Skip to main content

घर शिफ्टिंग प्रक्रिया मदत धागा

लेखक स्पा
Published on सोमवार, 16/11/2015
घर शिफ्टिंग हा मोठा प्रोजेक्ट पुढील महिन्यात अंगावर पडलेला आहे. यापूर्वी कधी घर शिफ्ट केलेले नसल्याने अमळ टेंसन आलेले अाहे . कुठून सुरुवात करायची हे कळत नाहीये, सुरवातीला वाटलेलं तसं बोलवा ट्रक भरा सामान, आणि करा शिफ्ट इतके सोपे प्रकरण वाटत नाहीये. अत्ताचे घरच अलिबाबाची गुहा झालेली अाहे.इतके सामान माळ्यावर आहे. सबब घर शिफ्टींग विषयीच्या टिप्स, डुझ अँड डोंट्स , आणि मिपाकरांचे शिफ्टिंग चे अनुभव यासाठी हा छोटेखानी धागा.

वाचन संख्या 15064
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

हम्म. पायावर चक्र गोंदवलेलं असल्याने या विषयाचा चांगलाच तगडा अनुभव आहे. घर शिफ्ट करण्याची एस ओ पी अनेक बाबींवर अवलंबून आहे. या बाबींवर घर शिफ्ट करायचा अनुभव "कधी शिफ्ट झालो कळलंदेखील नाही" ते "पुढे महिनाभर पाठ दुखत होती" या रेंजमध्ये कुठेही बसू शकतो. तर त्या बाबी अशा: १. दोन घरांमध्ये अंतर किती आहे? १अ. दोन्ही घरांचे मजले? १ब. लिफ्टची सोय दोन्ही घरांना आहे का? २. पॅकर्स-मूव्हर्स कंपनीचा खर्च करायची तयारी / इच्छा आहे का? ३. किती दिवसांत / तासांत शिफ्टिंग करायचं आहे? दोन्हीपैकी एक घर काही दिवसा/तासांनंतर/आधी अनुपलब्ध असण्याची शक्यता आहे का? ४. शिफ्ट होणार्‍या लोकांमध्ये संपूर्णतः परावलंबी मंडळी किती? (उदा० अंथरुणाला खिळलेले, वयोवृद्ध किंवा तान्ही बाळं) ५. शिफ्टिंग करण्यासाठी कर्त्या तरूण नौजवानांची (वय १५ ते ३५) संख्या किती आहे? ५अ. त्यातले टांगारू आणि रडार यंत्रणा बसवलेले किती? (त्यांना धरू नका.) ६. घरातल्या मौल्यवान वस्तू काही काळ ज्यांच्याकडे विश्वासाने सोपवता येतील असे मित्र / नातेवाईक जवळ राहतात का?

In reply to by आदूबाळ

१. दोन्ही घरातले अंतर साधारण दोन किमी १अ. जुने घर पहिल्या मजल्यावर लिफ्ट नाही, नविन घराला लिफ्ट आहे, चौथा मजला २.पॅकर्स आणि मुव्हर्स लागतीलच, पण त्यांची कार्य पद्धती माहित नाही. ३.दहा आधि ताबा मिळणार आहे, सो दहा दिवस आहेत. ४.परावलंबी कोणी नाही, पण वयोव्रुद्ध आहेत. ५.कोणीही नाही. ६.होय , असे लोक जवळ आहेत.

In reply to by स्पा

ओके. पहिली गोष्ट करणे म्हणजे जे सामान शिफ्ट करायचं आहे त्याची यादी (याद्या) करणे. यादी अ. मौल्यवान वस्तू (दागिने, चांदीची भांडी, देव, महाग साड्या, लॅपटॉप, टॅब वगैरे). हे आदल्या दिवशीच विश्वासू मित्र/नातेवाईकाकडे सुपूर्द करून या. यादी ब. रोजच्या वापरासाठी अनिवार्य वस्तू (टूथब्रश, पेस्ट, चहाचं भांडं, चारपाच कप, दोन दिवसांचे कपडे वगैरे.) आपण घरात रोज कोणत्या वस्तू वापरतो याच्या दोनतीन दिवसांच्या निरीक्षणातून ही यादी तयार होऊ शकते. गावाला निघाल्यासारखं बॅगांमध्ये या वस्तू पॅक करून स्वहस्ते नवीन घरात नेऊन ठेवाव्यात. नाशिवंत गोष्टी (उदा. भाजी) संपवून टाकाव्यात. यादी क. तुटूफुटू शकणार्‍या वस्तू (काचसामान, क्रोकरी, फ्रेम्स वगैरे). पॅकर्स आणि मूव्हर्स "फ्रजाईल" वगैरे स्टिकर्स लावून हे नीट नेतात, पण थोडी जरी मोडतोड झाली तरी उगाच टेंपर हलतं. त्यामुळे याची जबाबदारी आपण घेणे योग्य. यादी ड. पुस्तकं. (पॅकर्स सर्वात जास्त दुर्लक्ष पुस्तकांकडे करतात असा अनुभव आहे.) यादी इ. जोड्याने येणार्‍या वस्तू. (चपला, स्पीकर्स, सूट) यातली एक गोष्ट हरवली/मोडली तर दुसर्‍याचा काहीच उपयोग नसतो. तेव्हा या गोष्टी आपणच एकत्र बांधून ठेवाव्यात. यापैकी अ, ब आणि क या गोष्टी स्वहस्ते नवीन घरात नेऊन ठेवाव्यात. ड आणि इ साठी पॅकर्सवर करडी नजर ठेवावी.

आदूबाळ यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आवश्यकच आहेत पण... २. पॅकर्स-मूव्हर्स कंपनीचा खर्च करायची तयारी / इच्छा आहे का? ह्याला होकार असेल तर बाकी गोष्टी विसरा... सगळे सामान एकट्याने तीन तीन माळे चढवण्यापासून ते प्रोफेशनल पॅकर्स-मूवर्स वापरेपर्यंत मला अनुभव आहे. त्यामुळे इच्छा व तयारी असल्यास पॅ-मू बेस्ट. नो झंझट-नो खिटखिट.

