Skip to main content

रद्दीपेपर च्या मोबदल्यात काय आवडेल घ्यायला?

Published on गुरुवार, 21/04/2016
नमस्कार मिपाकर मित्रांनो, सर्वसामान्य घरांमधे किमान एक किंवा दोन वर्तमानपत्रे येतात. वर्षाला साधारण ३० ते ५० किलो रद्दी तयार होते. बाजारभावाप्रमाणे दारावर येणारा रद्दीवाला ९-१०-११ रुपये किलोने रद्दी विकत घेतो. पण त्याच्या काट्यावर १० किलो रद्दी ७ किलो भरते. आमच्या घरात डिजिटल काटा आहे व नेहमी आधी मी मोजुन घेऊन नंतरच रद्दीवाल्याला मोजायला देतो म्हणून माहिती. जेव्हा माझ्या काट्यावर मोजतो तेव्हा रद्दीवाला ७ रुपये किलोने पैसे देइन असे बोलतो. रद्दीवाल्याच्या काट्यावर ३० किलो रद्दी फक्त २२ किलो भरली होती. असो, अजून अनेक समस्या रद्दीवाल्यासंबंधित आहेत. रद्दीशीही संबंधित आहेत. भारतात कचरासंकलनामध्ये निव्वळ रद्दीपेपरची समस्या इतकी आहे की डम्पींग ग्राऊंडचा सुमारे ४०-५० टक्के कागदासंबंधित कचर्‍याने व्यापला आहे. वापरल्या जाणार्‍या १०० किलो कागदापैकी फक्त २० टक्के पुनर्वापरासाठी उपलब्ध होतो. विकसित देशांत हे प्रमाण सुमारे ५० ते ७० टक्के आहे. भारतातल्या पेपरमिल्सना वापरलेले कागद लागतात, त्यांच्या एकुण गरजेपैकी त्यांना परदेशातून सुमारे ५०-६० टक्के आयात करावे लागते. नवीन पेपर तयार करायला सुमारे ६० टक्के नवीन कच्चा माल (झाडे), व ४० टक्के जुने कागद लागतात. जर प्रत्येक घरातुन वापरलेले कागद नीट गोळा करता आले तर. ही आयात कमी करता येईल-त्यात जाणारे विदेशी चलन वाचवता येईल, डम्पिंग ग्राउंडची वाया जाणारी जागा वाचवता येइल. करोडो लिटर पाणी, लाखो झाडे, वीज वाचवता येईल. फायदे अनेक आहेत. भारतातले रद्दी पेपर गोळा करण्याची व्यवस्था अतिशय वाईट आहे हे आपण वर पाहिलेच. मुळात आपण सामान्य लोक ह्याकडे तसे लक्ष देत नाही, सरकार जागृती करुन थकून जाते, पेपरमिलवाले त्यांच्या उद्योगाच्या व्यापातच फसले आहेत. अशा समयी जर व्यावसायिकरित्या घरोघरचे, ऑफिसांतले वापरलेले कागद गोळा करुन पेपरमिलवाल्यांपर्यंत पोचवले तर हे सगळे शक्य होईल. वापरलेल्या कागदांपैकी सुमारे ८० टक्के कागद पुनर्प्रक्रिया करुन नवीन कागदनिर्मितीसाठी वापरता येतो. असे प्रयत्न झाले आहेत, होत आहेत. अनेक पेपर मील जसे खन्ना, आयटीसी, रामकी ग्रूप सारख्यांनी रिवर्स इंटीग्रेशन सुरु केले आहे, पण म्हणावे तितके यश येत नाही. अनेक एन्जीओ ह्यात आहेत पण तुम्हाला माहितच आहे एन्जीओ कसे काम करतात ते. मुख्य प्रश्न आहे सामान्य नागरिकांच्या सहभागाचा. माझ्यामते सामान्य लोकांना रद्दीच्या बदल्यात पैसे मिळतात ते हवे असतात विनासायास. घरबसल्या कोणी पेपर घेउन जातो, पैसे देउन जातो, कसं सुटसुटीत. एन्जीओ दान करा म्हणतात, पेपरमिलवाले आमच्या कलेक्शन सेण्टरवर आणुन द्या म्हणतात. बरेच इशु आहेत. प्रश्न असा आहे की जर घरीच येउन कोणी हे पेपर घेउन जाणार असेल व ह्या बदल्यात पैसे न देता इतर काही देणार असेल तर तुम्हाला ह्या वर्षाच्या ३०-५० किलो रद्दीच्या ३००-५०० रुपयांच्या ऐवजी काय घ्यायला आवडेल? तुम्हाला काही कल्पना सुचतात का की पैशांऐवजी काहीतरी पर्यावरणासाठी केल्याचं समाधान व त्याचं बक्षिस म्हणून एखादी गोष्ट, सेवा, सवलत मिळाली तर सामान्य जनता आकर्षित होऊन सहभागाचं प्रमाण वाढेल? माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. बघा कशा वाटतात, यातल्या व्यवहार्य नसतील तर सांगा, वेगळ्या काही असतील तरी सुचवा. १. एका वर्षाच्या रद्दीचे पैसे नियोजित करुन तेवढ्याचे गिफ्ट कुपन, डिस्काऊंट कुपन, गिफ्ट वाउचर्स देणे. २. बचतगटांकडून हाताने बनवल्या जाणार्‍या वस्तू, अंध, अपंग मुलांकडून, व्यक्तिंकडून बनवल्या जाणार्‍या वस्तु देणे ३. सोडेक्सो कुपनसारखे फुड कुपन्स देणे ४. ५०० रुपयात बसेल असा जास्तीत जास्त रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स तत्सम देणे. ५. घरपट्टी, पाणीपट्टी, तत्सम करांतून १ टक्का सुट देणे. स्वच्छ भारत अभियानास समस्त भारतीयांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपले अमुल्य मत जरुर नोंदवा. धन्यवाद. संदर्भः http://dipp.nic.in/english/Discuss_paper/DiscussionPaper_Recycling_WastePaper_21October2011.pdf

