Skip to main content

मराठी बोलींचे काही नमुने

लेखक मारवा
Published on सोमवार, 28/12/2015
मागे एकदा मराठी भाषा शिकण्यासाठी डॉ. दत्तात्रय पुंडे, जोशी , कालेलकर इ.ची पुस्तके घेतली होती. ती वाचत असतांना त्यात दिलेले बोली भाषेचे काही मजेदार नमुने आढळले. ते वाचुन बोली भाषांचे महत्व नव्याने लक्षात आले. या व इतर भाषातज्ञांच्या मते साधारण असे मानण्यात येते की. एकभाषक समाजाच्या एका गटाकडुन किंवा एकभाषक समाजाच्या एखाद्या विशीष्ट प्रदेशातील लोकांकडुन देवाणघेवाणीसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट भाषिक रुपास बोली असे म्हणतात. संपुर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर मराठी समाजाकडुन बोलल्या जातात त्या मराठीच्या विवीध बोली. त्यातील एक बोली प्रमाण बोली आहे इतर बोली या प्रमाण बोलींपासुन स्वनिमप्रक्रिया, व्याकरणप्रक्रिया, आणि शब्दसंग्रह यांच्या बाबतीत कमीअधिक दुर आहेत. तथापि प्रमाण बोली इतकेच या प्रत्येक बोलीला महत्व आहे. कारण बोली ह्या त्या त्या भाषकांचा सामाजिक-सांस्कृतिक वारसाच असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, त्याच्या संस्कृतीचा परिचय करुन घेण्याचे एक साधन म्हणुन मराठीच्या बोलींकडे पाहिले पाहीजे. बोली संदर्भात डॉं. ना.गो. कालेलकर म्हणतात " बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे. परीस्थीतीला अनुरुप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते. मुखपरंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो. ती साधी पण परीणामकारक असते. तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट्य असते." मराठी बोलींचा पद्धतशीर अभ्यास जॉर्ज ग्रिअर्सन या इंग्रज आय.सी.एस. अधिकार्‍याने सर्वात अगोदर केला. त्याच्याकडे संपुर्ण हिन्दुस्थानच्या भाषिक पाहणीचे काम इंग्रज सरकारने सोपवले होते. ते त्याने अनेक वर्षे चालवुन लिंग्वीस्टीक सर्व्हे ऑफ़ इंडीया या ग्रंथात एकुण १२ खंडात प्रकाशित केले. त्यात एकुण १७९ भाषा व ५४४ पोटभाषांचा तपशीलवार अभ्यास सादर केलेला आहे. या महाग्रंथाच्या ७ व्या खंडात मराठी व तिच्या बोलीं संदर्भातील अभ्यास समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत असा एकत्रित मराठी बोलींचा अभ्यास झालेला नाही. तुरळक व तुटक तुटक असा एकेका बोलीचा अभ्यास मात्र वेगवेगळ्या भाषाशास्त्रज्ञांनी केलेला आहे. उदा.खानदेशी चा विजया चीटणीस यांनी अरे-मराठी चा (कर्नाटकात व आंध्रप्रदेशात अरे-मराठी ही बोली बोलणारा काही शतकांपुर्वी तिथे स्थलांतरीत झालेला मराठी समाज आहे. ) डॉ. श्री.र. कुलकर्णी यांनी केलेला आहे. तर ग्रिअर्सनच्या या अभ्यासातील बोलींचे नमुने खाली दिलेले आहेत. हा अभ्यास आता अर्थातच फ़ार जुना झालेला आहे आज या बोलीभाषा देखील मोठ्या प्रमाणावर बदललेल्याच असतील मात्र तरी हे बोलींचे वैविध्य बघणे मला तरी रोचक वाटले म्हणुन इथे शेअर करत आहे एवढेच. या विवीधतेतुन भाषेची श्रीमंती संपन्नता तर जाणवतेच व कुठेतरी भाषेकडे बघण्याचा संकुचित दृष्टीकोण दुर होतो कदाचित. बाकी फ़ार रोचक माहीती पुंडे जोशी इ. च्या पुस्तकांतुन मिळते ती मुळातुनच वाचण्यासारखी आहे तुर्तास एक नजर या विवीधतेवर व गमतीजमतीवर टाकु. खालील दोन मुलांची गोष्ट वाले नमुने जॉर्ज ग्रिअर्सन चे आहेत. व त्यानंतर इतरांचे काही दिलेले आहेत. बुलढाणा जिल्हा कोणा एका माणसास दोन मुलगे होते । त्या-पैकी धाकटा बापास म्हणाला, बाबा माझ्या हिशाची जिनगी मला द्या। म्हणून बापाने आपली जिनगी दोघां-मध्ये वाटून दिली । थोड्याच दिवसांनी धाकटा मुलगा आपली सर्व जिनगी घेऊन देशांतरास गेला, व तेथे त्याने चैनबाजी-मध्ये आपली सर्व जिनगी उडविलीं। त्याचा सर्व पैसा ह्या रीतीने खर्च झाल्यावर त्या देशात एक मोठा दुष्काळ पडला। व त्यामुळे त्यास फ़ार ददात पडू लागली । नंतर तो एका गृहस्थाकडे जाऊन राहिला । त्या गृहस्थाने ह्याला आपले शेतात डुकरे राखण्यास ठेविले । कोळी बोली मुंबई प्रांत एका मानसाला दोन सोकरे होते । त्यामनचा धाकला सोकरा बापासला आपला । बापुस माजा धनाचा वाटा माना देस । तदं बापास जून धन वाटिलं । तदं थोड्या दिसांशी धाकल्या सोकर्‍यान त्याच्या वाट्याला जवरं आलतं तवरं जकलं कवलिलं आन दूर बिजा गांवा जेला आन तटे रेला न त्याचे मेरे जवरं होत नोतं तवरं जकलं उदलिलं । याचे मेरे अर्दी पुन नोती नी त्या गांवांत मोठा दुष्काळ आयला नी तदं त्यातो खावाचे हाल होवं लागले । मगशीं तो तनचेच एका सावकाराचे घरा जेला न त्याचे जवळ ह्‍राला । तदं त्या सावकारान त्याला धारलन शेतावर डुकरं चारायला । कुणबी बोली पुणे जिल्हा ग्रामीण कोणा एका मनुक्शाला दोन मुलग व्हत । त्यातला धाकला बापासनी म्हंगाला, बाबा, जिनगानीचा वाटा माला यायचा त्यो दे । मंग त्यांनी त्याला जिनगानी वाटुन-शानी दिली। मंग थोड्या दिसानी धाकला मुलगा सर्वे जमा करुन-शानी दुर देशामंदी गेला, आणि तिथं उधळपणानी राहून आपली जिनगानी उडवली। मंग त्यानी समद खरचल्यावर त्या देशामंदी मोठा काळ पडला । त्यामुळं त्याला आडचन पडू लागली । तव्हा तो त्या देशामंदील एक गिरस्ताप जाऊनशानी राह्यला । त्यानी तर त्याला डुकर चाराया आपल्या शेतामंदी पाठवलं। कोंकणी -कुडाळी बोली सावंतवाडी ‍अ‍ॅका माणसाक दोन झील होते । ते तुरलो न्हानगो बापाशीक म्हणूक लागलो बाबा, माका येतलो तो जिंदगेचो वांटो माका दी । मगे तेणी तॅका आपली जिंदगी वाटून दिली । मगे पुस्कळ दीस जांवचे आदीच न्हानग्या झिलान सगळा एकठंय कॅलां, आणि दुर दॅशाक जांवक गेलो आणि थैंसर मौज मारुन हॉतां सगळा घालयलां । तेचे कडला सगळा सरल्यार थैंसर एक थोर दुकळ पडलो; आणि तॅका कठीण दीस आयले । मगे तो थैंसरल्या अ‍ॅका गिरेस्ता थैं जावन रवलो । तेणी तॅका आपली डुकरा चरवक आपल्या शॅतांत धाडलो । कोंकणी मुसलमान बोली ठाणे जिल्हा कनच्या एका मानसाला