In reply to by संदीप डांगे

नसती चवचव रहात नाही. ते निर्वीकारपणे 'ये चैये क्या?' असं विचारतात. टॉस उडवून उत्तर द्यायचं. आणि हो, एक भंगारवाला शोधून ठेव आधीच :)

In reply to by आदिजोशी

'ये चैये क्या' हा प्रश्न टाळायचा असेल तर नको असलेले सामान आधीच काढून टाकणे हा उपाय आहे. बाकी हाताशी दहा दिवस असल्याने किमान ७ दिवस तरी हे काम करण्यासाठी व वेगवेगळ्या कंपन्यांकडून कोटेशन घेण्यासाठी पुरेसे आहेत. पॅ-मू आधी घरी येऊन सामान बघुन मग कोटेशन देतात. घासाघिस करायला भयंकर वाव आहे. पॅ-मू निवडतांना: १. नॅशनली ब्रँडेड, मोठी कंपनी टाळा. चिक्कार पैसे घेतात. सगळे पैसे अ‍ॅडवांस मागतात. नको असेल तरी इन्शुरन्स गळ्यात मारतात. २. गावातलीच कंपनी बघा शक्यतो किमान दहा वर्षांचा अनुभव, व ओळखीतले रेफरेन्स असतील अशी. पैसे कमी आणि काळजी जास्त. पॅकिंगमधला दिखावूपणा नसतो. खरंच उपयोगी असेल तितकंच पॅकिंग मटेरीअल वापरतात त्यामुळे कोटेशन कमी असतं. ३. नाक्यावरची मंडळी टाळा. ४. कोटेशनमधे जमतील तेवढे कापून, डिस्पॅच आणि डीप्लॉयमेंट झाल्यावर सगळ्या लेबरला ५०-५० दिले तरी ते लोक लक्षात ठेवून पुढे आपण कोणासाठी त्यांना रेफर कराल तर पुढच्यांनाही चांगली सर्विस मिळते. (वरिल मुद्दे स्व-अनुभवावर आधारित. पॅ-मू चे व्यावसायिक मूल्यमापन नाही. निर्णय घेतांना पूर्ण विचार करावा.)

१) सरळ मूवर्स अँड पॅकर्सना कॉल कर. सगळं तेच करतात. आपल्याला फक्त लक्ष ठेवावं लागतं, गधा मेहेनत शून्य. २) मूल्यवान वस्तू लॉकर मधे ठेव. खिशात जास्तीची कॅश ठेव. ३) काही गोष्टी ज्या लॉकरमधे ठेवता येत नाहीत (लॅपटॉप सारख्या) त्यांच्या २-३ बॅगा मात्र वेगळ्या ठेऊन पाळतीवर एक माणूस कायम बसव. त्याचं काम तेच. लघवीला जातानाही कुणालातरी खो दिल्याशिवाय त्याने जायचं नाही. ४) शक्य तेव्हढी अडगळ कमी करायची ही संधी मात्र सोडू नकोस. न लागणार्‍या गोष्टी रूथलेसली टाकून दे. सुखी होशील.

In reply to by आदिजोशी

पॅ.मु वाले सामानाची वाट लावतात, गहाळ करतात, अर्धे काम आपल्यालाच करावे लागते, नवीन घरात सगळं तसच टाकून जातात, असे अनेक प्रोब्लेम दिल्याने चिंता वाढलेली आहे, पॆसे खर्च करण्याचा विषय नाहीये, ते करुन विनाझंझट काम होत असेल तर त्या सारखे सुख नाही, जुन्या गोष्टिं उदा. भांडी,कुंडी यात मातोश्रींचा जीव अडकल्याने भंगार प्रकरण मोठ्या कॊशल्याने हाताळावे लागणार आहे

In reply to by स्पा

पॅकींग करणे आणि तिथे नेऊन सामान मांडणे असे दोन्हीचे बोलून घ्यावे. पॅकींगवाल्यांवर आपल्याला लक्ष ठेवावेच लागते. अशा वेळी प्रत्येक खोलीत आपला एक माणूस असलेला बरा. ते भराभर सामान पॅक करताना आपण लक्ष ठेवले तर काही प्रॉब्लेम होत नाही. मी मुंबईतल्या मुंबईत २ वेळा आणि एकदा बंगळूरूहून मुंबईला असेच सामान हलवले आहे. आपलं काम लोकं करणार म्हणजे थोडी फार झंझट होणार पण शारीरीक श्रम टळतात.

जुन्या घरात वापरात असलेल्या वस्तु , पण ज्या नविन घरात वापरणार नाहीत (उदा. पडदे, लहानमोठे लाकडी अथवा लोखंडी फर्निचर इ. ) त्याची व्यवस्था आधी लावा. नविन घरातील स्टोअरेज स्पेस चा अंदाज घेऊन, त्यात नीट राहील इतकेच सामान न्यायचा प्रयत्न करा. अजून एक महिना आहे त्यामुळे जास्तीच्या वस्तुंचे व्यवस्थापन करणे शक्य होईल बहुदा. याचा फायदा म्हणजे नविन घर काही काळ तुम्हाला प्रशस्तं आणि रिकामे वाटेल. मग ती जागा भरून काढण्यासाठी नविन वस्तुंची खरेदी करण्याचा आनंद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मिळेल. आणि मग काही काळानंतर तुमचे घर परत अलिबाबाची गुहा होईल. अनुभवाचे बोल आहेत हे ... :)

