Skip to main content

छायाचित्रण कलेचा आस्वाद

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 20/08/2018 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी. गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले. अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते. माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते. माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार - या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.

वाचने 41842
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

मस्त धागा. सकाळी सायकलींगला जाताना माझ्या सारख्या अतिशय टुकार छायाचित्रकाराने काढलेली काही छायाचित्रे कोणाला आवडू ना आवडो स्वतःला आवडायला लागतात . सकाळच्या सुदंर वातावरणाचा आणि मोबाइल मधल्या कॅमेऱ्याचा परिणाम.

फ्लॉरेन्स: आर्नो नदीवरील एक पूल . इ.स. १४५८ साली बनलेल्या पित्ती/मेदिची-प्रासादातले एक दालनः . एक शयनकक्ष ऊर्फ बेडरूम (३२०,००० वर्गफुटाच्या घरातील एक खोली) . एका दालनातील छतावरील चित्रः . आंघोळीचे संगमरवरी घंगाळ आणि एक घड्याळ ..

सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! गेल्या हिवाळ्यात टिपलेली पक्षाची ही मुद्रा. अनेक वर्षांनी साहित्य संपादकांनी छायाचित्रणकला स्पर्धा या उपक्रमाचे पुनुरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद.