भीमपराक्रम दादाने करून दाखविला आहे. त्‍याच्‍या कौशल्‍याने संघाच्‍या कामात सातत्‍याने सुधारणा होत गेल्‍याने दादाच्‍या शब्‍दालाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळात एक वजन होते. म्‍हणूनच त्‍याच्‍या सांगण्‍यावरूनच मंडळाने संघाच्‍या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपल यांची नियुक्‍ती केली. मात्र नंतर हेच चॅपल गुरूजी गांगुलीवर भारी पडू लागले. त्‍यांनी गांगुलीचीच पाळमुळे खणून काढण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला. त्‍यानंतर अनेक वाद झाले. आणि अखेर चॅपल बाहेर पडले. नंतरच्‍या काळात संघाच्‍या कामात सुधारणा होत गेली. गांगुलीची वैयक्‍तीक कामगिरी मात्र ढासळत गेली. भारतीय संघातील 'फॅब्‍युलिअस फोर' पैकी एक म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या खेळाडूच्‍या बॅटीतून धावांचा रतिब कमी झाला. सातत्‍याने अपयशाने त्‍याचा सामना केला. संघाच्‍या व्‍यवस्‍थापनातही मोठे बदल झाले. नवख्‍या खेळाडूंना अधिक संधी दिल्‍या जाऊ लागल्‍या आणि नंतर गांगुली एकाकी पडला. अशा परिस्थितीतूनही त्‍याने स्‍वतःला सावरत जेव्‍हा-जेव्‍हा संधी मिळाली आपला नैसर्गिक खेळ करून क्रिकेटची सेवा केली आहे. आज निवृत्तीच्‍या टप्‍प्‍यात आल्‍यानंतरही गांगुलीने आपल्‍यात आणखी किती क्षमता आहे, हे सिध्‍द करून दाखविले आहे. सचिन तेंडुलकर नावाच्‍या क्रिकेटच्‍या एका वादळासोबत आयुष्‍यातील अनेक सामने गाजविलेल्‍या या खेळाडूच्‍या निवृत्तीने सचिन खूपच दुःखी झाला आहे. क्रिकेटच्‍या मैदानावर जरी दादा आता यापुढे दिसणार नसला तरीही वेगवेगळ्या सामाजिक कामांतून तो सतत आपल्‍या चाहत्‍यांना दिसणार आहे. म्‍हणूनच दादाच्‍या चांगल्‍या आणि वाईट प्रत्‍येक प्रसंगांमध्‍ये त्‍याला पूर्णपणे पाठिंबा देणा-या त्‍याच्‍या राज्‍याच्‍या विकासासाठी तो आता कार्य करणार आहे. आयुष्‍यभर क्रि‍केटमध्‍ये व्‍यस्‍त राहिलेल्‍या सौरवच्‍या निवृत्तीनंतर त्‍याच्‍या कुटुंबीयांना आनंद होत असला तरीही क्रिकेटवर सच्‍चे प्रेम करणा-या प्रत्‍येकाला सौरवची निवृत्ती चटका लावून जाणारी आहे.

वाचने 2371
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सौरव गांगुली हा क्रिकेट मधील एक अत्यंत महान खेळाडू आणि कर्णधार आहे याबद्दल वादच नाही. त्याची निवृत्ती निश्चितच भारतीय क्रिकेटमधे एक पोकळी निर्माण करेल, जी भरायला थोडा अवधी जावा लागेल. पण सौरवची निवृत्ती चटका लावून जाणारी वगैरे आहे असं मला मुळीच वाटत नाही. किंबहुना, अत्यंत योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असं त्याचं वर्णन केल्यास ते जास्त सयुक्तिक ठरेल. आपण काहीही म्हटलं तरी एकूणच बीसीसीआयला तो नकोसा झाला होता. दालमियांची राजवट संपल्यावर त्यांची आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांची पाळंमुळं खणून काढण्याच्या बीसीसीआयच्या धोरणाचा तो बळी ठरला (शिवाय त्याने तेव्हा माज केला ही गोष्टही नाकारता येत नाही). गांगुली बाजूला पडत जाण्याचं अजून एक कारण म्हणजे नवीन चांगल्या खेळाडूंचं संघात आगमन. आपण आता पाहतोच आहे की हे 'फॅब फोर' संघात नसतानाही आपला संघ एकदिवसीय सामने जिंकतो आहे. या सगळ्या घटकांचा विचार करता गांगुलीने केवळ संघात राहाण्यासाठी सीलेक्टर्सची हांजी हांजी करणं हे त्याच्या आक्रमक स्वभावाला आणि प्रतिमेला विसंगत ठरलं असतं (निदान मला तरी ते बघायला आवडलं नसतं). 'मला संघात निवड होण्यासाठी सीलेक्टर्सच्या मर्जीवर अवलंबून राहाण्याची इच्छा नाही' हे त्याचं वक्तव्य या बाबतीत बरंच काही सांगून जातं. आणि तो निवृत्त झाला म्हणून झालेल्या दु:खाबद्दल म्हणायचं झालं तर त्याला काही इलाज नाही. माझ्या आधीची पिढी सुनील गावसकर निवृत्त झाला म्हणून हळहळली, मी सचिन/सौरव/कुंबळे निवृत्त होताना हळहळणार आणि पुढच्या मॅचच्या वेळी उत्साहाने धोनी/युवराजची फलंदाजी पाहायला टीव्हीसमोर बसणार.