आपण पुण्यात असाल तर माझा अनुभव शेअर करावासा वाटतो. पुण्याच्या आजूबाजूला खूप विकास झालाय आणि त्याबरोबर काही गुंड मवाल्यांचे त्रासदायक अनुभवही घर शिफ्टींगच्या वेळी येत आहेत. झाले असे की दोन वर्षांपुर्वी मी विश्रांतवाडीवरून विमाननगर येथे शिफ्ट झालो. एका मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीला सामान बांधणे, ट्रकमधे चढवणे, पुन्हा नवीन जागी उतरवणे असे सगळे काम दिले होते. त्या कंपनीच्या माणसांनी काहीही त्रास दिला नाही. सगळे सामान इमानेइतबारे बांधले आणि ट्रकमधे चढवले. प्रॉब्लेम सामानाचा ट्रक जेंव्हा विमाननगरच्या इमारतीजवळ आला, तेंव्हा आला. दोन अत्यंत माजलेले टगे मोटारसायकलवर आले आणि मला दमदाटी करू लागले की साहेब आम्ही माथाडी संघटनेचे आहोत आणि इथे आमची मोनापली आहे. आमच्याशिवाय इथे आम्ही कुणाला सामान उतरून देत नाही. मी त्यांना सांगीतले की हे आम्हाला कसे माहीत असणार. मी कंपनीला सर्व काँट्रॅक्टचे अमूक अमुक पैसे दिले आहेत. तर ते म्हणे आम्हाला ते काय माहीत नाही. तीन हजार रुपये दया. आम्ही सामान खाली करतो. त्या मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीच्या माणसांना त्यांनी दम दिला की सामान उतरवले तर खबरदार. मी तिथे रहाणा-या शेजा-यांना विचारले तर ते म्हणाले हे त्यांचे नेहमीचेच आहे. ते गुंड आहेत आणि आपण काही करू शकत नाही. पोलीसांना सांगीतले तर हे लोक इथेच त्या माथाडी संघटनेच्या ऑफीसमधे बसलेले असतात. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला त्रास देतील. त्यापेक्षा त्यांना थोडेफार पैसे देऊन तडजोड करा. त्यां गुंडांनी एक हजार रुपयांची मागणी केली. झक मारत सहाशे रुपयांवर तडजोड करून त्यांना कटवले. ते गुंड गेल्यानंतरच त्या मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीच्या माणसांनी सामान ट्रकमधून उतरवले. विनाकारण त्या ऐतखाउंना सहाशे रुपये द्यायला लागल्याबद्द्ल अक्षरशः संताप संताप झाला. तुम्ही सावध व्हावे म्हणून हा अनुभव शेअर करावासा वाटला.

म्हणजे हेच..माथाडी कामगारांचे पण ते जाउदे. दोन घरातले अंतर एव्हढे कमी असेल तर सरळ टेंपो स्टँड्वर जा, एका टेंपोवाल्याशी बोलुन भाव करा. त्यलाच दोन कामगार आणायला सांगा. छोटे सामान शक्यतो गोण्यात भरुन ठेवा ,जसे की भांडीकुंडी. मोठे सामान,बेड,कपाटे,फ्रीज वगैरे ते लोक बघतील. नव्या घरी सामान घ्यायला कोणालातरी बसवा. आणि तुम्ही स्वतः इकडुन एक एक करत सामान पाठ्वा. २-३ फेर्‍यात होउन जाइल हा.का.ना.का.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ती लोकं 'आदळआपट सम्राट' असतात. त्यांच्या लेखी सिमेंटची पोती आणि टीवी, फ्रीज यात फरक नसतो. तेव्हा बचके रैना रे बाबा...

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

यात पैसे व सामान याचे दुहेरी नुकसान आहे. सामान जास्त असेल तर खूप फेर्‍या मारायला लागती. दोन किमी हे अंतर पुढचीच बिल्डिंग इतकं कमी नसतं. किमान एका फेरीचे गाडीनुसार ६०० ते १२०० कितीही होउ शकतात. माणसी ३०० रुपये मजुरी. लक्ष ठेवायला व मॅनेज करायला माणसे जास्त लागतील. नाक्यावरली माणसे हो हो करून, अनुभव आहे असे दाखवून फसवतात. नंतर आपलं सामान त्यांच्या हातात आणि आपलं हार्ट आपल्या हातात अशी अवस्था होते. (हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, सरसरकटीकरण नाही.)

जास्त व्यवस्थित बोलता येईल....

एका प्याकर्सचा अनुभव बंडल होता, बाकीवेळा चांगले प्याकर्स व मूव्हर्स मिळाले. तेही आत्ता जरा परवडतय म्हणून. आधी आमचे आम्ही सामान मूव्ह करायचो. आधी मौल्यवान वस्तू, दागिने, पूजेची चांदीची उपकरणी, देवार्‍ह्यातले देव, मनगटी घड्याळे वगैरे विश्वासू लोकांकडे नेऊन द्या. एका मोठ्या स्टीलच्या डब्यात (साठवणुकीचा तांदळाचा, कणकेचा डबा वापरता येईल) शालीत गुंडाळून ते नेऊन द्या. म्हणजे फूट तूट नको. माळ्यावरील सामान व मोडके, जुने सामान जे आता टाकून द्याचे आहे ते आधी कमी करा, म्हणजे ते मधे मधे येणार नाही. एरवी न दिसणार्‍या माळ्यावरील गोष्टीत वयस्कांचा जीव अडकलेला असतो. आमच्याकडे आमच्या बालपणीच्या निबंधांच्या वह्या गावोगावी मिरवत आल्या आहेत. आता त्याला वाळवी लागली असेल पण त्या अमूल्य आहेत असे शिनियरांना वाटते. अमूक एक आता टाकायला हवे/ठेवायला हवे या चर्चेसाठी हाताशी वेळ ठेवा. जाऊ दे, नंतर ठरवू असे केलेत तर संपले. मग पुन्हा ती वस्तू माळ्यावर जाऊन बसेल. अगदी उरापोटी जपलेल्या वस्तू राहू द्या. त्यावरून फार वाद घालू नयेत. आमच्या मातोश्रींनी हळदीकुंकवाला लुटून आलेले दोन चमचे अजिबात टाकलेले नाहीत, वापरतही नाही. नंतर जे सामान शेवटचे आठ दिवस लागणार नाही ते प्याक करत करत बेडरूममध्ये (किंवा लिव्हिंग रुमात) ठेवत यावे. नीट रचावे. ब्याल्कनीत ठेवू नये. जगाला प्रदर्शन होते की आपण मूव्ह होतोय. हातातील कागदावर बॉक्स क्र. व त्यात असलेले सामान एकीकडे लिहीत जावे. मुव्हींगच्या अदल्या रात्री आपले स्वयंपाकाचे फोडणीचे सामान, जरुरीची भांडी पातेली, ताटे, चमचे, पिठे, चादरी, सतरंजी पोत्यात, बॉक्सात घालून आधीच नव्या घरी नेऊन ठेवावीत. आपले निदान तीन दिवसांचे कपडे सूटकेसमध्ये घालून नेऊन ठेवावेत. सकाळचे आवरून घरातील एका माणसास तिकडे नेऊन बसवावे व दुसर्‍या माणसास जुन्या घरी ठेवावे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था आधीच ठरवावी. ऐनवेळी भूक भूक होते व समोर सगळा पसारा असतो. मग हे सापडत नाही आणि ते कुठे ठेवलेय यावर चर्चा होते व हाती काही लागत नाही. सगळ्या वस्तू अनप्याक करायला वेळ असल्यास लगेच झोपण्याची व्यवस्था करून टाकावी. अन्यथा पुन्हा बेडरुमात सगळी बॉक्सेस नीट रचून ठेवावीत. नंबर्स दिसतील अशी. खरंतर रजा घेऊन ते काम एका दिवसात होऊ शकले तर बरे आहे. नंतर अगदी नीट व्यवस्था लावणे, ऑर्गनाईज करणे अनेक दिवस चालू राहते. एकदा जागेवर ठेवलेली वस्तू काही दिवसांनी तिथे गैरसोयिची वाटू शकते व पुन्हा सगळे बदलते. प्रत्यक्ष मुव्हींग करून संपले की जीव गेल्यासारखा वाटतो. एक मोठे काम झालेले असल्याने पिठले भात खाऊन पथारी पसरून झोपून टाकावे. दुसरे दिवशी उठल्यावर डोक्याला हात लावायची वेळ तशीही येणारच असते. तळटीप: वास्तूशांत आपल्या सोयिने नंतर होणार असेल तर ठीक, अन्यथा सामान हलवण्यापूर्वीच मोकळ्या घरात करून घेणे. आता लग्नाचा विचार चालू असेल तर ग्रहमख करण्याआधी वास्तूशांत झालेली असणे आवश्यक आहे. त्यावेळी वास्तूशांतीसकट सगळ्या गोष्टी एकदम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. बाकी काय ते गुर्जी सांगतील.

