Skip to main content

सरकारी अडवणूकीला कायदेशीर उत्तर कसे द्यावे?

Published on शनीवार, 12/03/2016
सबसे पहले एक जोक. कधीतरी नावाला जागायचे का नाही. ;-) पोलिस मामाने बाइकरला अलगद बाजुला घेतला. पो.मा: ए चल, लायसन दाखीव. बाइकरः नै ये. पो.मा: का नै. बाइकरः गेलो होतो बनवायला. पण ते म्हणले वोटर कार्ड पाहिजे. माझ्याकडं न्हाय. पो.मा: मग बनवुन घे. बाइकरः गेलो होतो बनवायला. पण ते म्हणले राशन कार्ड पाहिजे. माझ्याकडं न्हाय. पो.मा: मायला, मग बनवुन घ्यायचे ना.. बाइकरः गेलो होतो बनवायला. पण ते म्हणले ब्यांकेचं पासबुक पाहिजे. माझ्याकडं न्हाय. पो.मा: अरे मग खातं का नाय खोललं.. बाइकरः गेलो होतो खोलायला. पण ते म्हणले ड्रायविंग लायसन पाहिजे. माझ्याकडं न्हाय. अगदी ह्या प्रसंगाची आठवण यावी असा अनुभव सरकारी कचेरीचे जाहीर आभार ह्या धाग्यावर 'नाव आडनाव' यांनी टाकला. याविषयी प्रश्न विचारावे वाटले म्हणून वेगळा धागा काढला. तिथे संयुक्तिक वाटत नव्हते.
पत्त्याचा पुरावा नाकारण्याची वेगवेगळी कारणं - १) बँक स्टेट्मेंट मागच्या महिन्यात अपडेट केलंय (७/८ दिवस आधी महिना बदलला होता.). बँकेला न कळवता अ‍ॅड्रेस बदलला असशील तर? दुसरं प्रूफ आण ... २) एलपीजी गॅसची रिसीट दाखवली. ती तीन दिवसा आधीची होती. गेल्या तीन दिवसात घर बदललं असेल तर? ... ३) माझ्या कंपनीच्या लेटर हेड वर पत्ता घेऊन गेलो. साहेब - "कंपन्यांना कोण विचारतो आज काल? कितीतरी आहेत चुटपुट कंपन्या." मी - "साहेब पब्लिक लिमिटेड कंपनी आहे." साहेब - "नाही चालत". ... ४) अ‍ॅफिडेव्हिट करून आण असं सांगितलं होतं साहेबांनी. दाखवल्यानंतर - "अरे, असं नाही चालणार." साहेबांनी परत वेगळा फॉरमॅट सांगितला. ... ...) मी - "इथेच ५-६ महिन्या आधी बायकोच्या पासपोर्टचं वेरिफिकेशन झालंय. तोच पत्ता आहे." साहेब - "५-६ महिन्यांत डिव्होर्स झाला असेल तर? कोणी सांगायचं?" दोनशे रुपये दिले आणि काम झालं एकदाचं.
असा काही अनुभव तुम्हालाही आला असेल. विशेषतः मला बायकोचे ड्रायविंग लायसन्स काढतांना आलाय. कोर्टाबाहेर बसणार्‍यांकडून नेहमीच्या फॉर्मॅट मधे लायसन्ससाठी लागणारे अफिडिवेट बनवून घेतले. दिडशे रुपये दिले. अधिकार्‍याने ते सरळ नाकारले. म्हणे हे चालत नाही. म्हणजे दिडशे रुपये वाया गेले, मनस्ताप झाला. मी आजपर्यंत कुणालाच पैसे न दिल्याने माझ्याकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड सोडून कुठलेही कार्ड नाही. १. रेशनकार्ड काढायला जुने रेशन कार्ड लागते. ते नाही असे सांगितल्यावर असे होऊच कसे शकते असा प्रश्न आला. वास्तविकतः जुन्या रेशनकार्डाशिवायही नवे रेशनकार्ड मिळू शकते. २. वाहनचालक परवान्यासाठी रेशनकार्ड पाहिजे, वीजबिल पाहिजे, भाड्याच्या घरात राहत असाल तर भाडेकरार चालेलच असे नाही. ३. मॅरेजसर्टिफिकेट नसेल तर नवरा-बायको आहेत असं डिक्लेअर करणारा दुसरा कुठलाच पुरावा चालत नाही. सरकारी अधिकार्‍यांचे निश्चित असे लिहलेले सेट ऑफ रुल्स नसतात काय? आपल्याला वेबसाईटवर किंवा कार्यालयात लावलेल्या नोटिसबोर्डावर खालील पैकी कुठलीही दोन कागदपत्रे आवश्यक असे लिहून १५-१६ कागदपत्रांची यादी दिलेली असते. अधिकारी ते सर्वचे सर्व मागतात. बरे दिले तरी त्यातले कुठलेही कागदपत्र कोणतेही कारण न देता नाकारण्याचा त्यांना अंतिम अधिकार असतो का? त्याविरुद्ध कायदेशीर जाब आपण मागू शकतो म्हणजे जे म्हणताय ते लिहून द्या असं? ह्या पद्धतीने अडवणूक करुन पैसा खाणार्‍यांची तक्रार कशी आणि कुठे करावी? असे काही अनुभव आहेत का जिथे सरकारी अधिकार्‍याने अडवणूक केली, पण तुम्ही ज्यापद्धतीने हाताळले त्याने काम विनासायास आणि लवकर झाले? मदत करा मंडळी.