वाचन संख्या 10674
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

पर्यावरणहित जपणारी रिसायकलिंगची संकल्पना आवडली. शेवटी विचारलेल्या प्रश्नाला माझे उत्तरः टिव्हीवरच्या ऑन डिमांड कार्यक्रमांचे कूपन घ्यायला आवडेल. घरबसल्या सहजपणे वापर करता येईल हा उद्देश. तुम्ही सुचवलेले पर्यायही उत्तम वाटले.

पहिला पर्याय चांगला वाटतोय पण फक्त एकच पर्याय असण्यापेक्षा जास्त पर्याय असले तर लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे निवड करता येईल. भारतीय लोक नको तेवढे आणि नको त्या ठिकाणी चिकित्सक आहेत. पुढे जाउन यात प्लास्टिक (पिशव्या, बाटल्या, डबे ई वेगवेगळे सॉर्ट करून), थर्माकोल (कप वगैरे) याचा पण समावेश करता येईल. मुख्य प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे. रद्दीचे पैसे मिळतात म्हणून तरी लोक नीट ठेवतात. पण प्लास्टिक बद्दल तर आपण फारच निष्काळजी आहोत. कचरा वेगवेगळा करून ठेवावा आणि योग्य तिथे टाकावा एवढी साधी गोष्ट पण लोक करत नाहीत.

In reply to by खटपट्या

अ से च म्ह ण तो. बाकी, आमचा अनुभव. रद्दीचे पैसे येऊन त्याचं फार मोठं काहीही नियोजन करता येत नाही. आमच्याकडून कै होऊ शकत नै. रद्दी आमच्याकडे आठ रुपये किलो आहे, (कुठे जास्त भाव असेल तर खरड करा, तिकडेच विकेन म्हणतो.) दोन तीन महिन्याची साठवून वीस बावीस किलो रद्दी भरते. हातगाडीवाला दारात येतो, रुपया दोन रुपयावरुन आमच्याकडच्या महिला घासघीस करतात. रद्दीच्या पैशाच्या काय केलं पाहिजे, अशी कोणतीही खास कल्पना आमच्या डोक्यात नाही. पण, धाग्याववरुन आता रद्दी विकून बटरस्कॉच आईसक्रीमचं फ्यामिली प्याक आणावं काय, अशी कल्पना डोक्यात घोळत आहे. धन्यवाद. अवांतर : आजचं गाणं- अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे आठ रुपये किलो आहे, (कुठे जास्त भाव असेल तर खरड करा आमच्याकडे ९ रू भाव आहे. कुरियरने पाठ्वत चला.माझा कट काहीही नाही. समाजसेवा .