दोन सोकरे होते । त्यांशी धाकला बापासला बोलला, बाबा, जो मिलकतीचा वांटा मा-ना येवाचा तो दे। मंग त्यानि त्याला मिलकत वाटुन दिल्ली । मंग थोर्‍या दिसाशी धाकला सोकरा सगला जमा करुन लांबच्या मुलखाला गेला, आणी तवार उधळेपणाशी चालुन आपली मिलकत उरवली । मंग त्यानीन सगळा करचले-वर त्या मुलखात मोठा दुकाल पडला। त्या सबब त्याला अरचन पराली लागली । तवान तो त्या मुलखान येका मानसाच्या नजीक जाऊन ह्रेला । त्या-नी- तवा त्याला डुकरान चाराला आपल्या मुलखाला धारला । नागपुरी बोली कोन्या एका मानसास दोन पोर होते । त्यापैकी लहान बापास म्हनाला कि , बाबा जमेत माहा जो हिस्सा असेल तो मज दे। त्याने धन वाटुन देल्ल। थोड्या दिवसान लहान पो‍र्‍या सर्व घेऊन दूर देशी गेला । आनि तेथ उधळपट्टी करुन आपलं धन उडवलं। त्याने सर्व खर्चल्यावर त्या देशात मोठा दुकाळ पडला त्यामुळे त्यास अडचन पडली । तेव्हा तो तेथल्या एका गृहस्थाजवळ जाऊन राहिला । त्यान त्यास डुकर चारायास आपल्या वावरात पाठवलं। डांगी बोली ( गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवर पश्चिमेस असलेल्या डांग भागातील ) कोणता येक गोहाला दोन पोंसा व्हतात । त्याहुन लाहाना पोंसा बांसला म्हणु लागना, बा, जी आपली आमदानीना वाटा देणा व्हवा तो माला दे । मंग बांसने त्यासला आपली आमदनी वाटी दीधी । मंग थोडाच दिवसमा लाहाना पोंसा आपली वाटानी आमदानी सगळी गोळा करीसनी । येखांदी मुलुख वर निंधी गया । तठे उधाळपणा- खाल वागना, व आपली आमदानी सगळी पण सगळी कुल उडवी टाकी । त्यापासन सगळ खर्ची गया । मंग त्या मुलुख वर मोठा काळ पडा त्या पासीन त्याला मोठी येळा पडी । मंग तो त्या मुलुख-मा येक गोहो पान जाई रहिना। त्या गोहोनी त्याले आपला डुकरा चारुला खेतमा लावा । बालाघाट म‍र्‍हेटी बोली कोन्ही माणसाचे दोनं लेकरा होते । त्याच मधुन नाहन्याने बापास मनला, हे बाप, धना-मधुन जो माझा हिस्सा आहे तो माले दे । तव्हा त्यानी त्याले आपला धन वाटुन दिले । बहुत दिवस नाही झाले कि नाहन लेकरु समदा काही जमा करुन परदेशात निघुन गेला आनी तेथी छिचोरी-बाजी मधी दीवस गुमाऊन-सन्या आपला पैसा खोऊन देल्ला। जव्हा त्याने सर्व काही खोऊन बसला तव्हा त्या देशामधी मोठा कंताळ पडला। अनीख तो कंगाल झाला। अनीख तो जाऊन-सनि त्या मुलकाचे येकाचे घरी राहु लागला । त्याने त्यास आपले वावरात डुकर चारावास पाठवला । खानदेशी बोली ( अहिराणी ) " तुम्हीनं ज्ये पत्र धाडलत त्ये मल्ये कालदी मंगळवारी भेटलं, मांगो दुला आठी कालदी उतवा. त्याले मीनं सांगलं की वावरात पळह्यामधून सन तूरनी शेंग प्येरी दे. औंदां कपाशील्ये भाव नाही आन गेल्या वरसी मेघराजाकन कपाशीच येक बोंडबी भेटलं नाही. माझी अवस्था मले मालुम की देवाल्ये मालुम. कसा तरी दिवस काढी राहिनो आहे बरे. रववाराच्या बाजाराल्ये दोन गोर्‍हे घेइसन टाकतो. नवरीच्या चितांग आन वाकरवाळ्या गहान टाकीसन रुपये कहाडीन". चित्पावनी