In reply to by घाटावरचे भट

बा देवा ... काय बोललास काय .. अगदी मनातलं .. गांगुलीने असं हांजी हांजी केलं असतं तर आपला हिरो राहिलाच नसता रे तो .. तो *डवा 'किरण मोर्‍या"' .... **घाला स्वत:च्या कारकिर्दीत काय दिवे लावलेले कोणास ठाउक .. साला क्लियर होती रे सौरव ला संघाबाहेर ठेवण्यात "किरण मोरे" ह्याचे वैयक्तिक वाद कारणीभूत आहे.
मी सचिन/सौरव/कुंबळे निवृत्त होताना हळहळणार आणि पुढच्या मॅचच्या वेळी उत्साहाने धोनी/युवराजची फलंदाजी पाहायला टीव्हीसमोर बसणार.
अप्पन भी येईच कहता है ... कट्टर सौरववादी) टौरव टांगूली

"गांगूलीची अजून ऐक ओळख.... जलद गति गोलंदाजाना घाबरणारा, त्याच्या सोमोर डोळे मिचक्वत खेळणारा, कधि हि चेंडू लेगला पूल न करू शकणारा, bouncer ball खेळताना नेहमी ज्याचि फाटायचि, ....मैदानावर थोडेसे लागल्यावर नाटके करणारा... खेळ्ण्यापेषा मैदाना बाहेर राजकारण करण्यात धन्यता माणनारा.... आपल्या काहि बावळ्ट बंगालि समर्थकाच्या जोरवर कायम बातम्यामध्ये राहणारा..... सचिनचे त्रिशतक न होवू देणारा ( द्रविडच्या खांद्यावर बंदूक ठेवून )........ अश्या माणसाला.... "दादा", "टायगर" म्हणनने हास्यास्पद आहे......विकिराव थोडे जास्तच कौतूक झाले, एवढि लायकि नाहि त्याचि....... त्याला खेळ्तांना बघतांना कंटाळा तर यायचाच पण त्याच्या जाहिराति तर त्याहून टूक्कार.... सचिनभक्त्....अमितकुमार....

In reply to by अमितकुमार

ज्याप्रमाणे 'गांगुली जलदगती गोलंदाजांना घाबरतो आणि त्याला बाउंसर खेळता येत नाही' असं तुम्ही म्हणता तसंच 'सचिनला आजकाल इनस्विंगर खेळता येत नाही' असं म्हणणारे महाभागही माझ्या माहितीत आहेत. जर गांगुली इतका वाईट खेळाडू असता तर कसोटी सामन्यांत ७०००+ आणि एकदिवसीय सामन्यांत ११०००+ धावा करूच शकला नसता. आता गांगुली निवृत्त झालाय. जेव्हा एखाद्या फलंदाजाच्या संपूर्ण कारकिर्दीचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्या फलंदाजाचं यशापयश केवळ त्याने केलेल्या धावांवर ठरत असतं. एका मर्यादेपलिकडे त्या खेळाडूच्या भात्यात कोणते फटके आहेत याला काहीही अर्थ नसतो. अर्थात गांगुलीने नंतर जे राजकारण केलं त्याचं मी समर्थन मुळीच करू इच्छित नाही (पण असं राजकारण कपिल देवने सुनील गावसकरच्या विरोधात केलं असही म्हणतात. ती कदाचित भारतीय क्रिकेटची देदिप्यमान परंपरा असावी). माझा मुद्दा एवढाच आहे की केवळ लेग साईडला फटके न मारल्याने/ राजकारण केल्याने खेळाडू म्हणून गांगुलीचं श्रेष्ठत्व कुठेही कमी होत नाही. भविष्यात जेव्हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासाबद्दल लोक बोलतील, तेव्हा तुम्हाला ते पटो अथवा न पटो, सचिन बरोबर गांगुलीचंही मोठा खेळाडू म्हणून नाव घेतलं जाणारच. 'तुम्ही ऑफ साईडला सगळेच्या सगळे ९ क्षेत्ररक्षक लावा. गांगुली तरीही तुम्हाला ऑफ साईडला चौकार वसूल करुन दाखवील' हे स्टीव्ह वॉचं वाक्य किंवा 'ऑन दी ऑफ साईड, फर्स्ट देअर इज गॉड अँड देन देअर इज दादा' हे राहुल द्रविडचं वाक्य काही वेगळं सांगत नाही. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे डोक्यावरचे काळ्याचे पांढरे केलेल्या या धुरंधरांपेक्षा आपल्याला या खेळाची समज जास्त आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर बोलणंच खुंटलं.

In reply to by घाटावरचे भट

अरे कशाला परिश्रम घेतलेस एवढं टाइप करायचे , मी ही उत्तर देउ शकत होतो की , बाकी तुझं खालचं एकच वाक्य पुरं होतं रे..
अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे डोक्यावरचे काळ्याचे पांढरे केलेल्या या धुरंधरांपेक्षा आपल्याला या खेळाची समज जास्त आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर बोलणंच खुंटलं.
आपल्या इथं कोणी काय राजकारण केलं काय केलं हे कोणालाही अगदी तळापर्यंत माहित असावं म्हणूनच कुमारजींनी तो मुद्दा काढला, आणि जर माहित नसेल तर एक बडबड म्हणून सोडून द्यावं . गांगूली कोणत्या दर्जाचा आहे हे आपल्या सारख्या क्षुद्रांनी वर्णन काय करावं ? किंवा कोण्या एकाच्या ४ टिकांनी त्याचं श्रेष्ठत्व का कमी व्हावं ? इग्नोर कर ना बे भटा , असाइमेंट देउ का तुला एखादी अजुन ?

वरिल लेख हा अतिशोय्क्ती वाटतो म्हणून प्रतिकिया दिलि......