In reply to by रेवती

सविस्तर प्रतिसादासाठी ठांकू रेवती तै :) आमच्याच बाजूची बिल्डींग काही महिन्यांपूर्वी अचानक कोसळल्याने तडकाफडकी सर्वांनाच शिफ्ट व्हावे लागत आहे, जुन्या बिल्डींग्स ना महापालिकेने नोटीस बजावलेली आहे . म्हणून आत्ताही आम्ही रेंट नेच शिफ्ट होत आहोत . अचानक हि भानगड मध्ये उपत्ल्याने मंथली बजेट बर्यापैकी कोसळणार आहे :) नवीन घर असले तरी भाड्याचेच आहे, सो त्याच प्रमाणात खर्च करायचा आहे .

In reply to by स्पा

बजेट मूव्ह असल्यास आपले प्याकींग आपण करावे. बजेटवर असताना केलेल्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटीज या अनुभव समृद्ध करणार्‍या व पुढील आयुष्यात ताजंतवानं करणार्‍या असतात. ता. क. फुलांच्या कुंड्या अगदी शेवटी न्याव्यात व शेजार्‍यांन्ला दोन दिवस पाणी घालण्यास सांगावे.

In reply to by रेवती

बजेट मूव्ह असल्यास आपले प्याकींग आपण करावे. बजेटवर असताना केलेल्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटीज या अनुभव समृद्ध करणार्‍या व पुढील आयुष्यात ताजंतवानं करणार्‍या असतात.
सहमत आहे. अवांतर - 'Moving experience' असा शब्दप्रयोग यातूनच आला असेल काय? ;)

In reply to by रेवती

आता लग्नाचा विचार चालू असेल तर ग्रहमख करण्याआधी वास्तूशांत झालेली असणे आवश्यक आहे.
काय रे देवा!! =))

स्पा , तब्येतीची आणि विशेश करुन पाठीची काळजी घे रे बाबा ! अवांतर : बाकी तु मिपावर परत आला असल्याने तुझे ते फेसबुक स्टेटस वॉईड होते ना रे ... आता तुला स्पांडु , पांन्डुब्बा , स्पाऊली , स्पांडुरंग , स्पारायण वगैरे नावांनी हाक मारली तर हरकत नाही ना ;) =))

भरपूर वेळ हाताशी आहे ही चांगली गोष्ट आहे. सर्वप्रथम मूव्हर्स आणि पॅकर्सला न बोलावता तुम्ही थोडे कष्ट घेवून सामान पॅक करणे आणि त्याची वाहतूक करणे याला मानसिकरीत्या तयार असलात तर तो ऑप्शन निवडा. भरपूर पैशांची बचत होईल आणि जुन्या घरात सामान तुम्ही स्वतः पॅक करत असल्याने नवीन घरात सामान लावणे सोपे पडेल. सर्वात महत्वाचे - दोन्ही घरातील अंतर दोन किमी असल्याने एकच छोटा हत्ती टाईप वाहन दिवसभर भाड्याने घेणार आहात की आयशर, ट्रक सारखे अजस्त्र वाहन एकाच ट्रीपसाठी भाड्याने घेणार याचा निर्णय घ्या. दोन्ही प्रकारात किती खर्च होणार आहे तेही लक्षात घ्या. जर छोटा हत्ती ट्रीप नुसार पैसे सांगत असेल तर एकूण किती ट्रीपचे किती पैसे होतील व नक्की कोणत्या वाहनाला किती खर्च होईल ते पहा. सामान तुम्ही स्वत: पॅक करत असाल तर पुढील गोष्टींची गरज लागेल १) एखादी ४/५ लोकांची गँग - खोकी घरातून वाहनामध्ये आणि वाहनातून घरापर्यंत पोहोचविण्यासाठी. २) वाहन ३) भरपूर खोकी, सेलोटेप आणि मार्कर. सर्वप्रथम घरातल्या सामानाचे ढोबळमानाने वर्गीकरण करा. स्वयंपाकघरातील भांडी, खाद्यपदार्थ आणि धान्य, पिठे, पुस्तके, फर्निचर आणि मोठ्या वस्तू, पोत्यात भरून नुकसान न होणार्‍या वस्तू.. उदा चप्पल वगैरे. आता घरातल्या लोकांना सगळी खोकी सोपवा व एका खोक्यात एकाच प्रकारचे सामान भरण्यास सांगा. हे करताना खूप कमी वेळा लागणार्‍या वस्तू, कधीकधी लागणार्‍या वस्तू, नेहमी लागणार्‍या वस्तू अशा क्रमाने भरल्यास आणखी चांगले. खोकी भरताना सेलोटेप आणि मार्करचा मुक्तहस्ते वापर करा. खोक्यात काय आहे हे खोके न उघडता कळेल असे लिहा. आणखी शक्य असेल आणि घरातले तयार असतील तर प्रत्येक खोक्यावर कोड नंबर टाका. मी घराच्या शिफ्टिंगच्या वेळी "सामानाचे गंतव्य ठिकाण कोणते असणार आहे?" या नुसार कोड ठरवले होते. उदा, स्वयंपाकघरासाठी A, हॉलसाठी B, बेडरूमसाठी C, बाल्कनीसाठी D असे... नंतर कमी वेळा लागणार्‍या वस्तूंसाठी 3, कधीकधी लागणार्‍या वस्तूंसाठी 2, नेहमी लागणार्‍या वस्तूंसाठी 1. असे.. म्हणजे A1 लिहिलेले खोके सर्वप्रथम उघडून सामान लावावयास घ्यायचे.. असे करत D3 चे खोके महिना दीडमहिन्याने उघडले तरी चालेल. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे स्वयंपाकघरातील खोकी स्वयंपाकघरात, हॉलमधली हॉलमध्ये अशी पाठवता येतात. पुस्तकाच्या खोक्यावर एक पाकीट चिकटवून त्यामध्ये कोणती पुस्तके आहेत त्याची लिस्ट ठेवा. हाताशी एक साबण / हँडवॉश जरूर ठेवा. आयत्यावेळी बाहेरून काही खायला आणले तर हात धुण्यासाठी साबण शोधता शोधता सामोसा/कचोरी गार होवून जाते. शक्यतो घरातल्या सामानाचे पॅकींग स्वत: करा. खोकी नंतर रद्दीवाल्याकडे विकता येतात.

