लॉकडाऊन: तेविसावा दिवस
मी
डिसेंबर पासून एका कंपनीचे काम External Consultant म्हणून करणं सुरू आहे. त्यांची २० मार्चपासून लॉकडाउनमुळं घरून काम करण्याची सूचना मिळाली. त्यांच्या ऑफिसात जायचो तेव्हा विशेष काही काम नसायचं.आता घरून काम करताना मात्र कितीतरी कसली-कसली कामं देताहेत. अर्थात, त्यातली कोणती करायची आणि कोणती टाळायची याचं गणित ज्याचं त्याला माहित असतंच!
पूर्णवेळ नोकरी सोडून पाचेक वर्षे झाली तेव्हापासून वर्षातून आठेक महिने काम करतोय. एप्रिल-मे महिन्यात शक्यतो काम करण्याचं टाळतो, ते उद्दिष्ट आता (घरून काम करत असल्याने) एका अर्थाने पूर्ण होत आहे. सध्याची वर्क-ऑर्डर सप्टेंबर पर्यंतची आहे. भविष्याबद्दल काहीशी अनिश्चितता वाटते आहे खरी पण, सध्या तरी ठीक चालू आहे ना मग जाऊ दे, पुढचा हरी पुढे असंही मन म्हणतंय.
घरून काम म्हणजे घोरून काम असा सुरुवातीला बेत होता, पण काही कारणांनी हळूहळू तो बदलला! दिवसभरात सध्या बराच मोकळा वेळ मिळतोय. तिच्याशी तासंतास गप्पा मारणं, नवनवीन पाककृती (आणि अनेकदा रोजचा स्वयंपाक) करणं, वाचन करणं, अधूनमधून सायकलिंग करणं, पहायचे राहून गेलेले सिनेमे पाहणं, मुलींना काहीतरी शिकवणं आणि त्यांच्याकडून ते implement करून घेणं, घरातील किरकोळ दुरुस्ती करणं, साग्रसंगीत देवपूजा करणं, नुसतंच मोकळं बसून राहून काहीही न करणं… यांमध्ये खरंच किती मोठा आनंद आहे याची जाणीव होतेय.
...
ती
सध्याच्या लॉकडाऊनमुळं दहा वर्षांपूर्वीच्या हैदराबादेतील संचारबंदीची आठवण झाली. तेंव्हा आम्ही जुन्या शहरात राहायचो. ३१ मार्च २०१० ला आमच्या मोठीचा तिसरा वाढदिवस होता. तिच्या मित्र मैत्रिणींना बोलावून, केक कापून, फुगे फोडून वाढदिवस साजरा करायचा असा तिचा हट्ट होता पण संचारबंदीमुळे केक वगैरे मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. त्यावेळी एका (स्थानिक नेता असलेल्या) शेजारी मित्राने, भर कर्फ्यूत शहरात जाऊन भारी केक आणून मुलीचा हट्ट पुरवला होता. अर्थात ते दहा वर्षांपूर्वीचं ओल्ड सिटी नावाचा खेडं होतं! यावेळी मात्र लॉकडाउनमुळं,(आणि कदाचित, आम्ही ओल्ड सिटी सोडल्यामुळं) ३१ मार्च २०२० ला बाहेरून केक वगैरे मागवणं काही जमलं नाही. ३१ मार्च २०३० ला असंच काही होईल का?
लॉकडाउनमुळं, उपलब्ध असलेल्या सामग्री नुसार काहीतरी नवे-जुने खाद्यपदार्थ आम्ही सामूहिक रीतीने करतोय. म्हणजे, कुणी कांदा चिरतंय, कुणी साहित्य काढून देतेय, कुणी गॅस पेटवतंय, कुणी फोटो काढतंय, कुणी सगळं झाल्यावर आवराआवर करतंय…
घरून काम करत असल्यामुळे सध्या त्याची किचनमध्ये घुसखोरी फारच वाढलीय. नाहीतरी, सुरुवातीपासूनच त्याचं, “Cooking and coding is same” हे मत आहेच म्हणा. रोज काही ना काहीतरी करतोय. आणि एकटा नाही, दोन्ही मुलींना घेऊन.
मी अगदी result-oriented आहे आणि तो मात्र फारच process-oriented. मला, किचनमध्ये असताना, मी एकटीच हवी असते. पूर्वी जॉब करत असताना, चारसहा जणांचा - भाजी, पोळी, वरण, भात, तोंडीलावणं असा स्वयंपाक करून मी अर्ध्या तासात किचनमधून बाहेर पडायचे. त्याला मात्र कुठला पदार्थ करायची तयारी करायलाच तासभर तरी लागतो. आधी तो दोन्ही मुलींना बोलावणार, (मलाही सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार), पूर्ण प्लान समजावून सांगणार, काम वाटप करून देणार, मुलींना जे करता येत नाही ते तिथल्या तिथेच शिकवणार, सगळी जमवाजमव झाल्यावर गॅस पेटवणार, मग केव्हातरी तासाभरानंतर तो पदार्थ टेबलावर येणार, त्यानंतर मग सगळे फोटो काढणार. त्या सगळ्यांमध्ये दोन-तीन तास तरी जाणार. मीन राशीच्या लोकांचा स्वभावच थोडासा मिनमिन करणारा असा असतो का?