In reply to by चौकटराजा

ओके. डन हाय काय अन नाय काय ? खरं तर रद्दीच्या पैशात दुसरं तीसरं काहीही न घेता चांगली वाइन घेतली पाहिजे. चांगली वाइन कोणती काही सुचवाल का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगल्या वाईनसाठी २-३ महिन्यांची रद्दी पुरायची नाही! वर्षभर साठलेली रद्दी काढावी लागेल!!

In reply to by सुनील

ठीक आहे, तसं करु, सांगा दोन चार चांगली नावं आणि तिचे फायदे. लेखक महोदयांना प्रतिसाद अवांतर वाटू नयेत, रद्दीच्या मोबदल्यात काय, तेच सुरु आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांगा दोन चार चांगली नावं आणि तिचे फायदे.
नावे नक्कीच सांगू. पण फायदे मी काय सांगणार? ते ज्याचे त्याने अनुभवावे!! भारतीय वाईन्सम्ध्ये मी नाशिकच्या सुलाचा फॅन! रक्तवारुणींत सुला दिंडोरी शिराझ तर श्वेतवारुणींत सुलाची शेनिन ब्लां याची शिफारस करीन. (वर्षभराच्या रद्दीत यांपैकी कुठलीही एक येईल)

In reply to by सुनील

अरे व्वा! छान. चांगली कल्पना आहे. म्हणजे नाशिकच्या सुलाचा एक मोफत वाईन टूर पर्यायांमधे ठेवता येईल. चला, येउ द्यात. आणखी हटके कल्पना.

In reply to by चौकटराजा

मी त्यापेक्षा जास्ती भाव देणारे दुकान दावतो. माझा कट काहीही नाही. समाजसेवा . अता पहिली गोष्टः मस्त संकल्पना आणि डांगे साहेबांना पुन्हा लिहिते झालेले पाहून आनंद झाला.

In reply to by कविता१९७८

सेम हेच म्हणणार होतो. जगातील जे हवे ते पेपर मोबाईल , ट्याब, लॕपटॉपवर उपलब्ध होतात तर हार्ड कॉपी वाचण्यात कुठला शहाणपणा आहे ? पैसे तर वाचतीलच शिवाय पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे समाधान.

In reply to by उगा काहितरीच

अजुन कितीतरी जनता मोबाईल/टॅब/पीसीवर पेपर वाचु शकणार नाही.शिवाय त्यात मुळात या उपकरणांची किंमत / ईंटर्नेटची किंमत फार जास्त आहे. लोकांना स्वस्तात मस्त २-५ रुपयात हार्ड कॉपीच परवडते. शिवाय त्याचे ईतरही उपयोग (वाचुन झाल्यावर) करता येतात :) ते वेगळंच आमच्याकडे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार पेपर येतात. म्हणजे नियमित येणारा सकाळ, विकांताला संध्यानंद. शब्दकोडी सोडवायला मुंबई चौफेर, ठराविक दिवशी पुरवण्या वगैरे वाचायला(मुंबईची सवय) लोकसत्ता. आता मला सांगा... नेट सॅव्ही नसलेले लोक हे सगळे कसे वाचणार?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

डिजीटल विषमता संपून डिजीटल अंत्योदय होणे ही काळाची गरज आहे.

मला गिफ्ट वाऊचर्स वैग्रेपेक्षा बचत गट इत्यांदीकडून केलेल्या वस्तू घेणे जास्त आवडेल. माझ्या रद्दीवाल्याकडे एलेक्ट्रॉनिक वजनकाटा आहे. घरच्या आणि त्याच्या वजनात फरक येत नाही. सध्या ९ रुपये किलो भाव आहे. पावसाळ्यात भाव उतरतो (कागदाचे वजन वाढते). पूर्वी इंग्रजी आणि मराठी पेपराचे रद्दीचे भाव निराळे असत. गेल्या अनेक वर्षांपासून तो फरक नाहीसा झाला आहे. बियरच्या बाटल्यांचेही पूर्वी वेगळे दर असत. हल्ली सगळ्या काचा एकाच भावात (१ रुपया किलो) जातात.