बोली कोणतीच बोली हेंगाडी नाही नी आमची हेंगाडी कशी सेल. ऊलटी आमचीच बोली संस्कृताजवळ से असां शास्त्रीबावाच म्हणचत. एतां इतलां खरां की, ह्या बोल्यांत ल्येहंलेले ग्रंथ नी पुस्तकां आमला के आढळत नाहीं, असां पुष्कळ म्हणचत. पण हेवर ठी फ़ारत चांगले शिकले सवरलेले विद्वानांची ही व्यवहारभाषा नसेवी. एतां ही बोली कें नि केंवेरीं बोलचत तां सांगचा. रत्नांगिरीचेउत्तरा जयगड उत्तराहार ही नाही. पण जयगड पाष्टीं दक्षिंणाहार, रत्नंगिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, गोवा, एठांपावत सेच. पण तेचेय दक्षिणाहारी कदाचित चालत सेल. वर्‍हाडी बोली चा एक नमुना "कोन ? मोठी माय ? " ’व कोठी जाते माय ? " दंडाक जातो बये सदबाले भाकर घेऊन श्यानी ." "काऊन ? सदबादादा घरी नाई आला कावो ?" " कसा येईल ब्ये ? वावरात जोह्यडाचा चुरना चालला हाये. पाखराच्या मारे उसंत नाई, नईच्यान ढोरावासराचा आदरा, कोनाच्या भरोश्यान कोठ चुरना होते ? दादल्यावानी माणसाच्या उरावर राहाव लागत तेवा कोठ दाणा दिसते डोर्‍याल." "खरा आहे माय तुझा म्हणन. आजकाल पोटच्या पोरावर इश्वास राह्यला नाई, तुले त माहीत आहे." एक आदिवासी बोली्तील गीत दरियांत मचवा झुलताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो पायांत सांकल्या आनताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो नाकांत मोती आनताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो दंडात येला आनताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो कागदी पलंग मांगल्या दारा । काढ गो चोली घाल गो वारा काढतांय चोली घालतांय वारा । हात नको लावूं मेल्या फ़जित खोरा दरियांत मचवा झुलताय लाडके । सांवला दीर तुझा येताय गो अजुन एक नमुद करण्यासारखी बाब म्हणजे थोर भाषा अभ्यासक डॉ.ना.गो.कालेलकर म्हणतात " जेव्हा आपण प्रमाणभाषा हा प्रयोग करतो, तेव्हा प्रत्यक्ष जीवनात, व्यापक सामाजिक व्यवहारात अनेक परस्परसदृश्य भाषिक परंपरा रुढ आहेत हेच आपण मान्य करतो. प्रमाणभाषा हे सोयीसाठी मानलेले, लेखनाशी आणि त्यामार्फ़त शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्रे, ह्यांसारख्या माध्यमांशी संबंधित असलेले एक भाषिक रुप आहे. सर्व प्रचलित भाषिक रुपांशी संबंधित असलेले, पण ह्यांतल्या कोणाशीही पुर्णपणे एकरुप नसलेले, व्यक्तीने केलेल्या प्रयोगापेक्षा व्याकरणात्मक संहितेतल्या नियमांनी ज्यातल्या प्रयोगांची शुद्धाशुद्धता ठरवता येते, असे ते एक आदेशात्मक भाषिक रुप आहे. ती एक सोय आहे. तिची एक वेगळीच सवय करुन घ्यावी लागते." अजुन बरेच नमुने विवीध बोलींचे आहेत असंख्य बोलींचे प्रकार आहेत एकट्या कोंकणी त अनेक प्रकार आहेत.विवीध बोलींचे शब्दसंग्रह , शैली वेगळेपण फ़ार सुंदर रीतीने उलगडुन दाखवलेले आहे मात्र आता टंकाळा आला म्हणुन थांबतो. जिज्ञासुंनी मुळ पुस्तके वाचावीत व आनंद घ्यावा अशी अपेक्षा.