माझे दोन पैसे - चांगलेच मू-पॅ बघ बर्‍याच कटकटी कमी होतात. पैसे वगैरे वाचवण्यासाठी चुकूनही मित्र वगैरे बरोबर घेऊन करु नकोस. आपल्याला वाटते त्यापेक्षा भरपूर शारीरिक श्रमांचे काम असते. जेनो काम तेनो थाय! :) चौथ्या मजल्यावर जाणार आहेस त्यामुळे पलंग, सोफा, मोठी कपाटे यांची मापे घेऊन आधीच नवीन ठिकाणी जाऊन जिन्यांची वळणे, दरवाजे यांच्यातून ते आहेत तसे जाऊ शकतील का यांचा अंदाज घेणे. तसे होत नसल्यास भाग सुटे करुन घेऊन जाणे शक्य आहे का हे बघणे. तसेही शक्य नसल्यास ते ऐनवेळी भलतेच कटकटीचे ठरु शकते. नवीन ठिकाणी वीज जाते का? असेल तर कोणत्या दिवशी? हे तपासून ठेव त्यादिवशी अर्थातच मूविंग टाळणे. तरीही वीज गेल्यास हाताने सामान चौथ्या मजल्यावर नेणे आणि एलेवेटरमधून नेणे याचे रेट वेगळे असतात त्यामुळे ते व्यवस्थित बोलून तसे ठरवून घे. अन्यथा सामान अर्ध्या वाटेत आणि मूवर्स वाटेल ते रेट आयत्यावेळी सांगतात आणि देण्याखेरीज गत्यंतर नसते. नवीन बिल्डिंगला वॉचमन असेल तर आधी जाऊन एखादा चहा पाजून ओळख काढून ठेव. मूविंगच्या दिवशी मदतीला येऊ शकतो त्यालाही पाचपंनास रुपये देऊन ठेव. तुझी ओळख आहे म्हंटल्यावर मूवर्सही जरा दबून असतात. सामान खोक्यातून भरताना पॅकर्स बर्‍याचदा ओवरकॉन्फिडंट असतात त्यामुळे नाजूक वस्तू स्वतःच्या देखरेखीखाली नेणे/भरणे करावे. नवीन जागेत जाण्यासाठी शुभेच्छा! (घराच्यामूवपेक्षा बुद्धीबळाच्या मूव्ज सोप्या वाटणारा)रंगा टीप - लॅपटॉप आणि मोबाईलचे चार्जर्स कधीही पॅकिंगमधून पाठवू नयेत नवीन ठिकाणी फोन मान टाकत असतो आणि हमखास चार्जर ठेवलेले खोके सापडत नाही, बोंब होते! (हा स्वानुभव नाही, परंतु ऐकून आहे) :)

In reply to by चतुरंग

मुव्हींगबाबत सहमत. मुव्हींग हे आपले काम नव्हे. प्याकींग मात्र तो करू शकेल असे वाटतेय.

भेंडी !! मला न टार्‍याला दोन दोन क्वार्टर पाज. जुने घरंच भिंती खिडक्यांसकट नवीन जागेत नेऊन देतो तुला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा तू लग्न कर व तुझं घर शिफ्ट कर ना! मी पिठलं भात करून वाढेन, शिवाय विश्वासू मनुष्य म्हणून तुमच्या मौल्यवान वस्तूही सांभाळेन.

In reply to by रेवती

त्यापेक्षा तू लग्न कर व तुझं घर शिफ्ट कर ना! मी पिठलं भात करून वाढेन, शिवाय विश्वासू मनुष्य म्हणून तुमच्या मौल्यवान वस्तूही सांभाळेन.
काकु खर्र खर्र सांगायचं, माझ्या लग्नाचे येवढे का मनावर घेतले आहे? दूरची कोणी भाची-पुतणी उजवायची आहे काय??? ऑ ऑ? चिंतातुरकथेतील शंकाकुमार

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाय रे बाबा. आधी जेंव्हा तुला म्हणायचे तेंव्हा तीन चार भाच्या पुतण्या होत्या. आता त्यांची लग्ने होऊनही काही वर्षे झालीत. सध्या तू बरेच वर्षांनी सापडलायस तर जरा म्हणून घेते.