'रद्दी' च्या मोबादल्यात मला एक 'नवे पुस्तक' आवडेल (जरा काव्यात्मकच झाले! असो) वेलकम बॅक डांगे साहेब!!

माझ्या मते अश्या प्रकारच्या कल्पना नविन नाही. पुण्यात रद्दीवाला म्हणुन एका सर्विस आहे, जी घरोघरी जाउन रद्दी घेते, व तुम्हाला पैसे घेता येतात, अथवा ही रक्कम देणगी म्हणून त्यांच्या संस्थेला देता येते, जी वेगवेगळे उपक्रम राबवते. वर ह्या संस्थेचे लोक अगदी व्यवस्थित ड्रेस घालुन, डिजिटल वजनकाटा घेउन येतात. तुम्हाला देणगी साठी आग्रह पण नाहीच. रेट पण बरे आहेत. अजून काही संस्था पण हा स्तुत उपक्रम करतातच..(http://www.greenraddiwala.com/)

दर वर्षी बिग बझार वाले हेच तर करतात. मोठी जाहिरात देतात. आपल्या घरातले भंगार सामान नेउन द्यायचे आणि त्या बदल्यात खरेदीची डिस्काउन्ट कुपन्स घ्यायची. अर्थात यात त्यांचा धन्दा असतो त्यामुळे जर शंभर रु ची रद्दी दिलीतर पाचशे/हजार रु च्या खरेदीवर शंभर रु ची सूट मिळते.

@बजरबट्टू, कल्पना अजिबात नविन नाही. मी सदर विषयावर गेले १०+ वर्ष लक्ष ठेवून आहे. रद्दीपेपर गोळा करणे एक चांगला व्यवसाय आहे कारण इथे मार्केटगॅप खुप आहे. गेल्या दोन वर्षापासून तर या क्षेत्रात नवीन काय घडतंय यावर माझा सविस्तर अभ्यास सुरु आहे. अनेक ठिकाणी, शहरांमधे तुम्ही दिलेल्या लिन्कप्रमाणे व्यावसायिकांनी स्टार्ट-अप सुरु केले आहेत. पण स्केलींगचा इशु येतोय. दुर्दैवाने गेल्या पाच वर्षात अनेक आस्थापनांच्या नियोजनानुसार अपेक्षित असलेला विस्तार होऊ शकलेला नाही. हे ग्रीनरद्दीवाला बहुतेक मे २०१५ मध्ये सुरु झालेत व व एक वर्षात पुण्यासारख्या (अंदाजे) ५ लाख घरे असलेल्या शहरात त्यांचे रजिस्टर्ड युजर्स फक्त १२०००+ आहेत. म्हणजे अंदाजे ०.०२५ टक्के. हे खूप कमी आहे. मोबाईल-इन्टरनेटच्या माध्यमातून हे करु पाहणार्‍यांचा फोकस टेक्नोलॉजीकडे जास्त आहे, मूळ विषयाकडे कमी. माझ्या असे लक्षात आले आहे की लोकसहभाग कमी पडत आहे. त्याची कारणे काय असावीत व त्यावर उपाय काय करता येतील ह्यावर विचारविनिमय झाला तर उत्तम होईल. @उगा काहितरीच, कविता१९७८, दरडोई कागदाचा वापर कमी होणारा नाही हे मान्य करायलाच हवे. तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करणार्‍या अमेरिकेतही हा कमी झालेला नाही. शंभर टक्के टेक्नोसॅव्ही असलेल्या समाजातही शुन्य कागद वापर अशक्य आहे. आपण फारतर शुन्य कचरा व शंभर टक्के पुनर्प्रक्रिया साधू शकतो. भारतात अशी परिस्थिती येईस्तोवर समोर असलेली समस्या कशी सोडवता येईल त्यावरही विचार करणे क्रमप्राप्त ठरते. योग्य उपाययोजना केली तर कागदनिर्मिती व्यवसाय हा सस्टेनेबल व पर्यावरणप्रेमी होऊ शकतो.