वाचन संख्या 9859
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

मला गणेश देवीं विषयी त्रोटक माहीती आहे. ते एका मोठ्या भाषाविषयक सर्व्हे च काम करताय इतकच माहीत आहे. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे त्यांचे सहकारी आहेत व पद्मगंधा ने एक पुस्तक प्रकाशित केलय त्या संदर्भात अस तुटक तुटक माहीती आहे. पण फार डिटेल नाही. कृपया आपण विस्तारपुर्वक त्यांचे कार्य सांगितल्यास आनंद होईल. धन्यवाद

इथे नमूद केलेल्या काही बोलीभाषा 'शुद्ध' दिसत नाहीत. प्रमाण भाषेचा प्रभाव जाणवतोय. माझं काही चुकत असेल तर मार्गदर्शन करावे.

अजून प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.

लेख आवडला.आवडता विषय.कालेलकरांची पुस्तकं वाचलेली नाहीत पण ऐकून आहे.या धाग्यावर कोणी सुचवेल का.

In reply to by अजया

ध्वनिविचार, भाषा: इतिहास आणि भूगोल, भाषा आणि संस्कृती. बहुतेक ही महाराष्ट्र सांस्कृतिक खात्याच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. खूप सुंदर आहेत. या तिघांपैकी कशाचीतरी(बहुतेक ध्वनिविचार) प्रस्तावना अगदी वाचनीय आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सॉरी..कालेलकरांची पुस्तकं नाही सापडली. बाकीच्या लिंक्स खाली देतेय. ग्रियर्सन: मराठीची ऑडियो रेकॉर्डिंग्स http://dsal.uchicago.edu/lsi/Language/Indo-Aryan-southern-group घाटगे सर्व्हे https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Kunabi%20Of%20Mahad%20(III).pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Kudali%20(II).pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Warli%20Of%20Thana.pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Marathi%20of%20Kasargod.pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/cochin%20pdf.pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Konkani%20of%20konkan.pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Konkani%20of%20South%20Kanara.pdf https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Gawadi%20Of%20Goa.pdf

यात वापरलेली भाषा काही प्रमाणात आमच्या बोली भाषेत आजही समाविष्ट आहे.पण कालौघात बोलीच्या लहेजात बदल झाला असल्याचे दिसते. कुणबी बोली पुणे ग्रामीण ही आमची भाषा.पण त्यातही उत्तर पुणे जिल्हा अर्थात खेड,आंबेगाव, जुन्नर या भागात बोलली जाणारी भाषा ही जिल्ह्यातल्या इतर ग्रामीण भागात बोलल्या जाणार्‍या भाषेपेक्षा वेगळीच आहे. पुन्हा व्यक्तीचा जातीय, सामजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर हेही बोलीवर परिणाम करीत असतात.

जिंदगी हा शब्द मालवणी बोलीत नाही माझ्या माहितीप्रमाणे. त्या भाषेत पण मालवणी आणि कोकणीची सरमिसळ वाटतेय. बाकी इतर भाषा वाचतेय.

In reply to by यशोधरा

साधारण शे-सव्वाशे वर्षांपूर्वी इस्टेटीसाठी जिंदगी हा शब्द मराठी भाषेत अगदी रूढ होता. त्यामुळे मालवणीतही तो वापरला जात असल्याची शक्यता आहेच.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जिंदगी चा अर्थ इस्टेट मालमत्ता अशा अर्थाने होतो. माझ्या माहीतीप्रमाणे खरेदी खता मध्ये वा मृत्युपत्रा त देखील हा शब्द वापरण्यात येतो. गंमत म्हणजे याची व्युत्पत्ती शोधत होतो मला वाटल मुळ उर्दु जिंदगी मध्ये मालमत्ता असा अर्थ सहज असेलच व तिथुनच हा शब्द मराठीत आला असावा. पण माझ्याकडच्या श्रीपाद जोशी यांच्या उर्दु मराठी शब्दकोशात बघितल तर जिंदगी चा तसा काही अर्थ आढळला नाही. दुसर एक बघा वर कोकणी मुसलमान बोली चा नमुना आहे त्यात तो मिल्कियत ज्यावरुन मिळकत हा मराठी शब्द येतो तो वापरतो तो विशेष म्हणजे जिंदगी वापरत नाही. तर मग हा बहुधा जिन्नस या शब्दावरुन आला असावा का ? माहीत नाही माझ्याकडे मराठी शब्दकोश नाही. पण प्रथमदर्शनी तरी हा सरळसोट उर्दु जिन्दगी वरुन आलेला शब्द वाटत नाही. या शब्दाला एटीमॉलॉजिकली एक्सप्लोअर करणे रोचक वाटते.

In reply to by मारवा

जिन्दगी म्हणजे आपण जिन्दगी जे काही कमावलं ते, अशा अर्थाने तो शब्द रूढ झाला असावा असा मी आत्तापर्यंत माझा समज करून घेतला आहे.