खरे तर हा एका लेखाचा विषय,,,पण "स्पा"साठी प्रतिसाद... घर बदलायचे असेल तर सर्वप्रथम घराने आपल्याला स्वीकारले पाहिजे. सहवास-विश्र्वास-प्रेम, ह्या त्याच्या पायर्‍या. १. कुठल्याही घरी सामान घेवून तडक जावू नये. २. मोठे सामान आधी शिफ्ट करा. ३. स्वयंपाकघर हे सर्वप्रथम लावा किंवा सगळ्यात शेवटी.सगळ्यात जास्त वेळखाऊ काम म्हणजे....स्वयंपाकघर...उत्तम स्वयंपाकघर लावायला जास्तीत-जास्त एक दिवस लागतो. निदान ३-४ दिवस पथारी घेवून रहायला जा. ह्यामुळे होणारे फायदे. १. पाणी जाण्याच्या वेळा समजतात. ====> त्याप्रमाणे पिण्याचे पाणे भरून ठेवता येते. २. घरात कुठे गळती आहे का? हे समजते. ====> प्लंबरला बोलावून लगेच ते काम करून टाकता येते. ३. वीज जाण्याच्या वेळा समजतात. ====> त्याप्रमाणे इन्व्हर्टरची गरज असेल तर, लगेच ते काम करता येते. ४. लाईटची नादुरुस्त बटणे समजतात. ===> वायरमनला बोलावून तेकाम करून टाकता येते. ५. रात्री रस्त्यावरील दिव्यांचा त्रास होत नाही ना, हे पण समजते. ===> तसा त्रास होत असेल तर, खिडक्यांना काळा कागद लावणे आणि जाड पडदे शिवणे. ६. डास आहेत का? हे पण समजते. ====> डास-झुरळे असतील तर आपण जाण्या आधी पेस्ट-कंट्रोल केलेले कधी पण उत्तम. ७. आपले वाहन पार्किंग करायची सोय बघून ठेवता येते. ह्या सप्तपदी नंतर, आपण होमाकडे वळू या. =============================== होमाला हात घालण्यापुर्वी, शक्यतो घर ३-४ दिवस रोज धुवून काढा.विशेषतः स्वयंपाक घर. होमाला लागणारे एकमेव साहित्य म्हणजे... मेझरिंग टेप आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कंफर्ट झोनची निवड.(संगणकाची जागा, हा माझी कंफर्ट झोन आहे.तो एकदा नक्की केली की, त्याच्या अवती-भोवती माझी इतर दुनिया.) पहिल्या दिवशी खालील सामान लावा. घरातील मोठे सामान म्हणजे.... १. फ्रीझ २. कपाट ३. सोफा सेट ४. डायनिंग टेबल ५. टी.व्ही. ६. पलंग ७. संगणक ह्या पाचही गोष्टी आदल्या दिवशी शिफ्ट करा.ह्यापैकी प्रत्येक गोष्टी शिवाय आपण १-२ दिवस नक्कीच राहू शकतो. १. फ्रीझ चालू करून ठेवा.शक्यतो पहिल्या दिवशी फ्रीझ मध्ये बर्फ आणि पाणी ह्या व्यतिरिक्त काहीच ठेवू नका. २. रिकामे कपाट लावून घ्या. जरूर तिथे पायाला सपोर्ट लावा. ३. सोफा सेट लगेच लागल्या जातो. ४. डायनिंग टेबल, लगेच लागल्या जाते. ५. टी.व्ही. नुसताच ठेवा.चालू करू नका.कारण एकदा टी.व्ही. चालू करून बसलात की, त्याच्याच कडे लक्ष द्याल. ६.पलंग लावून घ्या.गाद्या टाकू नका. ७. संगणक पण नुसताच जागेवर ठेवा. आता फ्रीझमधील थंडगार पाणी प्या आणि जुन्या घरी जा. दुपारी मस्त जेवण करा आणि झोप काढा. आता दुसर्‍या घरी जातांना प्रत्येकाचे वैयक्तिक सामान आणि टी.व्ही., डी.व्ही,डी, आणि संगणाकाचे सटर-फटर सामान घेवून जा. संध्याकाळी टी.व्ही. आणि संगणक चालू करून बघा. संगणाकावर गाणी ऐकता-ऐकता, प्रत्येकाने आपापले वैयक्तिक सामान लावून घ्या. ते लावून झाले की, परत आपल्या आधीच्या घरी जा.जेवा आणि झोपा. ----------------------------------- दुसरा दिवस हा घाम गाळणारा आणि वेळ खाऊ.... ह्या दिवशी फक्त स्वयंपाक घर लावा.हे काम घरच्या कर्त्या स्त्रीवर सोपवा. पुरुषांनी कितीही उत्तम प्रकारे स्वयंपाकघर लावले तरी, घरच्या स्त्रीया त्याला नाके मुरडतात.अशावेळी आपण सांगकाम्या व्हावे, हे उत्तम. ---------------------------------- तिसर्‍या दिवसानंतर आपला खरा संसार, नविन घराबरोबर सुरु होतो. ---------------------------------------- महत्वाची गोष्ट.... कितीही काळजी घेतली तरी, घर लावतांना थोडा फार त्रास होतोच..... त्यामुळे हसत-खेळत घर लावणे हाच अशावे़ळी रामबाण उपाय. ------------------------ बिंधास्त रहा.

उखळ ,पाटा वरवंटा , जातं, मुसळ ,सूप,बंब असलेस कळवावे आम्ही मदंत करू. एसी, डबल डोअर फ्रिज, म्युझिक सिस्टीम,,,इन्व्हर्टर ,व्है. क्लिनर, मायक्रो. असल्यास नातवास पाठवून देवू.(ह. घ्या.)

जुन्या जागेचे भाडे कमी असते ती एक महिना ठेवायची नवीन जागा मिळाल्यावर.रोज एक दोन फेय्रा मारून चिल्लर सामान नेऊन ठेवायचे नवीन जागेत.सर्वात शेवटी रिकामे कपाट आणि पलंग नेण्यासाठी गोदरेज शोरूमपाशी कपाटं नेणारे असतात त्यांच्याकडून घेऊन जायचे.गुपचूप आणि स्वस्तात होते.मी हेच केले होते.त्यावेळी सोफासुद्धा मी एकट्यानेच पहाटे नेला होता. लिफ्टवर एकाच दिवशी ताण पडत नाही.त्याच दिवशी लिफ्ट बंद झाली तर गोची होऊ शकते.

हीच ती वेळ आपले 6 abs test करायची.पाटा वरवंटा उखळ मुसळ बंब नेणे डाव्या हातचा मळ @दिवाकर.

कितीवेळा सामान हलवलं असेल राव...लै आठवणी ताज्या झाल्या. सामान हलवताना एक शिकलो की जे शाबूतपणे बाहेर निघेल ते सामान आपलं. बाकी आपलं कधी नव्हतंच. काच सामान फुटलं. फ्रीजचं दार निखळलं. पोचे आले. कपाटाचा रंग खरवडला त्यालाही पोचे आले- कशाचाही त्रास करून घ्यायचा नाही. हलवाहलव म्हणली की हे नुकसान गृहित धरायचं.त्रास कमी होतो.