In reply to by संदीप डांगे

सहमत नको इतकी किचकट करून ठेवलीय ही साईट. मी नोंदणी केली तरी तारीख नोंदणी करू शकत नाही. आणि खरेच या धंद्यात व्यवसायात संधी असेल तर (म्हणजे मागणी प्रचंड पण पुरव्ठा पुरेसाही नाही) तर त्या व्य्वसायीकानी अजून नव नवे पर्याय शोधायला हवेत लोकांपर्यंत पोहोचायला. अति अवाम्तर अजूनही (अगदी माझ्या सद्ध्याच्या) कंपनीतही जुने कागद (गोपनीयता कारणास्तव) जाळले जातात (गेल्या वर्षापुर्वी किमान ४०० फाईल जाळल्या (सन १९८०-९० पर्यंतच्या) ता.क. मी जाळल्या नाहीत तर मनुष्यबळ विकास (?) विभागाच्या देखरेखीत आणि अखत्यारीत जाळल्या गेल्या.

In reply to by नाखु

नाखुकाका, फाईली जाळून टाकण्यापेक्षा श्रेडींग करणे जास्त चांगले. गोपनियताही टिकून राहते. काही कंपन्या तुमच्या ऑफिसमधे येऊन तुमच्यासमोर सर्व कागदपत्रांचे श्रेडींग त्यांच्या मशिनमधे करुन देतात व नंतर ती रद्दी घेऊन जातात. काही देशात, (आपल्याही) काही ऑफिसेस आपला कचरा घेउन जाणार्‍यांना पैसे देतात.

In reply to by संदीप डांगे

मी मनुष्यबळ वाल्याना सांगीतला पण मी त्यांचे तुलनेने कंपनीत नवखा असल्याने (तो कायम्च रहाणाराहे) झटकून टाकला व पुर्वीच्या परंपरेने "होळी" साजरी केली.. मलाही तो जाळ-धूर पाहून वाईट वाटले पण काय करणार?

मी आता वृत्तपत्र घेणे बम्द केले आहे. जेव्हा घेत असे तेव्हा रद्दी साचली की रद्दीवाल्याला फक्त रद्दी घेऊन जायला सांगत असे. पैसे घेत नसे.

चिंचवडला डॉ. वैद्य म्हणुन आहेत ते बरीच समाजसेवेची कामे करतात. ते घरी येऊन रद्दी घेऊन जातात. रद्दीच काय तर जुन्या कोणत्याही वस्तु नेतात. ते विकुन जो पैसा येतो तो त्यांच्या संस्थेच्या कामाला वापरला जातो. इतकी वर्ष डॉक्टरांचे काम बघितल्याने त्यांनाच रद्दी देतो. इतकंच काय तर जुना टेपरेकॉर्डर इ. सुद्धा देऊन टाकले. घरातली अडगळ अनायसे कमी होते आणि शिवाय त्याचे पैसे योग्या कामाला जातात. उगाच १००-२०० रुपयांचे कुपन वगैरे मिळण्यापेक्षा हा पर्याय मला जास्त आवडतो.

In reply to by पिलीयन रायडर

धन्यवाद पिराताई, सामाजिक जाणीव असलेल्या नागरिकांना तुमच्यासारखा पर्याय आवडतोच. पण काहींना इच्छा असून तसं आउटलेट मिळत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की अशी सामाजिक जाणीव वैगरे असणारे व त्यावर अंमलही करणारे आपण सगळे फार अल्पसंख्य आहोत. अशी जाणीव नसणार्‍यांची संख्याही मोठी आहे व त्यांच्याद्वारे होणारा कचराही. जनजागृती करुन पालथ्या घड्यावर पाणी होतंय. मी काहीतरी ब्रेकथ्रू शोधतोय जेणेकरुन ह्या ढिम्म लोकांनाही सामिल करुन घेता येईल.

In reply to by संदीप डांगे

>>>>>> जेणेकरुन ह्या ढिम्म लोकांनाही सामिल करुन घेता येईल ढिम्म लोक म्हणजे रेल्वेचे डबे. इंजिन जिकडे नेईल ते डबे तिकडे जातात. म्हणजे काही फायदा असला तरच ते जोडल्या जातात असे वाटते, नै तर वर्षांनुवर्ष गंज चढतो त्या डब्यांना पण ते हलत नाहीत. -दिलीप बिरुटे (ढिम्म डबा)

In reply to by पिलीयन रायडर

ह्या डॉ. वैद्य यांचा काही फोन नंबर, पत्ता मिळेल काय ? अथवा त्यांच्या सामाजिक संस्थेची साईट? नेऊन द्यायला देखिल तयार आहे. खूप खूप वस्तू केवळ एवढ्या कारणासाठी पडून राहिल्या आहेत की द्यायचे तर फुकटच आहे पण खरे गरजू असतील तर त्यांना मिळालेले जास्त आवडेल.