वाचन संख्या 2363
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

तुमचे आयुश्य आणि वेळ फार महत्वाचा आहे, सरकारी कचेरीत जावून तो अमुल्य वेळ व्यर्थ घालवू नका. आधी आपले काम सम दम दंड मार्गाने करून घ्या आणि नंतर "all gloves off" नियमाने भेद नीती वापरा. आपले सगळे काम झाल्या नंतर एक पत्र लिहा, सदर माणसाच्या विरुद्ध त्याच्या साहेबा कडे तक्रार करा, साहेबाच्या साहेबाकडे अश्या प्रकारे मुख्यमंत्री पर्यंत सगळ्या कडे निनावी तक्रार करा त्यांत इतर कुणाला CC मध्ये ठेवले आहे हे स्पष्ट लिहा. दक्षता खाते वगैरे च्या नादाला लागू नका. बहुतेक वेळा मी मारल्या सारखे करतो आणि तू रडल्या सारखे कर अशी सर्व तक्रारीची दाखल घेतली जाते. पण १० वरीष्ठां पैकी सर्वाना पत्रे गेल्याने कोणी तरी आपण काम करत अहो दाखवण्यासाठी एक तरी कागदी घोडे नाचवतो. विशेष फरक पडला नाही तरी खात्यांत अमुक माणसाविरुद्ध फार तक्रारी येत आहेत अशी कुजबुज सुरु झाली कि सदर माणसावर कमी जबाबदारी टाकली जाती. त्या शिवाय भविष्यात ह्या माणसाने आपल्या वरीष्ठां च्या मनाविरुद्ध काही केले कि वरिष्ठ लोक जुन्या तक्रारी वर काढून ह्याला त्रास करतात. तक्रार करताना हात आखडता घेवू नका. माणूस कामावर दारू पिवून येतो पासून ह्याने मला जाती वरून शिवी दिली अश्या प्रकारच्या तक्रारी करायला मागे पुढे पाहू नका. बहुतेक वेळा ह्या लोकांचे कचेरीत अनेक शत्रू असतात कुणी तर मग ह्या तक्रारीचा फायदा घेवून धडा शिकवतो.

प्राइमरी डॅाक्युमेंट कोणते ते सरकारने निश्चित करायला हवे. विजेचे मीटर माझ्या नावे करताना मला या सर्व गोष्टीचा उलगडा करून दिला एमएसइबीच्या अधिकाय्राने. भाडेकरार ( तातपुरता -लीव लाइसन ) वेगळा आणि चाळीत/इमारतीत मालकाकडे भाडेकरू म्हणून राहिलेली पावती वेगळी. ही पावती,टेलिफोन बिल,विज बिल तीन महिन्यांपर्यतचे ग्राह्य आहे.

In reply to by कंजूस

डॉक्युमेंट्स निश्चित केलेली असतात, पण ते साईटवर / त्या ऑफिसातल्या एखाद्या बोर्ड्वर. तपासणारा मात्र हे चालत नाही, ते चालत नाही अशी मोठी लिस्ट देतो. एका मेडिकल क्लेम साठी पण असाच प्रॉब्लेम आला होता. कॅशलेस असेल तर ठीक पण तो ऑप्शन नसेल तर क्लेम साठी लागणारी कागदपत्र दिल्यानंतर क्लेम परत आला नाही असं कमी वेळा होत असेल. कधी फॉरमॅट चा प्रॉब्लेम, कधी डेटा ज्या पद्धतीने आहे त्यात प्रॉब्लेम, कधी अजून काही. जर राहतो त्या ठिकाणापासून दवाखाना जवळ असेल तर जाता येतं पण तसं नसेल तर डॉक्युमेंट्स परत - परत आणनं अवघड होउन बसतं. हापिसात असं एकदा झालं तेंव्हा पाठपुरावा केला होता एजेंसी बरोबर पण दीड-दोन महिन्यांत एजेंसीच बदलली. क्लेम पण झाला नाही. मला वाटतं एजेंसी पेक्षा सरकारने सगळ्या हॉस्पिटलना एका फॉरमॅट मधे बिल देणं बंधनकारक केलं पाहिजे ज्यामुळे ह्या कारणांसाठी क्लेम अडकणार नाहीत.

In reply to by नाव आडनाव

मला वाटतं एजेंसी पेक्षा सरकारने सगळ्या हॉस्पिटलना एका फॉरमॅट मधे बिल देणं बंधनकारक केलं पाहिजे ज्यामुळे ह्या कारणांसाठी क्लेम अडकणार नाहीत.
सहमत.