In reply to by मारवा

मला वाटते हा शब्द जिनगी असा (उच्चारी जिन्गी) वापरीत असत. आपल्याला 'जिंदगी' शब्द अधिक परिचित असल्याकारणाने आपण तो जिंदगीच आहे असे धरून चालत आहोत. मी ऐकलेला 'जिन्गी' शब्द हा एकंदर चीजवस्तू, जिन्नस, या अर्थाने वापरलेला होता. पण आपट्यांच्या 'शब्दरत्नाकर'मध्ये' 'जिंदगा' ह्या शब्दाचे मूळ फार्सी असून अर्थ 'माल', मिळकत', 'इस्टेट' असा दिलेला आहे. शिवाय 'जिनगाणी', 'जिनगानी', 'जिनगी' हे शब्द फारसीवरून आलेले आणि जिणे' जीवन', निर्वाहाचे साधन, या अर्थी दिले आहेत.

आजच घरातल्या पुस्तकांच्या ढिगातले ना गो कालेलकरांचे भाषा इतिहास आणि भूगोल पुस्तक हातात आले आहे. काय योगायोग! सगळ्या बोलीचे नमुने सावकाश वाचते आता!

आवडला लेख. ही 'प्रॉडिगल सन' ची एक कहाणी सर्व भाषांमधे घेतल्याने त्यांचा तुलनात्मक अभ्यास करायला खूप मदत होते. ग्रियर्सनचं कार्य आणि चिकाटी अचंबित करणारी आहे. अजूनही हा सर्व्हे आणि त्याचे निष्कर्ष अभ्यासात वापरले जातात इतकं ते व्यवस्थित काम आहे. ब्रिटिश लोकांकडून ही चिकाटी खूप घ्यावीशी वाटते.(नुसती वाटतेच, घेतलेली नाही;)) यातील काही बोलींचं त्या काळचं रेकॉर्डिंग सुद्धा जालावर उपलब्ध आहे. मारवाजी, मराठी बोलींचा त्यानंतरचा एक चांगला अभ्यास म्हणजे घाटगे सर्व्हे. यात अनेक बोलींवरच्या पुस्तिका उपलब्ध आहेत. यांच्या पीडीएफपण आहेत. वर डॉ. गणेश देवींचा उल्लेख आहे. त्यांनी हे काम हाती घेतलं हे स्तुत्य आहे. पण त्याची जाहिरात आणि उदो-उदो जेवढा होतो, तितकं ते काम रिगरस नाही. त्याला ग्रियर्सनची सर तर चुकूनही नाही.

In reply to by पिशी अबोली

आपण स्वतः हे किचकट कठीण काम करता त्यामुळे त्यातील अडचणींची व्यावहारीक अडचणींची आपल्याला चांगलीच जाणीव आहे. त्यामूळे एखाद्याने केलेल्या कार्याचे महत्व साहजिकच लवकर पटते. कृपया जालावरील रेकॉर्डींग चे दुवे दिलेत तर आनंद होइल. घाटगे सर्व्हे संबंधी नव्याने माहीती कळली. डॉ. गणेश देवी च्या कार्याविषयी मला फारशी माहीती नाही त्यावर काय बोलणार ? घाटगेंचा सर्व्हे स्पेसीफीक मराठी बोलीं विषयीचा आहे का ? व आपल्याकडे काही बोलींचे नमुने असल्यास शेअर करावे ही विनंती. धन्यवाद.

In reply to by पिशी अबोली

घाटगे सर्व्हेच्या पिडीएफ कुठे मिळतील? ***
त्याला ग्रियर्सनची सर तर चुकूनही नाही.
माझ्या माहितीप्रमाणे डॉ. देवींच्या कामाची समूळ मांडणीच बरीच वेगळी आहे. मला तपशीलात सांगता नाही येणार फारसे, पण त्यांचा मूळ उद्देश फक्त भाषांची माहिती गोळा करणे एवढाच मर्यादित नसावा. शिवाय, ग्रियर्सनच्या पाठीशी सरकारी यंत्रणा होती. पाठबळ होते. अनेक वर्षे ते काम नेटाने चालविण्यासाठी लागणारे बरेच काही त्याला उपलब्ध असावे. भाषा रिसर्चचे काम अत्यंत मर्यादित पाठबळावर चालते. त्यात, केवळ भाषाच नव्हे तर एकंदर संस्कृतीचाच चहू अंगाने आढावा घ्यायचा प्रयत्न असतो असे वाटते. या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांशी या विषयावर बोलायचा योग आला आहे. त्यामुळे, 'ग्रियर्सन व भाषा अ‍ॅकॅडमी यांच्या कामाची तुलना (अ‍ॅपल टू अ‍ॅपल) होऊ शकेल का? करावी का?' याबद्दल मी जरा साशंक आहे. अर्थात, तू या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत असल्यामुळे तुझे मत मोलाचे आहेच. विस्ताराने मांडलेस तर माझ्याही संकल्पना स्पष्ट होऊ शकतील.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