खरंतर, आजवरच्या आयुष्यात आम्ही दोघांनीही, विशेषतः त्यानं, कुठलीच गोष्ट फार गांभीर्यानं म्हणून कधी केलीच नाही. जे केलं ते - सध्या मज्जा वाटतीय ना मग ठीकै, बाकी पुढचं पुढे, अश्याच विचारानं. म्हणूनच की काय, त्याला पहिल्यांदा भेटून पंधरा वर्षे झालीत असं वाटतंच नाही. पण, मुलींना घरकाम, किचनकाम, बाजारकाम, ड्रॉईंग, पेंटिंग इत्यादीतलं जे कळतं, ते काही अंशी त्याच्यामुळेच.
...
त्या
१३ मार्चला आमचा रिझल्ट आला. मी सिक्स्थ मध्ये गेले आणि दीदी नाईन्थमध्ये गेली. आमची शाळा १६ मार्चला स्टार्ट होणार होती पण लॉकडाउनमुळे नाही झाली. घरी राहिल्याने कधी-कधी बोअर वाटतंय पण आई-बाबा आणि दीदीच्यासोबत मज्जा येतीय.
परवा आई-बाबांनी आम्हाला अष्टा-चम्मा नावाचा गेम शिकवला. ते लहानपणी खूप खेळायचे म्हणे. खूपच इंटरेस्टिंग गेम आहे तो. मी तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच तो गेम शिकले. अष्टा-चम्मामध्ये तोडी करायला, आणि हसू नका, पण संडास बांधायला वगैरे खूप मजा येते. कधी कधी आम्ही नेम-प्लेस-ऍनिमल-थिंग खेळतो. तो गेम अधूनमधून आई आम्हाला मराठीमधून खेळायला सांगते. मी काही वेळ चीटिंग करते पण दिदीच्या लक्षात आलं तर ती मला मारते. आम्ही सगळे मिळून कधीकधी अंताक्षरी खेळतो.आईला तर खूप गाणे येतात आणि तिला काही गाणे तर पूर्ण म्हणता येतात. तिनं मला एक मराठी गाणं शिकवलं आहे. लास्ट वीकपासून बाबा आम्हाला जावा कोडिंग शिकवत आहेत. आतापर्यंत मी टोकन्स-इन-जावा शिकलेय. मला जावा खूप इंटरेस्टिंग वाटतंय पण अजून तेवढं काही समजत नाहीये.
सध्या बाहेर सगळंच बंद आहे म्हणे. मी तर खूप दिवसांपासून सेक्युरिटीगेटच्या बाहेरच नाही गेले. लास्ट समरमध्ये आम्ही पुण्याला गेलो होतो आणि या समरमध्ये आमचे कझिन्स हैदराबादला येणार होते, मग आम्हीपण नागपूरला जाणार होतो.
पण आम्ही कुठेच नाही गेलो, घरीच आहोत… मला वाटतं, करोना म्हणजे कर्फ्यू.
...
वाचने
18821
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
भारी.. हा फॉरमॅट आवडला..!!
करोना म्हणजे कर्फ्यू.
In reply to करोना म्हणजे कर्फ्यू. by NiluMP
शाळेत मॅम घरात मॉम त्रास आहे.
आवडले विचार.
छान !
मस्त
मस्त लिहिलंय.
वाह, मस्त ! आवडला, लॉकडाऊन:
फॉर्मेट आवडला
In reply to फॉर्मेट आवडला by मित्रहो
करोना म्हणजे कर्फ्यू. --- :-)
मस्त लिहीलय
असा फॉरमॅट ..
In reply to असा फॉरमॅट .. by चौकटराजा
कॅलिडोस्कोप माझ्या संग्रही
छान लिहिलंय
मस्त लेख
मस्त.
छान फॉर्मॅट
२०३०योगायोग आहे खरा! २०३० चा वाढदिवस दण्क्यात साजरा होवो, या शुभेच्छा! सहावीत जावा कोडिंग सुरुवात ? परवा एक मित्र म्हणत होता, पायथन वगैरे शिकून घे. मी आयटीत असलो तरी मला कोडिंगची गरज पडत नाही. काम थोडफार इन्फ्रस्ट्रक्चर अन बरंचसं अॅप्लिकेशन आहे. मित्राला म्हणालो, छे, मला काही उपयोग नाही त्याचा. पण आता वाटतंय, शिकून घ्यावं. प्रेरणेसाठी धन्यवाद!In reply to छान फॉर्मॅट by तुषार काळभोर
२०३० चा वाढदिवस दणक्यात साजरा
काही प्रतिक्रिया वाचून मौज वाटली.
लेख आवडला
In reply to लेख आवडला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अष्टा-चम्मा
In reply to लेख आवडला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अष्टा-चम्मा खेळ
In reply to अष्टा-चम्मा खेळ by वामन देशमुख
चल्लास- आठ
In reply to अष्टा-चम्मा खेळ by वामन देशमुख
बाब्बो!
In reply to बाब्बो! by लई भारी
सेम टू सेम.
छान लिहिलं आहे. आवडलं
अष्टा-चम्मा नावाचा गेम शिकवला
भारी लिहिले आहे आवडले..
लॉकडाऊन: १८५०वा दिवस (भाग २)