तितकं तुमचं काम सहज होतं. वरिष्ठांना किरकोळ गोष्टीत लोकांना अडवण्यापेक्षा स्वतःची इमेज महत्त्वाची असते. शिवाय तिथे कागदाला फार महत्त्व आहे. लेखी तक्रार केली की बाबू सरळ येतात. कुठेही गेलात तरी संबधित व्यक्तीचं नांव, फोन नंबर, तारीख आणि वेळ या गोष्टी फॉलो-अपसाठी आवश्यक असतात. योग्य फॉलो-अपनी कुठलं ही काम व्हायलाच पाहिजे.

In reply to by विवेक ठाकूर

वरचा अधिकारी गाठून खालच्याला कशी जिरवली तुझी हे दाखविण्याची मला दुरदैवाने हौस आहे. विशेषता: सरकारी बॅकेतले कारकून हे माझे लक्श्य असते. कारण ते बर्‍याच वेळा उद्धट व बिन्डोक असतात. काही वेळेस ओफिसरचे प्रमोशन मिळालेलेही या क्याट्यागरीत येतात. जास्त वाद न घालता डायरेक्ट शाखा व्यवस्थापकाच्या समोरच्या सीटवर जाउन बसले की फायदा होतो. म्यानेजरला रस्त्यावरील कुत्र्यानच्या पातळीला ( मनात असूनही) येणे कठीण असते.

मी महाराष्ट्राबाहेर राहतो. नुकतेच पारपत्रासाठी आवेदन दिले. जालावरील सुस्पष्ट यादीनुसार कागदपत्रांच्या प्रती जोडल्या. उपलब्ध पर्यायांमधून मुलाखतीची वेळ निवडली. नियोजित समयी कार्यालयात पोचलो. एका खिडकीवर कागदपत्रांची मूळप्रत जुजबी तपासली गेली व टोकन मिळाले. टोकन घेऊन शांतपणे खुर्चीत बसून वाट पाहिली. रांगेत धक्के खावे लागले नाहीत. प्रतीक्षेसाठी वातानुकूल प्रशस्त खोली व उत्तम व्यवस्था होती. मोठ्या पडद्यांवर टोकन क्रमांक दिसत होते, त्याप्रमाणे खिडकीवर गेलो. कागद जमा होताच एका प्रपत्राबाबत काही शंका असल्यामुळे विचारणा करण्यासाठी वरच्या अधिकारी महिलेने आत बोलावून घेतले. माझ्या स्पष्टीकरणाने समाधान होऊन लगेच सही केली. आवेदन जमा होताच पावती मिळाली. पुन्हा त्या कार्यालयात जावे लागले नाही. माझ्याकडे वेळ कमी होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात आधी जाऊन माझे आवेदन पडताळणीसाठी येईल असे सांगून ठेवले होते. आवेदन येताच तिथून मला फोन आला. लगेच जाऊन पडताळणी करून घेतली. आता पारपत्राची वाट पहात आहे. मला नियमितपणे 'तुमची पोलीस पडताळणी मिळाली', 'पारपत्र छापायला गेले', 'छापून झाले', 'टपालाने पाठवले' असे निरोप ईमेलने येत असतात. 'चहापाण्या'ची मागणी कुठेही झाली नाही आणि मी दिलेही नाही. ता.क. १ - मी रहातो ते राज्य सध्या भाजपशासित आहे. ता.क. २ - संपूर्ण आवेदन प्रक्रिया माझ्या पत्नीने पूर्ण केली. मी फक्त सह्या केल्या, आणि प्रत्येकी एकदा पारपत्र कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात गेलो.

माझा डॉक्युमेंटचा असाच घोळ होता. सारखे सारखे प्रॉब्लेम येऊ लागले. व्होटर्स कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसनवर पत्ता वेगवेगळा. राशन कार्डवर वेगळा. लायसन जुने कागदी. त्यावर जुजबी एका ओळीत पत्ता. बँक अकाउंट होइना की आधार. त्याच लायसनवर पॅन काढले. गावातले आधारकार्ड सेंटर बंद पडलेले. शिबिरात दुनिया गर्दी. मग गावाबाहेरच्या विडी घरकुल भागामधील एका कम्प्युटर इन्स्ट. मध्ये आधार कार्ड एजन्सी होती. त्याकडून एका दिवसात फोटो अन ठसे देऊन पावती मिळाली. आठ दिवसात कार्ड ऑनलाइन मिळाले. त्यावर बँक अकाउंट झाले, पोस्टपेड कनेक्षन, नवीन गॅस कनेक्षन, शॉप अ‍ॅक्ट, पार्टनरशिप डीड, फर्मचे अकाउंट, त्याचे पॅन, रेशन कार्ड, क्रेडीट कार्ड अशा सगळ्याच गोश्टी एकेक मार्गी लागल्या. पासपोर्टची सध्या तरी गरज नाही. कुणी घरी येऊन काढून देणारे असेल तरच करीन. ;)