डॉ. देवींच्या कामाची समूळ मांडणीच बरीच वेगळी आहे
हो. माझा विरोध त्या कामाला नाही. पण 'ग्रियर्सननंतरचा असा पहिला सर्व्हे' अशीच त्याची जाहिरात चालू असते. आणि प्रत्यक्ष डॉ. देवींची स्टेट्मेंट्स कधीकधी काहीच्याकाही वाटतात(भारतात या एवढ्या भाषा, एवढ्या बोली वगैरेसुद्धा). त्यात खरोखर अभ्यास करून लिहिलेल्या गोष्टी फारशा नाही आहेत, हा विषय जाणीवपूर्वक टाळला जातो. जास्त खोलात मी कधी त्याचा विचार केला नाही, पण त्यांच्या एकूण प्रभावी मांडणी आणि जाहिरातीमधे प्रत्यक्ष सर्व्हेमधे काय आहे हा विषय कधी जास्त उजेडात येतच नाही. त्यांच्या एका खंडासाठी मी लिहिलेलं आहे. पण त्याचं एडिटिंग, त्यात काय यावं, कसं यावं याबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा, हे व्यक्तिशः मला फारसं पटलं नाही. वैयक्तिक असा हा माझा त्यांच्याबाबतीतला एकच अनुभव. तो खंड आणि त्यातला लेख पब्लिश तरी झाला का देव जाणे. ग्रियर्सनचं काम हे प्रशासन चालवण्यासाठी केलं गेलं, ही गोष्ट तर खरीच. ब्रिटिश राज्याबाहेरच्या बोलींचा त्यात फारसा समावेश नाही(म्हणूनच गोव्यातील कोंकणी त्यात नाही). पण त्याने दिलेलं क्लासिफिकेशन, त्याचे भाषा आणि बोली या संबंधी विचार हे आजच्या काळातही रेलेवंट आहेत. तसं 'भाषा' च्या कामाचं नक्की काँट्रिब्युशन काय असेल, याचा अंदाज मलातरी येतच नाहीये.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सर्वभाषातज्ञ एकमेकांकडे बोते दाखवताना दिसतात २१व्या शतकात बोलीभाषांचे संपूर्ण शब्द संग्रह आणि व्याकरण युनिकोडातून आंतरजालावर उपलब्ध असावेत यासाठी फारसे काही होताना दिसत नाही, बोलीभाषा नव्या तंत्रयुगात जगल्या काय मेल्या काय या बाबत अभ्यासकही त्यांना समजूनही काही विशेष करताना दिसत नाहीत (त्यातील काहींना कॉपीराइटची पडलेली असते) सर्वसामान्य जनतेच्या हातात आज आंतरजालासारखे साधन येऊनही तेही आंतरजालावर बोली भाषेबाबत कधिमधीच्या अशा मनोरंजनात्मक चर्चेपलिक्डे जाऊन काही विशेष करताना दिसत नाहीत. आंतरजालावर अनेक वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला तुमच्या बोलीभाषेतील शब्द संग्रह शब्दार्थ युनिकोडातून नोंदवता येऊ शकतात, पण मराठी भाषक आणि बोलीभाषांचे भाषक (आणि त्यात अभ्यासकही आले) दुर्दैवाने या बाबत अत्यंत उदासिन आहेत.

In reply to by माहितगार

तुम्ही विकीपेडीया वरती मराठी भाषे संदर्भातील अधिकाधिक विदा उपलब्ध करुन देऊन जी आपल्या मराठी मायबोलीची सेवा करतात ती खरोखर कौतुकास्पद आहे. मला या तुमच्या कठीण कामाचा नेहमीच आदर वाटतो. कुठलाही लाभ मिळत नसतांना केवळ एक पॅशन म्हणुन ते ही इतक्या दिर्घ काळ सातत्याने तुम्ही जे करता त्यासाठी तुम्हाला सलाम ! मी नेहमी बघतो की कुठलीही चांगली माहीती असेल तर तुमची एक तळमळ असते की ती विकीपेडीया वर मराठीत यावी. तुमची ही धडपड प्रयत्न मला फार ग्रेट वाटतात. शिवाय तुम्ही लवचिकतेने जिथे विदामध्ये चुका असतील तर त्या सुधारण्याविषयी पण तत्पर असतात. तुम्ही अजिबात तिथे रीजीड नसतात. मी तुमच्या या कार्यासाठी मनापासुन तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही ज्या एकंदरीत उदासीनते बाबत म्हणता ते खरचं आहे. आपल्या मराठीत तुमच्यासारखे तळमळीने काम करणारे लोकं आहेत ही मोठी दिलासादायक बाब आहे. तुमच्यामुळे इतके तरी होत आहे. नाहीतर माझ्यासारख्या आळशी लोकांकडुन काही झाल नसत. तुमच्या कार्याला मनापासुन शुभेच्छा !