अजून एक आम्ही करायचो. थोडं अन्न धान्य मागे ठेवायचो नवीन बिर्‍हाडकरुंसाठी. पण आपल्यानंतर आपण सोडताय त्या घरी कुणी रहाणे अपेक्षित नसावे. तेव्हा हा सल्ला द्यावा की नाही कळत नाही.

अरे वा मस्त. नव्या घरा साठी मन:पुर्वक शुभेच्छा. वरती सगळ्यांनी बरेच सल्ले दिले आहेत. मला जे सांगायचे होते ते सगळे वर आलेच आहे त्यामुळे आता माझ्या कडे नव्याने सांगण्यासारखे काहीच नाही. वरचे सर्व सल्ले काळजी पूर्वक वाच. आणि निट नियोजन कर. घर बदलण्याचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय असतो. बर्‍याच अडचणी येतील, काहि गोष्टींचा / जणांचा त्रास / मनस्ताप होइल, काहिही झाले तरी वैतागू नकोस आणि धीर सोडु नकोस. शांत राहिलास तर सगळ्या अडचणी आपोआप दुर होत जातील. आणि एका महत्वाचे ......... वर सल्ले देण्यार्‍या सगळ्या उत्साही (आणि अतिउत्साही) प्रतिसादकांना (माझ्या या प्रतिसादाला उपप्रतिसाद देणार्‍यांना , आणि माझ्या या प्रतिसादाखाली इतर प्रतिसाद देणार्‍यांना पण) घर हलवण्यासाठी बोलावून घे. सगळे जण आवर्जून येतीलच याची मला खात्री आहे. (पर्‍या आणि टार्‍या तयार आहेतच. (हा टारोबा हल्ली कुठे बरं असतो?) ) फक्त एकच कर, सगळे सामान हलवुन झाले की नव्या घरातच एका कट्टा करयचा असे घोषीत कर. एका दगडात तीन पक्षी होतील. १. घरातले सगळे सामान खात्रीलायक व काळजिपूर्वक हलवले जाईल. २. एक कट्टा होईल. ३. शेजार्‍यांना पहिल्याच दिवशी समजेल त्यांना आता कोणाला झेलायचे आहे ते. पैजारबुवा,

पॅकर्स-मूव्हर्सचा अनुभव चांगला आहे. तरी स्वत:ला मगजमारी थोडीफार करावीच लागते. हा घ्या माझा अनुभव.. http://www.misalpav.com/node/32118

हे माथाडीवाले पुण्यात सगळीकडेच माजलेले आहेत की काही ठिकाणीच आहेत?

In reply to by बॅटमॅन

पुण्यात सगळीकडे आहेत का माहीत नाही पण ब-याच ठिकाणी यांनी उच्छाद मांडलाय हे खरे. मुव्हर्स पॅकर्सवाले सुद्धा आधीच बुकींग करताना फोनवर सांगतात की ते माथाडींचे तुमचे तुम्ही बघून घ्या.

काही नाही हो.. नक्की कसं ते कळत नाही पण सगळं सामान आपोआप नव्या घरात जातंच आणि कसं तरी महिन्याभरात का होईना पण जागेवर लागतंच.. उत्सहात प्रतिसाद द्यायला आले होते पण मान्यवरांनी पार लग्ग्ना पर्यंतची काळजी वाहिलेली असल्याने मी पामर काय सांगणार. शुभेच्छा!! आणि हो.. रेवाक्का रॉक्स!

In reply to by पिलीयन रायडर

"नक्की कसं ते कळत नाही पण, सगळं सामान आपोआप नव्या घरात जातंच आणि कसं तरी महिन्याभरात का होईना पण जागेवर लागतंच.." ह्याला सहमती.

नविन घरासाठि खुप खुप शुभेच्छा!.

एकंदरीत मान्यवरांनी जवळपास सगळच कव्हर केलय तरी काही सूचना १. फ्रिज पॅक करण्यापूर्वी त्याचा ट्रे काढून पाणी फेकून कोरडा पूसून घ्यावा. २. वस्तु पॅक करताना डब्ब्य्यांवर क्रमांक टाकून एका कागदावर त्या डब्यात काय आहे हे नोंदवून ठेवावे. ३. कुंड्या असतील तर विशेष काळजी घ्यावी ४. पॅमु वाले जुन्या झाडण्या, माठ वगैरे फेकून द्यायचा सल्ला देतात, पण मी तो मानला न्हवता. ५. कुठल्या मजल्यावर सामान शिफ्ट कारायचय व लिफ्ट वापरता येइल की नाही हे आधीच स्पष्ट सांगावे नंतर खूप वाद होतात ६. बोलणी करताना कोटेशन मधे वस्तु पॅक करणे, लोडींग, अनलोडींङ, नविन घरात वस्तु चढवणे, उन्पॅकिंग उदा फॅन, बेड ईत्यादी याची तर्तूद तसेच सगळे सामान मानासारखे हवे तिथे लाऊन दिल्यावरच पूर्ण हिषीब केला जाईल हे सांगून ठेवणे. नंतर मनस्ताप वाचतो. ७. फ्रिजमधील शेल्फ जर सुटे असतील तर ते टेप लावून चिपकवून ठेवणे जेणेकरून ते फुटणार नाही. ८. सर्वात रिस्की काम लोणच्यांच्या बरण्या पॅक करणे असते चुकून जरी फुटली तरी सगळा सत्यानाश इतर सामानाचासुध्हा.

स्पा - मला स्वस्तिक नावाच्या पुण्यातल्या पॅ आणि मुव्हर्स चा अतिशय चांगला अनुभव २ वेळेस आला आहे. हा फोन नंबर - ९८२२० ७४०५१ तळटीप - माझा ह्यात काहीही वैयक्तीक फायदा नाही.

पॅ आणि मुव्हर्स चा कामाचा वेग प्रचंड असतो . pack करताना पण आणि सामान नवीन जागी ठेवताना पण. धडा धडा बॉकस आणून टाकायला सुरवात करतात आणि एकाच ठिकाणी रचतात सगळ सामान. त्यामुळे मोठ्या अक्षरात स्वयपाक घर, बाथरूम असे स्पष्ट लिहावे . दारात उभे राहून लगेच जो तो डाग त्या त्या ठिकाणीच ठेवायला सांगावा नाहीतर घरातल्या घरात हलवायला सुद्धा खूप कष्ट पडतात

In reply to by देशपांडे विनायक

पुण्याला २२ ता.ला ओरीगामी कट्टा आहे, त्या दिवशी ठेवलात तरी चालेल... नाहीतर, डिसेंबर १ रे ४ ह्या दरम्यान, (तारीख आणि इतर आनुषंगिक बाबी, अद्याप तरी नक्की नाही.) मुंबईला एक कट्टा आहे, तेंव्हा दिलेत तरी चालेल...