In reply to by आवडाबाई

ह्या डॉ. वैद्य यांचा काही संपर्क क्रमांक दिल्यास मी व्यक्तीशः भेट घेईन (बर्याच वस्तू देणे आहे) बदली करण्यास गेल्यास कवडीमोल किंमत देणार्या पण अता सद्य स्थितीत चालू असलेल्या वस्तू.. ता. क. त्यांचा आश्रम वगैरे आहे काय?

In reply to by नाखु

काका, डिटेल्स मला मिळाले की मी देतेच, साईट अजुन सुरु झालेली नाही. आजवर ते आपल्या परीने काम करत होते. आताच त्यांनी जरा मोठ्या प्रमाणात काम सुरु केले. त्यांना बहुदा वृद्धाश्रम सुरु करायचाय म्हणुन आता ते असे पैसे गोळा करत आहेत. हा उपक्रमही नुकताच सुरु झाला. पत्ता:- चापेकर चौकातुन पीएनजी कडे जाताना पीनजीच्या जस्ट आधी वैभव स्वीट्स आणि अंबिका नावाचे दुकान आहे. तिथुन एक रस्ता आत मंडईच्या मागल्या बाजुला जातो. त्याच रस्त्याला लगेच डाव्या हाताला "अमित अपार्टमेंट्स" आहेत. तिथे तळमजल्यावर वैद्य लॅब आहे.

पेपर मॅशेची खेळणी, शो पीस वगैरे करायची वर्कशॉप घ्यायला हवी शाळांनी. मी हे स्वतः केलेले आहे. पुट्ठा बनवायचा कारखान्यात पण रद्दीचा वापर होतो. अर्थात हे झाले नंतरचे उपयोग. सध्या तरी रद्दीच्या बदल्यात पैसेच मिळावे. (प्रिंटिंग च्या धंद्यात कत्रणांवर घरे बांधलेले लोक्स माहीती आहेत.)

त्या वैद्य डाक्टरांचा णंब्रर देशील बरं...

डॉ. वैद्य - ९४२०८६३९२० ह्यांनी एक शंकर महाराज सेवा मंडळ म्हणुन स्थापन केले आहे. एरवी मी कुणाही महाराजांच्या कामाला मदत केली नसती. पण हे काका काकु मी लहानपणापासुन पाहिले आहेत. कुणी गरजु असेल तर आधी त्यांचा बाबांना फोन येतोच की अमुक एका माणसाला गरज आहे, बघा किती जमवता येतात. बाबाही देतातच. त्यांच्या रक्तदान शिबिराला वगैरे हजेरी असतेच. थोड्याच वेळात काकु मला त्यांच्या कामांबद्दल एक मेसेज पाठवणार आहेत. मी तो मिळाला की इथे देते. हे लोक जुन्या कोणत्याही वस्तु घेतात. पुण्यातुनही कलेक्शन होते. त्यांच्याकडे टेंपो आहे. त्यांची चिंचवडला चापेकर चौकाजवळ वैद्य लॅब म्हणुन आहे.

आम्ही रद्दी थेट रद्दी डेपो वाल्यांकडेच विकतो, ओळखीचा फायदा दुसर काय. लहानपनी मी त्यांच्याकडुन रद्दी च्या मोबदल्या मधे रद्दी मधे आलेली वाचनिय / शालेय पुस्तके घेत असे. ते ही माझाकरता त्या ढिगार्यातुन शोधुन शोधुन पुस्तके काढुन ठेवत असत. कॉलेज च्या होस्टेल मधे प्रत्येक सत्राच्या शेवटी वह्या, पुस्तके, झेरॉक्स नोटस्ट, सबमिशन, कच्चे काम..... अक्षरशः ट्रक भर कचरा जमा व्हायचा जो विकला न जाता बॉयलर ला इंधन म्हणुन वापरला जायचा, आम्ही त्यातला जमेल तेवढा माल मित्रांच्या, आमच्या ब्यागा, टिफीन वाल्या काकांची रिक्षा यांमधे भरुन घेऊन जायचो, ४-५ वेळच्या ढाब्याची चांगली सोय होत असे.