उत्तम धागा मारवा तुम्ही सन्कलीत केलेली हि माहिति खूप अभ्यासपुर्ण आहे. भाषा आणि तिचे डायलेक्ट्स ठिकठिकाणी बदलत असतात.

आवडलं राव

भाषाभ्यास आपला आवडता विषय. बाकी, गणेशदेवींबरोबर आम्ही एका जातीच्या बोलीवर काम करत आहोत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, बिपिनचा "तपशील?" या प्रश्नाशी सहमत आहे. बोली भाषांबबातचे शब्दसंग्रह आणि व्याकरणासहीत सविस्तर तपशिल आंतरजालावर युनिकोडातून मुक्तपणे उपलब्ध असणे अत्यंत जरुरीचे आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

बिका आणि माहितगार, डॉ.गणेशदेवींनी भारतातल्या विविध जातींच्या बोलींचा अभ्यास करायचं ठरवलं आहे. मी आणि माझा सहकारी मित्र अशाच एका जातीच्या बोलीचा अभ्यास करत असून लोकगीते, बोली, शब्द अर्थ, असं ते काम आहे. आम्ही बरीच लोकगीते जमवली आहेत. शब्द आणि त्याचा अर्थ असे काम बाकी आहे. -दिलीप बिरुटे

भाषा हा माझा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे तुमचा लेख खूप आवडला.

माहिती. एकच गोष्ट वेगवेगळ्या बोली भाषेत वाचताना मजा आली.

आयला पन आमी साता-याची मान्स बोलतो ती मराठी नेमकी कुठल्या बोली मधी मोडती? म्हन्जे 'प्रमाण बोली' का आमची वेगळी सातारी? का आजुन कुठली?

खानदेशी बोली ( अहिराणी ) " तुम्हीनं ज्ये पत्र धाडलत त्ये मल्ये कालदी मंगळवारी भेटलं, मांगो दुला आठी कालदी उतवा. त्याले मीनं सांगलं की वावरात पळह्यामधून सन तूरनी शेंग प्येरी दे. औंदां कपाशील्ये भाव नाही आन गेल्या वरसी मेघराजाकन कपाशीच येक बोंडबी भेटलं नाही. माझी अवस्था मले मालुम की देवाल्ये मालुम. कसा तरी दिवस काढी राहिनो आहे बरे. रववाराच्या बाजाराल्ये दोन गोर्‍हे घेइसन टाकतो. नवरीच्या चितांग आन वाकरवाळ्या गहान टाकीसन रुपये कहाडीन". हाई खांन्देस्नी अहिरानी ना नाव खालते जे काय लिखेल शे तिले कोन्ती भासा म्हंतस?

" तू धाडेल पत्र माले काल्दिन मंगयवारना रोज भेटनं, मांगो धल्ला काल्दीन आठे उना . त्याले मी सांगेलशे , कपाशीना वावरमां, तूरनी शेंग पेरी दे. यंदा कपाशीले भाव नई शे आनी गया सालमां तं आभायमाथीन पानी च उना नै म्हनीसन कपाशीना एक बोंड भी भेटनं नई. मना काय हालं व्हयना ते माले माईत अन देवले माईत. कसा तरी दिन काढी र्‍हायनू बरंका. आयतवारना बाजारमां दोन गोर्‍हा लई लीसू. त्यानकूरता नवरीना बाळ्या आन चितांग गहान ठी दिसू पैसाना करता." असे लिहिले असते तर आम्ही म्हणालो असतो की ही ' खान्देशची " अहिराणी बोली " आहे. उगीच कै च्या कै लिहुन भ्रम निर्माण करु नये .