In reply to by मुक्त विहारि

पुण्याला २२ ता.ला ओरीगामी कट्टा आहे,
यह कब हुव्या? कट्टा असताना कट्टप्पांचा धागा नाही? कय्सा अनर्थ हयये, कय्सा अनाचार हयये!!

स्पा साहेब - तुम्ही घराचे शिफ्टींग आधीच करुन मग मिपाकरां ची परीक्षा घेण्यासाठी तर हा धागा टाकला नाही हे आधी नक्की सांगा. :-) प्रज्ञा ताईंनी सकाळपासुन मिपाकरांना कामाला लावले होते.

In reply to by प्रसाद१९७१

हे हे, नाही ओ प्रसाद साहेब.पुढील महिन्यात सुरु होइल. आदि ने सांगितल्याप्रमाणे सर्वात अाधी अता चांगला भंगारवाला शोधणे आहे

पॅकर्स-मूव्हर्सचा अनुभव फार चांगला नसल्यामुळे समान आपलेआपण हलवणे खूप सोपे आणि बरे!! कंबरेचा काटा थोडा ढिला होईल कदाचित पण हा टास्क स्वतः करणे खूप फायद्याचे ठरेल. त्यानिमित्ताने थोडी अंगमेहनत देखील होते. आपल्याकडे समान किती आहे ह्याची पूर्ण कल्पना येईल. त्यातले किती वापरता येण्याजोगे आहे ह्याची आपोआप मोजदाद होईल म्हणजे नको असलेल्या वस्तू परस्पर भंगारवाल्याकडे जातील. सामानाची बांधाबांध सुरु झाल्यावर जवळच्या भंगारवाल्याला रोज एक चक्कर टाकण्यास सांगावे ते घेऊन जाण्याचा आपला वेळ आणि श्रम वाचतात. किमती आणि नाजूक समान नंतर शिफ्ट करावे आधी मोठे आणि अति उपयोगी समान हलवावे. ते नव्या घरात लागल्यावरच नाजूक समान घरी आणावे. शिफ्ट करायची वेळ येईपर्यंत जुने पण चांगले खोके, धान्यांची पोती, मोठाल्या ब्यागा, दाभाण, माफिया ( प्लास्टिकचा मोठा दोरा), मार्कर असे समान जमवून ठेवा. दणकट वस्तू ( भांडी, छोटे डबे, जास्तीचे अंथरूण, पांघरूण) पोत्यात भरायला हरकत नाही. मात्र पोत भरले कि त्याचे तोंड शिवून त्यावर नंबर टाकून त्यातले जिन्नस दर्शनी भागात लिहून ठेवायचे. बाकी नाजूक सामानासाठी खोके आहेतच. सगळ्या डागांची यादी करावी. आणि त्याची १ कॉपी मुद्दाम शिफ्टिंग करणाऱ्या मुलांना द्यावी . शिफ्टिंगच्या वेळी जुन्या घरात दोन माणसे, टेम्पो जवळ एक माणूस , नवीन घरी एक माणूस, तसे समान खाली उतरवताना किंवा वर चढवताना त्यांच्या बरोबर एक माणूस ह्याप्रमाणे राहावे. बाकी जेथे समान ठेवायचे आहे तिथे घरातल्या लोकांपैकी कोणाला तरी थांबायचे आणि यादी नुसार समान आले कि नाही ते बघण्यास सांगावे. ह्यासाठी सिनियर सिटीझन सुद्धा चालतील. पण माणूस खमका हवा. घर शिफ्टिंग आधी सगळ्यांनी नवीन घरी जाऊन घर कसे लावायचे ह्याचा विचार करावा. सोफा, टेबल, कपाट, अशा मोठ्या गोष्टीची मापं ( उंची X रुंदी X लांबी X खोली) जवळ ठेवावीत जेणेकरून आपण निवडलेली जागेत ती गोष्ट बसतेय का ह्याचा अंदाज येईल. घर लहान असल्यास तर हा टास्क जरूर करावा. ( मला ह्या गोष्टीचा खूप फायदा झाला नंतर तर मी घरभर टेप घेऊनच फिरू लागले आणि जवळ जवळ सगळ्या गोष्टींची माप लिहून घेतली त्यामुळे त्याचा फायदा आता होईल ) जर घरात एखादा पाळीव प्राणी असल्यास त्यालाही नवीन जागेत घेऊन जावे तिथे त्याला आवडीचा खाऊ द्यावा तसेच काही वेळ तिथे त्याला खेळवावे म्हणजे त्यालाही त्या जागेशी जुळवून घेणे कठीण जाणार नाही. नवीन घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आधीच करून ठेवा. जमल्यास तयार सरबत वैगरे आणि सुका खाऊ जवळ ठेवा. बाकी सगळ्यांनी खूप उपयुक्त सल्ले आणि माहिती दिलेलीच आहे. ३ कामसू गडी (बायका पुरुष कोणीही) कामाला लागले की २ दिवसात घर पोत्यात आणि खोक्यात मावत. मात्र घर लावताना घरच्या बाईचा जास्त वेळ जातो. खूपसे पेशन्स ठेवावे लागतात. येत्या महिनाखेरला मीसुद्धा दुसरया घरी शिफ्ट होणार आहे. त्यामुळे माझ्या मनातील शिफ्टिंगसाठी केलेली छोटी मोठी तयारी शेयर केली. रच्याक नवीन घराच्या शुभेच्छा !! नवीन घर लागेपर्यंत देव तुम्हास उदंड पेशन्स देओ…

लिहिण्यात फार वेळ जाईल. फोन करते. अन्नपदार्थ शक्य तितके संपवायाच्या मागे लागा इतकेच सांगते . आणि फ्रीझ रिकामा ठेवायचा. मू पॅ वाल्यांशी घासाघीस करता येते ही टीप लक्षात ठेव. १४ हजारावरून ४ हजारावर उतरवता येते! :)