संदीपभौ वेलकम बॅक! आमच्या इथे रोटरी क्लबमधील काही महिलांनी पेपरच्या पिशव्या दुकानदारांना देण्यासाठी काही स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.त्यांना रद्दी देते. त्यापूर्वी काही आॅप्शन नव्हते तेव्हा सात रूपयाला रद्दी विकत असे! रद्दीबदल्यात बचत गटाच्या वस्तू हा पर्याय आवडला.

महिन्यातून एकदा एक म्हातारी बाई येऊन आमच्या इथले पेपर घेऊन जाते आणि मोबदल्यात रुपये देऊन जाते. आजगायत मी कधी भाव विचारला नाही आणि किती किलो होते हे हि विचारले नाही. ती इमानदार आहे एवढे मला माहित आहे. तिच्या घरचे कागदाचे लिफाफे बनवितात. यावरच त्यांचा गुजारा चालतो.

मुंबईत असा उपक्रम कुणी चालवतं का? त्यांना रद्दी द्यायला नक्कीच आवडेल.

थोडासा वेळ मिळू शकला असता तर... असो!

रद्दीच्या बदल्यात भाजी द्यायला हवी.

माझा एक चुलतचुलत भाऊ शाळेत जाऊन रद्दीपासून पेपर बनवायचे प्रशिक्षण देतो. आपल्या आसपासच्या सोसायटीतिल निवृत्त झालेली तरुण माणसे निवडून आपण एक फावल्या वेळात पैसे कमवायचा उद्योग करु शकता ,ज्याना पैसे नको असतील असे लोक ते पैसे दान करु शकतात. हे काम तसे सोपे आहे व् आपण रिसाइकलिंगला हातभार लावत आहोत ही भावना समाजाचे ऋण उतरवनारि असते.

लहानपणी नेहमी घरी येऊन प्लास्टिक वर त्याच वजनाचा लसूण देणाऱ्या बायका पाहिल्या आहेत. अशीच एखादी वस्तू रददीवर कुणी घराच्या घरी देऊन गेले तर ग्रुहिणींना सोयीचे वाटू शकेल.

चांगले प्रतिसाद दिले सर्वांनी. खरंच धन्यवाद!! एका बाबतीत मात्र सुचवणी कमी आल्यात. 'मास' अपील होइल असं काय करावं? लोकसहभाग जास्तीत जास्त वाढवण्यासाठी.

मी वस्तू घेताना खूप विचार करते कारण घरातली जागा पुरेशी नाही आणि वस्तू नीट स्वच्छ ठेवायचा व्यवस्थितपणा (+ वेळ ) नाही. काही संस्थामध्ये "पैसे/देणगी देते पण वस्तू देऊ नका" असहि सांगते. मला असं वाटतं की प्रत्येकाची आवड / गरज वेगळी. त्यामुळे सगळ्यांना एकाच गोष्ट देण्यापेक्षा जर थोडे पर्याय दिलेत तर जास्त लोक प्रतिसाद देतील. जर रद्दी च्या बदल्यात जर माझ्या गरजेची / आवडीची गोष्ट नसेल तर मला स्वताला पैसेच आवडतील. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा !!!

रद्दी विकून येणारा पैसा आजू बाजूच्या परिसरांतील मांजरे, कुत्रे इत्यादी जनावरांच्या नसबंदी साठी वापरला जावू शकतो. अश्या प्रकारे काम करणाऱ्या काही संघटना मला ठावूक आहेत. सदर संघटनाचे स्वयंसेवक कोलोनीतील सर्वांच्या रद्दी घेवून त्यातून येणार्या पैश्याने आजूबाजूच्या सर्व जनावरांची नसबंदी करतात त्या शिवाय कुठल्याही जनावराला जर उपचाराची गरज आहे तर ते सुद्धा ते करतात.

धन्यवाद! संपर्कासाठी ठाण्यातील संघटनांचे पत्ते किंवा फोन नंबर आहेत का आपल्याकडे ? असल्यास इथे दिले तर बरे होइल.

आमची कंपनी हेच वर्तमानपत्रे आमच्याकडून गोळा करते आणि कोथरुड अंधशाळेत देते. ह्याच्या त्या कागदी पिशव्या बनवून परत विकत घेतल्या जातात. आणि त्या प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी वापरल्या जातात..